द्रोण : अरुण कोलटकरांच्या दीर्घकवितेचे रसग्रहण

- राजेश घासकडवी

***
डिस्क्लेमर : या कवितेत कवीने काहीसे भडक लैंगिक शब्द वापरले आहेत. अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वगैरेंसारख्यांच्या बाबतीत परिचित रामकथेत नसलेली काही विधानं केलेली आहेत. ती नावं ही रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये.
***

द्रोण


या कवितेविषयी लिहिताना कुठून आणि कशी सुरूवात करायची हा प्रश्न आहे. मुळात हिला कविता म्हणायचं, की दीर्घकाव्य म्हणायचं - नव्वद पानांत आणि पाच सर्गांमध्ये ती पसरलेली आहे - ते कळत नाही. छंद व गेयतेची बंधनं झुगारून देणारी, एकामागोमाग एक ठेवलेली वाक्यंवजा तीन ओळींची कडवी, अशी तिची काहीशी ढोबळ रचना आहे.

एवढा मोठा विजय मिळाला युद्धात,
रावणाला मारलं,
राक्षसांचा पराभव केला
म्हणून रामानं ठरवलं
विजयोत्सव साजरा करायचा.
आणि एक मोठ्ठी पार्टी दिली,

अशा ओळी वाचायला सुरुवात करतो तेव्हा तर कोणत्या आधारावर कविता म्हणायचं असा प्रश्न पडतो. एखादा गद्य परिच्छेद कडवीवजा वाक्यांमध्ये तोडल्याप्रमाणे पहिली काही पानं वाचायला मिळतात. केवळ कोलटकरांनी लिहिलंय म्हणून तिला कविता म्हणायची का, असाही प्रश्न पडतो. पहिल्या सर्गात काही कंटाळवाणी वाटणारी वर्णनं आहेत. जवळपास संपूर्ण पहिला पहिला सर्ग हा दोन पानांचं गद्य पातळ करून पंधरा पानं केल्याचा भास होतो. प्रस्तावनेत सूतोवाच केलेलं नसतं तर मी कदाचित तिथेच ही कविता सोडली असती - आणि अर्थातच उत्तम काव्याच्या आनंदाला मुकलो असतो. पहिल्या सर्गाच्या शेवटी शेवटी कवितेतल्या रूपकाची तोंडओळख होते, तेव्हा काहीतरी वेगळं वाचतोय याची जाणीव होते. दुसऱ्या सर्गात त्या रूपकाचा काहीसा अपेक्षित विस्तार होतो. पण त्या कल्पनेच्या वृक्षाला हळूहळू फांद्या फुटताना दिसतात, रूपकाचे नवीन पदर उलगडायला लागतात ते तिसऱ्या सर्गापासून. तिथून ही कविता आपली शक्ती दाखवायला लागते. एका अर्थाने पहिले दोन सर्ग हे मांडणीसाठी वापरलेले आहेत, तिथे बांधलेल्या भक्कम पायावरूनच ती पुढच्या भराऱ्या घेऊ शकते. इथपासूनच ती आपली गद्य भाषासुद्धा सोडते. गद्य भासणाऱ्या वाक्यांची जागा अर्थगर्भ, ओल्याकंच काव्यपंक्ती घेतात.

(तो गोष्टी सांगू लागला...)
अमंथित समुद्रांच्या,
अनाघ्रात आकाशांच्या,
कुंवार किनाऱ्यांच्या.

पाचूच्या चेटूकबेटांच्या.
वादळं वश असलेल्या मत्स्यकन्यांच्या.
देवमाशांच्या सुरतक्रीडेच्या.

यासारख्या ओळी वाचताना आपणही तीबरोबर भरारी घेतो. आपण आधी शंका घेतली याबाबत आपण मनोमन कोलटकरांची क्षमा मागतो. कविता जशी पुढे सरकते, तशी ती अधिक भव्यदिव्य होते. जणू काही हाडाच्या सांगाड्यापासून सुरूवात होऊन त्यात रक्तमांस, हृदय, मेंदू भरला जातो; तिला चेहरा मिळतो, एक धूसर शरीर मिळतं आणि त्या शरीराचं तांडव नृत्यही दिसायला लागतं. हा बदल होत असताना कवितेचे शब्दही जिवंत व्हायला लागतात. बोलेरो जर तुम्ही ऐकलं असेल, तर त्याची लय या कवितेला आहे. बोलेरोची सुरुवात लांबून विस्मृतीच्या गर्तेतून ऐकू येणाऱ्या सुरावटीने होते. नंतर तीच धून एखादा बॅंड पुढे सरकत आल्याप्रमाणे वाढत जाते, अंगात भिनत जाते. शेवटी संपूर्ण ऑर्केस्ट्राच्या ताकदीने ती आपल्याला घुसळून सोडते. तसंच काहीसं.

पहिल्या प्रस्तावनावजा पाच कडव्यात म्हटल्याप्रमाणे हे सर्ग वाल्मिकी रामायणात आढळत नाहीत, वानरांत आधीपासून प्रचलित असलेली ही रामकथा आहे - कदाचित वाल्मिकीपूर्वीचीही. इथेच कुणकुण लागते की ही कविता रामायणाविषयी नसून इतिहास, जेत्यांची संस्कृती व जितांची संस्कृती यांविषयी आहे. किमान ते तिचं एक अंग आहे. यातली वानरं, राम, लक्ष्मण, सीता हे प्रतीक म्हणून येणार आहेत. ही प्रतीकं कविताभर उलगडत राहातात. काही वेळा ती समजली आहेत, त्यांचा अर्थ हातात गवसला आहे असं वाटत असतानाच नवीन पैलू दिसतात. कधी कधी कवीने जाणूनबुजून एकच रूपक वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी वापरलं आहे. कोलटकरांचा खवचटपणा संपूर्ण कविताभर ठासून भरलेला असला तरी तो पहिल्या दुसऱ्या सर्गात प्रकर्षाने जाणवतो. ‘सीतामाई अग्नीने सर्टिफाय करून मिळाली’ म्हणणं काय किंवा एकंदरीतच ‘विचारवंत वानरांची’ चर्चा काय...

पहिल्या सर्गात रामाच्या पार्टीचं, किंबहुना पार्टीत काय काय असणार याचं, वर्णन आहे. काहीशी लांबलचक जंत्री आहे. पण मध्येच काही लक्ष वेधून घेणाऱ्या ओळी येतात.

लंकेच्या कोषागारातून
बाहेर आलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या
मौल्यवान वस्तू

(यादी...)

या प्रसंगी
विजेत्यांना पारितोषिक म्हणून
देण्यात येणार होते.

प्रत्यक्ष सागराने नजराणा म्हणून दिलेले मासे, रावणाच्या व लंकेतल्या धनिकाच्या तळघरातून आलेली दारू हेही असणार होते या पार्टीत. आणि ती दारू उसळणार, कारंज्याप्रमाणे, मयासुराने बनवलेल्या स्फटिक-अप्सरांच्या कुंभांतून व स्तनांतून. इथे जेते आणि जितांचं नातं स्पष्ट व्हायला लागतं. एका संस्कृतीचा विजयोत्सव हा दुसऱ्या संस्कृतीच्या अवशेषांवर, तिला लुटून होतो.

पण खरी मेख येते ती त्यापुढे. वानर व मानव यांचं त्या पार्टीपुरतं तरी पटावं, त्यांच्यात समता नांदावी यासाठी दोन तळी बांधलेली असतात. वानराने एका तळ्यात बुडी मारली की तात्पुरतं त्याला मानवाचं शरीर मिळतं. पार्टी संपल्यावर दुसऱ्या तळ्यात बुडी मारून पुन्हा वानर शरीर मिळणार असतं. पहिल्या तळ्यात बुडी मारून वानर मानवाचा देह प्राप्त करून घेतात. इतर मानवांना जोक्स सांगतात, त्यांच्याबरोबर व राक्षसांसोबत दारू पितात, राक्षसिणींच्या प्रेमाचे अधिकारी होतात. बीभिषणाने व मंदोदिरीने जातीने खपून आयोजित केलेली ही पार्टी नऊ दिवस सतत चालते.

या तळ्यांच्या रचनेतच कोलटकरांनी वर्णव्यवस्थेवर खवचट आणि खमंग टिप्पणी केलेली आहे. युद्ध जिंकण्यासाठी वानरांची मदत रामाला अर्थातच हवी होती. पण त्यांना आपल्या बरोबरीचं मानण्याची या कथेतल्या रामाची तयारी नव्हती. हा राम व्यवस्थेचा पालनकर्ता, आणि म्हणूनच व्यवस्थेच्या आतल्यांच्या (जेत्यांच्या) मते आदर्श राजा. पण ही कथा लिहिली आहे वानरांनी. त्या राजाने अत्यंत उदार होऊन या पार्टीपुरतं त्यांना मनुष्यत्व बहाल केलेलं होतं. पण तितक्यापुरतंच.

माकडाचा माणूस तर झाला. आता पुढे काय?

अर्थातच कवितावस्तूने निर्माण केलेल्या अपेक्षेप्रमाणे माणूस झालेल्या वानरांना विशेषत: त्यांच्यातल्या तरुणांना, माणूसच बनून राहावंसं वाटतं. हे आयुष्य छान आहे असं वाटायला लागतं.

काही ज्येष्ठ वानरांना
निदान जे विचारवंत होते त्यांच्यातले
किंवा नुसतेच भित्रे म्हणा

त्यांना हा शुद्ध वेडेपणा वाटत होता
चार दिवस गंमत
म्हणून हे ठीकाय असं त्यांचं मत होतं.

मग त्यांच्यातले एकेक जण उपदेश करतात. बदल किंवा कुठचंही स्थित्यंतर वाईट असं म्हणण्यासाठी जे युक्तिवाद केले जातात ते सर्व केले जातात. काही थोडेसे पटण्यासारखे, तर काही उघडउघड कोत्या दृष्टीकोनातले.

कोणी म्हणतो, शेपटी हे आपल्या जातीचं वैभव आहे, तीच तुम्ही टाकून देणार? थुत् तुमची. कोणी म्हणतो, मनुष्यसंस्कृतीचे नियम पाळणं आपल्याला झेपायचं नाही. तुम्ही जिन्यावरनं उतरण्याऐवजी पाचव्या मजल्यावरून चुकून उडी माराल आणि मराल. कोणी म्हणतं, गुळगुळीत कातडीचा माणूस म्हणजे केवळ माकडाचा अपभ्रंश. कोणी म्हणतं, ही माणसं म्हणजे फडतूस, कोणी पर्वत उचलेल का हातावर? (द्रोण हा शब्द न वापरता त्या कवितेच्या शीर्षकाचा एक अर्थ इथे हलकेच उलगडून दाखवला आहे. हा सुसंस्कृततेचा पर्वत पेलेल का या माकडांना?) कोणी म्हणतं की माणूस कल्पक आहे, पण त्याची कल्पकता ही भ्याडपणातून आलेली आहे. नौका, धनुष्यबाण वगैरे शोध हे निसर्गापासून, इतरांपासून दूर राहण्यासाठी लावलेले आहेत. कोणी म्हणतं, माणसाच्या जगात प्रत्येक झाड कोणाच्या मालकीचं असतं...

प्रत्येक बागेभोवती एक कुंपण असतं
आणि प्रत्येक कुंपणाबाहेर
कुणीतरी एक राखणदार उभा असतो.

एक वृद्ध कपी सांगतो की 'तुम्ही त्यांचं अंधानुकरण करता आहात... पण वात्सल्यभाव हा आपल्या मूल्यव्यवस्थेचा गाभा आहे, माणसांचं तसं नाही.' हे वाक्य लिहिताना कवीची ‘टंग’ त्याच्या ‘चीक’ला भोक पाडेल की काय इतकी ‘इन’ आहे, असं वाटतं.

काही वानर स्त्रिया या माद्यांच्या इतक्या मोठ्या आम्यांमुळे (स्तनांमुळे) मुलं गुदमरून कशी जात नाहीत असा प्रश्न विचारते. तर कोणी म्हणतं मानवपुत्रांना गुरुगृही पाठवल्यामुळे मातृप्रेम मिळत नाही, त्यामुळे ते कोरडे, हिंस्र होतात...या सर्व साधकबाधक ऊहापोहात एका संस्कृतीची दुसरीकडे बघण्याची कोती नजर कोलटकरांनी अधोरेखित केलेली आहे. एक गट दुसऱ्याकडे बघताना आपण व ते अशा रेषा आखण्याकडेच कल असतो. साम्य बघण्याऐवजी परस्परांमधले बारीकसे फरकदेखील उचलून धरून 'ते' कसे वेगळे (व म्हणून कमी दर्जाचे) आहेत हे विचार खूप वेळा पुढे येताना दिसतात. आपणदेखील पाश्चिमात्य संस्कृतीकडे अर्धवट माहितीवरून निष्कर्ष काढतो. व पाश्चिमात्यदेखील तशाच अर्धकच्च्या कल्पना बाळगून परतफेड करताना दिसतात. व्हिएटनाम युद्धाच्या काळात व्हिएटनामींना आप्तांच्या मृत्यूने तितकं दु:ख होत नाही अशी सोयीस्कर समजूत अमेरिकनांमध्ये पसरली होती (किमान ती तशी पसरवण्याचे प्रयत्न तरी झाले होते). एकंदरीतच कोलटकरांनी अत्यंत गंभीर रिपोर्टरी तटस्थतेच्या मिषाने एका बाजूने पूर्वग्रहदूषित विचारसरणीवर, कोत्या अनुमानपद्धतीवर तर दुसऱ्या बाजूने मानवी संस्कृतीच्या नावाखाली दडलेल्या स्वार्थावर सणसणीत कोरडे ओढलेले आहेत.

या सर्व उपदेशाला अर्थातच तरुण पिढी खास वानरी शैलीत पाठमोऱ्याने वाकून नमस्कार करून दाखवते. प्रश्न उपस्थित करून व त्यावरच्या साधकबाधक, कोरड्या, कर्कश ऊहापोहाची गंमत दाखवून हाही सर्ग संपतो.

***

मानव तर झालो. प्रस्थापित संस्कृतीचं सार तात्पुरतं का होईना, पण काबीज तर केलं. पण पुढे काय? ते टिकवून कसं ठेवायचं? त्यासाठी लढा कुठच्या बळावर द्यायचा? जळात राहून माशाशी वैर तर धरायचं नाही, मग जायचं कुठे, करायचं काय? म्हणून ते सल्ल्यासाठी सीतामाईकडे जातात. या सीतामाईचं रूप आदिमायेप्रमाणे जादूई आहे. निसर्गावर सत्ता असलेलं आहे. सीतामाई द्रोण बनवण्याचं काम करत झाडाखाली बसलेली आहे. यामुळे अशोकवाटिकेतली सीताच डोळ्यासमोर येते. रावणापासून मुक्त झाली तरी, रामाच्या सहवासात आली तरी... दोन पानं आपोआप झाडावरून गळून तिच्या डाव्या हातात येतात, उजव्या हातात त्याच वेळी जादूप्रमाणे एक चोय येते, व क्षणार्धात द्रोण तयार होत असतो. तो झाला की दुसरा, हे चक्र अव्याहतपणे चालू राहातं. हे चक्र एकाच वेळी नैसर्गिक आहे, व त्याचबरोबर मानवी प्रतिभेने नवीन रचनांच्या निर्मितीचं - तंत्रज्ञानाचंही आहे . ती त्यांना सांगते मानवच बनून राहा. इथून पळून जा. पण ते तितकं सोपं नसतं. लक्ष्मण (रेषा आखणारा, बंधनं घालणारा) रागीट होता, त्याने या वानरांचा कुठेही पाठलाग करून नायनाट केला असता - नियम मोडल्याबद्दल. रामही वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ताच होता. पण माझा राम मला वानरांमुळेच भेटला ना? तेव्हा त्यांना मदत केलीच पाहिजे, असं म्हणून ती त्यांच्या म्होरक्याला एक द्रोणांची चळत देते. आणि म्हणते, वेळ आली की त्यांचं काय करायचं हे तुम्हांंला कळेलच.

प्रत्यक्ष सीतामाईने बनवलेले असले तरी ते क्षुल्लक द्रोणच. ते पाहून इतर वानर अचंब्यात पडतात. त्यातला एक जण संतापतो, व त्या अतीव संतापाच्या भरात त्याची शेपटी परत येते. तो पुन्हा वानरत्व प्राप्त करतो. त्याचवेळी चमत्कारासारखा एक द्रोण वाऱ्याने गिरक्या घेत उडतो, जसजसा वर जातो तसतसा मोठा होतो. समुद्रात पडतो तोपर्यंत एका प्रचंड गलबताएवढा होऊन समुद्रात संथ तरंगायला लागतो. हेच सीतामाईचं देणं. स्वातंत्र्य, शक्ती, लक्ष्मणापासून दूरवर जाऊ शकण्याची. नवसुसंस्कृतांसाठी अढळपद. जणू कर्णाला क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी मिळालेलं, सूतपुत्रत्वाचा इतिहास माहीत नसलेल्या देशाचं राज्य.

सगळे वानर आश्चर्याने बघत असताना इंग, सीतामाईकडून द्रोण स्वीकारणारा वानरांचा म्होरक्या, डोकं ताळ्यावर ठेवून उरलेले द्रोण पुरून ठेवतो. व त्यावर एक मोठा दगड ठेवतो. त्याच्याकडे आता एकूण अठरा गलबतांचं आरमार असतं. या जोरावर अनेक गोष्टी करता येणार असतात. या जाणीवेसोबतच त्याला एक शंख सापडतो. आकाशाचा अंतर्भाव करणारा, आकाशाला स्वत:पासून लपायला जागा देणारा...

त्या शंखाची घुमटी
घोटीव
आणि कठोर होती

स्वप्नसुरत क्षणी
अश्मीभूत झालेल्या एखाद्या
यक्षिणीच्या स्तनाप्रमाणे

तो शंख आतून
लुसलुशीत होता एखाद्या
अप्सरेच्या योनीप्रमाणे

या शंखाला लैंगिक आकर्षणाइतकं तीव्र आकर्षण आहे. तो हाती आला की कामुकतेने व्हावा तसाच जीव वेडा होतो, हे इथे कवीला सुचवायचं आहे. तो शंख कानाजवळ आणल्याबरोबर सुरस आणि चमत्कारिक कथा सांगू लागला.

सर्वांग चितारून घ्यायचे डोहाळे लागलेल्या
असूर्यपश्या
चित्रलोलुप गुहांच्या
....
किंवा टकरा देऊन दाही दिशा
दणाणून टाकणाऱ्या
वज्रकपाळ एडके झुंजवण्यात आपला

वेळ वाया घालवणाऱ्या
व अजून गर्भाधान न झालेल्या
बहुव्रीही दऱ्याखोऱ्यांच्या

कुंपणात जीवाला रमू न देणारे, दुरून साजरे निळे डोंगर प्रत्यक्ष पायाखाली तुडवायला लावणारे शंखाचे ते शब्द. मानवाला आत्तापर्यंत कैक वेळा त्यांनी मोहिनी घातलेली आहे. अरे चला, इथे काय ठेवलंय, आपल्या वस्तीच्या वेशीपलीकडचा डोंगर ओलांडला की तिथे सर्व नवीन कोरं आहे. प्रस्थापित व्यवस्थेत पुरेसा मान न मिळणाऱ्या घटकांना तर तसं वाटणं सहाजिकच आहे.

आणि पुढे तो शंख
असंही म्हणाला
की अरे यार,

सीतामैयाचे आशीर्वाद
संगती असल्यावर
दुसरं काय पायजेलाय तुम्हाला?

जिथे जाल ते तुमचं आजोळच असेल,कारण शेवटी कुठचीही भूमी म्हणजे सीतेची माईच नाही का? ती तुम्हांला कसं काही कमी पडू देईल? माणसाची अनोळखी कुंवार रसरशीत किनाऱ्यांना आलिंगन देण्याची इच्छा ही अशीच आशावादी असते. तिचाच सतत डोक्यात घोंघावणारा, प्रस्थापित चाकोरीला तोडून नव्या मोकळ्या कुरणांची साद घालणारा हा आवाज. ही साद लोकांना ऐकवण्यासाठी तो शंख फुंकतो. ज्या दगडाखाली ते द्रोण पुरले होते त्याच दगडावर उभा राहून. जणू काही त्या द्रोणांत असलेल्या शक्तीच्या जोरावर उभं राहून.

आज्ञार्थी वलयं होती
कानांना ऐकू येण्यापलीकडली
व अलीकडली

जी ऐकणाऱ्यांना कळत न कळत
आपोआप
बंधनकारक ठरत होती.

व ऐकणारा प्रत्येक जण त्या
शंखाला अभिप्रेत असणाऱ्या भविष्यपुराणात
सामील होत होता.

कवीने म्हटलेलं नाही, पण शंखाचा अधिकारी स्वर त्या द्रोणांनादेखील ऐकू गेला कदाचित. कारण त्याच क्षणी जमीन हादरली, व ते सर्व द्रोण उसळी फोडून वर आले. इंग जो आकाशात उडाला तो नवीन भूमीवर जाऊन पडला. तीच इंग्लंड झाली हे आता कोणाला फारसं माहीत नाही. पुन्हा संस्कृतीचा विस्तार, जेते व जित यांचं चक्र याकडे कोलटकर निर्देश करतात.

जो पूर्ववत वानर झाला होता, तो या नवीन वानरांच्या प्रवासाच्या तयारीकडे तटस्थपणे पाहात होता. त्याला -

तू आमच्याबरोबर येऊ नकोस
असं त्याला कुणीच म्हणालं नव्हतं
पण ये असंही.

तो नवखंड पृथ्वी वसवण्यासाठी जाणारा तांडा पाहात तसाच बसून राहिला.

त्यांचीच वंशवेल विस्तारून
पुढे त्यांच्या शाखा
अमेरिकन, इंग्रज, फ्रेंच, जर्मन

इटालियन, रशियन,
हबशी, शिद्दी, अरब, तुर्की, चिनी, जपानी
वगैरे नावांनी प्रसिद्ध होणार होत्या

आणि पृथ्वीचा पचका करणार होत्या,
हे त्याला कसं माहीत असणार?
विनाकारण हळहळत

तो तसाच बसून राहिला तिथे वाळूत.
आपण किती भाग्यवान आहोत
हे त्याला समजलेलंच नव्हतं

शेपटीचं गतवैभव
त्याला परत मिळालेलं होतं
निरुपयोगी नाकाच्या बदल्यात.

इथे पाचवं सर्ग व कविता संपते. कवीचं मत पहिल्यांदाच व्यक्त करत. नंतर राहातो तो उपोद्घात.

जॉन नावाचा कोणीतरी पाश्चिमात्य शास्त्रज्ञ म्हैसूरला रामायणाचं भाषांतर करण्यासाठी आला असतो. लायब्ररीत बसलेला असताना एक हुप्प्या त्याचं लक्ष वेधून घेतो, व खिडकीपाशी केळीच्या पानात गुंडाळलेलं ताडपत्री हस्तलिखित ठेवतो. जॉन ते उघडून बघतो, तर पपईमुख नावाच्या कुणीतरी लंगूरी भाषेतून संस्कृतमध्ये केलेलं ते समश्लोकी भाषांतर असतं. आफ्रिकेतल्या एका टोळीने उत्तरेकडे सरकत सरकत पृथ्वी व्यापली या इतिहासाला व एकंदरीत मानवाच्या उत्क्रांतीच्या कल्पनांना तडा देणारं. जॉन झराझरा टिपणं काढतो, पण लवकरच ते हस्तलिखित नाहीसं होतं. त्याची टिपणं व आठवणी यांच्या सहाय्याने शक्य तितकं तो लिहून काढतो... त्याचं लेखन म्हणजेच ही मूळ कविता हे गर्भित आहे.

या सगळ्याचा अर्थ काय? कवीला नक्की काय सांगायचं आहे?

त्यासाठी पुन्हा एकदा या साहित्यप्रकाराला काय म्हणावं असा विचार करावा लागतो. म्हटलं तर हा वैचारिक लेख आहे. एक विषय घेऊन त्याबद्दल टिप्पणी करणारा. म्हटलं तर ही एक रूपककथा आहे. म्हटलं तर छंदबंधनं झुगारून देणारी दीर्घ कविता आहे. मी हिला कविताच म्हणेन, कारण तीत आलेली रूपकांची रेलचेल, एक अज्ञात, बोट न ठेवता येणारी लय यामुळे. कुठल्या बरणीत भरून ठेवावं व तीवर लेबल काय लावावं हे तितकंसं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की या रचनेतून काय प्रकारचा आकारबंध डोळ्यासमोर येतो? मला तरी असं वाटतं की या कवितेला एखाद्या विचारप्रवाहाचं रूप आहे. एखाद्या साध्या कवितेत किंवा वैचारिक लेखात बऱ्याच वेळा एक सरळसोट धारा असते. ‘द्रोण’मध्ये त्या धारेचं स्वरूप एखाद्या नदीसारखं आहे. अनेक उपनद्या तिला मिळतात, काही कालवे झरे वेगळ्या वाटांनी जातात, आणि प्रवाह पुढे जातो. महाकाव्यात काही आख्यानं येऊन जावीत तशा काही टिप्पणी येऊन जातात.

कवितेचा विषय आहे संस्कृती म्हणजे काय, व ती पसरते कशी? कोलटकरांची प्रतिभा अशी की ते संस्कृती हा शब्द एकदाही वापरत नाहीत. केवळ रूपकांतच बोलतात. हेच त्यांनी ‘तक्ता’मध्ये केलेलं आहे. वर्णव्यवस्थेबाबत बोलताना ते तक्त्याचं (वर्णमालेचं) रूपक वापरतात, व चौकटींविषयी बोलतात. त्या रूपकाचा अर्थ वाचकाने लावायचा असतो. मला कोलटकरांची कविता आवडते ती याच कारणामुळे. कवीला जे सांगायचं आहे त्यासाठी वाच्यार्थ वापरला तरी सुंदर कविता करता येते. पण रूपकांचा वापर हा कवितेला एक गहिराई प्राप्त करून देतो. रूपकांच्या वापरातून निर्माण होणारी आशयघनता हे कवितेचं शक्तीस्थान आहे.

तेव्हा प्रथम आपण रूपकांकडे बघू. कथा रामायणाची आहे, तेव्हा राम हे प्रमुख रूपक असावं हे उघड आहे. पण राम केवळ उल्लेखानेच या कथेत येतो. काहीसा पार्श्वभूमीला उभा असणारा - पार्श्वभूमी घडवणारा. राम हा आदर्श राजा आहे. पण आदर्श राजा म्हणजे नक्की काय? तर प्रजेला आदर्श वाटेल असा. आदर्श असणं आणि वाटणं यात फरक आहे. प्रजेसाठी निष्कलंक चारित्र्याची प्रतिमा ठेवली की राज्यकारभार, शत्रूंशी लढाया करून त्यांच्यावर विजय प्राप्त करणं यातही त्याच्या प्रजेसाठी आदर्श राहाणं म्हणजे लंकेवर विजय मिळवला की तिची संपत्ती हरण करून ती अयोध्येला बहाल करणं आलंच. हे करण्यासाठी, अयोध्यावासी ज्यांचं तोंडदेखील पाहणार नाहीत अशा वानरांशी मैत्री करणं (वालीचा कपटाने वध करूनही) हे त्याचं कर्तव्यच आहे. पण हे करतानाही वानरांना त्यांच्या जागीच ठेवणं हेही कर्तव्यच आहे. वर्णव्यवस्था वापरून घेणं आणि त्याचबरोबर ती जपणं ही रेषा चालायला सोपी नाही. कवितेतल्या रामाने त्यावर तात्पुरता तोडगा काढलेला आहे. वानरांना माणसांचं रूप काही काळपर्यंत, लंकेसारख्या दूरच्या भूमीत दिलं तर सगळेच खूष. ही व्यवस्था कोणी मोडू नये म्हणून लक्ष्मणाच्या कोपाचा बडगा तो बाळगून आहेच. प्रस्थापित व्यवस्था पददलितांना कमीतकमी 'मोबदला' देऊन वापरून कशी घेते याचं हे चपखल उदाहरण आहे. ब्रिटिशांना जेव्हा भारताचं शोषण करण्याच्या योजना राबवण्यासाठी भारतातल्याच वानरांची गरज पडली तेव्हा त्यांनी इथल्या नेटिव्हांना शिकवलं, पण तेवढ्यापुरतंच. त्यांना अर्थातच गोऱ्यांचं स्थान मिळालं नाही. जेते आणि  जित, परकीय राज्यकर्ते व त्यांच्या जुलमाखाली भरडली जाणारी नेटीव्ह रयत यांचं हे असं नातं कायमच राहिलेलं आहे. ही कथा शेकडो ठिकाणी पुन्हा पुन्हा घडलेली आहे.

रामाचं आणि वानरांचं रूपक तसं समजायला सोपं आहे. सगळ्यात गूढ गहन रूपक आहे ते सीतामाईचं. राम हा पार्श्वभूमीला असतो तर सीतामाई प्रत्यक्ष सहभाग घेते. कोलटकरांच्या ‘चिरीमिरी’मधल्या काही कवितांतही विठ्ठल- रखुमाई अशी रूपकाची जोडी येते. तिथे विठ्ठल हा कधी प्रस्थापित व्यवस्थेचा धारक म्हणून येतो, तर इतर (बऱ्याच) वेळा तो जीवनाच्या वारीचं अंतिम ध्येय म्हणून येतो. रखुमाई मात्र विठ्ठलाच्या पुरुषाची जोडीदार प्रकृती बनून येते. इथे सीतामाईचीदेखील तीच भूमिका आहे. सीतामाई ही धरतीची कन्या असल्यामुळे इथे हे रूपक अधिक चपखल बसतं. नुकत्याच शिकून-सवरून शहाण्या झालेल्या वानरांनी आसपास बघितलं तर त्यांना ही परिस्थिती दिसते. आसपासच्या निसर्गात, माणसांत, जमिनीत अमाप वैभव (untapped potential) असतं. अज्ञानामुळे आत्तापर्यंत ते वापरलेलं नसतं इतकंच. त्या झाडाच्या पानांपासून, नवनिर्माणाच्या प्रतीकांपासूनच हे द्रोण बनतात. हे द्रोण म्हणजे शक्ती, सामर्थ्य... पहिल्या द्रोणाचं जहाज बनल्यावर वानरांचा प्रमुख डोकं ताळ्यावर ठेवून अठरा जहाजांच्या आरमाराचा हिशोब करतो. पण सगळी तयारी व्हायच्या आतच तो शंख फुंकला जातो. आणि क्षुल्लक ठिणगी पडून पूर्ण तयारी आधीच विस्फोट व्हावा, क्रांतीसाठी सशस्त्र चळवळ व्हावी, अठराशे सत्तावन्नसारखा उठाव व्हावा, तशी ती शक्ती आपसूकच उद्रेक होऊन बाहेर पडते.

हा शंख हे कवीचं सर्वात जिव्हाळ्याचं रूपक आहे असं वाटतं. ही आंतरिक साद भल्याभल्यांना भुरळ पाडते. तिचा आवाज साजणगहिरा आहे. कानांना ऐकू येणाऱ्या आवाजाच्या अलीकडल्या व पलीकडल्या वलयांचा, सरळ मनालाच भिडणारा. नाविकांना झपाटून टाकणाऱ्या सागरकन्यांचा - सायरेन्सचा. हा आवाज कानांवर पडला की चेटूक होतं. जुनं, शिळं फेकून देऊन नवीन, कोवळं, ताजं शोधण्याच्या मानवाच्या ओढीचा हा आवाज आहे. गतानुगतिकांच्या वाटेने जायचं तर या शंखाचा, सायरेन्सचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून कानात उपदेशांचे बोळे भरण्याचा समाज प्रयत्न करतो. शेवटी प्रस्थापितांचा जाच, हा आतला आवाज आणि समाजातल्या व परिस्थितीच्या शक्तीची जाणीव झाली की संस्कृती नवीन माती शोधते, पसरते, फळते, फुलते...

इंग जिथे गेला तिथे नवीन संस्कृती वसवून जुन्या संस्कृतीला दडपण्याचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर त्याच मुळांचा शोध घेण्यासाठी जॉन येतो. हा इंगचा वंशज. त्याला इथेच राहणाऱ्या, आपली आदिम ओळख जपलेल्या वानराचा वंशज भेटतो आणि खरा इतिहास सांगतो. शेकडो वर्षांपूर्वी तुटलेल्या रेषा पुन्हा एकदा वर्तुळात येऊन मिळतात. कायमच्या जुळण्यासाठी अर्थातच नाही. संस्कृतीच्या गाण्यातली एक सुंदर सम साधण्यासाठी फक्त.
***
चित्रस्रोत : आंतरजालावरून साभार
हा लेख यापूर्वी 'मिसळपाव डॉट कॉम' आणि 'उपक्रम डॉट ऑर्ग' या संस्थळांवर प्रकाशित झाला आहे.

1 comment