फोरमी लेखनाची तीन पावलं

- आदूबाळ
मराठी भाषेतली फोरम्स (संकेतस्थळं) आंतरजालावर उगवूनही आता दीड दशकाहून अधिक काळ लोटला. एखाददुसर्‍या चुकार फोरमपासून सुरुवात होऊन ‘मराठी आंतरजाल’ (किंवा ‘मआंजा’) हे लाडीक नाव रूढ होऊनही आता जुनं झालं. ‘मराठी साहित्यव्यवहारात आंतरजालीय लेखनाचं स्थान’ किंवा ‘मराठी फोरम्सवरच्या साहित्याचा लेखाजोखा’ इ०ची व्याप्ती मोठी आहे, त्यावर साकल्याने लिहिण्याची माझी पात्रता नाही. मराठी फोरम्स, त्यांचे उदयास्त, हौशी लेखक, भलंबुरं लेखन, टोपणनावं-आयडी-डुआयडी, यशस्वी/अयशस्वी प्रयोग, वगैरे विषय रवंथ करण्याचे आहेत. त्यात न शिरता, काही फोरमी गोष्टींबाबत मोजकं लिहायचा मानस आहे. (इथे एक खुलासा करायला पाहिजे. हा लेख फोरमी ललित लेखनासंदर्भात आहे. फोरमी चर्चा/काथ्याकूट/हाणामार्‍या हा काही माझा प्रांत नोहे.)


"अमुकतमुक पुस्तक वाच... लेखक पुस्तकातून तुझ्याशी बोलतो आहे असं वाटतं..." अशी प्रस्तावना करून बर्‍याच पुस्तकांची शिफारस होते. काही आवडतात, काही वैतागाने भिरकावून द्यावीशी वाटतात. आवडलेल्या साहित्याच्या लेखकाला, "मित्रा, यू मेड माय डे!" असं सांगावंसं वाटतं. वैतागवाडी केलेल्या लेखकावर "हाड!" असं खेकसावंसं वाटतं. थोडक्यात, लेखकाशी संवाद साधावासा वाटतो. छापलेल्या पुस्तकांबाबत हे सहजी करता येईलच असं नाही. आणि इथेच फोरम्सचं वेगळेपण उठून दिसतं.
मराठी फोरम्सवर लिहिणारा लेखक मुख्यतः हौशी आहे. "मी फोरम्सवर का लिहितो?" याचं प्रामाणिक उत्तर ‘खाज’ असं आहे. जे सांगायचं आहे ते सांगायला व्यासपीठ मिळावं, ते चार लोकांनी वाचावं, आणि मुख्य म्हणजे कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळावेत या हेतूने हा हौशी लेखक वेळात वेळ काढून लिहितो, फोरमवर प्रसिद्ध करतो. फोरम्सवरच्या लेखनाची करन्सी ‘मिळणारे प्रतिसाद’ ही आहे. (जशी पारंपरिक छापील पुस्तकांची करन्सी विक्रीचे आकडे, आवृत्यांची संख्या, मिळणारे पुरस्कार वगैरे आहे.)
त्यामुळे लेखनाबरोबरच प्रतिसादांनाही फोरमी जगात महत्त्व प्राप्त होतं. प्रतिसादांची भूमिका ‘कौतुकाची थाप / पार्श्वभागी लाथ’ इतकीच मर्यादित न राहता वाचकाने लेखकाशी केलेल्या संवादाचं स्वरूप घेते. वाचकाची भूमिका पॅसिव्ह न राहता अ‍ॅक्टिव्ह होते हे फोरमी ललित लेखनाचं मोठं बलस्थान आहे. एक उदाहरण. मी इन्कम टॅक्स डिपार्ट्मेंटच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या एका कथेला एका भूतपूर्व इन्कम टॅक्स कमिशनरांनी प्रतिसाद दिला. मी तपशिलात घातलेला थोडासा गोंधळनिदर्शनास आणला, पण कथावस्तूला त्यामुळे ढका लागत नाही हेही सांगून, कथा आवडली हे आवर्जून कळवलं. खरं सांगतो, मला अगदी धन्य धन्य झालं.
पारंपरिक छापील पुस्तकांपासून फोरम्सचं हे पहिलं पाऊल पुढे.
दुसरं पाऊल आत्तापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवलं गेलं आहे. ते आहे सहलेखनाचं. म्हणजे एकापेक्षा अधिक लेखकांनी एकत्र येऊन एकच कथावस्तू फुलवणे.
पारंपरिक लेखनातही असे प्रयोग पूर्वी झालेले आहेत. चट्कन आठवलेला प्रयोग म्हणजे चौदा ब्रिटिश रहस्यकथाकारांनी एकत्र येऊन १९३१ साली लिहिलेली ‘दफ्लोटिंग अ‍ॅडमिरल’ ही रहस्यकादंबरी. या चौदांपैकी ओळखीची नावं - अगाथा ख्रिस्ती, डोरोथी एल सेयर्स आणि जी के चेस्टरटन. दुर्दैवाने कादंबरी ‘तशी बरी’ यापातळीपुढे जात नाही. (रहस्य चांगलं आहे, पण उकल एकदम पुचाट आहे.)
मआंजावर ‘ऐसी अक्षरे’ या फोरमवर ‘जपमाळकथा’ हा एक प्रयोग झाला. सहा वेगवेगळ्या लेखकांनी टप्प्याटप्प्याने कथा पुढे नेली. कथा सुरू करायच्या आधीच तपशीलवार नियम ठरवले गेले. कथेचं नाव ठरवण्यासाठी पौंडाच्या विनिमयदराचा अभिनव उपयोग केला गेला.  ‘वांझोटी’ या जपमाळकथेचे भाग इथे वाचता येतील.
या प्रयोगात मला किंचितशी नावडलेली एक गोष्ट म्हणजे नियमावली. ललित लेखनाला कोणतेही नियम असू नयेत, लेखकाला काय वाट्टेल ते लिहायचं पूर्ण स्वातंत्र्य असावं असं मला वाटतं. अर्थात, सहा लेखकांना एकत्र नांदवायचं, तर शिस्त हवी आणि नियम हवेत हे ओघाने आलंच. त्यामुळे या नावडण्याला फारसा अर्थ नाही.
आणि इथे फोरमी लेखनाचं तिसरं पाऊल. उत्स्फूर्त (impromptu) सहलेखनाचं.
‘मिसळपाव’ या फोरमवर पाषाणभेद यांनी एक बर्‍यापैकी संक्षिप्त ललित टाकलं. साखर कारखान्याला उस घालणार्‍या एका तरुण बागायतदाराच्या बायकोला बुलेटचे वेध लागलेत. घरची स्कॉर्पियो, स्टॉर्म वगैरे गाड्या सोडून नवर्‍याने बुलेटच वापरावी असा तिचा हट्ट आहे. "काय कळंना बाबा. आसं काय हाय त्या बुलेटमधी काय जानो. म्या काय म्हंतो, तुमाला काय समजलं का काय हाय ते?" हा अनुत्तरित प्रश्न ठेवून मूळ ललित संपतं.
इथे लेखकाने कथा पुढे न्यायची कोणतीही विनंती केलेली नाही. किंबहुना तसं लेखकाच्या मनातही नसावं. पण बहुदा शेवटचा अनुत्तरित, सस्पेन्स वाढवणारा प्रश्न वाचून वाचकांची कल्पनाशक्ती मोकाट सुटली असावी. ‘बुलेटच का?’ या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या प्रकारे वाचकांनी दिलं आणि कथा पुढे नेली!
ही फोरमी लेखनाची काही मोजकी उदाहरणं आहेत. फोरम्सवर असे अजूनही वेगवेगळे प्रयोग होत आले आहेत, होत राहतील. आपल्या वैशिष्ट्यांमुळे फोरमी ललित लेखन पारंपारिक मराठी ललित लेखनाच्या तुलनेत वेगळं उठून दिसतं. किंबहुना मराठी वाङ्मयाच्या संपन्नतेत भर घालण्याची क्षमता फोरमी ललित लेखन बाळगून आहेअसा विश्वास मला वाटतो. आता मुख्य धारेतले लेखक/समीक्षक/प्रकाशक या प्रयोगशील फोरमी लेखनाला आपलं म्हणणार, का ‘हौशी पक्ष्यांची टिवटिव’ म्हणून नजरेआड करणार हा वेगळा विषय.


***

2 comments