Uncategorized

पहिलंवहिलं संपादकीय

ब्लॉग ही संज्ञा अस्तित्त्वात येऊन ती प्रसिद्ध होण्याला दशकाहून अधिक काळ लोटला. जसजशी आंतरजालाशी आपली ओळख वाढत गेली तसतशी ती मराठी भाषिकांतसुद्धा प्रसिद्ध होत गेली. आंतरजालावर ब्लॉग होस्ट करण्यासाठी, देवनागरीमधून लिहिण्यासाठी व ब्लॉगवर प्रसिद्ध होणार्‍या लेखांची तात्काळ सूचना देण्यासाठी दिवसागणिक उपलब्ध होणार‍्या विनामूल्य सुविधांमुळे ह्या माध्यमाचा प्रसार वेगाने होत आहे व होत राहील. मराठीत लेखन करणार्‍या ब्लॉगरपैकी अनेकांनी ब्लॉगवर वैयक्तिक अनुभवकथन करता करता साहित्यिक पातळीवर जाणारं वैविध्यपूर्ण लिखाण केलं आहे. या लेखनातील निवडक पंचवीस नोंदींचे संकलन करून येत्या दिवाळीच्या निमित्ताने ते जालावर प्रकाशित करण्याचं आम्ही ठरविलं. आम्ही वाचलेल्या ब्लॉगपैकी आम्हांला आवडलेली, आमच्या स्मरणात राहिलेली ही काही…रेषेवरची अक्षरे! ऑनलाईन असणं नित्याचं असणार्‍या ब्लॉगशी परिचितांना हे संकलन पुनर्भेटीचा आनंद देईल. जे ब्लॉगशी अनभिज्ञ आहेत, त्यांच्यापर्यंत हे संचित पोहोचेल व त्यांनाही आनंद देईल अशी आशा आहे.

आजवरच्या मराठी ब्लॉग पोस्ट्सपैकी सर्वोत्तम काही पोस्ट्स एकत्र करून प्रकाशित केली जावीत, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. ह्या कल्पनेपासून ह्या संकलनापर्यंतचा प्रवास येथे सविस्तर सांगणं यथोचित ठरेल. हे संकलन म्हणजे ब्लॉगवर आजवर प्रसिद्ध झालेलं अक्षर अन अक्षर वाचून त्याचा घेतलेला मागोवा नाही. जे ब्लॉग आम्ही वाचतो, किंबहुना ब्लॉगजगतातील अनेक लोक वाचतात, अशा सुमारे साठ ब्लॉगची एक यादी करण्यात आली. ह्या यादीत वेगवेगळ्या विषयांवर व सकस लिखाण करणार्‍या ब्लॉगचा समावेश करण्यात आला. ह्यांतून काही चांगलं लेखन सुटलं असणं शक्य आहे. आम्ही आमच्या परीने उत्तमोत्तम ब्लॉग ह्या यादीत समाविष्ट केले परंतु अस्ताव्यस्त पसरलेल्या ब्लॉगविश्वात ही यादी परिपूर्ण असल्याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. आम्ही चौघे मिळून नियमित वाचत असणार्‍या ब्लॉगची संख्या ह्याच्या किमान दुप्पट वा अधिक असेल, हे मात्र येथे नमूद करावेसे वाटते. सवयीच्या गावातल्या ओळखीच्या वाटा पुन्हा एकदा धुंडाळल्या एवढंच. एखादी रम्य पायवाट ह्यांतून निसटली असण्याची शक्यता नाकारण्याचा कुठलाही हट्ट नाही. त्या ब्लॉगवर ३१ ऑगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक अक्षराचा विचार करण्याचं मग आम्ही निश्चित केलं. संपादक मंडळातील आम्ही चौघांनी मिळून ह्या सर्व ब्लॉगवरील ३१ ऑगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचल्या. ह्या ब्लॉगनोंदींपैकी कोणत्या नोंदी विचारात घ्यायच्या ह्याकरता भाषा, आशय, नाविन्य आणि घाट असे काही निकष ठरविण्यात आले. त्यानुसार व संपादकाच्या मतानुसार सुमारे पन्नास नोंदींची एक यादी करण्यात आली. ही यादी करणं हे अत्यंत अवघड काम होतं हे वेगळं सांगायला नकोच. तरीही काही गोष्टींवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. ह्या यादीत लेख समाविष्ट करताना एकाच ब्लॉगरचे तीनापेक्षा अधिक लेख त्या यादीत नसतील असं बंधन आम्ही घालून घेतलं. वैयक्तिक आवडीनिवडींपायी कोणत्याही एका लेखकावर भर दिला जाऊन इतरांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका ह्यामागे होती. संपादक मंडळातील आम्ही मंडळीही ब्लॉगर असल्यामुळे आमचेही ब्लॉग पहिल्या साठांच्या यादीत होते. त्यामुळे संपादक मंडळातील लेखकाच्या ब्लॉगवरील नोंदींची निवड करताना त्या लेखकाला निवडीचा किंवा त्यावर कोणताही अभिप्राय देण्याचा अधिकार नाकारण्यात आला व इतर तिघांनी मिळून ही प्रक्रिया पार पाडली. ह्या स्वतःहून स्वतःवर घातलेल्या नियमाचं आम्ही नक्कीच काटेकोर पालन केलं. तसंच लेखन हे पूर्णतः मूळ लेखकाचं असावं हाही निकष ठरविण्यात आला. साहित्य, चित्रपट, संगीत, पौराणिक ग्रंथ, इतिहास इत्यादी विषयांशी संबंधित चिकित्सा, मीमांसा किंवा समीक्षा करणारं लेखन ह्या संकलनात समाविष्ट न करण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला. परिणामी ह्या विषयांवर सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगर व त्यांच्या ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण नोंदी ह्या संकलनात आढळणार नाहीत. नैमित्तिक किंवा तात्कालिक विषय असणार्‍या तसेच विशिष्ट प्रश्नांवर प्रबोधन करणार्‍या अनेक महत्त्वपूर्ण नोंदीही आम्हांला वगळाव्या लागल्या.

विषय, शैली, मांडणी ह्या सर्वांमधली विविधता हे तर ब्लॉगचं वैशिष्ट्य. त्यामुळे निवड करताना काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार आम्ही केला. वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे जाणारं असं काही नोंदीत असावं असं पाहण्यात आलं. आपले अनुभव पार्श्वभूमीला ठेवून व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल असं लेखन व अशा नोंदींचा विचार करण्यात आला. ह्यातही शैली, भाषा, आशय, नाविन्य हे निकष होतेच. अत्यंत निर्दय होऊन ही पन्नास नोंदींची यादी आपण केली आहे असं वेळोवेळी वाटत होतं. ही भावना अंतिमतः केवळ पंचवीस नोंदी निवडण्याच्या बंधनामुळे अधिकाधिक दृढ होत गेली. ह्या वेळेला पुन्हा एकदा संभाव्य असमतोलाचा विचार केला गेला. काही ठराविक लेखकांच्या लिखाणाने ही निवड व्यापली जाऊ नये, म्हणून एका लेखकाच्या कमाल दोन नोंदी निवडण्याचं नक्की करण्यात आलं. मुळात हेतू हा उत्तमोत्तम लेखांच्या संकलनाचा होता. त्यात दर्जा हा एकमेव निकष. त्यामुळे एका लेखकाचा एकच लेख घ्यावा, असे कोणतेही संख्यात्मक बंधन प्रथमपासूनच आम्ही घालून घेतले नव्हते. प्रत्येकी आधी तीन व नंतर दोन कमाल नोंदी निवडण्याचा निर्णय हा केवळ अंतिम पंचवीस नोंदींत होणारा असमतोल टाळण्यासाठी घेतलेला निर्णय होता. किंबहुना कोणा लेखकाच्या किती नोंदी ह्या संकलनात आहेत ह्यावरून त्या लेखकाबद्दल, त्या ब्लॉगच्या गुणवत्तेबद्दल कोणतेही अनुमान काढले जाऊ नये, असे आमचे प्रामाणिक मत आहे. शिवाय हे ब्लॉगवर पूर्वप्रकाशित लेखांचे संकलन असल्यामुळे एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख दर्जेदार असणं हे स्वाभाविक व अंतिम पंचवीसांमध्ये ते समाविष्ट करणं हे गरजेचं वाटलं. आम्ही अंतिम यादी पंचवीस ठरवूनही प्रत्यक्षात सव्वीस नोंदींची केली, एवढीच काय ती आम्ही संपादक म्हणून आमची स्वतः पाळावयाची ठरवलेली शिस्त मोडली.

आम्ही ज्या ब्लॉगनोंदी निवडल्या, त्या सर्व नोंदी ह्या संकलनात प्रसिद्ध करण्यास त्या त्या लेखकाची संमती आहे किंवा नाही अशा अर्थाची विचारणा करणारे इपत्र त्या त्या लेखकाला पाठवून त्यांची संमती मागण्यात आली. ज्या ज्या लेखकांनी तशी संमती दिली, त्यांच्याच नोंदी ह्या संकलनात आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ह्या इपत्राच्या उत्तरार्थ काही लेखकांनी त्यांच्या दोनऐवजी एकच नोंद ह्या संकलनात समाविष्ट करण्यास संमती दिली. आपल्या दोन लेखांना प्रसिद्धी मिळणे ही आपणांस मिळालेली विशेष सवलत आहे, अशा समजुतीने व ती नाकारण्यासाठी त्यांनी एकच लेख समाविष्ट करण्यास संमती दिली. एकाच लेखकाच्या लेखांची संख्या कोणत्याही प्रकारे त्या लेखकाच्या वा त्याच्या ब्लॉगच्या दर्जाशी निगडीत नाही, एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख प्रकाशित करून केवळ ब्लॉगवरील अधिकाधिक उत्तम लेख संकलित करता येतील, तसे केल्याने त्या व्यक्तीला कोणतेही झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच हे संकलन ब्लॉगजगतातील उत्तमोत्तम लेखांचे असून उत्तमोत्तम ब्लॉगरचे नाही, परिणामी ज्यांचे एकाहून अधिक लेख ह्या संकलानात समाविष्ट होऊ शकतात त्यांचे कमाल दोन लेख निवडण्याचे बंधन हे केवळ तांत्रिक आहे, अशी ठाम भूमिका असूनही अशा प्रकारचे गैरसमज व विश्वासार्हतेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात व ते टाळले पाहिजेत, ह्या दृष्टिकोणातून एकाच लेखकाच्या एकाहून अधिक नोंदी प्रकाशित न करण्याचा निर्णय नाइलाजास्तव आम्हांला घ्यावा लागला. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून निवडलेल्या अंतिम सव्वीस नोंदींच्या यादीमधून काही नोंदी वगळून हे संकलन आम्ही प्रकाशित करत आहोत. ज्या लेखकांच्या एकाहून अधिक नोंदींना ह्या संकलनात स्थान मिळणे संपादकांच्या मते आवश्यक होते व तसे त्यांना कळविण्यात आले होते, त्या सर्वांचे आम्ही दिलगीर आहोत. ज्या लेखकांनी काही कारणास्तव आपल्या काही नोंदी समाविष्ट करण्यास संमती दिली नाही, त्यांच्याही निर्णयस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो. तसेच ज्या लेखकांनी विनातक्रार त्यांच्या नोंदी समाविष्ट करण्यासाठी अनुमती दिली, त्यांच्या सहकार्याबद्दल व आपले लेख प्रकाशित करण्याची संमती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. ब्लॉग हे माध्यम उपलब्ध करून देणार्‍या तसेच त्यासाठी पूरक तंत्रवैज्ञानिक सेवा पुरविणार्‍या सर्व व्यक्ती, सर्व विनानफा तत्त्वावर चालणारे उपक्रम, तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक उद्योग ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

ब्लॉगविश्वातील वैविध्याची ही झलक आहे, हे विधान हास्यास्पद ठरेल, ह्याचं कारण असं की वर नमूद केल्याप्रमाणे आम्ही अनेक विषय जाणीवपूर्वक वगळले आहेत. जरी ह्या संकलनामागे ब्लॉगजगतातील वैविध्य प्रदर्शित करण्याचा हेतू नसला तरीही अंतिमतः ह्या संकलनातील प्रत्येक लेखाचा विषय वेगळा आहे, असे आपणास दिसून येईल. त्यात विनोदापासून कवितांपर्यत, अनुभवकथनापासून ललित साहित्यापर्यंत बरंच काही सापडेल. प्रत्येकाची आपली अशी शैली आहे. आपले विचार सहजतेने मांडण्याची हातोटी आहे. हे तुम्हांलाही वाचताना जाणवेल. ह्या संकलनात समाविष्ट करण्यात आलेलं लेखन हे दर्जेदार लेखन आहे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण त्यात ब्लॉगवरील वैविध्य सामावून घेण्याचा जराही अट्टाहास नाही. ब्लॉगविश्वाशी ओळख करून देण्याचा तर मुळीच प्रयत्न नाही. प्रयत्न असलाच तर तो ब्लॉगवर लिहिलं गेलेलं दर्जेदार लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आहे.

ब्लॉगवरील दर्जेदार लेखनाचं संपादन व संकलन करण्याचा हा आमच्या माहितीत पहिलाच प्रयत्न आहे. ब्लॉगप्रमाणेच हे संकलनदेखील सर्वांसाठी खुलं असून विनामूल्य उपलब्ध आहे. ह्या उपक्रमाचं यश वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. हा उपक्रम पुढील वर्षीही चालू ठेवावा अशी आमची इच्छा जरूर आहे. तरीही हा उपक्रम एक वार्षिक उपक्रम होईल का, कोणत्या स्वरूपात चालू राहील, ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळणार्‍या प्रतिसादावर अवलंबून आहेत. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. आपण इपत्र पाठवून त्या आम्हांला कळवू शकता. आम्ही आमच्या दृष्टिने चांगलं ते वेचून तुमच्यापुढे ठेवत आहोत. आम्ही ते प्रामाणिकपणे वेचलं आहे असा आमचा नक्कीच दावा आहे. त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित होऊ नयेत अशी आशा आहे. तुमच्या दृष्टिनेदेखील हेच सर्वोत्तम किंवा हे सर्वोत्तमच असेल, अशी कोणतीही भाबडी आशा नाही. असं झालं तर आनंद आहे, नाही झालं तर खंत नाही. ह्या संकलनाच्या संदर्भात पडणार्‍या स्वाभाविक प्रश्नांची उत्तरं ‘नेति नेति’ अशीच आहेत. पण म्हणूनच हे संपादन ह्या सगळ्या प्रश्नांपलीकडच्या लेखांचं आहे. जी अक्षरं ब्लॉगच्या नसणार्‍या रेषांवर सरींसारखी झरली, रेषांवर पागोळ्यांसारखी साचली, आनंद देऊन गेली, बरंच काही सांगून गेली नि हळूच निसटताना अक्षर ओलावा मागे ठेवून गेली, त्यातलीच काही स्मृतींमध्ये कायमची साठलेली…तुमच्यासाठी नम्रपणे सादर.

***

’रेषेवरची अक्षरे २००८’ ब्लॉग आवृत्तीत उपलब्ध नाही.

अंकाची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.

***

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *