Uncategorized

पत्र-कथा

– मेरा कुछ सामान
पत्र – १


समीर,


खरंच तुझं पत्र आलंय… तुझ्या हस्ताक्षरातलं? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. चला, चांगलं झालं. पहिल्या नाही, तर किमान दुसर्‍या पुस्तकावर तरी तुझी प्रतिक्रिया मिळाली. अर्थात काही मुद्द्यांवर तू वाद उपस्थित केले असलेस तरी तुझं पत्र आलंय… माझ्यासाठी… माझ्या नावे… हा आनंदच खूप मोठा आहे माझ्यासाठी. त्यातूनही तू पत्र पाठवलंस, मेल नाही केलास, याचा आनंद वेगळाच. पुस्तकावर नंतर करू चर्चा. आधी सांग, तू कसा आहेस? ५ वर्षं झाली रे! ढापणं लागली मला. तिशी ओलांडली मी. आता मीही तुझ्या पंक्तीला. ही सगळी तू न विचारलेली माहिती. कारण तू विचारली नाहीस, तरी तुला ती हवी होती हे मला तुझ्या पत्रातून नीटच समजलेलं…


तू सांग, कसं चाललंय सगळं? रसिका कशी आहे? तिचे पेपर्स कशाकशात प्रकाशित होत असल्याचं समजत असतं अधूनमधून कोणाकोणाकडून. एकूण तुझं छान चालल्यासारखं वाटतंय. चाललंय ना?
आणि ते शेवटचं वाक्य का होतं तुझ्या पत्रात? तू माझ्यासाठी थांबावंस अशी माझी इच्छा कधीच नव्हती. त्यामुळे तू थांबला नाहीस याचं वैषम्यही नाही. कारण मुळात मी कोणासाठी थांबलेली नाही. किंबहुना मी कोणासाठी चाललेलीही नाही. मी फक्त स्वतःची वाट चालत होते आणि अजूनही तेच करतेय. पुढेही चालत राहीन. आणि जी गोष्ट आपण दुसर्‍यासाठी करत नाही, करू शकत नाही; ती आपल्या बाबतीत कोणी करावी अशी अपेक्षा करू नये हे शहाणपण नक्कीच आहे मला. त्यामुळे तुझ्याविषयी असला, तर आनंदच आहे; तू नीट स्थिर झालायस – तुला हवा तसा – हे पाहून.


आणि शेवटी माझ्या कथांबाबतच्या तुझ्या मुद्द्यांचं उत्तर, एका वाक्यात – “माझ्या नायिका आता मॅच्युअर झाल्यात…”


– राधा
***
पत्र – २


सम्या,


माझ्या नायिका मॅच्युअर झाल्यात, हा उपहास होता, टोमणा की खरंच कौतुक? काहीही असो. पण वयाबरोबर येतं रे शहाणपण लोकांना. फक्त प्रत्येकाचं वय वेगळं असतं आणि त्यामुळेच प्रत्येकाचा पल्लाही.


आणि आता मॅच्युअर नायिकांचं म्हणशील तर, हो! आता त्यांना प्रत्येक वेळी लढा द्यायची आणि स्वतःचंच खरं करण्याची गरज वाटत नाही हे बाकी आहे. तुम्हांला मत आहे म्हणून प्रत्येक वेळी ते मांडलंच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट समानतेच्या आणि तत्त्वाच्या तराजूत तोललीच पाहिजे असा आता त्यांचा आग्रह राहिला नाहीये. पण याचा अर्थ असा नाही, की त्या पारंपरिक व्यवस्थेला शरण गेल्यात. त्यांनी आणि त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्त्व आणि माणूसपण मान्य केलंय, त्यांच्यातल्या चांगल्या-वाइटासह… असा अर्थ आहे त्याचा. त्यांच्यावर त्याग लादला नाही गेला. त्यांनी त्याग केलाच पाहिजे, तडजोड ही कायम त्यांच्या बाजूनेच झाली पाहिजे असा काही त्यांच्या पार्ट्नर्सचा आग्रह नव्हता. अग्रेसिव फेमिनिजमचा टप्पा त्यांनी कधीच पार केलाय.
म्हणजे बघ, उद्या रसिकाने काही घरगुती कारणासाठी जॉब सोडला; तर मी म्हणणार नाही, की ती बाई आहे, म्हणून तू तिला त्याग करायला लावलास. मला खात्री आहे, की तो फक्त तुम्हां दोघांना सोयीस्कर वाटलेला निर्णय असेल – तुम्ही दोघांनी मिळून घेतलेला. या निर्णयात जर तुझं जॉब सोडणं सोयीचं ठरलं असतं, तर तू सोडला असतास. As simple as that. पण हीच गोष्ट जर एखाद्या पारंपरिक जोडप्यामध्ये घडली असती, तर मात्र मी स्त्रीमुक्तीची टिमकी वाजवली असती नक्कीच. पण तुमच्या बाबतीत नाही. बस्स. हाच फरक तर समजावून घ्यायचाय. समजूतदारपणा लादलेला नसतो तेव्हा, तो आतून उमलून येतो तेव्हा, त्यासारखी सुंदर आणि आश्वासक गोष्ट जगात कोणतीच नसते, नात्यातल्या दोन्ही बाजूंकरता.


त्या कथांत मला ज्या मानसिकतेविषयी बोलायचं आहे, ती सार्वत्रिक व्हायला कदाचित अजून थोडा वेळ लागेल; पण त्याची सुरुवात झालीये हे नक्की. काय वाटतं तुला?


बाकी, तात्त्विक चर्चेखेरीज इतर काही लिहिताना तुझ्या पेनातली शाई संपते का रे? बाकी काहीच लिहीत कसा नाहीस? तुझ्या घराविषयी, गॅलरीत येणार्‍या पक्ष्यांविषयी, कुंडीतल्या शेवंतीविषयी… ? तेही लिही…


– राधा
***
पत्र – ३


समीर,


तुझ्यापासून वेगळं झाल्यानंतर दोनेक वर्षांनंतरची गोष्ट आहे. जेजे आणि मी सहज म्हणून भटकत होतो. भर उन्हाळ्यात. आता माझे डोहाळे तर तुला माहितीच आहेत. उन्हं तापायला लागली, पाऊस मी म्हणायला लागला आणि थंडी हाडांत शिरायला लागली, की मला बाहेर भटकायची हुक्की येते. तर त्या दिवशी दुपारीही चांगली सुखात घरी बसलेली असताना मला बाहेर जायची उबळ आली आणि मग घोड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने जेजेलापण उन्हात बाहेर पडावं लागलं; अर्थातच त्याची इच्छा नसताना. त्यामुळे त्याची चिडचिड आणि त्यावर माझं सातमजली हसू अशी आमची वरात चाललेली. इतक्यात मला कुंपणाच्या भिंतीवर चढून काढता येईल असा बहावा दिसला. मग काय होतंय, असं म्हणत चढले की मी! आणि हा भर रस्त्यात हताश होऊन उभा. तीन-चार घोस काढल्यावर शेजारून जाणार्‍या एक आजीबाई म्हणाल्या, मलाही दे दोन काढून. मग त्यांच्यासाठी अजून दोन काढले. हा अवाक.


खाली उतरल्यावर म्हटलं त्याला, “तोंड बंद कर.”
तर म्हणे कसा, ” “Good God! You are impossible. You can’t do this at the age of 30, you crazy woman…”
मी म्हटलं, “I will be doing this at the age of 60, you old man… Wait and watch.”


मग काही बोलला नाही तो. माझा स्क्रू अगदीच ढिला असल्याची खात्री पटली असावी त्याला. But he was a nice man. त्याच्याइतकी माझी काळजी कोणीच कधी घेतली नाही. आधीही, नंतरही. पण मग कधी कधी माझं डोकं सटकायचं आणि मग मी त्याच्यावर प्रचंड वैतागायचे, “Goddamn! I am not your responsibility, dude. Control…”


हे माझं भरतवाक्य ऐकलं की मग मात्र खरंच दुखावला जायचा तो. पण तो तसाच होता. माझीच नाही, तर त्याच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाची अशीच काळजी घ्यायचा तो.


आजही अमलताश पाहिला की मला तो आठवतो. मोठ्ठाल्या स्वप्नाळू डोळ्यांचा, हडकुळ्या चित्रकारी हातांचा, ढगळे ढगळे रंगांचे डाग पडलेला टी-शर्ट घालणारा आणि विस्कटलेल्या केसांचा. माझं म्हणून एक चित्र काढून दिलेलं त्याने. नुसत्याच एका छोट्याश्या दाराला खूप मोठं कुलूप. “त्यापलीकडच्या खोलीच्या आकाराची व्याप्ती, त्या खोलीतलं जग काहीच माहीत नाही. बाहेरून बघणारा फक्त त्या मोठ्या कुलुपाकडे बघूनच दडपणार.” त्याचं वाक्य.


ह्म्म्म…


तुझ्या पत्रातल्या तुझ्या अंगणातल्या अमलताशाच्या उल्लेखाने मला त्याचीच आठवण आली. बाकी तू नशीबवान आहेस. सध्याच्या जगात अंगण असलेल्या घरात राहतोस आणि अंगणात काय, तर अमलताश! स्वर्गाची गरज काय आहे तुला? How I envy you, Sam…


– राधा


P.S. By the way, Ananya is a nice girl. She and JJ shifted together about a year ago.
 
***
पत्र – ४


मीर,


मीर… मीर…. मीर….


किती वर्षं झाली रे तुला या नावाने हाक मारून… थॅक्स… मी तुला अजूनही मीर म्हणू शकते हे सांगितल्याबद्दल. पहिल्यांदा ही हाक मी तुला कधी मारलेली आठवतंय?


कोजागिरी होती. तुझ्याच फ्लॅटच्या गच्चीवर जमलेलो ना आपण! योगायोगाने शनिवार असल्यामुळे दुसर्‍या दिवशी लवकर कामाला पळायचीपण घाई नव्हती कोणाला. अक्का कसला सुटलेला त्या दिवशी… हसून हसून पुरेवाट झालेली सगळ्यांची. पहाट होता होता सगळे पेंगुळले. आपणच जागे होतो दोघे. असं तास-दोन तास रात्रीच्या नीरव शांततेत तुझ्यासोबत बसून राहण्याचा अनुभव वेगळाच होता आणि त्यात आपल्याला भेटूनही उणेपुरे सहाच महिने झालेले.


चांदण्या अंधुक व्हायला लागल्या, तशा निरोपाच्या स्वरात मीच म्हणाले तुला, “अर्रे, सम्या…”
माझं वाक्य तोडत तू म्हणालास, “मीर…”
“…?”
“सम्या नाही… मीर म्हण.”
“आणि ते का?”
“कृष्णाची जशी मीरा, तसा राधेचा मी मीर…”


सरसरून काटा आलेला अंगावर त्या क्षणी. आणि तेव्हापासून तू माझ्यासाठी कायमचा माझा मीर झालास. तसं पाहता कृष्णाने काय दिलं मीरेला? आपल्याला दिसेल असं काहीच नाही. मीरेचं खरं देणं तिच्या भक्तीचं, प्रेमाचंच होतं. आणि तसं मी तरी काय दिलेलं तुला? माझं म्हणून जे देणं तू कायम मानत राहिलास, सांगत राहिलास ती खरंतर तुझ्याच प्रेमाची, तुझ्या विश्वासाची देण होती, नाही का?
मला वाटत होतं, जे झालं त्यानंतर मी हरवून बसलेय तुला मीर म्हणायचा अधिकार. आणि किती सहजपणे आज पुन्हा तो अधिकार दिलास तू मला? खरंतर, आज हे श्रेय तुझ्यापेक्षा रसिकाचं जास्त आहे. कसं काय इतक्या सहजपणे मान्य केलं तिने तुझ्या मनातलं माझं अस्तित्व? खरच तुमच्या नात्यातला हा बंध कौतुक करण्याजोगा आहे. अशी एकरूप झालेली जोडपी बघताना वेगळंच वाटतं रे… ती भावना अजूनही शब्दांत नाही मांडू शकलेले मी. कोण म्हणतं तीन माणसांच्या कथेत एक माणूस असंवेदनशील असायलाच हवा किंवा व्हीलन हवा? त्याशिवाय गोष्टीत अनेकरंगी छटा येत नाहीत? आपली कथा आहेच की पुरेशी रंगीबेरंगी… आपल्याच गुंतागुंतीने तयार झालेली…


मी कधी आपली कथा लिहिली, तर तिला नाव देईन, ‘तीन शहाण्या माणसांची गोष्ट’.


– राधा
***
पत्र – ५


मीर,


अनोळखी शहर ओळख कसं दाखवायला लागतं? ओळखीच्या पाऊलखुणा दाखवत मनात कसं भरत जातं? आणि पानगळीसारखं गळून जात मनातून संपून कसं जातं? शहरात नवीन आलेल्या, बावरलेल्या, भेदरलेल्या पोरीला त्या शहराने मैत्र दिलं, विश्वास दिला, प्रेम दिलं आणि मग अश्रू दिले, विश्वासघात दिला, तिरस्कारही दिला… त्याही पुढे जाऊन तुटलेलं सगळं कणाकणाने जोडलं. एक काळ होता, लहानपणीचाो – आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला घडवण्याचा. मग ’तो’ काळ आला. मनावरची सगळी पुटं गळून जाऊन आपल्या आतला लसलसता गाभा स्वीकारण्याचा. मोडण्याचा. कोसळण्याचा आणि मग नव्याने रुजून येण्याचाही… या सगळ्याचं साक्षीदार म्हणून ते शहरही मला प्रिय. माझा पैलू. माझ्या असण्याचा भाग.


पण त्या दिवशी मनातून पूर्णपणे तुटलं त्या शहराशी असलेलं नातं. एक शेवटचा हळवा कोपरा त्या दिवशी बंद झाला. नंतर शहर सोडेपर्यंतचा काळ फक्त शरीराने वावरत राहिले मी तिथे.


खूप विचार करूनही मला आजवर कळलं नाहीये, की नक्की काय चुकलं माझं? म्हणजे इतरही गोष्टी आहेत, घटना आहेत; ज्यांत चुका झाल्या. पण नंतर विचार करताना कळत गेलं, नक्की कुठे, कसं, काय चुकलं ते. त्यामुळे ते सुधारताही आलं. थोडक्यात काय, तर Peace was successfully established with most of the past. पण या बाबतीत तसं झालंच नाही. म्हणून हे कुरतडत राहतं आजही अधूनमधून.
वास्तविक पाहता मैत्री करताना मी काही अटी घातल्या नव्हत्या, की फक्त समानतावादी आणि फेमिनिस्ट लोकांशीच मैत्री केली जाईल म्हणून. मग मी कोण होते चिडचिड वाटून घेणारी सगळ्यांनी आपापल्या वाटा निर्माण केल्या नाहीत म्हणून; मुलींनी, मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला नाही आणि मुलांनी हुंडा नाकारला नाही म्हणून तरी? ही गोष्ट जाणवली, तेव्हा वास्तविक ‘हुश्श’च वाटलं होतं मला. शेवटी नियम पाळणं आणि न पाळणं दोन्हीही आपल्या सोयीचाच भाग. पण त्यांनीतरी माझ्याविषयी काय विचार केला?


आयुष्यात खूप वाईट काळ चालू होता, तेव्हा मी कायम सिद्धार्थचं बोलणं आठवायची. एकदा-दोनदा नाही, तर शंभरदा त्याने स्वतःहून मला सांगितलं होतं; की तोच माझा सगळ्यांत चांगला मित्र आहे. तसा तो बर्‍यापैकी चांगला मित्र होताही. पण तुला माहितीये ना, तू येण्याआधी आणि तू आल्यानंतरही,  तुझ्या जवळपास पोहोचू शकेल असंही कोणी नव्हतं कधी. आणि हे मी त्याला स्पष्टच सांगितलं एकदा. तेही त्याने आग्रह केला म्हणून. तेव्हापासूनच कदाचित सगळं बदलत गेलं असावं. पण तरी तो सांगायला विसरायचा नाही, की त्याच्या नजरेत मला वेगळं स्थान होतं, आहे आणि तोच माझा सगळ्यांत चांगला मित्र आहे. तर, त्या वाईट काळात कायम स्वत:ला हे म्हणत राहिले मी, की “चला, at least सिद्धार्थतरी आहे सोबत. तो तरी आपल्यावर शिक्के मारायची घाई नाही करणार. After all, life is not that bad. या शहरात जतन करण्यासारखं काहीतरी आहे माझ्याकडे. आणि मग तो दिवस आला. ती भेट झाली. काही काळापासून मला जाणवत आलेलं सगळं त्याच्या नजरेत उतरलं होतं आणि मग त्याच्या शब्दांतूनही आलं. माझं हे असं उत्कट असणं, माझे खूप जिवलग असणं… या सगळ्याकडे सिद्धार्थनेही तसंच पाहिलं होतं. ती संध्याकाळ मी कधीच विसरू शकणार नाही. त्या दिवशी त्याला भेटून आल्यावर वेड्यासारखी रडले होते मी. सिद्धार्थ शेवटचा धागा होता त्या शहराशी मला जोडणारा. त्या दिवशी तो तुटला. त्यानंतर बदलीची पहिली संधी येईपर्यंत निर्जीव शरीरासारखी वावरत राहिले तिथे. आता पुन्हा त्या शहराकडे कधी पावलं वळतील अशी शक्यता कमीच आहे.


– राधा
***
पत्र – ६


प्रिय मीर,


तुला कायमच कळत आलंय मला काय वाटतं, मला काय म्हणायचं असतं, ते. कधी कधी तर मी बोलण्याआधी आणि मला वाटण्याआधी तुला कल्पना यायची त्याची. पण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त काहीतरी आहे, जे कदाचित अजून तुझ्यापर्यंत पोचलं नाहीये. तसा आता हे सगळं तुला सांगण्याचा काही उद्देश नाही. नुसतच पानांचा आणि शाईचा अपव्यय. पण तरी तुला हे सांगावसं वाटतंय मला. गेल्या पाच वर्षांत मला माझ्याविषयी झालेले साक्षात्कार म्हण हवं तर. पण नंतर जाणवत गेल्या त्या गोष्टी अशा होत्या. आणि तू सोबत होतास, तेव्हा त्या तुझ्यापर्यंत पोचवायला मीच कमी पडले कदाचित; कारण मलाच हे सगळं उमजून आलं नव्हतं.


तुला माहितीय, मी पाच वर्षांची असताना आई-बाबा गेले, तेव्हापासून मोठ्या काकांकडेच राहिले मी. तसा काही त्रास नव्हता, पण प्रेमही नाही मिळालं कधी. त्यांची मुलं माझ्यापेक्षा खूप मोठी. त्यामुळे मी खिजगणतीतही नाही त्यांच्या. पुस्तकांमध्ये रमायचे आणि मग तशी माणसं बाहेरच्या जगात शोधायला धडपडायचे. या अशा जगण्यातल्या आणि कल्पनेतल्या अंतरामुळे मित्र-मैत्रिणीही नाही मिळाल्या. ग्रूप असा झाला, तो अगदी कॉलेजला आल्यावरच. तेही तिसर्‍या वर्षाला आल्यावर. तोवर आम्ही छोट्या-मोठ्या नोकर्‍या करून शिकण्यातच बेजार. बारावी आणि अठरा वर्षं पूर्ण झाली, तेव्हाच काकांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, की आता ग्रॅज्युएशन करायचं असेल तर स्वत: कमवा आणि शिका. नाहीतर जे स्थळ येईल त्याच्यासोबत अक्षता टाकून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करतो.  


त्यामुळे निकाल लागल्यावर जी मी बॅग घेऊन बाहेर पडले, ती आजतागायत कधी परत गेले नाहीये आणि त्यांनीही कधी चौकशी करायचा प्रयत्न केला नाही. तर मग जगण्याची ही अशी भ्रांत असल्यावर कसला ग्रूप आणि कसलं काय. पण तिसर्‍या वर्षाला येईपर्यंत स्कॉलरशिप मिळाल्यामुळे जरा निवांत झालेले तेव्हा. त्या वेळी खरंच आपली म्हणावीत अशी काही माणसं भेटली. तोवर प्रेम आणि सुरक्षितता अशी कोणाच्या सहवासात वाटलीच नव्हती. आणि या भावना बाहेर शोधता शोधता स्वतःच्या आतच एक जग बनवून घेतलं मी. तू त्या जगात येणारा पहिला होतास, आणि आजवर तरी एकमेव… कदाचित म्हणूनच तुझ्यानंतर भेटलेल्या सगळ्यांची, माझ्या बाकीच्या सर्व मित्रांची, अगदी मैत्रिणींचीही तुलना मी कायम तुझ्याशी करत राहिले. गंमत म्हणजे या सगळ्यांची मी आंपसांत कधीच तुलना केली नाही. तुझ्याशी मात्र सगळ्यांची केली. आणि अजूनही तूच सरस वाटतोस. सगळ्यांपेक्षा कणभर जास्त जवळचा.


पण तू विचारलंस, तेव्हा हे सगळं जाणवण्यापलीकडे गोंधळले होते मी. माझं तुझ्यावर प्रेम होतं, तुझं माझ्यावर जिवापाड प्रेम होतं, यापलीकडे कधी काही विचार करण्याची गरजच वाटली नाही मला. नाव देण्याचीही गरज वाटली नाही आणि सोबत राहण्याचीही गरज वाटली नाही. तू होतास, मी होते आणि का कोण जाणे, पण तेवढंच पुरेसं होतं मला. अरे, तुला भेटले तेव्हाच पंचवीस वर्षांची होते मी. एक तृतीयांश आयुष्य तर नक्कीच सरलं होतं माझं. एकटी राहायला लागूनच सात वर्षं झालेली. माझं व्यक्तिमत्त्व, धारणा, कल्पना, सगळ्या तयार झालेल्या. पण तरीही तू त्या सगळ्याला हादरा दिलास. तोवर काही मित्र-मैत्रिणी झाल्या असल्या, तरी मनाचं दार काही उघडू शकले नव्हते कधी कुणापुढे. बाकी सगळ्यांचा कंटाळा यायचा तसं त्यांच्यासोबत काही वाटायचं नाही आणि चांगल्या गप्पा वगैरे व्हायच्या वेगवेगळ्या विषयांवर; बाकी माझ्या एकटेपणाचा आणि फकिरीचा त्यांनी कधी बाऊ नाही केला, म्हणून हे मैत्र निर्माण झालं. पण माझ्याही नकळत माझ्या मनाच्या इतक्या आत प्रवेश करणारा, माझे विचार उघड्या पुस्तकासारखे वाचणारा, माझ्यातलं चांगलं-वाईट मला माझ्या तोंडावर सांगणारा आणि तरी त्या सगळ्यासकट माझ्यावर असा जिवापाड प्रेम करणारा; तू  पहिला आणि एकमेवच. तुझ्या सहवासात अनुभवलं मी, प्रेम काय असतं… सुरक्षित वाटणं किती छान असतं… स्वतःची काळजी न घेता काही काळ कोणासोबत राहता येणं किती लोभस असतं…


पण तुझ्याही काही अपेक्षा होत्या आणि तू विचारल्यानंतर त्या मला जाणवल्या. माझा त्या अपेक्षांवर आक्षेप नव्हता, शंका होती. स्वतःबद्दल…


तुझ्यासोबत घालवलेली तीन वर्षं, हा खरंच असा काळ आहे; ज्यासाठी पंचवीस वर्षं वाट बघणं वाजवी होतं. पण त्या तीन वर्षांनंतरही मी काही पुरेशी बदलले नव्हते, असं आता वाटतंय. म्हणजे बदल नक्कीच झाला होता, पण कदाचित सगळं जगणंच बदलण्याइतका नव्हता तो.


मीर, अर्रे! तू पहिल्यापासूनच असा. कुटुंबवत्सल गृहस्थासारखा. नि तरी माझ्यासारख्या बाईवर प्रेम करणारा. तुझी भेट होण्याआधी काही गोष्टी ठरवूनच टाकलेल्या मी स्वतःशी. त्यांतल्या काही तुला भेटूनही बदलल्या नाहीत. स्वतःच्या एकटेपणाला इतकी सरावलेले तोवर मी… चटावलेले म्हण हवं तर, की थोडा वेळ लोकांच्यात गेला की परत मला स्वतःच्या एकटेपणात परतावंसं वाटतं. तेव्हाही वाटायचं. आपल्या आजूबाजूला चोवीस तास माणसांचं अस्तित्व असणार आहे आणि तेही अनोळखी व्यक्तींचं नाही, तर मला ओळखणार्‍या लोकांचं, नातलगांचं… हा विचारच मला भोवळ आणायला पुरेसा होता.
शिक्षण पूर्ण करून स्थिर होण्याचा संघर्षाचा काळ मोठा होता माझ्यासाठी. आणि खूप कठीणही. या सगळ्या काळात मी खूप एकटी होते रे. त्यामुळे संघर्ष करताना कोणाची सोबत असते, तेव्हा भावना काही वेगळ्या असतात का याची मला कल्पना नव्हती. अजूनही नाहीय…


वास्तविक पाहता आयुष्यातल्या संघर्षाच्या काळाबद्दल लोकं खूप आसुसून बोलतात, भावुक होतात. प्रसंगी त्या काळातून निभावून नेल्याचा अभिमानही बाळगतात. पण माझ्या आयुष्यातल्या या संघर्षमय भूतकाळाकडे बघताना मला कधीच अभिमान वगैरे वाटला नाही रे. खूप दु:ख आणि वेदनाच होत्या त्यात आणि त्या सगळ्याचा त्रासच झाला मला. बरं, पुन्हा त्या सगळ्यांत एकटी होते मी. अनेक दिवस, रात्री, आठवडे, महिने, वर्षं… कणाकणाने तुटत आणि पुन्हा जुळवत सावरलंय मी स्वतःला. त्यामुळे संघर्षमय काळात सोबत करणं किंवा सोबत येण्यासाठी संघर्ष करणं या गोष्टी मला माझ्यापुरत्यातरी फॅन्टसीज्‌ वाटतात. आणि तुझ्यासोबत येण्यासाठी आणि कधीही न अनुभवलेल्या कुटुंबव्यवस्थेत सामावण्यासाठी लागणारा संघर्ष करायची माझी तयारी नव्हती. त्या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या कधीच तयार करू शकले नाही मी स्वतःला.


एखादी गोष्ट माहिती असणं, ती समजणं आणि ती आत्मसात होणं या तीनही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं, आपल्याला राग येतो आणि रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे हे आपल्याला माहिती असतंच. राग येण्याच्या आणि शांत राहण्याच्या क्रियांचं विश्लेषण करता येतं; त्याविषयी मतं तयार होतात, तेव्हा आपल्याला ते समजलेलं असतं. पण हीच गोष्ट जेव्हा आपण आचरणात आणायला जातो, तेव्हा तो एक सर्वस्वी वेगळा आणि विचारांच्या पलीकडचा अनुभव ठरतो. आपण वर्षभर विचार करुन, विश्लेषण करून जे मांडू शकणार नाही, ज्यापर्यंत पोहचू शकणार नाही, तिथवर पोहोचवण्याची क्षमता एका दिवसाच्या अनुभूतीत असते. आणि गीता असो, सूफी तत्वज्ञान असो की झेन कथा असो; या सगळ्या ज्ञानाचा गाभा, आत्मसात करण्याच्या या प्रवासात आहे.


आणि ही गोष्ट जेव्हापासून जाणवलीय ना, तेव्हापासून स्वतःच्या विचारांचं आणि विश्लेषणांचं कौतुक वाटणं बंद झालंय बघ. मला भलेही लाख गोष्टी माहिती असतील. त्यांतल्या हजारो समजत असतील; पण जोवर त्यातली एखादीतरी मी आत्मसात करू शकत नाही, तोवर माणूस म्हणून मी तितकीच अपूर्ण असते. अगदी माझ्या सगळ्या विचारांसह मी अपूर्ण असते…


हेच तर झालं ना… लहानपणापासून कुटुंबाला, प्रेमाला पारखी झालेली मी – वाचून, विचार करून, हे सगळं हवं असणं पटत होतं. पण आत्मसात झालं नव्हतं. म्हणूनच प्रत्यक्ष असं काही घडण्याची शक्यता दिसली तेव्हा पळ काढला मी. मला हवी तशी माणसं मिळत नाहीत, म्हणून खूप त्रागा केला कधी एके काळी. मग माणसं आहेत तशी स्वीकारायलाही शिकले. पण माझ्या मनाचा कुठलातरी एक हट्टी कोपरा अजूनही जिवंत आहे आणि अजूनही नकार देतोय वास्तव स्वीकारायला. माझ्या मनासारखी माणसं भेटणार नाहीत, हे वास्तव नव्हे; तर अशी माणसं भेटली तरी सांभाळून हे घ्यावंच लागतं, कारण तीही शेवटी माणसंच आहेत, हे वास्तव…


तुझ्या कुटुंबात नसतेच सामावले गेले रे मी. आणि त्यासाठी लागणारा त्रास सोसण्याचीही माझी तयारी नव्हती – तुझी असली तरीही. एकंदर अठ्ठावीस वर्षं आयुष्याचे रंग पाहिल्यानंतर मी अशा स्थितीला आले होते, की आयुष्यात आनंद नसला तरी चालेल, पण दु:ख नको, त्रास नको, संघर्ष नको. सोबतीला अगदी तू असलास तरी… आणि तुझ्याबाबतीतली कोणतीही गोष्ट मी औपचारिकता म्हणून करू शकले नसते हा मुद्दा तर आहेच. माझं सर्वस्व ओतूनही ते कमी पडण्याची शक्यता ज्या वाटेवर आहे, त्या वाटेवर मला जायचा धीर झाला नाही. आठवतंय तुला? तू विचारल्यानंतरच्या काळात माझी चिडचिड, माझा हेकेखोरपणा वाढला तो अगदी तू दूर जाईपर्यंत… तुला कळतच नव्हतं काय बिनसतंय… आणि तेव्ह कदाचित मलाही कळत नव्हतं ते. पण त्यात तुझी काही चूक नव्हती रे. तू तसाच होतास.  आधीसारखा. मीच माझ्या मनातल्या भीतीला घाबरून दूर पळाले. तुझ्यापासून… आपल्यापासून. पळून गेले रे मी मीर. पळपुट्यासारखी…


आणि आज पुन्हा मी तेच करणार आहे. होय मीर, आज पुन्हा मी तुझ्यापासून दूर जाणार आहे. कारण मी अशीच बोलत राहिले तुझ्याशी, तर मला नाही सहन होणार. पुन्हा कशी आणि किती निखळेन माहिती नाही आणि आता निखळले तर पुन्हा जुळू शकेन याची खात्री नाही.


करू शकलासच कधी, तर माफ करून टाक मला. बाकी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला सापडत राहीनच मी थोडी थोडी तुझ्यात कायम. Bye Meer…!


– राधा
***
***

चित्रस्रोत: आंतरजालावरून साभार
Facebook Comments

1 thought on “पत्र-कथा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *