जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

’रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ’रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ’रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ’रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं. 

यावर उपाय म्हणून ब्लॉगलेखकांकडून ’मी आणि माझी जात’ या वेगळ्या वाटेच्या विषयावर काही लिखाण मागवलं. तर त्यालाही जेमतेमच प्रतिसाद मिळाला. त्याची कारणं आपल्या प्रश्न कार्पेटखाली ढकलून वरपांगी स्वस्थ राहण्याच्या वृत्तीत शोधावीत की प्रेमप्रकर्ण-प्रेमभंग-प्रेमचारोळ्या यापलीकडे पाहायला तयार नसणार्‍या बनचुक्या शहामृगीपणात शोधावीत, या यक्षप्रश्नाचं उत्तर तुमच्यावरच सोडतो! पण आलेला प्रतिसाद इतका क्षीण होता, की तो तितकाच आणि तसाच छापावा असं अजिबात वाटलं नाही. त्यामुळे प्रतिसाद देणार्‍या मोजक्या लेखकांचे आभार आणि क्षमा एकदमच मानत तो विभाग यंदा रद्द करतो आहोत.

असो. प्रचंड वेगानं संख्याबळ वाढवणार्‍या मराठी ब्लॉगविश्वात उत्तम काही मिळवताना कष्ट झाले आणि त्यात अंतिम निवड करताना नेहमी होणारी ’हे घ्यावं की ते, हेही उत्तम नि तेही’ या प्रकारची दमछाक यंदा जराही न झाल्याने आम्ही कष्टीही झालो...

सूर निराशेचा लागला खरा. आमचा उत्साह आटला की ब्लॉगलेखकांचं सर्जन? माहीत नाही. पण आम्हांला येणारी मजा कमी झाली हे निश्चित. तरीही ’उपक्रम घेतला आहे हाती, तर एक प्रयोग म्हणून तो चालू ठेवू’ असा विचार करून झाला. पण हे असं बळंच चालू ठेवण्याची गरज आहे का? याचं उत्तर आज आमच्यापाशी नाही. ’आता नाही करावंसं वाटत’ असं म्हणून मुकाटपणे हा अंक बंद करता आला असताच. खंतावलेल्या सुरात हे सगळं सांगायची तरी काय गरज होती, हा प्रश्नही पडू शकेल कुणाला. पण ज्या उत्साहानं मराठी ब्लॉगांवरचं भरभरून लिहिणं तुमच्याशी वाटून घेतलं, त्याच चोखपणानं ही सवंगाईही दाखवली पाहिजे, असं वाटत राहिलं. केवळ म्हणून हा खटाटोप.

कदाचित आम्हांला वाटते आहे, तेवढी परिस्थिती वाईट नसेल. नसतील लोक लिहीत ब्लॉगवर, तर त्याने काहीही फरक पडणार नसेल. हे तात्कालिक असेल. कदाचित पुन्हा मराठी ब्लॉगवर सकस लिखाण होऊ लागेल. कदाचित आम्ही नेमक्या ठिकाणी पाहत नसू. कदाचित हे डायरीवजा माध्यम ललित लेखनाला तितकंसं मानवलं नसेल. कदाचित संस्थळांवर मिळणार्‍या विपुल प्रतिक्रिया इथे न मिळाल्यानं लेखक खट्टू झाले असतील... शक्यता अनेक. सगळ्याच कमीअधिक प्रमाणात महत्त्वाच्या. पण तूर्तास ’तोच तो’पणातला कंटाळा काही केल्या टळत नाही. 

या ब्लॉगविश्वात, तिथल्या लेखकांत आणि लिखाणात आम्ही गेली पाच वर्षं रमलो होतो. निर्मितिक्षम लोकांच्या सोबतीत भारावलो होतो. आम्ही ब्लॉग जगत होतो. ’रेषेवरची अक्षरे’मधून हा आनंद, उत्साह, भारावलेपण, सर्जन तुमच्याशी वाटून घेत होतो. यंदा त्याला काहीशी ओहोटी लागलेली असली, तरीही ब्लॉगवरच्या रिकाम्या जागांशी जुळलेल्या आठवणी ’रेषेवरच्या अक्षरे’च्या पीडीएफ फायलीत पुन्हा सापडतील. या अंकाच्या निमित्तानं तुम्हांला रेषेवरची अक्षरं पुन्हा आठवतील. जालावरच्या मुशाफिरीत आपल्याला सापडलेल्या या नव्या माध्यमाची अपूर्वाई, जादू आणि ताकदही तुम्हांला पुन्हा जाणवेल... अशी आशा बाळगत यंदाचा अंक सादर करतो आहोत. 

भेटत राहूच. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपादक
रेषेवरची अक्षरे
२०१२
1 comment