Uncategorized

ये मेल हमारा झू्ठ ना सच

– किरण लिमये
मी पेशाने किंवा हुनराने कवी नाही. पण कविता म्हणून जो काही साहित्यप्रकार आहे, तो मी वाचत आलोय आणि त्याबद्दल विचारही करत आलोय. अर्थात त्यात काही मोठे तीर मारलेले नाहीत. एकदम थोडक्यात म्हणायचं झालं, तर सध्या मी कविता वगैरे काही वाचत नाही, लिहीत नाही. माझ्या जीवनाच्या पुढच्या भागात जर मला बेफिकीर बेलाशक कलंदरी लाभली नाही, तर कदाचित माझा आणि कवितेचा संबंधही येऊ नये. मला त्यापेक्षा अधिक नशीली एन्टरटेनमेन्ट फिक्शनमधून मिळते.
तरीपण, माझ्या एका कोपऱ्याला असं सगळं झाल्याची चुटपूट राहील.
या सगळ्या प्रकाराकडे स्युडो-बौद्धिक आणि स्युडो-पोएटिकली बघण्याचा प्रकार.
***
मी हे लेखसदृश काही लिहायचं ठरवलं, तेव्हा लक्षात राहिलेली शेवटची ओळ अशी होती की : be a poet even in a prose.
हे सगळं मी सांगायला सुरुवात केली, ती या पावसाळ्यात, आणि माणसांनी दबाबा भरलेला ह्या शहरात. लोकल ट्रेनमधून आपल्यापुरता आडोसा केल्यागत मी उतरतो, तेव्हा मी विचार करतो : काही वर्षांपूर्वी आपल्या जागी जो माणूस होता, त्याला कविता कुठे कुठे तरी सापडत होत्या. आता सापडत नाहीत. काही केल्या सापडत नाहीत. आणि सापडल्याच, तरी लहानपणचं एखादं खेळणं एकदम घरातल्या एखाद्या कोपऱ्यात पडलेलं हाती लागल्यावर जितपत ओलं-कोरडं वाटेल, तितकंच वाटतं.
काय म्हणावं या अवस्थेला?
लोक तर लिहिताहेत कविता. आणि चर्चासुद्धा होते जोरजोरात. मी विस्मित कुतूहलाने निरीक्षणतो.
मला कोणती ओळ आठवते कवितेची?
‘तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार सोडूनी मी जाईन दूर गावा’ आठवते, किंवा ‘ह्या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा, अजस्त्र धांदल, क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा… …थांब जरासा वेळ तोवरी, सचेतनाचा हुरूप शीतल, अचेतनाचा वास कोवळा,, उरे घोटभर गोड हिवाळा…’
मर्ढेकरांच्या या ओळी मला का आठवतात?
एक म्हणजे दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात, एकदम शेवटा-शेवटाला ही कविता होती. दहावीचं वर्ष हे एकूण सगळ्यात पाचर मारल्यासारखं आहे. म्हणजे आधी कसं, कोणीतरी शाळेत लोटून दिलं. मग त्या उथळ पाण्यात सूर मारून पुढे येईयेईतो दहावीच आली. आणि मग बाकीचे सगळे एकच चर्चा करायला लागले, पुढे काय. आणि मर्ढेकर म्हणतात, की ‘थांब जरासा वेळ तोवरी’. त्याहीपेक्षा भारी ‘बुद्धदर्शन’मध्ये नेमाडे लिहायचे, ते घिरट्या घालत येणाऱ्या दुःखाबद्दल. दुःख काही नव्हतंच तेव्हा. थोडे उसासे होते, ते पुढे येणाऱ्या रंगांच्या तहानेत पटकन संपून गेले.
किंवा असं आहे. आपल्याला आपल्याशी बोलू देणारी  तरल हळवी वेळ मला दिसते. पण मी तिच्यात रमतो ना रमतो, तोच डिमांड-सप्लायच्या अक्राळविक्राळ हत्याराचे तिच्यावर होणारे घाव मी बघतो. त्या घावांतून बाहेर पडताना त्या वेळेचे विरत जाणारे सुख आठवत बसतो. मर्ढेकरांच्या ओळीत चक्रनेमिक्रमेण येणारा माणसांच्या गर्दीचा ठोका आणि त्यासरशी ठसठसत वाहणारी शहराची जखम. जाणिवेवर रोपलेल्या प्रत्येक दिवसासरशी मर्ढेकरांच्या ओळी माझा भाग बनतात.
***
पण मग अशा, आपल्या मनावर उमटून बसलेल्या, ओळींचं आपण काय करतो? त्या हळूहळू संप्लवन होत आपल्या हलकेपणात विरून जातात की त्यांच्यामुळे आपल्यात आणि आपल्या भोवतालच्या प्रतिमा-आवाजांच्या जगात एक पाचर मारली जाते? आणि आपण कायम बोटभर अंतरावरूनच जगाकडे बघत राहतो, कधीच त्यातले न होता?
असं होत असेल, तर कदाचित मला माझ्याकडे सहानुभूतीने बघता येईल.
***
म्हणजे साहजिक आहे, की नेहमी मला माझ्याकडे थंडपणे बघता येत नाही. एकतर मी हीरो शोधत राहतो किंवा कमनशिबी पोएटिक जिनियस, किंवा यांतलं काहीच नसलेलं दिवाभीत तरी. माझ्यातली अॅम्बिशन मला खदखदून हसते किंवा मला ओरबाडते. तिच्या वेटाळात मी घुसूही शकत नाही आणि तिच्याकडे अपरिचित पांथस्थाच्या नजरेने बघूही शकत नाही. प्राप्याच्या इच्छेचे फूत्कार छळत राहतात आणि त्याच वेळी ह्या सगळ्याचा दिशाहीन आवेश दिसू लागतो. हा एखाद्या खोल जाणिवेचा तुकडा की घाबरट आकांक्षेचे बेगडी कवच? मला उमजत नाही.
पोएट्स असतात का अॅम्बिशिअस?
अॅम्बिशन आणि कविता काही साथ-साथ जाणार नाही असं वाटतं. म्हणजे शब्दचमत्कृती बनेल शड्डू ठोकून आली, तर थोड्या कारागिरीने तिला कविता असंही म्हणता येईल. योग्य प्रयत्नांनी कवितेच्या ओळी कुठल्याही विषयाचा ठाव घेऊ शकतील. इट कॅन बी अ स्टोरी ऑर इव्हन अ पिक्चर. बट ओन्ली पार्ट ऑफ इट विल बी अ पोएम.
त्याहीपेक्षा असं वाटतं, की कुठचीही आकांक्षा आणि कविता यांत मूलभूत फरक आहे. आकांक्षेला पुढे पुढे जाण्याची अविश्रांत गरज आहे, कविता वाहत्या रस्त्याच्या बाजूने सावकाश चालण्याची किंवा उभी राहण्याची शक्यता जास्त आहे. कवितेत द्वेष नसलेलं आणि टाहो फोडणारं ममत्व नसलेलं कनवाळू बघेपण आहे. ती काही विरक्त नाही. पण असोशीने प्यावं हा तिचा शिरस्ता नाही. किंबहुना उराशी तहान ठेवून तृप्तीला न्याहाळावं, असं थोडं आहे. म्हणजे असोशीच्या, क्षण क्षण भोगण्याच्या झपाट लालसेची तिला ओळख नाही असं नाही. पण असोशीचा झाकोळ तिच्यावर टिकणारा नाही. भोगून उरलेल्या क्लांत जाणिवेचं, केवळ पाहण्याचं आणि त्या पाहण्याशी जोडलेल्या शोकात्म अनाकलनीयतेचं – आणि कवितेचं नातं अधिक जवळचं आहे.
म्हणजे असं मला ‘आत्ता’ वाटतं, कवितेचा विचार करताना. आधी वाटायचं, की कविता काहीही असू शकते : श्रद्धांजली, प्रेरणागीत, शोक, प्रपोज आणि आक्रोश. पण आता तसं वाटत नाही. आता वय वाढलं किंवा द्राक्षं आंबट झाली.
***
महत्त्वाकांक्षा असलेली माणसं स्वतःचं डिप्रेशन लपवत राहतात आणि बाकीच्यांना महत्त्वाकांक्षेत आणि पर्यायाने येणाऱ्या विसंगतीत ढकलत राहतात. मग एकतर तुम्हांलाही आपल्या किंवा इतर कोणाच्या महत्त्वाकांक्षेची दोरी धरायला लागते किंवा टक्क उघड्या डोळ्यांनी बघत राहावं लागतं. उगाच नाही, एवढी माणसं प्रेरणेची नवी नवी नशा शोधत बसत.
मला जमत नाही. अगदी जोरदार डोस दिला प्रेरणेचा, तरी तो कधी ना कधी उतरत जातो आणि मला गर्दीत चाचपडणारे जीव दिसतात. स्टेशनच्या गर्दीला जोखत जोखत बेलाची पानं विकणाऱ्या आणि गालावर रेषांची जाळी झालेल्या आजी; “दहा मिनिटं विकू दे,” म्हणून पोलिसापाशी गयावया करणारा इडलीवाला; आपल्या मुलाला पाठुंगळी मारून लोकल ट्रेनमधून हॉस्पिटलात घेऊन जाणारी, हैद्राबादी हिंदी बोलणारी पिचलेली बाई; फुगे विकणाऱ्या १५-१६ वर्षांच्या मुलासोबत स्वतःला फुग्यांनी पूर्ण झाकून त्यांच्या मधल्या हलत्या फटींतून बागेकडे बघत चालणारा लहान भाऊ आणि त्याला चुचकारून रस्ता सांगणारा पुढचा मुलगा; बादलीभर पाणी आणि लोकल ट्रेनच्या नजरा यांत आंघोळ करणारी बाई; इअरफोन घालून इकडून तिकडे जाणारे लोक; दुमडून दुमडून वाचले जाणारे पेपर; एकमेकांना स्पर्शू पाहणारे लोक; एकमेकांना ढकलू पाहणारे लोक; एकमेकांना फॉरवर्ड होणारे मेसेजेस्‌; बोलून बोलून बुळबुळीत सवयींवर अव्याहत सरकणारे संबंध…
माझं वाचणं आणि एकामागोमाग एक कशाचाही विचार करणं हे लोकल ट्रेनमध्ये होतं. ती माझी फ्रेम ऑफ रेफरन्स.
दररोज सकाळी मी घाबरून उठतो. आपल्याला थोडाही उशीर झाला; तरी तेज-तर्रार, क्षणा-क्षणाला काय करायचं हे पक्कं माहीत असलेली माणसं स्टेशनला आपल्या अवतीभवती जमतील आणि मग त्यांच्या सोबत स्पर्धा करून लोकलच्या डब्यात शिरताना किंवा त्यांच्यासोबत प्रवास करताना, आपलं त्या सगळ्या लोकांत फोल, पोकळ असणं स्पष्ट होईल.
मग मी होईल तितका लवकर प्रवास करतो. प्रवास नाही; नुसता जातो इकडून तिकडे. बहुतेक जण पेंगत असतात. आणि डब्याच्या दारातून हळूहळू प्रकाश आत येत असतो. आणि मग उरलेल्या हिरवळीची बेटं लागतात.
या हिरवळीच्या बेटांची किंवा खारफुटीची एक स्पष्ट व्हिज्युअल आठवण आहे. मी चांगदेव पाटीलची गोष्ट वाचून संपवली, तेव्हा लोकल ट्रेन खारफुटीजवळ यायला सुरुवात झालेली. बहुतेक, मला नीट काही झेपलं नसावं. लोकलच्या सरकत्या डब्यांच्या बाहेर दिवसाचा शेवटचा निवत जाणारा लख्ख प्रकाश, त्यात विलक्षण चमकणारी खारफुटी. कॉलेजच्या कृपेने मी फर्स्ट क्लासमधून येत होतो. डब्यात थोडीच माणसं. मला जागेवर बसवेना आणि काय करावं समजेना… नुसतं भरसटून गेल्यागत. मग मी दरवाज्यात उभा राहून नुसताच बाहेर बघत राहिलो. मुंबई फुगायचे सुरुवातीचे दिवस असल्याने माणसांचे लोंढे खारफुटीला लागले नव्हते. समोरच्या हिरव्या जिवंततेत काय दडलं आहे आणि तिच्या दलदलीत काय संपलं आहे ह्याचं उत्तर अजून मिळालं नव्हतं. दिवसाचा प्रकाश संपत चाललेला. सगळा राखाडी दिवस आणि अंधाराचं बीज असल्यागत त्याला ओढणारी खारफुटी. सावकाश हे सारं शोषलं जाईल अंधारात – या प्रतिमा, हे आवाज, हे शब्द, हे जर-तर… मग काय?
आता खारफुटी आकसून गेली आहे. तिच्यात शिस्तबद्ध चाळी आणि इमारती उभ्या आहेत. त्यांच्यात राहणारी आणि संचय करण्याच्या अनिवार्य लढाईत मागे पडलेली माणसं चेवाने लोकल ट्रेनची वाट बघत उभी असतात. अंधार-प्रकाश, पाऊस-उघडीप, सगळं सगळं आपल्या इच्छेच्या दाबाने रोंदून त्यांची रोरावती तहान सगळ्याला भिडलेली आहे. त्यांच्या लाटेतून, त्यांच्या संतत चालीतून उरलेली-बचलेली खारफुटी निश्चल आहे. तिच्यातले पक्षी, तिच्यातला चिखल. हे सगळं एका शाश्वत नाशाची वाट पाहत उभं आहे, त्यांच्या किंवा शहराच्या नाशाची. एकतर ‘जिवंततेचे अर्घ्य’ किंवा पूर्णविराम. तरी मध्येच एखादा किंगफिशर उडतो, रंगाचा रसरशीत तुकडा; आणि पुढे हगायला बसलेल्या लोकांची रांग.
दिवसाच्या सुरुवातीला आपसूक येणाऱ्या नव्हाळीच्या निश्चलतेने मी पाहतो, आपण यात नाही याचा सुस्कारा टाकतो आणि इअरफोन लावून आवाजाच्या भिंतीचा पारदर्शक पडदा टाकतो.
***
कवितेच्यात आणि माझ्यातही असाच एक पारदर्शक पडदा आलेला आहे. मुळात आता मी कविता कमी वाचतो, नाहीच जवळ-जवळ. वाचतो, तेव्हाही अनेकदा केवळ त्यांना न्याहाळल्यासारखं.
तरी एकदम एकेकदा काही ओळी मिळतात.
रघुनंदन त्रिवेदी यांच्या ओळी शेअर केलेल्या कुणीतरी. नेमक्या ओळी आठवत नाहीत. पण त्या ओळींचा अर्थ असा होता, की घर म्हणजे ती जागा – जिथे आपण बाहेरच्या जगातून थकून येतो आणि जिथे थकलो की बाहेरच्या दुनियेत जातो.
मी संध्याकाळी लोकल ट्रेनच्या गर्दीत स्वतःला चिरडून घेत असतो, तेव्हा मला या ओळी आठवतात. आपला वेगळेपणा किंवा सरसकटपणा चाचपून बघायला मी माझ्या आजूबाजूचे लोक बघतो. बसल्या-बसल्या पेंगणारे, किंवा स्मार्टफोनमध्ये गुंतलेले, गाणं ऐकणारे पुरुष; खिडकीला लगटलेले नशीबवंत आणि ओळखीचा कळप बनवून शिळोपा करणारे पुरुष; आणि त्यांच्या नजरांत, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या फोनमध्ये अध्येमध्ये येणाऱ्या बायका.
मला माझा एक काडेपेटीवजा कोपरा हवाहवासा वाटतो. पण दारातून आत गेलं की जाणवतं, आपण कुठलाही तळ नसलेल्या एका आवर्तात आलो; सवयीच्या, उबेच्या आदिम दोराने आपण यात तगून राहू. पण या आवर्ताची जाडसर, दाट घनता आपल्याला बेहोश करून सोडेल. आपणही त्या गर्दीचे सवयसक्त वाहक होऊ. मी एस्केप रूट्स चाचपू लागतो. तिथे कविता नसतात, तिथे असतात मुलाखतवजा प्रश्न : व्हेअर डू यु सी युअरसेल्फ फाइव इअर्स डाऊन द लाईन?
आय डोन्ट नो सर, आय फकिंग डोन्ट नो.
***
केव्हातरी काहीही माहीत नसण्याच्या अधांतरावर निवांत तोलले जाणारे आपले मित्र सेटल व्हायच्या, जबाबदारीच्या, ‘काय दिवस होते यार!’ प्रकारच्या गोष्टी करतात.
आधी केव्हातरी कवितांच्या ओळी वाचून दिवसांचे रिकामे लोट ढकलले जायचे. आता दिवस एकेकाला चिरडत जातात, मध्ये मध्ये फेसबुक शेअरएवढी व्हेकेशन ठेवून. कवितांची ओळसुद्धा नसते एकेकदा.
मध्ये मी एका मित्राला आक्रसत जाणाऱ्या हिरवळीबद्दल बोललो तेव्हा माझ्याकडे कुतूहलाने पाहत तो म्हणाला, “एक तर तुला – किंवा मला – वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. मला तू म्हणतोस हे कधीच दिसलेलं नाही.”
मग आम्ही हसत हसत आपापले पेग संपवले.
***
मला असं दिसतं; की माणशी उरून राहणारी, बौद्धिक-सामाजिक प्रतलांच्या पलीकडची कविता ही आपल्या माणूस म्हणून असणाऱ्या दुःखाच्या भोवती राहणारी, त्याच्याकडे बघणारी किंवा त्याला नेमकी शोषू पाहणारी चीज आहे. केवळ सवयीने चिकटलेले, किंवा आदिम पाशवी वारसा म्हणून आलेले भयगंड झुगारून पाहण्याची ओढ तिच्यात आहे आणि ह्या ओढीच्या अंती अटळपणे येणारा रिकामा, निर्दय असा अर्थहीन प्रवास आहे. कधी या प्रवासाला ती मूक धैर्याने सामोरी जाते, तर कधी प्रवासाच्या अथांग विवशतेला शारीर सुखांच्या नशेने तोलू पाहते – कोसळण्याच्या बेचिराख ओढीने. आणि तिचं हे केंद्र विचारांनी, शब्दांनी व्यक्त होण्याच्या पलीकडचं आहे. त्याची सिद्धता नसली, तरी प्रचीती आहे; पण ती निखळ वैयक्तिक आहे. एकाने दुसऱ्याला सांगता यावं अशी ती बाब नाही. आपण आपल्यात खोल खोल जावं अशी बाब आहे. कोणी याला सत्याची प्रचीती म्हणतील, तर कोणी धावायच्या अगोदरच हातपाय गाळलेली निराशी विफलता. आपण व्याख्या सोडून देऊ, आपण शब्दही सोडून देऊ. हे माणसांच्या धगीने जळणारं शहर, हे जगण्याच्या धुराने कोंदटलेले रस्ते सोडून देऊ. आपण एकमेकांचे हातही सोडून देऊ.
दृग देख जहाँ तक पाते हैं,
तम का सागर लहराता है,
फिर भी उस पार खड़ा कोई
हम सब को खींच बुलाता है,
मैं आज चला, तुम आओगी
कल, परसों सब संगी-साथी,
दुनिया रोती-धोती रहती,
जिसको जाना है, जाता है,
मेरा तो होता मन डग-मग
तट पर के ही हलकोरों से,
जब मैं एकाकी पहुँचूँगा
मंझधार, न जाने क्या होगा!
इस पार, प्रिये, मधु है, तुम हो
उस पार न जाने क्या होगा!
***
पण अंतिमतेच्या या भावनेने काही दिवस विस्कटून गेले, तरी आपण परत हळूहळू अर्थाचे आणि कृतीचे ठिपके जुळवू लागतो. आणि कधी कधी त्या लयीत बेभान होतो, त्यातच कुठेतरी निखळून जातो. पण तसं बेभान होता आलं नाही, की आपल्याला नवी नवी सोंगं रचावी लागतात आणि स्वतःला गंडा घालायचं कसबही जमवावं लागतं. मग जबाबदारी, किंवा सामाजिक संवेदना किंवा उतरंडीच्या वरच्या वरच्या पायरीवर जायचा हरदम नवा खेळ. शो मस्ट गो ऑन.
***
कोलटकर, ढसाळ, मनोहर ओक, मर्ढेकर. मुंबई आणि कविता अशा दोन गोष्टी एकत्र केल्या की मला ही नावं आठवतात. मला त्यांच्या कविता आठवतात; मुंबईबद्दल असलेल्या, नसलेल्या. मी त्यांना ७.३२ च्या बदलापूर लोकलमध्ये सोडलं, तर त्यांचं काय होईल? एकामागोमाग एक फिरणाऱ्या दिवसांच्या चक्रात, गर्दीत आपला कवडसा सांभाळत, आपल्या पोरा-बाळांना गर्दीच्या तटस्थ निश्चल निर्दयी भोवऱ्यातून बाहेर काढण्याचं गाजर पकडून धावणाऱ्या लोकांच्या कोलाहलात मला वाटतं, की आपण एका निखळ निरर्थक किनाऱ्याशी येऊन पोचलो आहोत आणि आपल्या भोवती पुरेपूर भरून राहिलेल्या स्तब्ध कुरुपतेत सौंदर्याचे, जाणिवेच्या खळाळत्या नशेत झोकून देण्याचे पुंजके इमॅजिन करणं एवढंच आपल्या हातात आहे. आपले-परके असे सारे दोर तोडून छलांग घ्यायला उभे तर आहोत आपण, पण समोर काहीच नाही. एवढ्या वर्षांच्या संचित आठवणींनी, निष्कर्षांनी आपल्याला एवढं ठाम कळलं आहे, की आपल्यासमोर काही नाही. आपण छलांग मारायची आणि आपल्या निर्वातात कोसळत जाण्याला विसरण्यासाठी पर्पज नावाची नशा करायची. असंच आहे का? असं नाही, तर काय आहे?
***
कविता आणि आपलं रोजमर्रा जगणे ह्यांना एकत्र पाहणंच चुकीचं आहे कदाचित. पोएम इज अ फ्लॅश ऑफ ब्युटी. जगण्याला समजून घेण्यासाठी किंवा जगणं बोटभर सरस करण्यासाठी कविता नसते. इट एक्झिस्टस् टू ट्रा न्स द एक्झिस्टन्स.
आपल्या भोवतीच्या संदर्भांच्या साऱ्या खुणा पुसून आपण आपलं सांगणं ट्रासेंड करतो कवितेत.
आपले आई-बाप, आपले मित्र, आपले साथी, आपले कोणीही नसलेले, आपली प्रेयसी, आपली आणि बाकी कोणाची शरीरं, आपल्या शरीरातून बनलेली नवी शरीरं, आपल्याशी काहीही जिवंत धागा नसलेल्या आपल्याभोवतालच्या जिवंत वस्तू, नुसत्याच वस्तू, किंवा नुसतंच असलेलं – जशा आठवणी किंवा न घडलेले भूतकाळ भोगायची तहान – सारं सारं ट्रांसेंड.
हे शहर, ह्या शहराचे मिणमिणते आणि चकाकते कोपरे, उसासे, आरोळ्या, हाका, हुंदके आणि शांततेचे कवडसे.
सगळं सगळं कवीच्या असण्यात विरघळून उरतात कवितेच्या ओळी आणि असली तर त्यांची लय.
***
इतक्या सगळ्या वैयक्तिक घोळात, काही वाटणं, त्यातल्या काहीचे शब्द होणं आणि सारं वाटणं केवळ केवळ निरर्थाचा चाळा आहे असा त्याचा कंटाळा येणंही. त्याच्यामध्ये मी स्वतःला एका जागी स्थिर तरंगवत ताडू पाहतो, की आत्ताच्या घडीला माझ्या आयुष्यात कवितेचं काय आहे?

 

अत्यंत ऑकेजेनल रोल. केव्हातरी लोभस चकाकीसारखी सापडणारी. मी कवितासंग्रह विकतसुद्धा घेत नाही. कारण त्यातली बहुतेक पानं मला दिसतही नाहीत. पण मी याला माझा प्रॉब्लेम मानतो.

 

पण तरीही अशा काही वेळा असतात, जेव्हा जे वाटतं त्याची ट्रॅंक्विलिटी (मराठीत काय म्हणतात?!) कदाचित कविताच पकडू शकेल. आणि माणसाला वाट्याला येणाऱ्या अशा वेळा एवढीच कवितेची स्पेस.

 

***

 

गुर्जरांच्या ‘गांधी मला भेटला’ या कवितेवर झालेल्या वादात  मला हा एकच प्रश्न भंडावत राहिला होता, की हे जे लिहिलं आहे त्याला कविता का म्हणावं? ज्या प्रश्नाचा बौद्धिक काथ्याकूट करता येतो, तो प्रश्न कवितेचा नाही असं मला वाटतं. गोड आध्यात्मिक निष्कर्ष किंवा निष्फळ पराभूत सुस्कारे वाटणं हेही कवितेचं नाही. अशा गोष्टींच्या कविता ह्या मासलेवाईक बनून राहतात. योग्य प्रसंगी घालण्याच्या दागिन्यासारख्या.

 

कवितेला बौद्धिक चाळणी लावण्याचं धाडस मी करतोय आणि ते मुळात चुकीचं आहे. अर्थात चूक किंवा बरोबर काही नसतंच किंवा सापेक्ष असतं असं मानण्याच्या फझी रेषांवर आपण येऊन ठेपलो आहोत.

 

पण शेवटी मी माझ्यासाठी निवड करतच असतो.

 

‘गांधी मला भेटला’ ही कविता नाही, कवितासदृश अभिव्यक्ती आहे अशी मी तिची वर्गवारी करतो.

 

कोणी काय बोलावं किंवा काय बोलू नये, याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे. कुणालाही काहीही बोलू द्यावं. आणि अशाने फार कचकचाट होतो असं वाटत असेल, तर प्रत्येकाच्या बोलण्या-लिहिण्याची किंमत काढावी. जितका ज्याचा सार्वत्रिक भल्यात वाटा, तितकी त्याची बोलण्याची मुभा.

 

कविता, म्हणजे आपल्या जगण्याकडे बघण्याचं निखळ वैयक्तिक एक्स्प्रेशन. तिला  सार्वजनिक अशा कुठल्याच चौकटीत जस्टीफाय करता येत नाही, म्हणजे मला करता येत नाही. असं करायला हिरीरीने धावणाऱ्या लोकांची मला गंमत वाटते.

 

माझ्या लेखी लिखाण हे एकतर सभोवतालचा अधांतरी गोंधळ विसरून दिवस ढकलण्याची लिहिणार्‍याची आणि वाचणार्‍याची सोय असतं किंवा त्या गोंधळाला आपल्यापुरता बांध घालण्याची सोय तरी असतं. त्याची दर्जानुसार उतरंड ही एकदम काल्पनिक गोष्ट आहे. पण लिखाणाला घेऊन समाज, देश वगैरे बुरुज सर करणाऱ्या लोकांची गंमत न्यारी असते. आपण स्वतः स्कॅव्हेंजर असताना बाकीच्यांच्या शुचितेच्या अशा परीक्षा घेणं मला विसंगत वाटत आलं आहे. अर्थात आपला तो जीवनानुभव आणि बाकीच्यांचं ते स्कॅव्हन्जिंग असंपण असतंच.

 

***

 

व्याख्यांचे, अधिकारांचे आणि चूक-बरोबरचे कधीही न भरणारे अतृप्त डोह मागे टाकले, की या शहराचे किनारे लागतात. तेच किनारे, जे केव्हातरी समजेच्या मर्यादित प्रकाशात जादुई उजळले होते. आज त्यांना शहराची वेडगळ हद्द येऊन भिडली आहे. त्या हद्दीच्या तुटक तुटक रेषा एकमेकांशी झोंबी घेत नव्या नव्या टिंबांना जन्म देताहेत.

 

माझा नॉस्टॅल्जिया आणि माझा काल्पनिक भूतकाळ या दोघांची याच किनार्‍यावर एकमेकांशी अदलाबदल झाली होती. इट वॉज सनसेट, आय रिमेम्बर. आणि मी ‘संध्याकाळच्या कविता’ वाचत होतो.

 

नंतर माझं ते पुस्तक हरवून गेलं. आधी त्या पुस्तकाची पानं कोरीकोरी होत गेली. मग हळूहळू सारं पुस्तक एकदा एका दिवसाने गिळून टाकलं. मी त्या दिवसाच्या मिटत्या जबड्यात हात घातला खरा, पण माझ्या हाताला सगळ्या समीक्षा लागल्या.

 

***

 

मला परत कधी कविता सापडेल का? की मला माझी थेरपी फिक्शनमध्येच शोधायला लागेल? मी तसंच करतोय. द वर्ल्ड रिटेन्स सम सेन्स ओन्ली इन द फिक्शन. एरवी आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल इतकं इतकं काही माहिती होऊन गेलंय, आणि आपल्याला जिथे काही माहिती नाही, तिथे हे माहीत नसणं हीपण एक प्रकारची माहितीच आहे किंवा कोणीतरी मुद्दामून ती माहिती लपवत असल्याने तेही आपल्याला माहीत होऊन जातच असतं. त्यामुळे हे सगळं कसं, काय बरं, काय वाईट या सगळ्यासाठी असलेल्या तोडग्यांचं एक सुपरमार्केट. आणि वर त्याचं अव्याहत मार्केटिंग.
आणि मग एवढे सुराग असतात प्रत्येक थिअरीला, की परत विश्वास वापरूनच आपल्याला निवडावं लागतं. मग नेमकं बदललं काय? की आधी आपण आंधळे होऊन धडपडत होतो आणि आता बघत बघत खड्ड्यात जातोे, असं?

 

म्हणजे असं आहे, की एकेकदा मला ‘है लिये हथियार दुश्मन…’ वगैरे वगैरे पाठच होतं. मी अगदी नीट छातीशी हात घट्ट बांधून वगैरेपण तसं म्हणू शकायचो. तेव्हा मी सौमित्रच्या कवितापण म्हणू शकायचो – ‘ह्या कविता फक्त कविता नाहीत’ किंवा ‘तू ह्या शहरात आहेस’ असं…

 

पण मध्ये एकदा मी परत आरशासमोर उभा राहून ‘है लिये हथियार दुश्मन…’ असं म्हणत होतो, तर चहूकडून माझीच प्रतिबिंबं मला हसायला लागली. ‘दुश्मन कोण ते तर सांग आधी!’ म्हणाली ती मला. आणि एक झिंज्या वाढलेली प्रतिमा म्हणाली, की ‘दुश्मनीएवढी डोळस निवड नाही. मैत्री तर कुणी गांडूपण करेल. तू कोण?’

 

मग बाकी कविता वगैरे नोंदवलेल्या वह्या मी एक दिवस रद्दीत टाकल्या. सोबत ओशो, विवेकानंद.

 

मी आता रँडमली उत्सुक राहतो, की शब्दांचा एखादा कवडसा चकाकतो का आपल्या वाटेत; किंवा एकेकदा इच्छेखातर त्यांना चुचकारतो. पण मी चुकूनही कसल्याही अर्थाच्या वाटेला जात नाही. इट्‍स डेंजरस.

 

पण ज्या काही वाटेला मी लागतो, तिथे कुणीतरी अस्पष्ट आवाजात बोलत असतं – एखादा जुन्या ओळखीचा, पण हरवलेला आवाज. किंवा प्युअर इमॅजिनेशन ऑफ द पास्ट.

 

या इथे झाडांना उदासीन करणाऱ्या संधिप्रकाशात
       मी जेव्हा ईश्वरी करुणांची स्तोत्रे म्हणू लागतो
        मावळतीला, शेवटच्या किरणांची फुले समुद्राच्या
        दिशाहीन पाण्यात बुडून जातात… कुठे जातात?

 

***

 

बरेच दिवस मी जिथे अडकून पडलो होतो, तिथून मी एकदाचा पळून निघालो. त्या वेळी मला माझ्या पुस्तकांचे काही गठ्ठे मागे सोडून द्यावे लागले. नाहीतर पळून जाणं शक्यच नव्हतं. त्या मागे राहिलेल्या पुस्तकांत कोलटकर ह्यांची ‘भिजकी वही’ होतं, मनोहर ओक ह्यांच्या ‘ऐंशी कविता’ आणि ग्रेसच्या ‘संध्याकाळच्या कविता’.

 

मनोहर ओकांच्या पुस्तकाला त्यांच्या मित्राची प्रस्तावना किंवा सुरुवात होती, बहुतेक तुळसी परब.

 

त्या प्रस्तावनेचा अर्क मनात राहिला आहे तो असा : जगण्याला कुठलाही धड आकार येण्याची खटपट सुरू केली की कवी संपलाच. मग तो तडजोड आणि विसंगती ह्यांच्या दातेरी चक्रात सापडलाच. या सगळ्याच्या बाहेर राहून जगणं नाका-तोंडात जाऊन त्यात बुडून मरायची तयारी हीच कवी असण्याची किंमत. ज्या क्षणी कवी असणारी माणसं स्वतःला दातेरी चक्रात नेतात, त्या क्षणापासून ती कवी म्हणून संपतात. त्यानंतर ते कवीसदृश पुनरावृत्ती करणारे बनतात. दे आर नो मोअर पोएट्स.

 

आपली काहीही औकात नसताना एकदम समीक्षकी सत्याचा आवेश. पण मला हे समीक्षकी सत्य म्हणून नकोय. माझ्या मनातली क्वेस्ट आणि माझ्या स्वतःच्या लिखाणातलं बरं-वाईट समजून घेण्याची चाहत यांमुळे मी लिहिणाऱ्या माणसाच्या आयुष्याबद्दल विचार करत राहतो.

 

***

 

आपण कवी आणि माणूस असं वेगळं करून पाहिलं पाहिजे का? म्हणजे भूमिका वगैरे घेणारा माणूस आणि कवी असं? म्हणजे मग भूमिका वगैरे घेणारं कवितासदृश लिखाण आणि कविता असंही वेगवेगळं करून ठेवलं पाहिजे का?

 

भूमिका वगैरे घेणाऱ्या, जगाची बऱ्या-वाइटाच्या उतरंडीत विभागणी करणाऱ्या लोकांबद्दल मला पूर्ण आदर आहे. त्यांचं कन्व्हिक्शन मला कायम अप्रूपाचं वाटत आलं आहे. आणि हे कन्व्हिक्शन, किंवा मूल्यश्रद्धा, ही कप्प्यात टाकण्याची गोष्ट नाही. ही त्या माणसाला पूर्ण व्यापून बसणार. त्याची प्रत्येक हालचाल रंगवणार. ‘एव्हरीथिंग इज पोलिटीकल’ म्हणतात, तशी. अशी माणसंही कविता लिहितात. पण त्या कविता, कविता किती आणि समविचारी लोकांशी साधायचा संवाद किती असतात? मी स्वतःला अशा कवितांच्या बाहेर पाहतो. कारण अशा कवितांत एक गोष्ट असते, ती म्हणजे सामूहिक आवेश.

 

एक वेळ अशी होती, जेव्हा मला सामूहिक आवेशाचं प्रचंड आकर्षण होतं. कदाचित अजूनही आहे. पण त्याच्या मर्यादा आणि साईड-इफेक्टस मला आता अधिक जाणवतात. आणि त्यामुळे आपल्या सामूहिक आयडेंटिटीज्‌ना घेऊन येणाऱ्या कविता हळूहळू त्यांचं जादुई वलय हरवत जातात.

 

उदाहरणादाखल ‘कोलंबसाचे गर्वगीत’. तिच्या बहुतेक ओळी मला अजूनही पाठ आहेत, कारण ती पाठ्यपुस्तकातली कविता. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ या ओळींचा विचार करताना असं जाणवतं, की ‘ध्येयासक्ती’ ही मुद्दामून जडवून घेतलेल्या व्यसनासारखी असते. ती नसेल, तर काय असेल ह्या प्रश्नाचा छुटकारा.

 

त्यापेक्षा टेनिसनची ‘युलिसिस’ मला मध्ये-मध्ये आठवते – विशेषतः आपण आता नव्या, तरुण जगात निरुपयोगी होणारे ठरणार आहोत असं वाटताना.

 

***

 

(माझ्या लेखी) कविता ही पूर्णत: वैयक्तिक प्रतलावरची गोष्ट आहे. तिच्यात एकच एक आयडेंटिटी आहे, माणसाची, एकदम एकदम पारदर्शक होत जाणाऱ्या माणसाची. दुसरी कुठलीही आयडेंटिटी आलीे, की कविता कविता उरत नाही, ती प्रचारकी साहित्य होते. आणि ही आयडेंटिटी सामाजिक भूमिका किंवा तत्त्वांचीही असण्याचीे गरज नाही. शब्दचमत्कृतीचे विक्रेते किंवा गाण्यांच्या तालावर शब्द फिट करणारे लोक ह्यांना अनेकदा आपण कवी म्हणायचं टाळतो, ते कदाचित याच अप्रत्यक्ष व्याख्येने.

 

पण म्हणजे लयीत, यमकात काही आलं की कविता नसतेच का?

 

हा कूटप्रश्न आहे. आणि माझ्यालेखी ह्याचं उत्तर ‘असं जरुरी नाही’ असं आहे. पण यमक, किंवा छंद हि कवितेची मूळ गरज नाही. मूळ गरज आहे पाहणाऱ्या माणसाला दिसलेलं आणि कुठल्याही विकाराच्या पलीकडे जाऊन उभं असलेलं काही. त्याला सत्य वगैरे म्हणावं का हे ज्याच्या-त्याच्यावर सोडावं.

 

रागावलेले, खिन्न झालेले, सोकावलेले, दारुण दुखावलेले, कुठल्याही भावनेवर हाय झालेले, हे सारेही लिहितात. एक वेळ अशा कविता साठवत होतो. आता त्या आठवतही नाहीत.
***

 

बघणाऱ्याच्या तरल होत जाणाऱ्या जाणिवेएवढाच महत्त्वाचा घटक म्हणजे काळाचा संदर्भ. माणसाच्या जगण्याकडे बघण्याची जेवढी माध्यमं आपण वापरत आलो आहेत, ती सगळी कालनिरपेक्ष आणि कालसापेक्ष अशा दोन्ही घटकांनी बनलेली असतात. एकाने दुसऱ्याला सांगण्याची थरथरती इच्छा कदाचित कालनिरपेक्ष आहे. पण सांगायची तऱ्हा कालनिरपेक्ष नाही. मर्यादा पडलेली जुनी माध्यमं आणि सांगण्यासाठी येणारं नवं-नवं ह्या दोहोंमधल्या ताणात सांगण्याची तर्‍हा आहे. आणि त्यामुळे ती बदलत जाते, कारण आपल्याला सतत नवं-नवं गवसत जातं.
***

 

पण मागच्या ३० वर्षांत मला जे नवं गवसलं आहे, त्याचा विचार करताना मला जाणवतं की :

 

 1. माणसाचा स्पर्श नसलेला भवताल ही गोष्ट माझ्यासाठी कृत्रिम आहे. मी एक निखळ शहरी माणूस आहे.
 2. माणसाच्या वागण्याच्या साऱ्या गोष्टी आता नियमांच्या किंवा अनुमानशीलतेच्या साच्यात बसलेल्या आहेत. आपल्याला न गवसलेलं किंवा न समजलेलं असं फार थोडं आहे; जसं पीडोफाईल व्यक्ती.
 3. बऱ्याच गोष्टींबद्दल थोडं थोडं कळूनसुद्धा आपल्याकडे बरीच माहिती आहे. हळूहळू अधिकाधिक लोकांना ही माहिती उपलब्ध होते आहे आणि ह्या माहितीबद्दल बोलायची सोयही त्यांच्यापाशी आहे. त्यामुळे लोक प्रचंड प्रमाणात बोलू-लिहू लागले आहेत.
 4. प्रत्येकाने प्रत्येकाला बोलू द्यावे ह्यापलीकडे आपल्याला काहीही सामाईक मिळालेलं नाही. शेवटी निर्णय हे आपल्याला गट फिलिंग आणि विश्वास यांवरच विसंबून घ्यावे लागतात. अनिश्चिततेचा तोडगा काही आपल्याला सापडलेला नाही.
ह्या सगळ्याचा कवितेशी काय संबंध?
मोठा आहे.
कविता आणि सौंदर्य ह्यांना जोडणारे आणि विलग करणारे सारे पूल ओलांडून आपण पलीकडे आलो आहोत. आणि आता आपल्यासमोर मोठा रिकामा प्रश्न आहे. हे सगळं काय, याचा.
***
समजा आपण आधी असलेल्या सगळ्या कविता नष्ट करून टाकल्या, तर काय होईल? आपलं मोठं नुकसान होईल, की आपण नवं शोधण्याच्या चुत्याप खेळातून मोकळे होऊ?

 

आधीचं सगळं साठवून ठेवायच्या भावनेने केलेला मोठा झांगडगुत्ता, म्हणजे ‘मग माझं नवं काय?’ हे झवतं गाढव.

 

सिनेमे, पुस्तके, कविता ह्या सगळ्यांच्या जुन्या ओळखीने असं होतं की नव्याची किक निघून जाते. काहीही नवं घडताना प्रेडिक्टेबिलीटी आपल्याला सारे शक्य पर्याय सुचवत राहते.

 

वे आउट इज टू फरगेट किंवा नशेचे मार्ग बदलत राहणं.
***

 

मला माहीत आहे, की हे सगळं चूक ठरू शकेल. हा स्वतःला निगर्वी वगैरे म्हणवून घेण्याचा प्रकार नाही. सवयीने किंवा रॅशनल निवड म्हणून मला माझ्या सभोवतालाशी जमवून घ्यावंच लागेल. आणि एकदा का मधली चिडचिडी निर्वातता संपली, की मला परत एकदा कवितेचा नाद लागेल.

 

किंवा माझी निवडीची हौस संपून मी समोरच्या सगळ्याकडे निव्वळ बघणारा होईन. आय विल सेक्युअर द सीट टू लेड बॅक अँड वॉच. मला तेव्हा वाटेल का कवितेबद्दल काही?
***

 

काही ओळी आहेत, ज्या मला माहीत आहेत, एवढंच मला नोंदवून ठेवायचं आहे. त्यांच्यात दडलेला रोमान्स मला भिरभिरं करून गेला, पण तो जगण्यासाठी मांसल सुखाच्या पार जाणं जमेजमेपर्यंत तो हरवूनही गेला.

 

Tell me, if I caught you one day
and kissed the sole of your foot,
wouldn’t you limp a little then,
afraid to crush my kiss?…
***
कोणी एक कवी आपल्या कविता एका ट्रंकेत ठेवून मरून गेला होता. मागाहून कोणीतरी त्या शोधल्या. ही निवड की बेफिकिरी?

 

आपण जाणीवपूर्वक लिहिताना समीक्षेच्या पलीकडे काय लिहू शकतो? आपण कॉन्शसली कविता लिहू शकतो?
काय प्रकारचं जगलं म्हणजे एखादा माणूस कवी बनतो?
***

 

माझे चतकोर प्रश्न आणि माझे सुट्टे-सुट्टे एकामागोमाग गेलेले दिवस.

 

केव्हातरी रोमारोमात जमलेलं हे ओळखीचं शहर सोडून नव्या वाटेला लागावं असं वाटून घेत, मी रस्त्यावरून चालत असतो. मला कोणाचा द्वेष वाटत नाही, काही हवंहवसंही वाटत नाही. या शहराची दमट हवा बोचकारत नाही. इट्स फन टू वॉक.

 

ओळी आणि पुढचे-मागचे दिवस एकमेकांशी जुळून येण्याच्या इच्छांना स्मरून :

 

ये धूप किनारा शाम ढले,
मिलते हैं दोनो वक़्त जहाँ,
जो रात ना दिन, जो आज ना कल,
पल भर को अमर, पल भर में धुआं

 

इस धूप किनारे पल दो पल
होठों कि लपक बाहों कि खनक
ये मेल हमारा झूठ ना सच क्यों रार करें,
क्यों दोष धरें किस कारण झूठी बात करें
जब तेरी समंदर आंखों में
इस शाम का सूरज डूबेगा
सुख सोयेंगे घर दर वाले
और राही अपनी राह लेगा

 

***
चित्रश्रेय : आदूबाळ
कविता : १. हरिवंशराय बच्चन २. ग्रेस ३. Nichita Stanescu ४. फ़ैज अहमद फ़ैज

 

***
Facebook Comments

2 thoughts on “ये मेल हमारा झू्ठ ना सच”

 1. खूप सुंदर सर…

  समिधामधील सुंदर ओळी…
  माझ्या अंत:करणातील सुंदर सुगंधी स्वप्ने फुलांच्या रुपाने वेली साकार होतात.
  त्या स्वप्नांचा मी संचय करतो फ़ूलांचा नव्हे!
  कोण असतो कवी? एकोणविस वर्षाचा गावठी, मराठी सेमी अर्बन हिंदी अन् मेट्रोपोलिटन इंग्लिश मध्ये भरकटलेला मी काय बोलणार? सगळेजण कल्पनेच्या सागरात न्हालेले अन् मी आता कुठे जुहुच्या चौपाटीवर पोहोचलोय! पण खरच कोण असतो हा कवी? लता दीं च्या त्या 'मेरी आवाजही पेहचान है', ह्या गाण्याप्रमाणे शब्दांनी ओळखल्या जाणार्‍या अन् त्यांचीच घोंगडी पांघरुन काळोख्या रात्री 'जागते रहो', म्हणणारा गुरखा तर नसेल ना?
  परवा असच वेब सफरींग करताना कवी शिवमंगल सिंह सुमन ची कविता सापडली-
  फकत यह जानता
  जो मिट गया वह जी गया
  मूँदकर पलकें सहज
  दो घूँट हँसकर पी गया
  सुधा-मिश्रित गरल
  वह साकिया का जाम है
  चलना हमारा काम है।
  कदाचित अनंत काळापर्यंत शब्दातुन कल्पनातुन चालणारा पथिक असेल कदाचित तो…

 2. कवितेच्या रूढ व्याख्येच्या पलीकडची कविता पकडू बघतो आहे लेखक असं वाटलं. आणि महानगरीय आधुनिक सोशलनेटवर्किंगपछाडित आयुष्य. आणि खेरीज कविता. तिच्यासोबतचे – बिघडलेले नको म्हणायला – पण बदललेले संबंध. वेगळीच आहे शैली. अस्ताव्यस्त, पण हातातला धागा न सोडणारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *