Uncategorized

(उपप्रश्नांसाठी) न लवंडलेली टिपणे

सलिल वाघ यांच्याकडून काही टिपणे
शब्दांकन: संपादक
कवी आणि कृतघ्नता
कवी जगतो. व्यवहारात आणि विचारविश्वात / भावजीवनात. त्यात त्याच्या डोक्यावर अनेकांचे अनेक ‘पावशेर’ असतात – ‘लिंक्स एन्ड लॉयल्टिज’ असतात. त्यांचे दडपण येऊ शकते. उदाहणार्थ, मी समाजजीवनात / राजकीय जीवनात मार्क्सवादी आहे किंवा हिंदुत्ववादी आहे; तर ते तिथेच असो – कवितेला त्याचे आभार नाहीत. कवितेत त्या विचारांशी बांधिलकी असलीच पाहिजे असे नाही. कारण कविता हीच एक विचारसरणीएवढी व्यापक गोष्ट आहे. त्यामुळे कवीने कवितेत तसल्या बांधिलक्यांचे भान ठेवू नये. बांधिलक्यांशी कृतघ्न असावे. तसेच कोणती व्यक्ती / संस्था / यंत्रणा / व्यवस्था आपल्याला चांगले म्हणते, आपल्याला फेव्हर करते याचेही उपकार स्मरू नयेत. कवीने व्यवस्थेशी कृतघ्न असावे. त्याशिवाय त्याला स्वातंत्र्य आणि मुक्तपणा मिळणार नाही.
कवी, काव्यगर्दी, सो०ने०शाही इत्यादी
कवीची वाचकापर्यंत पोहोचताना अन्‌ वाचकाची कवीपर्यंत पोहोचताना दमछाक होतेच.
लिहायला लागलो तेव्हा दिवाळी अंक किंवा मासिके, नियतकालिके त्यांच्या ज्वानीच्या ऐन भरात होती. नंतर ती कमी कमी, क्षीण (डीम) होत गेली. नंतर त्या पोकळीची जागा सोनेशाहीने घेतली. (सोशल नेटवर्क = सो० ने० शाही). नियतकालिक-संस्कृतीत रमायला जसे जमले नाही, तसे सोनेशाहीच्या राज्यातही रमता नाही आले. अशा ठिकाणी वावरणार्‍या लोकांबरोबर वावरणे भयंकर जाचक होते. टॉर्चरिंग वाटते. ते विश्व कधी आपले वाटले नाही. आपले सहधर्मीय तिथे असतील असं वाटलं नाही. म्हणून आपलं स्वतंत्र पुस्तकच छापत राहिलो. (रॉयल्टी घेतली नाही.  पुढच्या पुस्तकाच्या प्रकाशानांसाठी ते पैसे वापरले. पैसे नको हे व्रत नाही. पैशासाठी (कविता) नको हे धोरण! माझे प्रकाशक जरी आर्थिकदृष्ट्या घाट्यात गेले नाहीत, तरी फायद्यातही नव्हते. मात्र आर्थिक गणित ओढग्रस्तीचे असले, तरी अनेक अनोळखी लोकांनी स्वतःची आणि कवीची ओळख कवितेत शोधली ही घटना बघायला मिळाली. अंडरवर्ल्डमधल्या खबरीसारखी कविता कवितेतल्या लोकांपर्यंत या कानाची त्या कानाला पोहोचत गेली. थोडेच, पण सुबुद्ध आणि उत्तम दर्जाचेच वाचक मिळाले. या सुदैवामुळे आतबट्ट्याचा व्यवहार सोसूनही हुरूप टिकला. नंतरचा प्रकाशनव्यवहार घाट्यात गेला नाही. टाकलेले पैसे येतात. ब्रेक-इव्हन येतो – असा अनुभव आहे. तर-) सार्वजनिक स्वच्छतागृहात जाऊन विधी उरकणे आणि खाजगी जागेत मस्त शिट्टी मारत शू / शी / अंघोळ करणे यांत जो फरक आहे तो नियतकालिकात कविता छापणे आणि पुस्तकच काढणे यांत (अनुक्रमे) आहे. याला अपवाद आहे, फक्त दुस-या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी (२००५) पुस्तक तयार झाल्यावर त्यातल्या काही कविता दोन-तीन अनियतकालिकांत दिल्या होत्या, की आता या कवितांचे पुस्तक येतेय वगैरे… म्हणजे एकदा सार्वजनिक संडासात जावे लागले होते. पण एकदाच!कोकीळ, क्रीप्सॉलॉजी आणि ‘कविता’पण
कवितचे कवितापण तिच्या क्रीप्सॉलॉजीत आहे.  कवी हा क्रीप्सॉलॉजिस्ट असतो!
सैन्यात शत्रूपक्षाचे बिनतारी संदेश पकडून ते उकलणारे किंवा सॉफ्टवेअरचे पासवर्डस मिळवणारे, सोर्सकोड  हुडकून काढणारे किंवा ध्वनिशास्त्रात साउंडमधून ‘नॉइज टू सिग्नल’ असा एक रेश्यो असतो तो रेश्यो ओळखून ‘स्याम्पल साउंड’ मधून त्यातला सिग्नल वाचणारे अन्‌ विश्लेषित करून त्याचा अन्वयार्थ मांडणारे – असे क्रिप्सॉलॉजिस्ट असतात. कवी हा असाच संस्कृतीचा क्रिप्सॉलॉजिस्ट असतो. कविता ही क्रिप्सॉलॉजी असते. संकेतभेद करणे हे कवीचे काम. आणि तो संकेतभेद केल्यावर पुन्हा त्याचा आशय किंवा अन्वयार्थ जवळपास ‘डिव्हाईस-इंडिपेंडन्ट’ स्वरूपात बांधणे,ते करताना भाषेच्या नियमांची, दंडुकेशाहीची फिकीर न करता, प्रसंगी अभिरुचीला छेद देत, वाचकाला अंतर्मुख करून त्याच्या जिज्ञासेचा प्रक्षोभ घडवून आणणे हे काम कविता करते. कविता ही संकेतभेदाची ‘विद्या’ आहे. ती नुसते ‘शास्त्र’ नाही. ती नुसती ‘कला’ नाही. ती विद्या आहे, जिच्यात शास्त्र आणि कला दोन्ही येतात.  अगदी ढोबळ उदाहरण – कोकीळ पक्षी जोडीदाराला जी साद घालतो – शक्यतो मेटिंगसाठी, ती कोकीळ आणि कोकिळिणीचा आपसांतला संकेतव्यवहार आहे. तो संकेत  कोकिळाच्या जोडीदारासाठी आहे, माणसासाठी नाही. तरीही माणूस चोंबडेपणाने तो संदेश पकडतो. त्याचा कोकिळेसाठी असलेला अर्थही जाणतो अन्‌ ‘वसंत ऋतू आलाय’ किंवा ‘अमुक तमुक ढमुक असेल’ इत्यादी स्वत:साठी असलेला अर्थही उलगडतो. म्हणजे तो त्या संकेतातून अर्थाला मुक्त करतो, ‘वाचतो’, संकेतभेद करतो. कवी हेच करतो. माणुसतेच्या आघाडीवर माणसांचे अन्‌ दुनियेचे काय काय घडतेय? काय गावतेय? काय हुकतेय?  त्याचे सिग्नल कवी पकडतो. अन्‌ ते बोंबलून बोंबलून, टाहो फोडून जगाला सांगतो. (जग अर्थातच दुर्लक्ष करते. अन्‌ दुर्लक्ष जेव्हा महागात पडायला लागते, तेव्हा जग लक्ष देते. वेळ गेल्यावर…)तर – एखादी कविता जर ‘कविता’ असेल, तर तिचे कवितापण याच्यात आहे.

***
संबंधित लेख : पाकीट आणि चपला गायब
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *