गाठी

(गुलझार यांच्या 'जुलाहे' या कवितेवरून प्रभावित)

हाताशी मोकळा वेळ असला की मी आठवणींचा गुंता समोर घेऊन बसते. 
एक एक गाठ सोडवताना, 
कित्येक धरून ठेवलेली, निसटून गेलेली माणसे भेटतात, 
काही लख्ख, काही धूसर प्रसंग आठवतात.  
तोपर्यंत दुसरीकडे पुन्हा गुंता झालेला असतो.

एकदा मात्र एक सुट्टे टोकच लागले हाताला.
त्याला धरून मागे जाता जाता त्याच्या दुसऱ्या टोकाशी तू भेटलास.
मागे एकदा असंच एक टोक स्वतःकडे ठेवून, 
मध्ये घट्ट गाठ बांधून, दुसरं टोक माझ्याकडे दिलं होतंस.
म्हणाला होतास, "गाठी या वरतीच बांधलेल्या असतात!
असेल आपली पक्की, तर टिकेल."
नंतर आपापल्या मार्गांनी जाताना...
दोन्हीकडून ओढ बसायला लागली.
पण त्यामुळे मधली गाठ अजूनच घट्ट झाली का?
कदाचित हो... कदाचित नाही...
आपापल्या टोकाशी झालेला गुंता सोडवताना 
दोघांनाही बहुदा,
मागे वळून पुन्हा त्या गाठीकडे बघण्याचं धैर्य झालं नाही. 
आता फक्त सुतासारख्या सरळ तुझ्या आठवणीच तेवढ्या उरल्या. 

- जुई 

http://jchitale.blogspot.in/2012/03/blog-post.html
Post a Comment