Uncategorized

संदर्भासह अस्पष्टीकरण

– उत्पल व. बा.
कवितेविषयी तटस्थपणे बोलणं शक्य आहे का? कवितेबद्दल तरलतेने, व्याकूळ वगैरे होऊन बोलणं बहुधा सोपं आहे. पण कवितेचं आणि कवितालेखनाच्या प्रक्रियेचं वस्तुनिष्ठ विश्‍लेषण होऊ शकेल का? खरं तर मराठी साहित्यात नावाजलेल्या समीक्षकांनी याविषयी लेखन केलं आहे.  वसंत पाटणकर, म. सु. पाटील यांची कवितेविषयीची पुस्तकं उपलब्ध आहेत. मर्ढेकर, रा.भा. पाटणकर यांनीदेखील त्यांच्या लेखनातून कवितेचा शोध घेतला आहे. अरुणा ढेरेंसारख्या संवेदनशील, ज्येष्ठ कवयित्रीने कवितेविषयी साध्या-सोप्या भाषेत लेखन केलं आहे. अशी बरीच नावं घेता येतील. पण काही अपवाद सोडता कवी स्वतः कवितेबद्दल फारसे बोलत नाहीत. कवितेविषयी कवीला काय वाटतं? कविता लिहिण्याच्या ‘प्रोसेस’बद्दल काय वाटतं? माझ्या वाचनात हे फारसं आलेलं नाही. आणि याचं एक खरं कारण कविता लिहूनही मी कवितेविषयी बराच उदासीन राहिलो आहे. म्हणजे मी कविता लिहिल्या, कवितालेखनात खंड पडला तेव्हा ‘म्हणजे आता कविता लिहिणं संपलं आपलं?’ असं वाटून मी उद्विग्नदेखील झालो, पण मी कविता खूप आसुसून वाचलेल्या नाहीत किंवा कवितांबद्दलचं लेखन फारसं वाचलेलं नाही. कवितांचं विश्‍लेषण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला नाही. मला जे वाटतंय ते योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण मला कविता लिहिणं हा एक उच्च कोटीचा आत्मिक अनुभव वाटतो. तो अनुभव शब्दातीत आहे आणि म्हणूनच त्या अनुभवातून जी निर्मिती होते त्याचं विश्‍लेषण आपल्याला करता येत नाही असं मला वाटतं. तो अनुभव घेणं, घेत राहणं आणि सोडून देणं इतकंच मी करत आलो आहे. किंवा मला इतकंच जमलं आहे.   
कविता लिहायचं प्रमाण प्रचंड आहे. लिहिणारे बहुतेक सर्व जण सुरुवातीला किंवा केव्हा ना केव्हा कविता लिहितातच. कविता हा एकाच वेळी अतिअवघड आणि अतिसोपा प्रकार आहे. मी स्वत: बहुतेक कविता मुक्तछंदात लिहिल्या आहेत. त्यापैकी काही कवितांबाबत मला ‘या मुक्तछंदात लय आहे’ अशी प्रतिक्रिया मिळाली तर काहींबाबत ‘हे स्फुट लिहिल्यासारखं आहे’ अशी प्रतिक्रिया मिळाली. छंदोबद्ध कविताही मी लिहिल्या. पण त्या मोजक्याच. कविता लिहायला सुरुवात झाली तेव्हा. मुक्तछंद किंवा मुक्तगद्य हे माझे आवडते फॉर्म. कोलटकर, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, रघू दंडवते, नारारण सुर्वे, द. भा. धामणस्कर, अरुण काळे या व अशा इतरही कवींनी माझ्यावर गारूड केलं आहे. पण ग्रेस, ना. धों. महानोर, बालकवी, गुलजार, अनिल या व अशा इतर कवींच्या शब्दकळेनेही गारूड केलं आहे. सांगायचं म्हणजे मुक्तछंद हा फॉर्म माझ्या जास्त जवळचा असला तरी मुक्तछंदात ‘कवितापण’ असतं का याबद्दल मी कधीकधी संभ्रमित होतो. ज्याला यमक आहे, गेयता आहे त्याच फॉर्मला कविता म्हणावं आणि इतर वेळा मुक्तगद्य हा शब्द वापरावा असं वाटतं. पण हा मुद्दा इथेच सोडून पुढे जाऊ. कारण हा थोडा तांत्रिक भाग आहे आणि त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल.
माझी आस्था अर्थातच मुक्त किंवा छंदोबद्ध स्वरुपातली कविता ही आहे. मी म्हटलं तसं कवितेविषयी मी उदासीन राहतो ते विश्‍लेषणाच्या अंगाने. एरवी आवडलेल्या कवितांचा आस्वाद घेतला जातोच. परंतु इथेही एक मेख आहे. कवितेत मी ‘राहू’ शकत नाही. मला ही माझी मर्यादा वाटते आणि बलस्थानही. मर्यादा अशाकरता की असं केल्याने माझं कवितेचं आकलन अपुरं राहतं. आणि बलस्थान अशाकरता की ‘अतिपरिचयात्‌ अवज्ञा’ व्हायचा धोका टळतो. कवितेवर प्रेम करणारे काही जण सतत कवितेतच ‘राहिल्या’मुळे अतितरल, अतिभावुक होतात आणि मग त्यांची चेष्टा केली जाते हे फेसबुकशी परिचित असलेल्या वाचकांना (म्हणजे हा लेख वाचणार्‍या बहुतेक सगळ्यांनाच) माहीत असेल.
हा लेख मी माझं स्वत:चं कविता लेखन, माझी कवितेविषयीची दृष्टी आणि माझं आकलन याच मुद्यांभोवती लिहितो आहे. मी २००५-०६ साली पहिली कविता लिहिली. २०१४ मध्ये माझा एक कवितासंग्रह प्रकाशित झाला – ‘सायलेंट मोडमधल्या कविता’. मुद्रित माध्यमात (मासिकात) कविता प्रकाशित झाल्या असल्या तरी मी प्रामुख्याने फेसबुकवर कविता पोस्ट करत आलो आहे. माझा लेख वाचताना, माझा अनुभव वाचताना मी फार प्रथितयश कवी नाही हे वाचकांनी कृपया ध्यानात ठेवावं.  कवितेबद्दल आणि माझ्या अनुभवाबद्दल मोकळेपणानं बोलणं एवढाच माझा उद्देश आहे. कवितेच्या तांत्रिक अंगाबद्दल, कवितेविषयी समीक्षेच्या परिभाषेत बोलण्याची माझी क्षमता नाही. त्यामुळे तशी परिभाषा किंवा कवितेबद्दलचं विद्याशाखीय विवेचन तुम्हांला वाचायला मिळणार नाही याची खात्री बाळगा.
बहुतेक जणांच्या बाबतीत होतं ते माझ्याही बाबतीत झालं. प्रेम इत्यादीचा भंग झाल्यामुळे आम्ही आयुष्यात पहिल्यांदा कवितासदृश असं काहीतरी लिहिलं. त्या क्षणी त्याचं फार अप्रूप वाटलं होतं. मग पहिल्या आठ-एक कविता त्याच मनोवस्थेत लिहिल्या गेल्या. तोपर्यंत माझ्या वाचनात कवितांचा अंतर्भाव अजिबातच नव्हता. पुलं, नेमाडे, अरुण साधू, जी. ए. कुलकर्णी, श्री. ना. पेंडसे ही व अशी मंडळी मानगुटीवर होती. पण जेव्हा आपण आतून कमालीचे तुटलो तेव्हा आपण इतर काही न लिहिता कविता लिहिली हे मला जाणवलं. पहिला आवेग अर्थातच कालांतराने ओसरला. भग्न झालेलं हृदय कॅलेंडरच्या पानागणिक हळूहळू सांधलं जातं हे कळलं. व्यक्तिगत वेदनेच्या कोषातून कविता बाहेर आली. आणि हे त्यामानाने लवकर झालं. पण यादरम्यानचा प्रवास माझ्यासाठी महत्त्वाचा होता. म्हणजे मला असं आठवतं की मी जेव्हा प्रेम या ‘व्यक्तिगत-वैश्विक’ भावनेशी ‘डील’ करत होतो तेव्हाच एकीकडे तोवर कदाचित जे बोललो नव्हतो ते सगळं मला बोलावंसं वाटू लागलं होतं. प्रेम वगैरेमुळे जी असहायता येते, एकटेपण जाणवतं त्यात काही महान क्षण असे असतात की तुम्हाला एकदम भोवतालच्या सृष्टीशी जोडल्यासारखं वाटू लागतं. माझ्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यातली एक म्हणजे ‘आपण आपल्याला दिसणाऱ्या जगाशी आणि मुख्यतः इथल्या माणसांशी जोडलेलो आहोत ‘ असा एक प्रखर आध्यात्मिक म्हणावा असा साक्षात्कार! आणि व्यक्तिगत दुःखात हा साक्षात्कार होणं ही माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ठरली. व्यक्तिगत दुःख तुम्हाला एका बिंदूपाशी थांबवतं. पण तुम्ही थोडा (कधीकधी बराच!) प्रयत्न केलात तर तुम्ही तिथून पुढे सरकू शकता. इथे हेही सांगणं आवश्यक आहे की व्यक्तिगत दुःखाला अजिबात कमी लेखू नये आणि ते दुःख विसरायचं म्हणून ‘सामाजिक प्रश्नांकडे’ जाऊ नये. ती एक ‘ऑरगेनिक प्रोसेस’ असली पाहिजे. मला आठवतं, मी याच काळात प्रथम नर्मदा बचाओ आंदोलनाशी जोडला गेलो. मध्य प्रदेशमध्ये गेलो असताना मी अचानक मध्येच ‘ऑफ’ व्हायचो. आपण सगळं पाहतोय, समजून घेतोय हे तर खरं पण आपण मनातून अजून पूर्ण सावरलेलो नाही हे जाणवायचं. पण मी दुःखावर मात करायला वगैरे अजिबात तिथे गेलो नव्हतो. तिथे जायची इच्छा होतीच आणि दुसरीकडे मनात अधूनमधून डोकं वर काढणारं दुःखही होतं. हे असं दोन्ही सोबत ठेवून चालत गेलो की बरं असतं. मग हळूहळू व्यक्तिगत आवेग मंदावतात. अधिक समजूतदार, अधिक समृद्ध असा सूर सापडतो आणि आपल्याला एक दृष्टी प्राप्त झाल्यासारखं होतं. आपल्या आजूबाजूचं जग, या जगाचे नियम, इथले संघर्ष हे सगळं तुम्हाला झडझडून जागं करतं. मला तर असं वाटतं की प्रेम या संकल्पनेची ताकद प्रेमाचा अनुभव ‘म्हटलं तर पूर्ण-म्हटलं तर अपूर्ण’ राहण्यातच आहे. तिथे तुमच्या वाढीची बीजं असतात.  
तर हा एकूण प्रवास माझ्यासाठी फार संस्मरणीय होता. या प्रवासादरम्यान कवितेने योग्य वळणं घेतली आणि मला एक मोठंच दर्शन घडवलं. कविता लिहू लागलो तेव्हा मला एकदम कुणीतरी ‘गेट्स ओपन’ केली आहेत असं वाटलं होतं. पाणी वाहतं झालं होतं. पण मी कवितेचे आभार मानतो कारण ती शहाणी होती. तिने पहिल्या पाण्यात आवश्यक तेवढा काळच भिजू दिलं आणि मग पुढच्या, तुलनेने अवघड वाटेवर नेलं.
इथून हळूहळू कवितेची ताकद आणि तिचं झपाटलेपण लक्षात येऊ लागलं. ही आपली भयानक सुंदर सहचरी आहे हे कळलं. आपण हळूहळू ‘कवी’ वगैरे होतोय हे जाणवू लागलं. बरेचदा तर एखादी कविता लिहून झाली की ‘हे मी लिहिलंय’? अशा अविश्‍वासाने मी कागदाकडे पाहिलं आहे. कविता लिहितानाची मनोवस्था अद्वितीय असते. मी आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य नाही. अज्ञेयवादी आहे. आपणहून देवळात कधीच गेलेला नाही. धर्म ही त्याग करायची गोष्ट आहे, इथवर मी कधीच आलो आहे. असं असलं तरी विश्‍वातली अनेक रहस्यं आपल्या बुद्धीबाहेरची असू शकतात हे कुठल्याही विज्ञाननिष्ठ माणसासारखं माझंही मत आहे. कविता लिहितानाची मन:स्थिती ही मला अशीच गूढ वाटते. उमज, आवेग, गोंधळ, दृश्य-अदृश्य प्रतिमा, जोडलेपण, तुटलेपण अशी सगळी सरमिसळ झाल्याशिवाय कविता लिहिली जात नाही. आणखी एक अनुभव म्हणजे – काहीतरी एक असं घडलेलं असतं.- एखादा प्रसंग, बोलला गेलेला एखादा शब्द, मनात उठलेली तीव्र प्रतिक्रिया- ज्यामुळे हातात पेन घेतलं जातं आणि पुढची दहा मिनिटं सगळं आपोआप होतं. आपल्याकडून कुणीतरी कविता लिहून घेतंय असं वाटतं. लिहितानाचे ते क्षण, ती मनोवस्था आणि नंतर येणारं रिकामपण – कवीची खरी कमाई ही एवढीच! बाकी पुढचे सगळे सोपस्कार!
कधीकधी अचानक एखादी ओळ डोक्यात चमकते आणि मग हातात पेन आलं की पूर्ण कविता होते. या किंवा वरच्या परिच्छेदात दिलेल्या कारणांपैकी एका कारणामुळे मी कविता लिहिली आहे. परंतु एक मुख्य कारण म्हणजे तुटलेपण. कमालीचं अस्वास्थ्य असताना उत्तम कविता लिहिली जाते. बहुतेक सर्व कविता एकटाकी लिहिलेल्या असल्या तरी क्वचित काही कविता अपूर्णतेकडून काही दिवसांनी पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. काहींवर थोडं संस्करणही केलं आहे. इथे एक गोष्ट मात्र कबूल करावीशी वाटते. कविता हा साहित्यिक अभिव्यक्तीचा कदाचित सर्वात ‘रॉ’ असा प्रकार आहे, सर्वात थेट, उत्स्फूर्त असा प्रकार आहे. पण कथा-कादंबरीसारखे साहित्यप्रकार हे अधिक आव्हानात्मक आहेत. कविता हा प्रखर आत्माविष्कार आहे आणि कथा-कादंबरी हा संवेदनेचा सलग, वैचारिक आविष्कार आहे असं मला वाटतं. यात डावं-उजवं करण्याचा प्रश्‍न नाही. मला जे जाणवतं, ते सांगतो आहे इतकंच.
तर कविता अशी येत गेलेली आहे. मी जी कविता लिहिली तिच्या रूपाबद्दल, आशयाबद्दल विविध मतं असू शकतात. तशी ती प्रत्येक कवीच्या कवितांबाबत असू शकतात. पण मला असं वाटतं की स्वत:च्या कवितेचं मूल्यमापन करायची एक दृष्टी कवीमध्ये विकसित व्हायला हवी. मी मुद्दामच ‘दृष्टी’ असं म्हणतोय. समीक्षेची क्षमता नसणं हे मी समजू शकतो. पण एक प्रगल्भ अशी, तटस्थपणे स्वत:च्या कवितेचं अवलोकन करू शकणारी ‘दृष्टी’ मात्र कवीकडे असावी असं वाटतं. आपली कविता काय सांगू पाहते आहे, याची उमज कविता लिहिण्याच्या प्रवासात पडत जायला हवी. कवितेमध्ये अतिभावनिक गुंतवणूक असण्यापेक्षा बौद्धिक गुंतवणूक असेल तर कविता अधिक सशक्त होते असं माझं निरीक्षण आहे. मी याआधी ज्या प्रेमभंगाच्या कवितांचा उल्लेख केला त्या माझ्या कविता अतिसामान्य दर्जाच्या आहेत. त्यामुळे त्या मी कधीच पुढे आणल्या नाहीत. पण ती सुरुवात होती. ते कवितेशी पहिलं ‘एनकाऊंटर’ होतं. त्यामुळे अत्यंत उत्कटतेने लिहिलेली कविताही सामान्य दर्जाची होती. अर्थात मी म्हटलं तसं तिथेच प्रकरण आटोपलं नाही याचं मला फार बरं वाटतं. कविता आणि आपण या सहप्रवासात जी व्यापक दृष्टी विकसित व्हायला हवी ती झाली याचा मला आनंद होतो. महत्त्वाचा धडा हा की अत्यंत उत्कटतेने लिहिलेली कवितादेखील सामान्य दर्जाची असू शकते. बरेचदा होतं असं की स्वत: कवीच कवितेचा शत्रू ठरतो. कारण आपण जी कविता लिहू ती चांगलीच असणार असा त्याने ग्रह करुन घेतलेला असतो. कविता लिहिणं ही मोठीच गोष्ट आहे. कवितानिर्मितीचा आनंद होणं, अतिशय तरल भावावस्था निर्माण होणं, शब्दांच्या, शब्दार्थाच्या प्रेमात पडून मन त्यातच गुंतलेलं राहणं हे सगळं समजण्यासारखं आहे. कविता लिहायला सुरुवात होतानाच्या काळात तर हे होणं अगदीच स्वाभाविक आहे. (मी २००६-०७ साली फेसबुकवर नव्हतो याचं मला कधीकधी बरं वाटतं. नाहीतर ‘झाली कविता की टाक फेसबुकवर’ असं करून स्वत:ला आणि कवितेला बिघडवून घेतलं असतं.) कवितेची मोहिनी जबरदस्तच आहे. पण म्हणूनच तिथे सांभाळावंही लागतं. ‘व्यक्त होणं’ हा आजचा युगधर्म आहे आणि सतत व्यक्त होण्याने आज एकूणच ‘समाज स्वास्थ्य’ धोक्यात आलंय की काय अशी मला भीती वाटते. या अती व्यक्त होण्याने कवितेलाही इजा पोचवली आहे.
मी स्वत: फेसबुक कवी असल्याने त्याबाबत थोडं विस्ताराने बोलणं इष्ट होईल. मी वर उल्लेख केलेले धोके स्वत:देखील अनुभवले आहेत. क्षणात शे-पाचशेजणांपर्यंत पोचण्याची सोय असलेलं व्यासपीठ हाताशी असताना त्याचा सतत वापर करण्याचा मोह टाळणं हे तसं अवघडच आहे. मी बरेचदा कविता पोस्ट करण्यापासून स्वत:ला परावृत्त केलं आहे. दोन कवितांमध्ये किमान पंधरा-एक दिवसांची तरी गॅप असावी असं मी माझ्यापुरतं ठरवून घेतलं होतं आणि ते मी बर्‍यापैकी पाळलेलं आहे. या माध्यमामुळे कवितेलाही व्यासपीठ मिळालं ही एक जमेची बाजू असली तरी याच व्यासपीठावर कवितेची थट्टाही झालेली आहे आणि ही थट्टा व्हायला अतिउत्साही कवीच कारणीभूत आहेत. वास्तविक मी वर म्हटलं तसं कविता लिहिणं, कवी असणं ही एक विशेष गोष्ट आहे. पण या विशेषत्वाचा आबही राखता यायला हवा. मासिकांमध्ये जेव्हा कविता प्रकाशित होतात तेव्हा ज्या वाचकाला कवितेत फारसा रस नाही त्याला ती पानं टाळता येतात. फेसबुक या ‘दैनिका’त होतं असं की तुमच्या डोळ्यासमोर सतत कविता येत जाण्याची शक्यता असते आणि त्यातून वाचकाचा (यूझरचा) वैताग बहुधा वाढत जातो. मी याबाबत मागे एकदा फेसबुकवरच सविस्तर लिहिलं होतं.  
मी कविता लिहू लागल्यावर मला स्वत:त काही बदल जाणवले का? याचं उत्तर ‘हो’ असं आहे. मी स्वत:शी जास्त बोलू लागलो. मला असं जाणवू लागलं की आपल्या जाणिवांची उगमस्थानं वाढली आहेत. माझा माझ्याशी होणारा ‘डायलॉग’ अनेकानेक नव्या जाणिवांसह होऊ लागला. मी, माझं पर्यावरण, मी माझी नेहमीची जागा सोडून इतरत्र जातो तेव्हा त्या प्रवासातलं पर्यावरण, जिथे जातो तिथलं पर्यावरण – हे सर्व चिमटीत धरायचा प्रयत्न होऊ लागला. मला या विविध पर्यावरणांवर ‘भाष्य’ करण्यासाठी एक ‘फॉर्म’ मिळाला. एकदा पुणे-दापोली प्रवासात असताना बसमध्ये गर्दी होती. त्या गर्दीत ‘माणसं’ यावरच एक कविता लिहिली गेली. हे सर्वच कवींचं होतं का ते मला माहीत नाही. पण प्रवास हा मला लिहिण्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. (विंदा करंदीकरांच्या मृद्गंध, धृपद या कवितासंग्रहातील कवितांखाली तारीख आणि त्या त्या गावा/शहरांची नावं आहेत. ते वाचून मला बरं वाटलं होतं) एका जागी अडकून राहणं कवी-लेखकासाठी वाईटच. (मात्र मला हा विषय निघाला की हटकून जीएंची आठवण होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या आयुष्यातला बहुतेक सर्व काळ ते धारवाडमध्ये राहिले. एकाच गावात राहून त्यांनी त्यांच्या कथांमधून जी सृष्टी निर्माण केली, ज्या प्रतीचं लेखन केलं ते पाहिलं की अवाक व्हायला होतं!) फिरते राहिलो तर मेंदूतली विविध केंद्रही फिरती राहतात.
कवितेची ‘स्टोरी’ तशी मोठी आहे. जगताना कुठे कुठे अडखळलो, कुठे कुठे ठेचा लागल्या, दु:खही-आनंदही-प्रेमही-रागही-रितेपणही-भरलेपणही असं सगळं कधी-कुठे अनुभवलं त्याची एक स्पष्ट-अस्पष्ट गोळाबेरीज म्हणजे कविता. कविता म्हणून जे काही लिहिलं ते लिहिताना मला माझ्या अस्तित्वाच्या एका अज्ञात उंचीवरच्या टोकाला जाता आलं. आपण तिथेच कायम राहिलो तर काय होईल हा प्रश्‍न थोडा अप्रस्तुत आहे, कारण वास्तवात ते कुठल्याच कवीला शक्य होत नाही असं मला वाटतं. पण विचार केला की वाटतं की त्या टोकाला कायम राहणं म्हणजे स्वत:ला अनुभवाच्या अंतिमतेशी जोडून घेणं आहे. असं राहणं हे कसं असेल? आनंददायी असेल की दु:खदायी? जो अनुभव गाठीशी आहे तो सांगतो की या टोकाला काहीच जाणवत नाही. शब्द आपल्याला मुक्त करतात. आपला तात्पुरता लय होतो आणि पुन्हा जिवंत होऊन आपण त्या टोकावरून खाली ऐहिकाकडे येतो. त्यामुळे तिथेच कायम राहायचं असेल तर ते ऐहिकाशी कायमचं तुटलेपण असेल. तिथली भूमी वेगळी आहे. मुख्य म्हणजे ती सीमांनी बद्ध असलेली भूमी नाही. तिथे फक्त आपण आणि अमर्याद भूमी एवढंच आहे. तिथे आपल्याला जे दिसतं ते वेगळं आहे. तिथले नाद आणि प्रतिमा वेगळ्या आहेत. तिथे आपण जे अर्थांकन करतो ते वेगळं आहे. तिथे जातो तेव्हा आपण नवे होतो, अनोळखी होतो, स्वतंत्र होतो.  
हे जरी खरं असलं तरी आपण तिथे जाऊ शकतो यात आपलं कर्तृत्व काय आहे असाही प्रश्न मी स्वतःला विचारत असतो. म्हणूनच तिथे जे जाऊ शकतात त्यांनी अभिमान व नम्रता दोन्ही बाळगणं गरजेचं आहे असं वाटत राहतं. आणि कवितेविषयी मौन बाळगण्यातच शहाणपण आहे हेही जाणवत राहतं!
***
***
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *