Uncategorized

झाडांनो इथून पुढे

झाडांनो, घ्या मजा करून
तुमची पिढी शेवटचीच कदाचित, स्वातंत्र्य उपभोगणारी.
इथून पुढे तुंम्हांला नाही मिळणार मुभा
बी पडेल तिथे उगवायला आणि
वेलींना म्हणू तसं अंगाखांद्यावर खेळवायला.

हळूहळू चढत जाईल तुमच्यावर कॉर्पोरेट लुक.
पक्ष्यांना ठरवून दिली जातील
त्यांची स्थानं, त्यांची घरटी ‘चायना मेड’.

झाडांनो, इथून पुढे नाही करावी लागणार तगमग
कातळ कापून ओलावा शोधायची, तो टिकवायची.
ठरल्या वेळी ठरला कोटा ठिबकत राहील तुमच्यापर्यंत.

दुबळे असाल तर मिळेल आधार.
रोगी असाल तर औषधही.
खंगलात तर वेळीच बंदोबस्त होईल तुमचा
स्वेच्छामरणाचा विचार मनात येण्यापूर्वीच.
मधमाश्याही उडवल्या जातील हव्या तेव्हा - हव्या तशा.
परागकणांच्या उलाढालींचे डिजिटल मोजमाप होईल आपोआप.

इथून पुढे नाही रंगणार चर्चा एखाद्या अंगणात
तुम्ही कसे वागता याची.
आणि नाही चढणार एखादं मुजोर पोर शेंड्यापर्यंत सणासुदीला.
अमावस्या-पौर्णिमेला तुमच्या
सावल्यांची नि हालचालींची भीती नाही वाटणार दुबळ्या मनाला,
की सवाष्णीही नाही धरायच्या फेर साताजन्मीचा.

पण आज जो घेतो मोफत श्वास आंम्ही आणि
होतो तरतरीत तुमच्या सावलीत कुठेही,
उद्या त्याच श्वासांसाठी आणि सावलीसाठी
काढून ठेवलेल्या कर्जांचे हप्ते चिकटून असतील आमच्या झोपेला.
झाडांनो, आज घ्या मजा करून आणि
मलाही पडू द्या निपचीत तुमच्या सावलीत.
उद्या मीही असू शकतो तुमच्या कार्पोरेट जगाचा यशस्वी उद्योजक.

- कमलेश कुलकर्णी

http://kamleshkavita.blogspot.in/2012/03/blog-post_27.html
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *