जयविजय

- अभ्या

"ओ दादाऽ, येऊ का आतमदे?" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला.

आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी.

"जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय, ३० फुटाचं हाय, पन आरजंट पायजे."

मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाहिलंय मी.

"जय्विजय पायजेत छापून, ७ फूटाचे दोन."

"दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा."

जयविजय…

डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार-चोपदार, म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. रंगांनी भरलेल्या चार-पाच वाट्या अन्‌ तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले, की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटत असू. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर, हा कलाकार सापडायचा तानाजी चौकात देशीच्या गुत्त्यावर.

"सकाळी येतो म्हणून सांग काकांना." एवढाच निरोप घेऊन आम्ही घरी परतायचो.

"येईल रे, कुठे जातोय पळून! बँकेचा थकबाकीदार आहे तो." वडिलांचा दांडगा विश्वास.

त्यामुळेच कदाचित - दुसर्‍या दिवशी दारात बघावे, तर त्याने रंग कालवायला सुरुवात केलेली असायची. पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही; पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेजेस्‌ असायच्या. सुरुवातीला फिकट गुलाबी रंगात थोडीशी पिवळी छटा असणारा त्वचेचा रंग, लगेच पिवळ्या शेंदरी रंगात पितांबर आणि दागिने, जांभळ्या रंगाचा शेला आणि लाल कटिवस्त्र. सुरुवातीला नुसतेच रंग दिसत. काळा रंग निषिद्ध, असे म्हणून गडद तपकिरी रंगाचा लहान ब्रश एकदा फिरायला लागला, की पाहता पाहता चित्र सजीव होई. एक पाय गुडघ्यात वाकवून हाती तिरपा दंड घेतलेले, अगदी देवासारखे देखणे मुकुटधारी जयविजय.


बार्शीत श्री भगवंताचे मंदिर असल्याने पहिल्यापासूनच दरवाजावर भालदार-चोपदार नव्हेत, तर जयविजयच. खाली लफ्फेदार सही ठोकेस्तोवर घरातून चहा आलेला असायचा. चहा आणि बिदागी घेऊन तो जायचा, पण माझे निरीक्षण काही संपायचे नाही.

चाटे गल्लीतल्या त्याच्या दुकानासमोर उभारणे म्हणजेसुद्धा मौज असायची. शेजारी महाराष्ट्र ब्रास बँडवाल्यांची प्रॅक्टीस चालू आणि त्या तालावर इकडे दुकानाचे बोर्ड रंगवणे... मी तासन्‌तास बघत राहायचो. लस्सीचा ग्लास हातात घेतलेल्या अर्नोल्डपासून चहा पिणार्‍या अमिताभपर्यंत सगळे हुबेहूब उतरलेले असायचे. चित्रकलेच्या वहीत बर्‍याच प्रयत्नानंतर जमलेले जयविजय घेऊन एकदा त्याला दाखवावेसे वाटत, पण त्याच्या तिरसटपणाची भीतीही वाटायची.

एक रविवारी मात्र सकाळी सकाळी तो दारात उभा होता, चेहर्‍यावर अत्यंत अजिजी आणि आपली रंगीबेरंगी सायकल घेऊन. हप्ते न चुकवण्याचे आणि दारू न पिण्याचे उपदेश तासभर माझ्या वडिलांकडून ऐकून तो निघणार , इतक्यात मी माझे जयविजय त्याला दाखवले.

"चांगलं काढताव, पण मोठं झाल्यावर सायब व्हा बँकेतलं, तुमच्या वडलासारखं."

एवढेच बोलून गेला.
***

आज पटकन तेच जयविजय एका कागदावर काढून स्कॅन करून पीसीवर त्यात रंग भरायला १५ मिनिटं खूप होती.

"आमचे वडीलपण शेम आस्लंच जयविजय काढायचे बघा. बार्शीत पेंटर होते, गेले १० वर्शाखाली."

"आणि तुम्हांला नाही का येत मग पेंटिंग?" बँकेतल्या साहेबाच्या मुलाचा निरर्थक प्रश्न.

"नाही जमत, वडलांनी पतसंस्थेत लावलंय नोकरीला. आता घरात आरजंट लग्न ठरलंय. मोकळं दार कसं ठेवायचं, म्हणून तर हे फ्लेक्स लावतो दारावर."

***
***

चित्रस्रोत: आंतरजालावरून साभार

2 comments