Uncategorized

आन्सर क्या चाहिये? : अ‍ॅडमिशन वगैरे

– अस्वल

रिझल्ट लागल्यावर मी बारावीचं मढं पुरलं एकदाचं. एवढी कडवट चव बाकी कधीच कुठल्या वर्षाने मागे ठेवली नव्हती. अख्खं वर्ष पीसीएम ह्या शब्दांतच गेलं. मि़ळाले २८९/३००. आई-बाबा खूश.
बारावीचा एवढा राग यायचं अजून एक कारण आहे. विषय मस्त होते, ह्या दळभद्र्या वर्षाने ते नीट एंजॉयपण करू दिले नाहीत. Conics, Derivatives, Integration ह्या कसल्या अफलातून कन्सेप्ट्स आहेत. आरामात जर चहाच्या घोटाबरोबर एखाद्या वेळी ही गणितं सोडवली, तर पटकन सुटतात. मजा येते. पण इथे कोणी मस्तपैकी वेळ घेत, असं करायलाच देत नाहीये. क्रिकेट खेळताना जर फक्त जिंकायचंय म्हणून खेळलं, तर मग क्रिकेटची काय मजा? एखादा फसलेला शॉट, हुकलेला कॅच आणि मग जमलेला यॉर्कर, ह्या लयीत मजा आहे. जाऊ दे. झालं-गेलं इन्फिनिटीला मिळालं…
परत मी काही मोठ्या लोकांसारखा नाही. हे म्हणजे साले लहानपणीच आत्मचरित्रातले नायक-नायिका होऊन बसतात. शाळेतल्या सुजीतला पाचवीतच माहिती होतं म्हणे की त्याला डॉक्टर व्हायचंय म्हणून. गल्लीतल्या वासंतीने नववीत एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघितलं आणि ती ऑलरेडी सेट आहे. आपलं तसलं काही नाही- एक साधारण अंदाज आला की विज्ञान वगैरे मस्त वाटतं. त्या अर्थशास्त्र, अकाउंट्स आणि मराठी-बिराठीचं फॉर्मल शिक्षण आवडत नाही, म्हणून सायन्सला गेलो. पुढे? इंजिनिरींगला जायचं, हे ठरवलं होतं. पण प्रश्न होता – कुठलं?
तशी बारावीनंतरची सुट्टी झकास गेली होती एकदम. बरंच फिरणं झालं. चिक्कार धमाल केली. १० दिवस कोकणात, मग पुढे शाळेतल्या मित्रांबरोबर सायकल ट्रीप झाली. दे दणादण मासे हाणले. आठवण आली तरी ढेकर येतो. उत्साह २.० च्या जोरावर आता पुढचं ठरवायला हरकत नसावी!
तेव्हा त्या आनंदात तू भी क्या याद रखेगी बारहवी… जाओ, माफ किया.
***
आपण आता बारावीच्या निकालानंतरच्या रणधुमाळीबद्दल बोलणार आहोत, तेव्हा इथे काही पात्रांची थोडक्यात ओळख करून द्यायला हवी.
आई-बाबा : मवाळ-जहाल पक्ष. लोकशाही ही घरात फक्त नावाला असल्याने जहाल पक्षच सरकार चालवतं. तेव्हा मवाळ पक्षामार्फत वटहुकूम काढून घ्यावे लागतात, हे लक्षात आलं असेलच.
आज्जी : तुमचा एकमेव बिनशर्त सपोर्टर. जपून वापरा, हे हुकमी अस्त्र दर वेळी चालतंच असं नाही.
शेजारचे काका-काकू : डोक्याला शॉट नं. १ आणि २. ह्यांचा मुलगा त्रेतायुगात इंजिनेर झालाय. तेव्हापासून हे स्वतःला शाहों-का-शाह म्हणजे इंजिनेर-ऑफ-इंजिनेर समजतात. एकटे-दुकटे ह्यांच्या तावडीत सापडलात तर मेलात. गॅरेंटी आहे आपली.
समोरच्या बिल्डिंगमधला परेश : सद्गुणांचा पुतळा असलेलं एक महाआगाऊ कारटं. दुर्दैवाने (अर्थात तुमच्या) आय.आय.टी.ला निवडला गेला आहे. ह्याच्या अभ्यासाच्या सुरस आणि चमत्कारिक कथांपासून पुढली ४ वर्षंसुद्धा सुटका नाही.
इंजिनेर नसलेले नातेवाईक/बाबामित्र लोक : अतिशय चमत्कारिक जमात. कधी काय सल्ले देईल सांगता येणार नाही. २ पेक्षा जास्त एका वेळी घरी आले असतील तर संडासात लपण्याशिवाय दुसरा इलाज नाही.
इंजिनेर असलेले नातेवाईक/बाबामित्र लोक : “आम्ही केलं तेच इंजिनेरींग सर्वश्रेष्ठ” ह्या ब्रीदवाक्याचे लोक. योग्य पद्धतीने वापरले तर प्रचंड उपयोगी असतात. पण तुमचा त्यांच्यावर कंट्रोल हवा, त्यांना कंट्रोल दिलात तर तुमची चड्डी सुटलीच म्हणून समजा.
कॉमर्सला असणारे मित्र : हरामखोर साले. वेळी-अवेळी “ए XXX, पिच्चर को आयेगा क्या?” म्हणून पुढली ३-४ वर्षं खिडकीतून हाका टाकणार; सवय करून घ्या. त्यातला एक जरी सी.ए.ला बसला ना, तर बाय गॉड सूड घेता येईल.
इंजिनिरींगला न जाणार्‍या मैत्रिणी : टाटा. अश्रुपात.
इंजिनिरींगला जाणार्‍या मैत्रिणी : हे तेव्हा ठाऊक नव्हतं, पण आता सांगायला हरकत नाही – Null set. {} ही जमात फार कमी. असल्याच तर दुसर्‍यांच्या असतात.
***
तेव्हा अशी सगळी पात्रं बारावीचा निकाल- ते इंजिनिरींगची अ‍ॅडमिशन ह्या दरम्यान आजूबाजूला वावरत असतात. पदोपदी ११०% खात्री असलेले सल्ले देतात, इंजिनेरींगमध्ये कसा राम नाही इथपासून इंजिनेरींग केल्याशिवाय दुसरा उपायच कसा नाही इथपर्यंत मतं बदलत असतात. ह्यावर उपाय म्हणून एखाद्या मावशी किंवा आत्याच्या मुलाला मी खूप आशेने भेटायला जातो. तो कुठल्यातरी कॉलेजात इंजिनिरींग करत असतो ऑलरेडी. माझ्या बुडत्या जहाजासाठी ही काडी.
“मेकॅनिकल घेऊ नको. जाम बेकार. केट्यांवर केट्या लागतात.”
“केट्या म्हंजे?”
“फेल!”
येवढंपण कळत नाही छाप चेहरा करून ते मावशीमूल सालं उगाच भाव खातं. चुत्या आहे खरं तर हा अमोल. पण नाईलाज. ह्याला अजून २ केट्या लागू दे ईश्वरा, तुझ्यापुढे पेढे वाहीन.
“मग कुठलं घेऊ फील्ड?”
“प्रोडक्शन पण नको घेऊस हां – लोक लायनी लावून बसतात नोकरीसाठी.” मावसमुलाचा सल्ला. पुढे १० मिंटं तो काहीतरी बोलतो. दीड टक्के कळतं मला, पण बाकी well directed bouncer.
“इकडे ये सांगतो.” आई आणि मावशीची नजर चुकवून तो मला प्रायव्हसीसाठी बाल्कनीत घेऊन जातो. “आय.टी किंवा कॉंम्प्स बेश्ट. सगळ्या मुली तिकडेच असतात. शिवाय वर्कशॉपपण नसतं पुढे. परत सब्जेक्ट सोप्पे असतात रे. इलेक्र्टॉनिक्स, इलेक्ट्रिकल वगैरे पण तसंच – पण थोडं कठीण आहे. शिवाय तुला लॅब वगैरे असतील. रिलॅक्स!”
आयला, एकूण हा अमोल वाटतो तेवढा चंपक नाही. त्याचं ऐकून मी मनात एक-दोन फील्ड नक्की करतो. इलेक्ट्रिकल घेऊया. मिळेल तरी. आयटी-कॉम्प्स सालं सगळ्यांनाच पाहिजे असतं, मिळणारपण नाही. शिवाय कॉलेजात आपण मुली बघायला जाणार नाही, वगैरे विचार माझ्या मनात पिंगा घालत असतात. कोल्ह्याची आंबट द्राक्षं गोड मानून घ्यायची मानसिक तयारी सुरू झाली म्हाराजा.
/* this is a C style comment. On admission system. Pun.Intended.
* नंतरचा प्रकार म्हणजे अ‍ॅडमिशन. आम्हाला Centralized admission आहे म्हणून जरा तरी बरं, नाहीतर प्रत्येक कॉलेजापुढे भीक मागायला जावं लागलं असतं अकरावीसारखं.
* पण हा प्रकार जरा कठीण. ७० टक्के आणि ३० टक्के वगैरे काहीतरी कोटा सिस्टीम असते. तुम्ही आधी ३०% मध्ये पाहिजे ती कॉलेजं टाकायची – त्यातल्या एकात जरी सीट असेल, तर तुम्हाला मिळून जाते.
* पण मग ती घ्यायलाच हवी. मग पुढच्या अ‍ॅडमिशन प्रोसेसमधून बाद तुम्ही.
* आता ह्यात जर सीट मिळाली नाही तर मग उरलेल्या ७० टक्क्यात तुमचा विचार होतो. इथे सिटांची बदलणारी उपलब्धता तुम्हाला दिसत असते. त्यावरून आपले पर्याय नक्की करायचे. आपली वेळ आली की मग तिथे काय * परिस्थिती आहे, त्यावरून अ‍ॅडमिशन मिळते. ह्यात अजून सत्राशेसाठ प्रकार आहेत, पण बाकी डीटेलांत वाहून जाऊ आपण. मुख्य काम म्हणजे आपली ३० टक्केवाली लिस्ट बनवून तयार ठेवणे.
* आता ह्यात मी कदाचित घोळ घालत असेन, पण रूपरेषा अशी काहीशी असते.
*/
कुठलं कॉलेज कुठे टाकायचं? भलतंच एखादं ३० टक्क्यांत टाकलं तर मिळून जाईल, म्हणून मग तिथे फकस्त भारी भक्कम टाकायची – की जिकडे सीट मिळाली तर स्वर्ग. शेवटची नावं मात्र थोडी रिअलिस्टीक अशी.
७० टक्क्याला काही लिस्ट वगैरे लागत नाही. जे काय बाजारात उरलंय, त्यातूनच घ्यावं लागतं.
तर असा सगळा डोक्याला शॉट झेलून मी सगळी लिस्ट वगैरे बनवली. आता पुढचं पाऊल म्हणजे पैसे. पेड सीट मिळेल, पण परवडेल का? फ्री-सीट मिळवायला ३ मार्क कमी पडतायेत. बाबा मानतील का?
आई, डी.जे (संघवी)त चांगली इलेक्ट्रॉनिक्सची सीट मि़ळू शकेल. ७५००० वर्षाला-
नाही झेपणार रे राजा आपल्याला. ते दुसरं थोडं लांब आहे, पण चांगलं आहे रे कॉलेज. तिथे फ्री सीट-
रोज दीड तास लोकलचा प्रवास? तुटेन मी दोन दिवसांत. मला डी.जे.ला जायचंय. सांग ना बाबांना-
बघते.
त्या रात्री फुल टेन्शन आलं मला. काय होईल काय नाही. बाबा बहुतेक मानतील, एरवी व्हिलनसारखे वागत असले तरी तसे चांगले आहेत. छ्या, इथेपण सस्पेन्स!
मग दुसर्‍या दिवशी सकाळी चहाच्या कपाबरोबर संसदेचं पावसाळी अधिवेशन भरलं. मारी बिस्किटाच्या तुकड्याबरोबर बाबा मिशीत जेमतेम हसले तेव्हा मला होप्स होते. पण आईने त्यांना पेड सीटचं सांगितल्यावर पुढलं बिस्किट न उचलताच ते उरलेला चहा प्यायले आणि गंभीर चेहर्‍याने बसून राहिले. एक हाडाचा बाबाविरोधी सदस्य असूनही मला काहीतरी विचित्र वाटलं. कुछ तो गडबड हुई है दया.
पण अंतिम निकाल स्पष्ट आहे-
डी.जे. संघवी – caught & bowled by M.O.Ney ०(१)
Golden Duck.
What the fuck
damn my luck
मारली झक.
तेव्हा डी.जे. ची स्वप्नं – बाय बाय. दूरगावचं कॉलेज मिळेल फ्रीसीटसाठी. आता फ्रीसीट म्हटली तर मग मिळणार काय? तर म्हणे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन्स. भेंडी. ईटी.
मग बिल्डिंगच्या गच्चीवर थोडा वेळ बसलो उगाच. विचार केला. खूप वाईट वाटलं. खूप. रडलो थोडा. हिशेब केले. वेगवेगळ्या पद्धतीने रचून बघितलं की कुठे काही कमी होतात का? इथल्या स्कॉलरशिप, तिथल्या स्कॉलरशिप. टाटा मदत करतात. संस्था? लोन घेऊया? बाबांचा पी.एफ. –
अचानक डोक्यात वाजलं काहीतरी खण्णकन. भेंडी नको असले पैसे. गरज नाही, धन्यवाद. दीड तास तर दीड तास. त्यापायी आईबाबांच्या डोक्याला शॉट देणार नाही. इंजिनीरींग करायचं दूरच्या कॉलेजातच. ठरलं.
मग जरा बरं वाटलं मला. शर्टाच्या बाहीने डोळे पुसले. पांढरा शर्ट होता, जाऊ देत.
वटवाघळं जमायला लागली गच्चीत तेव्हा खाली आलो मग.
दुसर्‍या दिवशी मग पैसे भरले फ्रीसीटचे. बाबांबरोबर पावभाजी खाल्ली नंतर बाहेर एका हॉटेलमध्ये.
आता बरं वाटतंय का? होय म्हाराजाssss
इंजिनीरींगला जायचं होतं ना – झालं समाधान? होय म्हाराजाssss
फ्री-सीटही मिळाली, नो टेन्शन? होय म्हाराजाssss
इंजिनीरींग चालू होणार आता. जमतंय हे. सॉलिड.
***
***

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *