Uncategorized

अडगळीतल्या आठवणींचा पसारा..

– शिवोऽहम्‌

 

॥ १ ॥
Alice! a childish story take,
And with a gentle hand
Lay it where Childhood’s dreams are twined
In Memory’s mystic band,
Like pilgrim’s withered wreath of flowers
Plucked in a far-off land..
~Alice’s Adventures in Wonderland
सुरुवातीला मी अगदी घारीच्या नजरेनं पुस्तकं राखत असे (कारण मित्रांची बरीच पुस्तकं मी हक्कानं ढापलीत). पण आताशा तेवढा आग्रह राहिला नाही. त्यामुळे पुस्तकांना पाय फुटले आणि आवडीची बरीच पुस्तकं परागंदा झाली. उरलेली पुस्तकं थोडी कपाटात, तर बाकीची घरात इकडे, तिकडे, चोहीकडे पसरलेली असतात. त्यात निवांत बसून पुस्तकं वाचायचं ठिकाण म्हणजे टॉयलेट असा माझा ठाम विश्वास. त्यामुळे तिथेही एखाद्-दुसरे पुस्तक सापडलं की आई आणि हिचा ओरडा खावा लागतो. म्हणून एक शनिवार कपाटं आवरण्यासाठी सार्थकी लावायचा ठरवला.
बरेच दिवस न आवरल्यानं वरच्या कप्प्यातल्या पुस्तकांवर धूळ साचून राहिलेली. आधी ती झटकायला घेतली. मग हळूहळू खालचे कप्पे. त्यात इवान दानिसोविचचा एक दिवस, गुलाग, रूट्स, ग्रेप्स ऑफ राथ, रेड सन… अशी जंत्री निघाली. एका कोपर्‍यात कागदी कवर घातलेलं ‘अस्वस्थ दशकाची डायरी’. पिवळं पडलेलं. सहज चाळलं. अमृतसर १९८४, आसाम गण परिषद, प्रफुल्लकुमार महंता इ. विषय मांडलेले. वाटलं, किती दिवस झाले हे सगळं वाचून! मधेमधे ‘रेड सन’सारखं पुस्तक डोळे खाडकन उघडायला लावतं, पण सध्या वाचनाचा कल बदललाय हे खरं. क्षितिजं विस्तारली आहेत म्हणावं की घडणारं वास्तव डोळे उघडे ठेवून पाहण्याच्या क्षणी गुमान स्वीकारलं तरी संधी मिळताच झुगारणार्‍यांची तळी उचलून धरण्याची उमेद कमी झाली म्हणावं? समजत नाही, समजत नाही…
कवर फार जीर्ण झालं असणार, कारण त्याचा कण्याचा कागद मोडून हातात आला आणि सगळं कवर सुट्टं झालं. इलस्ट्रेटेड वीकलीचा जुना कागद. चित्र विरलेलं, पण टिपिकल फाँट आणि ढोबळ प्रिंट असलेलं फ्रंट पेज. किती वर्षांनी एखादा जुन्या ओळखीचा चेहरा अवचित समोर यावा तसं झालं.
लहान होतो तेव्हा घरात १०-१२ वर्तमानपत्रं येत असत. वडील स्वतः पत्रकार होते, त्यामुळे घरात काही न काही कानावर पडत असे. छगन भुजबळ बेळगावात धूमकेतूसारखे प्रकट झाले तेव्हा बाबांनाही कर्नाटकी पोलिसांचे तडाखे बसलेले. किरण ठाकूर घरी येत असत, तेव्हा चर्चा घडत असे. अर्थात काही कळायचं ते वय नव्हतं, पण कान उघडे होते आणि डोकं म्हणजे अनक्लेम्ड टेरिटरी होती. घरी इलस्ट्रेटेड वीकली येऊ लागला आणि बातमीमागचं दृश्य, तडफड, आक्रोश आणि सुकलेल्या रक्ताचा रंग समजायला लागला. खुशवंत सिंगाची टीम. मोठ्ठी, लक्ष्यवेधक मथळ्याची अक्षरे, सुंदर प्रेझेंटेशन आणि फोटोज्.
आणि फोटोज्!
१९८४च्या उन्हाळ्यात ’इलस्ट्रेटेड वीकली’चा बाज एकदम अंगावर आल्याचं आठवतं. गुडघ्यापर्यंत येणारी कफनी, डोक्यावर उंच खालसा पगडी, भरघोस दाढी, हातात घेतलेला मोठा बाण आणि बेदरकार नजर टाकत घोळक्यात बसलेला भिंद्रनवाले. त्याचे ’दमदमी टकसाल’मधले फोटोज, काही मुलाखती ज्यात सिक्ख कौम़ वगैरे येणारे शब्द. ’पंजाब केसरी’च्या संपादकांची हत्या, त्यांचे फोटो आणि सरतेशेवटी विनाशाचे पडघम, सैनिकांचे मोर्चाबंद जथे, ’अकाल तख़्ता’चा भग्न, गोळागोळीत छिन्नभिन्न झालेला चेहरा.”हे असं भारतात होतंय? का?’ असे प्रश्न मनात चुळबुळ करायला लागले. अर्थात, कोणी सांगितलं तरी कळ’लं नसतंच. कारण आम्ही पडत्या बाजूचे. हमखास. शिखांचं मंदिर पाडलं, त्यांची खलिस्तानाची मागणी हाणून पाडली हे कारण माझ्यासाठी पुरेसं होतं तेव्हा. मला आठवतं, की मी भिंद्रनवालेंचे फोटो कापून जमा करत असे तेव्हा.
तेच लंकेचं. भारतीय शांतिसेना लंकेत पाठवली त्याच्या १-२ वर्षं आधी तरी लंकेबाबत बरंच पाहायला मिळालं होतं. अंगावर शहारे यायचे एकेक फोटो पाहून. शून्य काचडोळ्यांनी लहान नातवाच्या कलेवराकडे पाहणारी म्हातारी, तिच्या कपाळीच्या सुरकुत्यांचं जाळं, तिचा मातकट काळा रंग हे अजून विसरलो नाही. बालासिंघमची आणि प्रभाकरनची मुलाखत. मला वाटतं, १९८६-८७ची गोष्ट असावी. तमिळ ईलम् नाव सांगणार्‍या अनेक संघटनांचं पेव फुटलं होतं तो काळ. एलटीटीई स्थापन केल्यापासून तोवरच्या वाटचालीत असे अवघड दिवस प्रभाकरनला दिसले नव्हते. त्यात भारतीय गुप्तचर संस्थांचा आडगिर्‍हाइकी कारभार, सैन्याने चालवलेली मनमानी, मुत्सद्द्यांनी पटावरच्या सोंगट्यांसारखा केलेला वापर असं बरंच काही असावं. आता पुरतं आठवत नाही, पण याच्या जवळ जाणारे विचार होते हे नक्की. सिंहलांनी तमिळांचा चालवलेला वंशविच्छेद, त्याविरुद्ध एकाकी झुंज देणारा हिकमती प्रभाकरन, त्याचं जिवावर उदार असलेलं सैन्य आणि त्यांचा निर्धार. सगळंच रसायन जबरी होतं माझ्यासारख्या, अंड्यातून बाहेर येऊ पाहणार्‍या मुलाच्या दृष्टीने.
***
॥ २ ॥
त्या वयात अशा गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी सुप्त आकर्षण वाटत असे, असं आता मागे वळून बघताना जाणवतं. इतरांच्या तुलनेत माझ्याकडे वाचनाचा रतीब मोठा होता हे वर सांगितलंच आहे. स्थानिक वृत्तपत्रं फुकटात येत असत, कर्टसी म्हणून. बाहेरगावची आणि इंग्रजी वृत्तपत्रं बाबा घेत असत. सकाळी एक गठ्ठा ’सकाळ’, ’पुढारी’, ’सत्यवादी’, ’नवसंदेश’, ’ऐक्य’, ’तरुण भारत’, ’जनवाणी’ (का दुसरं नाव होतं? बाबूराव धारवाड्यांचा पेपर, इचलकरंजीहून निघणारा). संध्याकाळी ’महाराष्ट्र टाईम्स’, ’टाईम्स ऑफ इंडिया’, ’एक्स्प्रेस्’ व आदल्या दिवशीचा ’हिंदू’. आठवड्याला ’इलस्ट्रेटेड वीकली’, दोन आठवड्यानी ’फ्रंट्लाईन’, ’स्पोर्टस्टार’. आजोबांनी कधीकाळी पूर्ण वर्गणी भरली असल्यामुळे ’ऑर्गनायझर’.
शिवाय दर शनिवारी पोलिस टाईम्स येत असे तो निराळाच. त्यातील ग्राफिक चित्रे, बटबटीत बातम्या आणि क्रूड काव्यमय शैलीतले मथळे बालमनाला फार मनोरंजक असत. पण लहान मुलांना उघड, उघड वाचायची चोरी होती. मोठ्यांनी चवीने, चघळत वाचायचा पेपर होता! पो. टा. आलेला दिसला की बाबा तो तत्काळ शेजारी देऊन टाकत. त्यामुळे तो चुकून हातात पडल्यानंतर बाबांच्या नजरेआड, एखाद्या कोपर्‍यात बसून पटापट मुख्य मजकुर वाचुन काढावा लागे. अशा फाष्ट वाचनाला स्पीड रिडींग म्हणतात हे पुढे समजले आणि कॉलेजच्या अभ्यासात उपयोगही झाला. एकदा कोल्हापुरात प्रेमचंद डोगरा आला होता. त्याचे शरीरसौष्ठव प्रदर्शन पहायला आम्ही शाहु स्मारकात गेलो. मी नुकताच सातवी-आठवीत सुर्यनमस्कार, दंड वगैरे व्यायाम सुरू केला होता त्यामुळे हा बलभीम पहायची मला उत्सुकता होती. म्हणुन मीदेखील बाबांसोबत गेलो. कार्यक्रमात शेवटी प्रेमचंदचे प्रदर्शन झाले, डोळे विस्फारुन एकेक पोझेस पाहिल्या. अशक्य काम होते सगळे! मग कार्यक्रम संपला. आम्ही बाहेर पडायला लागलो. ऑर्गनायझर होते अनंत सरनाईक, स्वतः जबरदस्त बॉडीबिल्डर. बाबांना पाहून त्यांनी हसून हात केला. बाबांशी गप्पा चालू झाल्या आणि मध्येच बाबा त्यांना म्हणाले, “ह्याला आवडतो तुमचा ’पोलीस टाईम्स’!” मी चाटच पडलो. मला कल्पनाच नव्हती की बाबांना हे माहीत आहे म्हणून. आणि हे सरनाईक तो पेपर चालवतात?! ‘हो, आवडतो!’ म्हणायचीही चोरी! सरनाईक आणि बाबा हसले, मला फार लाज वाटली स्वतःची, असं आठवतं. पण ते तेवढ्यापुरतंच. पुढच्या शनिवारी पुन्हा ’पोलीस टाईम्स’ची वाट पाहिली असेल.
त्या वेळी स्थानिक पेपरात येणारे विषय, म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल वगैरे, मला फारसे आठवत नाहीत. पण ’महाराष्ट्र टाईम्स’, ’एक्स्प्रेस्’, ’वीकली’, ’हिंदू’ हे फार चांगले असं बाबा म्हणत असत. त्यामुळे मी वाचायचा प्रयत्न करत असे. सातवीच्या सुट्टीत फार कष्टाने मी टॉम सॉयरची गोष्ट इंग्रजीतून वाचली. महिना लागला असेल! पण मराठी माध्यमाच्या मुलाला कितीसं इंग्रजी येणार? म्हणून बाबांना सांगितलं की तुम्हीच तुम्हांला आवडलेलं थोडं-थोडं वाचून दाखवा. मग त्यांनी गाळीव बातम्या मला वाचून दाखवाव्यात, कधी मराठी तर्जुमा सांगावा तर कधी नाही, असं चाले. पण एकूण बातम्या वाचायची, ऐकायची आवड लागली. हे सगळं वाचन, श्रवण चाललेलं असताना मुख्य इतिहास घडत होताच. जगात उलथापालथी सुरू होत्या आणि अनिवार्य, अनाकलनीय घटनाप्रवाहात माणसं, समाज, राष्ट्रं होत्याची नव्हती होत होती. पण मला ते फक्त वाचून कसं कळणार? चित्रांनी, फोटोंनी ते काम सोपं केलं. चमच्या-चमच्याने भरवलं म्हणा ना.
भिंद्रनवालेंचा काळ फार धामधुमीचा होता. पंजाबात पूर्वी एका घरात मोठा मुलगा हिंदू आणि धाकटा शीख अशी विभागणी असायची. शीख धर्म आहे न मानता पंथ आहे असं सारे समजत असत, पण मास्टर ताराचंदांनी, माझ्या माहितीप्रमाणे, फाळणीच्या काळात शिखांच्या वेगळेपणाचा उच्चार केला. अकालींना काटशह देण्याच्या संजय आणि इंदिराबाईंच्या युक्तीने भिंद्रनवालेंचा उदय पंजाब राजकारणात झाला. तो संत होता की नाही हे माहीत नाही, पण राजकारणी नव्हता हे नक्की. खालसा आणि निरंकारी असं काही असतं हे मला फोटोंवरून समजलं. सात मजली निळी पगडी घातलेले, पाचही हत्यारं ल्यालेले ते उंचेपुरे खालसा. आणि पांढरी साधी पगडी घातलेले संत-समागमवाले निरंकारी. तर निरंकारी/खालसा वादात शिखांची यादवी सुरू झाली आणि आज आपल्याला माहीत असलेल्या पंजाब प्रश्नाची वात पेटली. त्या आगीत कोणी आपली पोळी शेकली आणि कोणाचं सरपण कामी आलं ते सर्वज्ञात आहे. ‘फ्रॅट्रिसायडल’ शब्दातच काही चिरफाड करण्याचा भाव आहे असं मला वाटतं, हिंदू-शिखांच्या, शीख-शिखांच्या संघर्षात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली, पण लोकांपर्यंत माहिती पोहोचत नसे, आणि बरीच सेन्सॉरही होत असे. एका मोठ्या संपादकाला, लाला जगत नारायण यांना, दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या गेल्या, पण मराठी वर्तमानपत्रांमध्ये एकही बातमी नव्हती. अपवाद फक्त ‘मटा’. हे बाबांनी सांगितल्याचं आठवतं. घटना मी स्वतः वाचायला लागण्याआधीची आहे. ’टाईम्स ऑफ इंडिया’ तेव्हाही सरकारधार्जिणा होता आणि ‘इन द गुड बुक्स’ राहूनच त्यांनी आजचं साम्राज्य उभं केलं आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब असं म्हणतात, पण भारतात ’एक्प्रेस्’, ’इलस्ट्रेटेड वीकली’, ’हिंदू’ हे आणि असेच इतर काही त्यातले बिनीचे मानकरी म्हणावे लागतील.
अर्जनसिंह, जसजीत सिंह अरोरा, दिपेंदरसिंह हे सेनानी सरदार ‘दिसत’ असत. पण कुलदीप सिंह ब्रार म्हणजे सफाचट सैनिक. मग मला आमच्या वर्गातला रणजीतसिंह खर्डेकर आठवे. खानदानी मराठयांमध्ये असलेले हे ‘सिंहां’चं फॅड तोवर मला माहीत नव्हतं. ब्रार यांच्या मुलाखती, त्यांचे निर्णायक डावपेच आणि त्यांचा अरुण वैद्यांबरोबर चालत असतानाचा फोटो मला आठवतो. त्याच्याच शेजारचा फोटो होता भिंद्रनवालेंच्या छिन्नविच्छिन्न झालेल्या चेहर्‍याचा. म्हणजे सरकारने तसं जाहीर केलं होतं. भिंद्रनवालेंचा उजवा हात असणारे, निवृत्त मेजर जनरल शाहबेगसिंह यांचं शव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यावरुन उठलेली राळ आठवते.
शौरी ’एक्प्रेस’चे संपादक असताना झालेला झगडा तर पत्रकारितेसाठी प्राणांतिक असाच होता. अंतुले प्रकरणात त्यांनी कॉन्ग्रेसला दे माय, धरणी ठाय करून सोडलं होतं. अंतुले खुर्चीवरून पायउतार झाल्यावर आलेले बाबासाहेब भोसले यांनी छोट्या इनिंगमध्ये जोरदार बॅटिंग करून अवघ्या महाराष्ट्राला लोटपोट हसवलं. कोल्हापुरात आलेले असताना त्यांना बाबांनी राजोबा-गडदे यांच्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैमनस्याबद्दल विचारलं होतं, तेव्हा ते असं काहीसं म्हणाले होते, “चालायचंच हो! एवढं काय मनावर घेता तुम्ही पत्रकार लोक? पूर्वी एका न्हाव्यानं मिशी उडवली तर सगळ्या न्हाव्यांची भावकी बोडकी व्हायची. आता एखादा खपला, तर दुसरा एखादा खपणार, इतकंच!” राज्यकर्त्या व्यक्तीला समाजाच्या नाडीवर बोट ठेवून चालावं लागतं वगैरे गैरसमज माझ्या डोक्यात कधी शिरलेच नाहीत याचं कारण अशा नेत्यांची मुक्ताफळं.
मराठी पेपरात बरंच काही येत होतं. ‘कोल्हापूर सकाळ’ हा त्यातल्या त्यात राज्य/राष्ट्रीय स्तरावरील बातम्या द्यायचा, तर ’पुढारी’ हा इतर स्थानिक बातम्यांसाठी वाचला जायचा. म्हणजे मंगळवार पेठ व शिवाजी पेठ येथील तरुणांमध्ये कमानपाटा हाती घेऊन झालेली हाणामारी, किंवा शाहू मैदानावर फुट्बॉलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांनी खूश होऊन विजेत्या संघातील खेेळाडूंना प्रत्येकी २ कोंबड्या तिथल्या तिथे घोषित केल्या… अशा बातम्या आणि ‘विश्वसंचार’ नावाचं तुफान लोकप्रिय चौकटवजा सदर. त्याशिवाय इतर वृत्तपत्रं अनेक होती. ‘नवसंदेश’ हा कल्याण/मुंबई मटक्याच्या आकड्यांसाठी वाचला जाई. ‘सत्यवादी’ हा पेपर कुस्त्यांचे रंगतदार वृत्तांत देत असे. राजकुमार पाटलांचे वडील, आता नाव आठवत नाही, चालवत असत. शाहू मिलसमोर तेव्हा असलेल्या मैदानात एडक्यांची टक्कर होत असे. मोठमोठे, वळलेली शिंगं असलेले एडके मोठ्या मस्तीत उभे असायचे. एकदा जिंकलेल्या एडक्याला नि त्याच्या मालकाला बक्षीस देण्यासाठी ‘सत्यवादी’चे मालक आले होते आणि ते समोर येताच अजून मूडमध्ये असलेल्या एडक्याने धडक देऊन त्यांना आडवं केलं होतं!
हळुहळु वाचायची गोडी लागली आणि मग मोहरा वळला ‘हिंदू’कडे. गोष्टी घडतच होत्या तशा तेव्हा. जिनिवाहून कोणी एक नवी पत्रकार, चित्रा सुब्रह्मण्यम नावाची, नव्या बातम्या देऊ लागली होती…
***
 
॥ ३॥
त्या घडामोडींकडे वळण्याआधी एक दुसरा आठवणींचा, विचारांचा पसारा निवारायला हवा. लिहायला घेतलं, तेव्हा मला कल्पना नव्हती हे असं गाय रिचीच्या फिल्मसारखे नॉन्-लिनिअर होईल. हा सगळा ‘वर्म्स् आय व्ह्यू’ बघताना थोडं मागे-पुढे व्हायचंच असं म्हणू या. मागे जाऊ या जरा.
कॉन्ग्रेस ही एक बाधा आहे असंच आमच्या भागात, नागपुरात, सगळे म्हणायचे. मोठमोठ्या नावांपुढे खास वर्‍हाडी हेलाने ‘भोऽऽसडीचा’ लावल्याखेरीज आजूबाजूचे बोलत नसत. १९७७ च्या आणिबाणीत मी फारच लहान होतो आणि काही कळत नव्हतं. पण तरी नागपुरातले ते दिवस मला लख्ख आठवतात. ‘कुंपणाचे लाकडी खांब उपटायचे आणि पेटवायचे दिवस म्हणजे होळीचे’ हे समीकरण मोडलं ते त्या काळात. आमच्या घराशेजारी मा. गो. वैद्यांचं घर होतं. त्या एका रात्री मोठ्ठा जमाव निषेधाच्या घोषणा, शिव्या देत, ‘इंदिरा गांधी झिंदाबाद’ असं ओरडत आमच्या रस्त्यावर चालून आला होता. त्यांचा रोख वैद्यांच्या घराकडे असावा. घरातून बाहेर पडायचं नाही कोणी, असं वातावरण. फार वेळ ऐकलं, ऐकलं आणि बाबा-काका दोघे गरम डोक्याने लाठ्या घेऊन बाहेर पडले. आई, आजी हात धरून थांबवू लागल्या, पण दोघे हट्टाला पेटले आणि बाहेर पडले. थोडे पुढे गेले असतील-नसतील तोच मोठा धोंडा भिरभिरत आला आणि बाबांचा हात पार फोडून गेला. रक्ताची मोठी धार लागली आणि लाठी कुठच्या कुठे उडून पडली. मारामारी झाली का नाही ते आठवत नाही. शेजार्‍यांनी, आईने हिंमत करून त्यांना आत खेचून आणलं म्हणून बरं. पण तेवढ्यावर कुठलं थांबायला? आम्ही उंदरांसारखे आतल्या खोलीत बसून होतो, डोकावून पाहत होतो. तेवढ्यात समोरच्या दाराचा अडसर फोडून एक हेऽऽ मोठा बल्ल्या (लाकडाचा सोट) घरात शिरला. वाटेतल्या वस्तू फोडाफाड करत स्वैंपाकघरात येऊन थांबला. मी आश्चर्याने सगळं बघत होतो. लोक बाहेरून शिव्या देत होते, “बाहेर तर या!” म्हणत होते. पण आमच्या सुदैवाने ते आत आले नाहीत. वैद्य त्यांच्या घरात नसावेत तेव्हा. कारण काही कमीजास्त न होता लोक आले तसे शिव्या देत निघून गेले.
अशा वातावरणातून आम्ही आलेलो, कोल्हापुरात, कॉन्ग्रेसच्या चिरेबंदी गडात! दर दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत (हो! उन्हाळ्याच्यासुद्धा!) नागपूरची फेरी ठरलेली, महाराष्ट्र एक्स्प्रेस ह्या ३० तास घेणार्‍या ढकलगाडीतून. अधेमधे ब्रेक-जर्नी. शेगाव-खामगाव-भुसावळ. मोठी गंमत यायची. १९८३ च्या दिवाळीच्या सुट्टीत मला कपिल देव ह्या माणसाने केलेले पराक्रम समजले, क्रिकेट हा खेळ असतो हे समजलं आणि पेपरातली चित्रं गोळा करायला सुरवात झाली.
१९८४ च्या दिवाळीच्या सुट्टीत मी बदललो. घडलं ते असं:
दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आली होती. फराळ, फटाके अशी सगळी धमाल होती. ३१ ऑक्टोबरचा दिवस काही वेगळा नव्हता. अमर-ज्योती मंगल कार्यालयाजवळ मामा राहत होता, त्याच्या घराच्या अंगणात सकाळी खेळत होतो. तेवढ्यात मामाचा साला, अनिल, धावत घरात शिरला आणि जरा वेळानं धावत बाहेर आला. मी म्हटलं, “का रे अनिलमामा, काय झालं?” तो दोन मिनिटं बघत राहिला आणि म्हणाला, “इंदिरा गांधींना ठार मारलं रे!” कोणी मारलं हे कुणाला माहीत नसावं. पण प्रत्येकाला धाकधूक वाटत होती. मग मामा घाईघाईने आला आणि मला आत घेऊन गेला. त्यानंतर दुपारी बाहेर धांदल उडालेली दिसली. समोरच्या ‘हितवाद’च्या ऑफिससमोर लोक गोळा झाले होते आणि माहिती मिळवायचा प्रयत्न करत होते. तोवर उडत उडत समजलं होतं की पंतप्रधानांना त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या घातल्या होत्या. बिअंतसिंह आणि सतवंतसिंह ही नावं संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी होती. ती संध्याकाळ नाही नाही त्या चर्चा करण्यात गेली. महात्मा गांधींना मारलं, त्यानंतर झालेलं ‘ब्रह्मसत्र’ बर्‍याच लोकांना माहीत होतं. त्याच्या कटू आठवणी निघाल्या आणि शेवटी एका विचारावर सगळे थांबले. शिखांसाठी उद्याचा दिवस काळ असणार!
पण तेवढं थांबायला लोकांना वेळ नव्हता, त्याच रात्री नागपुरात एका शीख ढाबेवाल्याला जाळलं, त्याच्याच बाजेला बांधून. दुसर्‍या दिवशी तयारी जास्त ‘प्रोफेशनल’ झालेली असावी. शहरभर ‘इंदिराजी के हत्यारों को फांसी दो, फांसी दो’ असे नारे देत घोळके हिंडू लागले होते. दिसेल त्या शिखाला केस धरून, ओढून, लाथा-बुक्क्यांनी तुडवत जमाव न्याय करू लागला होता. मी स्कूटरवर मागे बसून बर्डीवर जात असताना हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. अर्थात माझ्या लेखी तो फारसा घृणास्पद प्रकारच नव्हता त्या वेळी! कांगारू कोर्ट प्रत्येक माणसाच्या (आणि मुलांच्याही) मनात लपलेलं असतंच आणि म्हणूनच जमावाचं मानसिक वय लहान मुलापेक्षा मोठं नसतं हे मला पटतं. हा झटपट न्याय करण्याचा पायंडा आपल्याच अंगाशी येऊ शकतो हे जेव्हा सर्वांना कळेल तेव्हा माणसाची जात सुधरेल. अर्थात हे दिवास्वप्नच राहणार. तसा समजावायचा प्रामाणिक प्रयत्न, सर्वार्थाने, एका म्हातार्‍याने केला होता. त्याच्या मागे, नव्हे त्याच्या हयातीतच, त्याच्या विचारांचं काय कडबोळं झालं ते काय सांगायला पाहिजे? अशा अनैतिहासिक दृष्टीचा ऐतिहासिक पुरुष जगात दुसरा झाला नाही असं कुरुंदकर म्हणतात, ते काही खोटं नाही.
त्या प्रसंगांनी मला जाण आली. माणसे मारामारी करतात, ते मुलं मारामारी करतात तसं नसतं, हे प्रत्यक्ष कळलं! आजही मला वाटतं की त्या अनुभवाआधीचा आणि नंतरचा मी यांत एक दरी आहे, जी सांधता येत नाही. I know it’s no use going back to yesterday, because I was a different person then. पेपर, पुस्तकं वाचून जे बापजन्मात समजलं नसतं ते एका क्षणात समजलं. मोठं व्हायची किंमत निरागसपणा, चांगुलपणाला मोठमोठे पोचे पडणं ही असावी, ही आपली शोकात्मिका. शोकांतिका म्हणत नाही, कारण नवी पिढी तो निरागसपणा घेऊन येतेच आणि चक्र चालूच राहतं. हे असंच चालू राहणार हा ऐतिहासिक, डोळस दृष्टिकोण. पण त्या म्हातार्‍यासारखे वेडे व्हावेत, होत राहावेत. इतिहास बी डॅम्ड्! माणूसपणा त्यातच आहे.
त्या मोठ्या भूकंपानंतर (डार्क पन् इंटेन्डेड) मग एकामागून एक घटना घडायला लागल्या. पेपर्स फेथफुली गाळीव वृत्तांत सांगू लागले. गेलेल्यांचे आकडे समजू लागले. मेलेली माणसं इतरांसाठी आकडे होऊन उरली. आकडे मनातून झाडता येतात, नावं नाहीत. तेवढे निलाजरे आपण झालो नाही हीच समाधानाची बाब! पण खरंच, एक दिवस सगळ्या मारलेल्यांचे फोटोसहित नावं / पत्ते एका पेपरात यायला हवे होते असं मला वाटतं. हजार पानी पेपर काढावा लागला तरी बेहत्तर! निदान लाज वाटून तरी ते सगळे थांबलं असतं. बरं! कदाचित नसतंही. माणसांची लांडगेतोड होत असताना सगळ्या साक्षेपी संपादकांत एकही खमका निघाला नाही. कदाचित माझ्या वाचनात, ऐकण्यात आलं नसेल म्हणू या. सारे क्षीण आवाजात हळहळत. राजा ओंगळ, नागडा आहे हे ठणकावून सांगायचं धैर्य कोणीही दाखवलं नाही. ठेचलेले लोक हंबरडा फोडत कोर्टाकडे धावले आणि नावं समोर यायला लागली. एच. के. एल. भगत, सज्जनकुमार, राजेश पायलट, ललित माकन, ब्रह्मानंद गुप्ता…. ललित माकन हे शंकरदयाळ शर्मांचे जावई. अतिरेक्यांच्या गोळ्यांना नंतर बळी पडले आणि सुडाचा एक चॅप्टर संपला. पण सगळ्यांत मोठा धक्का बसला तो जवळजवळ दोन वर्षांनी. जनरल वैद्यांची पुण्यात कॅम्पात गोळ्या घालून हत्या करण्यात आली तेव्हा.
हे सगळं तांडव सुरू असताना पंजाब बदलत होता. रिबेरोंवर प्राणघातक हल्ला झाला आणि सरकारने त्यांना बाजूला करून एक नवा पोलीसप्रमुख नेमला : के.पी.एस. गिल!
गोळीला उत्तर मोठी गोळी. ईंट का जवाब़ पत्थर. एक पोलीस गेला तर मारणार्‍याचे तीन नातेवाईक गेले. मारणाराही गेला. सीमेवर कुंपण पक्कं झाल्यावर पळवाटा बंद झाल्या आणि अतिरेकी प्रेशर कुकरमध्ये सापडले. एकेक करून सारे म्होरक्ये मारले गेले. काही कॅनडातून पत्रकं वाटण्यापुरते राहिले, काही न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर निषेधमोर्चे काढून धुगधुगी कायम ठेवू लागले. तसे काही शीख मला सॅन होजेच्या गुरुद्वारात बरेचदा दिसले होते. ‘राज करेगा खालसा!’च्या खाली भिंद्रनवालेंचा फोटो असलेला टी-शर्ट घालून एक पिकलेला म्हातारा हळूहळू पायर्‍या चढत होता. लंगरमध्येही तो फोटो होताच आणि शेजारी गुरू गोविंद सिंहांचा फोटो होता! पण जेवण छान होतं, कीर्तन छान होतं, रागींचं गायन छान होतं. केशधारी आणि मोना शीख एकत्र मिसळत होते. अमेरिकेचा मेल्टिंग पॉट सगळ्यांना घुसळून काढत होता.
१९८७ च्या ‘ब्लॅक थंडर’नंतर दहशतवाद पंजाबातून खरवडून काढला गेला. १९९२ पर्यंत पाळंमुळं खणून काढली गेली.
त्या वेळी भारतात काय काय सुरू होतं? सुभाष घिसिंग गोरखा लँड चळवळ चालवत होते. आयझॅक्-मुईवा नागांचा प्रश्न पेटवत ठेवत होते. लालडेंगा मिझो नॅशनल फ्रंट चालवत होते. मणिपुरात कांगलैपाक पार्टी सुरू झाली होती. नक्षलवाद दबा धरून होता. भोपाळ दुर्घटनेचं रामायण सुरू झालं होतं. आसाम विद्यार्थी चळवळ सत्तेत आली होती. महंता आता विरोधकाच्या भूमिकेतून राज्यकर्त्याच्या भूमिकेत आले होते. तमिळनाडूत द्रविड पार्ट्या लंकेतल्या आगीत तेल ओतत होत्या.
सगळा भवताल खदखदत होता…
***

 

***
चित्रस्रोत : आंतरजालावरून साभार
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *