Uncategorized

व्यायामशाळा आणि कॅलर्‍या

– मेघना भुस्कुटे


वैधानिक इशारा: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा माणूस दिसला रे दिसला, की काही लोक विनोदाच्या अपेक्षेनं आधीच खुळचटासारखे खिदळायला लागतात. हा लेख वाचणार्‍यांत असे नग असतील, तर त्यांनी माझा नमस्कार स्वीकारून ओसरीवरूनच तातडीनं निघण्याचं करावं. ‘किलो आणि कॅलर्‍या’मध्ये तुम्हांला विनोद सापडणार नाही, करुणरसपरिपोष आणि कटोविकटीचा संताप तेवढा सापडेल.


ट्रॅफिकजॅममधून रखडत-पेंगत मी अंधार-उजेडाच्या सीमेवर कशीबशी ऑफीसातून घरी पोचले आहे. जिमला जाण्याचा जामानिमा घाईघाईत उरकून उपाशीपोटी जिम गाठलंय. वॉर्मअप, उड्या-धावपळ, आणि मग स्ट्रेचेस असा पुरेसा त्रास देहाला दिला आहे. धन्य धन्य वाटतंय. त्याच आनंदाच्या लाटेवर तरंगत मी अन्नविषयक सल्लागाराला भेटले आहे. हा आमचा संवाद.


सल्लागारः काय काय खाता तुम्ही रोज? (मी आधी प्रचंड खजील होते. आपण दिवसभरातून किती वेळा चहा-कॉफ्या ढोसतो आणि काय काय चरबीयुक्त गोष्टी ओरपतो याचा हिशोब या माणसाला प्रामाणिकपणे द्यायचा या कल्पनेनं सटपटायला होतं. पण आता आलोच आहे तर होऊन जाऊ द्या, म्हणून सगळा पाढा वाचते. काय वाटेल ते वाटेल साल्याला. गेला उडत.)


सल्लागारः बरं. (बरंच काय काय कागदावर लिहितो. वेळा-बिळा घालून. वाचून स्वतःच खूश होतो.) आता आपण रोज संध्याकाळी प्रोटीनचं एक ड्रिंक घ्यायचं आहे. (‘आपण’ घ्यायचंय म्हणजे? मी काय ‘बघा ना, अजुनी रोज रडते हो’ गटातलं शिशुवर्गातलं मूल आहे का? नीट मोठ्या माणसासारखं बोलायला काय धाड भरलीय या माणसाला?)


मी: का?


सल्लागारः प्रोटीन इन्टेक कमी पडतोय आपल्याला. (पुन्हा तेच. तुझ्या दंडाच्या बेटकुळ्या लपता लपू नयेत असा टंच टीशर्ट घातलाएस बैला. आणि ‘आपल्याला प्रोटीन इन्टेक कमी पडतोय काय, आँ?) म्हणून थकवा येतो. (‘तू येऊन बघ एकदा पवईहून संध्याकाळी ७ वाजता ठाण्याला आणि मग येऊन नाच वेड लागल्यासारखा त्या मिलवर. मग बघू आपण कुणाला थकवा येतो ते. प्रोटीन इन्टेक कमी पडतोय म्हणे. असो. संताप आवरला पाहिजे. स्पष्टवक्तेपणा. हं, स्पष्टवक्तेपणा.)
मी: नाही, मी बाहेरून कोणतंही टॉनिक घेण्याच्या साफ विरोधात आहे. तेवढं सोडून बोला.


सल्लागारः बरं, मग तुम्ही संध्याकाळी एग इमल्शन घेत जा.


मी: एग इमल्शन म्हणजे?


सल्लागारः कच्चं अंडं घुसळायचं. त्यात दूध घालायचं. मिरपूड. मीठ. हवं तर चाटमसाला घालू आपण. आणि प्यायचं.


मी: जमणार नाही.


सल्लागारः अं?


मी: जमणार नाही.


सल्लागारः का?


मी: मला कच्चं अंडं खाऊन डचमळतं. (वास्तविक इथे ‘डचमळतं’ या शब्दाहून वेगळा, पॉलिटिकली करेक्ट-सौम्य पर्याय वापरणं शक्य आहे. पण मी ठरवून तोच वापरते. ऐक साल्या.)
सल्लागारः ….


मी: …..


सल्लागारः ओके, मग आल्यावर आपण मशरूम सूप घेऊ या. (मला ‘आपण’ची सवय व्हायला लागलीय? छे छे, हे होता नये. याला वेळीच ठेचला पाहिजे.)


मी: तुम्ही ‘आपण-आपण’ काय म्हणताय सारखं? तुम्ही येणार आहात का माझ्या घरी रोज खायला? (सल्लागार बावचळून माझ्याकडे बघत राहतो. आधीच व्यायामशाळेतले इन्स्ट्रक्टर्स, तिथल्या सेक्रेटरीछाप बायका, ट्रेनर्स आणि अन्नविषयक सल्लागार यांच्या चेहर्‍यावर मठ्ठपणाची एक पेश्शल छटा असते. दोन वर्षं सत्ता भोगलेला भूतपूर्व शिवसैनिक नगरसेवक किंवा ब्यूटीपार्लरमध्ये अखंड निरर्थक गॉसिपीय बडबड करणारी बाई यांच्याशीच तिची तुलना होऊ शकेल. त्यात आणि हे बावचळलेले वगैरे भाव. होपलेस.)


सल्लागारः हॅहॅहॅ…


मी: ….


सल्लागारः मग तुम्ही मशरूम सूप नाहीतर रशियन चिकन सॅलड घ्या.


मी: मी ऑफिसातून संध्याकाळी साडेसात वाजता घरी येते. त्याच्यापुढे मशरूम सूप किंवा रशियन चिकन सॅलड करायचं, तर मला ते रात्री ९ वाजता मिळेल.


सल्लागारः कुणी करून नाही का देणार?


मी: नाही. (माझी आई ‘माझी’ आई आहे. श्यामची नाही. तिच्यापुढे मशरूम सूप किंवा रशियन चिकन सॅलडचा विषय जरी निघाला, तरी ती मला गेल्या साडेतीन व्यायामशाळांना वाहिलेल्या पैशांचा उद्धार करेल. पाठोपाठ पाळी माझ्या जागरणांची, माझ्या हॉटेलिंगची आणि माझ्या एकूणच आरोग्यविषयक लडिवाळ सवयींची. ती मला सूप नाहीतर सॅलड करून द्यायला बसलीय. असो. असो.)


सल्लागारः आपण उद्या भेटू या का याच वेळी?


मी: हं.
दुसर्‍या दिवशी माझा इन्स्ट्रक्टरशी प्रेममय संवाद होतो. मी आर्मी ट्रेनिंग घेत नसून, मला जमेल तसतसा स्ट्यामिना वाढवण्याचा माझा विचार आहे हे त्याला नीट समजावून सांगूनही त्याच्या मेंदूला ते झेपत नाही. परिणामी मी जिमला रामराम ठोकते. जिममधल्या सेक्रेटरीछाप माणसाचा जवळजवळ एक दिवसाआड फोन येतो. आठव्या फोनला माझा संयम संपतो. मी भर मीटिंगमध्ये फोन उचलून त्याच्याशी गप्पा मारते.


मी: कसंय ना, मी माझे पैसे भरून तुमच्याकडे आले होते. तुम्ही नाही. गेले पैसे वाया, तर माझे जातायत. मला यायचं असेल तेव्हा, असलं तर मी येईन. तोवर मला फोन करून परत त्रास दिलात, तर मी तुमच्या जिमवर केस करीन. कळलं?


आजतागायत तिथून परत फोन आलेला नाही. मी रोज त्या जिमच्या दारावरून फिरायला जाते. तिथला एखादा मठ्ठ बाप्या दिसला, तर त्याला गोड स्माइलही देते. एग इमल्शन, रशियन चिकन सॅलड, मशरूम सूप आणि प्रोटीन इन्टेकशिवायही माझं व्यवस्थित चाललं आहे.


***

***
Facebook Comments

6 thoughts on “व्यायामशाळा आणि कॅलर्‍या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *