वाघीण

हे समाजशास्त्रातल्या इंग्रजी भाषे
गारद करते मला तुझे प्राचुर्य आणि तीक्ष्णता
होतो भाषावासी मी
घेत उंच उंच झोके

अणकुचीदार चिमटीत पकडतेस सूक्ष्मातिसूक्ष्म अर्थखंड
जेवढं झाकतेस तेवढंच उघडं करतेस अर्थाचं अंगप्रत्यंग

बारा गावचं पाणी प्यायलेली तू
रिचवून रिचवून रचलेली तू

तुझा पदर मोठ्ठा, तुझा कवळा मोठ्ठा
तुझी ओंजळ मोठ्ठी तुझी ढांग मोठ्ठी
तुझे ओठ हबशी मोठ्ठे तुझे स्तन


पाण्याने कारंजे बनून आकार खोदावेत
अवकाशात तात्पुरते
तसे आकार बनवत राहतेस तू
संध्याकाळच्या कुसुंबी ढगांसारखे

मजा आली तुझ्या पाठीवर बसून
अर्थांचे प्रदेश फिरताना
घडोघडी क्षितिजाच्या कक्षा
बदललेल्या दिसताना

तू मला येतेस
इतकेच नव्हे तर
मीही मला येतो
तुझ्यामार्फत

विरघळतात सगळ्याच गोष्टी तुझ्यात
आणि स्फटिकही होतात त्यांचे
झिरपतेस तू जेव्हा
त्यांच्यातून माझ्यात

तुझ्या लेथमशीनवर चाललेली
सततचीच घासाघीस
पाडत कीस उडवत ठिणग्या
घडवत नवनवीन टूल्स

तू वाघीण मालाच्या अपरंपार गोण्या वाहणारी
तू वाघीण ज्ञानमनोर्‍यावर पंजे चाटत बसलेली

- संग्राम गायकवाड 
 
http://osarisangram.blogspot.in/2012_04_01_archive.html
Post a Comment