Uncategorized

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

’रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ’रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ’रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ’रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं.

पुढे वाचा...

अनुक्रमणिका

संपादकीयहातवार्‍यांमधून बोलणारी मुलगी - प्रणव सखदेव (मुक्तचिंतन)
एका (सरकारी) पावसाळ्य़ाचा जमाखर्च - अश्विन (अवघा रंग एक झाला...)
आवंढा - निरंजन नगरकर (अळवावरचे पाणी)
मी लेखक असते... - मेरा कुछ सामान (मेरा कुछ सामान)
शनिवार पेठ - निल्या (निल्या म्हणे!!!)
सुव्हनियर - श्रद्धा भोवड (शब्द-पट म्हणजे कोडं..)
कलेचा प्रवास आणि मूल्यमापन - राज (Random Thoughts)
सरसकट गोष्ट आणि सरसकट गोष्ट (२) - संवेद (संदिग्ध अर्थाचे उखाणे)
प्रवाहापलीकडे... - शर्मिला फडके (चिन्ह)
गाठी - जुई (...झुई ...झुई झोका!)
झाडांनो इथून पुढे - कमलेश कुलकर्णी (अफ़ू)
खिडकी - जास्वंदी (जास्वंदीची फुलं)
वाघीण - संग्राम गायकवाड (ओसरी)
चिंता - आतिवास (अब्द शब्द)

***
Facebook Comments

16 thoughts on “जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें”

 1. संपादक मंडळाचे अभिनंदन. पण या वेळी उत्साह कमी झालेला स्पष्ट जाणवतो आहे. मागे मेल लिहीताना 'ब्लॉगचे कल्चर मराठीत रूजले नाही याची खंत वाटते' असा ता. क. टाकला होता. तिथून पुढे चालू.

  आपण लिहीत नाही असं संपादकीयात म्हटलं आहे. आपण म्हणजे नेहेमीचीच डोकी असू तर ठीक. पण एक गंमत आहे, लोकं मराठीत बरंच लिहीतायत, भरभरून लिहीत आहेत, फक्त ब्लॉगवर नाही.

  सायटींवर लिहीणं हा प्रकार कदाचित फक्त मराठीतच असावा. कोणत्याही लोकप्रिय सायटीवर गेलात तर लोक रोज लिहीत आहेत असं दिसेल. मग हे लोक ब्लॉगांवर का लिहीत नाहीत? ब्लॉगांवर लिहीणं आणि सायटींवर लिहीणं हे दोन वेगळे प्रकार आहेत. लोकप्रिय सायटींवर सदस्य संख्या भरपूर असते, लेख चांगला किंवा बराही असला तरी लगेच ५०-१०० प्रतिसाद मिळतात आणि वा-वा म्हटलेलं कुणाला आवडत नाही? पण याचा एक तोटाही आहे. सायटींवर तुमच्यासारखेच इतरही असतात आणि बरेच असतात. त्यामुळे तुमचा लेख एक-दोन दिवस हिट झाला तरी नंतर लगेच कविता-विडंबनं-चर्चा-आणखी कविता यांच्या गर्दीत हरवून जातो. कोणत्याही सायटीवर गेलात तर तिथे लेखकांचे लेख मिळणं अवघड असतं. (अपवाद मायबोलीचा. तिथे लेखकांसाठी स्वतंत्र सोय आहे.)

  ब्लॉगवर 'मै ही मै हूं, मै ही मै हूं, दूसरा कोई नही.' अर्थात ब्लॉगवर लिहील्यावर लगेच ५० वा-वा मिळत नाहीत. तिथे चिकाटीने सतत चांगलं देत राहीलात तर लोक येतात पण संयम हवा. अस करायची तयारी फार कमी लोकांची असते. ही मराठी सायटींवर टिका नाही, आहे ते वास्तव मांडलेलं आहे.

  इंग्रजी आणि मराठी ब्लॉगांमध्ये आणखी एक फरक आहे आणि तो फारच महत्वाचा आहे. जितके लोक मराठीत ब्लॉग लिहीत आहेत त्यातले बहुतेक सर्व एका विशिष्ट थरातून आलेले दिसतात. पण प्रतिभावंतांचं काय? नारळीकर, माशेलकर, गावसकर, मंगेशकर या सगळ्या 'करांकडे' सांगण्यासारखं कितीतरी आहे. त्यांना आपल्या आठवणी ब्लॉगवर मांडाव्यात असं का वाटत नाही? हे विचारणं कदाचित औद्धत्य ठरेल पण – आपण लिहीलेलं लोकांना फुकट कसं वाचायला द्यायचं? – ही मध्यमवर्गीय मनाला न झेपणारी शक्यता याच्या आड येत असेल का? परवाच एलकुंचवार म्हणाले, 'मी लिहीणं थांबवलं आहे.' या निर्णयाचा आदर आहेच, पण ते नेहेमी लिहीतात त्याव्यतिरिक्तही त्यांच्याकडे सांगण्यासारखे अनुभव कितीतरी आहेत. त्यांनी ब्लॉग लिहीला तर तो किती अमूल्य ठेवा ठरेल!

  या पार्श्वभूमीवर अमिताभचं कौतुक करावसं वाटतं. ऑपरेशन झालं तरी पठ्ठ्या हॉस्पिटलमधून लिहीत असतो. शेवटी लेखकाचं रक्त आहे, बॉस! त्याचं पाहून दिलीपकुमारही लिहीतो मधून मधून. यांच्याकडे ज्या आठवणी, जे अनुभव आहेत ते अमूल्य आहेत. अर्थात अमिताभ स्वत:चे जे भरमसाठ फोटू टाकत असतो त्याचा वैताग येतो पण मग मधूनच बाबूजींची अशी एखादी सुरेख कविता टाकतो की क्या कहने. ही परवाची लेटेस्ट.

  हम कब अपनी बात छुपाते?
  हम अपना जीवन अंकित कर
  फेंक चुके हैं राज – मार्ग पर,
  जिसके जी में आये पढ़ ले थमकर पल भर आते – जाते !
  हम कब अपनी बात छुपाते?
  हम सब कुछ करके भी मानव ,
  हमीं देवता , हम ही दानव ,
  हमीं स्वर्ग की , हमीं नरक की क्षण भर में सीमा छू आते !
  हम कब अपनी बात छुपाते?
  मानवता के विस्तृत उर हम ,
  मानवता के स्वच्छ मुकुर हम ,
  मानव क्यूँ अपनी मानवता बिम्बित हममें देख लजाते !
  हम कब अपनी बात छुपाते?

 2. प्रयत्न चांगलाय…पण अगदीच थिटा…! किती कमी गोष्टी घेतल्या आहेत! आणि त्यातील बहुतेक तर कविताच! अमुकच इतकं घ्यायचं असं तर काही ठरलेलं नसावं!
  मला तर फक्त ’शनिवार पेठ’ सोडून फारसं काही आवडलं नाही. ’निल्या म्हणे’…ला शुभेच्छा!
  आणि इतकी भयावह परिस्थिती आहे मराठी ब्लॊग विश्वाची?

 3. >>यावर उपाय म्हणून ब्लॉगलेखकांकडून ’मी आणि माझी जात’ या वेगळ्या वाटेच्या विषयावर काही लिखाण मागवलं. तर त्यालाही जेमतेमच प्रतिसाद मिळाला. त्याची कारणं आपल्या प्रश्न कार्पेटखाली ढकलून वरपांगी स्वस्थ राहण्याच्या वृत्तीत शोधावीत की प्रेमप्रकर्ण-प्रेमभंग-प्रेमचारोळ्या यापलीकडे पाहायला तयार नसणार्‍या बनचुक्या शहामृगीपणात शोधावीत, या यक्षप्रश्नाचं उत्तर तुमच्यावरच सोडतो!>>

  ही विचारणा मलाही केली होती. माझं उत्तर होतं की इतक्या गुंतागुंतीच्या विषयावर लिहीण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तेव्हाही नव्ह्तं आणि आजही नाही. एका विशिष्ट विषयाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ब्लॉगविश्वाचं सामान्यीकरण करणं धोक्याचं आहे.

  >>सूर निराशेचा लागला खरा. आमचा उत्साह आटला की ब्लॉगलेखकांचं सर्जन?>> हा प्रश्न संपादनमंडळाने स्वत:ला विचारून बघावा असं वाटतं. संपादनमंडळाच्या ब्लॉगलेखनात झालेली घट ज्या कारणांमुळे असेल तीच कारणे इतरांनाही लागू पडावीत.

  शेवटी आधी अनेकवेळा मांडलेला मुद्दा परत. ब्लॉगलेखन = ललितसाहित्य ही मर्यादा घालून घेतल्याने ब्लॉगमाध्यमाची ताकद पूर्णपणे वापरली जात नाही. हे बंधन कृत्रिम आहे.

 4. धन्यवाद!
  एक विनंती आहे- तुम्ही या निवडलेल्या पोस्ट्सचं वर्गीकरण का नाही टाकत?
  म्हणजे- कथा, कविता, वैचारिक लेख वगैरे?
  जनरली सगळ्या दिवाळी अंकात असं वर्गीकरण असतं..वाचणाऱ्यांना बरं पडतं!

 5. राज:
  मुद्देसूद विवेचन आहे अगदी. लोक खरंच संस्थळांवर जास्त उत्साहानं लिहितात.
  आमच्ब्लॉया मते – ब्लॊग आणि संस्थळ यांवरच्या लिखाणात प्रत्यक्ष फरक काहीच नसतो. पण ब्लॉगवर लिहिणारा माणूस (बहुतांशी)'ही माझी जागा आहे, हवं तर वाचा नाहीतर फुटा' अशा दृष्टिकोनातून लिहित असतो. त्याला 'चर्चा' अभिप्रेत नसते. संस्थळांवर लिहिताना एक तर ही मालकी हक्काची भावना नसते. एकूणच वातावरण एखाद्या पाराखाली जमलेल्या गप्पांच्या अड्ड्यासारखं असतं. कुणीतरी काहीतरी म्हणतं, त्यावर वाद-प्रतिवाद होतात. भूमिका बदलतात, कंपू जमतात. हे अर्थातच काही प्रमाणात ब्लॉगवरही होतंच. पण तरीही दोहोंमधे एक जाणवण्याइतपत ठळक रेषा दिसते. यातून ब्लॉगवरचं लिखाण हे (काहीसं) स्वतंत्र (कला-)(?!)कृतीच्या अंगानं जाणारं, तर संस्थळांवरचं (अर्थातच काहीसं!) चर्चाप्रस्तावांसारखं(आणि चर्चांसारखं) वाटतं.
  जे काय सगळ्यांच्या सोयीचं नि आवडीचं असेल ते टिकेल…
  जातीबद्दल: सामान्यीकरणाचा आरोप मान्य आहे. सगळ्यांना असं एका तागडीत कधीच तोलता येत नाही. पण मग निरीक्षणं मांडावीत तरी कशी? त्यात कुणावर ना कुणावर अन्याय होण्याचा धोका उरतोच. खरंच ठरीव विषयांच्या पलीकडे लिहिताना दिसत नाहीत. जे अपवाद आहेत, ते नियम सिद्ध करण्यापुरतेच… असो!
  Anonymous:
  चालायचंच! आभार. 🙂

 6. राज आणि निल्याचा लेख आवडला. पीडीएफ प्रतही प्रिंटणीय आहे. पानांवर पेज नंबर राहुन गेले आहेत, मुद्राराक्षसाची एखादी डुलकी चालायचीच.

 7. मला वैयक्तिकरित्या प्रणवची हातवाऱ्यांमधून बोलणारी मुलगी आणि कमलेशची झाडांनो इथून पुढे प्रचंड आवडल्या…

 8. अभिनंदन .. तुमच्या या उपक्रमामुळे नवीन (मी पूर्वी न वाचलेल्या) मंडळीची ओळख होते, म्हणून विशेष आभार.

 9. Everything typed was very reasonable. But, what about this?
  what if you added a little information? I am not saying your information isn't good, however suppose you added a title to maybe get folk's attention?
  I mean "जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें"
  is kinda plain. You could look at Yahoo's front page and see how they create post titles to get viewers to click. You might try adding a video or a picture or two to get people interested about everything've written.
  In my opinion, it might bring your posts a little bit
  more interesting.
  Here is my blog post ; neucopia

 10. My brother suggested I may like this website.
  He was entirely right. This post actually made my day.
  You can not believe simply how much time I had spent
  for this info! Thank you!

  Stop by my homepage … canon digital camera

 11. आपला अंक खुपं आवडला. झाडांनो इथुन पुढे अप्रतिम.

  आणखी एक. आपण म्हणता , " पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं. " यात आपल्या पहाण्यात माझा ब्लॉग कधीच आला नाही का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *