Uncategorized

शटरबंद

– अमृतवल्ली

मला एखाद्याचा राग आला ना की खूप राग येतो. उगाच नाही आई मला चिडका बिब्बा म्हणते; पण आता मला पेअर फाकार्द या माणसाचा इतका राग आलाय, की इतका राग मला कोणाचाही येत नाही. राजूदादा म्हणतो, प्रत्येक गोष्टीचे पहिले तीन नंबर काढून ठेवावे म्हणजे ठरवायला सोप्पं जातं पण काय ठरवायला सोप्पं जातं, ते नाही सांगितलंय. भाव खाण्यामध्ये राजूदादा फार आहे अगदी. मी भावखाऊ लोकांमध्ये त्याचा नंबर पहिला ठेवलाय. तरी माझ्या तीन आवडत्या आज्या ठरल्यात आणि तीन माणसं ज्यांचा मला खूप राग येतो ते. एक म्हणजे रमाकाकू, कारण तीला मला सोडून पुण्याला चालली आहे. कायमची. आणि तिने मला हे सांगितलंसुद्धा नाही स्वतःहून. दोन म्हणजे अण्णा. बाबांचे मित्र असले म्हणून काय झालं? कोण एखाद्या मुलीला तिच्या बाबांची आई म्हणून तिलाच हाक मारतं? पण हे अण्णांना सांगणार कोण? गल्लीत कधीही आणि कुठंही मी दिसले की ‘काय मुकुंदाची आई’ असा मोठ्याने हाक मारतात, आणि तिसरी ती अनसूयावहिनी. साधं एक वाक्य बोलताना अनसूयावहिनी इतकी ऍक्टिंग करते की बोलताना फक्त तिचं जोरजोरात हालणार तोंड दिसतं आणि डोळ्यासमोर नाचणारे हात; पण वहिनी काय बोलते ते ऐकूच येत नाही. गल्लीतला गोठपाटलीणीचा छोटासा नातू, अक्षु आहे ना, तो ‘एक पाय नाचीव रे गोविंदा’ म्हटल्यावर कसं एक पाय आणि दोन्ही हात नाचवतो, अगदी तस्सं! तर या सगळ्यांचा मला जितका राग येतो त्याच्या कितीतरी पट जास्त राग मला पेअर फाकार्द या माणसाचा आला आहे. इतकं काही त्याने अभ्यासात दिवे लावण्याचं काही कारणच नव्हतं. या माणसामुळेच मला हे असं इतक्या सकाळी मागच्या दरवाज्याच्या खिडकीत बसावं लागतंय. आजीच भरतवाक्य का काय ते आहे ना, ‘कुठल्या जन्माचं नातं कुठं साथ देईल आणि कुठल्या जन्माचं वैर कुठं घात करील, काही सांगता येत नाही हो!’ त्यातला प्रकार आहे झालं. आता माझी सविताकाकू असली जन्माची नाती कुठेही भेटण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्याबरोबर रस्त्याने चालणं म्हणजे आमच्या गावातल्या रेल्वेसारखं आहे. आमच्या गावाजवळून जाणारी रेल्वे कुठेपण थांबते, म्हणून प्रसिद्ध आहे म्हणे. नुसतं “अग बाई! सुमनकरांची संध्या का तू”, “अग पमे..ओळखलं न्हाईस होय मला” सारखं काही तरी बोलून किती वेळा थांबेल, काही पत्ता नाही.परवा चक्क डोमगावच्या जत्रेतला विदूषक तिच्या ओळखीचा निघाला. ती लहान असताना तिच्या बाबांच्या बदलीच्या गावातला शेजारी होता तो. अख्खी सर्कस फुकट, वर बर्फाचा गोळा! आमच्या नशिबी मात्र जन्माचे वैरी फार! हा पेअर त्यातलाच एक.
“ए शटरबंद!” राजूदादाने खच्चून हाक मारली आणि सायकलवरून झरकन निघून गेला. त्याला मला चिडवण्याशिवाय येतं काय? कालपासून त्याने मला शंभरवेळा तरी चिडवलं असेल. इतके काही माझे दात पुढे नाहीयेत काय, आणि त्या दाताला क्लिपा लावण्यासारखे तर अजिब्बात नाहीत, पण आमच्या मातोश्रींच्या आणि नानांच्या मनात कोणी भरवलं काय माहीत? सरळ चाल करून यायच्याऐवजी राजा जयसिंगासारखं कोंडीत पकडलं. मामाच्या घरी सुट्टीसाठी गेले आणि क्लिपा लावूनच आले. तह करण्यावाचून पर्यायच नाही ठेवला. मला तर वाटतं, आई मागच्या जन्मीची दिलेरखान असावी. बरोबर डाव साधला तिने. तहाची कलमे द्यावी तशी त्या डॉक्टरबाईने एक यादी दिली. पोळी-भाकरी काही दिवस बंद, दाताने काहीही तोडून खायचं नाही, ऊस-पेरू तर दूरची बात. त्याच पुस्तकात या पेअर फाकार्द का बिकार्दचं नाव होत. कशाला याने शोध लावला या तारेचा! दाताबरोबर मलापण आवळून ठेवलंय त्याने.
आज सकाळची ट्युशन बुडवली. आई काही बोलली नाही, पण शाळा बुडवणं अवघड आहे. सगळ्यांना चुकवून बाहेर पडावं तर आज नेमकी इंदूआजी आली आहे. बाहेर जाताना शंभर तरी प्रश्न विचारेल. तिची बडबड म्हणजे आगीतून फुफाट्यात! तेव्हा आज लवकर शाळेत जावं हे बरं आताशी पावणेदहा तर वाजलेत. सव्वादहापर्यंत शाळेत पोहचू. मागच्या बाकावरच्या भागुमामीला पटवायला लागेल जागेच्या अदलाबदलीला. पटकन दप्तर भरलं आणि घराबाहेर पडले. समोरची रमाकाकू अंगणात उभी होती, पण ती काही बोलायच्या आत मी सटकन घराबाहेर पडले. तसंही मला तिच्याशी अजिबात बोलायचं नाहीय्ये. हा गनिमी कावा मी काकाकडून शिकलेय. शत्रूला कळायच्या आत पसार. आईच्या हाका येईतो मी गल्लीच्या तोंडाशी असणाऱ्या सावळ्याच्या वाड्यापाशी पोहचलेसुद्धा होते.
***
पहिले तीन तास अगदी निवांत गेले. मागच्या बाकावर का बसलीस, म्हणून आशुने विचारलं.. मी नुसतं हुं केलं. तोंड उघडायचं कामच नाही. अळीमिळी गुप चिळी. छोट्या सुट्टीतसुद्धा सगळ्या पोरींना सांगितलं. सांगितलं म्हणजे लिहून दाखवलं,‘मार्गशीर्ष महिना चालू आहे. माझं कडकडीत मौनव्रत आहे’. आमच्या वर्गातल्या काही पोरी नुसत्या ‘ह्या’ आहेत. त्यातली एक नमू. मला म्हणे ‘उद्यापनाला बोलव मला.’ फसक्कन हसणार होते, पण तोंड उघडलं तर पंचाईत. पण चौथ्या तासाला हिरोळीकर सरांनी घात केला. मी, पूजी, आशू आणि विदू म्हणजे सरांचा ‘अशांत टापू’. त्यातला एक मागं का बसला, म्हणून त्यांनी डौऊट खाल्ला. फुसकंसं गणित देऊन मला बरोबर उठवलं. न बोलावं तरी पंचाईत, बोललं तरी पंचाईत. पोटात नुसता गोळा आला. तोंडावर हात घेऊन नुसतीच उभी राहिले. किती वेळ उभं राहणार? आता तासाची घंटा झाली असती तर बरं झालं असतं. पण आजी म्हणते तशी ‘वेळ सांगून येत नाही’ हेच खरं. माझ्या चेहऱ्याकडे बघून आशुने मध्ये शंका काढायचा प्रयत्न केला. खरं तर असल्या चढाया करण्यात आशु हुश्शार, पण सरांनी दाद दिली नाही. म्हणाले, “अश्विनी, तू शांत बस. कुलकर्णी, बोला.तोंडावरचा हात काढा, स्पष्ट बोला.” शेवटी तोंड उघडलं आणि जे झालं ते झालंच! ‘अय्या…ईईई..तुझे दात..अर्रर्र.’ सगळीकडून आवाज आले. पूजी, आशीसुद्धा माझ्या दाताकडे पाहत बसल्या. वर्गातली सगळी पोरंपोरी फिदीफिदी हसली. पाठोपाठ सरसुद्धा! आता शेलारमामानेच पाठ फिरवली तर कसं व्हायचं!
शेवटच्या तासापर्यंत मी कोणाशी काही बोलले नाही. सारखं डोळ्यातून पाणी येत होतं. पूजीने ओढून तिच्या शेजारी बसवून घेतलं. डब्बा तर आणलाच नव्हता आणि दातही खूप दुखत होते. या सगळ्याच मूळ कारण म्हणजे तो पेअर फाकार्द का बिकार्द. इतका राग आला मला त्याचा की डॉक्टरीणबाईची तहाची कलमे काढून त्यातल्या फाकार्दला दाढीमिश्या काढायला सुरुवात केल्या.
शाळा सुटली तरी घरी जाऊच वाटत नव्हतं, पण पोटात कावळे ओरडायला लागले.थोड्या वेळाने ते बाहेर येतील असं वाटायला लागलं. मग डोकंही दुखायला लागलं म्हणून घरी गेले. घराच्या दारापाशी येताच मात्र खमंग येसाराची आमटी आणि मऊमऊ खिचडीचा वास आला. आमच्या आईचं हे असंय, शत्रू असली तरी तिला माझ्या गोष्टी अगदी बरोब्बर कळतात. घरी गेले तेव्हा आईचं ‘वेळच्या वेळी’ प्रकरण चालू होतं. हे काय आहे, हे एकदा विचारायला हवं. आई आणि धर्माधिकारी आजीच्या बोलण्यात किती वेळा ‘वेळच्या वेळी’ हा शब्द येतो हे मी मोजायचंच सोडून दिलं आहे. आतासुद्धा मी जेवताना, माजघरात बसून दोघींची खलबतं चालू झाली.
“हो ना, बरं झालं बाई वेळच्या वेळी ठरवलंस आणि घडवून आणलंस हो.”
“हो ना, या गोष्टी वेळीच झालेल्या बऱ्या.”
“हो ना! आमच्यावेळी कुठे असलं होतं. माझ्या पमीचं पाहिलंस नं! बरं तरी मुकुंदाच्या कुठे लक्षातसुद्धा आलं नसतं.”
“नाही तर काय! नाना होते म्हणून निभावलं हो.”
“सगळं जिथल्या तिथं हवं गं! दर महिन्याला जायचं का आता?”
“हो ना, त्याच्या वेळा पाळाव्याच लागतील ना”
“होईल हो! दोन-अडीच वर्षांचा तर प्रश्न आहे. पण जन्माचं कल्याण होईल. बर्र, मग आपलं झुंजुरमासाचं काय करायचं? जाऊ या का या आठवड्यात?”
“ते जाऊच हो! अहो, पण आपल्या रमेचं काय करायचं? बोलला का तुम्ही भाऊजींशी?”
रमाकाकूचं काय? तिच्याविषयी काय बोलतायेत या दोघी? शत्रूची खलबतं चालू असताना कान देऊन ऐकावं; त्याशिवाय त्यांचे मनसुबे कसे कळणार? असं केल्यानेच महाराज सुटले ना आग्र्याहून. गुपचुप पिंपाच्या मागे जावं तोपर्यंत आई म्हणाली, “पोट भरलं असेल तर जरा रमाकाकूकडे जाऊन ये. सकाळपासून तीनदा येऊन गेली तुझ्यासाठी.” खरंतर कोणाला सुगावा न लागता बहिर्जी नाईकासारखं मांजराच्या पावलांनी फिरता आलं पाहिजे. पण आईच्या पाठीला डोळे नसतानाही, मी नेमकी काय करते हे तिला कसं कळत कोण जाणे. आता असं आईनेच म्हटल्यामुळे काही न बोलता उठले आणि सरळ रमाकाकूच्या घरी गेले. आमच्या वाड्याच्या समोरच धर्माधिकाऱ्यांचा वाडा आहे. त्यांच्या वाड्याची एक मज्जा आहे, घोड्यावरून थेट आत जाऊन लगेच घरात उतरता यावं, म्हणून तिथे देवडी आहे. याला म्हणतात हुशारपणा. रमाकाकूने ती छान रंगवली आहे आणि त्याच्यावर बोरूने रांगोळी काढली आहे. मी गेले तेव्हा त्या देवडीच्या जोत्यात बसून रमाकाकू काहीतरी काम करत होती. जवळ जाऊन पहिले तर ती केशराच्या काडीने तांदूळ रंगवत होती. प्रत्येक तांदूळ अर्धा पांढरा आणि अर्धा केशरी. दरवर्षी राजाकाकाच्या वाढदिवसाला रमाकाकू तिचा तो जगप्रसिद्ध केशरभात करणार म्हणजे करणार. गेली तीन-चार वर्षं तर काका नाही तरीसुद्धा. भाताचं झाकण पडलं की आमच्या माडीतसुद्धा त्याचा घमघमाट सुटणार. अख्ख्या गल्लीत तिच्यासारखा स्वयंपाक कोणी करत नाही. महाराज असते तर तिला मुदपाकखाना की काय, त्याचा प्रमुख केलं असतं. आमच्या आजीला आणि तिला मिळून हजारभर तरी पदार्थ येत असतील. आधी कसं व्हायचं, एकदा नैवेद्य दाखवला की लगेच जे काय केलंय, ते काकू आमच्या घरी आणि आजी काकूच्या घरी पाठवणार म्हणजे पाठवणार. गणित सुटल्यावर मी न् पूजी उत्तर एकमेकांना सांगतो तसं! खरंतर तिच्या मागे जाऊन मी तिचे डोळे झाकणार होते, पण ती मला अजिब्बात आवडत नाहीय्ये. आमचं गुप्त भांडण चालू आहे. तीसुद्धा दुसरीकडेच कुठेतरी टक लावून पाहत होती. हाताने काम सुरू होतं पण लक्ष भलतीकडेच. तांदळाचा एक-एक दाणा बरोबर अर्धा केशरी रंगवत होती. हल्ली काकूचं हे नेहमीचं झालंय. जवळ असली तरी जवळ आहे, असं वाटत नाही. तिला बघून मला कधी कधी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आठवण येते. तिच्यासारखीच काकू छान दिसते पण बोलत नाही की हसत नाही. मेण्याचा पडदा सरकवल्यावर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला काय वाटलं असेल? घाबरली असेल? महाराज जा म्हणाले तरी कुठे जाणार होती ती? तिचा नवरा, घरचे कुठे आहेत हेसुद्धा तिला माहीत नव्हतं. काकूचं पण तसंच आहे का? मला असं वाटतं, ते मी कोणाला सांगू शकत नाही. आमच्या घरचे ठोक देण्यात अव्वल. मागे एकदा वरच्या अंगणात सगळे गप्पा मारत असताना मी असंच बोलता-बोलता म्हणाले की, “मी तुझ्यापोटी जन्मले असते तर तुझ्यासारखीच सुंदर झाले असते.” तेव्हा आईने दुष्टपणे एक सूक्ष्मसा चिमटा जोरात काढला होता. तो चिमटा आठवून, मी तशीच तिच्याशी न बोलता परत घरी आले.
***
गेले पंधरा दिवस मधूनच माझे दात खूप दुखातायेत. हळूहळू पोळी खायला येतीये, पण एकदम बारीक बारीक तुकडे करून. एक घास ३२ वेळा चावायचा, तसा एका पोळीच्या तुकड्याचे ३२ घास करायचे आणि मग ते ३२ वेळा चावायचे. ३२ गुणिले ३२. कधी संपायचं कोण जाणे. जेवायचं काही नाही हो, पण सगळे वेगळेच वागत आहेत. आजी माझं जेवण होईपर्यंत माझ्याशेजारी बसून राहते; बाबा नेहमी आईस्क्रीमला नाही म्हणायचे, आता मुद्दामून खायला घालतात. किती दुखतं त्यांना काय माहीत! पूजी, आशी, विदू सोडल्या तर शाळेत मी जास्त कोणाशी बोलत पण नाही. बोलायला लागलं तर दाताकडे येडच्याप पोरी नुसत्या बघत बसतात आणि शंभर प्रश्न विचारतात; ब्रॅकेट्स दाताला कशाने चिटकवतात? ती तार स्टीलची आहे का? दात किती आत जाणार? किती दिवस पीन लावणार? सारखं-सारखं बोलून कंटाळा आला मला. ताप नुसता! पण या सगळ्यापेक्षा वाईट मला कशाचं वाटत माहीत आहे? आमच्या गल्लीतला तो अक्षु हल्ली माझ्याकडे येतसुद्धा नाही. आधी कसा, मी दिसले की पळत-पळत यायचा. मी जिथे जाईन तिथे मागे-मागे यायचा. आता माझ्याकडे पाहिलं की घाबरून त्याच्या आईच्या कडेवरून खालीसुद्धा उतरत नाही. आता तो माझ्याकडे कधीच येणार नाही. हे सगळं पीन लावल्यामुळे झालंय. काही कारणच नव्हत मला पीन लावायचं. इतके काही नाहीच आहेत माझे दात पुढे. सहज म्हणून आईने मला कावरा डॉक्टरकडे नेलं. त्या डॉक्टरीणबाईने पीन लावायच्या आधीच्या आठवड्यात तोंडात कसलं तरी गारेगार सिमेंटसारखं काहीतरी भरलं. थोड्या वेळाने ते अख्खंच्या अख्खं जबड्याचा साचा म्हणून बाहेर काढलं आणि आई, नानांच्या समोर ठेवलं. तो साचा बघून आईच्या चेहऱ्यावर ‘मूर्तिमंत’ की काय म्हणतात, तशी काळजी पसरली. आता माझे दात पुढे आहेत, त्यात माझी काय चूक? दुधाचे दात पडल्या-पडल्या तुळशीखाली पुरले होते. किती वाटलं तरी जीभ अजिबात पडलेल्या दाताच्या जागी लावली नव्हती. तरी असं झालं? असं म्हणतात की धर्माधिकाऱ्यांच्या पमीताईचे दात पुढे होते म्हणून तिचं लग्न उशिरा झालं. म्हणजे माझे दात आत गेल्या-गेल्या या लोकांना माझं लग्न करायचं आहे की काय? पळूनच जाईन मी. रामदासस्वामी झिंदाबाद!
आमच्या घरी आज झुंजुरमासाची गडबड चालली आहे. पानागावच्या आक्काच्या शेतात यंदा गूळभेंडी लावला आहे म्हणे. दुपारच्या जेवणानंतर निघालो तर पाऊण तासात पोहचू. संध्याकाळी हुरडा पार्टी आणि उद्या पहाटे झुंजुरमासाचे जेवण. बाजरीची भाकरी, उकडहंडी, गव्हाची खीर न् काय काय. मला काही खाता यायचं नाही ते सोडा. पण उर्सेकारांच्या मालकीची नदी आहे म्हणे. मागच्या वेळेस गेले होते तेव्हा आक्काच्या सोनीने दाखवली होती. मोठ्ठेच्या मोठ्ठे काळे-काळे मऊ-मऊ दगड आहेत आणि त्यांच्यामधून वाहणारी येवढुशी नदी. पावसाळ्यात पूर येतो तिला. मी काय पहिला नाही बुवा. त्या मोठ्या काळ्या दगडांनापण पीन लावणार का ही माणसं? कोणी वेडंवाकडं आडवं-तिडवं बसायचंच नाही. परेडच्या तासाला म्हणायला गेलं तर सगळे एका रांगेत बसतात पोरंपोरी, पण नंतर मागच्या रांगेतल्या, शेजारच्या रांगेतल्या पोरापोरींशी बोलायला लागले की आपोआप थोड्या वेळाने तिरकी-तिरकी होतात. तेव्हा सगळे किती छान दिसतात. शिंदेसरांनी एक शिट्टी वाजवली की धपाटे खायच्या भीतीने सगळे पीन लावल्यासारखी एका रांगेत सरळ. परेड सीधा देखेगा, सीधा देख.
तेवढ्यात राजूदादाची सायकल जोरात आवाज करत येऊन थांबली. दादाने जोरात एक टपली मारली आणि म्हणाला, “ए शटरबंद, ऐकू येत नाही का तुला? इंदूआजी केव्हापासून तुला हुडकतीये. तिने तुला मोठ्या आरशाच्या खोलीत बोलावलंय. जा लवकर आणि रमाकाकू चालली आहे उद्या पुण्याला. कितीदा बोलावलं तिने तुला. जाणार नाहीस तिला भेटायला?” आमच्या घरात एकटं बसायची काही सोयच नाही. आजीचं बरोबरच आहे “माणसं हैत का कोण!”
ती आमची मोठ्या आरश्याची खोली म्हणजे जंजाळच आहे. मोठी मोठी दहा तरी गोदरेजची आरशावाली कपाटं उभी आहेत. काही एकमेकांना खेटून, काही एकमेकांसमोर. कपाटात सामान, कपाटावर सामान. गाठोडी, डबे, पातेली, भांडी, गाद्या, उश्या. मागे पाहिलं की पसारा. आरशात पाहिलं की पसारा. महाराजांच्या सगळ्या तलवारी, भाले आमच्या या खोलीत मावले असते. इथे एका कोपऱ्यातल्या टेबलावर एक छोटी तोफसुद्धा आहे. नंतर कळलं की तो आजोबांचा पानाचा डब्बा आहे म्हणून. मला तो केव्हापासून कंपासबॉक्स म्हणून हवा आहे. पण आजी देईल तर शप्पथ. वर गेले तर इंदूआजी आरशासमोर ठाण का काय ते मांडून बसली होती. मी मात्र आरशात पाहिलेलं अजिबात चालत नाही. बारीक लक्ष असतं तिचं. जरा केसांचा जुटू बांधायला जास्त वेळ लागला की मागून आवाज आलाच. “पोरीच्या जातीने आतापासूनच इतकं नटणंमुरडणं बरं नव्हे” आणि आता चक्क आरशासमोर. सुधारली वाटत आजी. तिने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली,
“ये, समोर आरशात बघ. आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या घराण्यात एक मूळपुरुष होऊन गेला. दत्तोजी कुलकर्णी त्याचे नाव.”
“युगपुरुष म्हणायचं आहे का तुला?”
“चोमडेपणा करू नकोस. अशाने पुढची गोष्ट मुळीच सांगायची नाही मी.”, आजीने सूक्ष्म धपाटा घातला.
“तर सांगत काय होते, हा दत्तोजीराव तुझ्या त्या शिवाजी महाराजांच्या सैन्यात चाकरीला होता.”
“काय सांगतेस! म्हणजे माझ्या खापरच्या खापरच्या खापरपणजोबांनी शिवबाला पाहिलंय?”
“हो, आणि नुसता चाकरीला नव्हता तर सैन्यात पराक्रमही गाजवत होता. पण मग एका लढाईत मोगलांचे वार झेलता झेलता जखमी झाला. हातापायाच्या जखमा तर नंतर बऱ्या झाल्या, पण दोन दात तुटले ते तुटलेच. त्याच्या कामगिरीवर खूश होऊन राजांनी आपल्या नागठाण्याचं वतन तर त्याला दिलेच पण..”
“पण महाराजांनी तर वतनदारी पद्धत बंद केली होती ना, मग?”
“”ऐकणार आहेस का तू? अगं त्याला वतन मिळालं म्हणूनच आपलं शेत आहे नं नागठाण्याला, मग? हां तर, वतनाबरोबर त्याचे तुटलेले दोन दातपण सोन्याचे करून दिले. दत्तोजीराव हसले की त्याचे सोन्याचे दात चमकत असत. पुढे दत्तोजीने खूप मोठा पराक्रम गाजवला. तर सांगायचा मुद्दा असा की बाळा, माणसाने त्याच्या अंगच्या गुणाने पुढे जावं. आपण कसे दिसतो, यामुळे काय फरक पडतो? शिवाय जसे आई, बाबा, आजी, मी तुझे आहोत; तशी तू जशी आहेस तशी आमची आहेस. आहेस की नै? आहेस ना, मग हास बरं एकदा.”
दत्तोजीराव कुलकर्ण्यांच्या सोन्याच्या दातानंतर माझ्याच दातावर पीन. आरशात बघून मला एकदम हसूच आलं. इंदूआजीपण हसायला लागली. तिचाही कडेचा एक दात पडला आहेच की. आरशात पाहिलं तर दाताची पीन बहारदारपणे चमकत होती.
***
मग संध्याकाळपर्यंत शेतात आम्ही खूप मज्जा केली. मला न विचारताच आईने पूजीला आणि आशीला हुरड्याला बोलावलं होतं. उर्सेकारांच्या नदीच्या कडेच्या काळ्या दगडांना कोणी सरळ केलं नव्हतं. राजूदादा मला चक्क नावाने हाक मारत होता. मला पेरू आणि बोरं खाता येत नव्हती तर आशीने त्याच्या लहान-लहान बारीक फोडी करून दिल्या. नदीच्या येवढुश्या पाण्यासाठी आम्ही वाळूचं धरण बांधलं आणि शेतात उर्सेकारांच्या बैलगाडीतून लांबपर्यंत भटकून आलो. अजून काय पाहिजे? राजूदादाला बैल हाकता येतात हे माहीतच नव्हतं मला. त्याने जराही भाव न खाता माझ्या हातात दावणी दिली आणि बैलांची हाक्क्क.. हुर्रर्रची भाषापण शिकवली. बैलाच्या शिंगांना कात्रजच्या घाटातल्या बैलांसारखे पलिते बांधायला मात्र त्याने ठाम नकार दिला.
शेतातल्या मामांनी रात्री हुरड्यासाठी खळगा बनवला आणि मस्तपैकी शेकोटी पेटवली. गरमगरम गूळभेंडी आणि त्याच्याबरोबर ढीगभर चटण्या तयार. आमच्या गल्लीतल्या बायकांचं हे असंय, चटण्या म्हणजे चटण्या.शेंगदाण्याची, तिळाची, सुक्या गाजराची, दोडक्याची.कडीपत्त्यालापण सोडलं नाही. मध्ये नाही का, एका सुट्टीत लोकरीच्या शाली आणि प्लास्टिकच्या चिमण्या करायला घेतल्या होत्या. तेव्हा आजी म्हणते तसं, जळी स्थळी काष्ठी पाषाणी चिमण्याच चिमण्या आणि आता, चटण्याच चटण्या.
सगळ्यांना हुरडा आणि मामांनी केलेला चहा देऊन देऊन पाय तुटायची वेळ आ?ली. खाश्यांची चांगलीच पळापळ झाली. बाबांचे गल्लीतले मित्र एकीकडे, आजी आणि तिचं भजनी मंडळ दुसरीकडे आणि आईचा खलबतखाना तिसरीकडे. रात्र झाली तरी सगळे अगदी निवांत गप्पा मारत बसले होते. कोणालाच कसली घाई नव्हती. शेकोटीच्या प्रकाशात सगळे कोणीतरी वेगळेच लोक आहेत, असं वाटायला लागलं. मी, आमच्या घरचे, राजूदादा, रमाकाकू, गल्लीतले लोक कुठेतरी लांबच्या प्रवासाला निघालो आहोत आणि रात्रीपुरता आम्ही शेतात मुक्काम ठोकला आहे, असं काहीसं. शेवटी यांचं बोलणं ऐकायला मी इंदूआजीच्या मांडीला लोड करून बसकण मारली. थोडा वेळ हे सगळे भगवंताचा उत्सव, उद्याच्या झुंजुरमासाचा शिधा यावर बोलत होते; नंतर नंतर मात्र मला ते काय बोलत होते, ते कळेच ना म्हणून मी मस्तपैकी पाठीवर झोपून ताऱ्यांकडे पाहायला लागले. हे तारे आपल्यापासून हजारो प्रकाशवर्षं लांब असतात म्हणे. राजूदादा म्हणे, एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश जेवढा लांब जाईल तेवढा. आता प्रकाश कधी लांब जातो का? विचारलं तर म्हणे मला कळायचं नाही ते. असल्या अवघड गोष्टी करण्यात राजूदादा एकदम पटाईत. हे तारे जोडून जोडून आम्ही आमची आमची चित्रं तयार केली आहेत. आमच्या वेगळ्या राशी. या नवीन राशी तयार करता करता, आधी मिटलेले डोळे उघडले तर माझं डोकं रमाकाकूच्या मांडीवर होतं. मला बरोब्बर कळलं ते. ती माझ्या केसातून हळूहळू हात फिरवत होती. इतका मऊ हात तिचाच. खूप वेळ झाला होता आणि माझ्या अंगावर पांघरूणसुद्धा आलं होतं. शेजारीच आई, आजी आणि इंदूआजी होती. धर्माधिकारी आजी दिसत नव्हत्या. त्यांचा फक्त आवाज येत होता. काकू काहीच बोलत नव्हती, का तिला काही बोलावं असं वाटतच नव्हतं. धर्माधिकारी आजी म्हणत होत्या, “रमे, तुझं हित जाणूनच तुला पुण्याला पाठवतीये गं मी. तू मला पोटच्या पोरीसारखीच. माझाच मुलगा करंटा. सोन्यासारखी बायको सोडून निघून गेला. कुठे असेल नसेल, एक भगवंताला ठाऊक. राजा घरातून निघून गेल्याला चार वर्षं झाली. तुझ्यासारख्या गुणी मुलीच्या असं नशिबात यावं, यासारखं दुसरं दुर्दैव काय!. माझ्या मुलाने जे केलं त्याची भरपाई म्हणून बघू नको; तुझी आम्हाला काळजी वाटते म्हणून बघ. पुण्याला गेलीस की तुझं तुला उमजेल. मोठ्ठं मुलींचं कॉलेज आहे. रहायची सोय आहे. पुढचं शिक तू. सुट्टीला इथे ये. आईचं घर म्हणून ये. तू जशी आहेस तशी आमची आहेस बघ.” असं नि काय काय. बाकीचं कोणी काही बोलत नव्हतं. माझी आई, आजी, बाबापण. मी जागी झालीये ते कोणाला दिसत नव्हतं. मलासुद्धा कसंतरी झालं. घशात काहीतरी अडकल्यासारखं. अडकून अडकून एकदम घसा दुखायला लागला. काकूला उठून सांगावंसं वाटलं, ‘तू माझीच आहेस. तुला वाटलं, तर आमच्या घरी ये राहायला; नाहीतर आपण दोघी मिळून जाऊ पुण्याला.’ काकूच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने माझ्या आईकडे पाहिलं. मला वाटलं, आई काहीतरी म्हणेल पण आईने तिचा हात नुसताच हळूच धरून ठेवला आणि त्या दोघी एकमेकींकडे नुसत्या बघत राहिल्या. रमाकाकूला कळलं असेल का, की ती किती आम्हा सगळ्यांना हवी आहे? तिला पुण्याला खरंच जायचंय का नाही? तिला आवडलं आहे का? राजाकाका कुठे गेला? मला कोणी का हे सांगत नाही?
पहाटे पहाटे आईने सगळ्यांना उठवलं. झुंजुरमासाचा स्वयंपाक झाला होता. आई, आजी सगळेच काही ना काही कामात होते. मी उठल्या- उठल्या रमाकाकूला शोधायला गेले. तिला आमच्या घरी राहायला मी घेऊन जाणार, हेच सांगायचं होतं मला तिला. मी शोधायच्या आधीच तिने मला हाक दिली आणि माझ्याजवळ आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, ”अमू, किती दिवस झाले आपण बोललोच नाही बघ. किती काय काय सांगायचं होतं मला तुला. मी जाणार म्हणून रागावलीस का माझ्यावर? जाऊ की नको म्हणता म्हणता आज निघणार बघ. आईंची फार इच्छा आहे. मला सध्या काही कळत नाही गं. आता गेले की सहा महिन्यांनीच परीक्षा संपली की येईन. तू येशील ना मध्ये मला भेटायला?”
मी काही म्हणायच्या आधीच अक्षु आमच्याकडे एकदम पळत-पळत आला आणि आमच्याभोवती त्याचे छोटेसे हात टाकून जोरात मिठी मारली. जणू काही खूप दिवसांनी तो मला आणि काकूला भेटत होता. मलापण तर तसंच वाटत होतं. रमाकाकूने तिचे हात आमच्याभोवती टाकले आणि दोघांना जवळ ओढून घेतलं. मी हळूच तिच्याकडे पाहिलं तेव्हा रमाकाकू आमच्याकडे बघून छान हसत होती.
***
***

चित्रश्रेय: अमृतवल्ली
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *