Uncategorized

रेषेवरची अक्षरे २००९

‘रेषेवरची अक्षरे २००९’ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.


***
‘रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक आपल्यापुढे ठेवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. मराठी ब्लॉगविश्वातील उत्तम प्रतीचं लेखन वेचून ते दिवाळीच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मागच्या वर्षी केला. आमच्या जराही न ओसरलेल्या उत्साहाचं भांडवल व ह्या उपक्रमातून मिळणाऱ्या आनंदाचं लालूच ह्या दोन गोष्टी हा उपक्रम यंदाही सुरू ठेवण्यास पुरेशा ठरल्या. गेल्या वर्षीच्या अंकाबद्दल ब्लॉगविश्वातील व ब्लॉगविश्वाबाहेरील वाचकांकडून आलेले अभिप्राय उत्साहवर्धक व प्रोत्साहनपर ठरले. त्याच पाठबळावर ’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत. सप्टेंबर २००८ ते जुलै २००९ ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या ब्लॉगनोंदींचा विचार आम्ही प्रस्तुत अंकासाठी केला व त्यांतून आमच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट अशा वीस नोंदी आम्ही यंदाच्या संकलनात समाविष्ट केल्या आहेत. ब्लॉग व नोंदी ह्यांच्या निवडीचे निकष आम्ही गेल्या वर्षीच्या अंकात सविस्तर विशद केले होते. यंदाही ते निकष आम्ही शक्य तेवढ्या काटेकोरपणे पाळले आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही हे संकलन ब्लॉगविश्वाबाहेर जाईल व त्यातून ब्लॉगगोलाची त्रिज्या विस्तारेल अशी आम्ही आशा करतो.
 
ह्या संकलनाच्या संपादनाच्या निमित्ताने ‘ब्लॉग’ हे माध्यम, हा उपक्रम, मराठी साहित्य (!) अशा अनेक विषयांवर आमच्या चर्चा वेळोवेळी झडत असतात. आमची खाज व माज ही त्यामागची कारणं प्रांजळपणे मान्य करायला हवीत. त्यामधून नेमकं काय हाती लागेल, हे आताच काही सांगता येणार नाही, परंतु ह्याच मंथनातून काही बारकाव्यांत शिरण्यासाठी वाव मिळतो व काही निरीक्षणं पडताळून पाहता येतात. ब्लॉग ह्या संवादाच्या दुहेरी माध्यमाचा आपण पुरेपूर वापर करतो का, हा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. त्याआधी आम्हांला कोणत्या स्वरूपाचे ब्लॉग येथे अभिप्रेत आहेत, हे स्पष्ट केलं पाहिजे. येथेच आम्हांला आमचा पहिला प्रश्न भेडसावतो – ब्लॉगांच्या वर्गीकरणाचा. ब्लॉगांचे काही ढोबळ प्रकार आहेत, असं आमचं त्याहून ढोबळ निरीक्षण आहे. ब्लॉगवरील नोंदींचे विषय, त्यांचं स्वरूप, भाषा, शैली, घाट इ. किंवा अन्य आधार ठरवून त्यानुसार वर्गीकरण करू पाहता अत्यंत विस्कळीत वर्गीकरण हाती लागतं. त्यामुळे तूर्तास ‘रेषेवरची अक्षरे’साठी विचारात घेता येतील असे ब्लॉग असा एक सरधोपट वर्ग आम्हांला इथे अभिप्रेत आहे. ब्लॉग ह्या माध्यमाचा एक माध्यम म्हणून अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक सुटं टोक. तर ह्या अशा ब्लॉगांवर आपण ब्लॉगलेखक-वाचक किती संवाद साधतो? आपण वाचतो, नाही आवडलं किंवा ठीक वाटलं तर सोडून देतो, आवडलं तर “वा! छान” म्हणतो, क्वचित आपण मजकूर वा शैलीबद्दलही प्रतिसाद देतो; पण आपण किती वेळा प्रश्न विचारतो व उत्तर मागतो, आणि किती वेळा प्रश्न मागतो व उत्तर देतो? वाचक-लेखक संवादाकडे आपण अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे व तो संवाद जाणीवपूर्वक साधला पाहिजे, असं आम्हांला वाटतं.
 
त्याच अनुषंगाने ब्लॉगवरील प्रयोगशीलतेवरही काही बोललं पाहिजे. प्रयोगशीलतेला भरपूर वाव असतानाही आपण तितके प्रयोग करत नाही, असं आम्हांला वाटतं. ब्लॉग हे एक अनियंत्रित व अनिर्बंध माध्यम आहे. ह्या दोन्ही शब्दांना असलेल्या सकारात्मक व नकारात्मक अर्थछटांच्या धूसर सीमारेषेवर उभं राहून ह्या प्रयोगशीलतेकडे पाहावं लागतं. ‘वाट्टेल ते’ नावाचा तारू केव्हा भरकटेल, ह्याचा कधीच नेम नसतो. परिणामी, ब्लॉगविश्वात काही दिग्दर्शित प्रयोग मर्यादित स्वरूपात होण्याची आवश्यकता आहे, असं आमचं मत आहे. आम्ही आमच्या परीने असे प्रयोग करत आहोत व राहूच. ’रेषेवरची अक्षरे’ हे अशा प्रयोगांचं एक हक्काचं व्यासपीठ व्हावं, अशी आमची इच्छा आहे. तुम्हांला काय वाटतं?
 
अर्थात मैफिल काही सुनी सुनी नाही. यंदाच्या अंकात निम्म्याहून अधिक लेख गेल्या वर्षीच्या अंकात नसलेल्या लेखकांचे आहेत, ही जमेची बाजू. ब्लॉगविश्वात नवनवीन ब्लॉगांची भर सतत पडत असते. ह्या संकलनाच्या निमित्ताने त्यांच्यामधल्या उल्लेखनीय ब्लॉगनोंदींची दखल घेण्याची संधी मिळते. त्याचबरोबर एखाद्या ब्लॉगवर काहीच मस्त सापडलं नाही, तर हुरहूरही लागते. त्यामुळेच गेल्या वेळेस असलेल्या पण यंदा नसलेल्या लेखकांवर आम्ही प्रचंड नाराज आहोत. त्यांना “लिहिते व्हा!” अशी आमची आग्रहाची विनंती! यंदाच्या अंकातील नोंदीही वैविध्यपूर्ण नि शैलीपूर्ण आहेत. हे वैविध्य सांभाळण्यासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत, ह्यातच सर्व काही आलं. नव्या, जुन्या सगळ्याच ब्लॉगांपैकी जर तुम्ही काही पाहिले नसतील, तर आवर्जून पाहा.
 
आमचा पहिला प्रयत्न विश्वासार्हतेच्या कोणत्याही शंका उपस्थित न करता तुम्ही स्वीकारलात, त्याबद्दल मन:पूर्वक आभार! यंदाच्या रेषेवरच्या अक्षरांनादेखील आपण तेवढ्याच प्रेमाने आपलंसं कराल असा विश्वास वाटतो. आपल्या अभिप्रायांची वाट पाहतो आहोत. जरूर कळवा. दुष्काळ व पूर अशा परस्परविरोधी नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर आलेली यंदाची दिवाळी सर्वांसाठी एक नवीन झांजर घेऊन येवो, अशी आशा करतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
– संपादक मंडळ


***


०१. दिशांचे पहारे – क्षिप्रा
०२. बरेच काही उगवून आलेले – नंदन होडावडेकर
०३. ३१ दिवस… नो पेन… – मॉशिअर के
०७. अगं अगं बशी…!!! – श्रद्धा भोवड
१०. नॅनी – संग्राम
१२. सावली – विशाखा
१५. चल तर जाऊ… – प्रसाद बोकील
१६. रंगुनी रंगात सार्‍या… – गायत्री नातू
१८. स्तंभावरती चार सिंह – अ सेन मॅन


***
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *