Uncategorized

घडत्या इतिहासाची वाळू

– गायत्री नातू


कोणत्याही भाषेतले काही विशिष्ट शब्द कवितेत असू नयेत,
कोणत्याही विशिष्ट विषयावर कविताच असू नयेत, किंवा
कोणत्याही विशिष्ट (विचारसरणीच्या) व्यक्तीने
कविता प्रसिद्धच करू नयेत
असे मानणार्‍यांनो, वाटणार्‍यांनो, घडवून आणणार्‍यांनो :
पूर्णविरामापुढचं काहीही तुमच्यासाठी नाही.


‘कविता वाचावी, न्याहाळावी, अनुभवावी फक्त; नये धरू भिंगाखाली, नये काढू तिचे रक्त’ अशासारखं  मत असणार्‍यांनो : माझंही तसंच मत असतं बरेचदा; पण क्वचित जेव्हा नसतं, त्या मन:स्थितीतला आणि तिला कारणीभूत झालेल्या कवितांबद्दलचा हा लेख असणारेय.
***


“वाढत्या वयाबरोबर केवळ बाहेरचं जगच नाही तर आपलं मनही बदलतं. …तरुणपणी आपली अशी धारणा असते की भोवतालचं जग आपल्याला विविध प्रकारचे अनुभव सादर करत आहे व आपलं मन (तरल, संवेदनाक्षम, धारदार इत्यादी) त्या अनुभवांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भिंगातून पाहतं आहे. आपलं मन विशिष्ट रंगारूपाचं, विशिष्ट घडणीचं आहे आणि ते तसंच राहणार अशी आपली धारणा असते. पण हे मनच वेगळं बनू शकतं असं जेव्हा जाणवतं तेव्हा ती जाणीव काहीशी हादरवणारी असते.” — विलास सारंग [१]


या अवतरणात जिचं वर्णन केलंय ती जाणीव मी अजून पुरतेपणी अनुभवली नाहीये. पण ‘जगाने सादर केलेले अनुभव मनाने भोगावे किंवा उपभोगावे; शक्य झाल्यास त्या-त्या वेळचे उरापोटातले भाव शब्दांत मांडावेत’ यापलीकडे त्या अनुभवग्रहणप्रक्रियेत आणि त्या अनुभवाचं वर्णन करण्याच्या पद्धतीत अजून  वेगळंही काही असतं, अशी जाणीव अधूनमधून होते. आधुनिकतावादी (मॉडर्निस्ट) हे विशेषण लावल्या गेलेल्या कला- आणि वाङ्‍मयकृती पाहताना आणि वाचायचा प्रयत्न करताना ही जाणीव विशेष प्रबळ असते. ते ‘अजून वेगळंही काही’ म्हणजे बहुधा यांपैकी कोणतीतरी जाणीव :
-आपल्या मनाची घडण आपल्यालाच कळलेली नाही
-समोरची कलाकृती आपल्या मनाबुद्धीची जुनी घडण काही अंशी बदलते आहे, आणि त्या बदलाबद्दल नंतर खूप काळ डोक्यात विचारांचे धागे तुटत-जुळत राहत आहेत
-तिचा ‘अर्थ’ न कळताही आपल्याला ती आकर्षित करते आहे
-‘कलाकृती आवडली का?’ या प्रश्नाचं हो किंवा नाही असं बायनरी उत्तर देता येत नाहीये
-समोरच्या अभिव्यक्तीत आपल्या जुन्या स्मृतींशी परिचित असं हुकमी फारसं काही नसल्यामुळे तिच्या स्वरूपाबद्दल जास्त विचार केला जातो आहे; आणि तिला कसं अनुभवलं पाहिजे याबद्दलही.
– आपण त्या कलाकृतीला कितीतरी प्रश्न विचारतो आहोत, आणि त्यांची उत्तरं शोधतो आहोत; आपल्यालाच त्या प्रश्नोत्तरांमधून नवीन काही लिहायला सुचतं आहे.
या जाणिवेतून एका प्रश्नाला नवी धार चढते : ‘कसदार सर्जनशील लिखाण कसं घडतं/ घडवावं?’ – या प्रश्नाच्या उत्तराची एक शक्यता डॉ. विलास सारंग यांच्या लिखाणात मला दिसली.
एकोणीसशे साठच्या दशकापासूनचे मराठी साहित्यातले आधुनिकतेचे पाईक म्हणून तीन द्वैभाषिक लेखकांचा एकत्र उल्लेख होतो : दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि विलास सारंग. त्यात कवी म्हणून चित्रे-कोलटकर आणि कथात्म-गद्यलेखक म्हणून सारंग अशी ढोबळ विभागणी होताना दिसते. ‘अर्ध्यामुर्ध्या’सारखी कथा आणि ‘एन्कीच्या राज्यात’सारखी कादंबरी लिहिणार्‍या सारंगांचं, गद्यलेखन हे निर्विवाद बलस्थान होतं. पण त्यांच्या एका आत्म-समीक्षापर लेखामधल्या एका वाक्याने त्यांच्या कवितेबद्दलची माझी उत्सुकता चाळवली :  “माझ्या कल्पनाशक्तीचा प्रवास बरेचदा कवितेकडून कथेकडे होतो. कवितांमध्ये ज्या प्रकारचा अनुभव-आशय प्रतिमांच्या आणि विधानांच्या साहाय्याने व्यक्त होतो तोच अधिक नाट्यपूर्ण स्वरूपात, तपशिलांसह कथात्म लेखनात अवतरतो.”  आणखी एका ठिकाणी[२] आपल्या भाषिक जडणघडणीची उकल करताना, (वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत फक्त मराठीतच वाचन केल्यामुळे) ‘माझे सबोध मन इंग्रजीत काम करत असले तरी, माझे अबोध मन मराठीत मुळे धरून आहे’ असं ते म्हणतात. त्यामुळे अनुभवाची, विचारांची प्राथमिक आणि तुलनेनं असंस्कारित अभिव्यक्ती म्हणून सारंगांच्या मराठी कवितेकडे पाहता येईल असं वाटलं, आणि त्यांच्या कविता वाचायला घेतल्या.


चित्रे-कोलटकर-सारंग त्रिकूटामध्ये आजवर विलास सारंगांना मराठी वाचकवर्तुळात तुलनेनं कमी प्रसिद्धी लाभली आहे. त्यांच्या साहित्याची इतरांनी केलेली मीमांसाही सहजी आढळत नाही. पण त्यांनी स्वत:च्या लेखनप्रेरणांबद्दल आणि प्रक्रियांबद्दल वेळेवारी केलेलं लेखन हा तटस्थ आत्म-समीक्षेचा उत्तम नमुना आहे. स्वत:च्याच लिखाणाचं विवेचन हे निव्वळ आत्मसमर्थनासाठी करणं शक्य असतं. विलास सारंगांच्या विवेचनात असं समर्थन नक्कीच आहे, पण त्यातला मूळ मुद्दा अधिक व्यापक स्तरावरचा, वाचकाचं एकूण साहित्यव्यवहाराबद्दलचं कुतूहल चाळवणारा अथवा शमवणारा असतो. सारंगांचं आत्म-विवेचन मुख्यत: त्यांच्या कथा-कादंबर्‍या आणि भाषांतराबद्दलचं असलं, तरी त्यात कल्पनेच्या आविष्काराची काही तंत्रंही त्यांनी उलगडून दाखवली आहेत; तसंच अन्य समकालीन कवींच्या तंत्रांवर टिपणंही नोंदवली आहेत. ती तंत्रं त्यांच्या कवितेत वापरली गेली आहेत का, हे धुंडाळायचा, आणि एकुणातच ‘डोक्याला कष्ट देणार्‍या’ त्यांच्या कवितेत वेगळं काय दिसलं ते मांडायचा प्रयत्न या लेखात करते आहे.


‘कविता: १९६९-१९८४’ हा सारंगांचा पहिला कवितासंग्रह. त्यात सुरुवातीला कवितेचा घाट, तिचा नाद यांच्यावरचे प्रयोग केंद्रस्थानी दिसतात. इथे शब्द केवळ संदेशवहनाचं साधन राहत नाहीत, तर त्यांचं स्वत:चं अस्तित्व हाच त्या कवितेचा ‘पॉइंट’ असतो. कवितेचा आशय काय आहे, कवीला नक्की काय म्हणायचं आहे असे प्रश्न उद्भवू नयेत अशी ही कविता.  दुर्बोधता आणि अर्थनिर्णयन या प्रक्रिया तिथे अर्थहीन वाटतात. मॉडर्निस्ट चित्रात जसे आकृतिबंध आणि रंग एखाद्या विशिष्ट दृश्यरचनेत मांडून, ‘चित्र म्हणजे ‘नैसर्गिक’रीत्या जसं दिसतं तसं हुबेहूब काढायचं’ अशी धारणा डळमळीत केलेली असते; त्याप्रमाणे अशी आधुनिकतावादी कविता शब्द आणि नादांच्या एखाद्या विशिष्ट भाषिक रचनेतून कवितेच्या स्वरूपाबद्दलच्या वाचकाच्या धारणेला धक्का देऊन जाते. उदाहरणार्थ, सुनीताच्या चौदा ओळींचं बंधनमात्र पाळणारी आणि रचनेत अनेक प्रयोग करणारी सारंगांची प्रति-सुनीतं. एक फक्त ‘अलगद, नजर, फुलत, विरळ, टिकटिक, विझत’ इतकेच शब्द वेगवेगळ्या लयबद्ध क्रमात वापरून घडवलेलं, दुसरं फक्त चौदाच शब्दांत लिहिलेलं – एकेका शब्दाची एक ओळ, असं. आणखी एक, मराठीत सुनीतांकरता बरेचदा वापरल्या गेलेल्या शार्दूलविक्रीडित वृत्तात लिहिलेलं :


कोरा कागद भाबडा सतत हा चीत्कार कानांवरी
हे कॅलेंडर हे घड्याळ भवती मुंग्या कुठे चालल्या
माझे हात इथे कुठे हरवले डोळे खुळ्या भावल्या
लाटांचे पडदे पल्याड खिडकी कोणी कुणाला तरी


सांगाडे घनदाट ताटकळती ओठांविना बासरी
झाडे ढाळत आसवे कवडसे खोटे तशा सावल्या
भिंतींचे पडसाद संथ कवळ्या ओठांत कोमेजल्या
वाळूच्या पुतळ्यांपुढे अचल मी आभास हे लोकरी


रस्ते पालवतात भाकडकथा आभाळ ओठंगुनी
झांजा मंद मनात वाजत कधी पाणावला आरसा
काठोकाठ दिशा उधाण कविता हे पावसाळे तुझे


शून्यातून प्रसादचिन्ह फुटके मी कातडीचा धनी
वारे आज तुझे तुझ्याच सगळ्या वाटा तुझा हा वसा
शब्दांचे बघ ताटवे विलग एकांतात भाषा विझे”


हे वाचताना “क्कॅय?” असं झालं पहिल्यांदा; आणि ना. धों. ताम्हणकरांच्या ‘गोट्या’मधला  “टकटक घड्याळ वाजे, मांजर टकमक बघऽत हे बसले। टेब्लावरी दउतटाक उगीच पडले॥”वाला ‘पाडू’ कवितेचा प्रसंगही आठवला.  पण तरीही ‘कोरा कागद..’ पुन:पुन्हा वाचावीशी वाटली हे खरं. काय असावं मला वाटलेल्या या आकर्षणाचं मूळ? एक तर या प्रति-सुनीतात पीट्रार्कच्या इटालियन सॉनेटची यमकरचना चोख पाळली आहे – ती गाता येण्याजोगी – अगदी ‘रॅप’ही करता येईल अशी आहे. लयीसाठी नेटका अनुप्रास वापरला आहे : त्का.. का.., दाट… ताट, ळ्या… ल्या, ळू… ळ्या इत्यादी. सुरुवातीच्या आठ ओळींत एकामागून एक प्रतिमांनी वातावरणनिर्मिती आणि पात्रपरिचय एकत्रच करून दिला आहे. ‘कवळ्या ओठांत कोमेजल्या’मधला विनोद, ‘शून्यातून प्रसादचिन्ह फुटके..’मधला हताशपणा आणि कवितेची किल्ली असल्यासारखी वाटणारी शेवटची ओळ असे तुकडे मला आधी आवडले. अपार्टमेंटच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन आसपासच्या अस्तित्वाच्या फुटक्या तुकड्यांत ‘प्रतिभा’ शोधणारा पहिल्या कडव्यातला निवेदक शेवटच्या कडव्यापर्यंत दाही दिशा फिरून, साठ पावसाळे बघून आलेल्या माणसासारखा वाटला. मग या कवितेशी खेळायच्या अगणित संधी आहेत असं लक्षात आलं…  शब्दखंडांची जिगसॉ पझलसारखी तोडमोड करून वेगळाच अन्वय आणि “अर्थ” लावता येतो :


कोरा कागद भाबडा सतत हा; डोळे खुळ्या भावल्या,
हे कॅलेंडर हे घड्याळ; भवती कोणी कुणाला तरी:
“माझे हात इथे कुठे हरवले?” चीत्कार कानांवरी,
लाटांचे पडदे पल्याड खिडकी… मुंग्या कुठे चालल्या.


कवितेतला एकुलता यतिभंग – हेतुपुरस्सर असो वा नसो – वेगळ्या अर्थाची शक्यता निर्माण करतो : ‘शब्दांचे बघ ताटवे विलग ए ऽ कांतात भाषा विझे.’ बाकी चेतनगुणोक्ती, ट्रान्स्फर्ड् एपिथेट् वगैरे अलंकार आवड असल्यास शोधून घ्यावे. एकूणात ‘पॉल क्ली’ची गोधडी शिवल्यासारखी दिसणारी, डोळे खिळवून ठेवणारी चित्रं (कॅसल ऍन्ड सन,टेम्पल गार्डन्स) आणि ही कविता आपल्या मेंदूला सारख्याच पद्धतीनं उत्तेजित करताहेत असं वाटलं.


या कवितासंग्रहामध्ये शेवटी वास्तवदर्शी, देशा-परदेशातल्या मानवी समूहांवर भाष्य करणार्‍या काही कविता आहेत. कदाचित विलास सारंगांच्या कवीपणाच्या सुरुवातीच्या काळात ‘फॉर्म’वर, रूपावर अधिक भर होता असेल, आणि त्यावर पकड आल्यानंतर, जगण्यातले ‘कंटेंट’ पुरवणारे अनुभव घेतल्यानंतर आशयाला अवसान आलं असेल. कारण पुढे १९८९ मध्ये संपादित केलेल्या ‘इंडियन इंग्लिश पोएट्री सिन्स नाइन्टीन फिफ्टी : ऍन ऍन्थॉलॉजी’ या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी भारतातल्या कवितेची नवी गरज मांडली ती अशी: “केवळ शैली आणि घाटावर लक्ष देऊन भागणार नाही, तर सामाजिक परिस्थितीची खोल जाणीव आवश्यक आहे : इथल्या माणसांचं दु:खसातत्य (सफरिंग), आधुनिकता, पारंपरिक अंतर्गतता आणि इथल्या रस्त्यांतून काय चालतं त्याची जाणीव हवी.”


याच जाणिवेतून सारंगांच्या ‘घडत्या इतिहासाची वाळू’ या दुसर्‍या कवितासंग्रहातल्या कविता लिहिल्या गेल्या आहेत असं दिसतं. अवघ्या एकतीस कवितांचा हा संग्रह दोन भागांत विभागला आहे – विदेशी (बरेचदा उत्तर अमेरिका आणि मध्यपूर्वेकडचे देश, जिथे शिकण्या-शिकवण्याच्या निमित्तानं सारंग राहिले होते), राजकीय-सांस्कृतिक अनुभवांचा संदर्भ असलेल्या कवितांचा एक भाग आणि स्वदेशी सामाजिक-व्यक्तिकेंद्री संदर्भांतील कवितांचा दुसरा भाग. कवितांमधले संदर्भ खुजे नाहीयेत; बरंच काही पाहिल्या-वाचलेल्या माणसानं ते दिले आहेत. त्यात आखाती युद्ध आहे, पॅलेस्टिनी निर्वासित आहेत, वॉल्ट व्हिटमन आहे, तसा नवव्या शतकातला बंगाली कवी ‘मुरारी’ आहे, सॉक्रेटीस-झांटिपी आहेत आणि पंचतंत्रातलं, मगराच्या पाठीवर बसून सैर करणारं माकडही आहे.
***
पहिल्या भागातल्या कविता वाचताना माझी सद्यस्थितीतली एक गरज पूर्ण झाली : आफ्रिका, मध्यपूर्व आणि दक्षिण आशिया इथे सध्या जागोजागी चाललेल्या यादवी युद्धांबद्दल विस्कळीत, अव्यक्त असं जे काही खुपत असतं, त्याला शब्दांचे, संज्ञांचे खिळे ठोकून डोक्यात टांगून ठेवण्याची. हॅना ऍरन्टच्या ‘बनॅलिटी ऑफ इव्हिल’ या शब्दसमूहासारखं काहीतरी.


या संग्रहाचं नाव ज्या कवितेतून आलं असावं तिच्यातल्या काही ओळी :


सिमेंट बांधकामांच्या मृगजळी दगडीपेक्षा
अधिक भरवशाचे आहेत
वार्‍यावर उडून जातील असं वाटण्याजोगे
बेदूइन लोकांचे तंबू,
जे आज इथे तर उद्या तिथे
असे हलत असतात
समुद्रावर उचल खाणार्‍या अरबी गलबतांप्रमाणे.


आठवण ठेवलेली बरी,
की आपण केवळ चिखलामध्ये विरून जात नाही,
तर धुळीच्या, वाळूच्या कणांमध्येही.


‘काळ आणि अवकाश : इतिहासाला एक तळटीप’ असं असलं तरी खुद्द इतिहासही फॉसिल्ससारखा घट्टमुट्ट नसून वाळूसारखा सरक-फिरता आहे हे सांगायला फारच उपयोगी शब्दचित्र!सोमालियातल्या संघर्षावरच्या कवितेतलं भाष्य असं :


..आभाळात
लढाऊ विमानं जाताहेत
देवतुल्य न्यायदानाची आधुनिक इंजिनं
खाली दूरवर निर्वासितांचा लोंढा
फाटक्या कपड्यांतील निर्वासित अनंतकाळचे
झगडताहेत बेघर लोक धूळभरल्या उष्ण वार्‍यांशी
पर्वतांची सहनशक्ती अमाप आहे


मोगादिशूमधली ही निवान्त सकाळ :
सकाळ होईलच इतर स्थळी
पृथ्वीच्या आसानुसार व इतिहासाच्या
सकाळ उगवते
टिकाऊ शांततेमध्ये लपेटलेली,
बामियाँच्या बुद्धाच्या
खालसा केलेल्या अवाढव्य पोकळीत.”


आत्ता सीरिया आणि इराकमध्ये जे चाललंय तेच हे. तिथेही आहेत सहनशील पर्वत आणि पाल्मीराच्या पोकळीतही सकाळ उगवेल. इतिहासाच्या दगडी पाउलखुणा नष्ट केल्या गेल्याच्या दु:खासोबतच वर्तमानाच्या जिवंत पावलांखाली थोडी जमीन देण्याइतकी कणव देवतुल्य न्यायदात्याला येईल?
गेल्या काही वर्षांत युद्धं टीव्हीमार्फत आपल्या दिवाणखान्यात पोचली. तंत्रज्ञानाच्या या झेपेबद्दल आश्चर्य वाटतंयसं दाखवत, माफक उपहासक, सौम्य शब्दांत लिहिलेल्या एका कवितेच्या शेवटी एकदम फटकारा येतो :


मृत्यूच्या या ऋतूत
तुम्हाला वेळही मिळत नाही चिंतन करायला
या भिकारड्या युद्धाबद्दल,
या बेशरम जेत्यांबद्दल, या बेशरम पराजितांबद्दल.”


क्यूबन भूमीवरच्या ‘ग्वांटानमो बे’मधल्या अमेरिकन तुरुंगात ठेवलेला एक अफगाण कैदी ‘हबीबुल्ला’. त्याचं स्वगत असलेली एक  कविता सुरुवातीला सहज, अभिनिवेशहीन आहे. मग ‘इंग्रजांनी ब्रह्मदेशच्या थिबॉ राजाला खच्ची करण्यासाठी हिंदुस्थानात धाडलं, तसंच अमेरिकनांनी मला खच्ची करण्यासाठी क्यूबाला पाठवलं आहे. सगळी साम्राज्यं इथून-तिथून सारखीच’ असा विचार त्याच्या मनात येतो. कवितेचा शेवट असा :


..उघड्यावर माझ्या तुरुंगात
आकाशातले तारे पाहताना उबदार पाऊस
माझ्या सर्वांगावर बरसतो. पावसाचे थेंब
चमचमतात चंद्रप्रकाशात काटेरी तारांवर,
जणू एक वेदना ताणलेली काटेरी दोरीवर
कित्येक समुद्रांवर आणि कित्येक शतकांमधून.


‘यादवी’ हे सिव्हिल वॉर प्रकारच्या युद्धासाठी सहजी वापरलं जाणारं विशेषण; त्याच्या मूळ अर्थाकडे लक्ष दिलं तर फार समर्पक वाटतं : कृष्णाचे यदुवंशातले सारे नातेवाईक शेवटी आपसांतच मारामार्‍या करून नष्ट झाले, त्यासारखं ते यादवी. महाभारतातल्या या आख्यानासारखी एक नव-संशोधन-आधारित ‘दक्षिण अमेरिकन बोधकथा’ सारंग तयार करतात. मूठभर स्पॅनिश कॉंकीस्तादोरांनी सव्वाकोट इंकांना ठार केलं नाही, तर दक्षिण अमेरिकेतल्याच दुसर्‍या एका टोळीला इंकांविरोधात लढण्यासाठी शस्त्रं दिली.


इंकांच्या छातीत वा मस्तकात घुसलेल्या गोळ्या
देशी लोकांच्याच होत्या.
शौर्य, धडाडी, कौशल्य या गोष्टी बाजूला राहिल्या.
आक्रमणासाठी आपलीच माणसं पुरतात.
***


या पहिल्या भागातली एक कविता इतरांहून वेगळी. तिचा फक्त ‘मझा’ घ्यावा अशी.


उपवास आणि मेजवानी


मेंढ्यांचा कळप चरतो आहे
इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत,
चरून-चरून
मेंढ्या होताहेत गुबगुबीत,


थोडं चमत्कारिक वाटतं हे:
या रमझानच्या दिवसांत
उघड्यावर खाण्याची बंदी असते.
मेंढ्या खुशाल लोकांदेखत खाताहेत.


रमझान पलटेल; उपवास सुटेल.
सरकारी हॉस्पिटलांतील दुखणाईतांची
गर्दी वाढेल: तुडुंब खाल्ल्याने पोटदुखी, अपचन.


गुबगुबीत मेंढ्यांचा कळप नाहीसा होईल.


ई. एम्. फॉर्स्टर यांनी कथन आणि कथानकामधला फरक असा सांगितला होता : “राजा मेला आणि नंतर राणी मेली” ही स्टोरी (कथन) आहे. “राजा मेला आणि नंतर शोकाने राणी मेली” हा प्लॉट (कथानक) आहे.
या संकल्पनेवरचं आपलं मत सारंगांनी वेगवेगळ्या लेखांतून असं मांडलंय : ‘कथानकाला तर्कशास्त्रातल्या अर्ग्युमेंटसारखी अशा एकापुढे एक परस्परसंबंधी विधानांची गरज असतेच असं नाही. कथानक असंही असू शकतं, की “राजा मेला आणि राजपुत्र दरबारातल्या विदूषकाचा हात धरून पळून गेला.” दोन वाक्यांमधल्या फटीचा सर्जकाला फायदा करून घेता येतो. साहित्यिक सृजन ही ‘सिनॅप्सिस’ची, जुळणीची क्रिया आहे. विशेषत: कवितांमध्ये असातत्य, अप्रासंगिकपणा यांसंबंधी प्रयोग करून पाहणं शक्य असतं. साहित्यकृतीत सुसंबद्धता (कोहीरन्स) हवी; एकसंधपणा (कोहीजन) नसला तरी चालेल.’
माझ्या मते वर दिलेली कविता अशा प्रकारच्या प्रयोगाचा चांगला नमुना आहे.
***


कवितासंग्रहाचा दुसरा भाग ‘देशी’ आहे. त्यातल्या कविता वाचून वाटलं, सारंग या वर्षीच्या मे महिन्यात आपलेआपणच वारले म्हणून. अन्यथा, त्यांच्या एक-दोन विवक्षित कविता मुद्दाम सोशल मीडियावर प्रसिद्धीला आणवून, गेलाबाजार कोर्टकचेर्‍या आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याकरता हा उत्तम हंगाम होता. ‘परमेश्वराची शिकार’ नावाच्या कवितेची सुरुवात अशी:


परमेश्वराच्या मागावर असलेली
लांडग्यांची एक टोळी :
हेच धर्माचं मूलसूत्र.
परमेश्वर – एक निसटणारं सावज;
आवाक्यात आलं की चहूबाजूंनी लचके तोडा,
अर्थात्‌ आपापल्या पायरीप्रमाणे:
प्रथम शक्तिमान राजकारणी , गालफडं सुजलेले
(ज्यांना मंदिरात थेट प्रवेश मिळतो),
मग उद्योगपती, फिल्मस्टार,
मग मध्यमवर्ग, मग खालच्या जातीचे लोक.


शतपथ ब्राह्मणातलं याज्ञवल्क्याचं ते ‘कोवळं गोमांस खाण्या’बद्दलचं वाक्य उद्धृत करणार्‍या, ‘अन्न’ नावाच्या त्यांच्या कवितेतला काही भाग असा :


काल रात्री याज्ञवल्क्य माझ्या स्वप्नात आला;
म्हणाला : ‘मुला, तुला इतरांचं अन्न नाही आवडलं,
तर ढोसायची सक्ती नाही.
पण एवढा-एवढासा तुकडा घे,
चर्चमधल्या वा मंदिरातल्या वा मशिदीपासच्या
‘वेफर’सारखा, किंवा प्रसादासारखा, किंवा कुरबानीसारखा.
एक तुकडा घे बैलाच्या मांसाचा, एक भाकरीचा,
ओंजळभर पंचामृत, ओंजळभर वाईन.
घे, घे, खा, घुटका घे. मग होतील सारे तुझे भाईबंद.
मनुष्यांच्या बंधुभावाची खरीखुरी ग्वाही.’


(तरी चतुराईनं ‘गाईच्या मांसाचा’ म्हणायचं टाळलंय!)
***


आहार, निद्रा, भय, मैथुन ही पशु-चेतनेची चार, अधिक मननशीलता, अशी मनुष्य-चेतनेची पाच लक्षणं मानली जातात. ‘माणसातल्या पशुचेतनेवरची मननशीलता’ हे सारंगांच्या कवितेचं लक्षण मानता येईल. खाणं आणि खासकरून पिणं,  मृत्यू, नाती आणि लैंगिकता हे विषय या भागातल्या कवितांमध्ये वारंवार येतात; त्यापलीकडचं काही सांगण्यासाठी भक्कम पार्श्वभूमी म्हणून. काही वेळा अत्यंत अनपेक्षित जागी एखादा श्लेष टाकून वाचणार्‍याची विट्टी उडवली जाते :


अरुण कोलटकर फेम इराणी रेस्टॉरंटची जागा उडपी रेस्टॉरंटने घेतली, यावरून एकूणातच भवतालाच्या भंगुरतेवर भाष्य करणार्‍या कवितेत मध्येच हे येतं :


“लेक्चरांदरम्यान प्राध्यापक येतात घाईत
कढत काफीसोबत उसंत घ्यायला; विचार करतात
– उडपी, की उडिपी, की उडुपी?
अचानक त्यांची खात्री पटते,
की या लोकांचा मूळपुरुष
कुणी उडिपीयस नावाचा ग्रीक होता;
तो प्राचीन काळी हिंदुस्थानच्या किनार्‍याला लागला.
प्राध्यापक उडिपीयस कॉम्प्लेक्सविषयी चिंतन करताहेत


माणसातल्या लिबिडोची सगळीकडून मापं काढणारी ‘लिबिडोचा लिप्ताळा’ कविता संपते ती या आशेवर :


कदाचित दूर भविष्यकाळात
आपण या सार्‍या गोंधळातून, विचक्यामधून
बाहे येऊ आणि सुखाने राहू.
लिंगविभाजन नाही, स्त्री (किंवा पुरुषाला)
बळजबरीने नमवणं नाही;
अखेर, आपल्यामागे लागलेलं
लैंगिकतेचं ते शुक्लकाष्ठ टळेल;
तो दैत्य किंवा ते झेंगट होईल लिबि-
        डोडो.
***


सारंगांच्या कवितांचा ढाचा शोधला तर साधारण ‘हे दिसतं आहे’ – ‘हे माझ्या स्मृतीतल्या दुसर्‍या कशाच्यातरी सारखं आहे’- ‘याच्यावरून तिसरीच अलौकिक / विकृत / अमानवी कल्पना उभी झाली आहे’ – ‘यानंतर वास्तवात हे होईल’ असा दिसतो. वास्तव –> प्रतिमा –> अतिवास्तव –> भाकित असं सूत्र आपल्यापुरतं या कवीनं ठरवलं आणि विकसित केलं असेल का? कवितेच्या संदर्भात माहिती नाही, पण स्वत:च्या कथेच्या बाबतीत त्यांनी लिहिलेल्या एका वाक्यावरून, जाणीवपूर्वक असं तंत्र वापरलं गेल्यासारखं वाटतं: “माझं तंत्र असं आहे की कथेच्या सुरुवातीच्या भागात कथा साधी वास्तववादी कथा आहे, असं वाटावं. मग हळूहळू कथेचा फॅंटसी भाग कब्जा करू लागतो, तो उग्र स्वरूप धारण करू शकतो. कथेचा अंत बहुधा फॅंटसीमय वातावरणात होतो.” [३]


ही फॅंटसी, प्रेयसीसारखी हवीहवीशी, मजेदार बहुधा नाहीच. कथेच्या तुलनेत कवितेच्या सघन फॉर्ममुळे मूळ कल्पनेतली उग्रता आणखीनच भेसूर वाटते; कुणाला बीभत्सही वाटेल; उदा. मानवी अवयवांचं तुलाभरण करणार्‍या एका उदार गौरवमूर्तींबद्दलची कविता.


पण तरीही – कदाचित कोणताच शब्द, कोणतीच कल्पना निषिद्ध न मानल्यामुळेच – या कविता ‘खर्‍या’ वाटतात. हगणं-मुतणं, झवणं, किंवा समलिंगी संभोग या गोष्टी, याच किंवा अजून न-संस्कृत शब्दांत लिहिल्या की ती कविता ‘मॉडर्न’, ‘खरी’ आणि अपरिहार्यपणे ‘ग्रेट’ होते असं नाही. पण या शब्दांना आणि क्रियांना न लाजणं, समर्पक वाटेल तिथे त्यांचा वापर करणं – किंवा अगदी त्यांच्यावरच कविता लिहिणं हे सारंगांनी (त्यांच्यासोबतच्या काही मान्यवर कवींसारखं) जशा पद्धतीनं केलं आहे –  ती पद्धत इन्टरेस्टिंग आहे. ग्वांटानमो बेमध्ये काटेरी तारांच्या कुंपणातल्या खुल्या तुरुंगात, टेहळणीवरचे सोजीर रात्रंदिवस पहारा ठेवत असताना “निवांतपणे हस्तमैथुनही करता येत नाही” हे हबीबुल्लाचं वाक्य साहजिक वाटतं  (तिथे अजून ग्राम्य शब्द बरोबर ठरला असता का? पण स्वत:ला ‘अफगाण योद्धा’ म्हणवून घेणारा कैदी कदाचित हीच संज्ञा वापरेल.)


‘मुरारीचं मरण’ ही नवव्या शतकातल्या एका कवीच्या शेवटच्या घटकांबद्दलची कविता. तिचा शेवट असा :


ताप चढत राहिला. उग्र मिश्रण
लघवीचं आणि घामाचं
मुरारीच्या पंचेन्द्रियांमध्ये भिनलं.
दरवाज्याची चौकट विरघळली.


म्हशींचा कळप : एक काळं विधान रफारांसहित.
पांढर्‍या बगळ्यांच्या स्वल्पविरामांसह.
पहाटेचं तलम ऊन : एक हायकूचित्र
जे कवीने कित्येकदा निरखलं होतं.
एक चिन्ह शांतीचं आणि सलगतेचं, सातत्याचं.
कोंदट झोपडीतली दुर्गंधी एव्हानाच
त्वरेने वातावरण ढवळून टाकत होती
पुढल्या जन्मांसाठी, पुढल्या मरणांसाठी.
***


टी. एस्‌. एलियटच्या ‘ईस्ट क्रोकर’मधल्या उतार्‍याचं विलास सारंगांनी एके ठिकाणी भाषांतर केलंय. साहित्य घडवण्याचा, कविता लिहिण्याचा खटाटोप म्हणजे काय, ते – सिसिफस आणि प्रोमीथियसचा संगम असावा तसं – छान सांगितलंय त्यात.


शब्द वापरायला शिकण्याचा प्रयास:
प्रत्येक प्रयत्न असतो एक नवा आरंभ
प्रत्येक वेळचं धाडस
ही एक नवी सुरुवात, अव्यक्तावरील हल्ला
जे जिंकण्यासारखं आहे, शक्तीनिशी व नम्रतेने,
ते आधीच शोधण्यात आलेलं आहे-
एकदा वा दोनदा वा कित्येकदा,
ज्यांची बरोबरी करणं कठीण आहे
-पण इथे स्पर्धेचा प्रश्न नाही –
ही लढाई आहे गमावलेल्या श्रेयाच्या पुनरुत्थानासाठी,
पुनरुत्थानानंतर पुन:पुन्हा गमावलेल्या श्रेयासाठी


हे वर्णन लक्षात घेऊन लिहिली गेलेली सारंगांची कविता, ते लक्षात ठेवून वाचली; तर अजून गहिरी वाटते. त्या कवितांना (किंवा त्यांच्या निवेदकाला) प्रश्न विचारावेसे वाटतात; त्यांच्यातल्या काही विधानांना तीव्र असहमती दाखवता येते; “छ्या! एका बाजूला भरपूरच खुल्या दिलाचं, न बुरसटलेलं काही बोलता, आणि दुसर्‍या बाजूला लग्न, झांटिपी, दारू (न) पिणार्‍या बायका इत्यादीबद्दल बोलताना शिळ्याच कढीला ऊत आणता हे कसं?” असं मनात भांडता येतं. कधी समजुतीनं “तुम्ही इथं म्हणताय तो काळही बदललाय आता” असंही म्हणता येतं. “उफराट्या जगात केवळ विलंबित तात्पर्य खरं” या वाक्यापेक्षा “In a topsy-turvy world, there is only the deferred moral” ही ओळच जास्त भारी आहे आणि जास्त नीट कळते, तेव्हा काही काही कविता मुळात इंग्रजीतच लिहायला पाहिजे होत्या; किंवा “इथल्या रस्त्यांतून काय चालतं त्याची जाणीव” निवेदकाला स्वत:च्या सुरक्षित खिडकीत बसून आलीये, रस्त्यावर उतरून नाही  – वगैरे मतप्रदर्शनही करता येतं. थोडक्यात, ’कवितेविषयी’ रवंथ करायचा असेल तर, चविष्ट असो वा नसो – सारंगांच्या कविता ही एक पौष्टिक पेंड आहे.
***


[१] लेख : ‘बदल: बाहेरचे आणि आतले’, पुस्तक : सर्जनशोध आणि लिहिता लेखक, मौज प्रकाशन
[२] लेख : एका मराठी लेखकाची कैफियत, पुस्तक : अक्षरांचा श्रम केला, मौज प्रकाशन
त्यांच्या एकूणच समीक्षापर लेखनात (उदा. ‘सर्जनशोध आणि लिहिता लेखक’) मूळ आणि भाषांतरित वैश्विक इंग्रजी साहित्य आणि मराठी साहित्य यांचा संशोधकाच्या वृत्तीने धांडोळा घेऊन, त्या पार्श्वभूमीवर आपल्या लेखनाच्या वाटा शोधून, तो प्रवास सारंग इतरांसमोर ठेवतात.
[३] लेख : ‘दुभंगलेलं वाङ्मय’, पुस्तक: लिहित्या लेखकाचं वाचन, शब्द प्रकाशन
 
***
चित्रस्रोत : गायत्री नातू

 

Facebook Comments

5 thoughts on “घडत्या इतिहासाची वाळू”

 1. विलास सारंग आणि गायत्री नातू! हे कॉंबीनेशन च इतकं मोहक आहे याची कल्पना येत नाही! रेषेवरची अक्षरे इज बॅक!

 2. विलास सारंगांचं फक्त गद्य वाचलं आहे, कविता नाही. मला साधारणपणे मराठी कविता वाचताना अडचण येते. म्हणजे उर्दूचे शब्द जसे आरपार घुसतात तसे मराठीचे फार क्वचित. याला अर्थातच आमचे बालपणीचे संस्कार कारणीभूत आहेत. लहानपणी उर्दू/हिंदी अधिक जवळची .. त्यात नदीपलीकडे संपर्क फारसा नाही. त्यामुळे मराठी गद्याचा आनंद घ्यायला अडचण येत नाही, कवितेत मात्र येते.

  मग मराठी कवितेची वेगवेगळी अंगे इतक्या सुरेखपणे उलगडून दाखवणारा लेख वाचला की अवस्था वाचता न येणाऱ्या मुलासारखी होते. गोष्टीच्या पुस्तकात चित्रे बघून तो हरखून जातो, यापलीकडेही काहीतरी अद्भुत आहे हे जाणवतं पण तिथे जाता येत नाही.

  तर आमच्यासारख्या न वाचता येणाऱ्यांसाठी लिहीत राहावे ही इणंती.

  ता.क. अर्थात मी इतकाही कमनशिबी नाही. 🙂
  "झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया" सारख्या ओळी वाचल्या की अंगावर काटा येतो आणि तेव्हा मराठीची खरी ताकद कळते.

 3. आपल्याच अंकातल्या लेखांवर आपणच जाहीर कमेंट करणं किती बरोबर किती चूक असा उलटसुलट विचार बराच काळ केल्यावर एका घडीला मला असं झालं, "बरं-वाईट काय असायचंय त्याच्यात? संपादन केलं म्हणजे वाचकपण गमावलं का काय? ते काही नाही… मी मला हवं ते म्हणणारच!" नि विचार बदलायच्या आत खरडायला घेतलं!

  मला फार म्हणजे फार म्हणजे फार आवडला हा लेख. एकूणच समीक्षात्मक लेखनाबद्दल डोक्यात थोडे अडथळे आहेत. परिभाषेची गरज मला कळते. सगळ्याच गोष्टी अमुक एका पातळीच्या खाली सोप्या असणार नाहीत, हेही कळतं. पण तरीही – निदान साहित्यासारख्या जिवंत गोष्टीबद्दल रसरसून – समरसून काही बोलताना बर्फगार अलिप्तपण आणून आणि एका विशिष्ट संचातलेच्च शब्द वापरून बोलायला पाहिजे, ही काय अट आहे ते काही केल्या कळत नाही. त्या पार्श्वभूमीवर हा लेख आवडला. धीर देऊन गेला. अनेक प्रकारच्या लाग्याबांध्यांसह (ऍसोसिएशन्स) वाचणारे आपण आणि तशाच अनेकरंगी-अनेकपदरी अनुभवांच्या पडद्यांतून लिहिणारा लेखक यांच्यात पूल बांधले जात असतील, तेव्हा याच जातीचं काही घडत असेल, याची खूण पटवून गेला. माझ्या तुंबून पडलेल्या वाचनाचे अनेक रस्ते मोकळे करून गेला. त्याबद्दल रीतसर आभार.

 4. गायत्री, हा बाप लेख आहे! फुकट कौतूक नाही करतै. कवितेला हे असं चहुबाजूंनी भिडणं आणि चाचपडत तिचा अंदाज घेणं हे येरागबाळ्याचं काम नाही. त्यातही नन-अदर-दॅन सारंग!! लोकांचा त्यांचं गद्य वाचताना जीव जातो…आणि इथे क..वि..ता…तरीही एक तक्रार आहे, तू हा लेख पुर्ण लिहीला नाहीस असा माझा सावध अंदाज आहे. तू कविता मात्र नेमक्या निवडल्या आहेस, सारंगांचं नेमकं प्रतिनिधित्व करणाऱ्या. परत वाचतोय, परत परत वाचतोय.

  तळटीप- मेघना, मी पहील्या पानावरच डीक्लेरेशन दिलं आहे की सगळ्या लेखांवरच्या कॉमेन्ट्स या वाचक म्हणून असतील, संपादक म्हणून नाही! हाऊ स्मार्ट!

 5. I agree with Samved: हा बाप लेख आहे!…one of the best I have read in Marathi criticism for a long time…If Sarang were to be alive, he would certainly have sought a meeting with Ms. Natu..

  The article is so good that Samved is moved to say: तू हा लेख पुर्ण लिहीला नाहीस असा माझा सावध अंदाज आहे…I like that response…

  तरी चतुराईनं 'गाईच्या मांसाचा' म्हणायचं टाळलंय!…this was masterstroke…absolute tongue in cheek…Sarang too cannot escape his middle-class timidity!

  I don't really like Sarang's poetry as much as his prose but it is still so good…he wants to be like Arun Kolatkar and B S Mardhekar but he just can't…Kolatkar is simpler, wittier, more musical…Mardhekar simpler, more spiritual…

  I look forward to Ms. Natoo's next …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *