Uncategorized

कवितेचे व्यवहार : प्रकाशकांच्या चश्म्यातून (इंद्रायणी साहित्य)

’इंद्रायणी साहित्य’च्या सागर कोपर्डेकरशी साधलेला मनमोकळा संवाद


– संपादक


संपादक : सागर, इंद्रायणी प्रकाशन हे मराठीतलं एक जुनं नाव आहे. एक प्रकाशक म्हणून तू कवितेकडे कसा बघतोस?


सागर : इंद्रायणी प्रकाशनानं एक धोरण म्हणून फारसे कविता संग्रह प्रकाशित केलेले नाहीत. कविता कळणारा वाचकवर्ग हा मर्यादित आहे, त्याचमुळे व्यावहारिकदृष्ट्या कवितासंग्रह प्रकाशित करणं फारसं फायद्याचं नाही. त्यामधे प्रकाशकाचे पैसे अडकून राहतात, पुस्तकांचे गठ्ठे वर्षानुवर्ष जागा अडवून ठेवतात आणि त्यामुळे नवीन काही प्रकाशित करण्यावरोदेखील मर्यादा येतात. शिवाय प्रस्थापित कवींचे त्यांच्या प्रकाशकांशी चांगले सूर जुळलेले असतात. तिथे दुसऱ्या कुणाचा शिरकाव होणं थोडं कठीण.


पॉप्युलर-मौजसारख्या प्रकाशकांनी एका वेगळ्या भूमिकेतून कवितासंग्रह प्रकाशित केले असतील असं माझं मत आहे. तिथे आर्थिक गणितांपल्याड जाऊन हा वाङ्मयप्रकार, चांगले कवी समाजापुढे आले पाहिजेत असा दृष्टीकोन त्यांनी बाळगला असावा. पण आम्ही कवितासंग्रह केलेच नाहीत असं नाही. आम्ही कवी गिरीशांच्या जन्मशताब्दीनिमित्त वसंत कानेटकरांनी संकलित केलेल्या ’गिरीशांच्या समग्र कविता’ प्रकाशित केल्या आहेत. कवी गिरीश हे मराठीतलं एक मोठं नाव, त्यांच्या कविता एकत्रित स्वरूपात पुढे आल्या पाहिजेत असा आमचा मानस होता. शिवाय ’टीकटॉक’ नावाचा बालकवितांचा एक छोटा संग्रह आम्ही काढला होता. इंग्रजीमधल्या कविता, त्याच्या बाजुला मराठी अनुवाद असं त्याचं स्वरूप होतं. या पुस्तकासाठी आम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला होता.


संपादक : उद्या तुझ्याकडे कुणी कविता प्रकाशनासाठी पाठवली तर तुझी निवड प्रक्रिया कशी असेल?


सागर : कविता वाचकाला भावायला हवी, त्याला ती सोपी वाटायला हवी. आमच्याकडे जेव्हा कवितेसाठी प्रस्ताव येतात, तेव्हा मी हेच निकष लावून बघतो.


संपादक : पण कविता हा प्रकार तसा तितकासा सरळ नाही. मग ती वाचकाला सोपी किंवा आपलीशी कशी वाटेल?


सागर : माझी आणि ग्रेसांची फार छान मैत्री होती. ’साजणवेळा’च्या सुमारास ते पुण्यात असताना माझी त्यांची ओळख झाली होती. नंतर कधीतरी मी त्यांना विचारलं होतं की तुमची कविता दुर्बोध आहे असा एक समज आहे. मग ती वाचणाऱ्यानं कशी समजून घ्यायची? तेव्हा त्यांनी मला फार छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की चांगला कवी हा त्याच्या कवितेत वाचकांसाठी काही पॉइंटर्स सोडतो. वाचणाऱ्याला ते पॉइंटर्स सापडले पाहीजेत आणि त्यांच्याशी वाचकाला त्याचे अनुभव जोडता आले पाहिजेत. कवीला काय म्हणायचंय, त्याला काय अनुभव आलेत हे वाचकांना विचारावं लागता कामा नये. कवीला जे सांगायचंय, ते त्यानं कवितेत आधीच सांगितलेलं असतं.


तर माझ्याकडे जेव्हा कवितेचं बाड येतं तेव्हा मी मला काही पॉइंटर्स सापडतात का ते आधी बघतो. मला स्वतःला ती भावते का ते मी पाहतो. त्या कवितेत काही विचार असावा लागतो, जो लोकांपर्यंत पोचणं आवश्यक असतं आणि हे सगळं तपासल्यावर आम्ही त्याची आर्थिक गणितं जुळवून बघतो.


संपादक : पुस्तक आणि वाचक यांच्यामधला दुवा म्हणजे वितरक. एखादा कवितासंग्रह विकला जावा म्हणून वितरकांकडून कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जातात?


सागर : पुस्तकासंदर्भातला सोहळा हा बहुतेक वेळा प्रकाशकांकडून केला जातो. वितरक पुस्तकांसाठी जागा उपलब्ध करून देतात. हल्ली बरेच वितरक स्टेशनरी, इंग्रजी पुस्तकं यांच्या सोबत असावीत म्हणून मराठी पुस्तकं विकतात. आता याला काही अपवाद आहेत. ’अक्षरधारा’चे राठिवडेकर पुस्तकांचे बरेच इव्हेण्ट्स करतात. ’रसिक साहित्य’चे नांदूरकर यांचादेखील एक वेगळा प्रयत्न असतो. त्यांचा ’रसिक आंतरभारती’ म्हणून एक उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत काही वर्षांपूर्वी त्यांनी कवी अनिलांच्या कवितांची सीडी काढली होती. त्याला आनंद मोडकांचं संगीत होतं आणि हृषीकेश रानडे, विभावरी आपटे, अजय गोगावले इ. गुणी गायकांनी त्यांचा आवाज त्या कवितांना दिला होता. या उपक्रमाचं साहित्यिक मूल्य उच्च होतं. वैभव जोशींच्या ’मी वगैरे’ नावाच्या कवितासंग्रहाचादेखील ’रसिक साहित्य’नं छान सांगीतिक उपक्रम केला आहे. पण ही अपवादात्मक उदाहरणं आहेत.


संपादक : चांगली कविता असेल आणि तिचं मार्केटिंगही तितकंच चांगल्या पद्धतीनं केलं तर कवितासंग्रहांना उठाव येतो असं म्हणायचंय तुला?


सागर : हो, विशेषतः ग्रेस किंवा संदीप खरे यांच्यासारखे प्रस्थापित कवी असतील आणि जर त्यांच्या कवितांचं सादरीकरण होत असेल, तर त्यांच्या पुस्तकांची मागणी वाढते असं एक निरीक्षण आहेच.


संपादक :  ’मी माझा’ या चंद्रशेखर गोखले यांच्या तुफान खपाच्या कवितासंग्रहाचं वितरण तू केलं होतंस. त्याचे काही अनुभव सांगशील?


सागर : साधारण वाचकाच्या दृष्टीने बघायचं, तर कवितेचा नि त्याचा संबंध प्रेमात पडल्यावर येतो! त्याआधी कविता भेटते ती अभ्यासाच्या निमित्ताने, मार्क मिळवायचे म्हणून कविता पाठ करावी लागते इतपतच तिची ओळख. कळत्या वयात कविता – तिच्या कुठल्यातरी चार ओळी – अचानक ओळखीच्या वाटायला लागतात, कुठेतरी नेणिवांच्या पातळीवर भिडतात. ही कवितेची गंभीर ओळख.


चंद्रशेखर गोखलेंच्या कवितेचं असंच झालं. ’आय़डियल’च्या नेरूरकरांनी मला हे पुस्तक दिलं होतं. त्या कवितांमधली शब्दमांडणी आणि विचार सहज भिडणारे होते, त्यात कुठे काही क्लिष्ट नव्हतं. चंद्रशेखरला गोखलेंना भेटल्यावर त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि ते फसवले जाण्याची शक्यता मला स्पष्ट दिसत होती. म्हणून मी ’मी माझा’च्या वितरणाची जबाबदारी घेतली. मी निव्वळ शंभरेक प्रतींपासून वितरणाची सुरुवात केली आणि त्याची सांगोवांगी प्रसिद्धीच इतकी झाली होती, की माझं काम फक्त मागणीनुसार पुरवठा करणं इतकंच उरलं होतं.


संपादक :  ’मी माझा”चं वितरण करताना तुला कुठला पॅटर्न जाणवला का?
सागर : या एका पुस्तकाच्या बाबतीत मी पाहिलं, की ते सगळीकडे पोहचलेलं होतं. नाशिक, कोल्हापूर, अकोला अशा सर्वच भागातून त्याला मागणी होती. मघाशी म्हटल्याप्रमाणं, त्या पुस्तकातले विचार साध्या भाषेले आणि सहजपणे भिडणारे होते. कॉलेजमधे जाणारी मुलं भेट द्यायला हे पुस्तक वापरायची. ’मी माझा’सारखीच दिसणारी, तशाच फॉर्ममध्ये लिहिलेली असंख्य पुस्तकं नंतर आली. निव्वळ ट ला ट जोडून किंवा गोखल्यांच्याच काही ओळी मोडून-वापरून लिहीलेली ही पुस्तकं वितरित करण्यासाठी मला विचारणा झाली होती, त्यातल्या काहींना आर्थिक फायदाही झाला पण मला त्यात पडायचं नव्हतं. ती कमअस्सल प्रॉडक्ट्स होती. अशी निदान पंचवीसेक पुस्तकं आलेली मला माहित आहेत. पण ती काळाच्या ओघात टिकली नाहीत. का? कारण त्यात तो विचार नव्हता. गोखल्यांच्या कवितेचा ‘भावणं’ हा एक जो गुण होता तो या बाकीच्या नकलांमधे नव्हता.


संपादक : आपण एकीकडे कवितासंग्रहांच्या खपाबद्दल बोलतो तेव्हाच ब्लॉगसारख्या माध्यमातून बऱ्या-वाईट कवितांचं मोठं पीक आलेलं दिसतं. विनाखर्च उपलब्धता आणि इंटरनेटचा सर्वदूर आवाका या कारणांपलीकडे या तथाकथित विरोधाभासाची अजून काही कारणं आहेत असं तुला वाटतं का?


सागर : आजही साहित्यसंमेलनात कोटीकोटी रुपयांची पुस्तकं विकली जातात. तेव्हा पुस्तकं विकलीच जात नाहीत असं नाही. आज मुळात पुस्तकं प्रमोट करावी लागतात, वाचकांपर्यंत सतत त्या पुस्तकाबद्दलची माहिती पोचवत राहावी लागते आणि एकदा लेखक स्थिरावला की त्याची पुस्तकं विकली जातातच. पूर्वी सांगोसांगी प्रसिद्धी व्हायची, मोठे प्रकाशन सोहळे व्हायचे किंवा ’सत्यकथा’सारखी दर्जेदार मासिकं होती; ’ललित’, ’साहित्यसूची’सारखी नव्या पुस्तकांची दखल घेणारी माध्यमं होती, ज्यांच्यामुळे नवे कवी वाचकापर्यंत पो़चायचे. मघाशी तुला म्हणाल्याप्रमाणे, वितरकांची भूमिका आज मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून जवळजवळ फुकट काही वाचायला मिळणार असेल, तर लोक ते नक्कीच वाचणार. माझं असं निरीक्षण आहे की ब्लॉगवर जे असतं ते सर्वच चांगलं असतं असं नाही. त्यातलं जे खरंच चांगलं आहे ते टिकावं आणि जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचावं हे महत्त्वाचं. ब्लॉगवर पंधराएक कविता वाचल्या तर एखादी कविता चांगली निघते, बाकी निव्वळ टाकाऊ असतात. ग्रेस नेहमी म्हणायचे की तुम्ही जे लिहिता ते तुम्हीच खा, म्हणजे ते अर्धकच्चं आहे की कसं ते तुम्हांला कळेल, तुमची पचनशक्ती वाढेल आणि मग तुमच्या हातून चांगलं लिखाण होईल. तेव्हा ब्लॉगवर मिळणाऱ्या झटपट प्रसिद्धीच्या मागे लागून अर्धकच्चं काहीतरी लोकांपर्यंत नेणं हे कवीसाठीच घातक असतं.


संपादक : कविता इथून पुढे कुठे जाईल असं तुला वाटतं?


सागर : कविता पुढेच जाईल! गुलज़ार एकदा खाजगी बैठकीत म्हणाले होते की भाषेची उत्क्रांती होताना व्याकरण असं हवं, शब्द असेच हवे किंवा त्यात इंग्रजी शब्द नकोच असा कोणताही अट्टहास कशाला? वयाच्या ब्यांशीव्या वर्षी हा माणूस इतका मोकळेपणाने विचार करतो! या वयात लोक हट्टी बनतात… मराठीत फारसीमधून, अरबी भाषेतून बरेच शब्द आले आहेत, ते येऊ द्यावेत, त्यानेच भाषा समृद्ध होते. कवितेत असे प्रकार व्हायला हवेत. मराठी कवितेत असे वेगळ्या भाषेतले शब्द आले किंवा हिंदी/ इंग्रजी ओळी आल्या; तर येऊ द्याव्यात की. कदाचित यातूनच जास्त लोकांपर्यंत पोचता येईल असं मला वाटतं. मला वाटतं, कविता ही शेवटी एक संभाषणाचं माध्यम आहे, तेव्हा लोकांना कळेल असं कवींनी लिहावं. लिहिताना ’या हृदयीचे त्या हृदयात घालणे’ हा मूळ उद्देश विसरू नये हे महत्त्वाचं.
***
चित्रस्रोत : सागर
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *