Uncategorized

पुन्हा रेषेवरची अक्षरे!

‘रेषेवरची अक्षरे’ या दिवाळीत पुन्हा येतो आहे!

२०१२ मधे ‘रेषेवरची अक्षरे’चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण, चर्चा, वादविवाद, गॉसिप्स आणि भंकस, उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स… हे सारं संपणार याची खंतही होती.

 

मधल्या काळात आम्ही ब्लॉग सोडून थोडे थोडे बाहेरख्याली झालो. फोरम्सवर डोकावलो. फेसबुकावर उंडारलो. पोटापाण्यात रमलो. लिहिण्यावाचण्याशी अपराधीपणाचे, मैतरकीचे आणि घरपरतीचे खेळ आलटून पालटून खेळलो. ‘रेरे’च्या अंकाबद्दल लोकांनी विचारणा केल्यावर थोडे गडबडलो, शरमलो आणि सुखावलो. दरम्यानच्या काळात काही ताजे लेखक आले, काही जुन्या लेखकांच्या शब्दांना परत धार चढली, बऱ्याच गोष्टींचे संदर्भ बदलले आणि नव्या अर्थाचे शब्दही उगवले. आमची उत्सुकता नव्याने जागी झाली. गेल्या तीन वर्षात मराठी ब्लॉग विश्वात नक्की काय काय झालं याचे हिशेब मांडायला आम्ही चित्रगुप्ताच्या तत्परतेनं पुन्हा सज्ज झालो.

 

तर… ‘रेरे’ – अर्थात ‘रेषेवरची अक्षरे’ – या दिवाळीत पुन्हा येतो आहे!

 

आम्ही ब्लॉग्सची यादी बनवायला सुरुवात केली आहेच. पण यंदा मराठीतल्या महत्त्वाच्या फोरम्सचाही आम्ही ढांडोळा घेतो आहोत. तिथेही उल्लेखनीय ललित लिहिलं जातं आहे. तुमच्या वाचनात काही नवीन चांगले ब्लॉग्स आले असतील, तर ते आम्हांला ‘resh.akashare@gmail.com’ या पत्त्यावर जरूर कळवा. इंटरनेटचं आभासी विश्व प्रचंडच आहे आणि म्हणूनच ‘साथी हाथ बढाना’चं हे एक प्रांजळ आवाहन.
***
Uncategorized

रेषेवरची अक्षरे २००८

‘रेषेवरची अक्षरे २००८’ ब्लॉग आवृत्तीत उपलब्ध नाही.

अंकाची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.


***


माणसं लिहीत होती.
भाषा मरत असताना,
संस्कृतीला धोका असताना,
ब्रेनड्रेन होत असताना,
साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना
माणसं लिहीत आलीयेत.
माणसं लिहितायत.
अजूनही.
पायांखालची माती आणि खिशातली चलनं बदलत गेली.
छपाईची माध्यमं आणि मक्तेदार्‍या बदलत गेल्या.
लिखाणाची भाषा कात टाकत गेली.
लांबी अधिकाधिक आटत गेली.
तरीही
माणसं लिहितायत.
नव्या दमानं. अजूनही.
प्रेम, प्रेमभंग, पाऊस. नॉस्टाल्जिया, स्वदेस.
कंटाळा, स्टॅग्नेशन. पुन्हा प्रेम.
न चुकता पडणारी तीच ती भव्यदिव्य स्वप्नंबिप्नं.
त्यांचे तेच ते माती खायला लावणारे अपेक्षित शेवट.
आणि याच चिखलामातीतून रसरशीतपणे वर येणारी काही जिवंत झाडं हिरवीगार
माणसं भाषेत रुजवत आलीयेत.
माणसं लिहितायत. अजूनही.
झाडांची दखल घ्या न घ्या.
ती असतातच माती आणि पाण्यासकट. सावल्या पेरत.
तशीच माणसांची अक्षरं तरत आलीयेत.
परभाषांची आक्रमणं, कॉपीराइट्सच्या साठमार्‍या आणि छापखान्यांच्या मक्तेदारीतून. विचार पेरत.
माणसं लिहीत आलीयेत.
माणसं लिहितायत.
अजूनही.


***

 

पहिल्या अंकाची प्रस्तावना आणि आमची भूमिका इथे वाचता येईल.
Uncategorized

पहिलंवहिलं संपादकीय

ब्लॉग ही संज्ञा अस्तित्त्वात येऊन ती प्रसिद्ध होण्याला दशकाहून अधिक काळ लोटला. जसजशी आंतरजालाशी आपली ओळख वाढत गेली तसतशी ती मराठी भाषिकांतसुद्धा प्रसिद्ध होत गेली. आंतरजालावर ब्लॉग होस्ट करण्यासाठी, देवनागरीमधून लिहिण्यासाठी व ब्लॉगवर प्रसिद्ध होणार्‍या लेखांची तात्काळ सूचना देण्यासाठी दिवसागणिक उपलब्ध होणार‍्या विनामूल्य सुविधांमुळे ह्या माध्यमाचा प्रसार वेगाने होत आहे व होत राहील. मराठीत लेखन करणार्‍या ब्लॉगरपैकी अनेकांनी ब्लॉगवर वैयक्तिक अनुभवकथन करता करता साहित्यिक पातळीवर जाणारं वैविध्यपूर्ण लिखाण केलं आहे. या लेखनातील निवडक पंचवीस नोंदींचे संकलन करून येत्या दिवाळीच्या निमित्ताने ते जालावर प्रकाशित करण्याचं आम्ही ठरविलं. आम्ही वाचलेल्या ब्लॉगपैकी आम्हांला आवडलेली, आमच्या स्मरणात राहिलेली ही काही…रेषेवरची अक्षरे! ऑनलाईन असणं नित्याचं असणार्‍या ब्लॉगशी परिचितांना हे संकलन पुनर्भेटीचा आनंद देईल. जे ब्लॉगशी अनभिज्ञ आहेत, त्यांच्यापर्यंत हे संचित पोहोचेल व त्यांनाही आनंद देईल अशी आशा आहे.

आजवरच्या मराठी ब्लॉग पोस्ट्सपैकी सर्वोत्तम काही पोस्ट्स एकत्र करून प्रकाशित केली जावीत, हा एकमेव हेतू ह्या संकलनाच्या मूळ कल्पनेमागे आहे. ह्या कल्पनेपासून ह्या संकलनापर्यंतचा प्रवास येथे सविस्तर सांगणं यथोचित ठरेल. हे संकलन म्हणजे ब्लॉगवर आजवर प्रसिद्ध झालेलं अक्षर अन अक्षर वाचून त्याचा घेतलेला मागोवा नाही. जे ब्लॉग आम्ही वाचतो, किंबहुना ब्लॉगजगतातील अनेक लोक वाचतात, अशा सुमारे साठ ब्लॉगची एक यादी करण्यात आली. ह्या यादीत वेगवेगळ्या विषयांवर व सकस लिखाण करणार्‍या ब्लॉगचा समावेश करण्यात आला. ह्यांतून काही चांगलं लेखन सुटलं असणं शक्य आहे. आम्ही आमच्या परीने उत्तमोत्तम ब्लॉग ह्या यादीत समाविष्ट केले परंतु अस्ताव्यस्त पसरलेल्या ब्लॉगविश्वात ही यादी परिपूर्ण असल्याची खात्री देणे केवळ अशक्य आहे. आम्ही चौघे मिळून नियमित वाचत असणार्‍या ब्लॉगची संख्या ह्याच्या किमान दुप्पट वा अधिक असेल, हे मात्र येथे नमूद करावेसे वाटते. सवयीच्या गावातल्या ओळखीच्या वाटा पुन्हा एकदा धुंडाळल्या एवढंच. एखादी रम्य पायवाट ह्यांतून निसटली असण्याची शक्यता नाकारण्याचा कुठलाही हट्ट नाही. त्या ब्लॉगवर ३१ ऑगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक अक्षराचा विचार करण्याचं मग आम्ही निश्चित केलं. संपादक मंडळातील आम्ही चौघांनी मिळून ह्या सर्व ब्लॉगवरील ३१ ऑगस्ट २००८ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचल्या. ह्या ब्लॉगनोंदींपैकी कोणत्या नोंदी विचारात घ्यायच्या ह्याकरता भाषा, आशय, नाविन्य आणि घाट असे काही निकष ठरविण्यात आले. त्यानुसार व संपादकाच्या मतानुसार सुमारे पन्नास नोंदींची एक यादी करण्यात आली. ही यादी करणं हे अत्यंत अवघड काम होतं हे वेगळं सांगायला नकोच. तरीही काही गोष्टींवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. ह्या यादीत लेख समाविष्ट करताना एकाच ब्लॉगरचे तीनापेक्षा अधिक लेख त्या यादीत नसतील असं बंधन आम्ही घालून घेतलं. वैयक्तिक आवडीनिवडींपायी कोणत्याही एका लेखकावर भर दिला जाऊन इतरांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका ह्यामागे होती. संपादक मंडळातील आम्ही मंडळीही ब्लॉगर असल्यामुळे आमचेही ब्लॉग पहिल्या साठांच्या यादीत होते. त्यामुळे संपादक मंडळातील लेखकाच्या ब्लॉगवरील नोंदींची निवड करताना त्या लेखकाला निवडीचा किंवा त्यावर कोणताही अभिप्राय देण्याचा अधिकार नाकारण्यात आला व इतर तिघांनी मिळून ही प्रक्रिया पार पाडली. ह्या स्वतःहून स्वतःवर घातलेल्या नियमाचं आम्ही नक्कीच काटेकोर पालन केलं. तसंच लेखन हे पूर्णतः मूळ लेखकाचं असावं हाही निकष ठरविण्यात आला. साहित्य, चित्रपट, संगीत, पौराणिक ग्रंथ, इतिहास इत्यादी विषयांशी संबंधित चिकित्सा, मीमांसा किंवा समीक्षा करणारं लेखन ह्या संकलनात समाविष्ट न करण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला. परिणामी ह्या विषयांवर सातत्यपूर्ण लेखन करणारे ब्लॉगर व त्यांच्या ब्लॉगवरील अभ्यासपूर्ण नोंदी ह्या संकलनात आढळणार नाहीत. नैमित्तिक किंवा तात्कालिक विषय असणार्‍या तसेच विशिष्ट प्रश्नांवर प्रबोधन करणार्‍या अनेक महत्त्वपूर्ण नोंदीही आम्हांला वगळाव्या लागल्या.

विषय, शैली, मांडणी ह्या सर्वांमधली विविधता हे तर ब्लॉगचं वैशिष्ट्य. त्यामुळे निवड करताना काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार आम्ही केला. वैयक्तिक अनुभवांच्या पलीकडे जाणारं असं काही नोंदीत असावं असं पाहण्यात आलं. आपले अनुभव पार्श्वभूमीला ठेवून व्यक्ती-स्थळ-काल ह्यांच्या मर्यादा ओलांडू शकेल असं लेखन व अशा नोंदींचा विचार करण्यात आला. ह्यातही शैली, भाषा, आशय, नाविन्य हे निकष होतेच. अत्यंत निर्दय होऊन ही पन्नास नोंदींची यादी आपण केली आहे असं वेळोवेळी वाटत होतं. ही भावना अंतिमतः केवळ पंचवीस नोंदी निवडण्याच्या बंधनामुळे अधिकाधिक दृढ होत गेली. ह्या वेळेला पुन्हा एकदा संभाव्य असमतोलाचा विचार केला गेला. काही ठराविक लेखकांच्या लिखाणाने ही निवड व्यापली जाऊ नये, म्हणून एका लेखकाच्या कमाल दोन नोंदी निवडण्याचं नक्की करण्यात आलं. मुळात हेतू हा उत्तमोत्तम लेखांच्या संकलनाचा होता. त्यात दर्जा हा एकमेव निकष. त्यामुळे एका लेखकाचा एकच लेख घ्यावा, असे कोणतेही संख्यात्मक बंधन प्रथमपासूनच आम्ही घालून घेतले नव्हते. प्रत्येकी आधी तीन व नंतर दोन कमाल नोंदी निवडण्याचा निर्णय हा केवळ अंतिम पंचवीस नोंदींत होणारा असमतोल टाळण्यासाठी घेतलेला निर्णय होता. किंबहुना कोणा लेखकाच्या किती नोंदी ह्या संकलनात आहेत ह्यावरून त्या लेखकाबद्दल, त्या ब्लॉगच्या गुणवत्तेबद्दल कोणतेही अनुमान काढले जाऊ नये, असे आमचे प्रामाणिक मत आहे. शिवाय हे ब्लॉगवर पूर्वप्रकाशित लेखांचे संकलन असल्यामुळे एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख दर्जेदार असणं हे स्वाभाविक व अंतिम पंचवीसांमध्ये ते समाविष्ट करणं हे गरजेचं वाटलं. आम्ही अंतिम यादी पंचवीस ठरवूनही प्रत्यक्षात सव्वीस नोंदींची केली, एवढीच काय ती आम्ही संपादक म्हणून आमची स्वतः पाळावयाची ठरवलेली शिस्त मोडली.

आम्ही ज्या ब्लॉगनोंदी निवडल्या, त्या सर्व नोंदी ह्या संकलनात प्रसिद्ध करण्यास त्या त्या लेखकाची संमती आहे किंवा नाही अशा अर्थाची विचारणा करणारे इपत्र त्या त्या लेखकाला पाठवून त्यांची संमती मागण्यात आली. ज्या ज्या लेखकांनी तशी संमती दिली, त्यांच्याच नोंदी ह्या संकलनात आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ह्या इपत्राच्या उत्तरार्थ काही लेखकांनी त्यांच्या दोनऐवजी एकच नोंद ह्या संकलनात समाविष्ट करण्यास संमती दिली. आपल्या दोन लेखांना प्रसिद्धी मिळणे ही आपणांस मिळालेली विशेष सवलत आहे, अशा समजुतीने व ती नाकारण्यासाठी त्यांनी एकच लेख समाविष्ट करण्यास संमती दिली. एकाच लेखकाच्या लेखांची संख्या कोणत्याही प्रकारे त्या लेखकाच्या वा त्याच्या ब्लॉगच्या दर्जाशी निगडीत नाही, एकाच लेखकाचे एकाहून अधिक लेख प्रकाशित करून केवळ ब्लॉगवरील अधिकाधिक उत्तम लेख संकलित करता येतील, तसे केल्याने त्या व्यक्तीला कोणतेही झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच हे संकलन ब्लॉगजगतातील उत्तमोत्तम लेखांचे असून उत्तमोत्तम ब्लॉगरचे नाही, परिणामी ज्यांचे एकाहून अधिक लेख ह्या संकलानात समाविष्ट होऊ शकतात त्यांचे कमाल दोन लेख निवडण्याचे बंधन हे केवळ तांत्रिक आहे, अशी ठाम भूमिका असूनही अशा प्रकारचे गैरसमज व विश्वासार्हतेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात व ते टाळले पाहिजेत, ह्या दृष्टिकोणातून एकाच लेखकाच्या एकाहून अधिक नोंदी प्रकाशित न करण्याचा निर्णय नाइलाजास्तव आम्हांला घ्यावा लागला. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून निवडलेल्या अंतिम सव्वीस नोंदींच्या यादीमधून काही नोंदी वगळून हे संकलन आम्ही प्रकाशित करत आहोत. ज्या लेखकांच्या एकाहून अधिक नोंदींना ह्या संकलनात स्थान मिळणे संपादकांच्या मते आवश्यक होते व तसे त्यांना कळविण्यात आले होते, त्या सर्वांचे आम्ही दिलगीर आहोत. ज्या लेखकांनी काही कारणास्तव आपल्या काही नोंदी समाविष्ट करण्यास संमती दिली नाही, त्यांच्याही निर्णयस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो. तसेच ज्या लेखकांनी विनातक्रार त्यांच्या नोंदी समाविष्ट करण्यासाठी अनुमती दिली, त्यांच्या सहकार्याबद्दल व आपले लेख प्रकाशित करण्याची संमती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. ब्लॉग हे माध्यम उपलब्ध करून देणार्‍या तसेच त्यासाठी पूरक तंत्रवैज्ञानिक सेवा पुरविणार्‍या सर्व व्यक्ती, सर्व विनानफा तत्त्वावर चालणारे उपक्रम, तसेच सर्व खाजगी व सार्वजनिक उद्योग ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

ब्लॉगविश्वातील वैविध्याची ही झलक आहे, हे विधान हास्यास्पद ठरेल, ह्याचं कारण असं की वर नमूद केल्याप्रमाणे आम्ही अनेक विषय जाणीवपूर्वक वगळले आहेत. जरी ह्या संकलनामागे ब्लॉगजगतातील वैविध्य प्रदर्शित करण्याचा हेतू नसला तरीही अंतिमतः ह्या संकलनातील प्रत्येक लेखाचा विषय वेगळा आहे, असे आपणास दिसून येईल. त्यात विनोदापासून कवितांपर्यत, अनुभवकथनापासून ललित साहित्यापर्यंत बरंच काही सापडेल. प्रत्येकाची आपली अशी शैली आहे. आपले विचार सहजतेने मांडण्याची हातोटी आहे. हे तुम्हांलाही वाचताना जाणवेल. ह्या संकलनात समाविष्ट करण्यात आलेलं लेखन हे दर्जेदार लेखन आहे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण त्यात ब्लॉगवरील वैविध्य सामावून घेण्याचा जराही अट्टाहास नाही. ब्लॉगविश्वाशी ओळख करून देण्याचा तर मुळीच प्रयत्न नाही. प्रयत्न असलाच तर तो ब्लॉगवर लिहिलं गेलेलं दर्जेदार लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आहे.

ब्लॉगवरील दर्जेदार लेखनाचं संपादन व संकलन करण्याचा हा आमच्या माहितीत पहिलाच प्रयत्न आहे. ब्लॉगप्रमाणेच हे संकलनदेखील सर्वांसाठी खुलं असून विनामूल्य उपलब्ध आहे. ह्या उपक्रमाचं यश वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. हा उपक्रम पुढील वर्षीही चालू ठेवावा अशी आमची इच्छा जरूर आहे. तरीही हा उपक्रम एक वार्षिक उपक्रम होईल का, कोणत्या स्वरूपात चालू राहील, ह्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळणार्‍या प्रतिसादावर अवलंबून आहेत. आपल्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. आपण इपत्र पाठवून त्या आम्हांला कळवू शकता. आम्ही आमच्या दृष्टिने चांगलं ते वेचून तुमच्यापुढे ठेवत आहोत. आम्ही ते प्रामाणिकपणे वेचलं आहे असा आमचा नक्कीच दावा आहे. त्याच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित होऊ नयेत अशी आशा आहे. तुमच्या दृष्टिनेदेखील हेच सर्वोत्तम किंवा हे सर्वोत्तमच असेल, अशी कोणतीही भाबडी आशा नाही. असं झालं तर आनंद आहे, नाही झालं तर खंत नाही. ह्या संकलनाच्या संदर्भात पडणार्‍या स्वाभाविक प्रश्नांची उत्तरं ‘नेति नेति’ अशीच आहेत. पण म्हणूनच हे संपादन ह्या सगळ्या प्रश्नांपलीकडच्या लेखांचं आहे. जी अक्षरं ब्लॉगच्या नसणार्‍या रेषांवर सरींसारखी झरली, रेषांवर पागोळ्यांसारखी साचली, आनंद देऊन गेली, बरंच काही सांगून गेली नि हळूच निसटताना अक्षर ओलावा मागे ठेवून गेली, त्यातलीच काही स्मृतींमध्ये कायमची साठलेली…तुमच्यासाठी नम्रपणे सादर.

***

’रेषेवरची अक्षरे २००८’ ब्लॉग आवृत्तीत उपलब्ध नाही.

अंकाची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.

***

Uncategorized

रेषेवरची अक्षरे २००९

‘रेषेवरची अक्षरे २००९’ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.


***
‘रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक आपल्यापुढे ठेवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. मराठी ब्लॉगविश्वातील उत्तम प्रतीचं लेखन वेचून ते दिवाळीच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मागच्या वर्षी केला. आमच्या जराही न ओसरलेल्या उत्साहाचं भांडवल व ह्या उपक्रमातून मिळणाऱ्या आनंदाचं लालूच ह्या दोन गोष्टी हा उपक्रम यंदाही सुरू ठेवण्यास पुरेशा ठरल्या. गेल्या वर्षीच्या अंकाबद्दल ब्लॉगविश्वातील व ब्लॉगविश्वाबाहेरील वाचकांकडून आलेले अभिप्राय उत्साहवर्धक व प्रोत्साहनपर ठरले. त्याच पाठबळावर ’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत. सप्टेंबर २००८ ते जुलै २००९ ह्या कालावधीत प्रकाशित झालेल्या ब्लॉगनोंदींचा विचार आम्ही प्रस्तुत अंकासाठी केला व त्यांतून आमच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट अशा वीस नोंदी आम्ही यंदाच्या संकलनात समाविष्ट केल्या आहेत. ब्लॉग व नोंदी ह्यांच्या निवडीचे निकष आम्ही गेल्या वर्षीच्या अंकात सविस्तर विशद केले होते. यंदाही ते निकष आम्ही शक्य तेवढ्या काटेकोरपणे पाळले आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही हे संकलन ब्लॉगविश्वाबाहेर जाईल व त्यातून ब्लॉगगोलाची त्रिज्या विस्तारेल अशी आम्ही आशा करतो.
 
ह्या संकलनाच्या संपादनाच्या निमित्ताने ‘ब्लॉग’ हे माध्यम, हा उपक्रम, मराठी साहित्य (!) अशा अनेक विषयांवर आमच्या चर्चा वेळोवेळी झडत असतात. आमची खाज व माज ही त्यामागची कारणं प्रांजळपणे मान्य करायला हवीत. त्यामधून नेमकं काय हाती लागेल, हे आताच काही सांगता येणार नाही, परंतु ह्याच मंथनातून काही बारकाव्यांत शिरण्यासाठी वाव मिळतो व काही निरीक्षणं पडताळून पाहता येतात. ब्लॉग ह्या संवादाच्या दुहेरी माध्यमाचा आपण पुरेपूर वापर करतो का, हा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. त्याआधी आम्हांला कोणत्या स्वरूपाचे ब्लॉग येथे अभिप्रेत आहेत, हे स्पष्ट केलं पाहिजे. येथेच आम्हांला आमचा पहिला प्रश्न भेडसावतो – ब्लॉगांच्या वर्गीकरणाचा. ब्लॉगांचे काही ढोबळ प्रकार आहेत, असं आमचं त्याहून ढोबळ निरीक्षण आहे. ब्लॉगवरील नोंदींचे विषय, त्यांचं स्वरूप, भाषा, शैली, घाट इ. किंवा अन्य आधार ठरवून त्यानुसार वर्गीकरण करू पाहता अत्यंत विस्कळीत वर्गीकरण हाती लागतं. त्यामुळे तूर्तास ‘रेषेवरची अक्षरे’साठी विचारात घेता येतील असे ब्लॉग असा एक सरधोपट वर्ग आम्हांला इथे अभिप्रेत आहे. ब्लॉग ह्या माध्यमाचा एक माध्यम म्हणून अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक सुटं टोक. तर ह्या अशा ब्लॉगांवर आपण ब्लॉगलेखक-वाचक किती संवाद साधतो? आपण वाचतो, नाही आवडलं किंवा ठीक वाटलं तर सोडून देतो, आवडलं तर “वा! छान” म्हणतो, क्वचित आपण मजकूर वा शैलीबद्दलही प्रतिसाद देतो; पण आपण किती वेळा प्रश्न विचारतो व उत्तर मागतो, आणि किती वेळा प्रश्न मागतो व उत्तर देतो? वाचक-लेखक संवादाकडे आपण अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे व तो संवाद जाणीवपूर्वक साधला पाहिजे, असं आम्हांला वाटतं.
 
त्याच अनुषंगाने ब्लॉगवरील प्रयोगशीलतेवरही काही बोललं पाहिजे. प्रयोगशीलतेला भरपूर वाव असतानाही आपण तितके प्रयोग करत नाही, असं आम्हांला वाटतं. ब्लॉग हे एक अनियंत्रित व अनिर्बंध माध्यम आहे. ह्या दोन्ही शब्दांना असलेल्या सकारात्मक व नकारात्मक अर्थछटांच्या धूसर सीमारेषेवर उभं राहून ह्या प्रयोगशीलतेकडे पाहावं लागतं. ‘वाट्टेल ते’ नावाचा तारू केव्हा भरकटेल, ह्याचा कधीच नेम नसतो. परिणामी, ब्लॉगविश्वात काही दिग्दर्शित प्रयोग मर्यादित स्वरूपात होण्याची आवश्यकता आहे, असं आमचं मत आहे. आम्ही आमच्या परीने असे प्रयोग करत आहोत व राहूच. ’रेषेवरची अक्षरे’ हे अशा प्रयोगांचं एक हक्काचं व्यासपीठ व्हावं, अशी आमची इच्छा आहे. तुम्हांला काय वाटतं?
 
अर्थात मैफिल काही सुनी सुनी नाही. यंदाच्या अंकात निम्म्याहून अधिक लेख गेल्या वर्षीच्या अंकात नसलेल्या लेखकांचे आहेत, ही जमेची बाजू. ब्लॉगविश्वात नवनवीन ब्लॉगांची भर सतत पडत असते. ह्या संकलनाच्या निमित्ताने त्यांच्यामधल्या उल्लेखनीय ब्लॉगनोंदींची दखल घेण्याची संधी मिळते. त्याचबरोबर एखाद्या ब्लॉगवर काहीच मस्त सापडलं नाही, तर हुरहूरही लागते. त्यामुळेच गेल्या वेळेस असलेल्या पण यंदा नसलेल्या लेखकांवर आम्ही प्रचंड नाराज आहोत. त्यांना “लिहिते व्हा!” अशी आमची आग्रहाची विनंती! यंदाच्या अंकातील नोंदीही वैविध्यपूर्ण नि शैलीपूर्ण आहेत. हे वैविध्य सांभाळण्यासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत, ह्यातच सर्व काही आलं. नव्या, जुन्या सगळ्याच ब्लॉगांपैकी जर तुम्ही काही पाहिले नसतील, तर आवर्जून पाहा.
 
आमचा पहिला प्रयत्न विश्वासार्हतेच्या कोणत्याही शंका उपस्थित न करता तुम्ही स्वीकारलात, त्याबद्दल मन:पूर्वक आभार! यंदाच्या रेषेवरच्या अक्षरांनादेखील आपण तेवढ्याच प्रेमाने आपलंसं कराल असा विश्वास वाटतो. आपल्या अभिप्रायांची वाट पाहतो आहोत. जरूर कळवा. दुष्काळ व पूर अशा परस्परविरोधी नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर आलेली यंदाची दिवाळी सर्वांसाठी एक नवीन झांजर घेऊन येवो, अशी आशा करतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
– संपादक मंडळ


***


०१. दिशांचे पहारे – क्षिप्रा
०२. बरेच काही उगवून आलेले – नंदन होडावडेकर
०३. ३१ दिवस… नो पेन… – मॉशिअर के
०७. अगं अगं बशी…!!! – श्रद्धा भोवड
१०. नॅनी – संग्राम
१२. सावली – विशाखा
१५. चल तर जाऊ… – प्रसाद बोकील
१६. रंगुनी रंगात सार्‍या… – गायत्री नातू
१८. स्तंभावरती चार सिंह – अ सेन मॅन


***
Uncategorized

रेषेवरची अक्षरे २०१०

‘रेषेवरची अक्षरे २०१०’ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.


***


आम्ही लिहितोच आहोत


पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून
मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात.
इरेस पडलों जर बच्चमजी तर
आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते
किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही.


गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो
आणि लिहीत होतो कोसळणार्‍या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे.
आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत
आम्ही लिहितोच आहोत.


पण नंतर असेच झाले
अट्टल कलावंताचे होते तसेच झाले
प्रश्नचिन्हांनी फेर धरले
आमचेच शब्द गर्गरा फिरले.


अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द?
आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी?
शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र


आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्याची सामानाची यादी, पिवळ्या पडत चाललेल्या वर्तमानपत्रातल्या रद्दी बातम्या –
अहमद घर बघ
कमळ बस
अभय निव्वळ काना-मात्राविरहित शब्दांची लगोर रच
म्हणजे सारे जनांचे श्लोक?


शांतं पापं- शांतं पापं
शांततेत पाप आहे!
शब्दांनी कर्ण्यातून मोठा कल्ला केला…


मग वाटलं अर्थांना शब्दाच्या नव्या त्वचा द्याव्यात
जसं उमजतं तसंच समजतं का हे बघावं
बघावेत आत्मजांचे प्रवास
निराकाराकडून आकाराकडे
अर्थांकडून शब्दांकडे
स्क्रीनवरच्या शुभ्र धुक्यातून
काळ्या पूर्णविरामाकडे.


***


अनुक्रमणिका


०१. माझ्या प्रियकराची प्रेयसी – मेघना भुस्कुटे
०२. आरं गोयिंदा रं गोपाला – सतीश गावडे
०३. रेघांमागून – प्रसाद बोकील
०४. प्रतिनिधी – सखी
०५. केवळ दुःखच – क्षिप्रा
०६. आम्ही गडकरी – श्रद्धा भोवड
०८. आर्तव – मंदार गद्रे
१०. ऊन की बात… – अस्मि
११. कपडे – सोनल
१२. सहभोजन – अमोल पळशीकर
१५. कवितेचं नामशेष होत जाणं – ज्ञानदा देशपांडे
१७. मिणमिण – किरण लिमये
१८. निर्माल्य – स्वाती आंबोळे
१९. क्लोज एन्काउंटर्स ऑफ चायनीज काइंड – चिमण उर्फ गुरुदत्त
२१. इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस – विद्याधर नीळकंठ भिसे
२२. बुद्ध – अ सेन मॅन
२३. बी. पी. ओ. – नचिकेत गद्रे
***

सहभाग
(गायत्री नातू, चिमण ऊर्फ गुरुदत्त, जास्वंदी, नंदन, नचिकेत गद्रे, यॉनिंग डॉग, राज श्रद्धा भोवड, सई केसकर, स्वाती आंबोळे)***

 

Uncategorized

रेषेवरची अक्षरे २०११

‘रेषेवरची अक्षरे २०११’ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.

***

तुतारीच्या शोधात…

सालाबादप्रमाणे ‘रेषेवरची अक्षरे’चा अंक ह्याही दिवाळीला आपल्यासमोर हजर आहे. मागल्या वर्षात काय झालं? काही ब्लॉग आले, काही ब्लॉग गेले. काही तरले, काही बुडाले.काही मंदावले. काही सुस्तावले.काही दौडले. काही सुटलेच. काही आपले चालले नि काही दुसर्‍यांनीच चालवायला घेतले! त्यांना आपण शुभेच्छा देऊ. चालणार्‍यांना प्रोत्साहन देऊ.सुटलेच आहेत त्यांना सोडून देऊ. दौडणार्‍यांना दौडू देऊ.सुस्तावल्यांना गदगदा हलवू. मंदावल्यांना दमदाटी करून लिहितं करू. बुडलेल्यांना तरलेल्यांनी वंदन करावे. आलेल्यांनी गेलेल्यांच्या रिकाम्या जागा भराव्यात. हे सगळं झालं की कशी ब्लॉगविश्वाची अनुदिनी मागल्या पानावरून पुढे चालू. काही नवं नाही नि काही जुनंही नाही. पण आम्ही एक तुतारी शोधत राहणार. जमेल तसं नवं शोधत राहणार, करत राहणार नि तुम्हांला सारखं तसं सांगत राहणार.अनुक्रमणिका


संकलित विभाग


Uncategorized

रेषेवरची अक्षरे २०१२

‘रेषेवरची अक्षरे २०१२’ची पीडीएफ आवृत्ती तुम्ही इथून उतरवून घेऊ शकता.

***

‘रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ‘रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ‘रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ‘रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं.
अनुक्रमणिका

एका (सरकारी) पावसाळ्य़ाचा जमाखर्च – अश्विन (अवघा रंग एक झाला…)
आवंढा – निरंजन नगरकर (अळवावरचे पाणी)
मी लेखक असते… – मेरा कुछ सामान (मेरा कुछ सामान)
शनिवार पेठ – निल्या (निल्या म्हणे!!!)
सुव्हनियर – श्रद्धा भोवड (शब्द-पट म्हणजे कोडं..)
कलेचा प्रवास आणि मूल्यमापन – राज (Random Thoughts)
सरसकट गोष्ट आणि सरसकट गोष्ट (२) – संवेद (संदिग्ध अर्थाचे उखाणे)
प्रवाहापलीकडे… – शर्मिला फडके (चिन्ह)
गाठी – जुई (…झुई …झुई झोका!)
झाडांनो इथून पुढे – कमलेश कुलकर्णी (अफ़ू)
खिडकी – जास्वंदी (जास्वंदीची फुलं)
वाघीण – संग्राम गायकवाड (ओसरी)
चिंता – आतिवास (अब्द शब्द)***