Uncategorized

आमचं हॉगवर्ट्स

– जास्वंदी
 
अथर्व नुकताच रडून थांबला होता. वही आणि पेन मांडीवर ठेवून टीव्हीकडे एकटक बघत बसला होता. एकशे बाराव्यांदा केबलवाल्यांनी पॉटरपट लावलेला होता. बाबा हातात मोबाईल घेऊन “how to write poems?” गुगल करत बसला होता. आई बंगलोर टीमसोबत कॉलवर असताना एकीकडे “rules of poetry” वाचत होती.
“व्ही नीड अ स्केड्यूल, फॉर नेक्स्ट पी मोड्यूल” असं कोणीतरी म्हणाल्यावर आईला त्यातही काव्य दिसत होतं. बाबा मध्येच उठला. अथर्व टीव्ही बघत बसलाय, हे पाहिल्यावर पुन्हा एक धपाटा लगावला “टीव्ही बघतोयस निर्लज्जपणे? कविता कोण करणार? बस लिहायला लवकर… “
आज दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी खेळून आल्यावर आईने दप्तर भरायला लावल्यावर अथर्व एक कागद घेऊन बाहेर आला.”आई गं… ऐक ना. थोडासा होमवर्क राहिलाय.”

“शाब्बास! अथर्व, तुला नं…”
बाबा आईला अडवत म्हणाले “रेणू, ओरडू नको आता त्याला. इथे ये अथर्व. काय राहिलाय गृहपाठ दाखव. करून टाक पटकन…”
अथर्व आईपासून लांब होत बाबांजवळ गेला आणि गृहपाठाच्या यादीचा कागद बाबांच्या हातात ठेवला. बाबांनी यादी वाचली आणि अथर्वला जोरदार धपाटा लगावला.
“सायन्सचे ४ प्रयोग, हिस्ट्रीचा एक प्रोजेक्ट, गणिताचे ३ एक्सरसाईज, हिंदी दिवाळी निबंध आणि मराठी कविता.”
 
ह्या घडीला सायन्स आईने, गणित बाबांनी, हिस्ट्री गुगलने आणि हिंदी नवनीतने संपवलं होतं. उरलं होतं मराठी. “I don’t understand this. सातवीतल्या मुलाला कविता कशी करता येईल? कोण आहेत रे टीचर तुझ्या? काय अर्थ आहे ह्याला? स्वतः करायची म्हणजे काय?” असा मराठी, शाळा, काव्य-साहित्य, मीनल टीचर… असा सगळ्यांचा उद्धार करून तिघं मेंबर्स कविता लिहायला बसले होते.
 
“तुला हे काल नाही आठवलं? आत्याज्जी होती नं काल? तिनी पटकिनी लिहून दिली असती एखादी कविता.” बाबांच्या ह्या वाक्यावर आई फिस्सकन हसली.
“मालती आत्या? त्यांच्या कविता माहित्येत नं कश्या असतात ते?”
“पेपरमध्ये येतात बरं तिच्या कविता.”
“पेपर म्हणजे मुक्तपीठ? काय काय कमेंट्स आल्या होत्या त्यांच्या कवितेवर आठवतं आहे ना? मधुमालती म्हणजे मालती आत्या हे तुला जोवर ठाऊक नव्हतं तोवर तूही किती हसला होतास आठवतं आहे नं?”
” हे बघ रेणू, कशीही का असेना कविता करते ना? तुझ्या माहेरच्या किती लोकांना येते गं कविता करता?”
“अय्या! सासर-माहेर कुठे आलं ह्यात? आणि ते काढायचंच असेल ना, तर हे लक्षात ठेव की गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण न करणं आणि आयत्या वेळी रडायला बसणं ही तुमच्याकडची सवय आहे. स्प्रिंटचा शेवट  आला  की काय होतं तुझं माहित्ये ना?”
 
अथर्व आता टीव्हीकडे पाठ करून आईबाबांचं भांडण ऐकत बसला होता. बाबांनी अथर्वकडे पाहिलं. आईचा विषय बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्याला मारणार, त्याआधी अथर्वने वही  समोर केली.
 
“आजोबा माझे आहेत थोर
आमच्या घरचे डंबलडोर. “
 
“अं.. चांगली आहे. पण निदान ४ ओळी तरी हव्यात, म्हणजे चारोळी म्हणता येईल.” इति बाबा.
“चारोळी लिहायला नाही सांगितल्ये पण, कविता करायच्ये रे रजत! आणि चारोळी कविता असते हे माहित्ये मला, पण दिवाळीच्या २१ दिवसांच्या सुट्टीत फक्त ४ ओळींची कविता लिहिली? मला नाही बरोबर वाटत.”
“चंगो आयुष्यभर चारोळ्या करतात, त्यांचं किती कौतुक तुला.”
“तुझा मुलगा चंगो नाहीये नं पण? आणि त्याबद्दल तर तू बोलूच नकोस रे! आठवतं ना कॉलेजमध्ये असताना वहीच्या मागच्या पानावर लिहिली होतीस एक चारोळी आणि स्वतःची म्हणून खपवली होतीस? “
“तो प्रचंड वड कसा उन्मळून पडला होता, म्हणे त्याला बिलगलेला वेल कुणीतरी खुडला होता… अशीच ना काहीतरी?”
“मला काय माहीत? तू लिहिली होतीस नं? ” आई-बाबा दोघंही हसले. अथर्वने पुन्हा टीव्हीकडे तोंड केलं.
 
“चवदार असते आजीची कढी
त्यावरून फिरवते  का जादूची छडी ?”
 
“पण डझ ढी आणि डी राईम?” आईच्या प्रश्नावर बाबांनी फोनमधून तोंड बाहेर काढलं. “हम्म…”
“हम्म? व्हाटसप बघतोयस ना? वाटलंच होतं. इथे मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून-“
“अगं, थांब गं! मेघनाला पिंग करत होतो. ती एवढे भारी ब्लॉग लिहित असते. तिला विचारलं लिहून देतेस का कविता? मेसेज पाहिलाय तिने. पण उत्तर नाही देते.”
“आता मी काय सासर-माहेर काढत नाहीये हो, पण मीसुद्धा  दादूला विचारलं मगाशी, त्याचा लगेच रिप्लाय आला. रविवारपर्यंत देतो म्हणून. त्याला म्हटलं ठीक आहे. सांगू नको हां त्याला उद्या हवीये ते. कसं वाटतं…असं आयत्या वेळी विचारलं आपण म्हणून…”
“काहीही असतं तुझं!”
 
तेवढ्यात आईच्या कॉलवरच्या माणसांनी ‘ओके बाय’ला सुरुवात केली. आईने म्यूट फोनवर बाय म्हणून कॉल कट केला.
“हं.. आता बोला. अथर्व, तुला ‘कणा’ नावाची कविता माहित्ये का? कुसुमाग्रज ना रे रजत? माय मोस्ट फेव्हरेट पोएम.. मी काय म्हणते, असा काहीतरी सोशल इश्यू घ्यायचा का?”
“पण मी आपल्या सगळ्यांवर करतोय नं कविता…” बराच वेळ शांत बसलेला अथर्व बोलला.
 
“सागर माझा मित्र अजून कोण?
तोच माझा हार्माय्नी आणि रॉन”
 
“गाढवा? ही तुझी कविता आहे? गर्ल चाईल्डबद्दल करू शकतो कविता. रजत, आता बास आणि ते व्हाटसप. लवकर झोपायचं आहे रे ही कविता संपवून.”
“गर्ल चाईल्ड नको. सिरिअस आहे. हाऊ अबाउट पाऊस?”
“समथिंग लाईक अग्गोबाई-ढगोबाई? हां अथर्व, तशी लिहायची? ऐक नं… किंवा त्या चिंटूमधल्या गाण्यासारखी आईबद्दल लिहितोस का रे?”
“दमलेल्या बाबाची कहाणीच लिहील ना मग तो…”
“वाटलंच होतं मला! संदीप खरे हॅज ऑल द आन्सर्स असं म्हणता येईल पण.”
“मी काय म्हणतो? ही बघ ही एक कविता आल्ये मला फॉरवर्ड. आपण मराठीत करूयात फक्त की झालं. पावसाबद्दल आहे. पेत्रीचोर म्हणजे काय असतं?”
“क्काय? असली नको काहीतरी कविता ज्याचे अर्थही माहीत नाहीत. किती बोर आहे रे कविता करणं! त्यापेक्षा एक दहा गणितं अजून सोडवली असती.”
“नाहीतर काय? कविता करून कोणाचं पोट भरतं का?” बाबा वैतागत म्हणाला.
“असंच नाही रे अगदी..,. आता आपला संदीप खरे नाही का?”
“पण तोही आधी इंजिनिअर झाला. सलील डॉक्टर झाला. उद्या नाही चालल्या कविता तर बॅकप आहे त्यांना.”
“गुलज़ार मग?”
“रेणू, गुलज़ार गीतकारे गं, कवी नाही.”
“देअर इज नो डिफरन्स रे! कवितेला चाल लागली की गीत, नाही लागली की कविता. इतकं सिम्पल आहे रे.”
“बरं, बास आता. पेत्रीचोर म्हणजे पहिल्या पावसाचा वास. ती कविता मी सरळ ट्रान्सलेटमध्ये टाकली आणि झालीये की! राईम करू फक्त.”
“राईमचीही नाहीये रे गरज. ’कणा’ घे किंवा कोणतीही फेमस कविता घे. राईम नसतं हल्ली. काय म्हणतात ते… मुक्तछंद! ते रॉक्स!”
“झालीये का मग फायनल? अथर्व ही घे. ही काढ लिहून अशीच्या अशी.”अथर्वची फिल्म एव्हाना संपली होती. त्याने बाबाकडून फोन घेतला आणि सो कॉल्ड कवितेतल्या शब्दांमधली अक्षरं उतरवून घेण्याआधी मागच्या पानावर त्याने अजून  दोन ओळी लिहिल्या.

 
“आई बाबा एकदम ठस,
ते चिडले की मी इम्मोब्यूलस!”
 
आई बाबा मोठ्ठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात झोपायला गेले. अथर्व “सुटलो एकदाचा” म्हणत गुडूप झाला. लाईट बंद झाले. आणि त्याबरोबर घरात थोडीशी जाग आलेली कविताही पुन्हा फक्त व्हाटसप फॉरवर्ड आल्यावरच थोडा वेळ उठायला झोपी गेली.
 
***
चित्रसंस्करण : स्नेहल
Facebook Comments

4 thoughts on “आमचं हॉगवर्ट्स”

  1. किती बोलकं आहे हे स्फुट, कसलाही आव न आणता अनेक ठिकाणी झगझगीत प्रकाशझोत टाकणारं. 'थोडीशी जाग आलेली कविता'! खल्लास.

  2. कसलं मस्त अाहे हे! झक्कास एकदम. स्वमग्न दमलेल्या अाईबापाला जोर का झटका धीरे रे असलं थोबडवलं अाहेस. नि अजूनही बरंच काही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *