Uncategorized

इतिहास

– Arnika


गेल्या वर्षी माझ्या भारतातल्या आणि इंग्लंडमधल्या शाळांबद्दल ‘शाळा-शाळा’ नावाची मालिका लिहायला घेतली होती. त्यातल्या नांदी, गणित, विज्ञान आणि भाषा ह्या विषयांनंतर आज इतिहासाबद्दल लिहिते आहे.इतिहास. भारतात काय किंवा इंग्लंडमधे काय, इतिहासामुळे कोणाचा अभिमान कधी ठेचकाळेल आणि कोण कधी दुखावलं जाईल ह्याचा नेम नसतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशा हिशोबाने पिढ्यापिढ्यामधून घरंगळत येणारा तो विषय आहे. सनावळ्यांशी, वादविवादांशी, भावनांशी जखडलेला, पण  शाळेत जाण्याआधीपासून माझ्या अत्यंत आवडत्या विषयांपैकी एक. भारतातल्या शाळेत त्या तासाला चित्र काढत बसता यायचं, परीक्षेच्या आदल्या दिवशी पाठांतर करून काम भागायचं म्हणून, आणि इंग्लंडच्या शाळेत इतिहास कसा ‘शिकायचा’ ते शिकायला मिळालं म्हणून!


‘छोट्या शिवबाला जिजाऊंनी रामायणातल्या गोष्टी सांगितल्या’ असं बिंबवताना त्याच शिवबाच्या राज्यात धान्याची किंमत दहा वर्षं बदलली नव्हती हे शिकवायला विसरणारा एकीकडचा इतिहास. दुसरीकडे दुसऱ्या महायुद्धात चर्चिलचे गोडवे गाऊन नंतर ‘शांततेत देशाचं नेतृत्त्व करायला चर्चिल योग्य नव्हता असं तुम्हांला वाटतं का?’ असा बिनधास्त प्रश्न विचारणारा इतिहास! एकीकडची पुस्तकं आम्हाला अभिमान पाजायला उत्सुक आणि दुसरीकडची पुस्तकं, ‘एकाच पुस्तकाला कधीही भुलायचं नाही’ हा धडा द्यायला! ते दोन्ही इतिहास शिकतानाची ही गोष्ट…


“It’s quite interesting, we’re learning about the Battle of Britain.” नववीत इंग्लंडच्या पहिल्या-वहिल्या इतिहासाच्या तासाला जाताना अलेक्सा मला म्हणाली. मी नुकतीच जालियनवाला बाग़ हत्याकांड, भगतसिंगची फाशी अशा आठवीच्या भारतीय इतिहासातून बाहेर पडत होते. ज्या देशाच्या छळवादामुळे माझं आठवीचं इतिहासाचं पुस्तक भरलं त्या देशाच्या इतिहासाविरुद्ध मी असहकार चळवळ पुकारायचं ठरवलं होतं. वर्गात गेल्यावर मला जागेवर बसवत मिसेस कार्टर म्हणाल्या, “काय फरक वाटतोय तुला भारतातल्या आणि इंग्लंडच्या इतिहासाच्या वर्गात?


“आम्ही बाकांवर बसतो, टेबलभोवती गोल करून नाही बसत!” नजरेत भरलेली पहिली गोष्ट मी कशीबशी इंग्लिशमधे सांगितली. त्यावर मिसेस कार्टरनी सहज दिलेल्या उत्तरात किती किती अर्थ लपले होते ह्याचा मी पुढे खूप दिवस विचार करत राहिले! आणि पुढे कितीही इतिहास ऐकला तरी हे एक वाक्य त्या सगळ्याचा पाया आहे हे जाणवलं. माझ्याकडे थेट बघत मिसेस कार्टर म्हणाल्या होत्या,  “हं! रांगेने बाकांवर बसवली की जास्त मुलं वर्गात मावतात खरी, पण इतिहास हा चर्चेचा विषय आहे… सगळ्यांची तोंडं एकाच दिशेला असून कशी चालतील?”


तो तास फार पटकन आवडीचा झाला. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास, त्या काळी युरोपमधे झालेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक उलाढाली असे विषय होते. तेव्हा प्रश्न विचारण्याइतपत त्या इतिहासाची माहिती मला नव्हती. युरोपमधले सगळे देश नकाशात ओळखून रंगवताही येत नव्हते (तेव्हा युरोप भूभागाची मी कागदावर केलेली वाटणी त्या-त्या देशांच्या नेत्यांनी पाहिली असती, तर तिसरं महायुद्धही सुरू होऊ शकलं असतं)! पुस्तकात युद्ध आणि लढायांबद्दल शिकतानाही त्या काळी विज्ञान, साहित्य, कला, भाषा, अन्न, पैसा या सगळ्यांचा इतिहास कसा बदलत गेला हे कळत होतं. ज्याला जो धागा जास्त जवळचा वाटत होता त्याबद्दल जास्त वाचन करून आम्ही एकमेकांना शिकवत होतो. मिसेस कार्टर मदत करत होत्या.


त्या शिकण्या-शिकवण्यात कोणत्याही व्यक्तीला देवत्व नव्हतं. व्हिक्टोरिया राणीला नाही, युद्धात देश चालवणाऱ्या चर्चिलला नाही, भावनेच्या भरात युद्धाच्या गोष्टी लिहिणाऱ्या पत्रकारांना नाही किंवा इतिहासात दोन पदव्या असणाऱ्या मिसेस कार्टरना नाही! सगळ्यांना एकमेकांबद्दल बरी-वाईट मतं असण्याची आणि ती चांगल्या शब्दात मांडण्याची मुभा त्या वर्गात होती, याचंच मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटत होतं…


कारण भारतात इतिहासाच्या तासाबाबत काही गोष्टी आम्ही लवकर शिकलो. वर्गात फार प्रश्न विचारायला जायचं नाही. स्वाध्यायांना न पडणारे कुठलेही प्रश्न स्वत:ला पडू द्यायचे नाहीत.  कारण ‘देशासाठी बलिदान दिलेला एक धडाडीचा नेता जिवंतपणी देशासाठी दसपट कार्य करू शकला असता ना?’ असा प्रश्न एकदा वर्गात आम्ही विचारला होता, तेव्हा आमच्या पिढीला देशाचा कसा अभिमान नाही हे सरांकडून ऐकण्यातच तो तास संपला. कोणी केलेल्या गोष्टींना कर्तृत्व म्हणायचं, कोणी केलं ते बलिदान, कोणी केला तो अन्याय म्हणायचा आणि कोणी केलं त्याला बंड म्हणायचं असा रेडी-मेड मेन्यू  शंभर पानांत बांधून दर वर्षी ‘अभ्यासाला’ असायचा. तो तास बिनबोलत घालवला की सहज पार पडायचा.


तशाच सवयीप्रमाणे मी इंग्लंडच्या शाळेतही इतिहासाला बरेच दिवस शांत बसून होते. एक दिवस इतिहासाचे विभागप्रमुख डॉक्टर बॉनेटा वर्गात आले. शिकवता शिकवता ते म्हणाले, “आपण वाचतो त्या गोष्टी कितपत विश्वासार्ह असतात, तो इतिहास ज्याने लिहिला त्याचा नज़रिया काय असतो, हे आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे.”


“सर, मग तुम्ही शिकवता तो इतिहास विश्वासार्ह आहे असं कसं धरून चालायचं?” मिशेलने विचारलं. काय गहजब होतोय हे ऐकायला मी सरसावून बसले.
“बरोबर आहे, मिशेल. पहिली गोष्ट म्हणजे, इतिहासात काहीच ‘धरून चालायचं’ नाही.” सर कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाले. “तुम्हांला पुरावे आणि मतं पारखायला शिकवणं हे माझं काम आहे. पण माणूस तिथे पूर्वग्रह! त्यामुळे एखादा शिक्षक चांगलं शिकवत असेल, तर त्याच्या विद्यार्थ्यांना त्याचं म्हणणं खोडून काढणारे लेखही तो वाचायला सांगेल.” त्यांनी मिश्किल चेहऱ्याने आमच्याकडे पाहिलं.


“उद्यापासून महायुद्धाचा सगळा इतिहास जर्मनमधेच वाचायला घेऊया मग!” मिशेल म्हणाली, आणि वर्गात जबरदस्त हशा पिकला.


हळूहळू मलाही शिक्षकांनी या गप्पांमधे ओढलं.


“आपण महायुद्धांबद्दल बोलत असताना आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका मोठा इतिहास भारताने अनुभवलाय, हे अर्निका सहज सांगू शकेल.” असं  म्हणून त्यांनी मला वर्गात उभं करून दहा मिनिटं बोलायला लावलं. त्या सबंध तासाला सरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सांगितलं, तेव्हा एक मुलगी माझ्याकडे वळून म्हणाली, “I wouldn’t blame you if you don’t feel sorry for us about the World Wars.’’


रोमराज्याचा इतिहास शिकताना सर तेव्हाच्या समाजातल्या स्त्रीविषयी वाचून दाखवत होते. स्त्रियांना किती मान होता, त्यांचा व्यवसाय निवडायची मुभा होती, असे रोमन इतिहासकारांनी लिहिलेले खलिते अभ्यासाला होते. पुस्तक मिटत सर म्हणाले, “माझ्या लक्षात काय आलं सांगू? इतका जर स्त्रियांचा मान आणि आदर होता, तर यातलं काहीच कुठल्या स्त्रीने का लिहिलं नाहीये? त्यांना लिहिण्याचे अधिकार का नव्हते?” सर आम्हांला सहज विचार करायला लावत होते.


एक गोष्ट मात्र मला सतत खटकायची. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक कुटुंब पुन्हा एकत्र येत होती, घरं वसवत होती, जगण्याची घडी बसवत होती. पण हे सगळं पुस्तकात वाचताना, मिसेस कार्टरकडून ऐकताना फक्त मलाच उत्साह वाटत होता.


तीन महिने महायुद्ध वाचल्यानंतर बरं काहीतरी घडतंय, तरी यांना अभिमान वाटत नाही का? चर्चिलची युद्धकाळातली भाषणं ऐकताना शूर झाल्यासारखं वाटत नाही का? वक्तृत्त्व स्पर्धांमधे देशाच्या विजयाबद्दल दमदार भाषण करू देणारे विषयच कसे नसतात? आठव्या हेन्‍री राजाबद्दल बोलताना “He was all right, I suppose” असं कसं काय म्हणू शकतात सगळे? स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या झेंडावंदनाबद्दल वाचताना मला भरून यायचं तसं यांचं कसं होत नाही? तानाजीच्या कोंढाणा लढाईचा प्रसंग येऊच नये म्हणून मी पुस्तक लवकर मिटून ठेवायचे तसं यांना कधीच नाही का करावंसं वाटत? इतक्या सुंदर शिकवलेल्या इतिहासाबद्दल बोलताना इतकं निर्विकारपणे कसं बोलतात?


पण एकीकडे मी वॉरिकचा जुना राजवाडा आणि रॉचेस्टरमधलं सातव्या शतकात इंग्लंडमधे बांधलेलं चर्च बघत होते. किती कौतुकाने  आणि कष्टाने जतन केल्या होत्या त्या वास्तू! अवतीभोवती असा ‘जागता’ इतिहास पाहिल्यानंतर मोडकळीला आलेल्या शनिवार वाड्याचे, प्रतापगडाचे आणि जुन्या देवळांचे (मैत्रिणींच्या भाषेत exotic) फोटो त्यांना गूगलवर दाखवताना जाणवलं, की माझा अभिमान माझ्याबरोबर फक्त शब्द आणि सावली होऊन फिरत होता. आणि इंग्लंडमधे शब्दांनी “It’s all right” पर्यंतच पोहोचू शकलेला आभिमान वर्तमानातही इतिहास जपून ठेवायला मदत करत होता…


***
***

चित्रस्रोत: आंतरजालावरून साभार
Facebook Comments

1 thought on “इतिहास”

  1. हा लेख खूपच आवडला. इतिहासाकडे पाहण्याच्या अ‍ॅप्रोचमधला फरक अगदी नीट उलगडलेला आहे.

    बाकी लेखांचे कलेक्शनही जबरी आहे. असेच अजून येऊद्यात. अनेक धन्यवाद आणि तुमचा उपक्रम वर्धिष्णू राहो याकरिता शुभेच्छा !!!!

    -निखिल बेल्लारीकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *