Uncategorized

कुछ इश्क़ किया कुछ काम किया

– ए सेन मॅन


आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल किंवा कदाचित त्याही आधीची. नेमकं आठवत नाही, पण मी एक सीडी ऐकली होती. इक्बाल बानोच्या गाण्यांची. या गायिकेनं गायलेलं काहीही मी त्याआधी कधीच ऐकलं नव्हतं. सीडीत सात-आठ गाणी असतील किंवा जास्तही असतील, पण त्यातली दोन गाणी मला अजूनही जशीच्या तशी आठवतात. याचं कारण म्हणजे तेव्हा ती सीडी पुढे मागे करून ही दोन गाणी त्या दोन दिवसांत मी किमान पन्नासएक वेळा तरी ऐकली असतील. एका गाण्यात इक्बाल बानो तिच्या खड्या आवाजात ठणकावायची – “हम देखेंगे, लाज़ीम है के हम भी देखेंगे, वो दिन के जिस का वादा है…” कुठल्या दिवसांचा वादा आहे असा प्रश्न पडेपर्यंत आकाशवाणीचा जो एक काल्पनिक आवाज आपल्या सगळ्यांना माहीत आहे तशा आवाजात ती गर्जायची –


जब ज़ुल्मो सितम के कोहे गरान
रुई की तरह उड़ जाएँगे
हम महक़ूमों के पाओं तले
ये धरती धड़धड़ धड़केगी
और अहले हक़म के सर ऊपर
जब बिजली कडकड कडकेगी …


(महक़ूम = दबलेपिचलेले, अहले हक़म = हुकूमत/सत्ताधीश)


या कडाडण्यावर श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट आणि जोरदार हौसला अफ़जाई. पुढे जेव्हा ती “सब ताज उछाले जाएँगे, सब तख़्त गिराए जाएँगे” या ओळीवर यायची तेव्हा तबला नाट्यमय वातावरणनिर्मिती करायचा आणि लोक वेडे होऊन “इन्क़लाब ज़िंदाबाद”च्या घोषणा द्यायचे. त्या रेकॉर्डिंगमध्येही ते स्पष्ट ऐकू यायचं. मला असा प्रश्न पडायचा की ही कोण आहे बाई, कुणी लिहिलंय हे नि लोक इतके का चेकाळलेत या गाण्यावर? त्याच सीडीमध्ये एक दुसरं गाणं होतं, विरहात नाजूक झालेला कवी झिरपत झिरपत म्हणायचा –


उठ रही है कहीं क़ुरबत से तेरी साँस की आँच
अपनी ख़ुशबू में सुलगती हुई मध्धम मध्धम
दूर उफ़क़ पार चमकती हुई क़तरा क़तरा
गिर रही है तेरी दिलदार नज़र की शबनम


क़ुरबत (जवळ), उफ़क़ (क्षितिज) या शब्दांवर अडूनही अवतीभवती दरवळणार्‍या सूक्ष्म उष्ण सुवासात एक ओळ तरंगत येऊन धडकायची –


इस कदर प्यार से ए जाने जहाँ रक्खा है
दिल के रुख़्सार पे इस वक़्त तेरी याद ने हाथ


सीडीचं कव्हर उलटंपालटं करून पाहिल्यावर कळलं की कातरवेळी तुझ्या आठवणींनी हृदयाच्या गालावर हात ठेवला आहे असं म्हणणारा आणि सत्तेच्या माजाला थेट आव्हान देणारा कवी एकच आहे. साहजिकच माझी उत्कंठा चाळवली गेली. यूट्यूब आणि विकिपीडिआचा बोलबाला व्हायच्या आधीचा हा काळ आहे. जेव्हा एका फटक्यात एकदम घाऊक माहिती मिळत नसे तेव्हा पत्ता लिहिलेल्या बसच्या तिकिटासारखी ही दोन गाणी मी घट्ट धरून ठेवली होती असं आठवतं. इकडेतिकडे विचारून, शोधून अखेर एक दिवस या कवीचा पत्ता सापडला तो पाकिस्तानातला. नाव – फ़ैज़ अहमद फ़ैज़ ऊर्फ फ़ैज़. राहणार – बहुदा लाहोर किंवा सियालकोट किंवा लंडन, बेरुत, मॉस्को. यात एकवाक्यता नव्हती. कुणी लाहोरच्या आठवणी सांगत होता, कुणी लंडन, बेरुत, मॉस्कोच्या. इक्बाल बानो गाते आहे तो काळ सत्तरचं दशक मावळून ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीचा. फ़ैजच्या आयुष्याचा शेवटल्या काही वर्षांचा.


जनरल झियाची हुकूमशाही राजवट जोरात होती तो हा काळ. मुदलातच यथातथा असणार्‍या सर्व लोकशाही संस्थांचं केलेलं पद्धतशीर खच्चीकरण, शासनयंत्रणेकडून होणारा जुलूम, मुस्कटदाबी, न्यायाच्या नावाखाली नैसर्गिक न्यायाला धाब्यावर बसवून केले जाणारे निवाडे आणि भर चौकात होणार्‍या शिक्षा, या भीतीच्या वातावरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केलेली संपूर्ण गळचेपी आणि या सगळ्याला सामावून घेणारं अतिरेकी इस्लामीकरणाचं हुकमी आवरण. या परिस्थितीत फ़ैज़च्या सडेतोड शायरीला नि लिखाणाला धार आली नसती तर नवल. फ़ैज़वर पाळत होतीच. त्यातून कसेतरी निसटून ते भारतात आले. भारताने आश्रय देण्याचा केलेला प्रयत्न पाकिस्तान सरकारने येन केन प्रकारेण मोडून काढला. पुढे फ़ैज बेरुतला राहिले. या सगळ्या दरम्यान पाकिस्तानात इक्बाल बानो साडी नेसून फ़ैज गात होती, सरकारने साडीवर घातलेल्या बंदीला न जुमानता. इतरही लोक गात होते. फ़ैज़ची कविता गाणं हाच विद्रोह होता याचं कारण फ़ैज़च्या लिखाणात बंडखोरी तर होतीच, परंतु त्याहून सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फ़ैज़ची पोच साहित्यिक वर्तुळापर्यंत मर्यादित नव्हती. तो एक लोकशाहीर होता.
 
हम देखेंगे, आवाज: इक़्बाल बानो


बेरुतला असतानाही फ़ैज़ आपली पत्रकारिता, संपादन, लेखन आणि लेखकांचं संघटन हे काम अव्याहतपणे करतच होता. अरबी, फार्सी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी अशा अनेक भाषांवर असलेल्या प्रभुत्वामुळे फ़ैज़ जिकडे गेला तिकडचा होऊ शकला हे एक फार सोपं स्पष्टीकरण आहे. भाषेची मदत नक्कीच होते, पण मला नेहमी कमाल वाटते ती फ़ैज़च्या त्या त्या ठिकाणच्या प्रश्नांशी एकरूप होऊन त्यावर काम करण्याच्या कुवतीशी. सामाजिक कामातल्या आंतरराष्ट्रीय सामीलकीबाबतच्या गप्पा लोक फार जोरजोरात मारतात. फ़ैज़ जगात जिथे होता तिथल्या स्वातंत्र्य, समतेच्या लढ्यांत तो सामील होता. याचं एक फार मोठं कारण म्हणजे फ़ैज़चं वैश्विक दु:खाशी नातं होतं. जगात कुठेही आणि कुणाचंही दु:ख समजून घेण्याची आणि ते वाटून घेण्याची एक विलक्षण ताकद फ़ैज़मध्ये होती. हे सोपं नसतं. विशेषत: परदेशी असताना, काहीच सांस्कृतिक संदर्भ नसताना जेव्हा आपण अनेकदा शोषित व शोषक अशी दुहेरी भूमिका बजावत असतो, तेव्हा सर्व काही आलबेल असल्याचे फुगे फोडून समजातल्या विसंगतींकडे डोळसपणे, प्रयत्नपूर्वक पाहावं लागतं. हे भान मला जरा उशिराच आलं, पण ते येण्यात फ़ैज़चा वाटा मोठा आहे. “बड़ा है दर्द का रिश्ता, ये दिल ग़रीब सही” असं फ़ैज़ लिहून गेला, कारण तो अशी दु:खाने सांधलेली नाती बांधू शकला. बेरुतला असताना फ़ैज़ने एका पॅलेस्टिनी बाळासाठी अंगाईगीत म्हणून लिहिलेली ही एक कविता हे समजण्यासाठी पुरेशी आहे –


मत रो बच्चे
रो रो के अभी
तेरी अम्मी की आँख लगी है
मत रो बच्चे
तेरे अब्बा ने
कुछ ही पहले
अपने ग़म से रुख़्सत ली है
मत रो बच्चे
तेरा भाई
अपने ख़्वाब की तितली पीछे
दूर कहीं परदेस गया है
मत रो बच्चे
तेरी बाजी का
डोला पराए देस गया है
मत रो बच्चे
तेरे आँगन में
मुर्दा सूरज नहला के गए हैं
चंदरमा दफ़ना के गए हैं
मत रो बच्चे
तू गर रोयेगा तो ये सब
अम्मी, अब्बा, बाजी, भाई
चाँद और सूरज
और भी तुझ को रुलवायेंगे
तू मुस्क़ाएगा तो शायद
ये सारे एक दिन भेस बदल कर
तुझसे खेलने लौट आयेंगे


फिलिस्तीनी बच्चे के लिए लोरी, आवाज: फ़ैज़ अहमद फ़ैज़


परदेशी राहताना होणारी घालमेल, घराची लागलेली ओढ, स्वत:च्या घरचा पत्ता शोधत फिरावं लागल्यागत झालेली भंजाळलेली अवस्था आपणहून परदेशी येऊनसुद्धा मी अनुभवलेली आहे, त्यामुळे फ़ैज़च्या या  एका कवितेशी रिलेट होणं स्वाभाविक होतं. पण फ़ैज़ची ही यातना मरणप्राय होती, कारण त्याचं परदेशातलं वास्तव्य सक्तीचं होतं.


मेरे दिल मेरे मुसाफ़िर
हुआ फिर से हुक़्म सादिर
के वतन बदर हों हम तुम
दें गली गली सदायें
करे रुख़ नगर नगर का
के सुराग़ कोई पायें
किसी यारे नामाबर का
हर एक अजनबी से पूछे
जो पता था अपने घर का
सरे कू-ए-नाशनायाँ
हमें दिन से रात करना
कभी इससे बात करना
कभी उससे बात करना
तुम्हें क्या कहूँ के क्या है
शबे ग़म बुरी बला है
हमें ये भी था ग़नीमत
जो कोई शुमार होता
हमें क्या बुरा था मरना
अगर एक बार होता


(सादिर = आदेश; वतन बदर = हद्दपार; नामाबर = पोस्टमन/संदेशवाहक; सरे कू-ए-नाशनायाँ = सारे जुने रस्ते; ग़नीमत = स्वीकार, मान्य)


दर रात्रीगणिक येणारं रोजचं मरण सांगताना फ़ैज़ने थेट गालिबच्या ओळीच कवितेत पेरल्या आहेत. गालिबच्या ओळी थेट वापरण्याचं धार्ष्ट्य फ़ैज़कडे होतं कारण त्याची तशी ताकद होती. उर्दू शायरीचा होरा बदलणारा फ़ैज़ हा गालिबच्या तोडीचाच कवी होता. पण मुद्दा तितकाच नाही. सक्तीने परदेशी राहावं लागणं, परत जाताक्षणी अटक होण्याची भीती असणं, फाशीची शिक्षा असलेली कलमं लागतील असे गुन्हे हेतुपुरस्सर नोंदवणं या गोष्टी मला ऐकून माहीत होत्या, पण कधीच वळल्या नव्हत्या. पाकिस्तानात तर अनेकांच्या बाबतीत अशा बातम्या फक्त ऐकून माहीत होत्या. बेनझीर भुट्टोचं पाकिस्तान सोडणं, तिच्या परत येण्यानं झालेला गहजब, तिचा झंझावाती प्रचार आणि त्यातच तिचा झालेला खून या घटना माझ्या विशीत घडल्या तेव्हा मला या सगळ्या प्रकाराची पहिल्यांदा खरी जाणीव झाली. काही वर्षांपूर्वी युरोपात राहत असताना तिथल्या विद्यापीठात शिकवणारी एक जण तिच्याबद्दल सांगत होती, “मी मूळची इथली नाही. फार गरिबीत होतो आम्ही आमच्या देशात. आम्ही अक्षरश: एक दिवस सगळा गाशा गुंडाळून इथे आलो. जगण्यासाठी. पण प्लीज कुणाला सांगू नकोस. मी सांगत नाही सगळ्यांना, कारण इथल्या लोकांना कळलं तर ते माझा दुस्वास करतील. त्यांना आवडत नाही आम्ही. लोकांना वाटतं फार सुखात ऐदीपणे राहतो आहोत आम्ही परप्रांतीय. त्यांना हे रोजचं मरण दिसत नाही. पण प्लीज कुणाला सांगू नकोस. तुला कळेल असं वाटलं म्हणून सांगितलं.” मला कळण्याचं कारण फ़ैज़ होतं हे तिला सांगता आलं असतं तर बरं झालं असतं. विजाच्या फॉर्मवर प्रश्न येतो – Do you fear persecution in your home country? – तेव्हा तेव्हा फ़ैज़ आठवतो.
(मेरे दिल मेरे मुसाफ़िर, आवाज: टीना सानी)

 


पूर्वी ब्राह्मणी घरांत नातेवाईकांच्या पहिल्या वर्तुळापासून “इतकं असेल तर पाकिस्तानात जाऊन राहा म्हणावं” अशी वाक्य दबक्या सुरात ऐकू यायची. आता त्याला प्रतिष्ठा आहे, कारण आमचे नेते, मंत्रीही असली वाक्य बोलतात आता. ऐकणार्‍याला वाटावं की जणू काही पाकिस्तानात पुरोगामी विचारांना फारच वाव आहे! जनरल झियाचा काळ हा काही फ़ैज़चा पहिला संघर्षाचा काळ नव्हता. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर चारेक वर्षांतच तथाकथित रावळपिंडी कटात गोवून फ़ैज़ला चार वर्षं वेगवेगळ्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं होतं. मुख्य कारण हे की त्याची पत्रकारिता, शायरी आणि त्यातलं अन्यायाविरुद्ध केलेलं संघर्षाचं आवाहन सरकारला असह्य होतं. पुढेही या न त्या कारणाने फ़ैज़ला तुरुंगात डांबण्याचा एककलमी कार्यक्रम पाकिस्तानाच्या अनेक राजवटींनी राबवला. आयुष्यातला इतका काळ तुरुंगात वा देशाबाहेर घालवल्यामुळेही असेल कदाचित, तुरुंगांचे संदर्भ, बंदी असण्याची वेदना आणि मनाची दडपणहीन मुक्त अवस्था यांचं नेमकं भान त्याच्या कवितेत उतरतं –


ये जफ़ा-ए-ग़म का चारा, वो नजाते दिल का आलम
तेरा हुस्न दस्ते ईसा, तेरी याद रूहे मरिअम


लो सुनी गयी हमारी, यूँ फिरे है दिन के फिरसे
वोही गोशा-ए-क़फ़स है, वोही फ़स्ले गुल का मातम


ये अजब क़यामतें हैं, तेरी राहगुज़र में गुज़रा
ना हुआ के मर मिटें हम, ना हुआ के जी उठे हम


(जफ़ा = जाच, वंचना; नजात = मुक्ती; दस्ते ईसा = येशूचे हात; रूहे मरिअम = मेरीचा आत्मा; गोशा-ए-क़फ़स = तुरुंगाचा कानाकोपरा)


(ये जफ़ा-ए-ग़म का चारा, पूर्ण गझल, आवाज: अबीदा परवीन)

 


तुरुंगाचे असे संदर्भ फ़ैज़च्या कवितेत वारंवार येतात कारण ते त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढणं हे त्यानं आपलं काम मानलं. आजूबाजूच्या सामान्य कष्टकर्‍यांच्या आयुष्यात रोज येणार्‍या कयामतींची त्याला चिंता आहे. जगाच्या अंतिम दिवसापर्यंत न्यायाची वाट पाहायला, त्या दिवसाची फिकीर करायला त्याला फुरसत नाही. किंबहुना धर्माचं स्तोम माजवणार्‍यांचं त्याला अजिबात कौतुक नाही. त्याचं स्पष्ट म्हणणं आहे –


यूं बूतों ने डाले हैं वसवसे के दिलों से ख़ौफ़े ख़ुदा गया
यूं पड़ी हैं रोज़ क़यामतें के ख़याले रोज़े जज़ा गया


(वसवसे = संशय, रोज़े जज़ा = कयामतीचा दिवस)


कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं ‘शिवाजी कोण होता’ या विषयावरचं एक भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात ते असं म्हणतात की शिवाजी हा जनतेचा राजा नव्हता; तो ‘रयतेचा’ राजा होता. पानसरे यातला अर्थभेद विस्तारानं सांगताना म्हणतात की शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार म्हणजे रयत. शिवाजी प्रामुख्यानं त्यांच्या हिताचं रक्षण करणारा म्हणून रयतेचा राजा होता. माझं फ़ैज़शी नातं जुळण्याचं एक महत्त्वाचं कारण हे असावं की फ़ैज़ हा रयतेचा कवी होता. फ़ैज़ने ’इंतेसाब’ या नावाने आपल्या कवितेसाठी एक अर्धवट राहिलेली अर्पणपत्रिका लिहिली आहे. यात आपली कविता फ़ैज़ कोणाकोणाच्या नावे अर्पण करतो यावरून त्याची बांधिलकी, सामीलकी कोणाशी आहे ते लख्खपणे कळतं. त्याच्या कवितेचं त्याच्या भवतालाशी असलेलं घट्ट नातं त्याला किती पक्कं माहीत होतं ते कळतं. फ़ैज़ म्हणतो,


आज के नाम
और आज के ग़म के नाम
आज का ग़म जो है ज़िंदगी से भरे गुलसिताँ से ख़फ़ा
ज़र्द पत्तों का
ज़र्द पत्तों का बन जो मेरा देस है
दर्द की अंजुमन जो मेरा देस है
किलर्कों की अफ़सुर्दा जानों के नाम
किर्मकुर्दा दिलों और ज़बानों के नाम
पोस्टमेनों के नाम
तांगेवालों के नाम
रेलबानों के नाम
कारखानों के भोले ज़ियालों के नाम …
दहकां के नाम
जिनके हातभर खेत से एक अंगुश्त पतवार ने काट ली
दूसरी मालिये के बहाने से सरकार ने काट ली
जिसकी बेटी को डाकू उठा ले गये
जिसके ढोरों को ज़ालिम हंका ले गये
जिनकी पग ज़ोरवालों के पैरोंतले धज्जियाँ हो गयी …


(ज़र्द पत्तों = पिवळी/ गळून पडलेली, वाळलेली पानं, किर्मकुर्दा = वाळवी लागलेली, दहकां = शेतकरी, मालिया = सारा)


फ़ैज़चं त्याच्या भवतालाशी असलेलं नातं राजकीय आहे. प्रोग्रेसिव रायटर्स असोसिएशनच्या मुशीतून आलेल्या अनेक साहित्यिकांनी हे नातं अधोरेखित केलं, त्यात फ़ैज़चं नाव खूप मोठं आहे. कदाचित फ़ैज़च्या डाव्या विचारांशी असलेल्या बांधिलकीमुळेही असेल, पण आपल्या आजूबाजूच्या राजकीय अर्थकारणापासून फ़ैज़ची कविता कधीच फारकत घेत नाही. म्हणूनच फ़ैज़ ती शेतकरी, कष्टकरी वर्गाला अर्पण करू शकतो. जगातली दु:खं आपली करून, आपली कविता त्यांच्या नावे करून, त्या दु:खांत मग्न न होता उलट हलाखीचं जीवन जगणार्‍या हरेक व्यक्तीसोबत नाळ जोडून त्याची कैफियत ऐकून घेणारा, सांगणारा, त्याला धीर देणारा आणि आशा दाखवणारा असा हा कवी आहे. त्यामुळे त्याचं जगणं त्याच्या कवितेपासून अलिप्त नाही. आपलं कम्युनिस्ट पार्टीचं काम, पत्रकारिता, ट्रेड युनिअन फेडरेशनचं उपाध्यक्षपद, शिकवणं, राजकीय चळवळीत असणं हे फ़ैज़च्या कवितेच्या पार्श्वभूमीला नसतं, ते सगळं व कविता सोबतच पुढे चालत असतात.


जखमेवर हलक्या हाताने मलम लावावं तसं अनेकदा फ़ैज़ ऐकता-वाचताना होतं. फ़ैज़च्या कविता गाऊन, त्यातून प्रेरणा घेऊन लोक जुलुमाविरुद्ध विद्रोह करत आहेत, आणि हे होत असताना विद्रोहाच्या पहिल्या लाटेत दडपशाहीला बळी पडून जे जायबंदी झाले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फ़ैज़ त्यांना मलमपट्टी करतो आहे असं एक चित्र फ़ैज़च्या कवितेने माझ्या नजरेसमोर नेहमी उभं केलं आहे. फ़ैज़मध्ये आपल्या शब्दांच्या सामर्थ्याबद्दल कमालीचा आत्मविश्वास आहे, त्यांचं काम जखमा भरण्याचंदेखील आहे ही जाणीव आहे, पण सगळ्या जखमा या मलमपट्टीने भरून येणार नाहीत याचं पूर्ण भान आहे, या मर्यादेपोटी आलेली असहायता आहे, परिणामांची चिंता आहे आणि तरीही माणसाच्या खंबीरपणे उभं राहण्यानं परिस्थिती बदलण्याची आश्वासक हाक आहे. तो कधी सौम्यपणे गोंजरून आपल्याला धीर देतो –


दिल नाउम्मीद तो नहीं, नाकाम ही तो है
लंबी है ग़म की शाम मगर शाम ही तो है


तर कधी तितक्याच तलम नरम शब्दांत सांगतो की बाबांनो आता


चश्मे नम जाने शोरीदा काफ़ी नहीं
तोहमते इश्क़ पोशीदा काफ़ी नहीं …
राह तकता है सब शहरे जाना चलो
आज बाज़ार में पाबजोलां चलो


(पाबजोलां – पायांत बेड्या, साखळ्या ठोकून घेऊन)फ़ैज़च्या कवितेतला हा संघर्ष कृतिशील होता आणि रेलेवंट होता असं वारंवार जाणवतं. अनेक लोकही तसं सतत म्हणत असतात. वास्तविक पाकिस्तानात स्वातंत्र्योत्तर काळात सदैव अस्थिर राहिलेल्या राजकीय परिस्थितीमुळे फ़ैज़ला व अनेकांना हा संघर्ष सतत करावा लागला. तो करावा लागल्यामुळे कवितेलाही धार आली हे खरं असलं, तरीही अस संघर्ष करत राहावा लागणे हे काही फार चांगलं झालं नाही. शिवाय ज्या माणसाने नेहमी समाजातल्या विषमतेवर, अन्यायावर, दु:खावर प्रकाश टाकला त्याची कविता आजही रेलेवंट असेल तर परिस्थिती काहीच बदललेली नाही, उलट अधिकच बिघडली आहे असंच खेदानं म्हणावं लागतं. त्यामुळे फ़ैज़च्या कवितेचा आजच्या काळातला रेलेवन्स हा त्याच्या कवी म्हणून मोठा असल्याचं लक्षण जरूर आहे, पण आपण समाज म्हणून परिस्थिती बदलू शकलेलो नाही याचंही ते द्योतक आहे. याशिवाय मला असं वाटतं की मी तुलनेने भाग्यवान आहे, कारण मला असा राजकीय संघर्ष प्रत्यक्ष करावा/पाहावा लागलेला नाही. तुलनेनी भारतात लोकशाही बरीच बरी रुजली, संस्थाही प्रस्थापित होऊ शकल्या, राजकारणही कधी लष्करी उठाव, अलोकशाही मार्गाने सत्तापालट अशा मार्गाने गेलं नाही. विचार व अभिव्यक्तिस्वातंत्र्य तुलनेनं बरंच अबाधित राहिलं. एक आणिबाणीचा काळ वगळता, जो मी स्वत: अनुभवलेला नाही, भारतीय संदर्भ पुरेसा कमी संघर्षमय राहिलेला आहे. या भाग्यामुळे माझ्याकडे फ़ैज़च्या योगदानाकडे त्रयस्थपणे पाहण्याची आणि त्याचा रेलेवन्स सांगितला जातो त्यापेक्षा किंचित उणा ठरवण्याची सोय आहे.


ही सोय आता उरली आहे का ते मात्र माहीत नाही. दाभोळकरांचा खून झाला, पाठोपाठ पानसरे आणि कलबुर्गीही यांचाही. परवा एक मित्र भारतात परत जायला घाबरत होता, तो बीफ खातो म्हणून. आमची एक दलित मैत्रीण दलितांवरच्या वाढत्या हल्ल्यांचा हवालदिल होऊन पाढा वाचत होती. अफाट शक्ती आणि साहस दाखवून लढतही होती, पण फेसबुकावरचं वास्तव्याचं ठिकाण मुद्दामहून चुकीचं लिहिलंय म्हणाली. धमक्या येतात तिला. परवा अजून एक जण फेसबुकावर, इकडे तिकडे काय लिहितो ते जरा सांभाळून लिहावं लागतं असं म्हणाला. वर्षभरापूर्वी तो मला सोशल मीडिआ आणि त्याचा निवडणूक प्रचारात कुणी कसा प्रभावी वापर केला, यांव त्यांव असं बरंच काही हिरिरीने सांगत असे. हल्ली प्रत्येक वेळी आपसुकपणे फ़ैज़ आठवतो. आपल्या देशाला जाब विचारणारा आणि हताशपणे सवाल करणारा –


तुझको कितनों का लहू चाहिये ए अर्ज़े वतन
जो तेरे आरिज़े बेरंग को गुलनार करें
कितनी आहों से कलेजा तेरा ठंडा होगा
कितने आँसू तेरे सेहेराओं को गुलज़ार करें…


हम तो मजबूरे वफ़ा हैं मगर ए जाने जहाँ
अपने उश्शाक़ से ऐसे भी कोई करता है?


(उश्शाक़ = प्रियकर, सखा/सखी)


एकदा देशाला जाने जहाँ म्हटल्यावर फ़ैज़चं सखीला जे सांगणं आहे तेच देशालाही लागू होत असलं पाहिजे. सये, तुझं दुखणं माझ्या गाण्यानं बरं होईल याची मला खातरी असती, तर मी दिवसरात्र निरनिराळ्या गोष्टी गुंफून तुझ्यासाठी मधाळ गाणी गायलीही असती,


पर मेरे गीत तेरे दुख का मुदावा ही नहीं
नग़मा ज़र्राह नहीं, मुनीसो ग़मख़्वार सही
गीत नश्तर तो नहीं, मरहमे आज़ार सही
तेरे आज़ार का चारा नहीं नश्तर के सिवा
और ये सफ़्फ़ाक मसीहा मेरे क़ब्ज़े में नहीं
इस जहाँ के किसी ज़ीरूह के क़ब्ज़े में नहीं
हाँ, मगर तेरे सिवा, तेरे सिवा, तेरे सिवा


(मुदावा = इलाज, नग़मा = गीत, ज़र्राह = (घरगुती) इलाज, मुनीसो ग़मख़्वार = जवळचा मित्र, नश्तर = शस्त्रक्रियेसाठीचं हत्यार, सफ़्फ़ाक = क्रूर, जुलमी, ज़ीरूह = सजीव)


मेरे हमदम मेरे दोस्त, पूर्ण गीत, आवाज: टीना सानी


फ़ैज़चा हताशपणा, कवितेच्या मर्यादेची जाणीव समजून घेतानाच त्याची ’कविता प्रत्यक्ष कृतीला पर्याय नाही’ ही भावनाही नीट समजून घेतली पाहिजे. तोच फ़ैज़चा रेलेवन्स आहे. त्याचा रेलेवन्स केवळ मोघम अच्छ्या दिनांच्या वाद्यात नाही.


फ़ैज़चा आणिक एक रेलेवन्स आहे. तो त्याच्या सुंदर असण्यात. त्याचं प्रेम सुंदर असण्यात. त्याचं काम आणि प्रेम दोन्ही तितकं महत्त्वाचं मानण्यात. समर्पणात न झिंगता जगणं महत्त्वाचं मानण्यात. किंबहुना या दोन्हींत होणारी फरफट नॉर्मल मानण्यात. फ़ैज़च्या क्रांतीच्या कल्पनेतही कमालीचा संयम आहे. त्यात आक्रस्ताळेपणा नाही. दोस्तानं सहज खांद्यावर हात टाकावा तसं मनावर अल्लद हात ठेवून सत्य तेच सांगणारा हा माणूस होता. त्याचं हे चांदणगोंदणी सांगणं, जावेद अख़्तर म्हणतो त्याप्रमाणे आहे – चांदणं जिथे पडेल ती जागा सुंदर होते, चांदणं कुठे पडावं ती जागा शोधत नाही. तशी फ़ैज़ची कविता आहे. ती सुंदर विषय आशय शोधत नाही; ती जे म्हणते ते सुंदर होतं. फ़ैज़लाही याचं भान असावं. त्यामुळे दृष्टीआडच्या वस्त्यांचं सौंदर्य शोधायला तोही चंद्राला सोबत घेतो. अर्थात फ़ैज़चं सामान्य माणसाशी आणि गल्लीबोळांशी असलेलं नातं निव्वळ नॉस्टॅलिक नाही, तर तो त्याचा गाभा आहे. त्यामुळेच त्याने त्याची कविता या वस्त्यांच्या नावेही अर्पण केली आहे.


कठड़ियों और मुहल्लों, गलियों के नाम
जिनकी नापाक ख़ाशाक से
चॉंद रातों को आ आ के करता है अक्सर वज़ू


फ़ैज़ने दख्खनी लहेजात एक गझल लिहिलीय. त्यात नुसता शब्दांचा, भाषेचा गोडवा नाही तर जुन्या काळातल्या आठवणी एकदम तरळून जाताना उरलेलं नि कुठेतरी निसटून गेलेलं एक साधं जग, मैत्रांचं असणं, एक उबदार शेजारपाजार नि “आमच्या आळीत बरं का…” या तुकड्यानं सुरू होणारं सर्व काही इतकं मस्त एकवटलंय की हे फुरसतीत भेटणं म्हणजे काय ते मी हल्ली पार विसरलो आहे असं एकदम ऐकताना वाटतं. फ़ैज़ म्हणतो,


कुछ पहले इन आँखों आगे क्या क्या न नज़ारा गुज़रे था
क्या रौशन हो जाती थी गली जब यार हमारा गुज़रे था


थे कितने अच्छे लोग के जिनको अपने ग़म से फ़ुरसत थी
सब पूछते अहवाल जो कोई दर्द का मारा गुज़रे था


थी यारों की बहुतात तो हम अग़्यार से भी बेज़ार ना थे
जब मिल बैठे तो दुश्मन का भी साथ गवारा गुज़रे था


टीना सानीनं ही गझलही फुरसतीत गायलीय, त्यातले ठहराव अधिक गहिरे करत.


अशा साध्या, सुंदर कविता, गझलाही फ़ैज़ने अनेक लिहिल्या – तितक्याच ताकदीने आणि नजाकतीने. जेव्हा गुलाम अली आणि आशा भोसले एकत्र अल्बम तयार करू शकत होते, अशी राजकीय परिस्थिती अस्तित्वात होती; त्या काळातली ही आशा भोसलेंनी गायलेली गझल ऐका:


(यूं सजा चाँद, आवाज: आशा भोसले)

अशीच एक मिताक्षरी गझल बेगम अख़्तर यांनी गायली आहे. यात थोडं भरून आलेलं आभाळ आणि दारू घेऊन फ़ैज़ सगळ्या संकटांना तोंड द्यायला सज्ज होऊन बसला आहे. याच गझलेच्या मक्त्यात (शेवटच्या शेरात) पुन्हा फ़ैज़ने आपली छाप उमटवली आहे ती त्याच्या सिग्नेचर आशावादाने. स्वयंस्फूर्तीने चाकोरीबाहेरच्या बिकटवाटा धुंडाळून नव्या वाटा निर्माण करू पाहणार्‍या कुणालाही निराशेच्या, स्वत:विषयी शंका निर्माण होतानाच्या, काळात सतत शांत शांत करणारा आणि नवा जोम देणारा हा शेर आहे –

फ़ैज़ थी राह सरबसर मंज़ील
हम जहाँ पहुंचे कामयाब आये


माझी पीएचडी पूर्ण झाली तेव्हा हा शेर मला कैच्या कैच पटला!


विंदांनी परिवर्तनवादी, बंडखोर वृत्तीची ‘टाईप १-मौज, टाईप २-ब्रह्मानंद’ अशी जी नेमकी व्याख्या केली आहे –


सगळे मिळून सगळ्यासाठी मरण्यामध्ये मौज आहे
सगळे मिळून सगळ्यासाठी जगण्यामध्ये ब्रह्मानंद


त्या व्याख्येनुसार फ़ैज हा ‘टाईप टू’चा परिवर्तनवादी कवी आहे. म्हणजे क्रांतीच्या ऐन भरात संघर्ष शिगेला असताना फ़ैजला तीच चिंता असावी, जी उद्या सकाळी दूध येईल की नाही या काळजीने व्याकूळ झालेल्या आईला लागून राहते. म्हणूनच त्याची कविता दु:खी आयांच्या, विधवांच्या, देहाच्या बाजारात पिचलेल्यांच्या नावानेही आहे.


उन दुखी माँओं के नाम
रात में जिनके बच्चे बिलखते हैं और
नींद की मार खाए हुए बाज़ूओं से
सँभलते नहीं दुख बताते नहीं
मिन्नतो ज़ारीयों से बहलते नहीं


आपल्या प्रियेनेही आपल्यासाठी येऊ नये, तर गुलशनाचा कारभार चालावा म्हणून यावं असं त्याचं म्हणणं आहे. क्रांतिकारी परिवर्तनासाठी कराव्या लागणार्‍या संघर्षामुळे मानवी जीवनाच्या संततपणात खीळ पडली, तर त्याचे आघात ज्यांना प्रथम सोसावे लागतात, त्या वर्गाच्या, त्यातल्या महिलांच्या सामान्य दु:खांशी, क्रांतीच्या स्वप्नांनी फटकून वागू नये असं सांगणारा हा कवी आहे. शेक्सपिअरला हैदरच्या रूपाने पुन्हा जिवंत करणार्‍या विशाल भारद्वाजला ही फ़ैजची ताकद नेमकी कळली आहे. हिंसेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या एका मोठ्या काळाचा, प्रदेशाचा पट उभा करताना त्यातले हिंसेचे, सूडबुद्धीचे पुरुषी कंगोरे मांडताना हैदरच्या सामान्य आईला एका असामान्य पातळीवर नेताना त्याने फ़ैज़ मोठ्या शिताफीने वापरला आहे. त्यातली फ़ैज़ची सतत डोकावणारी शायरी हाँटिंग आहे, ज्यातच ‘हैदर’चं यश आहे.


‘गुलों में रंग भरे’ या गझलेवर मेहंदी हसनचा दावा निर्विवाद असला तरी फ़ैज़च्या इंतेसाबचा जो तुकडा विशालने उचलला आहे, त्यावर रेखा भारद्वाजचा पूर्ण हक्क आहे!फ़ैज़ भेटायच्या आधी धीरोदात्त नायकाच्या गोष्टीत बाजूला एक प्रेमकथा, प्रेमभंग हा निव्वळ मसाला होता. आपलं काम आणि आपलं प्रेम यांतल्या गुंत्यांची प्रचीती मला वहिवाटीचे रस्ते सोडल्यावर आली असली, तरी त्या गुंत्यांचं भान फ़ैजमुळे आलं आहे. ते त्याच्या वास्तवाशी प्रामाणिक असलेल्या या कवितेमुळे –


वो लोग बहुत ख़ुशकिस्मत थे
जो काम से आशिक़ी करते थे, या इश्क़ को काम समझते थे
हम जीते जी मसरूफ़ रहे, कुछ इश्क़ किया कुछ काम किया
इश्क़ काम के आड़े आता रहा और इश्क़ से काम उलझता रहा
फिर आख़िर तंग आ कर हमने दोनों को अधुरा छोड़ दिया


(मसरूफ़ = व्यग्र)


जिथे वाटा अर्ध्यातून सुटल्या तिथे सोबतचे लोकही सुटले हे भान मात्र त्यानंतर आलं. तेव्हा “ग़म ना कर, दर्द थम जायेगा, यार लौट आयेंगे, अभ्र खुल जाएगा, दिन निकल आएगा, रुत बदल जायेगी” असं म्हणणार्‍या फ़ैजनेच पुन्हा साथ दिली.इथवर हे लक्षात आलं असेलच की फ़ैज़ नुसता हल्लीच्या काळातला मोठा उर्दू कवी, लोककवी नव्हता; तर तो एक सर्वाधिक गायला गेलेला कवीदेखील होता. याचं श्रेय त्याच्या कवितांना संगीतात गुंफणार्‍या अनेक संगीतकारांना आणि त्यांना गाणार्‍या – प्रसंगी गाऊन विद्रोह करणार्‍या – गायक-गायिकांनाही आहे. इक्बाल बानोने गायलेली कविता मुळातच तत्कालीन राजवटीला आव्हान देणारी होती; पण नूर जहानला तर ‘मुझसे पहिली सी मुहब्बत मेरे महबूब ना माँग’ हे गाणं ते निव्वळ फ़ैजचं आहे म्हणून गायला मनाई करण्यात आली होती. तेव्हा फ़ैज़ तुरुंगात असताना तिने हे गाणं गाऊन त्याच्या अटकेचा निषेध केला होता. हे गाणं पुढे एका सिनेमातही आलं, पण मुद्दा हा की तिने ते हिमतीनं गायलं – कुणापुढेही न झुकता.यातल्या अनेक अनवट कवितांना स्वरबद्ध करण्याचं मोठं श्रेय अर्शद महमूद या एका संगीतकाराला आहे. त्याच्याइतकं मोठं काम फारच दुर्मीळ म्हणावं लागेल. ब्लॉग, सोशल मिडीया, फोरम, प्रकाशनाचे हक्क अशा अनेक विषयांवर चर्चा आपण करत असताना लिहिण्यासोबत प्रकाशनाच्या, प्रसिद्धीच्या, जाहिरातीच्या जागा संगीतालाही उपलब्ध झाल्या आहेत हे विसरून कसं चालेल? आजच्या, आधीच्या किती मराठी कवींना गायलं जात आहे? प्रश्न संदीप खरेची कविता किती थोर आहे हा नाही. प्रश्न हा आहे की, त्याच्याइतका गायला गेलेला कवी सध्या आहे का? जर नसेल, तर आजच्या कवींना गाण्याची जबाबदारी कोण घेणार आहे? जर आजचे प्रथितयश संगीतकार हे गायक घेणार नसतील; तर संगीतनिर्मितीच्या व प्रसाराच्या प्रस्थापित माध्यमांना छेद देत व नव्या माध्यमांचा आधार घेत हे काम कोणी करणार आहे का? हा प्रश्न प्रस्थापित व होतकरू दोन्ही गायक, संगीतकारांना आहे. कविता जगली तर श्वास घ्यायला मोकळी जागा उरेल. जेव्हा कविता संकोचेल तेव्हा ती गायला लोक आणि गाण्याची माध्यमं असणार आहेत का? कवितेसाठी अशी माध्यमं निर्माण करणं ही निव्वळ काळाची गरज नाही, तर आपली जबाबदारीही आहे.


फ़ैज़शी माझी दोस्ती होण्यात ज्या एका कवितेचा मोठा वाटा आहे, नव्हे ती कविता माझ्या जाणिवेचा अविभाज्य भाग झाली आहे, त्या कवितेच्या या ओळी नेहमी एक मोठी जाणीव करून देत राहतात, की प्रश्न बोलण्याच्या गरजेचा नाही, तर बोलण्याच्या जबाबदारीचा आहे. या धडधाकट शरीरावर बोलण्याची जबाबदारी आहे. आपला धर्म, जात, वर्ग, लिंगभाव, भाषा, सामाजिक प्रतिष्ठा यांतल्या एक वा अनेक गोष्टींमुळे मिळालेल्या खास सवलतींमुळे (privileges) आपल्याला मिळालेला आवाज अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वापरण्याची ही जबाबदारी आहे. हाती असलेला वेळ थोडा वाटला तरी खरंतर तो बोलायला भरपूर आहे. सत्य जिवंत असेपर्यंतच ही संधी आहे.


बोल के लब आज़ाद हैं तेरे
बोल ज़ुबां अब तक तेरी है
तेरा सुतवां जिस्म है तेरा
बोल के जां अब तक तेरी है


बोल ये थोड़ा वक़्त बहुत है
जिस्मो ज़ुबां की मौत से पहले
बोल के सच ज़िंदा है अब तक
बोल जो कुछ कहना है कह ले!


बोल के लब आज़ाद हैं तेरे, फ़ैज़च्या काही आठवणींसह – शबाना आज़मी


***

 

Facebook Comments

5 thoughts on “कुछ इश्क़ किया कुछ काम किया”

 1. अहाहा, दिवाळी लागली सार्थकी, कितीतरी दिवसांनी, सेन मॅन, शतश: धन्यवाद! लिहिते झालात याचा आनंद झालाय.

 2. सुरेख लेख. आवडला.
  फ़ैज़सारख्या डाव्या बाजूकडे कलणारया कवींची सामाजिक प्रश्नांवरची कविता नेहमीचा तीव्र असते असं निरीक्षण आहे.
  काही-काही शब्दप्रयोग भावले. " झिरपत झिरपत म्हणायचा" किंवा " पत्ता लिहिलेल्या बसच्या तिकिटासारखी ही दोन गाणी मी घट्ट धरून ठेवली होती."

  "माझी पीएचडी पूर्ण झाली तेव्हा हा शेर मला कैच्या कैच पटला!" इथे अगदी अगदी असं हजार वेळा. आणि त्यातला 'कर रहा था.." हा शेर खास गाईडला उद्देशुन अगदी चपखल बसतो. 🙂 मला मेहदी हसनने गायलेलीही आवडते.

  फ़ैज़ने ग़ालिबच्या ओळी वापरल्या आहेत हे माहीत नव्हतं. यावरून एक किस्सा आठवला.
  मखदुम मोईनुद्दीन पैगंबरवासी झाले तेव्हा फ़ैज़ मॉस्कोमध्ये होते. बातमी कळताच श्रद्धांजली म्हणून त्यांनी मकदूम साहेबांची "आप की याद.." परत आपल्या शब्दांत लिहून काढली. मात्र मला मखदूम साहेबांची कांकणभर जास्त आवडते.

 3. खूप आवडला लेख. ज्याच्या नज़्म-गज़लांची इतकी असोशीनं पारायणं/ कानायणं केली, स्वत:च्या इतक्या अनुभवांना ज्याच्या शब्दांनी शाकारलं – त्या फ़ैज़बद्दल दुसर्‍या कुणी लिहिलेलं वाचून ’अरे वा, तुम्हीपण त्यातलेच!’ च्या आनंदाशिवाय अजून काही मिळेल असं मुळीच वाटलं नव्हतं. पण तुझ्या लेखानं माज उतरवला. फ़ैज़चा वैयक्तिक जीवनप्रवास, त्याचं आणि आपलं वर्तमान – आणि त्यावरून नजिकच्या भविष्य़ात काय करायला हवं (प्रिविलेज्ड् लोकांनी इतरांवरच्या अन्यायाबद्दल बोलणं, कवींना गायलं जाणं) हे सगळंच एकदम स्फटिकासारखं मांडलं आहेस.

 4. लेख आवडला. फैझची ओळख एका पाकिस्तानी मित्राकडून झाली होती. आता इतका प्रशस्त आणि फैझवर मनापासून प्रेम करणारा लेख वाचून छान वाटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *