Uncategorized

रक्तात पेटलेल्या अगनीत सूर्यान्नो –

– अभिजित बाठे


तुम्ही जागे आहात की झोपलायत हे कळत नाहीये.
म्हणजे जागे होतात तेव्हा फार जळजळ व्हायची हे आठवतंय.
पण जळजळ थांबलीये ती तुम्ही झोपलायत म्हणून की वय वर्षं पस्तीस – हे कळत नाहीये.
तसंही तुमचं दर्शन दुर्मीळ झालंय.
च्यायला सिअ‍ॅटलमध्ये लई ढगाळ असतं.
तर रक्तात पेटलेल्या अगनीत सूर्यान्नो –
कसं काय?
निवांत?
माझंही निवांत चाललंय.
गजर लावायचे आणि मेटाकुटीला येऊन वेळा पाळायच्या यातही धमाल असते नाही?
स्वत:च स्वत:शी वाद घालायचे, लढायचं, बोलायचं वगैरे वगैरे ठीके….
पण जळजळ बंद.
घोर, निष्काम, निर्लोभ, निर्मोही काळज्या भरपूर, पण ती म्हणजे कपातली वादळं.
तुम्ही मला झोपवलंत की मी तुम्हांला हे बऱ्याच वर्षांची तंद्री भंगल्याने बहुतेक कळत नसावं.
पण आपल्याला एकमेकांची आठवण आली नाही हे मात्र खरं.
तसे अधेमधे अचानक काही काही सूर्य पेटतात,
पण concentrate, segregate, attack आणि diffuse यूजुअली वर्क होतं.
ते आणि तुम्ही इंग्रजीत पुरेसे पेटत नाही हे एक कारण असावं.
पेटणारे सूर्य पेटणार आणि यथावकाश भिजणार, विझणार हे एके काळी नेमाचं होतं.
मग ते ढगाळ डिप्रेशन.
आणि मग त्याच्याशी डील करायची अशी सवय लागली की
देदिप्यमान सकाळ, लाही लाही दुपार, टळटळीत संध्याकाळ – आता उजाडत नाही.
याचं वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये.
तुम्ही हवंहवंसं दु:ख होतात.
तुम्ही नकोसे होऊनही टळत नव्हतात म्हणून तर जळजळ होती.
च्यायला मलापण ना! आजार टळल्याचं सोयर नाही ते नाही, पण लक्षणं उतरल्याचं कोण सुतक!
तर रक्तात पेटलेल्या अगनीत सुर्यान्नो –
तुम्ही एके काळी मस्त प्रोपेल करायचात.
हल्ली तुम्ही ऑन डिमांड पेटत नाही याने मात्र चिडचिड होते.
भेंचोत, पीटर वॉकर असे जागोजागी पेरुन ठेवलेले असतात की सानिध्याने मशाली पेटतात
पण धगधगत नाहीत.
तर रक्तात पेटलेल्या अगनीत सुर्यान्नो –
तुम्ही जुन्या मित्रांसारखे आहात.
म्हणजे आहातही आणि असणारही आहात, पण….


अधूनमधून भेटत जा.


निदान फोन तरी!
***

***
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *