Uncategorized

पाकीट आणि चपला गायब

– अभिजित बाठेपंधरा-एक वर्षांपूर्वी गुलज़ार कुठल्यातरी चॅट रुममध्ये येऊन लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणार होता.
बाबाने मग त्याच्या मित्रांना त्याला कोणता प्रश्न विचारणार असं विचारलं.
त्याच्या एका मित्राने एक तोड प्रश्न पाठवला –
महेन – “सुधा – माज़ी को माज़ी न रहने दिया तो…”
त्यावर सुधा म्हणते, “माज़ी – याने?”
“माज़ी याने past”….
आणि मग ‘कतरा कतरा’ वगैरे सुरू होतं.
मित्राचा प्रश्न असा की बाबा रे – ते वाक्य कसं पूर्ण होतं?गुलज़ारला कदाचित आठवलं नसतं….
च्यायला, कुणाला काय आठवणार?
मी लिहिलेल्या गोष्टीचे संदर्भ लोक मला दहा-दहा वर्षांनी विचारतात. मग ओरिजिनल लेख, गोष्टी, पत्रं शोधावी लागतात. उत्तरं कधी सापडतात, कधी सापडत नाहीत, कधी सांगावीशी वाटतात, कधी नाही. बऱ्याचदा “तलाश जारी” चपलख बसतं. इन जनरल लिहिलेल्या ओळीबद्दल लिहिण्याआधी, लिहिताना आणि लिहिल्यानंतर विचारणं हे चूकच.
ती चूक करायला मला भाग पाडलं या दिवाळी अंकाने.
मी करतोय आणि केलं ते चूक हे कळायला मला २-३ महिने लागले. यूजुअली जास्त लागतात. मुलाखतीच्या अनुषंगानं सलील, कविता, मी या विषयांबद्दल मीच मला पुन्हा-पुन्हा, अधूनमधून आणि चढ्या क्रमाने विचार करायला भाग पाडलं.सलील वाघ हा माणूस अस्तित्वात आहे – मी त्याला भेटलोय!
सलील वाघ या माणसाला मी फारसा ओळखत नाही – मैत्री-बित्री लांब.
सलील वाघ हा दिसायला एक कुट्ट काळा माणूस आहे – हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.
सलील वाघ सोबत मी एकदा चहा प्यायलोय – भरत नाट्यसमोर.
मी ज्यांच्या सोबत एकदाच चहा पितो ते लोक एकतर अत्यंत चुत्ये किंवा लई भन्नाट असतात. सलील दोन्ही नाही.
नक्की.
सलील मूळचा कार्हाटीचा. सौराष्ट्रात जन्मला, कसब्यात वाढला, नू.म.वि.त शिकला.
यांतलं काहीही त्याच्याकडे पाहून जाणवत नाही.
सलील सरावलेल्या पुणेकराच्या संशयात्मक शांतपणे बोलतो.
त्याच्या शब्दाला वजन असतं. असं निदान आपल्याला वाटतं.
सलील गुंतागुंतीच्या गोष्टी अगदीच सोप्या शब्दांत सांगतो. त्याने फार मोठ्या गुंत्यांचा फार सखोलपणे आणि निर्णायक विचार केल्याचं जाणवतं.
सगळ्या गुंत्यांवर मात करून पुढे जाऊन त्याने इंजिनिअरिंग केलं.
आणखी पुढे जाऊन तो सिंहगड रोड परिसरात राहतो.
त्याच्या मते, स्वत:ची ओळख म्हणजे passion.
त्याच्या मते, छंदाचा धंदा करू नये.
त्याच्या मते, काही करायचं असेल तर बारा वर्षांच्या वनवासाची तयारी ठेवावी.पण हे आणि एवढंच मला माहितीए किंवा एवढंच मला त्याच्याशी बोलल्यावर कळलं.
आता यावर त्याची मुलाखत काय कप्पाळ लिहिणार?
बरं, लिहून होईलही तासा – दोन तासांत, पण ती एकदा चिकटली की चिकटली.
त्यातून सुटका नाही.
मग लोकांनी विचारण्याआधीच मीच मला मागचे संदर्भ विचारत राहणार.
वर्षानुवर्षं….Character is what you do when no-one is watching – हे वाक्य मला मागचे बरेच दिवस झाले छळतंय.
Character आणि कवितेचा काय संबंध?
Character आणि कवितेचा संबंध काय?
की character म्हणजे कविता?
मन से रावण जो निकाले राम उस के मन में है – ही कविता की character?
कविता म्हणजे विचार की नुसताच उद्गार?
सलीलचं कॅरॅक्टर म्हणजे कविता का?
एकतर मर मर जगून कुणी न पाहता करायची, आणि मग तिचा आणि आपला उरलेला जन्म तिची सांडमांड, हेळसांड, धिंड, धिंडवडे, अवहेलना, तिच्या अर्थाची वाचकांना लागणारी हूल आणि हुलकावणी पाहत बसायचं?
प्रशचिन्हावाचूनचा विचार म्हणजे कविता का? की फक्त शांतता?
प्रश्नचिन्हाचा शोध शून्याच्या आधी लागला असावा. नसता मी काय लिहिलं असतं?संपादक म्हणाले (बहुतेक) की सलीलला ओळखणारा जगात एकमेव मनुष्य तू आहेस. तू बोल.
सलील म्हणे काय बोलणार? मग संपादकांनी चुत्याप्स प्रश्न तयार करून दिले.
मी ते त्याला पाठवले.
बोललो तेव्हा त्या प्रश्नांची त्याने इमानेइतबारे उत्तरं दिली.
संपादक म्हणाले – अरे, मुलाखत परत ऐक, उतरवून काढ, मग नीट लिही.
च्यायला, मला तसं करणं भयानक वाटलं.
एकतर मला असं (किंवा बहुतेक कसंही आणि काहीही) करता येत नाही.
माझ्याकडून जनरली गोष्टी होतात.
मी झोपायला जात नाही – मी झोपतो.
म्हणजे असा काम करता करता लवंडतो.
तर अशी ही एक लवंडलेली मुलाखत –(हे बघ – मला असं वाटतं की) तीन प्रकारचे कवी असतात – खपाऊ, टाकाऊ आणि हौशे.
खपाऊंच्या कविता सगळेच छापतात. त्यांची पुस्तकं निघतात. पुस्तकांच्या आवृत्त्या.
टाकाऊंच्या कविता आयडिऑलॉजीला धरून असतात. त्या विद्यापीठांत लागतात. त्याच्या आवृत्त्या.
हौशे पन्नासेक आवृत्त्या आपणच छापून आल्या-गेल्याला वाटतात.
(सलील या तीनपैकी कुठला, असा प्रश्न मला पडला नाही. वर्ग-प्रवर्ग आणखीही असू शकतात. सलील माझ्या माहितीतल्या कुठल्या वर्ग-प्रवर्गात फिट होऊ शकत नाही. तो ब्राह्मण आहे का, हा माझा रेग्युलर प्रश्नही मी त्याला विचारला नाही. लोकांना चुत्या बनवायची वेगवेगळी पांघरुणं त्याला माहीत असावीत. मला माहितीएत. तशा पांघरुणाची सलीलबाबत मला गरज वाटली नाही. प्रश्न विचारण्याचं, उत्तर देण्याचं किंवा मुलाखत कुठून(ही) कुठ(ही)पर्यंत नेण्याचं बंधन आम्हा दोघांवरही नव्हतं.)

view
लेखकाच्या नोटबुकातील एक पानस्वत:ची ओळख म्हणजे पॅशन आणि भाषा विकावी लागेल असा कुठलाच धंदा मला करायचा नव्हता म्हणून मग मी त्या वाटेला गेलो नाही.
सुरुवात कुठून झाली माहीत नाही (आणि ते तितकंसं महत्त्वाचंही नाही), पण शाळेत लिहायला लागलो.
एकदा कविता मोठ्या बहिणीला सापडल्या.
एकतर कविता करणं ऑकवर्ड, त्यात तिच्याबद्दल बोलणं आणखीच – अशी जुनी आठवण.
तुम्ही कवी हे कळल्यावर लोक तुम्हाला त्यांची बाडं आणून द्यायला लागतात.
पण ते नंतर.
शांतता वगैरे फारशी मिळत नाही. नसते.
गदारोळात होते ती कविता.
शांतता (शोधलीच तर) उपेक्षेत मिळते.
पण त्यातही सॉलिट्यूड आणि प्रायव्हसी या वेगळ्या गोष्टी.
मी सुटं लिहितो.
तुटक, त्रोटक.
थोड्या कविता जमल्या की फेर करायला बसतो.
कविता लिहिल्यावर विचित्र वाटतं.
जन्मानंतर कवी आणि कविता वेगळे होतात.
असं असूनही पुढे कविता चित्र्यांपर्यंत पोचल्या.
ते म्हणाले छाप नाहीतर (कवितांचा) जीव दे.
प्रकाशन वगैरे म्हणजे कवितांवरचा अग्निसंस्कार.
तो मुकुंद ओकने केला आणि विक्रीला पाठवला.
त्याचं नाव ‘निवडक कविता’.
त्याला हळूहळू वाचक मिळाले.
एका लेव्हलचे मिळाले त्यामुळे बरं वाटलं.
त्याने थोडंफार नाव झालं, मग पुढची पुस्तकं बऱ्यापैकी विकत घेतली गेली.
कवीने प्रकाशनानंतर १२-१४ वर्षं उपेक्षेची तयारी ठेवावी. निगेटिव्ह फीडबॅक लवकरात लवकर मिळावा नाहीतर कवी अल्पसंतुष्ट होतो.
(बरं,) कविता आणि विद्वत्ता या वेगवेगळ्या गोष्टी.
कवीला कवितेचा किंवा समकालीन कवींचा अभ्यास लागत नाही.
ते आणि नव्वदोत्तरी, नव्वदोपरी वगैरे अशी कविता कालबद्धही होत नाही.
५००० वर्षं झाली माणूस कवी आहे. त्यामुळे जागतिकीकरण वगैरे डजन्ट मॅटर.
(हे बघ,) प्रोफेशनल कवी म्हणून वाचन असा काही प्रकार नसतो. नाही म्हणायला इतर कवी वाचलेत. प्रत्येकाचा झपाटलेपणाचा काळ असतो. सवयी लागतात. रिचुअल बनतं. निराला, गोरखनाथ इंटरमिटंटली वाचले. समशेर बहादूर, मर्ढेकर वाचले. पुढे फिलॉसॉफी आणि ह्युमन राईट्स इश्यूज्‌बद्दल वाचलं, पण (त्याचं असं आहे की) एखादी गंमत जशी शेअर करावीशी वाटते, तशी कविता.
म्हणून प्रकाशन.
लोचे त्यानंतर होतात.
म्हणजे लिहिल्यावर एकतर डिप्रेशन येतं की हे चुकलं तर नाही?
मग प्रकाशनानंतर वाटतं की च्यायला जी गोष्ट प्रिव्हिलेज्ड होती ती आता दुसऱ्यालाही आवडली. मग ते बरोबर का? मग युनिक असं काहीच नसतं का? की कशावरही विशेषाधिकार नाही?
इथे शिस्त लागते.
कविता निर्दयीपणे स्वत:पासून वेगळी करावी लागते.
पुढचं काम – पुढची कविता करणं.
कवी हा कृतघ्नच असावा लागतो.
त्याने फार फार तर काय करावं? प्रकाशन!
(बरं, दुसरी गोष्ट अशी की) कविता अनवधानाने कुणाला आवडल्याच आणि कुणी तसं सांगितलं की मग जशा आवडल्या तशाच कविता लिहाव्यात का, असा मोह होतो. कविता आधीच कवीपासून वेगळी झालेली असते. प्रत्येक जण सिनेमा आपापल्या ऍंगलने पाहतो. सत्याला अनेक दरवाजे असतात. कवी हा नेहमीच स्वत:च्या सिनेमाचा आणि स्वत:च्या कवितेचा हीरो असतो. पण ऍडॅप्टेशनचा त्याला अधिकार नाही.
सोशल नेटवर्क, नियतकालिकांत प्रसिद्धी ही म्हणजे भुक्कड लोकांशी मासळी बाजार लेव्हलवर स्पर्धा. त्यामुळे त्यात कधी पडलो नाही. नियतकालिकांत कविता कधी छापली नाही कारण माझ्या एकट्याच्या कविता छापायला कुठलं नियतकालिक तयार झालं नाही.
(एकतर) आपण अनवधानानं शिकतो ती भाषा.
गद्य म्हणजे लिखाणाचं करप्शन.
गद्य आणि पद्य ही मुळातच दोन वेगवेगळी माणसं.
गद्य आयुष्याच्या अर्थाबद्दल बोलतं तर पद्य म्हणजेच आयुष्याचा अर्थ.
कवीला स्वत:ची कविता कळते तेव्हा ती वितळायला लागते.
मग वाहून जाते.झालं – संपली मुलाखत.म्हणजे च्यायला कविता वगैरे विषयच आधी दुर्बोध. सलीलच्या मते तर कविता कवीला कळताच कामा नये, नाहीतर ती वितळायला लागते. व्हॉट द फक – च्यायला लोक असं सगळं गोठवून का ठेवतात?
ते आणि त्यात त्याची कविता.
मी त्याचं ‘निवडक कविता’ वाचलं आणि मला ते आवडलं.
म्हणजे काय – तर ऑब्व्हियसली मला ते कळलं, मी त्याच्याशी रिलेट करू शकलो. मी जर लिहिलं असतं, तर ते असंच काहीतरी असतं असं वाटून मी सिनेमासारखा त्यात स्वत:ला शोधायला लागतो. मी त्याची आणखी एक-दोन पुस्तकं वाचायचा प्रयत्न केलाय, पण मला ती कळली नाहीत. अजून तरी.
एक माणूस वर्षानुवर्षं काहीतरी लिहितो. आपण त्यातला एक तुकडा वाचतो. बरं, आपण वाचेपर्यंत सोड, त्याचं लिहून झाल्या-झाल्या त्याचंच लिखाण त्यालाच परकं झालेलं.
मग त्याच्या परक्या आणि कधीकाळी आपल्याशा झालेल्या तुकड्याबद्दल बोलणं म्हणजे माजी छावीच्या माजी छाव्याला भेटण्यासारखं झालं.
ऑकवर्ड!(सलीलचा धंदा कुठला हा प्रश्न अप्रस्तुत. एका दृष्टीने ‘भाषा न विकणे’ आणि ‘पुस्तक प्रकाशित करणे’ हे हिप्पोक्रिटिकल वाटू शकतं. पण मी वाचलेल्या त्याच्या लिखाणावरून त्याने पुस्तकं प्रकाशित केली असली तरी भाषा विकली नाही हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नीट विश्लेषण करणं अवघड. सलील वाचलेल्या लोकांना हे साधारण कळू शकेल. सलीलची वाचकांना ओळख करून द्यावी, तो कशा प्रकारच्या कविता करतो याचं वानगीदाखल उदाहरण द्यावं किंवा त्याच्या कुठल्या एका कवितेवर त्याच्याशी चर्चा करावी, असं मला कधीच वाटलं नाही आणि मी तसं केलंही नाही. त्याला कविता लिहून किती विचित्र वाटत असेल, हे मी मला ती वाचून किती विचित्र वाटतं, याच्याशी आयडेन्टिफाय करू शकतो. छावीचा छावा याव्यतिरिक्त मला दुसरं उदाहरण सुचलंही नाही. मी जिथवर पोचून परत आलोय तिथवर तू कधी पोचलास का, तिथं पोचून मला जे वाटलं ते आणि तसं तुलाही वाटलं का, असं आम्ही एकमेकांना विचारण्यात काहीच पॉइंट नव्हता. कारण तिथे सहानुभूती अशक्य.)मी सलीलला तू कविता कशा लिहितोस, तुला कविता कशा सुचतात वगैरे प्रश्न(ही) विचारले नाहीत. असल्या प्रश्नांचा मला(च) वैताग येतो.
मी त्याला बोलू दिलं आणि त्याने मला. त्याच्या कवितांसारखं.
बोलणं सुरू व्हायच्या आधीच काही प्रश्न गृहीत होते, काही नव्याने सापडले, काही प्रश्न आम्ही जाणूनबुजून सोडून दिले – त्याच्या कवितांसारखे.
बोलताना तो कधी गहन होता, कधी दुर्बोध, कधी थोर – त्याच्या कवितांसारखा.
माणूस तुकड्या-तुकड्यात आपल्याला भेटतो आणि आधीच्या तुकड्यापेक्षा वेगळा वाटतो म्हणजे तो बदलतो की आपण?
कुणीही कधीही मुदलात बदलतं का? की त्याच्या ‘आधीच्या कविता’च्या प्रस्तावनेत तो म्हणतो तसं आपणच आपल्याला काळाच्या पुढे नेऊन आजच्या स्वत:ला भूतकाळासारखं पाहायचं?
आणि मग सापडतं ते असतं काय?
उसासा?
प्रश्न?
की न सुचलेल्या वाक्याची अवतरणचिन्हं?“माज़ी को माज़ी न रेहने दिया तो –” वर गुलज़ारची प्रतिक्रिया काय असेल?
Always be a poet – even in the prose?

***

२. लेखकाच्या इच्छेनुसार प्रमाणलेखन तपासण्याखेरीज या लेखावर कोणतेही संपादकीय संस्कार केलेले नाहीत.
३. चित्रस्रोत : अभिजित बाठे
***
Facebook Comments

1 thought on “पाकीट आणि चपला गायब”

 1. आवडले नाही. कविता हा इतर भौतिक व्यवहारांपासून तुटलेला स्वायत्त व्यवहार असतो, अशा जुन्यापुराण्या दृष्टीने हा संवाद घडलेला वाटतो.
  ''एका लेव्हलचे (वाचक) मिळाले त्यामुळे बरं वाटलं", हे वाघ यांचे विधान आणि "तो ब्राह्मण आहे का, हा माझा रेग्युलर प्रश्नही मी त्याला विचारला नाही", हे मुलाखतकाराचे विधान- दोन्हीतून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. केवळ खोट्या उच्चभ्रू प्रतिष्ठेशी संबंधित कवितेचा व्यवहार करण्याचा हा प्रकार आहे. यावर युक्तिवादही होऊ शकत नाही, कारण "मी म्हणतोय" एवढेच कोणत्याही गोष्टीचे समर्थन इथे असते. त्यामुळेच मग "मी वाचलेल्या त्याच्या लिखाणावरून त्याने पुस्तकं प्रकाशित केली असली तरी भाषा विकली नाही हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नीट विश्लेषण करणं अवघड", अशी भोंगळ विधानेही केली जातात.
  दुसरीकडे वाघ यांनी "न लवंडलेली टिपणे"मधे असे म्हटले आहे, "समाजजीवनात / राजकीय जीवनात मार्क्सवादी आहे किंवा हिंदुत्ववादी आहे; तर ते तिथेच असो – कवितेला त्याचे आभार नाहीत. कवितेत त्या विचारांशी बांधिलकी असलीच पाहिजे असे नाही. कारण कविता हीच एक विचारसरणीएवढी व्यापक गोष्ट आहे." ही विधाने चमकदार असली तरी "मी म्हणतोय" एवढ्याच एका पायावर उभी आहेत, त्यांचेही "विश्लेषण अवघड" आहे, कारण मुळात त्या त्या मुद्द्यांच्या खोलात जायचा प्रयत्नच नाही. "विचारसरणी" म्हणजे काय, हेच माहीत वाघ यांना माहीत नसावे, असे या विधानांवरून वाटते. हा धार्मिक भोंदूगिरीसारखाच प्रकार असतो. एखादा साधूबाबा जे म्हणजे ते त्या बाबतीतले सत्य ठरते, कारण केवळ त्याला आलेली अनुभूती हेच त्या सत्याचे समर्थन असते. तसाच प्रकार कवितेच्या बाबतीत करणे मुद्रित अंकांमधून ही मंडळी करतच होती. तेच 2015 साली ब्लॉगवर व्हावे, हा एक उच्चवर्गीय-उच्चजातीय-महानगरी-अहंगंडातून आलेला प्रकार वाटतो.
  ही मुलाखत वाचल्यावर सलील वाघ यांचे नाव जालावर शोधले असता, महाराष्ट्र टाइम्समधे आलेला त्यांचा जुुना लेख मिळाला. त्यात वाघ लिहितात, "राज ठाकरेंचं नाव किणी प्रकरणात होतं, ते स्वतः इंग्लिश मिडियममधून शिकले, ते ब्रँडेड टी शर्ट घालतात, त्यांची मुलं इंग्लिश मिडियममधून शिकतात वगैरे आक्षेप क्षणभर मान्य जरी केले तरी जर आज राज ठाकरेंच्या निमित्तानी जर मराठी लोकांवरच्या अन्यायाला वाचा फुटत असेल तर त्यात शरम वाटण्यासारखं काय आहे?" ज्या चित्र्यांकडे वाघ यांच्या कविता पोचल्या व नंतर त्यांनी छापायला सांगितल्यावर छापल्या गेल्या, त्या चित्र्यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाची शरम वाटते, अशा आशयाचा लेख लिहिला होता. त्याला प्रत्युत्तर देत अनेक शेरे मारणारा वाघ यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्यातील वर दिलेल्या उद्धृतातून वाघ यांची राजकीय आणि सामाजिक समजही कळून आली.
  एखादी संस्कृती किंवा समाज या गोष्टी इतक्या सुलभ पद्धतीने चालत नसतात. असो. तो विषय नाही. पण मराठी कविता 2015 सालीही कवितेबद्दल असाच स्वप्नाळू स्वायत्त विचार बाळगून असेल तर जागतिकीकरणोत्तर वास्तवाला ती कितपत भिडू शकेल याविषयी शंका वाटते.

  विशाल काळदाते, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *