Uncategorized

नवं जग, नवी कविता : उत्तरआधुनिकतेचं नमन

– विश्राम गुप्ते***
उत्तरआधुनिक जग आणि त्या जगातली कविता यांचा वेध घेणारं ‘नवं जग नवी कविता’ हे विश्राम गुप्ते यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. वाचकाला चिरपरिचित असणारं कवितेचं प्रारूप इतकं आमूलाग्र बदलतं आहे, कारण ते बदललेल्या काळाचं अपत्य आहे. काळ आणि कविता यांच्यातलं हे नातं उलगडणारा निबंध म्हणजे प्रस्तुत पुस्तक. त्या पुस्तकातला अंश प्रसिद्ध करतो आहोत.प्रकाशनाला संमती देणार्‍या लेखकाचे आणि ‘संस्कृती प्रकाशना’चेही आम्ही ऋणी आहोत.
***  नव्या जगातली नवी कविता वाचताना नव्या जगाचं स्वरूप समजावून घेऊ या. ह्या जगात मिडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट आणि मेडिटेशन ह्या पाच मकारांचं प्राबल्य वाढतंय. हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. नवी कविता ह्या पाच मकारांचा कलात्मक आणि संकल्पनात्मक हुंकार आहे. नवं जग जुन्याच्या तुलनेत समजावून घ्यायला अधिक कठीण गोष्ट आहे. म्हणून नवी कविता समजावून घेताना आपल्याला नव्या जगाचे हे मकारात्मक संदर्भ लक्षात ठेवायचे आहेत. प्रस्तुत निबंध जसा नव्या कवितेबद्दल आहे, तसाच तो नव्या जगाबद्दलसुद्धा आहे. ह्या कवितेबद्दल बोलताना नव्या जगाचे, म्हणजेच जागतिकीकरणाचे संदर्भ अटळ आहेत. जग आणि कविता हे नातं आई-मुलासारखं जैविक असतं. जशी आई तसं मूल. जसं जग, तशी कविता. जसा अनुभव तशी अभिव्यक्ती.’श्री चावुण्‍डराजें करवियलें’ ह्या त्रोटक वाक्याने लिखित मराठी साहित्याचा इतिहास सुरू झाला असं म्हणतात. म्हैसूरजवळ श्रवण-बेळगोळा इथला गोमतेश्वराचा भव्य पुतळा राचमल्ल गंग ह्या राजाच्या चामुण्‍डराय नावाच्या प्रधानाने करवून घेतला. त्याची जाहिरात व्हावी म्हणून त्याने हे वाक्य दगडावर कोरून घेतलं. हाच मराठीचा पहिला शिलालेख. हा शिलालेख आजपासून सुमारे साडेआठशे ते नऊशे वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. त्याचा उद्देश दात्याच्या दातृत्वाची द्वाही फिरवणे आहे.भाषेचा प्रमुख उद्देश संदेशवहन असला तरी तिचा दुय्यम उद्देश जाहिरातबाजी किंवा ’सेल्फ प्रमोशन’ही असतो. हे केवळ आजच्या म्हणजेच उत्तरआधुनिक संवेदनशीलतेचंच व्यवच्छेदक लक्षण नाही, तर ते लक्षण प्राचीन काळात म्हणजे सुमारे एक हजार वर्षांपूर्वीसुद्धा आढळून येतं. मराठीतला पहिला शिलालेख चामुण्‍डरायाचा ‘ब्रँड’ प्रमोट करणारा आहे. लिखित मराठी वाङ्मयाची – त्यात कवितेचाही अंतर्भाव होतो – कथा प्राचीन शिलालेखांपासून सुरू होते. मराठीच्या ह्या शिलालेखांत सार्वजनिक स्वरूपाच्या व्यावहारिक म्हणजेच रुक्ष नोंदी आढळून येतात. आजतागायत शोधल्या गेलेल्या अर्धा डझन शिलालेखांपैकी एकावरही कवितेची एकही ओळ नाही.एकविसाव्या शतकातल्या मराठी कवितेची अभिव्यक्ती आणि व्याप्ती समजून घेण्यापूर्वी तिची उत्क्रांती समजावून घेणं मनोरंजक ठरतं. जिला ‘खणखणीत’ म्हणता येईल अशी मराठीतली आद्य अभिव्यक्ती कवितेच्याच माध्यमातून झालेली आहे. मराठीतल्या सकल संतकवींचा हा सृजनानंद ज्ञानेश्वरांच्या अद्भुत प्रतिभाविलासानंतर क्रमाने वाढत चाललाय की घटत चाललाय ह्या प्रश्नाचं उत्तर एकविसाव्या शतकात लिहिलेल्या मराठी कवितेच्या संदर्भात देणं रोचक असेल.तेराव्या शतकापासून सुरू झालेला मराठी कवितेचा हा उत्कट आणि भावरम्य प्रवास जागतिकीकरणाच्या संपूर्ण कह्यात गेलेल्या एकविसाव्या शतकात नेमका कुठल्या पडावावर येऊन थांबलाय, आणि इथून तो प्रवास पुढे कुठच्या दिशेने होणार आहे ह्याची कथा (narrative) मनोरंजक असू शकते. ही कथा जितकी थेट, होईल तितकी हसतखेळत सांगण्याचा प्रस्तुत निबंधाचा इरादा आहे. चालू काळ व्यामिश्र भावस्थितींना जन्म देणारा रोचक काळ आहे. त्याला चिंताक्रांत, लांबोड्या चेहर्‍याने सामोरे न जाता तो हसतखेळत समजून घेता येतो अशी प्रस्तुत निबंधाची भूमिका आहे. गांभीर्याची दुसरी बाजू हसरी असते.साहित्यिक कृतींच्या आकलनासाठी ’गांभीर्य’ हे मूल्य विसाव्या शतकापर्यंत वैध होतं. कारण तोपर्यंत भाषेतून व्यक्त होणारा अर्थ बर्‍यापैकी ’स्थिर’ स्वरूपाचा होता. जागतिकीकरणानंतर ह्या अर्थालाच ’अस्थिरतेचं’ ग्रहण लागलं. जागतिकीकरणाने रूढ केलेली नवी नैतिकता नि:संशय, निखालस किंवा निरपेक्षतावादी तत्त्वांवर आधारलेली नाही, तर ती सापेक्षतावादी मूल्यांवर आधारित असल्याचा एकूण प्रत्यय येतो. ह्या नवनैतिकतेला आत्मसात केलेल्या नव्या शतकाने आधीच्या वीसही शतकांपासून तात्त्विक आणि मानसिक काडीमोड घेतल्याचेही दिसून येतंय. त्यामुळे सुमारे आठशे ते हजार वर्षांची   स्थिर मूल्यपरंपरा चालू शतकात शीर्षासन करताना दिसून येते. प्रस्थापित मूल्यांची ही विपरीत करणी चालू काळातलं सर्वाधिक मोठं आव्हान आहे हे फक्त कवीच नव्हे तर कवीतरसुद्धा मान्य करतील.गेल्या वीसबावीस वर्षात झालेली आय.टी. क्रांती, त्यातून मानवी मनावर प्रस्थापित झालेली इलेक्ट्रॉनिक मिडियाची अधिसत्ता आणि त्यातून बदललेलं मानवी मन हे चालू काळासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. माध्यम (media) क्रांतीमुळे हजार-दीड हजार वर्षं रुजलेल्या स्थिर मानवी वर्तणुकीच्या साच्यांना नवे पर्याय निर्माण झालेत. मिडियाच्या प्रादुर्भावामुळे मानवी वर्तणुकीचे नवे आविष्कार जन्माला आलेत, नवे विभ्रम रूढ झालेत आणि नवी मूल्यव्यवस्था रूजू लागली आहे. मानवी जाणीव (conscience) आणि नेणीव (sub-conscience) दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक मिडियाने घुसखोरी केली. त्याचा परिणाम म्हणजे, व्यक्तिगत आणि पर्यायाने सामुदायिक मनाची स्वायत्तताच हरवली. समाज टेलिव्हिजनचं ऐकू लागला. चौकोनी चेहर्‍याचा टेलिव्हिजन सेट आपला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड झाला. नव्हे, तो सर्वव्यापी ईश्वर झाला.रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट, मोबाईल इत्यादी मिडियाच्या सर्वव्यापी सत्तेमुळे आणि जगणं उलटंपालटं करणार्‍या ह्या मिडियाच्या विलक्षण संस्कारांमुळे काव्य, शास्त्र आणि विनोदाच्या प्रांतात अनोखे वारे वाहू लागले आहेत. थोडक्यात, पारंपरिक हळवी मराठी कविता धीट होऊ लागली आहे. जागतिकीकरणानंतर लिहिल्या गेलेल्या ह्या नव्या कवितेचा, पारंपरिक – म्हणजेच स्वस्थ आणि सुस्त – वाचकांना सांस्कृतिक धक्का बसू शकतो. सांस्कृतिक धक्के सगळ्यांनाच पचवता येत नसतात. त्यामुळे असे धक्के देणारी कविता दुर्लक्षित ठेवली तर बरं असं सामान्य वाचकांना वाटू शकतं. कुठल्याही काळात नव्याला विरोध ही स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया असते. पण हा विरोधही कालांतराने मावळतो. नवं अखेरीस जुनं होऊन नव्या नव्याची चाहूल लागते. हा कालचक्राचा नियम आहे. ह्या नियमासमोर आपण सगळेच, इन्क्लुडिंग कवी, हतबल आहेत.आज आपण जगतोय ते जग जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे अभूतपूर्व खुलं म्हणून अस्थिर झालं आहे. खुलेपणा किंवा लिबरलिझम आभाळातून पडत नसतो. त्यासाठी निर्ढावलेल्या परंपरेशी वाटाघाटी कराव्या लागतात. जुनं सोडून नव्याचा पाठलाग करावा लागतो. जुन्यात स्थैर्य असतं, नव्यात मात्र अस्थैर्य आणि टेंशनच असतं. हे टेंशन किंवा anxiety म्हणजेच भविष्याबद्दल भय आपल्या काळाची प्रमुख ओळख होऊ पाहतंय.जुनं संपलं, पण नवं सुरू होत नाही ह्या सस्पेन्सयुक्त अवस्थेत मनं चिंताक्रांत आणि भयभीत होतात. ह्या मानसिक अवस्थेत जुन्याचं पुनरुज्जीवन करावसं वाटतं. पण तेही धड होत नाही आणि नवंही धड पचवता येत नाही ह्या संभ्रमित अवस्थेत जगणार्‍या समाजाला जागतिकीकरणोत्तर समाज म्हणतात. हा संभ्रम न संपणारा आहे तेव्हा त्याचा बाऊ न करता आपण जागतिकीकरणाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक आशयात, नव्या कवितेचं कारण, तिचा उद्देश आणि तिची दृष्टी नेमकी काय आहे ह्याची सर्वांगीण चौकशी करून बघू या.
एक गोष्ट निश्चित आहे. जागतिकीकरणामुळे आपल्या सभोवताली अनोखा आणि अनपेक्षित अवकाश तयार झालेला दिसतोय. ह्या अवकाशात जसे मानवी स्वभावाचे नवे विभ्रम दिसून येतायत, तसेच कलेचे नवनवे आविष्कारसुद्धा रूजू बघतायत. ह्या आविष्कारांचा तसेच नव्या मूल्यांचा ज्ञानाच्या हरेक क्षेत्रात प्रसार होतोय. साहित्य, समीक्षा, कला आणि उपभोगाच्या क्षेत्रात जेव्हा नवी विचारसरणी रूढ होऊ लागते तेव्हा मानवी वर्तणूक, विचार, आचार इत्यादीचे नवे साचे निर्माण होतात. साहित्याची नवी व्याख्या तयार होऊन त्याच्या आकलनात ’गांभीर्या’सोबत ’खेळकरपणाचा’सुद्धा अंतर्भाव होऊ शकतो.मूलत: आर्थिक म्हणजेच भौतिक आशय घेऊन येणार्‍या जागतिकीकरणाने जगभरातल्या सांस्कृतिक म्हणजेच अधिभौतिक अवकाशांमध्ये (cultural pockets) खळबळ निर्माण केली. त्यामुळे देशोदेशी सर्वमान्य असलेल्या सांस्कृतिक समजुतीअपसमजुतींमध्ये नवी संशोधनं होऊ लागली आहेत. किंबहुना आज अशी कालानुरूप संशोधनं करणं नव्या सांस्कृतिक प्रवक्त्यांना भाग पडलं आहे.कुठल्याही काळातला कवी त्या काळातला सांस्कृतिक प्रवक्ता असतो. ह्या कवीच्या प्रवक्तेपणाचा पाया ज्या गृहितांवर आधारित होता, त्या गृहितांना जागतिकीकरणाने जबरदस्त हादरा दिलेला आहे. ह्या हादर्‍यांचे विविध पदर उलगडवून सांगणे आणि त्या अनुषंगाने नव्या कवींच्या रचना जोखून बघणे हे ह्या निबंधाचं ध्येय आहे.काळासोबत राहायचं असेल तर अंतर्यामी वसत असलेल्या पारंपरिक मूल्यव्यवस्थेत ’स्ट्रक्चरल अ‍ॅडजेस्टमेंट्स’ आणि अमेंडमेंट्सना सध्यातरी पर्याय दिसत नाही. मग तो कवी असो की कवितेचा वाचक, चित्रकार असो की चित्राचा आस्वाद घेणारा रसिक, लेखक असो की समीक्षक आणि सत्ताधीश असो की त्याला सत्तेपर्यंत पोहोचवणारा मतदाता नागरिक, ही अंतर्यामीची ’स्ट्रक्चरल अ‍ॅडजेस्टमेंट’ अटळ आहे.बदलता काळ माणसाच्या भावविश्वात उलथापालथ करणारा ८.३ रिक्श्टर स्केलचा भूकंप आहे. ह्या भूकंपात माणसांची जुनी घरं नष्ट होतील हे नक्की, पण त्या घरात राहणार्‍यांच्या मनांची उभारी नष्ट होऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाला स्वत:ची जाणीव आणि नेणीव चालू काळाशी सुसंगत ठेवावी लागणार आहे. ही कालसापेक्ष जाणीव फक्त तगून राहाण्यासाठीच नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीसुद्धा उपयुक्त होईल असंही प्रस्तुत निबंधाचं प्रतिपादन आहे.काळ बदलला आहे. तो बदलत आहे. तो पुढेही बदलणार आहे. काळाबद्दल केवळ ही तीन विधानंच खातरीपूर्वक करता येतात. जुन्या काळाच्या गर्भातून नवा काळ जन्मतो ह्या घासून गुळगुळीत झालेल्या पारंपरिक समजुतीवर आधारलेलं काळाचं स्थिर ‘मॉडेल’ एकविसाव्या शतकात जुनं म्हणून गैरलागू झालेलं दिसतंय. त्या ऐवजी नवोत्तर काळाला समजून घेणारं काळाचं पर्यायी ‘मॉडेल’ प्रस्थापित होऊ बघतंय. ह्या नव्या मॉडेलची खुबी म्हणजे ते अतोनात परिवर्तनशील आहे. एखादा ’काऊच पोटॅटो’ (टिव्ही अ‍ॅडिक्ट) ज्या वेगाने रिमोटचं बटण दाबून चॅनेल हॉपिंग करतो त्यापेक्षाही जास्त वेगाने भोवतालचा काळ बदलत चाललाय. त्याला समजावून घेणं हे नव्या कवितेसमोरचं मोठं आव्हान आहे. काळाचं हे नवं किंवा नवोत्तर ‘मॉडेल’ जुन्या, पारंपरिक काळाला ठार मारून उभं ठाकलंय हा प्रस्तुत निबंधाचा युक्तिवाद आहे.व्यापक सांस्कृतिक नजरेने बघायचं झालं तर असं म्हणता येईल की अंदाजे वीस शतकांनी युक्त अशा एका पारंपरिक काळाचा आज ‘अंत’ झाला असून त्या जागी नव्या अपारंपरिक काळाचा उदय झाला आहे. ह्या अपारंपरिक काळात जुनी मूल्यव्यवस्था गैरलागू ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याऐवजी नवी मूल्यव्यवस्था रूजू बघतेय. कवी संस्कृतीचा प्रवक्ता असल्याने सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेवर सखोल चिंतनाची त्याच्याकडून अपेक्षा असते. ह्या चिंतनाच्या गाभ्यात जागतिकीकरणाने अभूतपूर्व बदल घडवून आणलेले दिसतात. मूल्यव्यवस्थेच्या संदर्भात सांगायचं झालं तर हे एकविसावं शतक उपटसुंभासारखं अवतरलेलं आहे. त्याचा गेलेल्या वीस शतकांशी फारसा संबंध नाही असं भीत भीत का होईना, पण नोंदवावसं वाटतं.पंधरा वर्षांपूर्वी अंत पावलेल्या विसाव्या शतकाचं एकविसाव्या शतकाशी नातं आहे का? आलेल्या नव्या शतकाचा गेलेल्या दहाबारा शतकांशी काही तार्किक, ऐतिहासिक, भावनिक आणि जैविक संबंध आहे की नाही? असा तात्त्विक संभ्रम पैदा करणार्‍या ह्या एकविसाव्या शतकाला ‘नवोत्तर जाणीवेचं शतक’ म्हणण्याचं स्वातंत्र्य हा निबंध घेणार आहे. एकविसाव्या शतकात ही नवोत्तर संवेदनशीलता (new sensibility) जन्म घेतेय. संवेदनशीलता म्हणजे अनुभवाला दिलेला सौंदर्यवादी, मूल्यगर्भ आणि भावनाशील प्रतिसाद (gut reaction) असते. जागतिकीकरणोत्तर नव्या कवींची ही गट रिअ‍ॅक्शन नेमकी काय आहे? हे तपासून बघणं ह्या निबंधाचं एक ध्येय आहे.अनुभव बदलला की संवेदनशीलता बदलते. जागतिकीकरणपूर्व काळातला सामाजिक-सांस्कृतिक आणि जागतिकीकरणोत्तर कालखंडातला सामाजिक-सांस्कृतिक अनुभव भिन्न असल्याने त्यांना दिलेला अभिव्यक्त्तीचा प्रतिसाद भिन्न असणं स्वाभाविक आहे. विसाव्या शतकातली संवेदना जर ’नवी’ होती हे आपण मान्य केलं तर एकविसाव्या शतकातल्या संवेदनशीलतेला ’नवोत्तर’ म्हणण्यात काहीच गैर नाही. ह्या नवोत्तर मूल्यरचनेचं सार्वजनिक बांधकाम आज सर्वत्र जोरात सुरू आहे. त्यामुळे होणारं नैतिकतेचं ट्रॅफिकजॅम आपली डोकेदुखी ठरली आहे. त्यावर झटपट उपाय दिसत नाही.भारतासारख्या उतरंडप्रिय (hierarchical) समाजात, जिथे सगळा भर जन्मावर आधारित अधिकार, वर्णाधिष्ठित कर्मकांड आणि घोकंपट्टी संस्कारांवर असतो, त्या समाजात नव्या मूल्यरचनेचे बांधकाम अहोरात्र सुरू आहे. ह्या मूल्यरचनेतून अभूतपूर्व मानसिक ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. जुन्या मूल्यांची उत्क्रांती होतेय. मानसिक स्थैर्य, जेष्ठांबद्दल धाक, चिरंतन मूल्यांबद्दल आदर, इतिहासाबद्दल रम्य समजूत ह्या जमीनदारी अवस्थेत रूजण्यार्‍या मूल्यांची सद्दी संपत आली की काय? ही शंका येतेय. त्याऐवजी लोकशाही आणि समतेवर आधारित नव्या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना होण्याची शक्यताही वाढतेय.जागतिकीकरणोत्तर एकविसाव्या शतकात जगभरात पारंपरिक सामाजिक उतरंड मोडली जाऊन त्या ऐवजी एक आडवी (horizontal) समाजव्यवस्था अस्तित्वात येतेय. ही गोष्ट खेदजनक नाही तर आनंददायक आहे असं पोस्टमॉडर्निझमचं तत्त्वज्ञान सांगतं. ह्या जागतिक पार्श्वभूमीवर भारतातसुद्धा उतरंडीची समाजव्यवस्था आडवी होतेय का, हा प्रश्न विचारता येतो. त्याला गंमतीदायक उत्तर असं आहे: भारतात आडवी समाजव्यवस्था येऊ घातली तरी सध्या ही पारंपरिक उतरंड कललेली दिसते. भारतात आज उभी नाही आणि आडवीही नाही तर ’तिरपी’ समाजव्यवस्था दिसून येतेय.’अल कायदा’ आणि ’तालिबान’ काहीही म्हणोत, सत्य हे आहे की जागतिकीकरणानंतर जगभरातले मानवी समाज कालच्या तुलनेत आज अधिक लिबरल, अधिक मोकळे आणि अधिक उपभोगप्रवण झाले आहेत. भारतसुद्धा ह्या नियमाला अपवाद नाही. ह्या आडव्या म्हणजेच समतेचं सूचन करणार्‍या समाजव्यवस्थेला फ़ारसं परिचित नसलेलं पारंपरिक भारतीय मन त्यामुळे पुरतं भांबावून गेलेलं दिसतं. त्यातून पैदा होणारा सामुदायिक संभ्रम, राग, चिंता, मानसिक ताण आणि हिंसा दिवसेंदिवस आडव्या होऊ बघणार्‍या समाजरचनेची ओळख ठरू लागलीय. आज तरी नव्या जाणीवेच्या कवींसमोर आडवी समाजरचना एक कलात्मक अव्हान आहे. कारण आपली कविता, आपलं साहित्य, प्रस्थापित कला ही मुळात उभ्या (vertical) समाजरचनेत आकारास आली होती. त्यामुळे ती प्रकृतीने पारंपरिक आणि वृत्तीने कंझर्वेटिव्ह होती. नव्या वातावरणात हे समीकरण बदललं आहे हा प्रस्तुत निबंधाचा युक्तिवाद आहे.लॉरेन्स एम. फ़्रिडमनच्या ’द हॉरिझॉंटल सोसायटी’ ह्या विख्यात पुस्तकात आडव्या समाज रचनेबद्दल विस्तृत विवेचन केलं आहे. ते थोडक्यात असं: आधुनिक तंत्रज्ञानाने मानवी अस्मितेची कल्पना कमालीची बदलून टाकली. तंत्रज्ञान क्रांतीमुळे आपलं एकूणच सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवन बदललं. पारंपरिक समाजात मानवी नातेसंबंध आणि परस्परव्यवहार हे उतरंडीच्या रचनेवर आधारित होते. ह्या उतरंडीत खाली असलेल्यांना वरच्यांचं ऐकावं लागायचं. ह्या उतरंडप्रिय समाजव्यवस्थेत माणसाचं स्थान त्याच्या जन्मावरून ठरायचं. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान क्रांतीनंतर हे बदललं. आधुनिक काळ सुरू झाला. त्यात प्रत्येक माणसाला स्वत:ची जन्मदत्त अस्मिता बदलण्याची मुभा मिळाली. आधुनिक समाजात मिडियाचा प्रभाव वाढला. त्यातून पारंपरिक मानवी अस्मितेच्या संकल्पना उलट्यापालट्या झाल्या. खर्‍या अर्थाने समताधिष्ठित समाजरचनेचं सूतोवाच झालं. सामाजिक समतेच्या शक्यता वाढल्या. हा ’खास’ नव्हे तर ’मास’ कल्चरचा प्रभाव आहे असं लॉरेन्स एम. फ्रिडमन सुचवतो.जागतिकीकरणानंतर भारतात माहिती तंत्रज्ञानाची तुफान वावटळ आली. मिडियाची म्हणजेच टेलिव्हिजनची मानवी मनावर, पर्यायाने मानवी जाणिवेवर आणि नेणिवेवर सत्ता स्थापन झाली. माणूस टेलिव्हिजनशी एकरूप झाला. तो मास कल्चरचा उपभोक्ता झाला. त्यामुळे त्याचे पारंपरिक सांस्कृतिक आग्रह सैल झाले. नवे, पाश्चात्य वाटतील असे सांस्कृतिक उपक्रम त्याला आपले वाटू लागले. तमाशा आणि वगनाट्याचा आस्वाद घेणारं मराठमोळं सामुदायिक मन टिव्हिवरच्या सोपऑपेरात गुंग झालं. कोणी काहीही म्हणो, आज भारतात हळूहळू का होईना, पण सर्वत्र आडव्या समाज रचनेची, हॉरिझॉंटल सोसायटीची पायाभरणी सुरू झाली आहे. ह्या दाव्याच्या पुष्टीसाठी रोजमर्राच्या मानवी संबंधांचं उदाहरण देता येतं. काल हे संबंध पुरेसे बंदिस्त होते, आज ते अधिक मोकळे होऊ लागले आहेत.अश्या आडव्या समाजरचनेत सनातनी मूल्यांऐवजी आधुनिक मूल्यं, स्थैर्याऐवजी सळसळ, धाकाऐवजी संवाद, जन्मदत्त अधिकारांऐवजी मानवी अधिकार आणि रम्यतेऐवजी प्रखर वास्तवतेचे विकल्प उपलब्ध असतात. ह्याला मूल्यपरिवर्तन किंवा मूल्यउत्क्रांती म्हणून नव्या बदलांना समजावून घेता येतं. एकेकाळच्या धाकयुक्त सांस्कृतिक पर्यावरणावर खेळकर संवादाचा अंमल सुरू होतोय. घट्ट नाड्या सैलावतायत. गोठलेली मनं वितळतायत. सनातनी प्रवृत्तीला सहनशीलतेशी तडजोड करावी लागतेय. ‘जगा आणि जगू द्या’ आणि ‘हजार गुलाब फुलू द्या’ ही सर्वसमावेशक मानसिकतेला अधोरेखित करणारी दोन वाक्यं उत्तरआधुनिक काळाच्या भिंतीवर चितारलेली दिसतायत. ‘वेलकम टू पोस्टमॉडर्न टाईम!’. आडव्या समाजव्यवस्थेत तुमचं स्वागत आहे हेच जणू काही नवा काळ कवी आणि कवीतरांना ओरडून सांगतोय. काळाचा हा आवाज ऐकणं आणि त्याचा अन्वयार्थ लावणं हे ह्या निबंधाचं प्रयोजन आहे.ह्या काळात म्हणजे, उदाहरणार्थ २०१५ साली, मराठी कवितेच्या सांस्कृतिक पर्यावरणात संकल्पनांचा संकर घडून येतोय. म्हणून नवोत्तर कवितेला समजावून घेणं बौद्धिकदृष्ट्या रोमांचकारी ठरतंय. जर कवितावाचनाची आणि आकलनाची खेळकर शैली रूढ केली, आणि कवितेला जोखताना तिच्याकडे केवळ एक साहित्यिक अभिव्यक्ती म्हणून न बघता कवितेसोबत तिचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि तात्त्विक पर्यावरण विचारात घेतलं तर त्या कवितेचा अर्थ प्रसरण पावतो ही प्रस्तुत निबंधाची भूमिका आहे. थोडक्यात, कवितेच्या आकलनात इंटरडिसिप्लिनरी अ‍ॅप्रोच लागू केला तर त्या कवितेचा आशय व्यापक होण्याची शक्यता आहे. ही शक्यता जोखून बघणार्‍या परंपरेने चालत आलेल्या जुनकट आस्वादनाच्या आणि अर्थांतरणाच्या पद्धतीला नवे पर्याय सुचवावे लागतात. तसा एक प्रयत्न ह्या निबंधात करण्याचा इरादा आहे.

***
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *