Uncategorized

शनिवार पेठ

पुण्याबाहेरून येऊन पुण्यात घर शोधण्याची वाईट वेळ अनेकांवर दैवदुर्विलासाने येते. त्यांतलेच आम्ही एक. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनक्रमणासाठी पुण्यनगरीत येणे क्रमप्राप्त होते! तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर राहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी तात्पुरता सोडवला असला, तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात राहायचे होते (ज्याचे त्याचे नशीब असते, दुसरे काय!). मलाही ज्ञानप्रबोधिनीच्या जवळपास राहायचे होते, पण ’सदाशिव-पेठ’वाले काही पाड लागू देत नव्हते. घर शोधणे हे आमचे प्रथम कर्तव्य बनले होते. ’सकाळ’मधल्या छोट्या जाहिराती धुंडाळणे, ब-या वाटतील तेवढ्या जाहिराती मार्क करणे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष जागा पाहायला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला. बरेच दिवस मनासारखी जागा मिळत नव्हती. एके दिवशी राव्हल्या एक जाहिरात नाचवत आमच्याकडे आला. एरव्ही घर पाहायला जायचं म्हटलं की अजगरासारखा पडून राहणारा राव्हल्या एवढा इंटरेस्ट घेतोय म्हणजे जागा चांगलीच असणार असं मला वाटलं. 

’पे. कालीन वाड्यात हवेशीर ३०० चौ फुटांची प्रशस्त जागा. वीज, पंखा, गरमपाणी यांची उत्तम सोय. फक्त सुशिक्षित व चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी. शनवार मारुती जवळ शनि. फक्त सं ५ ते ७. नोकरदार, एजंट व वेळ न पाळणा-यांचा अपमान केला जाईल.’

जाहिरात पाहून जरासा चमकलोच. ३०० चौरस फूट आणि प्रशस्त? ’पे. कालीन’ म्हणजे पेशवेकालीन. म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. वीज, पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करून दिल्यामुळे वाडा-मालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. ’सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी’? अक्षरओळख होईस्तोवर पहिल्या एक-दोन इयत्ता जातात. त्या पहिल्या एक-दोन इयत्तांचे विद्यार्थी सोडले, तर विद्यार्थी कधी अशिक्षित असतो का असा प्रश्न कोणालाही पडेल. पुढे जाहिरातीत लिहिलं होतं, ’फक्त चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी...’

समजा ही जाहिरात एखाद्या लौकिकार्थाने वाईट घरातील मुलानं वाचली, तर तो म्हणणार आहे का, ’नको बा, आपण कशाला? फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायचं तिकडे?’ अशी जाहिरातीची खिल्ली उडवत उडवत मी सगळ्यांसमोर जाहिरातीचं जाहीर वाचन केलं. सगळे फिसकारून हसत होते. राहुल म्हणाला, "फक्त शनिवारी जा, बरं का. नाहीतर अपमान करेल घरमालक." जाहिरातीतला शेवटचा शनी वाराचा नसून पेठेचा आहे हे मी जाहिरात वाचण्यात कमी अनुभवी असलेल्या राहुलला समजावलं. "सदा, शनी, भवानी, रास्ता, नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म्स वापरतात इकडे." राहुलनं अज्ञान दाखवत विचारलं, "निगो पेठ? आयला ही कोणती पेठ आहे?" मी त्याला सांगितलं, "अरे गाढवा, निगो म्हणजे पेठ नाय काय. निगोशिएबल." शब्दमर्यादा वाढूनही शेवटचं वाक्य छापायला दिलंय, म्हणजे घरमालक एकतर शेट माणूस असायला हवा किंवा पूर्वानुभवातून बरीच पीडा सहन करून कावलेला तरी असावा असा निष्कर्ष आम्ही काढला. घरमालक कसा असेल ही उत्सुकता जाहिरातीवरून चाळवल्यानं उद्याच दिलेल्या वेळेत मालकभेटीसाठी जायचं ठरलं.

मी आणि राहुल तयारच होतो. सागर आला की आम्ही वाडामालकांना (वा.मां.ना) भेटायला जाणार होतो. साडेचारला सागर आला. इतर कोणी जायच्या आत बरोबर ५ वाजता टपकून घर पाहून घ्यावे असा विचार मनात होता. त्याप्रमाणे लगेचच आम्ही घर शोधायला निघालो. शनवार मारुती लगेचच सापडला. पण यांचा ’पे. कालीन’ वाडा काही केल्या सापडेना. घरमालकानं फोन नंबरही दिला नव्हता. मग काय, पुण्यात पत्ता विचारण्याचं जोखमीचं काम आमच्यावर ओढवलं. पुण्यात पत्ता विचारला की विचारणारा आपोआपच केविलवाणा व बिचारा होतो. पत्ता ज्याला विचारला जातो तो प्रस्थापित बनतो व ’हे कोण परप्रांतीय इथे आलेत’ या अविर्भावात आपल्याकडे पाहतो. अगदी कोथरूडला राहणा-या माणासानं पेठेत जाऊन पत्ता विचारला, तरी तो पुणेकरांच्या दृष्टीने पुण्याचा असूनही पुण्याबाहेरचा ठरतो. पत्ता सांगणारे कधी उत्तर न देता, तर कधी मुद्दाम चुकीचं उत्तर देऊन निघून जातात. अशाच एका महाभागाने मला लकडीपुलावर दुचाकी चालवायला लावून १०० रुपयांचा चुना लावला होता. लकडी पुलासमोरून जाताना आजही तो कटू प्रसंग आठवतो.

पत्ता सांगण्याचा असाच एक सत्य प्रसंग आठवला. मी एकदा पीएमटीनं डेक्कनहून वनाज कॉर्नरला निघालो होतो. बसमध्ये बरीच गर्दी असल्यानं व कंडक्टरला विचारणं शक्य नसल्यानं मी ’वनाज कॉर्नरचा स्टॉप माहीत आहे का?’ असं शेजारी बसलेल्या एका वृद्ध गृहस्थांना विचारलं. ’काही कल्पना नाही बुवा,’ असं म्हणून म्हातारबुवा खिडकीबाहेर पाहायला लागले. थोड्या वेळानं मी इतर दोन-तीन लोकांना विचारून स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉपवर उतरल्यावर पाहतो तर काय, हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉपवर उतरले. माझं डोकं गरम झालं. मनात विचार आला, वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील, पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी जाऊन त्या गृहस्थांना जाब विचारला, "का हो, वनाज माहीत नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात?" ते गृहस्थ क्षणभर वरमले, पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, "अच्छा, तुम्ही वनाज म्हणालात का? मला नीट ऐकू आलं नसावं. अरेच्चा, माझा मुलगा बोलावतोय वाटतं!" असं म्हणून नीटसं ऐकू येत नसतानाही न मारलेली हाक ऐकून म्हातारबुवांनी पिशव्या बखोटीला मारून रस्ता क्रॉस करून पळ काढलासुद्धा!

पुण्यातल्या पत्ता सांगण्याच्या अशा अनुभवांना व एसटीडीवरच्या ’पत्ता विचारण्याचे पैसे पडतील’ अशा स्वरूपाच्या पाट्यांना मी फारशी भीक घालत नसे. वयोवृद्ध लोक शक्यतो टाळून कोणा तरुणाला पत्ता विचारता येईल का म्हणून मी इकडे तिकडे पाहत होतो. शेवटी मनाचा हिय्या करून एका जवळच्या दुकानात शिरलो. 

"का हो, इथे शनवार मारुतीजवळच्या कुठल्या वाड्यात भाड्यानी जागा देतात का?" असा प्रश्न त्यांना विचारला. 

दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "काय हो? सुशिक्षित आहात ना?" 

एखादी पाटी वाचायची राहिली की काय असा विचार मनात चमकून गेला. मी पाट्या शोधू लागलो. ते पाहून गृहस्थ म्हणाले, "शनवार मारुतीजवळ शेकडो वाडे आहेत. तुम्हांला कुठला हवाय? नाव काय आहे मालकांचं?" 

मी म्हटलं, "काही कल्पना नाही. ’सकाळ’ला जाहिरात आहे." 

गृहस्थ म्हणाले," अहो, मग त्यांनाच फोन करून का नाही विचारत?" 

मी म्हटलं, "अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत." 

त्यावर ते दुकानदार बडबडले, "च्यायला, ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्यासारख्यांच्या मागे ताप लावतात. बघू जाहिरात." व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागदपत्रं देऊ त्या तत्परतेनं आणि अदबीनं मी जाहिरातीचा पेपर त्यांच्याकडे दिला आणि आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. 

"ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ’ब. जोशी’ एवढंसुद्धा टाकणार नाही हा *&%$##*!" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. "हे इथंच पलीकडे आहे, डावीकडे वळा," असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. 

दुकानदारानं सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालो, पण ते ’हे इथंच पलीकडे’ न सापडल्यानं परत त्या दुकानात आलो. सांगूनसुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं! हे म्हणजे घोर पातकच, अशा नजरेनं त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ’काका, एक वेळ मुस्काटात मारा, पण ते तसल्या नजरेनं पाहू नका’ असं सांगावं वाटलं. दुकानदार वैतागून बोलले, "अहो, काय तुम्ही! इथेच पलीकडे जो जुन्या संडासासारखा दरवाजा दिसतोय, तो जोश्यांच्या वाड्याचा दरवाजा." दुकानदारानं जरी संडासाचं दार म्हणून अवहेलना केलेली असली, तरी जोश्यांच्या वाड्याचं द्वार म्हणजे जणू स्वर्गाचं दार असल्यागत आमच्या चेह-यावर हसू पसरले व समाधानाने आम्ही तिकडे निघालो.

दारावरची लोखंडी कडी वाजवणार इतक्यात राव्हल्याने माझा हात धरला व म्हणाला, "अबे, वेडाबिडा झाला की काय?". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली की काय असं वाटलं. 

मी राहुलला विचारलं, "काय झालं?" 

त्यावर तो म्हणाला, "अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोश्या उगाच अपमान करायचा." 

"ठीक आहे," म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पाहत आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत आहोत हे वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं, आता ती व्यक्ती येवून दार उघडेल. पण कसचं काय! काहीच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे होऊन दरवाज्यावर ठकठक केली. ’ठकठक’मधला दुसरा ’ठक’ वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला. तुम्ही पेठेत आहात याची जाणीव करून देणा-या स्वरात त्यानं विचारलं, "काय हवंय?" 

घरमालक आतल्या बाजूनं बहुदा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो पहिल्यांदा घाबरून मागे सरला. नंतर सावरून म्हणाला, "रूम हवी आहे." 

मालकांनी म्हटलं, "नाव काय तुमचं?" 

राव्हल्याने लगेच "राहुल" असं उत्तर दिलं. 

"राहुल काय? द्रविड की गांधी?" म्हाता-याला आडनाव अपेक्षित असावं, म्हणून मी राहुल जोशी असं त्याचं पूर्ण नाव सांगून टाकलं. 

ते ऐकून मालक वदले, "रूम वगैरे काही नाही. आमच्याकडे एक प्रशस्त जागा आहे भाड्यानी देण्यासाठी." काही तरी गफलत होत असावी, म्हणून मी जाहिरातीचा पेपर पुढे केला. 

मालक म्हणाले, "हो, आमचीच जाहिरात आहे ती." 

मालक दरवाजा न उघडता खिडकीतून आमच्याकडे पाहत बोलत होते व खिडकीच्या खाली आम्ही असा हा इंटर्व्ह्यू सुरू होता. टाचा उंचावून आम्हांला न्याहाळत वा.मा. म्हणाले, "कु्ठून आलात?" 

"एबीसी चौकातून." राहुल्या वदला.

वा.मा.: "एबीसी? ते काय?" 

मी: "अप्पा बळवंत चौक म्हणायचं असेल त्याला."

वा.मा.: "अरे, कुठून आलात म्हणजे पुण्यात कुठून आलात?" 

मी: "काका, आम्ही औरंगाबादहून आलो आहोत."

वा.मा.: "अच्छा. कशाला?" 

मी ’नोकरी’ असं म्हणालो असतो, तर वा.मा.नी दरवाजा उघडला नसता. म्हणून मी ’पुढील शिक्षणासाठी’ असं सांगितलं.

वा.मां.नी ’ठीक आहे’ एवढंच म्हणून आमच्याकडे पाहिलं. काहीही न बोलता दरवाजा उघडला व ’कुणीही दोघांनी आत या’ असं फर्मान सोडलं. च्यामारी! आम्ही तिघे आलेलो असताना फक्त दोघांनी आत या म्हणणं म्हणजे कहर होता. तरीपण सागरनं समजूतदारपणा दाखवला व तो बाहेर थांबला. मी आणि राहुल आत गेलो. बळवंतराव जोशी यांची देहयष्टी त्यांच्या नावाला पूर्णपणे विसंगत व आडनावाला साजेशी होती. गोरेपान, कपाळी गंध, केस उडालेले, काका कसले - आजोबाच शोभावेत असे. खाली मळ खाऊन खाऊन स्वरंग-स्वजात विसरलेले धोतर, वर एखाद्या पारशीबुवाप्रमाणे अडकवलेली बंडी, त्यातून डोकावणारे कळकट जानवे, कानात भिकबाळीसारखे काहीतरी घातलेले. थंडीचे दिवस नसतानाही पायात लाल रंगाचे सॉक्स चढवले होते. ही वेषभूषा पाहून आपण पेठेत आलो आहोत याची खात्री पटली.

दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. त्याच चौकोनात एका कोप-यात एक जिना होता. वाड्याच्या वरच्या मजल्यावर २-३ खोल्या होत्या. त्यातलीच एखादी आम्हांला दाखवतील असे वाटले. वा.मा. दिवाणखाण्यात गेले, त्यांच्या मागोमाग आम्हीही निघालो. आम्ही मागेच येत असल्याचे पाहून वा.मा. मागे वळाले व ताडकन म्हणाले, "वहाणा काढून पाय धुऊनच वर या. मी वाड्यातच आहे. तुम्ही बाहेरून आलात. तेव्हा पाय हे धुतलेच पाहिजेत." चौकात एका घंगाळात पाणी भरून ठेवलं होतं. तिथे जाऊन आम्ही चपला काढून पाय धुतले व दिवणखाण्यात प्रवेशकर्ते झालो. 

"हा आमचा वाडा." वा.मां.नी सांगायला सुरुवात केली. दिवाणखाणा अगदी पेशवाई थाटातला होता. वर झुंबर, केळकर संग्रहालयात शोभला असता असा गालिचा. दिवाणखानाभर मांडून ठेवलेल्या वाड्यावर आजवर राज्य करणा-यांच्या तसबिरी, कोणाकोणाच्या पुणेरी पगड्या, भिकबाळ्या. एक जुनाट टीव्ही कोप-यात पडला होता.

वा.मां.नी त्यांच्या व बहुतांश ज्येष्ठांच्या आवडीचा ’ओळखी काढा’ हा खेळ सुरू केला. मग आडनावे विचारणे, नातेवाइकांची आडनावे विचारणे, कोण नातेवाईक कुठे आहेत याची प्राथमिक चौकशी करणे झाले. कुठूनच ओळख लागत नसल्याचं पाहून वा.मा. थोडे खट्टू झाले. त्यांनी मग स्वकुळाची बख्तरे आमच्यासमोर उलगडायला सुरुवात केली. दिवाणखान्यातील एकेका तसबिरीवर वा.मां.नी भाष्य करायला घेतलं. संक्षेप वगैरे संकल्पनांना फाटा देत, बळवंतराव, एकनाथराव, विष्णुपंत, हरीपंत, भिकाजीपंत अशी त्यांची वंशावली आम्हांला ऐकवली. त्यानंतर त्यांनी वाड्याचा इतिहास, वाडा बांधणारे पंत, त्यांचे पेशवेदरबारातले वजन व कर्तबगारी कथन केली. हे वर्णन ऐकून आम्ही पेशवेदरबारात विराजमान आहोत असा क्षणभर भास झाला. ही अगाध माहिती ऐकून झाल्यावर राहण्याच्या जागेसंबंधी जाणून घेण्यासाठी आमची चुळबुळ सुरू झाली. आम्ही काकुळतीला येऊन म्हणालो, "थोडं राहण्याच्या जागेविषयी सांगता का?"

वा.मा.: "हो, सांगतो की. माझ्याकडे सगळं नियमांनुसार होतं. इथे राहणा-याला नियमांचं पालन हे अत्यावश्यक आहे. अन्यथा गच्छंती अटळ आहे. सर्व नियम तुम्हांला समजावून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचं सर्वात आधी. तर सांगा. आपण घर भाड्यानी कशासाठी देतो?"

मी: "सोबत व्हावी, जागा वापरात राहावी, वगैरे वगैरे."

वा.मा.: "सोबत वगैरे ते ठीक आहे हो, पण मुख्य कारण म्हणजे घरभाडं. त्यासाठी आम्ही घर भाड्यानी देतो. तेव्हा तिथे कुचराई मान्य नाही. नियम क्रमांक १. महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे इथे सदरेवर आणून दिले पाहिजेत."

मी: "हो, चालेल ना. काही अडचण नाही."

वा.मा.: "अहो, बाकी नियम पुढे आहेत. ते सर्व ऐका आणि मग काय ते ठरवा."

मी: "ठीक आहे. सांगा."

वा.मा.: "हां, तर मग भाड्यानंतर येते ती वाड्याची शिस्त. वाड्याची शुचिर्भूतता कायम राहील असे वर्तन ठेवावे लागेल."

राहुल: (वाड्यावर नजर फिरवत) "हो , राहील ना. शुचिर... चिर... शुचिरब्रूता कायम राहील ना." शुचिर्भूतता उच्चारताना होणारा राव्हल्याचा चेहरा पाहून मला हसू आवरेना. हा शब्द त्याला पहिल्यांदाच पुस्तकाबाहेर भेटला असावा. मनतल्या मनात मी मला उच्चार करता येतो का ते पाहून घेतलं.

वा.मा.: "नियम क्रमांक २. जाता येता दिंडीदरवाजा लोटून कडी लावून मगच आत येणे किंवा बाहेर जाणे." कडकट्ट कुजलेला व लाथ घातली तर कोसळेल अशा लाकडाचा तो सापळा म्हणजे दिंडीदरवाजा! हे जरा अतीच होत होतं. हा सापळा जर दिंडीदरवाजा असेल, तर खुद्द वा.मा.ही स्वत:ला राघोभरारी समजत असतील असा विचार मनात येऊन गेला.

वा.मा.: "हा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. इथल्या शेवटल्या भाडेकरूनी या नियमाचं पालन करण्यात कुचराई केली, म्हणून त्यांना हा वाडा सोडावा लागला. वेळोवेळी बजावूनही दरवाजा उघडा ठेवायचे व कहर म्हणजे वरून असत्य बोलायचे. दरवाजा आम्ही उघडा ठेवला नाही, म्हणून मलाच दटावून सांगायचे. पाहिले पाहिले आणि दिले एक दिवस घालवून."

मी: "बरोबर आहे. नियम तर पाळायलाच हवेत."

वा.मा.: "आता नियम क्रमांक ३. आमचेकडे पहिल्या प्रहरी सडासंमार्जन होते. त्यामुळे वाडा पवित्र होतो. त्यामुळे सडासंमार्जनानंतर झोपून राहणे नाही."


वर खोलीत झोपून राहिलेलं ह्यांना काय कळणार आहे असा विचार मी विचार मनातल्या मनात करत आहे हे ओळखूनच वा.मां.नी पुढचा नियम सांगितला. 

वा.मा.: "नियम क्रमांक ४. सकाळच्या आरतीला वाड्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी हजर राहायचे." नियम ऐकून मी जरा चपापलोच! "त्याचं काय आहे, हा नियम करावा लागला. अहो, व्हायचं काय, की आमची आरती सुरू असताना जुने भाडेकरू उठायचे आणि आळसावलेलं तोंड घेऊन दारात तोंड धुण्याकरिता उभे राहायचे. अजिबात चालायचं नाही ते. अपवित्र वाटतं."

मी: "अहो, ती मुलं वर राहायची ना? मग खाली कशाला येतील तोंड धुवायला?"

वा.मा.: "अहो, ते पुढच्या नियमात कळणारच आहे. गडबड कशाला करता?"

मी: "बरं."

वा.मा.: "हां, तुम्ही काढलाच आहात विषय, तर सांगतो. नियम क्रमांक ५. वर शौच व स्नानाची सोय नाही. वरच्या मुलांनी हे वापरायचे," असं म्हणून वा.मां.नी दोन कवाडांकडे बोट केले.

मी: "इथे? खाली?"

वा.मा.: "हो मग. त्यात काय? वाड्याचे ऐतिहासिक स्वरूप जपले जावे म्हणून आम्ही वर शौचालय बनवले नाही."

मी मनात म्हटलं, ’अहो, ऐतिहासिकच रूप जपायचे होते, तर हे तरी शौचालय कशास बांधले? जायचे होते नदीपात्रावार, रस्त्याच्या कडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार? गरजवंताला अक्कल नसते या उक्तीनुसार मी मुकाट्याने पुढचे नियम ऐकण्यास सज्ज झालो.

वा.मा.: "नियम क्रमांक ६. जिने चढताना धावत-पळत जिने चढायचे नाहीत. धावत गेल्याने जिन्यांचे आयुष्य कमी होते. पाय न वाजवता सावकाश जिने चढायचे, कितीही घाईत असाल तरीही."
हा नियम ऐकून एखाद्या रात्री हातोडी घेऊन त्या खिळखिळ्या जिवाला एकदाची शांती द्यावी असा विचार मनात येऊन गेला. हा विचार जिना व वा.मा. राघोबादादा पेशवे दोघांसाठीही येऊन गेला होता. पण इरिटेशन फेज संपून आता मला म्हातारा इंटरेस्टिंग वाटू लागला होता. श्रीमंतांनी पुढचे नियम सांगावेत म्हणून आतापर्यंतच्या नियमांना सहमती दर्शवणे भाग होते. मी मुद्दाम चेहरा आनंदी ठेवला होता. वाडा मस्त असल्याचे मी मधूनमधून श्रीमंतांना सांगत होतो.

वा.मा.: "नियम क्रमांक ७. कमीत कमी ८ महिने राहण्याचा लिखित करार करावा लागेल. करार मोडल्यास पुढील भाडेकरू येईपर्यंतचा जाहिरातखर्च व भाड्याची रक्कम देणे करार मोडणा-यास बंधनकारक रा्हील. त्याचं काय होतं, आहो, भाडं राहिलं एकीकडे. जाहिरात खर्चातच अर्धं भाडं निघून जातं. त्यात वर नुसत्याच ’माहिती घेऊन येतो-येतो’ म्हणणा-या उपटसुंभांमुळे वेळ दवडला जातो. रात्री-अपरात्री येणारे महाभागही काही कमी नाहीत. त्यामुळे भेटायची वेळ छापावी लागते. तो खर्च वाढतो. एवढे करूनही काही हरामखोर अपरात्रीच यायचे. तुम्ही त्यातले वाटत नाही म्हणूनच एवढी सखोल माहिती देतोय."

पेशवे आता आम्हांला त्यांच्या गटात ओढू पाहत होते. 

राहुल: "तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आम्ही कमीत कमी एक वर्ष तरी राहूच." 

वा.मां.नी राहुलकडे समाधानानं व मी रागानं पाहिलं. वा.मां.नी नियमावली चालूच ठेवली होती.

वा.मा.: "नियम क्रमांक ८. दिंडीदरवाजा रात्रौ ९नंतर बंद राहील. एकदा दरवाजा बंद झाला की बंद. गाडी पंक्चर झाली होती, रिक्षा मिळाली नाही, बस वेळेवर आली नाही, अशी कारणे चालणार नाहीत. पोचायला उशीर होत आहे असे लक्षात आले तर वाड्यापर्यंत येण्याचे कष्ट घेऊ नका. बाहेरच कुठे तरी सोय बघा व दुस-या दिवशी वाड्यावर या. नियम क्रमांक ९. रात्रौ ११नंतर दिवे घालवले पाहिजेत. दिवे न घालवल्यास वरच्या खोल्यांचा फ्यूज काढण्यात येईल. नियम क्रमांक १०. कोणत्याही प्रकारचे मद्यपान-धूम्रपान निषिद्ध. सिगारेटची थोटके लपवण्याचा प्रयत्न करू नये. मी सिगारेट पिणारा मनुष्य एक मैलावरून ओळखू शकतो."

वा.मा.समोर बसलेला राव्हल्या एका वेळी पाच बोटांत पाच सिगरेटी धरून ओढतो हे वा.मां.ना सांगितले असते तर वा.मा. झीट येऊन पडले असते. मैलभरावरून ओळखण्याची थाप आम्ही वा.मां.चे वय पाहता पचवून घेतली. वा.मा. आता थांबायला तयार नव्हते.

वा.मा.: "नियम क्रमांक ११. वाड्यावर मुलींना आणण्यास तीव्र मनाई आहे. मग ती सख्खी बहीण का असेना. मागे एक मुलगा होता. राहायचा एकटाच, पण इथे येणा-या गोपिका पाहून लोक आमच्या वाड्याची चारचौघांत नालस्ती करायला लागले. ’शनिवाराचा बुधवार केला’ म्हणू लागले. त्याला त्यावरून टोकलं, की ’बहीण आहे, आतेबहीण आहे, चुलतबहीण आहे, मावसबहीण आहे’ असे बहाणे करायचा. एका भल्या पहाटे त्याच्या दारावर थाप मारून तुझ्या पुण्यातल्या बहिणीचा फोन आला आहे असे सांगितले. झोपेत असल्याने "पुण्यात कोणी बहीण राहत नाही," असे गाफीलपणे म्हणाला. दिला त्याच दिवशी घालवून त्या नीच माणसाला. तेव्हा आताच सांगतो, मुलींना वाड्यात प्रवेश नाही."

या अटीमुळे सागरची थोडी पंचाईत होणार होती. पण काही तरी मॅनेज करता आले असते.

वा.मा.: "नियम क्रमांक १२. वाहने फक्त रात्री वाड्यात घेण्याची परवानगी आहे. सकाळी सडासंमार्जनाआधी वाहने बाहेर काढलीच पाहिजेत. दिवसा दुचाक्या बाहेरच राहतील. नियम क्रमांक १३. वाड्यात कसल्याही प्रकारचे अभक्ष्य बाहेरून आणून खायचे नाही. तसे काही आढळल्यास ते जप्त केले जाईल."

अभक्ष्य जप्त करून बळवंतबुवा त्यावर ताव मारणार की काय अशी शंका मनाला चाटून गेली.

वा.मा. पुढे वदले, "नियम क्रमांक १४. वाड्यात स्वयंपाकाचे प्रयत्न करायचे नाहीत. स्वयंपाक करायचा प्रयत्न केल्यास शेगडी व इतर साहित्य जप्त केले जाईल. नियम क्रमांक १५. वाड्याचे बाह्य सौंदर्य अबाधित राहावे यासाठी कसल्याही प्रकारची वस्त्रे वा अंतवस्त्रे राहत्या जागेच्या बाहेर वाळत घालू नयेत."

या नियमाचा भंग केल्यास वा.मा. जप्तीची धमकी देतात की काय असे वाटून गेले, पण त्यांच्या सुदैवानं ते तसं काही बोलले नाहीत. ’आमच्याकडे पाहुणे येतात व ते खूप वाईट दिसतं’ एवढंच सांगून त्यांनी नियमाचं महत्त्व विषद केलं.

वा.मा.: "नियम क्रमांक १६. मित्रांचा गोतावळा आणून चकाट्या पिटत बसायचे नाही. घरात दोनच्या वर व्यक्ती राहता कामा नयेत. मी अधूनमधून याची पडताळणी करत असतो. मागच्या वेळी अशीच पडताळणी केली, तेव्हा डझनभर जोडे व बाथरूममध्ये ५ टूथब्रश सापडले. मला फसवू पाहत होते लफंगे. दिले घालवून बोडकिच्यांना."

आम्हांला तिघांना राहायचे होते. सागरचा टूथब्रश पाहून वा.मा. आम्हांलाही एक दिवस हाकलणार असे वाटून गेले. पण पकडले न जाण्यासाठीचा उपाय वा.मा.च सुचवून गेले होते.

वा.मा.: "नियम क्रमांक १७. खाली आम्ही राहत असल्याने वरती जोरजोरात चालणे-आदळआपट-धांगडधिंगा चालणार नाही.
नियम क्रमांक १८. मोठ्या आवाजात टेप वगैरे लावल्यास फ्यूज काढला जाईल. रात्रभर अंधारात बसावे लागेल.
नियम क्रमांक १९. भाडेकरारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इथे राहणा-या प्रत्येक व्यक्तीच्या छायाचित्रांच्या २ प्रती पोलीस चौकीत देण्यासाठी लागतील. शिवाय पुण्यातील ओळखणा-या दोन व्यक्तींचे कायमस्वरूपी पत्ते, दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे.
नियम क्रमांक २०. कच-यासाठी घंटागाडी येते. घरात-खिडकीत कुठेही कचरा ठेवू नका. बुद्धीचा वापर करा.
नियम क्रमांक २१. कुलूप लावून बाहेर जाताना दिवे व पंखा बंद करून जाणे.
नियम क्रमांक २२. उन्हाळ्यात फ्रीजमध्ये पाण्याची बाटली ठेवण्याचा आग्रह करू नये.
नियम क्रमांक २३. पाच हजार रुपये डिपॉझीट म्हणून जमा करावे लागतील. जागा सोडताना काही नुकसान झालेले असल्यास त्याची भरपाई डिपॉझीटमधून वसूल केली जाईल.
नियम क्रमांक २४. शेजा-यांशी काही वाद-भांडण झाल्यास तुम्ही एकटे नाही हे ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व नियम शिरोधार्य मानत असाल, तरच तुम्हांस इथे प्रवेश दिला जाईल."

हा शेवटला अपवादात्मक नियम सांगून वा.मा. शमले. एवढे नियम सांगत बसण्यापेक्षा वा.मां.नी लिहून ते बाहेर लावावेत असं मला वाटत होतं. वा.मां.चं बोलणं ऐकून वाटलं, एवढे नियम लक्षात ठेवायचे असते, तर च्यायला, चांगला वकील झालो असतो. इंजिनिअर होऊन कशाला असे हाल सोसले असते? पेशव्यांनी आतापर्यंत आमच्यावर नियमांच्या चार राउंड्स - म्हणजे २४ गोळ्या -झाडल्या होत्या. आता तरी पेशव्यांची मॅगझीन रिकामी झाली असेल या विचाराने आम्ही आवराआवरीच्या हालचाली सुरू केल्या. 

मी पेशव्यांनाच विचारले, "नियम संपले असतील तर आम्ही येतो. आता उशीर होतोय."

वा.मा.: "ठीक आहे. पण शौचालयासंबंधी आणखी काही नियम आहेत. ते मी तुम्ही राहायला आल्यावर सांगीन."

शौचालयातपण नियम! आधी उजवा पाय ठेवा, मग डावा. कडी लावा, पाणी टाका, असले नियम वा.मा. सांगतात की काय, असे वाटायला लागले. जे काय असेल ते सगळे हलाहल आजच पचवून घ्यावे, म्हणून मी म्हणालो, "नको नको, जे काय असेल ते आताच सांगा."

वा.मा.: "नियम क्रमांक २५. रात्रीच्या वेळी वाड्यात शांतता असते. रात्री शौचालयाचा वापर करायचा झाल्यास तो उभ्याने करू नये."

हा नियम ऐकून मी उभ्याउभ्या उडालो! पेशव्यांची इच्छा काही उमजेना.

मी: "म्हणजे?"

वा.मा.: "स्पष्ट सांगायचे म्हणजे उभ्याने शौचालयाचा वापर केला असता रात्रीच्या शांततेत वाड्यात विचित्र आवाज होतो व घरात लेकी-सुना असल्याने ते चांगले वाटत नाही."

बळवंतरावांच्या वाड्यात निसर्गाच्या हाकेला मोकळ्या मनाने ओ देण्याची चोरी होती. तिथेपण नियम होते. अशा नियमांच्या दडपशाहीने वाड्यात राज्य करणा-या या पेशव्यास, गारदी बनून ठार मारण्यास मी त्याच्यामागे धावतो आहे व वा.मा. दिंडीदरवाजा उघडून धोतर सावरत बाहेर पळ काढत आहेत असे चित्र मनासमोर तरळून गेले.

एवढे सहज पाळण्याजोगे सामान्य नियम ऐकल्यावर, मी काय किंवा इतर कुणी बुद्धी जाया न झालेली व्यक्ती काय, इथे राहणार नाही हे स्वच्छ होते. पण एवढा वेळ घातला होता, तर असे मधेच उठून जाता येईना. मला हे असे नेहमी होते. जिथे गोष्ट पटत नाही, तिथून निघणे जरा अवघड होते. कपड्यांच्या दुकानात मनासारखे कपडे नाही मिळाले, तर सगळे कपडे पाहून काहीच न घेता त्या दुकानातून निघताना जरा अवघडल्यासारखेच होते, तसे मला होत होते.

’वाडा आम्हांला तर खूप आवडला आहे. आम्हांला लवकरात लवकर यायचे आहे’, असे असत्य वचन सांगून निघावे व पुढले काही महिने शनवाराचे नावही काढू नये अशा विचारात मी होतो. राव्हल्याचा निघण्याचा काही बेत दिसत नव्हता. पेशव्यांच्या वाड्यावर आतल्या खोलीत त्याला लाल-तांबडे काहीतरी फडफडताना दिसले. तिकडेच त्याचे लक्ष लागून राहिले होते. लाल-तांबड्याचीही राहुलशी नजरानजर झालेली दिसली. असले अघटित पेशवांच्या नजरेखाली चाललेले पाहून मलाच धस्स झाले. ह्या नियमांचे जोखड घेऊन इथे राहण्यासाठी राव्हल्या आम्हांला कनव्हिन्स करतो की काय, असे वाटून मी हवालदिल झालो. 

’आम्ही कळवतो नंतर’ असे म्हणून निघायच्या विचारात असताना राव्हल्याने "आम्ही राहायला येतोच आहोत, ऍडव्हान्स कधी देऊ?" असे विचारून बॉम्बच टाकला. तिथून निघून आम्ही रूमवर परतलो. राहुल आणि लाल-तांबड्याची काहीतरी ष्टोरी सुरू होणार असे दिसू लागले होते. राव्हल्या तिथे जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला होता. राव्हल्याचा मूड वेगळाच दिसत होता. माझा लाल-तांबडा किंवा कुठल्याही रंगाशी संबंध नसल्याने व अजून बुद्धिभेद झालेला नसल्याने शनिवारातल्या त्या घाशीराम कोतवालाच्या घरात राहा जाण्याचा माझा अजिबात मानस नव्हता. पुढचे काही दिवस राहुलबाबा कागदपत्रे जमवणे, करार तयार करणे, फोटो काढणे असल्या कामात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात त्याला ओळखणा-या (पक्षी ओळख दाखवण्या-या) दोन पुण्यात्म्यांच्या शोधात तो बरेच दिवस होता. शेवटी ज्यांच्याकडे तो इमाने-इतबारे वडे खात होता, त्या जोशी वडेवाल्यांनी ह्या राहुल जोश्याला जोशी वाडेवाल्यांकडे राहण्यासाठी मदत केली. राव्हल्याचा दुसरा पुण्यात्मा मलाच बनावे लागले होते. शेवटी एकदाचे त्याचे घोडे गंगेत न्हाले.

एके दुपारी निवांत बसलो असताना एका क्षणभरात आजवर झालेल्या सगळ्या गोष्टी भराभर माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. थोडा वेळ विचार केला आणि माझं मलाच हसू आलं. आता मला राव्हल्याच्या चेह-यावरचा ओसंडून वाहणारा आनंद, राव्हल्यानेच दाखवलेली जाहिरात, राव्हल्या आधीपासूनच तासनतास जिच्याशी गुलुगुलु बोलायचा ती व्यक्ती व जुन्या भाडेकरूंकडून सतत उघडा राहणारा दिंडीदरवाजा या सगळ्य़ा गोष्टींचा क्षणात उलगडा झाला! गेमर राव्हल्या आता भावी सासुरवाडीत ऑफिशिअली राहायला जाणार होता. आम्ही मात्र छोट्या जाहिरातींची कात्रणे काढून त्यावर लाल-तांबड्या रेषा मारत भर उन्हात भर पेठांमधून घर शोधत वणवण हिंडत होतो. 

- निल्या

http://nilyamhane.blogspot.in/2012/01/blog-post.html
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *