Uncategorized

कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट…

– भडकमकर मास्तर

ओळख लिहिण्याची गरज आहे काय?
डिस्क्लेमर : हे सिनेमाचं परीक्षण नाही. सिनेमा रिलीज व्हायचाय. तो न पाहता, दिग्दर्शकाची इंग्रजी शब्दांनी भरलेली ‘मराठी माज’ मुलाखत बघून अंदाजे लिहिलेली गोष्ट आहे.
पिक्चर पाहायचा की नाही, आवडतो की नाही, ते थेटरात जाऊन आपापले पाहून ठरवावे 🙂
***
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी, “साहेबांनी आम्हांला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं, साहेब मोठ्ठे गुणी…”, “एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स…” हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं बोलतोय. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. “एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स” असतेच, कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग.
हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो, पण ते सावरतात.
समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऑर्कुट फेस्बुक समाजसेवा करायची सवय असते. मुलाचं नाव श्याम. श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉ. अ. पी. ल. सो. स्टे. नो. नॉ. असतातच.
मुलगा यांच्या जातीचा फेस्बुक ग्रुप चालवत असतो. हे तो आईला सांगताना एक फोनवरचा संवाद :
“जात म्हणू नये. जात शब्द फार जातीय वाटतो श्याम. समाज म्हणावं.” श्यामची आई.
“पण जातीय म्हणजे काय?”
“ जातीय म्हणजे अश्लील.”
“ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन.”
असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो. ‘आपण्न्क्कीकुठूनआलो?’ या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉ. अ. पी. ल. सो. स्टे. नो. नॉ.) मुलीच्या प्रेमात पडतो. ‘आपणएव्ढेहुशार्कसे?’ या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि ‘हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?’ या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर मायदेशी परततो.
दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले लोक राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात, तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात. तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात. या खुनांचं खापर की काय ते, श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळी यांच्याकडे गोखले सांसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात, अर्ज-विनंत्या करतात. पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत…
मध्यांतर
त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे, पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे. त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की “मला ऑप्रेशन नको!” असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते. गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. ‘नमस्ते सदा…’ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात. पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जाते. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट… सारे हॉस्पिटल आनंदी होते. मग काय! कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते. काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं…
मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडते, त्यात त्यांचे बाबा आठवतात. शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब, असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. ‘ताठ कणा हाच बाणा’ हे त्यांचे ब्रीदवाक्य त्यांना आठवते…
मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत “माज आहे मला, माज आहे मला!” असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात. डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, पण तरी गोखले मात्र “मेलो तरी बेहेत्तर, पण लढाई माझी आहे!” असे सांगतात. मग मागे झांजा वाजायला लागतात. ‘कोकणस्थ-कोकणस्थ-कोकणस्थ’ अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते… कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका हातात घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता ’एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स’ अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते.
मग वाटेत येणारे सारे ‘अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स’ गुंड दंडाचा प्रसाद खातात, ताठ कण्याच्या लाथा खातात, गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात : “आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत…”
आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्‍या साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो. मग डीएसपी आणि जज साहेब “हाच खरा शूर!” असं म्हणत गोखल्यांचं अभिनंदन करतात.  मग परत भाषण : “मी कोकणस्थ आहे, पण मी जातीय नाही; मी संघात जायचो, पण मी पोलिटिकल नाही; मी रस्त्यात मारामारी करतो, पण मी गुंड नाही… “ वगैरे वगैरे ‘हा आहे, पण तो नाही’ असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर ‘कोकणस्थ!’ असा जोरात आवाज काढून आरती संपते.
सिनेमाही संपतो.
मग नावे येताना –
श्याम घरी येतो आणि त्याचे लग्न होते आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो. त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो. पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्‍या शर्टात जातात.
***
***
चित्रस्रोत: आंतरजालावरून साभार
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *