Uncategorized

प्रवाहापलीकडे…

प्रवाहापलीकडे...

अमूर्त चित्र हे अमूर्तच असते. त्याला इतर वेगळी ओळख नाही. थेट तुमच्यासमोर येऊन तुम्हांला ते भिडते. एका समीक्षकाने माझ्या चित्राबद्दल लिहिले की, याला काही सुरुवात, शेवट दिसतच नाही.
जरी त्याला ते अभिप्रेत नसले, तरी मला हा मोठाच प्रशंसोद्गार वाटला. - जॅक्सन पोलॉक

(स्टुडिओ- प्रकाश वाघमारे)

शांत, रम्य नदीकाठी, हिरव्या, दाट वनराईच्या पार्श्वभूमीवर एखाद्या चित्रकाराचा स्वत:चा स्टुडिओ असणं हे अकल्पित नक्कीच नाही.
पण जर तो चित्रकार आणि त्याचा असा स्टुडिओ भर मुंबई शहरात आहेत असं कोणी मला आधी सांगितलं असतं, तर मी त्याला वेडा ठरवलं असतं. 

पण एका मंगळवारी सकाळी ११ वाजता मी चित्रकार प्रकाश वाघमारेच्या स्टुडिओत उभी होते आणि समोरच्या प्रशस्त खिडकीच्या चौकटीतून मला मोकळं आकाश, दाट जंगलात वळण घेत नाहीशी झालेली पायवाट, गर्द वृक्षराजीला लागून नदीचं खळाळतं पात्र असं सगळं दिसत होतं. 
प्रकाश ऍबस्ट्रॅक्ट पेंटर आहे हे माहीत होतं म्हणजे हा त्याने रंगवलेला कॅनव्हास निश्चित नाही, कोल्हापूर स्कूलच्या एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेलं हे एक नयनरम्य, रिऍलिस्टीक शैलीतलं निसर्गदृश्य समोरच्या चौकटीत बंदिस्त असणार, कारण बोरिवलीच्या एका इमारतीतल्या पाचव्या मजल्यावरून प्रत्यक्षात असं काही मला दिसणं शक्य नाही असं मनाशी म्हणत मी चौकटीच्या आणखी जवळ जाते.

निसर्गचित्र भलतंच जिवंत असतं. खालून वाहणार्‍या नदीच्या काठावर धोबी एका लयीत हातातले कपडे आपटत असतात. काळ्या कातळावर वाळत घातलेल्या कपड्यांचे काही शुभ्र, काही रंगीत चौकोनी, आयताकृती पॅटर्न्स... खिडकीच्या चौकटीला लागूनच जरा खाली पिंपळाच्या पानांचा सळसळता पसारा आणि त्यावर मान तिरकी करत खालच्या नदीच्या पात्राकडे डोकावून बघणारा चक्क एक रंगीत खंड्याही. नदीच्या पलीकडच्या काठावर गुलाबी टबुबिया मनसोक्त फुललेला, चिंचेची काळसर हिरवी दाटी आणि बाजूलाच एक उंच निष्पर्ण झाडही. पर्स्पेक्टीव्ह पूर्ण.
निसर्गचित्रातल्या शिशिराच्या खुणा अजून ठळक होत्या, ताज्या हिरव्या रंगाऐवजी पिवळ्या, तपकिरी, यलो ऑकरच्या छटा जास्त दिसत होत्या.प्रकाश वाघमारे, ज्याला भेटायला मी या स्टुडिओत आलेली असते, त्याचा आवाज आता मला ऐकायला येतो. तो सांगत असतो, "मी पहिल्यांदा ही जागा पाहिली, तेव्हा एप्रिल-मेचे दिवस होते. गुलमोहोर, पळस, अमलताश फ़ुलण्याचा ऋतू... हा सगळा पट्टा लालभडक, केशरी आणि पिवळा दिसत होता. ते दृश्य बघितलं आणि ठरवलं की स्टुडिओ असावा तर इथेच." 
नक्कीच. मी मान डोलावते.
आणि मग खिडकीच्या कट्ट्यावरच बैठक जमवून आमच्यातला संवाद सुरू होतो.
प्रकाश जवळपास गेली दोन दशके चित्रं काढतो आहे. त्याची चित्रं अमूर्त असतात आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी माझ्या मनावर एक दडपण असतं. याच्या चित्रांची भाषा आपल्याला समजेल का, समजलेली बरोबर असेल का, आणि तीच त्यालाही अभिप्रेत असेल का, मला माहीत नव्हतं.
आम्ही बोलत होतो, तिथेच बाजूला एक मोठा निळाशार कॅनव्हास होता. डोहात वारंवार डोकावून बघायचा मनाला मोह व्हावा, त्यातल्या प्रकाशाच्या तिरिपींकडे, कवडशांकडे पुन्हा पुन्हा निरखून पाहण्याचा मोह व्हावा आणि तसं बघत असतानाच निळ्या डोहातली नीरव शांतता मनापर्यंत पोचावी, तसं काहीसं प्रकाशशी बोलत असताना त्या कॅनव्हासकडे नजर वळली की होत होतं.

दरम्यान प्रकाश त्याच्या स्टुडिओबद्दल, चित्रांबद्दल, चित्रकलेबद्दल बोलत असतो आणि मी ऐकत असते."एकान्त अवकाश ही स्टुडिओची माझ्या मनातली संकल्पना. स्टुडिओ म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी मिळणारा वेळ. जो तुम्हाला राहत्या घरात मिळू शकत नाही. जिथे फक्त तुम्ही, तुमची चित्रे, मनातले विचार असतात. काहीही व्यत्यय मधे न येता, एकसंध विचारांच्या प्रोसेसमधे हातून जे काम घडतं, ते महत्वाचं असतं असं मला वाटतं. अशा एकान्तात, एकसंध विचारांच्या प्रोसेसमधून तुम्ही मेडिटेशनमधे जाता. चित्र काढण्याकरता ही विशिष्ट मानसिक अवस्था मला गरजेची वाटते. 
दोन वर्षांपूर्वी मी या जागेत आलो.
त्याआधी विरारला होतो. विरारच्या घरात चित्र काढायला माझी वेगळी खोली होती, पण एकान्त नव्हता. सतत डिस्टर्बन्समधे जायचो मी. आणि एकदा डिस्टर्बन्समधे चित्र गेलं की ते अर्धवटच राहायचं. पूर्ण करायचा नंतर कितीही, अगदी जबरदस्तीने प्रयत्न केला, तरी ते खराब व्हायचं.
त्या वेळी मला जाणवलं की, आपल्याला चित्रं काढण्याकरता स्वतंत्र जागेची गरज आहे. मग विरारला वेगळी जागा घेतली चित्रं काढायला. आणि तशी वेगळी जागा झाल्यावर मनात इतका फोर्स आला ना, मला स्वत:लाच आश्चर्य वाटेल एव्हढी मी कामं केली त्या काळात, कारण कोणीच नाही तिथे डिस्टर्ब करायला. फक्त मी आणि माझी चित्रं. ही २००५ची गोष्ट.
शिक्षण संपल्यावर मधे बराच काळ गेल्यानंतर ही माझी अशी वेगळी, स्वतंत्र जागा मला मिळाली होती. मधल्या काळात मी घरी, किंवा इतर ठिकाणीही, बाहेर, जिथे जागा मिळेल तिथे काम करत होतो. आम्ही एक लॅन्ड घेतली होती, त्यावर एक अगदी ओपन अशी स्पेस... लाद्या वगैरे नव्हत्या, वरून मोकळी... तिथे जाऊन काम करायचो. नितीनच्या दादरा-नगरहवेलीला जाऊन काम केलं, सफाळ्याला केलं, जिथे मोकळी जागा असेल, तिथे काम करायचो. ज्या वेळी थोडे पैसे हातात आले, त्या वेळी स्वतंत्र स्टुडिओ घेतला.
एकान्तासाठी मी सतत धडपडत असायचो. तुमचं आणि चित्राचं नातं ख-या अर्थाने अशा एकान्तातच निर्माण होतं. घरात असताना हे होत नाही. नंतर पुन्हा दुसरा स्टुडिओ घेतला मी. तोही विरारलाच. त्याचाही चांगला अनुभव आला.
त्यानंतर मग आत्ता आहे, त्या जागी आलो.
एक आर्ट कॅम्प झाला होता नॅशनल पार्कमधे. त्या वेळीच मला हा परिसर बघता क्षणीच खूप आवडला होता. ठरवलं, इथेच स्टुडिओ थाटायचा. खरं तर, यापेक्षाही एक मोठी जागा मला बोरिवली वेस्टला मिळत होती, पण त्या गर्दीत मला जायचं नव्हतं, निसर्गाच्या जवळ जागा हवी होती. लहान तर लहान. २००७ला ही जागा मी बुक केली. २००६ला माझा स्वतंत्र शो झाला होता. त्या शोमुळे खूप फायनान्शियल सपोर्ट मिळाला. त्यामुळे ही जागा घेता आली. इथे शिफ्ट झालो २००८-९ला."

ही जागा लहान आहे असं प्रकाश म्हणाला, तेव्हा मला खरं तर आश्चर्य वाटलं. कारण दरवाज्यातून आत शिरल्यावर या जागेचं पहिलं इम्प्रेशन मनात उमटतं, किती प्रशस्त, मोकळी जागा आहे. एक सलग मोकळा हॉल, टोकाला ओपन किचन, डाव्या बाजूला पार्टिशनच्या मागे टॉयलेट युनिट आणि मग बेडरूम. काहीही क्लटर नसलेला स्वच्छ, मोकळा अंतर्भाग, भरपूर प्रकाश आणि वावरायला मोकळी जागा. ही सगळी स्पेस कुठून आली?
प्रकाश उठून हाताने दाखवतो, त्याने काय काय, कसे बदल केले आहेत ते."या जागेचा आत्ता आहे तो सगळा अंतर्भाग मी मला हवा तसा डिझाईन केला. डोक्यात होतंच मला काय हवंय ते. आतल्या सिव्हिल स्ट्रक्चरमधे शक्य होते, तेव्हढे सगळे बदल केले. किचन आणि लिव्हिंग रूममधल्या जागेवर बाथरूम युनिट होतं, ते काढून टाकून एक सलग मोकळी जागा तयार केली. चित्रं काढायला, ती ठेवायला मोकळी स्पेस मिळाली पाहिजे हा मुख्य उद्देश होता.
चित्र काढताना मला स्पेस, अंतर महत्त्वाचं वाटतं. ते पुरेसं मिळायला हवं.
चित्र कधी पूर्ण होईल नाही सांगत येत. एक महिना लागतो, जास्तही. कधी कधी या बिनबॅगवर बसून तास न्‌ तास मी नुसताच चित्राकडे बघत बसतो, तंद्री लागते, कधी कधी त्यावरच झोपही लागते बघताना.
अर्थात चित्र संपूर्ण होत असतानाची ही प्रोसेस आहे, मधली प्रोसेस काय ते मला सांगता येणार नाही. ब्लॅन्कनेस, पोकळी मनात असते. ती मी तशीच राहू देतो.
विचार करून हेच करायचंय असं कधीच होत नाही. त्याशिवाय पुढच्या टप्प्यापर्यंत आपण पोचत नाही असं मला वाटतं.
ही मागची दोन चित्रं आहेत, त्यांच्यावर चुकीचे रंग लागले. फेबिओ आणि कॅम्लिन, रंगाच्या कंपन्या वेगळ्या, रंगांची नाव सारखी असूनही आतले रंग वेगळे. कॅम्लिनचा रंग वापरला आणि काही कळेनाच चित्र. एकदम फ्लॅट. मग दुसरे रंग त्यात मिसळून पुन्हा प्रयत्न केला, तर जे फॉर्म्स होते तेही गायब. चित्र असं डिस्टर्ब झालं की मग बाजूला ठेवण्यावाचून पर्याय नसतो. आता मी त्यावर ऑइल करायचा प्रयत्न केलाय, बघू या.
अर्थात हे सिरियस काम नाही. हे खेळणं आहे रंगांशी. पण काहीतरी त्यातून मिळतं, आणि मग तिथून सुरुवात होते नव्या कामाची. आता कदाचित यातून पुढची प्रोसेस मला मिळेल. पुढे सरकण्याची गरज आहे हे मनाला जाणवतंय.
गेल्या वर्षी तर फक्त पेपरवर्क केलं मी. ते अचानक होत गेलं. म्हणजे मी पेपर्स घेतले आणि आता करू काय, म्हणून ब्लॅक इन्कने सुरुवात केली. मग विचार केला आता रोलर वापरू या, काय होतंय बघू या, म्हणत लाईन करायला गेलो. आणि नंतर एव्ह्ढे बदल होत गेले अचानक. मजा येत गेली आणि त्यातून २५-३० पेंटिंग्स झाली, पेपरवर. पण नंतर मी सुरुवात केली करायला परत, तर जाणवलं, झालं आता यात काम करून. पुन्हा नाही झालं.
प्रोसेस पुढे सरकायची थांबते ती अशी. मग कॅनव्हासवर आलं ते. कॅनव्हासवर करायला पाहिजे मला असं वाटलं. आता हीसुद्धा प्रोसेस पुढे सरकत नाहीय, हा शेवटचा कॅनव्हास असणार या सिरीजमधला.
(जो ब्ल्यू कॅनव्हास समोर होता त्याकडे हात दाखवून प्रकाश सांगतो.)
आता पुढचं काही खुणावतंय. चित्र संवाद साधेल याची वाट पाहतोय. चित्राला त्याच वेळी सुरुवात होऊ शकते.”

चौकटीबाहेर दुपार लखलखती. पण आतला उजेड तीव्र नाही. हिरव्या झाडांमधून गाळून आत येण्यामुळे तो मऊ, कोमल झालेला आहे. 
खिडकीच्या समोरच्या भिंतीला लागून मोठे कॅनव्हास उलटे करुन ठेवलेले असतात. प्रकाश ते आता एक एक करून सुलट करतो आणि मला त्याची चित्रं दाखवतो.आर्ट गॅल-यांमधे जाऊन एखाद्या चित्रकाराची चित्रं बघणं आणि त्याच्या प्रत्यक्ष स्टुडिओत ती बघणं यांमधे सिनेमात काश्मीर बघणं आणि प्रत्यक्षात बघणं इतकं अंतर. स्टुडिओतल्या चित्रात तुम्ही प्रवेश करू शकता. आर्ट गॅलरीतलं चित्र तुमच्यात आणि त्याच्यात नको इतकं अंतर राखतं.
प्रकाशच्या ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्जच्या बाबतीत तर ती त्याच्या स्टुडिओत जाऊन बघायला मिळण्याचा अनुभव माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. 
चित्रांचे कॅनव्हास काही जमिनीवर आडवे, काही भिंतीला लागून, काही एकमेकांसमोर, एकावर एक. तैलरंगाचा पोत, कधी खडबडीत, कठीण, कधी हळूवार मऊ. ब्रशचे फ़टकारे कधी हलके, कधी जोरकस. आणि निळे, हिरवे, लाल, तपकिरी, अर्दन, अवकाशमय, नैसर्गिक रंगांचे टोन्स. त्यातले उजेडाचे चौकोन, फटी... काही चिन्हं, काही अनाहत आकार, ओळखीचे, अनोळखी वाटणारे... ऊर्जेचे, लयीचे आणि उत्पत्तीचे, विलयाचेही. खोलवरून, उसळी मारून बाहेर येतो आहे, तोही शांततेचाच प्रवाह... नीरव, आध्यात्मिक. 


प्रकाशचं बोलणं माझी उमज सोपी करत जातं अजूनच. मी चित्र पाहते, त्याचं बोलणं ऐकते, आणि पुन्हा चित्र पाहते. 
"चित्राची भाषा कळायला कठीण नाही. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात ना, तर ते खूप सोपं आहे. त्याकरता सारखी चित्रं बघायला हवीत, चित्रकारांशी बोलायला पाहिजे. चित्रातली प्रतीकात्मकता वगैरेही जाणून घ्यायची फार गरज नसते. मुळात प्रतीकात्मकता म्हणजे नक्की काय? सब्जेक्टला एका छोट्या चिन्हात अडकवून ठेवलेली गोष्ट आहे ती.”

ऍब्स्ट्रॅक्शनकडे नेणारा हा जो प्रवास असतो, प्रकाश सुरुवातीपासून त्याच मार्गावर होता का?

(प्रश्नाचं उत्तर सविस्तर असणार हे माहीत होतं. त्यामुळे आता ’चहा घेणार का?’ या त्याच्या उत्तरावर मी आवर्जून ’हो’ सांगते. प्रकाश ’चहा-शौकीन’ आहे असं त्याच्याच बोलण्यावरून समजतं. देशी-विदेशी, अनेक प्रकारचे चहा त्याच्या संग्रहात असतात. मला हे आवडतं. पण सध्या मी देशी, लाल, दुधाच्या चहावरच समाधान मानायचं ठरवते. कारण प्रकाशच्या उत्तरातून जे सापडणार होतं, त्याचा आस्वाद माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा, गरजेचा असतो.)"८४-९० हा काळ मी जेजेमधे होतो. जेजेमधे मला ऍडमिशन मिळाली नव्हती आधी. त्यामुळे एक वर्ष मी ग्रान्टरोडच्या 'चित्रकला मंदिर'मधे होतो. घरून प्रेशर होतं - तू आयटीआय कर आणि नोकरीला लाग. हे काय करतोस. धंदे चित्र काढण्याचे. मध्यमवर्गीय कुटुंबातला जो नेहमीचा प्रॉब्लेम, तोच. या भांडणामधे एक वर्ष तसंच गेलं. मला जेजेलाच प्रवेश हवा होता. ते वातावरण बघितलेलं होतं चित्रकलेचं. रहेजामधे ते नव्हतं. झगडून काय-काय केलं, पण घेतली ऍडमिशन जेजेला. घरून अजिबात सपोर्ट नव्हता. झोपायला जागा होती, दोन वेळा जेवायला मिळत होतं म्हणून ते घर. बाकी कमवायचं तू, तुझं शिक्षण तू घे, त्याकरता काय ते प्रयत्न तू कर.

कॉलेजात सुरुवातीला पोर्ट्रेट्स आणि लॅन्डस्केप्स खूप करायचो आम्ही. कॉलेज सुटल्यावरही आम्ही हॉबी क्लासमधे बसू द्या अशी विनंती अनिल नाईकसरांना करायचो. कॉलेज साडेतीनला सुटल्यानंतर हे क्लास सुरू व्हायचे. मग आम्ही स्केचिंग, लॅन्डस्केप्स असं करत तिथेच बसायचो. घरी जाऊन तरी करणार काय? 
ही चित्र करताना माझ्या मनात विचार यायचा की, हे आपण का करतोय? मी सरफेसचा खूप विचार करायचो. झाडाच्या खोडाचे सरफेस. हे किती वेगवेगळे आहेत, हे कसे उतरवणार, असे प्रश्न पडायचे त्या वेळेला, पण विचार नव्हता तेव्हढा.
मग माझ्याकडे कॅमेरा आला. फोटोग्राफी खूप करायला लागलो. नैसर्गिक गोष्टी, ज्या आपल्या नजरेला वेगळ्या वाटतात, त्या मी शूट करत गेलो. त्याचबरोबर मी चित्रकारांच्या पेंटिंग्जचे फोटोग्राफ्सही खूप घेत असे.
कॉलेजमधे हरिहरेश्वरचा कॅम्प होता. त्या वेळी सगळे पेंटिंग करत असताना मी शूट करत होतो. दगडांचे खूप फोटो काढले मी तेव्हा. दगडावरचं टेक्श्चर वगैरे जे त्यात आलं, ते बघून आर्टिस्ट सेन्टरमधे प्रफुल्ला डहाणूकर उडाल्या. "अरे, मला कसं दिसलं नव्हतं हे?" असं म्हणाल्या.
म्हणजे एक वेगळी दृष्टी येतच होती तेव्हापासून. पण वाटायचं कॅमेरा काही सेकंदांत जे टिपतो, त्याकरता आपण इतके दिवस कशाकरता घालवतो पेंटिंगमधे? याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे हे जाणवायला लागलं.
सुरुवात इथे झाली होती. आणि माझ्या चित्रांत त्याच सुमारास त्रिकोण यायला लागले होते.
प्रोफेसर बघायचे आणि म्हणायचे, "वा, सुंदर झालंय."
पण सुंदर झालंय म्हणजे काय?
आम्हांला अजून पेंटिंगच कळायचं नाही. करतोय, हातून होतंय, पण त्याचा अर्थ कळत नाही. हे असं का, कळत नव्हतं.
त्यानंतर आम्हाला कोलतेसर आले शिकवायला जेजेमधे. ते औरंगाबादला काही महिने होते. तिथून पुन्हा इथे आले पेंटिंग शिकवायला.
एक दिवस अचानक मी चित्र काढत असताना ते आले आणि म्हणाले, "अरे, तू काय करतो आहेस माहीत आहे का? तू गायतोंडे रंगवतो आहेस."
मला गायतोंडे कोण तेही माहीत नव्हतं तेव्हा. पॉल क्लीसुद्धा माहीत नव्हते.
"तो त्रिकोण म्हणजे काय माहीत आहे का तुला?" कोलतेंनी विचारलं.
म्हटलं, "नाही सर. जॉमेट्रिकल फॉर्म आहे हा, इतकंच माहीत आहे."
हे उत्तर माझ्याकडून गेल्यावर सर म्हणाले, "शोध आणि पंधरा दिवसांनी येऊन भेट मला उत्तर घेऊन. पेंटिंगची आवड आहे ना? मग हा शोध घ्यायलाच हवास तू."
हे चॅलेंज मी स्वीकारलं. भारावल्यासारखा, अक्षरश: वेड्यासारखा मी लायब्ररीमधे जाऊन बसायला लागलो. कधी काही न वाचणारा मी पुस्तकं वाचायला लागलो. मित्रांबरोबरही त्याचीच चर्चा.
पुस्तक चाळत असताना मी तंत्राची वगैरे पुस्तकंही बघितली. पण यापेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट घडून आली.
श्रावण महिना चालू होता, म्हणून मी माझ्या गावी गेलो होतो. घरी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं.
माझे आजोबा अर्थ सांगत होते, "रजोगुण, तमोगुण, सद्गुण म्हणजे काय? त्रिकोण आहे बरं का."
काय योगायोग होता तो. मी असा पायरीवर पाय ठेवतोय, आणि हे शब्द ऐकतोय.
त्या रात्री मी आजोबांना झोपू दिलं नाही. त्यानंतर मग विचारांची आवर्तनंच सुरू झाली.
मग गावाला जत्रेत किंवा संकष्टी चतुर्थीला घरात रांगोळी किंवा चुन्याने जो आकार काढतात, कना असं म्हणतात त्याला कोकणात, तो जो एक विशिष्ट आकार आहे, त्याबद्दलही विचारायला लागलो सगळ्यांना. चौकोनामधे त्रिकोण असतात, त्यांना सजवतात. त्याचा अर्थ विचारून सगळ्यांना भंडावून सोडलं. गावची जत्रा असताना सगळ्यांच्याच अंगणात ती सारखीच आकृती असते. त्यात काहीतरी वेगळी एनर्जी दिसायला लागली मला. देवीची पालखी निघून गेली की ती एनर्जी निघून गेल्यासारखी वाटायची.
गावातल्यांकरता त्या आकृत्या रूटीन होत्या, एक प्रथा म्हणून अर्थ न कळताच त्या ते चितारत होते. मला मात्र विचार थांबवता येत नव्हते. वाटलं की, हा फॉर्म त्रिमितीत घेतला तर काय होईल? तर त्याचा पिरॅमिड झाला.
मग मात्र मी जास्त खोलात जाऊन अभ्यास करायला लागलो. काय आहे हा पिरॅमिड नक्की? इजिप्तचे पिरॅमिड... त्यात किती एनर्जी असते, पॉझिटीव्हिटी किती असते, हा सगळा विचार मग चित्रांतून जास्त सखोलतेनं, जाणीवपूर्वक यायला लागला.
पंधरा दिवसांनी सरांना भेटलो.
मग त्यानंतरच्या त्यांच्यासोबतच्या चर्चेत ज्या गोष्टी मिळाल्या, त्या अजूनपर्यंत पुरताहेत मला.
त्यातूनच मी पुढे डेव्हलप होत गेलो. पण मूळ ऍब्स्ट्रॅक्शनला सुरुवात इथून झाली. त्रिकोण, त्याचा अर्थ काय, कसा असतो, का असतो... या विचारांतून. बिंदू, वर्तुळ हे नंतरचे.
खरं तर कुठलेही चित्रकलेचे सर तुम्हांला भौमितिक आकार रंगवायला देतात. वर्तुळ, त्रिकोण, अर्धवर्तुळ किंवा चौकोन रंगवा आणि हे कॉम्पोझिशन तयार करा. पण कधी सरांना कोणी विचारत नाही की, हे आकारच का देता आम्हांला रंगवायला?
गती, स्थिती आणि लय हे मूळ फॉर्म्स आहेत. गती म्हणजे वर्तुळ, स्थिती म्हणजे चौकोन आणि लय म्हणजे त्रिकोण. हा बेस आहे. इथून सुरुवात आहे. हा बेस समजवून दिला कोलतेसरांनी. ते माझे गुरू आहेत."

ऍबस्ट्रॅक्शनची इतकी सोपी आणि सुंदर मूलभूत रचना... मला अचानक जगातल्या सगळ्या चित्रांचा मूळ गाभा एकदाचा समजलाय असं काहीतरी अचानक वाटायला लागलंय.
माझ्या मनात मगाशी गायतोंडेंचं वाक्य घोळत होतं. त्याला तेही विचारून टाकलं.

गायतोंडे म्हणायचे, मी ऍब्स्ट्रॅक्ट पेंटर नाही, मी फक्त पेंटर आहे. ते का नक्की?प्रकाश समजूतदार, ज्ञानी हसतो. आणि मला समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो, "पेंटिंगमधे रिऍलिस्टीक, ऍब्स्ट्रॅक्ट असं काही नसतंच खरं. तुम्ही पेंट काय करता याला महत्त्व आहे. पण म्हणून नुसतं रंग लावणं म्हणजेही पेंटिंग नाही ना! नाहीतर रंगारीसुद्धा स्वत:ला चित्रकारच समजतील. पेंटिंगमधे भेद नसावाच. माणसासारखं दिसतय म्हणून हे रिऍलिस्टीक पेंटिंग, माणसासारखं दिसत नाही हा आकार, म्हणून हे ऍबस्ट्रॅक्ट असं काही नाही. आपण पेंटिंग बघताना हे अमूर्त बघतोय की मूर्त यात बघणा-याने अडकून पडता कामा नये.
या सगळ्या गोष्टी निसर्गात आहेत, पण आपली दृष्टी कमी पडते. सौंदर्य बघण्याची आपली दृष्टी कमी पडते.
आपण लिमिटेड सौंदर्यात अडकलेले आहोत. बारकाईने बघायची गरज असते. तरच या गोष्टी दिसतील. दगडांचे आकार बघा. त्यांचं अंतरंग बघा. मुळात ती चित्रंच असतात. निसर्गाने सगळंच दिलेलं असतं. पोत असतो, रंग असतात, आकार असतात. चित्रकार हा निमित्त असतो ते लोकांपर्यंत पोचवायला. पण त्याआधी त्याला निसर्गातले मूलाकार समजावून घ्यायला हवेत ना. दृष्टी तुम्हांला व्हायब्रेट करत असते तिथे पोचण्याकरता. जाणीव करून देत असते की, हे बघ आणि हे लोकांपर्यंत पोचव.
सुरुवातीच्या काळात केलेल्या फोटोग्राफीचा मला याकरता खूपच फायदा झाला, ही दृष्टी डेव्हलप करण्याकरता. लेन्स तुम्हांला खूप जवळपर्यंत पोचवत असते. बारकाईने वस्तूकडे बघायला तुम्हांला प्रवृत्त करते."

लेन्स जे काही सेकंदांत टिपते, त्याकरता आपल्याला पेंटिंग करायची काय गरज या प्रश्नाकरता जो विचार केला, त्यातून काय गवसलं?

"निसर्गातले जे आकार आहेत, त्यांच्यापलीकडे काय आहे हे जाणून घ्यायला त्या आकारांशी संवाद साधण्याची गरज असते. तो संवाद सहज होत नाही. त्या आकारांची तुम्ही फक्त कॉपी करता, तेव्हा तुम्ही चित्रकार नसता.
तुमची स्वत:ची स्वतंत्र शैली, ओळख केव्हा निर्माण होते? जेव्हा तुम्ही विचार करता, तुमचा विचार कॅनव्हासवर उतरवता, तेव्हा.
नाहीतर नुसते आकार रंगवणं याला काय अर्थ?
फिगरेटिव्ह रंगवणं ही नुसती क्राफ्ट्समनशिप झाली. ते काही मोठं काम नाही. भले ते न्यूड असो, नाहीतर निसर्गचित्र. ती क्राफ्ट्समनशिप झाली. कोणालाही सरावाने ते जमू शकतं.
पण विचारांचं काय? निसर्गाच्या आकारांमधला आणि रंगांमधला जो संवाद तुम्ही कागदावर उमटवायला हवाय, तो कुठून येणार त्यात?
त्याकरता सराव उपयोगाचा नाही नुसता.
ती एक वेदना असते, जी तुम्ही चित्रात मांडत असता. नाहीतर कोणी विकत घेत नाही अशी चित्रं का पेंट करायची हाही एक प्रश्न असतो. निसर्गात आपण काय बघतो, त्याचा अनुभव कसा घेतो, तो अनुभव कसा इंटरप्रिट करतो ते महत्त्वाचं.
शेवटी तुम्हांला वाट दाखवणारा निसर्गच आहे. तुम्ही निसर्गाचा भाग आहात आणि तुम्हीही निर्माते आहात. कारण तुम्ही सजीव आहात.
तुम्ही जे बीज लावता, त्यातून कोणता आकार, कसा जन्म घेणार हे तुम्हांला माहीत नसतं. आकार रोज बदलत असतो.
पाच मिनिटं बघितलेलं झाड रंगवायचा विचार तुम्ही करता. अरे, पण त्याचं आयुष्य बघ ना. ते कसं विकसित होत गेलंय? ते रंगवलं, तर ते अमूर्त नाही का?
मगाशी आपण त्रिकोणांबद्दल बोलत होतो... अनंत आहे सगळं. तुम्ही कुठला आकार निर्माण करणार, तुमचं काहीच नसतं त्यात. आकारांकडे बघतानाही त्याला सब्जेक्टिव्हिटी आली की प्रॉब्लेम होतो. मग लोकं म्हणतात, आम्हांला समजलं हां. खरंतर पोर्ट्रेट काय किंवा लॅन्डस्केपही काय, कोणालाही काही समजत नाही.
गर्भ असतो त्याच्यापर्यंत कोण जातंय? झाडाचं पान आहे ते दिसतंय, पण त्या पानाला सजीवपणा येण्यासाठी आतमधे काय आहे? तो रंग, तो हिरवेपणा, पिवळा रंग येण्याकरता आतमधे काय आहे, त्याचं उमजणं महत्त्वाचं.
त्यातला जो भाव असतो, ती जी संवेदना असते चित्रकाराच्यात आणि त्याच्यात निर्माण झालेली, जे भाष्य असतं त्या दोघांमधलं, ते टिपण्याचा प्रयत्न करतो आर्टिस्ट."


चित्र सुरू होतं ते यातून. पण ते थांबतं कधी?

"खरंतर ते नाही थांबत. पण तुम्हांला ती दृष्टी एक आलेली असते. ती दृष्टी त्या पेंटिंगमधून तुम्हांला सांगते की, आता थांब. खूप झालं.
काही वेळा पुढचं पेंटिंग त्यातूनच कंटीन्यू होत असतं. पण एकदा एका प्रकारे केलेलं काम पुन्हा करायला गेलो, तर ते होणार नाही. कारण त्याकरता तुमचा जो विचार असतो, तो पुढे ढकलला गेलेला असतो. म्हणजे तुमचा विचार कंटीन्यू राहिल्याचं हे द्योतक आहे.
पेंटिंग करताना मी थांबतो, तेव्हा विचाराची ती प्रोसेस संपलेली असते. पेंटिंग संपत नाही कधी.
माझ्या बाबतीत वीसेक पेंटिंग एका प्रोसेसमधे निर्माण होतात आणि मग ती प्रोसेस निघून जाते. पुन्हा त्याकडे वळता येत नाही. तसा प्रयत्न केला, तर त्रासदायक होतं ते. जिवापाड धडपड केली, तरी होत नाही. कॅनव्हास खराबच होतो.
जिथे भावच नसतो, तिथे चित्र उमटत नाही. संवेदना काय निर्माण होणार, भावच नसेल तर?"

चित्रांना शीर्षकं कशी सुचतात हा प्रश्न प्रकाशच्या बाबतीत अप्रस्तुत होता. अमूर्त चित्रांना ती बहुतेक कधीच का नसतात हा प्रश्न मी तरीही प्रकाशला विचारते.

“चित्रांना टायटल्स देऊ नयेत, कारण मग चित्राच्या अनुभूतीला मर्यादा येतात. मर्यादेच्या कुंपणाबाहेर जाऊन शोध घेता यायला हवा. चीरफाड करता यायला हवी विषयाची.
साधी गोष्ट आहे. डॉट किंवा बिंदू हा काही अंतिम नाही. कितीही अणूरेणूएवढा असेल, पण तो अंतिम नाही. तो धन तरी असेल, नाहीतर ऋण तरी असेल. धन असेल, तर तो फोडला की त्यातून अनेक आणखीन बिंदू जन्म घेतील; ऋण असेल, तर तो स्वत:तून अनेक अवकाश निर्माण करू शकतो.
म्हणजे कुठलीच गोष्ट अंतिम नाहीये.
चित्राचंही असंच आहे, त्याला कुठली सुरुवात नाही आणि शेवट नाही. पण मधली जी प्रोसेस आहे, ती महत्त्वाची आहे.
ती प्रोसेस काय, तर तुम्ही रंग आणि आकारांमधे कसं इन्व्हॉल्व होताय? स्वत: इन्व्हॉल्व्ह होणं महत्त्वाचं आहे.

स्टुडिओ लोकेशनचा कितपत परिणाम?

"खूपच. वातावरण तुम्हांला खूप काही शिकवून जात असतं. शेवटी आपण त्याच्याशीच कनेक्टेड आहोत. बहुतेक वेळ मी इथेच राहतो. कधीतरी मधेच जाऊन येतो घरी. जिथे काम करतो, तिथेच राहिलं की खूप फरक पडतो. विशेषत: पेंटिंगचं. बरेचदा तर काम करत असताना कित्येक दिवस मी कुठेच जात नाही. घराच्या बाहेरही पडत नाही. सकाळी चालून आलो की इथेच स्टुडिओत असतो पूर्ण वेळ.
आजूबाजूच्या वातावरणाचा, मगाशी म्हटलं तसा, खूप प्रभाव असतोच. इथे खाली पिंपळाचं झाड आहे. त्याच्या खाली नुसतं उभं राहिलं, तरी एक वेगळीच एनर्जी मिळते. आणि हे खरंच आहे. शास्त्रीय आधारही असेल काही, पण माझा विश्वास आहे. वडाच्या झाडाखाली उभं राहिल्यावरही मनातल्या नकारात्मक विचारांचा निचरा होतो.
शिवाय इथे पक्षीही खूप येतात.
(ते खरंच. आम्ही बोलत असताना पिंपळाच्या शेंड्यावर येऊन बसलेला खंड्या नंतर कितीतरी वेळ तिथेच होता. अगदी दुपारचं कडक ऊन्ह चढेपर्यंत त्याच्या अवतीभवतीनं वेगवेगळ्या पक्षांची ये-जा चालूच होती).
"पक्ष्यांचं निरीक्षण करण्यात कितीही वेळ घालवू शकतो मी. सनबर्ड्स, बार्बेट्स तर सारखेच दिसतात. काहींची अजून ओळख पटलेली नाही.
एक हिरव्या रंगाचा पक्षी. त्याच्या डोक्यावर गुलाबी, लालसर पॅच आहे. तो असतो. आता दुपार कलली की पक्षी यायला लागतील पुन्हा.
नदीच्या पलीकडच्या काठावरच्या जंगलाचा हा पट्टा तर दर आठ दिवसांनी आपलं सगळं रंगरूपच पालटतो. आत्ता आठ दिवसांपूर्वी आली असतीस, तर हा पट्टा गर्द हिरवा दिसला असता. शिवाय त्या हिरव्यातही अनेक छटा. दाट हिरवा, पिवळसर हिरवा, काळपट हिरवा. पॅलेटमधे ग्रीनच्या सगळ्या शेड्स एकमेकांमधे मिसळून गेल्यासारखं दृश्य दिसत होतं. झाडांची पालवी किती वेगवेगळी रूपं धारण करते ते इथे दिसतं.
पहिल्यांदा जागा बघायला आलो, तेव्हा एप्रिल महिना होता आणि समोर दिसणारं दृश्य केवळ अनोखं होतं. सगळा ऑरेंजचा पट्टा असा समोर. वरपर्यंत. म्हटलं, अरे, हे काही वेगळंच आहे. गुलमोहोर, पलाश, पांगारा सगळी झाडं एकदम फ़ुललेली. प्रत्येकाची केशरी छटा वेगवेगळी. आणि नदीकिनारी झुकलेली आहेत, ती चिंचेची झाडं आहेत. त्यांच्यावर सकाळी आणि संध्याकाळी पोपटांचे थवेच्या थवे येतात. माझ्याकडे छोटी दुर्बीण आहे, त्यातून बघतो. या सगळ्या निसर्गाचा, वातावरणाचा परिणाम तुम्ही कायम ताजेतवाने राहण्यावर नक्कीच होतो. आणि मग पर्यायानं तुमच्या कामावर."

रोजचा एक दिवस?

"मी सकाळी लवकर, म्हणजे साडेपाच-सहाला, उठतो. चालून आल्यावर माझी योगासनं चालू होतात. माझी सगळी कामं मी स्वत:च करतो. स्टुडिओची लादी झाडण्यापासून पुसण्यापर्यंत सगळं मीच करतो. मला ते आवडतंही आणि माझ्याकरता तो एक प्रकारचा व्यायामही आहे.
मित्र कधी विचारतात, तू काय झाडू मारतोस? तेव्हा मी त्यांना सांगतो की, हे झाडू मारणं नाही, माझं ब्रश फिरवणं आहे. त्याकरता एक्सरसाईझ आहे हा. आणि खरंच आहे हे. मी जेव्हा मोठे कॅनव्हास करायचो, तेव्हा हात अक्षरश: दुखायला लागायचे. पूर्वी मी कधीकधी स्पन्ज वापरायचो. तेव्हाही तसंच व्हायचं. मग ठरवलं की, कामवाली वगैरे काही नाही. आपण स्वत:च सगळं करायचं. आता मोठा धुण्याचा ब्रश लादीवर फिरवतो, तेव्हा ही भविष्यातल्या मोठ्या कामाची प्रॅक्टीस आहे असं समजतो. कपडेपण मी स्वत: धुतो, मशीनवर नाही. ही शारीरिक मेहनत झालीच पाहिजे असं मी समजतो.
त्यानंतर मग दिवसभराच्या कामाला सुरुवात. एकीकडे म्युझिक चालू असतं. क्लासिकल. ते मला आवडतं. समजत नाही फारसं, पण आवडतं. माझ्याकडे झायलिन आहे, ते वाजवतो मधून-मधून. व्हायोलिनही आहे. फारसं वाजवता येत नाही, पण आहे. लहानपणापासूनची आवड होती. पूर्ण होऊ शकली नव्हती. तबला शिकायचा होता, तेव्हा वडील म्हणाले, कशाला? तुला काय तमाशात काम करायचं आहे का? आता तबला कुठे, तमाशा कुठे! पण एकंदरीत संगीताकडे, वाद्यांकडे बघण्याची दृष्टीच तशी. घरी कलेचं वातावरण अजिबातच नव्हतं.
चहा, नाश्ताही माझा मीच करतो. जेवण करायलाही आवडतं. वेगवेगळ्या डिशेस करून मित्रमंडळींना खायला घालायला आवडतं.
अर्थात हे सगळं इतर वेळी. एकदा चित्रावर काम चालू झालं की रोजचं जेवणही विसरायला होतं.
चित्र काढायची काही स्पेसिफिक वेळ नाही. एकदा मनात आलं की कॅनव्हासवर बसेपर्यंत जिवाला स्वस्थता नसते. समोर बसलात, सुरुवात झाली, आजूबाजूला रंग पडले की स्थिरावल्यासारखं वाटतं मग.
मला शिस्त आवडते. सगळा पसारा इकडे-तिकडे पडलाय, त्यात मी रंगवतोय असं मला आवडत नाही.
माझं चित्रपण तसंच आहे, तसंच झालं पाहिजे. स्वच्छता म्हणजे परमेश्वर असं उगीच म्हणत नाहीत."

प्रकाशच्या स्टुडिओत खरंच सगळं स्पॉटलेस क्लीन असतं. धुळीचा कण नाही की अस्ताव्यस्त पसारा नाही. चित्रकाराच्या स्टुडिओचं अस्तित्व अबाधित ठेवूनही इतका व्यवस्थितपणा, स्वच्छता कशी राखू शकला हा? हे असं नेहमीच मेन्टेन करणं जमतं?

माझ्या मनातले विचार जणू ओळखल्यासारखा तो म्हणतो, "आता तुला कदाचित वाटेल, आज आपण स्टुडिओ बघायला येणार, म्हणून यानं हे सगळं असं नीट आवरून ठेवलंय. पण हे नेहमीच तसं असतं. तू कधीही न सांगता आलीस, तरीही तुला असंच दिसणार आहे."

प्रकाश त्याच्या विचारांच्या प्रोसेसमधे असा गुंतून जाऊन बोलत असताना पुन्हा पुन्हा प्रश्नांचे विरामी ठिपके देणं नकोसं वाटत असतं. त्याचं सलग बोलणं मग मी फारसं डिस्टर्ब करतच नाही.

"चित्र डोक्यात कायम असतंच मात्र. तुम्ही कॅनव्हासवर असा किंवा नसा.
कधी-कधी हातून काम होत नाही. त्या वेळी वाचन चालू होतं. बाहेरसुद्धा खूप फिरतो. कधी-कधी लॅपटॉपवर गेम खेळत असतो, एरवी फक्त इमेल चेक करण्यापुरता कॉम्प्युटर वापरतो.
संगीत मात्र चोवीस तास चालू असतं. काम करताना संगीत मला डिस्टर्ब करेल अशी शक्यताच उद्भवू शकत नाही. उलट संगीत व्हायब्रेशन्स निर्माण करतं. आणि नाद तर चित्रात असतोच. लय, सूर, तालावर माझा ब्रश चालतो अनेकदा. चित्रात प्रकाश असतो, तसा संगीतात नाद असतो. खूप एन्जॉय करतो मी संगीत. वर्ल्डस्पेस चॅनेल होता, तेव्हा तो चोवीस तास चालू असायचा. फक्त झोपताना बंद. आता वर्ल्डस्पेस बंद झाला, तेव्हा माझं खूप नुकसान झाल्यासारखं वाटलं. संगीताच्या वेगवेगळ्या प्रवाहांची इतकी माहिती मिळायची. टीव्हीवर स्पोर्ट्स बघतो. कधी बातम्या, नॅशनल जिओग्राफी, चांगल्या फिल्म्स बघतो. आवश्यकता काही नाही. पण टाळतही नाही. 

मी सगळ्या प्रकारचे पेंट्स वापरलेत. पेस्टल, वॉटरकलरपासून, ऍक्रिलिक, ऑइल. मी ऍक्रिलिक हल्ली दोन वर्षं चालू केलीत.
ऍक्रिलिकमधे फेबिओचे कलर्स मला जास्त आवडतात. बाकीचे फारसे आवडत नाहीत, कारण ते ग्लॉस होतात. फेबिओचे कलर्स हे मॅट कलर्स आहेत, त्यामुळे पेंटिंगमधे आणि बघणा-यालाही वेगळी मजा येते. त्या कलरची ही वेगळी क्वालिटी आहे.
पूर्वी ऑईलमधेच जास्त काम करायचो. ऑईलमधे विन्सरन्यूटनचे कलर्स चांगले आहेत. पूर्वी कॅम्लिनही वापरलेत. पण कळतं की, वाईट कलर्स वापरल्याने पेंटिंगवर किती परिणाम होतो ते.

सुरुवातीची चित्र तर चोरबाजारातले रंग वापरून केली आहेत. तेव्हा पैसे नसायचे. स्वस्तातले कलर्स म्हणजे चोरबाजार. पण तिथे काही वेळा अशा शेड्स मिळायच्या, की त्या नंतर कधी सापडल्याच नाहीत. कारण काही वेळा ते बाटल्यांतले राहिलेले रंग एकत्र मिसळून टाकायचे. त्यातून एव्हढे वेगळे रंग मिळालेत की, ते आता शोधूनही सापडायचे नाहीत. त्याची वेगळीच मजा यायची. नंतर बाजार कितीही शोधला, तरी तो रंग सापडायचा नाही.
सगळ्या रंगांतलं काम मला आवडतं. आणि सगळ्या माध्यमांमधलंही. पेपरकोलाज बनवलेत. मोठमोठी म्यूरल्स. मेटलमधे, क्लेमधे, वुडनमधे, सिरॅमिक्समधे. कोलाज तर भरपूर केलं आहे. काईटपेपरचे कोलाज भरपूर केलेत.
आता मात्र सगळं लक्ष पेंटिंगवर केन्द्रित केलं. फोटोग्राफीही बंद केली. पूर्वी अगदी प्रोफेशनल फोटोग्राफी करायचो. नितीन दादरवालाबरोबरही करायचो. त्याच्यामुळे मला कोलटकरांचे फोटो काढायला मिळाले. कोलतेसरांचे पेंटिंग्जचे खूप कॅटलॉग्ज, तसे इतरही चित्रकारांचे, शूट केलेत.
आता हे सगळं बंद केलं.
वेगवेगळ्या गोष्टींमधे गुंतण्यापेक्षा एकात गुंतणं गरजेचं आहे हे जाणवलं.
कोणत्या गोष्टीत कुठे थांबायला पाहिजे हे मी ठरवलं.
आता मला फक्त पेंटिंग करायचंय. ते मी करतोय.
उद्या चित्रं घेतली नाहीत कोणी, तर काय करायचं मला माहीत नाही.
अगदी तशीच वेळ आली, तर हा स्टुडिओ काढीन आणि दुसरीकडे स्वस्तात जागा घेऊन पेंटिंग करीन. पण मला चित्रंच काढायची आहेत. फक्त चित्रांसाठीच जगायचं आहे.
जोडीला संगीत आहे. अजून काय हवंय?
स्पेसिफिक टूल्स वगैरे काही वापरत नाही. उलट मला असं वाटतं की, टूल्स आपणच निर्माण करायची असतात. काही वेळा काही गोष्टी विकत घेतल्या. पण त्या वापराव्याशा वाटल्या नाहीत. उदाहरणार्थ, माझे बरेचसे ब्रशही मी नंतर वापरले नाहीत. घेताना वाटलं होतं की, काही काम करता येईल. पण नंतर विचार बदललेला असतो. ठरवून काही करता येत नाही. नितीनने पूर्वी मला फ्रेन्च ब्रश दिले होते.
पेंटिंग टेबल मी विरारला माझ्या स्टुडिओतच बनवून घेतलं होतं. मोठी कामं करत होतो त्या वेळेस. मला हाईटला उंच टेबल हवं होतं. खूप ड्रॉवर्स आहेत त्याला. एकात टूल्स आहेत. गन, प्लाय, ब्रश वगैरे. एकात ऑइलकलर्स, स्केचबुक्स वगैरे. असं चित्राचं सगळं साहित्य एका टेबलात मावू शकतं.
उभं राहूनच काम करायला जास्त आवडतं. मात्र वॉटरकलर करतो, तेव्हा बसून करतो.
कधी-कधी तर कागदाला टाईल्सवरच टेप लावून त्यावर काम करतो.
मधल्या काळात ब्रशपेक्षा स्पन्जनं जास्त काम करायला लागलो. ब्रशनं जितका रंग लागतो, त्यापेक्षा अर्ध्या रंगात मला स्पन्जनं तोच परिणाम मिळतोय असं लक्षात आलं. वेगवेगळं टेक्निकही त्यातनं मिळायला लागलं. हे टेक्निक कशाकरता, कोणतं, ते आतूनच येतं. कुठल्यातरी गोष्टीचं निमित्त असतं. स्पन्जला कॉटनचा मऊ कपडा गुंडाळून, तो रंगात बुडवून वापरला की केव्हढातरी वेगळा इफेक्ट येतो. हे आपोआप होत जातं. जाणीवपूर्वक अमुकच टूल्स वापरायची असं होत नाही. कधी-कधी ग्राफिकची टूल्स वॉटरकलरकरता वापरली जातात. आता ब्रश आणि रोलरनेच जास्त काम होतंय. त्यांना काही टूल्स म्हणता येणार नाही. चित्रांची मूलभूत गरज ओळखून काम करायला हवं.

एका वेळी अर्थातच एकाच पेंटिंगवर काम करतो. माझा संवाद एकाच पेंटींगशी एकाग्रतेनं होत असतो. दुसरं पेंटिंग कोणत्या रंगाचं होईल सांगू शकत नाही. पण हातातलं पेंटिंग काही कारणानं डिस्टर्ब झालं, तर ते बाजूला ठेवून दुस-यावर काम सुरू करतो. मग पुढचे कित्येक महिने त्या पेंटिंगकडे बघत नाही. दुसरं पेंटिंग मग आपल्याला 'जा, तिकडे जा' असं सांगत नाही, तोपर्यंत तिकडे जायचं नाही. एकाच पेंटिंगवर मन एकाग्र असलं, तरी ड्रॉइंग, स्केचिंग वगैरे चालू असतं. तो अर्थात रोजचा एक्सरसाईझ आहे.

चित्राकरता असिस्टंट वगैरे गोष्टींची मी कल्पनाही करत नाही, कारण मुळात मला मी आणि माझं चित्र यांत कोणताही डिस्टर्बन्स नको असतो.
मीसुद्धा कधी कोणाकडे असं काम केलं नाही. कमिशन्ड वर्क केलं आहे.
म्यूरल्ससाठी मी कोलतेसरांसोबत काम केलेलं आहे. चित्रावर नाही. चित्रकाराबरोबर काम करण्याचा तो प्रकार मला आधीपासूनच कधी आवडला नाही. एकदा सुदर्शन शेट्टीनं मला दिल्लीमधे असताना 'हेल्प करशील का' म्हणून विचारलं होतं. म्हटलं, सॉरी. मी दुस-याच्या चित्राला कधीच हात लावत नाही, लावणारपण नाही. आपण का जगतोय, कशासाठी जगतोय? जर आपण स्वत:चा रस्ता निर्माण केलेला आहे, तर त्या रस्त्याने आपल्याला स्वत:लाच जायचंय. दुस-याकडे पाय का अडकवायचा? 
आता वीस वर्षं झाली की मलाही चित्र काढायला लागून. पण आपण प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करायचं हा विचार कधीच डोक्यात आलेला नाही. 
कॉलेज संपल्यापासून आपण फक्त चित्रच काढायची हे ठरवलं होतं. नोकरी कधीच करायची नाही हे ठरवलं होतं. तरीपण व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून तीन वर्षं काम केलं रचना संसदला. ते मला सोडायलाच तयार नव्हते.
तिथे मी आर्किटेक्चरच्या मुलांकरता ग्राफिक चालू केलं. मिसेस कोलतेही माझ्याबरोबर होत्या, ग्राफिक, सिरॅमिक्स करून दाखवलं त्या मुलांना, तर ती मुलं आर्किटेक्चर सोडून इकडेच लक्ष द्यायला लागली. त्यांना ते आवडलं खूप. टेक्निकली आपण काय करू शकतो आर्किटेक्चरमधे, ते बघायला त्यांना खूप आवडत होतं.
पण या सगळ्यात माझ्या पेंटिंगवर परिणाम व्हायला लागला. काम होईना. आठवड्यातून एका लेक्चरसाठीही आठवडाभर वेळ काढायला लागायचा. तयारी, विचार करायला लागायचा. मग ठरवलं की, आपण काही टीचर होणारी माणसं नाही, आपला हा प्रांत नाही. मग तिथून बाजूला झालो.

सोपं तर काहीच नाही आत्तापर्यंतच्या आयुष्यात. मी घरात सगळ्यांपेक्षा वेगळा का झालो, मला वेगळी दृष्टी का मिळाली माहीत नाही. मी वेगळा मार्ग शोधायचा ठरवल्यानं घरचे माझ्यावर कायम नाराज होतेच.
एकत्र कुटुंब आमचं. गणपतीला गावी होतो आम्ही सगळे, तेव्हा आम्ही मस्जिद बंदरला ज्या इमारतीत रहायचो ती इमारत अचानक कोसळली. पेपरमधे वाचलं, तेव्हा आम्हाला कळलं हे. सुदैवाने आम्ही वाचलो, कारण गावाला होतो. राहायचं कुठे आता? मग घरातले सगळे या ना त्या नातेवाइकाकडे रहायला गेले. मला कोणाकडेच असं जाता येण्यासारखं नव्हतं, कारण वेडा आहे हा म्हणून सगळ्यांनीच मला बाजूला टाकलं होतं.
सहा महिने मी एका प्रेसमधे राहत होतो. पुठ्ठ्यांवर झोपायचो. माझा मोठा भाऊ, काकांचा मुलगा, विरारला राहत होता. तो एक दिवस आला आणि त्याने हे बघितलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आपण सगळे व्यवस्थित राहतो आणि हा असा राहतोय. त्यानं सरळ मला उचललं आणि विरारला घेऊन गेला. मग तेव्हापासून विरारवासी झालो.
वाट्टेल ती कामं केली. हातगाडीही ओढलेली आहे. माझा भाऊ फ्रीज रिपेअर करायचा, तेव्हा त्याच्यासोबत गिरगावात डोक्यावरून फ्रीज वाहून नेला आहे. माझे वडील टेलिफोन्समधे होते. वडिलांनी कधीही मला सपोर्ट केला नाही. आर्थिक नाही, मानसिकही नाही. खूप नैराश्य यायचं त्यांच्यामुळे मला. काकांच्या मुलांमुळे मी आज इथे आहे. आता सगळं ठीक आहे, पण त्या वेळी जे नुकसान व्हायचं ते झालंच. मी मात्र सगळ्यांबरोबर व्यवस्थित वागतो, काही मनात न ठेवता. काही कटुता नाही, वाईट विचार नाही. ते जर ठेवले, तर इतरांच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला? मला दुस-यांकरता जगायला आवडतं. शक्य होईल ती मदत करत राहतो. अण्णा हजारेंचं आंदोलन असो की प्रकाश आमटेंचं कार्य, माझ्या ताकदीनुसार मी मदत करतो. समाजाशी कलाकारानं जोडलेलं राहावं, या ना त्या मार्गानं ऋण फेडावं अशा मताचा मी आहे. मी भोगलंय ते माझ्या घरातल्या नव्या पिढीला भोगायला लागू नये असं वाटतं मला. दुस-याकरता जगायला मला आवडतं. भावाच्या मुलाला त्याच्या आवडीचं शिकायला मी परदेशात पाठवलं ते ह्याच विचारातून."
  
अमूर्त चित्रकलेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात खूप प्रश्न असतात, समज-गैरसमज असतात. प्रत्यक्ष त्या चित्रकारानं त्याच्या चित्रांविषयी बोलावं, त्यानं ते समजावून सांगावं अशी एक अपेक्षाही मनात कुठेतरी असते, जी साहजिकच पूर्ण होत नाही. एकतर तो चित्रकार त्याचं चित्र पूर्ण झाल्यावर मनानं त्यापासून केव्हाच दूर गेलेला असतो. आणि दुसरं म्हणजे, अमूर्ततेला कोणत्याही अर्थात, व्याख्येत बसवणं हे त्या चित्रसंकल्पनेलाच मूळ गाभ्यापासून दूर घेऊन जाणं ठरणार. प्रकाश आत्तापर्यंत त्याच्या चित्र काढण्यामागच्या, चित्र काढतानाच्या दृष्टिकोनाबद्दल, मनोधारणेबद्दल इतकं सविस्तर आणि सुंदर, गहन असूनही कळायला सोप्या भाषेत बोलत होता की, मी न राहवून अमूर्त संकल्पनेबद्दलच्या सर्वसामान्यांच्या मनातल्या काहीशा नकारात्मक भूमिकेबद्दल त्याला विचारून टाकायचं ठरवलंच. पण त्याआधी एक चित्रकार या नात्यानं तो स्वत:च्या चित्रकलेबद्दल काय फिलॉसॉफी मनात बाळगून आहे याबद्दलही मला उत्सुकता वाटत असते.
प्रकाश माझ्या अपेक्षेप्रमाणे आणि त्याच्या स्वभावानुसारच उत्तर देतो. स्पष्ट आणि सडेतोड आणि मूलभूत.

"मूर्ताकडून अमूर्त असा माझा प्रवास आहे, पण तो तसाच असायला हवा असं नाही. कधी उलटाही होऊ शकतो. काहीच सांगता येत नाही. शेवटी अणूरेणूंचा खेळ आहे हा. बिंदूमधून अवकाशात आणि अवकाशातून पुन्हा बिंदूकडे असू शकतोच ना प्रवास?
आपण काय जगतो हे वास्तव आहे. कारण चित्रात तेच उमटत असतं.
फिलॉसॉफी काही वेगळी नाही माझी. स्वतंत्र फिलॉसॉफी असावी इतका काही मोठा नाही मी. चित्र ही त्याच्या स्वत:त एक फिलॉसॉफी आहे. स्वत: निसर्ग आहे. हा निसर्ग घडत असताना आपण फक्त अनुभव घ्यायचा असतो, जिवंत अनुभव घडत असतो आपल्यासमोर.
निसर्गाने जी ताकद, जो विचार दिला आहे, त्याचा वापर करत जायचं. जी विचार प्रक्रिया त्यातून बनते, तिच्यानुसार जगायचं. स्वत:ला वेगळ्या, अधिक उंचीच्या पातळीपर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा. आणि त्याकरता हे जे चित्रांचं माध्यम हातात आहे, त्याचा वापर करायचा. बास. इतकंच."

ऍब्सट्रॅक्ट चित्रं कळण्याबद्दल? 

"याचं उत्तर खरंतर सोपं आहे अगदी. माझ्या वरच्या साध्या फिलॉसॉफीला साजेसं सांगायचं तर - प्रकाश, वारा, अग्नी, धरती, आकाश. ही पाच तत्त्वं आहेत. त्यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. हवेला आकार नाही, ती तर आपण पाहूही शकत नाही. पाणी, अग्नीचा दाह याला कुठलाही आकार देऊ शकत नाही तुम्ही. तो दाह तुम्ही आकारात पकडू शकत नाही. त्याला चित्रात आणू शकतो मात्र आपण. नाद जो आहे, ध्वनी, तोही तुमच्या चित्राला कुठेतरी इन्स्पायर करत असतो आणि तो येतो चित्रात तुमच्या. पण आता तो कसा बघायचा ते तुमच्या संवेदनशीलतेवर अवलंबून.
बघण्यालाही मर्यादा असतात. या मर्यादांना ओलांडून बघायचा जर लोकांनी प्रयत्न केला, तर त्याचा अनुभवही घेता येतो.
पण आपल्याकडे दूरदृष्टीचा अभाव असा की, 'अच्छा, हे असं केलंय? त्यात काय, मीपण करीन,' इथून सुरुवात होते नकारात्मक भूमिकेला. आणि मग तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत लोक.
म्हणजे होतं काय की, सुरुवातीलाच तो माणूस निगेटिव्ह एनर्जी घेऊन आलेला असतो. त्याऐवजी हे काहीतरी वेगळं आहे असा पॉझिटिव्ह ऍप्रोच ठेवला, तर चित्र तुमच्याशी संवाद साधायला लागतं.
मी मगाशी म्हटलं तसं, की वेड लागलंय का चित्रकाराला हे असलं काहीतरी करत बसायला? त्याला का असं ऍबस्ट्रॅक्ट काढावंसं वाटलंय? त्याला काहीतरी कारण असेल ना? ही चित्रं तर विकलीपण जात नाहीयेत. मला माहीत नाही यांचं काय होणार आहे. तरीपण का असं करावंसं वाटतंय?
कारण यात कुठेतरी तुमच्या संवेदना आणि वेदना आहेत. त्या तुम्ही इथे प्रतीकात्मक रूपात मांडत असता.
आणि त्याच्यावरून तुम्हांला ते जगणं कळतं यार.
मी जगतोय. मी चित्राशी जगतोय. चित्राबरोबर जगतोय मी. तो माझा भाव आहे. तो मी व्यक्त करत असतो त्या वेळेला.
ते कोणी बघावं, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी हा नंतरचा भाग झाला.
किंवा आज कळलं नाही, तरी उद्या कळेल ते लोकांना.
कदाचित त्यांना ती दृष्टी आली, तर कळेल. पण नाही कळलं, तरी काही फरक पडत नाही.
आणि तुम्ही काय देता आणि काय घेता यापेक्षा चित्र तुम्हांला बरंच काही देत असतं.
चित्र लोकांपर्यंत पोचलंय - नाही पोचलंय, यांमुळे खरंच काही फरक पडत नाही."

लोकं आपल्या चित्राला कसं इंटरप्रीट करतात, बरोबर करतात की नाही, अशा गोष्टींचा विचार?

"अजिबातच नाही. मी का याचा विचार करावा? मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्याकरता जगतो. मी दुस-यांसाठी तर जगत नाही.
मी करतो त्यातून कोणाला आनंद घेता येत असेल, तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाची दृष्टी वेगळी, विचार वेगळा. दहा लोकांनी चित्रं बघितली, तर दहा लोकांना वेगवेगळी वाटणार ती चित्रं. चेहरा नसतानाही काही लोकांना त्यात चेहरा दिसतो, तसं आहे हे.
दृष्टी प्रत्येकाकडे असतेच, पण तिचा वापर करायची गरजच लोकांना वाटत नाही. आपल्याकडे कमर्शियल अ‍ॅन्गलचा इतका भयानक अतिरेक झाला आहे की, लोक फक्त पैशासाठी जगतात. फक्त पोटासाठी जगायचं असं लोकांनी ठरवूनच टाकलेलं आहे. त्यामुळे ते तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत. आज आपल्याकडे हा जो सगळा गचाळपणा माजला आहे ना, तो कलेबाबत दूरदृष्टी नसल्यामुळे माजला आहे.

टेक्नॉलॉजी कितीही प्रगत असली, तरी प्रत्यक्ष पेंटिंग बघणं आणि इमेज बघणं यात प्रचंड फरक आहे. तुम्ही पेंटिंग कसं बघता, कुठे आणि कोणत्या अ‍ॅन्गलनं बघता, यांवरही खूप काही अवलंबून असतं. योग्य प्रकाशात पेंटिंग बघायला लागतं. माझा नेहमी आग्रह असतो की, माझ्या स्टुडिओत या आणि पेंटिंग बघा, तो याकरताच. तुम्ही स्टुडिओत आल्याशिवाय कळणार नाही, आर्टिस्ट काय करतो, कसा काम करतो ते.
त्याची भाषा तिथे उलगडते. बाहेर जाऊन स्वत:च्या कलेबद्दल काहीतरी बडबडणे याला फारसा अर्थ नसतो.
पण फार कमी जण येतात, कोणाला आर्टिस्टच्या स्टुडिओत जाऊन त्याला भेटण्यात फारसा इंटरेस्ट नसतो. येतात ते चित्रकार मित्रच असतात.
कलेचे ग्राहक, रसिक यांना स्टुडिओची वाट सापडतच नाही बहुतेक.
क्वचित कधीतरी, कोणालातरी माहीत असतं की, प्रकाश वाघमारे काही वेगळी चित्रं काढतो. ती बघण्यात त्यांना रस असतो. असे लोक येतात, नाही असं नाही, येतात. हे लोक असतात, त्यांच्याकडे चित्रकाराची चित्रं खरेदी करण्याची क्षमता नसते. पण चित्र समजण्याची क्षमता खूप असते त्यांची. त्यांना ती दृष्टी असते. जे समजणार नाही, ते समजावून घ्यायची त्यांची तयारी असते. हे लोक धडपडत स्टुडिओ शोधत येतात. अशांचं मी अत्यंत प्रेमाने स्वागत करतो, त्यांना माझी चित्रं दाखवतो.
’गॅलरी सेव्हन’बरोबर माझं चांगलं जमायचं. ओनर स्वत: आर्टिस्ट होती. खूप चांगल्या चर्चा व्हायच्या आमच्या. ऍब्स्ट्रॅक्टकरता ती खूप चांगली गॅलरी होती. पण आता बंद झाली ती.
अशाही गॅल-या होत्या, पण मधल्या काळात चित्रांना मार्केटमधे इतकं महत्त्व आलं... आलं ते चांगलंही झालं हे निश्चित, पण कलेचा धंदा जास्त झाला. ह्यात कमर्शियल शिकलेली माणसं चित्र काढायला लागली, कारण इथे पैसा आहे.
पण ह्यात चित्रांशी एकरूप झालेला मूळ चित्रकार मागे पडला. चित्रांच्या कॉप्या करणं हा धंदा झाला. अनेक मोठमोठी नावं यात आहेत.
पण ही कला नाही. हा कलेचा बाजार. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रकारांची प्रतिमा यामुळे खराब होते. त्यांना ती कॉपी आहे हे लगेच कळतं. ते म्हणतात, तुमचे आर्टिस्ट आमची कॉपी करतात आणि मग आमच्याकडेच चित्रं विकायला घेऊन येतात. मग त्यांना सांगायला लागतं की, नाही. असेही चित्रकार आमच्याकडे आहेत, ज्यांच्याकरता चित्रकला हा धंदा नाही. ते चित्रकलेकरता जगतात. तुम्ही येऊन बघा. कोलतेंसारखी माणसं आहेत, जयराम पटेलांसारखी आहेत, गणेशसारखा माणूस कलकत्त्याला आहे, दिल्लीला रामकुमारांसारखी व्यक्ती आहे. ही स्वतंत्रपणे काम करणारी माणसं.
तरुण पिढीच्या बाबतीत बोलायचं, तर ऍबस्ट्रॅक्टमधे हेमंत धाणे, नमिता सावंत, प्रकाश मोरे, अमेय जगताप ही मुलं मस्त काम करताहेत. वसईवरूनही आलेली आहेत यांतली अनेक. जेजेमधे शिकलेल्यांपेक्षा चांगलं काम आहे यांचं. नवं शिकतात, वाचतात, लेक्चर्स ऐकायला धडपडतात.

फिगरेटिव्ह आणि ऍबस्ट्रॅक्ट असला काही भेदभाव चित्रकलेत नाही, स्वत:ची ओळख महत्त्वाची; जशी के. जी. सुब्रमण्यन, मनजीत बावा यांची आहे. हे फिगरेवव्ह काम करतात. त्यांची आयडेंटिटी आहे. आज अनेक प्रसिद्ध, नावाजलेले चित्रकार आहेत; त्यांना मात्र अनेक वर्षांनंतरही स्वत:ची ओळख चित्रांमधून उमटवता आलेली नाही, येणारही नाही. कारण कमर्शियल दृष्टिकोन त्यांना कुठेतरी जास्त महत्त्वाचा वाटलेला आहे. हल्ली टेक्नॉलॉजीचा वापर करून चित्रं काढायची पद्धत आहे.
तुम्ही प्रयोग जरूर करा. पण त्या चित्रांमधे तुम्ही स्वत: कुठे दिसता, त्याचा विचार नको का करायला? ती कुठेच नसते. आर्टही नसते त्यात.

कॅमेरामधून फोटो काढत असताना माझ्या लक्षात आलं की, मला इथे नाही थांबायचं. अजून पुढे जायचंय. असं काहीतरी मिळवायचंय, जे ह्या कॅमे-यातल्या फोटोंमधे नाही, किंवा त्या फोटोंच्या पलीकडे आहे. त्यातून मी या ऍब्स्ट्रॅक्शनकडे वळलो. त्या वेळी विचार करत असताना आधी मला आकार दिसायचे. ग्राफिक्समधे मी उत्कृष्ट होतो. मला माझ्या फायनल एक्झामच्या एका असाईन्मेन्टला ९५ मार्क्स मिळाले होते कॉलेजात. पण मला स्वत:ची आयडेंटिटी शोधायची होती. कॅमे-याच्या फोटोंमधूनही श्याम मंचेकरसारखा कलाकार स्वत:ची आयडेंटिटी निर्माण करतो, अभिजात चित्रकलेतून मिळेल असा अनुभव देतो. उधळलेल्या भंडार्‍याच्या त्याच्या फोटोमधे कला असते.
एकदा पैसा मिळवायचं वेड लागलं की त्याचं व्यसन लागतं. दुसरं काही सुचू देत नाही हा पैसा. तो तुम्हांला पुढे जाऊ देत नाही. ज्याला मागणी आहे, तेच पुरवायला भाग पाडतो.
काम करायचं म्हणून करायचं किंवा यातून पैसे मिळतील म्हणून काम करायचं, याला काही अर्थ नाही. ज्यांनी पैशाकरता काम केलेलं आहे, ते मोठे चित्रकार झाले असतील. पण चित्राची भाषा त्यांच्यापासून फार दूर आहे. आज ज्यांचं नाव आहे असे कोणतेही चित्रकार घ्या, चित्राची भाषा त्यांच्यापासून दूर गेली आहे.
गायतोंडे का कुठे गेले नाहीत? आयसोलेशनमधे राहिले, कारण त्यांना चित्रांशी जोडलेलं राहणं महत्त्वाचं वाटत होतं. याउलट बरवे. चित्राशी कनेक्टेड राहून ते शब्दांमधूनही व्यक्त होऊ पाहत होते. कोलते तिन्ही गोष्टी करताहेत.
बरवेंची काही चित्रं, जी सिम्बॉलिझमवर आधारित होती, त्यांना सिम्बॉलिझममुळे काही मर्यादाही होत्या. त्यांची चित्रं बरंच काही सांगत होती, पण त्या मर्यादेत सांगत होती. म्हणजे, खरं सांगायचं तर, बरवेंनाही ऍबस्ट्रॅक्शनकडे जायचं होतं. पण ते तेव्हढी डेअरिंग करत नव्हते. आणि हे त्यांच्या बोलण्यातही येत होतं. पण ते अडकूनच होते, ते ओपनच होत नव्हते. सुरुवातीचे बरवे तुम्ही पाहिलेत, तर ते ओपन होते. पण परत ते एका कोषात अडकून पडले. बीजाच्या वरतीही एक अस्तित्त्व असतं, त्यात ते खुले झाले नाहीत. वरच्या अवकाशात ते फर्म नव्हते.
गायतोंडे याच्यापलीकडे होते. ते आकाश, अवकाश, सगळं विभाजन करून त्यात पाहत होते.
इव्हन पळशीकरांची काही ऍब्स्ट्रॅक्टमधली चित्रं घ्या. ते या गोष्टी पाहत होते. म्हणजे ते रिऍलिटीमधे काम करत असताना, ऍब्स्ट्रॅक्शनकडे का वळत होते? किंवा तंत्राचे फॉर्म्स का येत होते? कारण ते व्हायब्रेशन्स पेंट करत होते. आपली चिन्हं ही व्हायब्रेशन्सचाच एक भाग असतात. नैसर्गिकरित्या आलेली.

दोन प्रकारचे आर्टिस्ट असतात. वैचारिक आणि इगोइस्टिक. इगोइस्टिक चित्रकार म्हणतो, मला पोर्टेट येतं, लॅन्डस्केप येतं. माझ्यासारखा मीच.
हा इगो निर्माण झाला की चित्रकार विचार करायचा थांबतो. त्याला पुढचा रस्ता दिसत नाही. या चित्रकारांना विशेषत: लॅन्डस्केप्स, पोर्ट्रेट्स काढणा-यांना कॉलेजेसमधून डेमॉन्स्ट्रेशन्सना बोलावतात. ते त्यात खूश होतात. त्यांची एनर्जी अशा गोष्टींमधे खर्च होते. त्यांना हे कळत नाही की, आपण काहीतरी महत्त्वाचं मिस करतो आहोत.
काही चित्रकारांना याची जेन्युईन खंत वाटते. ते त्यातून बाहेर पडायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. दलालांना ही खंत होती. बेन्द्रेंना होती. ऍबस्ट्रॅक्ट हेच पेंटिंग आहे असे उद्गार बेन्द्रेंनी काढले होते. जे सत्य आहे, ते तुम्ही टाळू शकत नाही. तुमच्यासमोर ते येतंच. कदाचित कोलतेसरांमुळे ते आम्हांला आयुष्यात फार लवकर समजलं असं मी आत्ता म्हणू शकतो.
काहीही केलं असतं, तरी मी इकडे वळलोच असतो. वेळ लागला असता मात्र. चुकीच्या माणसांबरोबर राहिलो असतो, तर हा मार्ग हरवूनही बसलो असतो.
चित्रातली प्युरिटी भेटणं महत्त्वाचं. हात किती चांगला, तंत्र किती परफेक्ट याला महत्त्व नाही. ती क्राफ्ट्समनशिप झाली. मी फोटोग्राफरही आहे. कॅमे-यातून काढू शकू अशी इमेज जर एखाद्याने कॅनव्हासवर काढली, तर मला नक्की कळतं की.
त्यात तो माणूस दिसायला पाहिजे हा माझा आग्रह. प्रोजेक्टर लावून कॅनव्हासवर इमेज टाकून पेंटिंग करणारे चित्रकार आज मोठे आहेत.
देशाला चित्रकलेत मागे ओढतात हे लोक. आज आपले अर्टिस्ट इथे इन्स्टॉलेशन वगैरे करतात, त्यात ते पंचवीस वर्षांपूर्वीचं युरोपातलं काम करतात. त्यांना वाटतं आपण कन्टेम्पररी आर्टिस्ट. इन्स्टॉलेशन वगैरे केली की युरोपवारी घडते, म्हणून आज प्रत्येक आर्टिस्ट हे करायला जातो.
अरे, पण कलेला काही मिळतंय का त्यातून?
चित्रकलेकरता जगणा-यांना यातून नैराश्य येईल अशी परिस्थिती सध्या आहे. एक वेळ अशी आली की, मलाही असं नैराश्य आलं. का करतोय हे आपण, असं वाटलं. काय आहे उद्या आपल्या हातात? मग मी स्वत:ला स्टुडिओत कोंडून घेतलं. आणि माझ्या चित्रांमुळेच मी त्यातून बाहेरही आलो.   
नव्या चित्रकारांना मी काय सांगू? इतकंच सांगतो की, चित्र तुमचा ध्यास असायला हवा. चित्रकार चित्राकरता जगला, तर तो चांगलाच होणार. पैसा महत्त्वाचा आहे हे माहीतेय, पण त्याकरता स्वत:च्या चित्राशी तडजोड करू नका. विकलं जातंय, म्हणून चित्र काढू नका. चित्राशी प्रामाणिक राहा. बाकी इतर कामं आहेत उपलब्ध आज-काल पैसे मिळवायला.

***

चित्रकार प्रकाश वाघमारे. तो विचार करतो आणि तो चित्रं काढतो. त्याला हवीत तशी.
आपली चित्रं लोकांना कळायलाच हवीत, अशी त्याची अपेक्षा नाही. नाही कळली, तरी खंतही नाही. कारण विचार करणा-यांना ती कळतील, कळतात याची त्याला खात्री आहे. अनुभव आहे.
लोकांना चित्रकला कळायला हवी ही आस्था मात्र त्याला आहे.
ती त्याच्या शब्दाशब्दांमधून जाणवते.
त्याकरता तो माझ्याशी दिवसभर बोलला. तळमळीने आणि मनापासून, साधं, सोपं, स्पष्ट आणि सडेतोड, खोल पोचणारं, अर्थपूर्ण बोलला. काहीही तत्त्वज्ञानी आव न आणता चित्रांच्या मूलतत्त्वांबद्दल बोलला.

चौकटीबाहेरची उन्हं आता मंदावली होती. आम्ही बोलत असताना पिंपळाच्या फांद्यांवर अनेक पक्षी आले आणि गेलेही. नदीचं पात्र जास्तच शांत वाटत होतं, कारण कपडे आपटणारे धोबीही आता घरी निघून गेले होते. मावळत्या प्रकाशात जंगलाच्या आत जाणारी पायवाट अस्पष्ट दिसेनाशी झाली. सकाळी इथे आले, तेव्हा चौकटीबाहेर लख्ख उजेडात रिऍलिस्टिक शैलीतलं एक निसर्गचित्र दिसलं होतं... आता ते नव्हतं. त्याची जागा अमूर्त संध्याप्रकाशाने घेतली होती.  
मात्र खालच्या काळ्या कातळांवरचे शुभ्र, रंगीत कपड्यांचे चौकोन; नदीच्या पात्रापलीकडचा यलो ऑकर, तपकिरी; पिंपळाचा अस्पष्ट हिरवा; हे सारं वातावरणातल्या राखाडी शिशिरामधे मिसळून जाऊन जो एकसंध आकार निर्माण झाला होता, तो मला जास्त स्पष्टतेनं दिसत होता, समजत होता.
आणि त्याच्या सत्यतेबद्दल कुठलाही संदेह, कोणताही आभास मनात नव्हता.
मग मी त्याकरता, आणि एकूणच सगळ्याकरता, प्रकाश वाघमारेचे मनापासून आभार मानते.

शर्मिला फडके

http://chinhatheartblog.blogspot.in/2012/03/blog-post.html
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *