Uncategorized

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

’रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ’रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ’रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ’रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं.

पुढे वाचा...

अनुक्रमणिका

संपादकीयहातवार्‍यांमधून बोलणारी मुलगी - प्रणव सखदेव (मुक्तचिंतन)
एका (सरकारी) पावसाळ्य़ाचा जमाखर्च - अश्विन (अवघा रंग एक झाला...)
आवंढा - निरंजन नगरकर (अळवावरचे पाणी)
मी लेखक असते... - मेरा कुछ सामान (मेरा कुछ सामान)
शनिवार पेठ - निल्या (निल्या म्हणे!!!)
सुव्हनियर - श्रद्धा भोवड (शब्द-पट म्हणजे कोडं..)
कलेचा प्रवास आणि मूल्यमापन - राज (Random Thoughts)
सरसकट गोष्ट आणि सरसकट गोष्ट (२) - संवेद (संदिग्ध अर्थाचे उखाणे)
प्रवाहापलीकडे... - शर्मिला फडके (चिन्ह)
गाठी - जुई (...झुई ...झुई झोका!)
झाडांनो इथून पुढे - कमलेश कुलकर्णी (अफ़ू)
खिडकी - जास्वंदी (जास्वंदीची फुलं)
वाघीण - संग्राम गायकवाड (ओसरी)
चिंता - आतिवास (अब्द शब्द)

***
Uncategorized

हातवार्‍यांमधून बोलणारी मुलगी

हातवार्‍यांमधून बोलते मुलगी
डोळ्यांवर तिचा सगळा विश्वास
जे दिसतं तेच असतं
तिला कळत नाही
न दिसणारं-अमूर्त
डिक्शनरीत शोधते संस्कृतीचा अर्थ
सांगते दाखव संस्कृती. कशी असते?
जसं हात जोडले की देव
मनगटावर बोट फिरवलं की घड्याळ, वेळ
प्रत्येक गोष्ट बांधते हातवार्‍यांमध्ये
संस्कृती दाखवताना माझी फाटते

हातवारे करते. भरभर करते
हात शब्द हात ओठ हात जीभ हात दात
हात स्वर हात आवाज
बोटा-हातांवर नाचते मराठी इंग्रजी

५ वर्षांची असताना
ताप आला खूप
त्यानंतर ऐकू येत नाही
बोलता येत नाही
आधी येत होतं
चेहरा होतो छोटासा
वाटतो व्हॅन गॉच्या सनफ्लॉवर्ससारखा
हातवारेच बोलतात
हातवारेच सांगतात
सुखदु:ख.

- प्रणव सखदेव
 
http://mazemuktchintan.blogspot.in/2011/10/blog-post.html
Uncategorized

जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

’रेषेवरची अक्षरे’च्या मागल्या अंकाच्या संपादकीय प्रस्तावनेत आम्ही तसा बराच थयथयाट केला होता आणि तरीही आम्ही (अंमळ भाबडेपणाने) नवीन वाटा शोधत राहण्याचा आमचा उत्साह अद्याप टिकून असल्याचं लिहिलं होतं. त्याचबरोबर तो तसा किती दिवस टिकून राहील याबद्दल जरा शंका व्यक्त केली होती. पण आमचा उत्साह पुरेसा भाबडा आहे हा साक्षात्कार नोंदवण्याची वेळ बहुदा आली आहे.

आपण लिहीत नाही आता जुन्या वेगाने, उत्साहाने वगैरे. आधीच मराठीतून लिहिल्या जाणार्‍या ब्लॉगवर हाताळले जाणारे विषय मर्यादित. त्यात ’रेषेवरची अक्षरे’ची चौकट त्याहूनही बंदिस्त. जे ललित साहित्याच्या चौकटीत बसेल, असं ब्लॉगवर लिहिलं गेलेल्यातलं उत्तम काही वेचून समोर ठेवणं इतकंच आमचं मूळ उद्दिष्ट. त्यामुळे ’रेषेवरची अक्षरे’च्या साच्यात मराठी ब्लॉग ओतले की, तेच ते नि तेच ते होत जाण्याचा एक धोका होता. दुर्दैवानं तो यंदा खरा ठरल्याचं जाणवत गेलं. तेच ते विषय, संकुचित विश्व, मर्यादित आवाका यांमुळे मराठी ब्लॉगांवरचं ललित लेखन ठरीव, घोटीव आणि निर्जीव होत गेलं. ही शक्यता ’रेषेवरची अक्षरे’ सुरू करताना माहीत नव्हती का? अर्थात होती. पण तरीही ’करून तर पाहू’ म्हणून करून पाहिलं. काही नवीन देण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालूनही, वेगानं वाढणार्‍या नवनवीन ब्लॉगांचे पत्ते उत्साहानं हुडकूनही, म्हणावं तितकं काही सापडलंच नाही हे खरं. 

यावर उपाय म्हणून ब्लॉगलेखकांकडून ’मी आणि माझी जात’ या वेगळ्या वाटेच्या विषयावर काही लिखाण मागवलं. तर त्यालाही जेमतेमच प्रतिसाद मिळाला. त्याची कारणं आपल्या प्रश्न कार्पेटखाली ढकलून वरपांगी स्वस्थ राहण्याच्या वृत्तीत शोधावीत की प्रेमप्रकर्ण-प्रेमभंग-प्रेमचारोळ्या यापलीकडे पाहायला तयार नसणार्‍या बनचुक्या शहामृगीपणात शोधावीत, या यक्षप्रश्नाचं उत्तर तुमच्यावरच सोडतो! पण आलेला प्रतिसाद इतका क्षीण होता, की तो तितकाच आणि तसाच छापावा असं अजिबात वाटलं नाही. त्यामुळे प्रतिसाद देणार्‍या मोजक्या लेखकांचे आभार आणि क्षमा एकदमच मानत तो विभाग यंदा रद्द करतो आहोत.

असो. प्रचंड वेगानं संख्याबळ वाढवणार्‍या मराठी ब्लॉगविश्वात उत्तम काही मिळवताना कष्ट झाले आणि त्यात अंतिम निवड करताना नेहमी होणारी ’हे घ्यावं की ते, हेही उत्तम नि तेही’ या प्रकारची दमछाक यंदा जराही न झाल्याने आम्ही कष्टीही झालो...

सूर निराशेचा लागला खरा. आमचा उत्साह आटला की ब्लॉगलेखकांचं सर्जन? माहीत नाही. पण आम्हांला येणारी मजा कमी झाली हे निश्चित. तरीही ’उपक्रम घेतला आहे हाती, तर एक प्रयोग म्हणून तो चालू ठेवू’ असा विचार करून झाला. पण हे असं बळंच चालू ठेवण्याची गरज आहे का? याचं उत्तर आज आमच्यापाशी नाही. ’आता नाही करावंसं वाटत’ असं म्हणून मुकाटपणे हा अंक बंद करता आला असताच. खंतावलेल्या सुरात हे सगळं सांगायची तरी काय गरज होती, हा प्रश्नही पडू शकेल कुणाला. पण ज्या उत्साहानं मराठी ब्लॉगांवरचं भरभरून लिहिणं तुमच्याशी वाटून घेतलं, त्याच चोखपणानं ही सवंगाईही दाखवली पाहिजे, असं वाटत राहिलं. केवळ म्हणून हा खटाटोप.

कदाचित आम्हांला वाटते आहे, तेवढी परिस्थिती वाईट नसेल. नसतील लोक लिहीत ब्लॉगवर, तर त्याने काहीही फरक पडणार नसेल. हे तात्कालिक असेल. कदाचित पुन्हा मराठी ब्लॉगवर सकस लिखाण होऊ लागेल. कदाचित आम्ही नेमक्या ठिकाणी पाहत नसू. कदाचित हे डायरीवजा माध्यम ललित लेखनाला तितकंसं मानवलं नसेल. कदाचित संस्थळांवर मिळणार्‍या विपुल प्रतिक्रिया इथे न मिळाल्यानं लेखक खट्टू झाले असतील... शक्यता अनेक. सगळ्याच कमीअधिक प्रमाणात महत्त्वाच्या. पण तूर्तास ’तोच तो’पणातला कंटाळा काही केल्या टळत नाही. 

या ब्लॉगविश्वात, तिथल्या लेखकांत आणि लिखाणात आम्ही गेली पाच वर्षं रमलो होतो. निर्मितिक्षम लोकांच्या सोबतीत भारावलो होतो. आम्ही ब्लॉग जगत होतो. ’रेषेवरची अक्षरे’मधून हा आनंद, उत्साह, भारावलेपण, सर्जन तुमच्याशी वाटून घेत होतो. यंदा त्याला काहीशी ओहोटी लागलेली असली, तरीही ब्लॉगवरच्या रिकाम्या जागांशी जुळलेल्या आठवणी ’रेषेवरच्या अक्षरे’च्या पीडीएफ फायलीत पुन्हा सापडतील. या अंकाच्या निमित्तानं तुम्हांला रेषेवरची अक्षरं पुन्हा आठवतील. जालावरच्या मुशाफिरीत आपल्याला सापडलेल्या या नव्या माध्यमाची अपूर्वाई, जादू आणि ताकदही तुम्हांला पुन्हा जाणवेल... अशी आशा बाळगत यंदाचा अंक सादर करतो आहोत. 

भेटत राहूच. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपादक
रेषेवरची अक्षरे
२०१२
Uncategorized

एका (सरकारी) पावसाळ्याचा जमाखर्च

पाहता पाहता एक वर्ष झालं. वर काही महिनेही उलटून गेले असतील.

तसं पाहिलं तर एक वर्ष हा फार मोठा कालावधी नाही. त्यातही माझ्यासारख्याच्या आयुष्यात तर एक वर्ष गेलं काय, किंवा शंभर वर्षं गेली काय, विशेष फरक काय पडणार? शरीर आणि मनावर ठसे उमटवण्यापलीकडे काळ विशेष काय करणार माझ्या आयुष्यात? मग हे लिहायचा अट्टाहास तरी कशाला? रिकाम्या मनाला रिझवण्यापलीकडे काय उपयोग आहे याचा? एका वर्षापूर्वी मी घर सोडून माझ्या पोटामागे जाताना एक पोस्ट लिहून गेलो होतो. त्या वेळी मनात जमा झालेलं सारं ओकून टाकायचं एवढाच लिहायचा उद्देश होता. आत्ताचाही उद्देश काही फार निराळा नाही. हे एका अर्थी स्वगत आहे, एका अर्थी प्रकट आहे.

बाकी स्वत:बद्दल लिहायचं (आणि स्वत:बद्दल लिहीतच राहायचं) ही काही फार चांगली गोष्ट नाही, पण दुसरं भांडवल आहे काय माझ्यापाशी? जी.एं. नी कुठेतरी लिहिलंय की, लिहिणा-याचं आयुष्य त्याच्या लेखनात शोषलं जातं. मी काही लेखक नाही, पण एकंदरीत आपल्याच आयुष्याकडे पाहत राहायचं, आपल्याच मनाचे टवके आपणच उडवत राहायचे असा हा सारा खेळ आहे. कागदावर किंवा स्क्रीनवर मांडलेले हे तुकडे कोणीतरी पाहतं इतकंच, पण त्याने तरी असा काय फरक पडतो? लिहून ते दुस-याने पाहावं अशी अपेक्षा एकदा ठेवली की ते लिहिलेलं परकं होऊन जातं. मग कोणी भलं-बुरं म्हणावं अशी अपेक्षाही अपराधी वाटायला लावते. मग हे ठेवावं का आपल्यासाठी? का अजून काही अनुभव दूर करून टाकावेत आपल्यापासून? जाऊ दे. जसा हात आणि डोकं चालत राहील, तसं त्यामागे जात राहावं झालं. बाकीचे विचार आत्ताच कशाला? (बाकी लिहिणं हा स्वान्तसुखाय असा उद्योग आहे आणि म्हटलं तर काहीसा आधारदेखील, यात शंका नाही. निदान वेळ तरी बरा जातो. तर सांगायचा मुद्दा असा की, जे काही आत्ता लिहिलं जाणार आहे, ते अत्यंत विस्कळीत, असंस्कारित, कंटाळवाणं, अघळपघळ आणि पाल्हाळीक असणार आहे. त्यात प्रथमपुरुषी एकवचनी अव्यय अनेकदा येणार आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे.)

या एका वर्षानं काय काय दिलं? घर सोडून जाताना ओले झालेले डोळे त्यानंतरही दोन-तीन वेळा परत भिजले. पण आठवणी म्हटल्यावर पहिल्यांदा हेच का आठवावं? चांगल्या आठवणींचेही कितीतरी तुकडे झोळीत आहेत की. हिमालयापासून समुद्रापर्यंत केलेला वीस हजार मैलांचा प्रवासही गाठीशी आहे. थंड रात्री जमलेल्या मैफली, रात्र-रात्र जागून केलेले रिपोर्ट आणि प्रेझेंटेशनं, पकडलेले साप-विंचू-ससे-बेडूक-खेकडे, विंचू चावून सुजलेले हात, डीहायड्रेशनमुळे गलितगात्र होणं, त्यावर केलेले अर्वाच्य विनोद, वेळी-अवेळी रंगात आलेल्या क्रिकेट म्याचेस, त्यात शेकून निघालेले गुडघे किंवा जबडे - हेपण आहे की गाठोड्यात. लिहावं का याविषयी? का जपून ठेवायच्या या आठवणी? सहा महिन्यांच्या सततच्या प्रवासानंतर निरोप घेताना लहान मुलासारखे झालेले माझे मित्र... सांगावं का हे? मागे काही बांधून ठेवायचं झालं तर, या आठवणीच आहेत माझ्याकडे. बाकीच्या जगाच्या दृष्टीने मी जरी 'सेटल' झालेलो असलो, तरी ज्यांना माझं स्वत:चं म्हणता येईल अशा या आठवणीच आहेत जमलेल्या. बाकी साचलेला पैसा माझा नाही (असा आहेच किती?), की बाकी निरर्थक वस्तूंचा गाळपण माझा नाही. आणि वर्षापूर्वी पडलेला प्रश्न आत्ताही अनेकदा मजपुढे येऊन उभा राहतो, की ज्या गोष्टी माझ्या नाहीत, त्या जमा करणं आणि सतत करत राहणं हेच आयुष्य आहे का? जोवर मी का जगतो आहे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, तोवर मी स्थिरावलो आहे हे म्हणण्याला तरी काय अर्थ? वर्षभरापूर्वी काढलेली प्रश्नचिन्हं एका वर्षानंतर अजूनच मोठी झालीयेत. अजूनही थोरोचं पुस्तक वाचलं की अनेक प्रश्न भोवती गोळा होतात आणि मान खाली जाते आपोआप. आपलं घर, आपला पैसा, आपल्या वस्तू आणि आपण जगतो ते आयुष्य हे सारं किती वरवरचं आहे याची जाणीव त्रास देऊ लागते. आपण 'चलती चाकी'मध्ये आहोत आणि हळूहळू भरडून निघत आहोत हे पाहून निर्विकारपणे खांदे उडवायची लाज वाटायला लागते. महिना काही हजार रुपये मिळतात म्हणून आपण काय-काय करतो! चार लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून आपण आपल्यावर किती झाकणं घालून घेतो... शेवटी हा सारा खेळ कोणासाठी आहे? माझ्या हळूहळू बोथट होणा-या जाणिवा ही मी काही हजार रुपयांसाठी दिलेली किंमत आहे?

ही नोकरी करतो म्हणजे मी देशाची सेवा करतो असा भ्रम मला सुदैवाने झालेला नाही. नकाशावर काढलेल्या अर्थहीन रेषाही आता खुज्या वाटू लागल्या आहेत. समजा एखाद्या धरणाची जागा मी सांगितली, तर नंतर होणा-या नाशाला मी जबाबदार ठरत नाही का? केवळ कामासाठी काम करताना करदात्यांचा पैसा वाया जातो, हे पाप कोणाच्या माथ्यावर? निरर्थक उपक्रम बनवणा-यांच्या, की हे काम निरर्थक आहे, हे माहीत असूनही त्यात पगारासाठी काम करणा-या माझ्या? एखाद्या खनिजाचा साठा शोधून काढला, तर नंतर होणारी उजाड जमीन कोणाकडे बोट दाखवणार? 'विकास' या गोंडस नावाखाली जेव्हा काही आदिवासी त्यांच्या जमिनीतून मुळासकट उपटले जातात, लाखो प्राणी बेघर होतात, तेव्हा कोणालाच अपराधी कसं वाटत नाही? मग केवळ दोन वेळचं अन्न-वस्त्र या एका गरजेपोटी मी या पापाचा भार वाहतो आहे का? काय उत्तर देणार? वर्षभरापूर्वी जर का मी गोंधळलेलो असेन, तर आत्ता हा गोंधळ अजूनच वाढलेला आहे. आणि सरकारी नोकरीचं व्यवच्छेदक लक्षण असणा-या कटकटी, वैफल्यं यांना तोंड देताना हेच मूलभूत प्रश्न मला त्रास द्यायला लागलेले आहेत.

आपण किती खोटं आयुष्य जगत असतो? आपण आपल्या गरजा किती वाढवत असतो? तेही मला अमुक इतका पगार आहे आणि मी तो असा खर्च करतो हे दाखवण्यासाठी? "अरे, अशा गाड्या मायलेजसाठी घ्यायच्या नसतात!" अशी वाक्यं मला तरी आता विकृत वाटतात. लॅपटॉप झाला, आता आयपॅड. ब्लॅकबेरी टाका, आयफोन घ्या, कारण तो घेण्याची तुमची परिस्थिती आहे हे जगाला दिसलं पाहिजे. पैसा हा होडी चालेल इतपतच असावा ही पैशाची जी किंमत कबीराने सांगितली आहे, ती या एका वर्षात पैसे मिळवल्यानंतर पूर्णपणे पटली, ही या वर्षाची जमेची बाजू.

या एका वर्षात अजून एक मोठा फायदा हा झाला की, एकट्याने दिवस काढायची सवय झाली. घरापासून अडीच-तीन हजार किलोमीटर दूर राहायचं या जाणिवेनं पहिले काही दिवस परीक्षा पाहिली, पण नंतर सवय होत गेली. आता वाटतं की एकटेपणासारखा दुसरा सोबती नाही. ब-याच आधीपासून जडलेला हा एकटेपणा असा अचानक सोबतीला आला. गोनीदांची एक कविता आहे -
'आलो येथवर पावला पाऊली
वरती वडाची शीतल साउली...
सावळी सावली देखिली रेखिली
गाईन म्हणतो एखादे गाणे
कधी काळीचे एकटवाणे... 
नका होऊ गोळा, एकला असू... 
क्षणिक स्मृतींनी मुसमुसू...
माझ्यावरती मजला रुसू द्या
छ्पराखालती मजला बसू द्या...'
अशा जातीचं एकटेपण, 'आपुलाचि वाद आपणांसी' यांत किती सुख आहे! गाणं, पुस्तकं यांतल्या ज्या गोष्टी भोवती सदा गलबला असताना लक्षात येत नाहीत, त्या एकटेपणी लक्षात येतात. जर भोवतालचा गलबला फारच वाढला, तर कासवासारखं स्वत:ला बंद करता येतं ही या नोकरीची देणगी. 'हम सब माही, सब हम माही, हम है बहुरी अकेला' हे म्हणणारा कबीर यापूर्वी कधी एवढा आपलासा वाटला नव्हता. आयुष्याच्या अखेरीस जेव्हा सारी आतड्याची माणसं पुढे जातील, तेव्हाचा निष्प्रेम, निर्भेळ एकटेपणा समोर आल्यावर काय होईल ते माहीत नाही, पण आत्ताचा एकलकोंडेपणा तरी सोबत्यासारखा वाटतो आहे हे खरं. 

असो. अजून बरंच काय-काय मनात आहे, पण फार भरकट-भरकट होण्यातही अर्थ नाही. हात राखून लिहितानाही एवढा फाफटपसारा झाला. आवरतं घ्यावं हे बरं. परत एकदा अर्धविराम.

- अश्विन

http://ashwin3009.blogspot.in/2011/11/blog-post_10.html
Uncategorized

आवंढा

मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले, तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पाठीला घामाने शर्ट चिकटलेला असला आणि उन्हाने चेहरा रापला असला, तरी मला आतून गार-गार वाटत होतं. इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा संपली होती आणि चांगली गेली होती.

सराईतपणे उघड्या फाटकातून सायकल सर्रकन आत नेली आणि तसाच मागच्या मागे उतरून अलगद भिंतीला जाऊन टेकू दिली. धडधडत व्हरांड्यात जाऊन आईला हाक मारणार तोच भानावर आलो आणि मग आवाज न करता हलक्या पावलांनी घरात शिरलो. घरात शांतता होती आणि आतल्या अंधाराला डोळे सरावायला थोडा वेळ लागला. हळूहळू दबक्या पावलांनी पुढच्या खोलीतून मधल्या खोलीत गेलो. आई अपेक्षेप्रमाणे जराशी पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. तिची झोपमोड न होऊ देता तिथून स्वयंपाकघरात आणि तिथून मागच्या दारात आलो. दाराशेजारच्या नळावर बसलेल्या दोन चिमण्या माझ्या चाहुलीने भुर्रकन उडाल्या आणि पारिजातकावर जाऊन बसल्या. धुण्याच्या दगडावर पोट टेकवून पहुडलेल्या मांजरीने एक डोळा उघडून पाहिलं आणि कुंपणाच्या भिंतीवर बसलेला कावळा उडून गेला. कडुनिंबाखाली टाकलेल्या झोपाळ्यावर बसलेल्या चिमी-ठमीला मात्र काहीच पत्ता लागला नाही. वेण्यांचे लांब-जाड शेपटे पाठीवरून मागे टाकून दोघी हळुवारपणे झोके घेत पुस्तकांच्या आडून खुसपुसत होत्या. काय एवढ्या गप्पा रंगल्या होत्या कोण जाणे!

पाय न वाजवता थोडासा झुकून पुढे गेलो आणि बैलांच्या वेसणी धराव्यात तशा त्यांच्या वेण्या दोन हातात दोन धरून खेचल्या.

"आऊच... आई गं," दोघी नाजूकपणे कळवळल्या आणि मी वेण्या सोडून हसत उभा राहिलो.

"दादिटल्या खादिटल्या," चिमी ओरडली आणि पुस्तक घेऊन मारायला मागं आली. झोपाळ्याभोवती दोन-तीनदा तिला हुलकावण्या दिल्यावर रागाने फुसफुसत पुन्हा झोपाळ्यावर धपकन बसली.

"जा चिमे, मला जेवायला वाढ." मी म्हणालो.

"अडलंय माझं खेटर. स्वतःच्या हाताने वाढून घेता येत नाही का?" चिमी नाक उडवत म्हणाली.

"जा, नाहीतर मी आईला उठवीन हां."

दोन सेकंद माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघून चिमी उठली. "चल गं ठमे", असं म्हणून दाणदाण पाय आपटत आत गेली. ठमी गेली नाही. खाली बघत मंद हसत हातातल्या मिटलेल्या पुस्तकावर बोट फिरवत बसली.

मी कडुनिंबाला टेकून उभा राहिलो. तिच्या सावळ्या गोल चेहर्‍याकडे, खाली झुकलेल्या लांब लांब पापण्यांकडे आणि आता खांद्यावरून पुढे घेतलेल्या वेणीकडे पाहत राहिलो.

"बन्या म्हणाला, तुला बघायला येताहेत उद्या?" मी विचारलं.

तिने पापण्या उचलून वर पाहिलं. मी नजर चुकवून जांभळीच्या पानांमध्ये मोहोर शोधू लागलो.

"हो, येताहेत ना. श्रीरामपूरचे लोक आहेत."

मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खाली बघून मंद हसत पुस्तकावर बोट फिरवत होती.

"मोठी तालेवार पार्टी आहे म्हणे?" मी मिश्कीलपणे म्हणालो.

"हो, आहेच्च मुळी." तिने तिरप्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिचं हसू आता रुंदावलं होतं, " ट्रान्सपोर्टचा बिझिनेस आहे. पंचवीस ट्रक आहेत म्हणे."

का कोण जाणे, पण मला कशाचातरी खूप राग आला. मी नजर पुन्हा जांभळीच्या पानांमध्ये खुपसली.

"असेना का. आम्हांला काय फरक पडतो?" तिच्याकडे न पाहताच मी म्हणालो, "आम्ही काय, तुझ्या लग्नात जेवणावर उभा-आडवा हात मारणार आणि तुझा नवरा तुला ट्रकमध्ये घालून न्यायला लागला की खाली उभं राहून तुला टाटा करणार. अर्थात तू आम्हांला लग्नाला बोलावलंस तर... बोलावणार ना?"

काही उत्तर आलं नाही, म्हणून मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. तिची नजर खालीच झुकलेली राहिली. चेहर्‍यावरचं हसू मात्र मावळलं होतं. मला बरं वाटलं.

पुस्तक सोडून आता ओढणीशी वेगाने चाळा करणार्‍या तिच्या नाजूक, लांब बोटांकडे पाहून मी आणखी चेव आल्यागत म्हणालो, "ठमेऽऽ, काय म्हणतोय मी? बोलावणार ना लग्नाला?"

तिने झटकन वर पाहिलं. इतका वेळ हसणार्‍या तिच्या टपोर्‍या काळ्या डोळ्यांमध्ये पाणी डबडबलं होतं आणि डोळ्यांच्या गुलाबी कडा लालसर होऊन पापण्या भिजल्या होत्या.

"ठमे..." मी चरकलो.

ती तटकन उठून उभी राहिली आणि माझ्याकडे न पाहता, काहीही न बोलता तरातरा चालू लागली.

"ठमे... मेहरुन्निसा..." माझ्या घशातून अस्पष्ट शब्द उमटले.

मला मोठ्यानं हाक मारून तिला थांबवायचं होतं, पण घशात इतका मोठा आवंढा आला की डोळ्यातून पाणीच आलं. 

- निरंजन नगरकर

http://alavavarachepani.blogspot.in/2011/12/blog-post.html
Uncategorized

मी लेखक असते…

मी लेखक असते तेव्हा,
नाकारत असते मी भाग होणं, कोणत्याही समूहाचा वगैरे...
रचनेच्या नावाखाली नियमांत बांधून, आत्मा मारून टाकलेल्या प्राणिमात्रांपेक्षा,
माझ्या कल्पनेतले स्वैर, मुक्त आणि उत्फुल्ल जीव,
खुणावत असतात मला...

मी लेखक असते तेव्हा,
मला गरज नसते ईश्वराच्या कृपेची वगैरे...
कारण मी स्वतःच ईश्वर असते मी निर्माण केलेल्या जगाची.
त्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी सरस निर्मिती करून,
मी स्वतःला कधीच सिद्ध केलेलं असतं माझ्या नजरेत...

मी लेखक असते तेव्हा,
मला भासत नाही उणीव कोणत्याच नात्यांची वगैरे...
या जगातल्या आपमतलबी आणि फायद्या-तोट्यांची गणितं मांडणार्‍या नात्यांपेक्षा,
माझ्या लेखणीतून फुलणारी,
कितीतरी सुंदर, निखळ आणि नितळ नाती जगत असते मी,
प्रत्येक क्षणी प्रत्येक रूपात...

पण मी लेखक नसते तेव्हा,
कोसळत जातात माझ्यावर या जगात व्यतीत केलेले क्षण.
कोसळत जाते मग मीच स्वतःमधून...
गुडघे टेकून हताशपणे,
गदगदत राहते एका आशेची वाट बघत...
ईश्वराला मीच नाकारलेलं असतं,
त्यामुळे बंद असते वाट त्याच्याकडे जायची.
बाहेरचं जग आणि नाती आता भुलवू शकत नाहीत मला.
त्यांच्याकडे जाणं शक्य असूनही पाठ फिरवते मी तिकडे,
आणि मी निर्माण केलेल्या जगात आता मलाच प्रवेश नसतो...
मी लेखक नसते तेव्हा...

- मेरा कुछ सामान...

merakuchhsaman.blogspot.in/2011/12/blog-post_24.html
Uncategorized

शनिवार पेठ

पुण्याबाहेरून येऊन पुण्यात घर शोधण्याची वाईट वेळ अनेकांवर दैवदुर्विलासाने येते. त्यांतलेच आम्ही एक. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनक्रमणासाठी पुण्यनगरीत येणे क्रमप्राप्त होते! तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर राहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी तात्पुरता सोडवला असला, तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात राहायचे होते (ज्याचे त्याचे नशीब असते, दुसरे काय!). मलाही ज्ञानप्रबोधिनीच्या जवळपास राहायचे होते, पण ’सदाशिव-पेठ’वाले काही पाड लागू देत नव्हते. घर शोधणे हे आमचे प्रथम कर्तव्य बनले होते. ’सकाळ’मधल्या छोट्या जाहिराती धुंडाळणे, ब-या वाटतील तेवढ्या जाहिराती मार्क करणे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष जागा पाहायला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला. बरेच दिवस मनासारखी जागा मिळत नव्हती. एके दिवशी राव्हल्या एक जाहिरात नाचवत आमच्याकडे आला. एरव्ही घर पाहायला जायचं म्हटलं की अजगरासारखा पडून राहणारा राव्हल्या एवढा इंटरेस्ट घेतोय म्हणजे जागा चांगलीच असणार असं मला वाटलं. 

’पे. कालीन वाड्यात हवेशीर ३०० चौ फुटांची प्रशस्त जागा. वीज, पंखा, गरमपाणी यांची उत्तम सोय. फक्त सुशिक्षित व चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी. शनवार मारुती जवळ शनि. फक्त सं ५ ते ७. नोकरदार, एजंट व वेळ न पाळणा-यांचा अपमान केला जाईल.’

जाहिरात पाहून जरासा चमकलोच. ३०० चौरस फूट आणि प्रशस्त? ’पे. कालीन’ म्हणजे पेशवेकालीन. म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. वीज, पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करून दिल्यामुळे वाडा-मालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. ’सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी’? अक्षरओळख होईस्तोवर पहिल्या एक-दोन इयत्ता जातात. त्या पहिल्या एक-दोन इयत्तांचे विद्यार्थी सोडले, तर विद्यार्थी कधी अशिक्षित असतो का असा प्रश्न कोणालाही पडेल. पुढे जाहिरातीत लिहिलं होतं, ’फक्त चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी...’

समजा ही जाहिरात एखाद्या लौकिकार्थाने वाईट घरातील मुलानं वाचली, तर तो म्हणणार आहे का, ’नको बा, आपण कशाला? फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायचं तिकडे?’ अशी जाहिरातीची खिल्ली उडवत उडवत मी सगळ्यांसमोर जाहिरातीचं जाहीर वाचन केलं. सगळे फिसकारून हसत होते. राहुल म्हणाला, "फक्त शनिवारी जा, बरं का. नाहीतर अपमान करेल घरमालक." जाहिरातीतला शेवटचा शनी वाराचा नसून पेठेचा आहे हे मी जाहिरात वाचण्यात कमी अनुभवी असलेल्या राहुलला समजावलं. "सदा, शनी, भवानी, रास्ता, नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म्स वापरतात इकडे." राहुलनं अज्ञान दाखवत विचारलं, "निगो पेठ? आयला ही कोणती पेठ आहे?" मी त्याला सांगितलं, "अरे गाढवा, निगो म्हणजे पेठ नाय काय. निगोशिएबल." शब्दमर्यादा वाढूनही शेवटचं वाक्य छापायला दिलंय, म्हणजे घरमालक एकतर शेट माणूस असायला हवा किंवा पूर्वानुभवातून बरीच पीडा सहन करून कावलेला तरी असावा असा निष्कर्ष आम्ही काढला. घरमालक कसा असेल ही उत्सुकता जाहिरातीवरून चाळवल्यानं उद्याच दिलेल्या वेळेत मालकभेटीसाठी जायचं ठरलं.

मी आणि राहुल तयारच होतो. सागर आला की आम्ही वाडामालकांना (वा.मां.ना) भेटायला जाणार होतो. साडेचारला सागर आला. इतर कोणी जायच्या आत बरोबर ५ वाजता टपकून घर पाहून घ्यावे असा विचार मनात होता. त्याप्रमाणे लगेचच आम्ही घर शोधायला निघालो. शनवार मारुती लगेचच सापडला. पण यांचा ’पे. कालीन’ वाडा काही केल्या सापडेना. घरमालकानं फोन नंबरही दिला नव्हता. मग काय, पुण्यात पत्ता विचारण्याचं जोखमीचं काम आमच्यावर ओढवलं. पुण्यात पत्ता विचारला की विचारणारा आपोआपच केविलवाणा व बिचारा होतो. पत्ता ज्याला विचारला जातो तो प्रस्थापित बनतो व ’हे कोण परप्रांतीय इथे आलेत’ या अविर्भावात आपल्याकडे पाहतो. अगदी कोथरूडला राहणा-या माणासानं पेठेत जाऊन पत्ता विचारला, तरी तो पुणेकरांच्या दृष्टीने पुण्याचा असूनही पुण्याबाहेरचा ठरतो. पत्ता सांगणारे कधी उत्तर न देता, तर कधी मुद्दाम चुकीचं उत्तर देऊन निघून जातात. अशाच एका महाभागाने मला लकडीपुलावर दुचाकी चालवायला लावून १०० रुपयांचा चुना लावला होता. लकडी पुलासमोरून जाताना आजही तो कटू प्रसंग आठवतो.

पत्ता सांगण्याचा असाच एक सत्य प्रसंग आठवला. मी एकदा पीएमटीनं डेक्कनहून वनाज कॉर्नरला निघालो होतो. बसमध्ये बरीच गर्दी असल्यानं व कंडक्टरला विचारणं शक्य नसल्यानं मी ’वनाज कॉर्नरचा स्टॉप माहीत आहे का?’ असं शेजारी बसलेल्या एका वृद्ध गृहस्थांना विचारलं. ’काही कल्पना नाही बुवा,’ असं म्हणून म्हातारबुवा खिडकीबाहेर पाहायला लागले. थोड्या वेळानं मी इतर दोन-तीन लोकांना विचारून स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉपवर उतरल्यावर पाहतो तर काय, हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉपवर उतरले. माझं डोकं गरम झालं. मनात विचार आला, वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील, पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी जाऊन त्या गृहस्थांना जाब विचारला, "का हो, वनाज माहीत नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात?" ते गृहस्थ क्षणभर वरमले, पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, "अच्छा, तुम्ही वनाज म्हणालात का? मला नीट ऐकू आलं नसावं. अरेच्चा, माझा मुलगा बोलावतोय वाटतं!" असं म्हणून नीटसं ऐकू येत नसतानाही न मारलेली हाक ऐकून म्हातारबुवांनी पिशव्या बखोटीला मारून रस्ता क्रॉस करून पळ काढलासुद्धा!

पुण्यातल्या पत्ता सांगण्याच्या अशा अनुभवांना व एसटीडीवरच्या ’पत्ता विचारण्याचे पैसे पडतील’ अशा स्वरूपाच्या पाट्यांना मी फारशी भीक घालत नसे. वयोवृद्ध लोक शक्यतो टाळून कोणा तरुणाला पत्ता विचारता येईल का म्हणून मी इकडे तिकडे पाहत होतो. शेवटी मनाचा हिय्या करून एका जवळच्या दुकानात शिरलो. 

"का हो, इथे शनवार मारुतीजवळच्या कुठल्या वाड्यात भाड्यानी जागा देतात का?" असा प्रश्न त्यांना विचारला. 

दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "काय हो? सुशिक्षित आहात ना?" 

एखादी पाटी वाचायची राहिली की काय असा विचार मनात चमकून गेला. मी पाट्या शोधू लागलो. ते पाहून गृहस्थ म्हणाले, "शनवार मारुतीजवळ शेकडो वाडे आहेत. तुम्हांला कुठला हवाय? नाव काय आहे मालकांचं?" 

मी म्हटलं, "काही कल्पना नाही. ’सकाळ’ला जाहिरात आहे." 

गृहस्थ म्हणाले," अहो, मग त्यांनाच फोन करून का नाही विचारत?" 

मी म्हटलं, "अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत." 

त्यावर ते दुकानदार बडबडले, "च्यायला, ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्यासारख्यांच्या मागे ताप लावतात. बघू जाहिरात." व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागदपत्रं देऊ त्या तत्परतेनं आणि अदबीनं मी जाहिरातीचा पेपर त्यांच्याकडे दिला आणि आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. 

"ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ’ब. जोशी’ एवढंसुद्धा टाकणार नाही हा *&%$##*!" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. "हे इथंच पलीकडे आहे, डावीकडे वळा," असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. 

दुकानदारानं सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालो, पण ते ’हे इथंच पलीकडे’ न सापडल्यानं परत त्या दुकानात आलो. सांगूनसुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं! हे म्हणजे घोर पातकच, अशा नजरेनं त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ’काका, एक वेळ मुस्काटात मारा, पण ते तसल्या नजरेनं पाहू नका’ असं सांगावं वाटलं. दुकानदार वैतागून बोलले, "अहो, काय तुम्ही! इथेच पलीकडे जो जुन्या संडासासारखा दरवाजा दिसतोय, तो जोश्यांच्या वाड्याचा दरवाजा." दुकानदारानं जरी संडासाचं दार म्हणून अवहेलना केलेली असली, तरी जोश्यांच्या वाड्याचं द्वार म्हणजे जणू स्वर्गाचं दार असल्यागत आमच्या चेह-यावर हसू पसरले व समाधानाने आम्ही तिकडे निघालो.

दारावरची लोखंडी कडी वाजवणार इतक्यात राव्हल्याने माझा हात धरला व म्हणाला, "अबे, वेडाबिडा झाला की काय?". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली की काय असं वाटलं. 

मी राहुलला विचारलं, "काय झालं?" 

त्यावर तो म्हणाला, "अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोश्या उगाच अपमान करायचा." 

"ठीक आहे," म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पाहत आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत आहोत हे वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं, आता ती व्यक्ती येवून दार उघडेल. पण कसचं काय! काहीच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे होऊन दरवाज्यावर ठकठक केली. ’ठकठक’मधला दुसरा ’ठक’ वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला. तुम्ही पेठेत आहात याची जाणीव करून देणा-या स्वरात त्यानं विचारलं, "काय हवंय?" 

घरमालक आतल्या बाजूनं बहुदा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो पहिल्यांदा घाबरून मागे सरला. नंतर सावरून म्हणाला, "रूम हवी आहे." 

मालकांनी म्हटलं, "नाव काय तुमचं?" 

राव्हल्याने लगेच "राहुल" असं उत्तर दिलं. 

"राहुल काय? द्रविड की गांधी?" म्हाता-याला आडनाव अपेक्षित असावं, म्हणून मी राहुल जोशी असं त्याचं पूर्ण नाव सांगून टाकलं. 

ते ऐकून मालक वदले, "रूम वगैरे काही नाही. आमच्याकडे एक प्रशस्त जागा आहे भाड्यानी देण्यासाठी." काही तरी गफलत होत असावी, म्हणून मी जाहिरातीचा पेपर पुढे केला. 

मालक म्हणाले, "हो, आमचीच जाहिरात आहे ती." 

मालक दरवाजा न उघडता खिडकीतून आमच्याकडे पाहत बोलत होते व खिडकीच्या खाली आम्ही असा हा इंटर्व्ह्यू सुरू होता. टाचा उंचावून आम्हांला न्याहाळत वा.मा. म्हणाले, "कु्ठून आलात?" 

"एबीसी चौकातून." राहुल्या वदला.

वा.मा.: "एबीसी? ते काय?" 

मी: "अप्पा बळवंत चौक म्हणायचं असेल त्याला."

वा.मा.: "अरे, कुठून आलात म्हणजे पुण्यात कुठून आलात?" 

मी: "काका, आम्ही औरंगाबादहून आलो आहोत."

वा.मा.: "अच्छा. कशाला?" 

मी ’नोकरी’ असं म्हणालो असतो, तर वा.मा.नी दरवाजा उघडला नसता. म्हणून मी ’पुढील शिक्षणासाठी’ असं सांगितलं.

वा.मां.नी ’ठीक आहे’ एवढंच म्हणून आमच्याकडे पाहिलं. काहीही न बोलता दरवाजा उघडला व ’कुणीही दोघांनी आत या’ असं फर्मान सोडलं. च्यामारी! आम्ही तिघे आलेलो असताना फक्त दोघांनी आत या म्हणणं म्हणजे कहर होता. तरीपण सागरनं समजूतदारपणा दाखवला व तो बाहेर थांबला. मी आणि राहुल आत गेलो. बळवंतराव जोशी यांची देहयष्टी त्यांच्या नावाला पूर्णपणे विसंगत व आडनावाला साजेशी होती. गोरेपान, कपाळी गंध, केस उडालेले, काका कसले - आजोबाच शोभावेत असे. खाली मळ खाऊन खाऊन स्वरंग-स्वजात विसरलेले धोतर, वर एखाद्या पारशीबुवाप्रमाणे अडकवलेली बंडी, त्यातून डोकावणारे कळकट जानवे, कानात भिकबाळीसारखे काहीतरी घातलेले. थंडीचे दिवस नसतानाही पायात लाल रंगाचे सॉक्स चढवले होते. ही वेषभूषा पाहून आपण पेठेत आलो आहोत याची खात्री पटली.

दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. त्याच चौकोनात एका कोप-यात एक जिना होता. वाड्याच्या वरच्या मजल्यावर २-३ खोल्या होत्या. त्यातलीच एखादी आम्हांला दाखवतील असे वाटले. वा.मा. दिवाणखाण्यात गेले, त्यांच्या मागोमाग आम्हीही निघालो. आम्ही मागेच येत असल्याचे पाहून वा.मा. मागे वळाले व ताडकन म्हणाले, "वहाणा काढून पाय धुऊनच वर या. मी वाड्यातच आहे. तुम्ही बाहेरून आलात. तेव्हा पाय हे धुतलेच पाहिजेत." चौकात एका घंगाळात पाणी भरून ठेवलं होतं. तिथे जाऊन आम्ही चपला काढून पाय धुतले व दिवणखाण्यात प्रवेशकर्ते झालो. 

"हा आमचा वाडा." वा.मां.नी सांगायला सुरुवात केली. दिवाणखाणा अगदी पेशवाई थाटातला होता. वर झुंबर, केळकर संग्रहालयात शोभला असता असा गालिचा. दिवाणखानाभर मांडून ठेवलेल्या वाड्यावर आजवर राज्य करणा-यांच्या तसबिरी, कोणाकोणाच्या पुणेरी पगड्या, भिकबाळ्या. एक जुनाट टीव्ही कोप-यात पडला होता.

वा.मां.नी त्यांच्या व बहुतांश ज्येष्ठांच्या आवडीचा ’ओळखी काढा’ हा खेळ सुरू केला. मग आडनावे विचारणे, नातेवाइकांची आडनावे विचारणे, कोण नातेवाईक कुठे आहेत याची प्राथमिक चौकशी करणे झाले. कुठूनच ओळख लागत नसल्याचं पाहून वा.मा. थोडे खट्टू झाले. त्यांनी मग स्वकुळाची बख्तरे आमच्यासमोर उलगडायला सुरुवात केली. दिवाणखान्यातील एकेका तसबिरीवर वा.मां.नी भाष्य करायला घेतलं. संक्षेप वगैरे संकल्पनांना फाटा देत, बळवंतराव, एकनाथराव, विष्णुपंत, हरीपंत, भिकाजीपंत अशी त्यांची वंशावली आम्हांला ऐकवली. त्यानंतर त्यांनी वाड्याचा इतिहास, वाडा बांधणारे पंत, त्यांचे पेशवेदरबारातले वजन व कर्तबगारी कथन केली. हे वर्णन ऐकून आम्ही पेशवेदरबारात विराजमान आहोत असा क्षणभर भास झाला. ही अगाध माहिती ऐकून झाल्यावर राहण्याच्या जागेसंबंधी जाणून घेण्यासाठी आमची चुळबुळ सुरू झाली. आम्ही काकुळतीला येऊन म्हणालो, "थोडं राहण्याच्या जागेविषयी सांगता का?"

वा.मा.: "हो, सांगतो की. माझ्याकडे सगळं नियमांनुसार होतं. इथे राहणा-याला नियमांचं पालन हे अत्यावश्यक आहे. अन्यथा गच्छंती अटळ आहे. सर्व नियम तुम्हांला समजावून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचं सर्वात आधी. तर सांगा. आपण घर भाड्यानी कशासाठी देतो?"

मी: "सोबत व्हावी, जागा वापरात राहावी, वगैरे वगैरे."

वा.मा.: "सोबत वगैरे ते ठीक आहे हो, पण मुख्य कारण म्हणजे घरभाडं. त्यासाठी आम्ही घर भाड्यानी देतो. तेव्हा तिथे कुचराई मान्य नाही. नियम क्रमांक १. महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे इथे सदरेवर आणून दिले पाहिजेत."

मी: "हो, चालेल ना. काही अडचण नाही."

वा.मा.: "अहो, बाकी नियम पुढे आहेत. ते सर्व ऐका आणि मग काय ते ठरवा."

मी: "ठीक आहे. सांगा."

वा.मा.: "हां, तर मग भाड्यानंतर येते ती वाड्याची शिस्त. वाड्याची शुचिर्भूतता कायम राहील असे वर्तन ठेवावे लागेल."

राहुल: (वाड्यावर नजर फिरवत) "हो , राहील ना. शुचिर... चिर... शुचिरब्रूता कायम राहील ना." शुचिर्भूतता उच्चारताना होणारा राव्हल्याचा चेहरा पाहून मला हसू आवरेना. हा शब्द त्याला पहिल्यांदाच पुस्तकाबाहेर भेटला असावा. मनतल्या मनात मी मला उच्चार करता येतो का ते पाहून घेतलं.

वा.मा.: "नियम क्रमांक २. जाता येता दिंडीदरवाजा लोटून कडी लावून मगच आत येणे किंवा बाहेर जाणे." कडकट्ट कुजलेला व लाथ घातली तर कोसळेल अशा लाकडाचा तो सापळा म्हणजे दिंडीदरवाजा! हे जरा अतीच होत होतं. हा सापळा जर दिंडीदरवाजा असेल, तर खुद्द वा.मा.ही स्वत:ला राघोभरारी समजत असतील असा विचार मनात येऊन गेला.

वा.मा.: "हा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. इथल्या शेवटल्या भाडेकरूनी या नियमाचं पालन करण्यात कुचराई केली, म्हणून त्यांना हा वाडा सोडावा लागला. वेळोवेळी बजावूनही दरवाजा उघडा ठेवायचे व कहर म्हणजे वरून असत्य बोलायचे. दरवाजा आम्ही उघडा ठेवला नाही, म्हणून मलाच दटावून सांगायचे. पाहिले पाहिले आणि दिले एक दिवस घालवून."

मी: "बरोबर आहे. नियम तर पाळायलाच हवेत."

वा.मा.: "आता नियम क्रमांक ३. आमचेकडे पहिल्या प्रहरी सडासंमार्जन होते. त्यामुळे वाडा पवित्र होतो. त्यामुळे सडासंमार्जनानंतर झोपून राहणे नाही."


वर खोलीत झोपून राहिलेलं ह्यांना काय कळणार आहे असा विचार मी विचार मनातल्या मनात करत आहे हे ओळखूनच वा.मां.नी पुढचा नियम सांगितला. 

वा.मा.: "नियम क्रमांक ४. सकाळच्या आरतीला वाड्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी हजर राहायचे." नियम ऐकून मी जरा चपापलोच! "त्याचं काय आहे, हा नियम करावा लागला. अहो, व्हायचं काय, की आमची आरती सुरू असताना जुने भाडेकरू उठायचे आणि आळसावलेलं तोंड घेऊन दारात तोंड धुण्याकरिता उभे राहायचे. अजिबात चालायचं नाही ते. अपवित्र वाटतं."

मी: "अहो, ती मुलं वर राहायची ना? मग खाली कशाला येतील तोंड धुवायला?"

वा.मा.: "अहो, ते पुढच्या नियमात कळणारच आहे. गडबड कशाला करता?"

मी: "बरं."

वा.मा.: "हां, तुम्ही काढलाच आहात विषय, तर सांगतो. नियम क्रमांक ५. वर शौच व स्नानाची सोय नाही. वरच्या मुलांनी हे वापरायचे," असं म्हणून वा.मां.नी दोन कवाडांकडे बोट केले.

मी: "इथे? खाली?"

वा.मा.: "हो मग. त्यात काय? वाड्याचे ऐतिहासिक स्वरूप जपले जावे म्हणून आम्ही वर शौचालय बनवले नाही."

मी मनात म्हटलं, ’अहो, ऐतिहासिकच रूप जपायचे होते, तर हे तरी शौचालय कशास बांधले? जायचे होते नदीपात्रावार, रस्त्याच्या कडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार? गरजवंताला अक्कल नसते या उक्तीनुसार मी मुकाट्याने पुढचे नियम ऐकण्यास सज्ज झालो.

वा.मा.: "नियम क्रमांक ६. जिने चढताना धावत-पळत जिने चढायचे नाहीत. धावत गेल्याने जिन्यांचे आयुष्य कमी होते. पाय न वाजवता सावकाश जिने चढायचे, कितीही घाईत असाल तरीही."
हा नियम ऐकून एखाद्या रात्री हातोडी घेऊन त्या खिळखिळ्या जिवाला एकदाची शांती द्यावी असा विचार मनात येऊन गेला. हा विचार जिना व वा.मा. राघोबादादा पेशवे दोघांसाठीही येऊन गेला होता. पण इरिटेशन फेज संपून आता मला म्हातारा इंटरेस्टिंग वाटू लागला होता. श्रीमंतांनी पुढचे नियम सांगावेत म्हणून आतापर्यंतच्या नियमांना सहमती दर्शवणे भाग होते. मी मुद्दाम चेहरा आनंदी ठेवला होता. वाडा मस्त असल्याचे मी मधूनमधून श्रीमंतांना सांगत होतो.

वा.मा.: "नियम क्रमांक ७. कमीत कमी ८ महिने राहण्याचा लिखित करार करावा लागेल. करार मोडल्यास पुढील भाडेकरू येईपर्यंतचा जाहिरातखर्च व भाड्याची रक्कम देणे करार मोडणा-यास बंधनकारक रा्हील. त्याचं काय होतं, आहो, भाडं राहिलं एकीकडे. जाहिरात खर्चातच अर्धं भाडं निघून जातं. त्यात वर नुसत्याच ’माहिती घेऊन येतो-येतो’ म्हणणा-या उपटसुंभांमुळे वेळ दवडला जातो. रात्री-अपरात्री येणारे महाभागही काही कमी नाहीत. त्यामुळे भेटायची वेळ छापावी लागते. तो खर्च वाढतो. एवढे करूनही काही हरामखोर अपरात्रीच यायचे. तुम्ही त्यातले वाटत नाही म्हणूनच एवढी सखोल माहिती देतोय."

पेशवे आता आम्हांला त्यांच्या गटात ओढू पाहत होते. 

राहुल: "तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आम्ही कमीत कमी एक वर्ष तरी राहूच." 

वा.मां.नी राहुलकडे समाधानानं व मी रागानं पाहिलं. वा.मां.नी नियमावली चालूच ठेवली होती.

वा.मा.: "नियम क्रमांक ८. दिंडीदरवाजा रात्रौ ९नंतर बंद राहील. एकदा दरवाजा बंद झाला की बंद. गाडी पंक्चर झाली होती, रिक्षा मिळाली नाही, बस वेळेवर आली नाही, अशी कारणे चालणार नाहीत. पोचायला उशीर होत आहे असे लक्षात आले तर वाड्यापर्यंत येण्याचे कष्ट घेऊ नका. बाहेरच कुठे तरी सोय बघा व दुस-या दिवशी वाड्यावर या. नियम क्रमांक ९. रात्रौ ११नंतर दिवे घालवले पाहिजेत. दिवे न घालवल्यास वरच्या खोल्यांचा फ्यूज काढण्यात येईल. नियम क्रमांक १०. कोणत्याही प्रकारचे मद्यपान-धूम्रपान निषिद्ध. सिगारेटची थोटके लपवण्याचा प्रयत्न करू नये. मी सिगारेट पिणारा मनुष्य एक मैलावरून ओळखू शकतो."

वा.मा.समोर बसलेला राव्हल्या एका वेळी पाच बोटांत पाच सिगरेटी धरून ओढतो हे वा.मां.ना सांगितले असते तर वा.मा. झीट येऊन पडले असते. मैलभरावरून ओळखण्याची थाप आम्ही वा.मां.चे वय पाहता पचवून घेतली. वा.मा. आता थांबायला तयार नव्हते.

वा.मा.: "नियम क्रमांक ११. वाड्यावर मुलींना आणण्यास तीव्र मनाई आहे. मग ती सख्खी बहीण का असेना. मागे एक मुलगा होता. राहायचा एकटाच, पण इथे येणा-या गोपिका पाहून लोक आमच्या वाड्याची चारचौघांत नालस्ती करायला लागले. ’शनिवाराचा बुधवार केला’ म्हणू लागले. त्याला त्यावरून टोकलं, की ’बहीण आहे, आतेबहीण आहे, चुलतबहीण आहे, मावसबहीण आहे’ असे बहाणे करायचा. एका भल्या पहाटे त्याच्या दारावर थाप मारून तुझ्या पुण्यातल्या बहिणीचा फोन आला आहे असे सांगितले. झोपेत असल्याने "पुण्यात कोणी बहीण राहत नाही," असे गाफीलपणे म्हणाला. दिला त्याच दिवशी घालवून त्या नीच माणसाला. तेव्हा आताच सांगतो, मुलींना वाड्यात प्रवेश नाही."

या अटीमुळे सागरची थोडी पंचाईत होणार होती. पण काही तरी मॅनेज करता आले असते.

वा.मा.: "नियम क्रमांक १२. वाहने फक्त रात्री वाड्यात घेण्याची परवानगी आहे. सकाळी सडासंमार्जनाआधी वाहने बाहेर काढलीच पाहिजेत. दिवसा दुचाक्या बाहेरच राहतील. नियम क्रमांक १३. वाड्यात कसल्याही प्रकारचे अभक्ष्य बाहेरून आणून खायचे नाही. तसे काही आढळल्यास ते जप्त केले जाईल."

अभक्ष्य जप्त करून बळवंतबुवा त्यावर ताव मारणार की काय अशी शंका मनाला चाटून गेली.

वा.मा. पुढे वदले, "नियम क्रमांक १४. वाड्यात स्वयंपाकाचे प्रयत्न करायचे नाहीत. स्वयंपाक करायचा प्रयत्न केल्यास शेगडी व इतर साहित्य जप्त केले जाईल. नियम क्रमांक १५. वाड्याचे बाह्य सौंदर्य अबाधित राहावे यासाठी कसल्याही प्रकारची वस्त्रे वा अंतवस्त्रे राहत्या जागेच्या बाहेर वाळत घालू नयेत."

या नियमाचा भंग केल्यास वा.मा. जप्तीची धमकी देतात की काय असे वाटून गेले, पण त्यांच्या सुदैवानं ते तसं काही बोलले नाहीत. ’आमच्याकडे पाहुणे येतात व ते खूप वाईट दिसतं’ एवढंच सांगून त्यांनी नियमाचं महत्त्व विषद केलं.

वा.मा.: "नियम क्रमांक १६. मित्रांचा गोतावळा आणून चकाट्या पिटत बसायचे नाही. घरात दोनच्या वर व्यक्ती राहता कामा नयेत. मी अधूनमधून याची पडताळणी करत असतो. मागच्या वेळी अशीच पडताळणी केली, तेव्हा डझनभर जोडे व बाथरूममध्ये ५ टूथब्रश सापडले. मला फसवू पाहत होते लफंगे. दिले घालवून बोडकिच्यांना."

आम्हांला तिघांना राहायचे होते. सागरचा टूथब्रश पाहून वा.मा. आम्हांलाही एक दिवस हाकलणार असे वाटून गेले. पण पकडले न जाण्यासाठीचा उपाय वा.मा.च सुचवून गेले होते.

वा.मा.: "नियम क्रमांक १७. खाली आम्ही राहत असल्याने वरती जोरजोरात चालणे-आदळआपट-धांगडधिंगा चालणार नाही.
नियम क्रमांक १८. मोठ्या आवाजात टेप वगैरे लावल्यास फ्यूज काढला जाईल. रात्रभर अंधारात बसावे लागेल.
नियम क्रमांक १९. भाडेकरारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इथे राहणा-या प्रत्येक व्यक्तीच्या छायाचित्रांच्या २ प्रती पोलीस चौकीत देण्यासाठी लागतील. शिवाय पुण्यातील ओळखणा-या दोन व्यक्तींचे कायमस्वरूपी पत्ते, दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे.
नियम क्रमांक २०. कच-यासाठी घंटागाडी येते. घरात-खिडकीत कुठेही कचरा ठेवू नका. बुद्धीचा वापर करा.
नियम क्रमांक २१. कुलूप लावून बाहेर जाताना दिवे व पंखा बंद करून जाणे.
नियम क्रमांक २२. उन्हाळ्यात फ्रीजमध्ये पाण्याची बाटली ठेवण्याचा आग्रह करू नये.
नियम क्रमांक २३. पाच हजार रुपये डिपॉझीट म्हणून जमा करावे लागतील. जागा सोडताना काही नुकसान झालेले असल्यास त्याची भरपाई डिपॉझीटमधून वसूल केली जाईल.
नियम क्रमांक २४. शेजा-यांशी काही वाद-भांडण झाल्यास तुम्ही एकटे नाही हे ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व नियम शिरोधार्य मानत असाल, तरच तुम्हांस इथे प्रवेश दिला जाईल."

हा शेवटला अपवादात्मक नियम सांगून वा.मा. शमले. एवढे नियम सांगत बसण्यापेक्षा वा.मां.नी लिहून ते बाहेर लावावेत असं मला वाटत होतं. वा.मां.चं बोलणं ऐकून वाटलं, एवढे नियम लक्षात ठेवायचे असते, तर च्यायला, चांगला वकील झालो असतो. इंजिनिअर होऊन कशाला असे हाल सोसले असते? पेशव्यांनी आतापर्यंत आमच्यावर नियमांच्या चार राउंड्स - म्हणजे २४ गोळ्या -झाडल्या होत्या. आता तरी पेशव्यांची मॅगझीन रिकामी झाली असेल या विचाराने आम्ही आवराआवरीच्या हालचाली सुरू केल्या. 

मी पेशव्यांनाच विचारले, "नियम संपले असतील तर आम्ही येतो. आता उशीर होतोय."

वा.मा.: "ठीक आहे. पण शौचालयासंबंधी आणखी काही नियम आहेत. ते मी तुम्ही राहायला आल्यावर सांगीन."

शौचालयातपण नियम! आधी उजवा पाय ठेवा, मग डावा. कडी लावा, पाणी टाका, असले नियम वा.मा. सांगतात की काय, असे वाटायला लागले. जे काय असेल ते सगळे हलाहल आजच पचवून घ्यावे, म्हणून मी म्हणालो, "नको नको, जे काय असेल ते आताच सांगा."

वा.मा.: "नियम क्रमांक २५. रात्रीच्या वेळी वाड्यात शांतता असते. रात्री शौचालयाचा वापर करायचा झाल्यास तो उभ्याने करू नये."

हा नियम ऐकून मी उभ्याउभ्या उडालो! पेशव्यांची इच्छा काही उमजेना.

मी: "म्हणजे?"

वा.मा.: "स्पष्ट सांगायचे म्हणजे उभ्याने शौचालयाचा वापर केला असता रात्रीच्या शांततेत वाड्यात विचित्र आवाज होतो व घरात लेकी-सुना असल्याने ते चांगले वाटत नाही."

बळवंतरावांच्या वाड्यात निसर्गाच्या हाकेला मोकळ्या मनाने ओ देण्याची चोरी होती. तिथेपण नियम होते. अशा नियमांच्या दडपशाहीने वाड्यात राज्य करणा-या या पेशव्यास, गारदी बनून ठार मारण्यास मी त्याच्यामागे धावतो आहे व वा.मा. दिंडीदरवाजा उघडून धोतर सावरत बाहेर पळ काढत आहेत असे चित्र मनासमोर तरळून गेले.

एवढे सहज पाळण्याजोगे सामान्य नियम ऐकल्यावर, मी काय किंवा इतर कुणी बुद्धी जाया न झालेली व्यक्ती काय, इथे राहणार नाही हे स्वच्छ होते. पण एवढा वेळ घातला होता, तर असे मधेच उठून जाता येईना. मला हे असे नेहमी होते. जिथे गोष्ट पटत नाही, तिथून निघणे जरा अवघड होते. कपड्यांच्या दुकानात मनासारखे कपडे नाही मिळाले, तर सगळे कपडे पाहून काहीच न घेता त्या दुकानातून निघताना जरा अवघडल्यासारखेच होते, तसे मला होत होते.

’वाडा आम्हांला तर खूप आवडला आहे. आम्हांला लवकरात लवकर यायचे आहे’, असे असत्य वचन सांगून निघावे व पुढले काही महिने शनवाराचे नावही काढू नये अशा विचारात मी होतो. राव्हल्याचा निघण्याचा काही बेत दिसत नव्हता. पेशव्यांच्या वाड्यावर आतल्या खोलीत त्याला लाल-तांबडे काहीतरी फडफडताना दिसले. तिकडेच त्याचे लक्ष लागून राहिले होते. लाल-तांबड्याचीही राहुलशी नजरानजर झालेली दिसली. असले अघटित पेशवांच्या नजरेखाली चाललेले पाहून मलाच धस्स झाले. ह्या नियमांचे जोखड घेऊन इथे राहण्यासाठी राव्हल्या आम्हांला कनव्हिन्स करतो की काय, असे वाटून मी हवालदिल झालो. 

’आम्ही कळवतो नंतर’ असे म्हणून निघायच्या विचारात असताना राव्हल्याने "आम्ही राहायला येतोच आहोत, ऍडव्हान्स कधी देऊ?" असे विचारून बॉम्बच टाकला. तिथून निघून आम्ही रूमवर परतलो. राहुल आणि लाल-तांबड्याची काहीतरी ष्टोरी सुरू होणार असे दिसू लागले होते. राव्हल्या तिथे जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला होता. राव्हल्याचा मूड वेगळाच दिसत होता. माझा लाल-तांबडा किंवा कुठल्याही रंगाशी संबंध नसल्याने व अजून बुद्धिभेद झालेला नसल्याने शनिवारातल्या त्या घाशीराम कोतवालाच्या घरात राहा जाण्याचा माझा अजिबात मानस नव्हता. पुढचे काही दिवस राहुलबाबा कागदपत्रे जमवणे, करार तयार करणे, फोटो काढणे असल्या कामात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात त्याला ओळखणा-या (पक्षी ओळख दाखवण्या-या) दोन पुण्यात्म्यांच्या शोधात तो बरेच दिवस होता. शेवटी ज्यांच्याकडे तो इमाने-इतबारे वडे खात होता, त्या जोशी वडेवाल्यांनी ह्या राहुल जोश्याला जोशी वाडेवाल्यांकडे राहण्यासाठी मदत केली. राव्हल्याचा दुसरा पुण्यात्मा मलाच बनावे लागले होते. शेवटी एकदाचे त्याचे घोडे गंगेत न्हाले.

एके दुपारी निवांत बसलो असताना एका क्षणभरात आजवर झालेल्या सगळ्या गोष्टी भराभर माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. थोडा वेळ विचार केला आणि माझं मलाच हसू आलं. आता मला राव्हल्याच्या चेह-यावरचा ओसंडून वाहणारा आनंद, राव्हल्यानेच दाखवलेली जाहिरात, राव्हल्या आधीपासूनच तासनतास जिच्याशी गुलुगुलु बोलायचा ती व्यक्ती व जुन्या भाडेकरूंकडून सतत उघडा राहणारा दिंडीदरवाजा या सगळ्य़ा गोष्टींचा क्षणात उलगडा झाला! गेमर राव्हल्या आता भावी सासुरवाडीत ऑफिशिअली राहायला जाणार होता. आम्ही मात्र छोट्या जाहिरातींची कात्रणे काढून त्यावर लाल-तांबड्या रेषा मारत भर उन्हात भर पेठांमधून घर शोधत वणवण हिंडत होतो. 

- निल्या

http://nilyamhane.blogspot.in/2012/01/blog-post.html
Uncategorized

सुव्हनियर

Only antidote to mental suffering is physical pain.

***

सुई तिला कच्चकन टुपली.

कळ मस्तकात गेली, तशी कोणी टिपेचा आवाज लावावा आणि गोंगाट शांत व्हावा तसं डोक्यात सगळं शांत झालं.
स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात सूर मारला की पाण्याआत कसं निर्वात वाटतं, तसं.
आणि कुरणावर ढगांची सावली पसरत यावी तसं होत गेलं...

फक्त वेदना नकोच आहे तिला, वेदनेला भाषा हवीये.
सुईला आता हळूहळू लय सापडतेय.
सुई वेगवेगळ्या कोनातून फिरतेय, फिरत राहतेय. आडवी, उभी, वर्तुळाकार. शरीरावर तिची लिपी कोरत, गिरवत राहतेय.
ही एक नवीनच भाषा आहे. यातली वाक्यं वेगळी आहेत, हिचा सिंटॅक्सही वेगळा आहे.

तिने डोळे मिटून काळ्याकभिन्न अंधारामधल्या दूरवरच्या लालबुंद ठिपक्याकडे नजर लावली. वेदनेच्या पायर्‍या चढत तिला तिथे जायचंय. चाळीसेक असतील.

वेदना आत चिरकली. तिचे प्रतिध्वनी शरीरभर उमटले.
पाण्यात पडलेल्या शाईच्या थेंबासारखी ती शरीरात विरघळत राहिली, भिनत राहिली.
आता कुठल्या आठवणी नाहीत, दुखरे विचार नाहीत, घसा दाटून येत नाहीये. आता शरीरात लख्ख वेदनेचा वास आहे.

ती त्या वेदनेला आजमावतेय.

वेदनेच्या लाटा मेंदूला थडकल्या की सातव्या लाटेबरोबर आतात जाणार्‍या वस्तूंसारखी एकेक अप्रिय आठवण पुसली जातेय. त्यांचा ठणका निमालाय.
वेदनांच्या लाटांवर स्वार व्हायचं आणि जायचं आठवणी नसलेल्या प्रदेशात. लालभडक वेदनेचं वारूळ बनवून घ्यायचं वाल्यासारखं. इतकं की, त्यातून काही दिसता कामा नये की काही आकळता कामा नये.

वेदना अनावर झाली की डोळ्यापुढे काळीनिळी शाई सांडल्याचा भास होतोय, शरीराचा स्वल्पविराम होतोय.

ती या वेदनेला काहीही विचारू शकतेयो, कारण वेदना उलटून तिला काही विचारणार नाहीये. ती फक्त ’आहे’.

स्टु्डियोतलं धमाधम वाजणारं गाणं एव्हाना पुसट होत गेलंय.
.
.
.

सुई एकदाची शरीरावेगळी होते, तशी लख्ख ऊन पसरल्यासारखं वाटतं.
अर्ध्या तासापूर्वी कुठेही नसलेलं एक निळंशार फ़ुलपाखरू आता तिच्या पाठीवर हुळहुळतंय.

तिच्यातून ती बाहेर पडली आणि तिनं स्वत:वर नजर फिरवली. नुकत्याच बनवलेल्या आरशासारखी कवळी-कवळी वाटत होती ती.

ताप येऊन गेल्यासारखं हल्लख तर वाटतंच आहे, पण हलकीशी नशासुद्धा आहे.

त्या अर्ध्या तासाच्या ग्लानीत एक मोठ्ठा काळ निघून गेलाय. जणू काही तो दुसर्‍या आयुष्याचा हिस्सा होता आणि आता ही तापाची चुरचुर आहे, ठणका आहे ते वेगळंच आयुष्य आहे.

टॅटू हे दुसर्‍यांसाठी फक्त स्टाइल स्टेटमेंट असेलही कदाचित...
तिच्यासाठी तो वेदनेशी वेदनेनं भिडू पाहायचा मार्ग आहे!
आणि ते फुलपाखरू तिच्या सुटकेचं सुव्हनियर!

- श्रद्धा भोवड
 
http://www.shabd-pat.blogspot.in/2012/02/blog-post.html
Uncategorized

सुव्हनियर


 
Only antidote to mental suffering is physical pain.

***

सुई तिला कच्चकन टुपली.

कळ मस्तकात गेली, तशी कोणी टिपेचा आवाज लावावा आणि गोंगाट शांत व्हावा तसं डोक्यात सगळं शांत झालं.
स्प्रिंगबोर्डवरून पाण्यात सूर मारला की पाण्याआत कसं निर्वात वाटतं, तसं.
आणि कुरणावर ढगांची सावली पसरत यावी तसं होत गेलं...

फक्त वेदना नकोच आहे तिला, वेदनेला भाषा हवीये.
सुईला आता हळूहळू लय सापडतेय.
सुई वेगवेगळ्या कोनातून फिरतेय, फिरत राहतेय. आडवी, उभी, वर्तुळाकार. शरीरावर तिची लिपी कोरत, गिरवत राहतेय.
ही एक नवीनच भाषा आहे. यातली वाक्यं वेगळी आहेत, हिचा सिंटॅक्सही वेगळा आहे.

तिने डोळे मिटून काळ्याकभिन्न अंधारामधल्या दूरवरच्या लालबुंद ठिपक्याकडे नजर लावली. वेदनेच्या पायर्‍या चढत तिला तिथे जायचंय. चाळीसेक असतील.

वेदना आत चिरकली. तिचे प्रतिध्वनी शरीरभर उमटले.
पाण्यात पडलेल्या शाईच्या थेंबासारखी ती शरीरात विरघळत राहिली, भिनत राहिली.
आता कुठल्या आठवणी नाहीत, दुखरे विचार नाहीत, घसा दाटून येत नाहीये. आता शरीरात लख्ख वेदनेचा वास आहे.

ती त्या वेदनेला आजमावतेय.

वेदनेच्या लाटा मेंदूला थडकल्या की सातव्या लाटेबरोबर आतात जाणार्‍या वस्तूंसारखी एकेक अप्रिय आठवण पुसली जातेय. त्यांचा ठणका निमालाय.
वेदनांच्या लाटांवर स्वार व्हायचं आणि जायचं आठवणी नसलेल्या प्रदेशात. लालभडक वेदनेचं वारूळ बनवून घ्यायचं वाल्यासारखं. इतकं की, त्यातून काही दिसता कामा नये की काही आकळता कामा नये.

वेदना अनावर झाली की डोळ्यापुढे काळीनिळी शाई सांडल्याचा भास होतोय, शरीराचा स्वल्पविराम होतोय.

ती या वेदनेला काहीही विचारू शकतेयो, कारण वेदना उलटून तिला काही विचारणार नाहीये. ती फक्त ’आहे’.

स्टु्डियोतलं धमाधम वाजणारं गाणं एव्हाना पुसट होत गेलंय.
.
.
.

सुई एकदाची शरीरावेगळी होते, तशी लख्ख ऊन पसरल्यासारखं वाटतं.
अर्ध्या तासापूर्वी कुठेही नसलेलं एक निळंशार फ़ुलपाखरू आता तिच्या पाठीवर हुळहुळतंय.

तिच्यातून ती बाहेर पडली आणि तिनं स्वत:वर नजर फिरवली. नुकत्याच बनवलेल्या आरशासारखी कवळी-कवळी वाटत होती ती.

ताप येऊन गेल्यासारखं हल्लख तर वाटतंच आहे, पण हलकीशी नशासुद्धा आहे.

त्या अर्ध्या तासाच्या ग्लानीत एक मोठ्ठा काळ निघून गेलाय. जणू काही तो दुसर्‍या आयुष्याचा हिस्सा होता आणि आता ही तापाची चुरचुर आहे, ठणका आहे ते वेगळंच आयुष्य आहे.

टॅटू हे दुसर्‍यांसाठी फक्त स्टाइल स्टेटमेंट असेलही कदाचित...
तिच्यासाठी तो वेदनेशी वेदनेनं भिडू पाहायचा मार्ग आहे!
आणि ते फुलपाखरू तिच्या सुटकेचं सुव्हनियर!

- श्रद्धा भोवड
 
http://www.shabd-pat.blogspot.in/2012/02/blog-post.html
Uncategorized

कलेचा प्रवास आणि मूल्यमापन

                                   
नुकताच टाइम मासिकातील एक लेख वाचनात आला. 'द ग्रेट गॅट्सबी' ही एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड याची कादंबरी विसाव्या शतकातील एक महत्त्वाची कलाकृती मानली जाते. मुराकामीसारख्या लेखकाने 'माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे पुस्तक' या शब्दांत हिचा गौरव केला आहे. अनेक अभ्यासक्रमांना हे पुस्तक लावून विद्यार्थ्यांचे शिव्याशापही घेतले गेले आहेत. पण ’गुडरीड्स’ या सायटीवर तब्बल २९,००० लोकांनी या कादंबरीला भिकार, टुकार, कंटाळवाणी अशी शेलकी विशेषणे देऊन आपली नावड व्यक्त केली. एकीने पुस्तक कचर्‍याच्या पेटीत टाकून त्याचा फोटो प्रतिक्रिया म्हणून लावला. तसं बघायला गेलं, तर यात फारसं काही आश्चर्यकारक नाही. कोणत्याही कलाकृतीला श्रेष्ठ म्हणणारे जितके असतात, तितकेच तिला नाकारणारेही असतात. मात्र या नेहेमी घडणार्‍या घटनेतून काही रोचक प्रश्न समोर येतात.

कलेचा उगम माणसाच्या नैसर्गिक प्रेरणांमधून झाला असावा. फ्रान्सच्या शोवे इथल्या गुहांच्या भिंतींवरची अंदाजे ३०,००० वर्षे जुनी चित्रे माणसाच्या कलेचा पहिला पुरावा मानली जातात. (नुकतीच स्पेनमध्ये सापडलेली, निएंडरथाल माणसाने काढलेली चित्रे कदाचित याहूनही जुनी, म्हणजे ४२,००० वर्षांपूर्वीची, असू शकतील.) नंतर माणूस जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये गेला. भाषा, हवामान, राहणीमान अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आज आपल्याला दिसणार्‍या नानाविध संस्कृती. गेल्या ३०,००० वर्षांमध्ये बरंच पाणी वाहून गेलंय, पाण्यावरचे पूलही बदललेत.

विसाव्या शतकातील कलाक्षेत्राकडे नजर टाकल्यास संस्कृतीच्या अनधिकृत राजधान्या सहज दिसून येतात. पॅरीस, न्यूयॉर्क, लंडन यांसारख्या शहरांमधून जी मासिके निघतात, इथे जी प्रदर्शने भरतात, इथे जे महोत्सव होतात, त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली असते. या शहरांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. ही सर्व शहरे गेल्या काही शतकांत ज्या महासत्ता बलाढ्य होत्या त्या देशांमध्ये आहेत. हा योगायोग आहे का? नक्कीच नाही. जेते केवळ संपत्ती, सत्ता हिरावून घेत नाहीत, गुलामांची संस्कृतीही इथे पणाला लागलेली असते. आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडातील लोक गेल्या काही शतकांत स्वत:चे अस्तित्व टिकवण्यात गर्क होते, आज मरू की उद्या अशी परिस्थिती असताना कलेकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होता?

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना स्वातंत्र्य त्या मानाने लवकर मिळाले. पण इथे एक महत्त्वाचा फरक असा की, ज्यांना स्वातंत्र्य मिळाले ते या खंडाचे मूळ रहिवासी नव्हते. सुरुवातीला आलेल्या युरोपियन वसाहतींचे हे वंशज होते. त्यांनी नंतर आलेल्या आपल्याच बांधवांविरुद्ध युद्ध पुकारून स्वातंत्र्य मिळवले. पण मूळचे अमेरिकन इंडियन, जे या खंडावर कित्येक हजार वर्षांपासून राहत होते, त्यांच्या परिस्थितीत 'आजा मेला नातू झाला अन्‌ खुंटाला खुंट कायम झाला' या न्यायाने फारसा फरक पडला नाही. (त्यातही युरोपियन वसाहती झाल्यानंतर कित्येक लाख अमेरिकन इंडियन बाहेरून आलेले नवीन रोग, युद्धे किंवा अमानुष हत्याकांड यांना बळी पडले.) तीच गत आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांची. जिम क्रोच्या कृपेने यांना खरे स्वातंत्र्य मिळायला विसावे शतक उजाडावे लागले. 

अमेरिका आणि युरोपचे नाते म्हणजे लव्ह-हेट रिलेशनशिप आहे. औद्योगिक क्रांतीनंतर सुबत्ता आल्यावर सांस्कृतिक वारसा मिळवण्यासाठी युरोपशिवाय पर्याय नव्हता. युरोपमध्ये उगम पावलेल्या अनेक चळवळी अमेरिकेत लोकप्रिय झाल्या. पण त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये वर्चस्व मिळत असताना कलेच्या क्षेत्रातही आम्ही मोठे हे दाखवायचे होते. इन-मिन पाच-सहा लेखकांच्या कामाला 'अमेरिकन रेनेसान्स' असे नाव देणे हा या वृत्तीचा एक केविलवाणा परिणाम. हे म्हणजे रितेश देशमुखच्या लग्नाची पार्टी आणि बेजिंग ऑलिंपिक उद्घाटन सोहळा यांची तुलना करण्यासारखे आहे. (इथे या लेखकांना कमी लेखण्याचा हेतू नाही. मेलव्हिल, थोरो, इमर्सन, एमिली डिकीन्सन प्रतिभावंत होते यात वादच नाही. पण रेनेसान्स या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे.) अमेरिकेत अधिकृत भाषा इंग्रजी असल्याने इतर संस्कृतींच्या अभिव्यक्तींना मुळातच मर्यादा पडतात. (भारतात प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी सांस्कृतिक ओळख होण्यामध्ये भाषावार प्रांतरचनेचा महत्त्वाचा वाटा आहे.) आजही अमेरिकन इंडियन लोकांच्या कलाप्रकारांना दुर्मीळ कला जतन करण्यापलीकडे महत्त्व नाही.

बाकीच्या खंडांमधील परिस्थिती निराळी होती, कारण इथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य मूळच्या स्थानिक रहिवाश्यांकडे गेले, जेत्यांच्या पिढ्या (सुदैवाने) मागे थांबल्या नाहीत. हळूहळू इथून उगम पावलेले लेखक जागतिक स्तरावर येऊ लागले. अमिताभ घोष एका मुलाखतीत म्हणाले होते, "मी इंग्रजीत लिहायला लागलो, तेव्हा इतर पाश्चात्त्य लेखक आणि समीक्षक यांची मुख्य भावना आश्चर्याची होती. भारतासारख्या देशातला एक लेखक निर्दोष इंग्रजीत लिहितो आहे, हे म्हणजे एखादा कुत्रा गातो आहे असे होते. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे." विक्रम सेठ, सलमान रश्दी, नायपॉल यांसारख्या लेखकांनी भारतीय कथेला जागतिक स्तरावर नेण्यात यश मिळवले आहे. नायपॉल यांनी इंग्रजी साहित्याची नेहमीचीच यशस्वी वाट चोखाळण्याचे साफ नाकारले. वसाहतवादाच्या परिपाकामध्ये स्वत:चा शोध घेताना डिकन्सपासून जेन ऑस्टीनपर्यंत सर्व ब्रिटीश लेखक त्यांना परके वाटले. ('द ग्रेट गॅट्सबी' इतक्या लोकांना आवडले नाही, त्यामागे असेच कारण असावे असे वाटते. सध्याच्या जगाशी संबंध लावण्यासारखे त्यांना त्यात काही सापडले नसावे. आणि जर असे असेल, तर व्याख्येनुसार ते अभिजात साहित्य ठरू शकत नाही.)

इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. गेल्या शतकातील जेत्यांच्या देशातील कालमानस (zeitgeist) आणि बाकीच्या जगातील कालमानस यांमध्ये मूलभूत फरक आहेत. संस्कृती, राहणीमान यांच्या अनुषंगाने युरोप आणि अमेरिका येथील कलाप्रकारांचा प्रवास काही विशिष्ट दिशांनी झाला. पण बाकीच्या जगात तसे झाले नाही. बरेचदा राहणीमानाचा दर्जा चांगला नसल्याने कलांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात पाश्चात्त्य कलांचे पडसाद उमटलेच नाहीत असे नाही. मग प्रश्न येतो की, या राहिलेल्या जगातील कलाकृतींना पाश्चात्य कलाकृतींचे मापदंड लावून त्यांचे मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे? कला आणि शास्त्र यांतील एक मुख्य फरक म्हणजे शास्त्रामध्ये प्रगती एका निश्चित दिशेने होते. रामन इफेक्टचा शोध भारतात लागला, तेव्हा भारत गुलामगिरीत होता की स्वतंत्र याने काही फरक पडत नाही. मात्र कलेचा प्रवास कोणत्याही दिशेने होऊ शकतो आणि या प्रवासावर सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा मोठा प्रभाव असतो. यांतील कोणतीही दिशा बरोबर किंवा चूक नसते. असे असताना जागतिक साहित्य एका विशिष्ट दिशेनेच चालले आहे (आणि ती दिशा अर्थातच युरोप आणि अमेरिकेतील साहित्यिकांनी ठरवलेली आहे) आणि आपणही तीच दिशा पकडली पाहिजे असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. (एखाद्या कलाकाराला ती वाट चोखाळावी वाटली, तर अर्थातच ते स्वातंत्र्य आहेच.) किंबहुना सध्या प्रचलित असलेले मापदंड हेच अंतिम आहेत असे मानायलाही काही आधार नाही. दुर्दैवाने जागतिक स्तरावर पारितोषिके निवडताना बरेचदा याच अलिखित नियमानुसार व्यवहार चालतात हे सत्य आहे. शैक्षणिक भाषेत या प्रकाराला hegemony असे नाव आहे.

युरोपियन सांस्कृतिक वर्चस्वाचे पडसाद काही वेळा जेत्यांचे राज्य नसणार्‍या देशांमध्येही उमटले. टर्कीच्या इतिहासात त्या देशावर एकदाही पारतंत्र्याची वेळ आली नाही. तरीही कायम युरोपच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि युरोपियन समाजात आपल्याला स्थान मिळावे अशी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या टर्कीतले विचारवंत आणि कलाकार मानसिकरित्या नेहमीच युरोपच्या गुलामगिरीतच राहिले. (हीच अवस्था दस्तोयेव्ह्स्कीच्या काळात रशियामधील विचारवंतांची होती.) ओरहान पामुकने याबद्दल बरेच लिहिले आहे. या वृत्तीचे एक उदाहरण म्हणजे सोळाव्या शतकात टर्कीमध्ये बलाढ्य ओटोमान साम्राज्याच्या राजवटीत 'मिनिएचर पेंटींग' हा चित्रकलेचा एक अनोखा प्रकार लोकप्रिय होता. नंतर युरोपमध्ये 'इंप्रेशनिझम'चे वारे वाहू लागले आणि त्या लाटेचा परिणाम म्हणून मिनिएचर पेंटिंग ही कला लयाला गेली. या कलेचा लोप पामुकच्या गाजलेल्या 'माय नेम इज रेड' या पुस्तकाचा गाभा आहे.

या वर्चस्वाचा आणखी एक परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर बहुतेक करून जेत्या देशांमधील कलाकारांनाच स्थान मिळत राहिले१. गालिबसारख्या अलौकिक प्रतिभाशाली कवीला वर्डस्वथ, शेले यांच्या रांगेत स्थान मिळायला हवे, पण आज जागतिक पातळीवर मूठभर संशोधक सोडले, तर त्याचे नावही कुणाला माहीत नाही. पाच हजार वर्षांचा सांस्कृतिक वारसा सांगणार्‍या चीनसारख्या देशात अनेक प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. चीनबाहेर त्यांची दखल कोण घेणार? (विक्रम सेठचे चिनी कवितांच्या अनुवादाचे पुस्तक 'थ्री चायनीज पोएट्स' वाचनीय आहे.) रेनेसान्सच्या काळात युरोपमध्ये प्रतिभेचा महापूर आला हे खरे, पण इतर जगात प्रतिभावंत झालेच नाहीत असेही नाही.

कलेच्या इतिहासाबाबत आढळणारा एक रोचक मुद्दा म्हणजे साधारणपणे ज्या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असते, तिथली संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसते. (जय हो!) शीतयुद्ध चालू असताना सीआयएने रशियाविरूद्ध वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने मॉडर्न आर्टला एक शस्त्र म्हणून वापरले. मॉडर्न आर्टला मान्यता मिळण्यात पडद्यामागे सीआयएच्या मदतीचा मोठा वाटा होता. टॉम क्रूझपासून ऑपरापर्यंत हॉलीवूडचे स्टार लोक मुंबईच्या उकाड्यात हसतमुखाने येत आहेत. याला कारण बॉलीवूडची गुणवत्ता अचानक हजारपट वाढली आहे असे आहे का? अजिबात नाही. गुणवत्ता इराणच्या कितीतरी चित्रपटांमध्येही ठासून भरलेली असते, तिथे का बरं कुणी जात नाही? द होल थिंग इज दॅट के भय्या सबसे बडा रुपय्या.

भारतात परिस्थिती बदलते आहे. पण उण्यापुर्‍या पन्नास वर्षांमध्ये क्रांतिकारक बदल होणे अवघड आहे. भारताचे दुर्दैव हे की, या देशाचा प्रवास पाश्चात्त्य देशांच्या उलट - सुवर्णकालाकडून अंधारयुगाकडे - झाला. अठराव्या शतकामध्ये जागतिक व्यापारात ५०% वाटा भारत आणि चीन यांचा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टक्केवारी २%वर आली होती. ज्याला कदाचित 'पोएटीक जस्टीस' म्हणता येईल, अशी परिस्थिती एकविसाव्या शतकात येऊ घातली आहे. युरोपची गंगाजळी धोक्यात आहे. अमेरिकेने स्वत:च्या जळत्या घराकडे दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे इतर देशांमध्ये नाक खुपसणे चालू ठेवले, पण या वेळी ते अंगाशी आले आहे. याउलट भारत, चीन, ब्राझील यांची परिस्थिती आधीपेक्षा बरीच सुधारली आहे. अशा परिस्थितीमध्ये कलाक्षेत्रावर याचे पडसाद न उमटणे अशक्य आहे. शिवाय आताचे जग रेनेसान्स किंवा एनलायटनमेंटपेक्षा फारच वेगळे आहे. आंतरजालामुळे सामान्य लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊ लागले आहे. 

एकविसाव्या शतकात हा प्रवास कसा होईल हे बघणे रोचक ठरावे.

----

तळटीप

१. बरेचदा युरोपातील मान्यवर कलाकारांनी इतर संस्कृतींमधील कल्पना वापरल्या. पिकासोच्या कलाकृतींवर आफ्रिकन कलेचा बराच प्रभाव होता. पण ज्या कलाकारांपासून त्याला ही प्रेरणा मिळाली ते अंधारातच राहिले. हा विरोधाभास दाखवणारी आफ्रिकन चित्रकार शेरी सांबा याची चित्रमालिका बोलकी आहे. पहिल्या चित्रात पिकासो आणि आफ्रिकन चित्रकार दाखवले आहेत. दुसर्‍या चित्रात ते चित्रे घेऊन प्रदर्शनाला जात आहेत. तिसर्‍या चित्रात पिकासो नाही, मात्र आफ्रिकन चित्रकार गर्दीमध्ये हरवला आहे. त्याचे चित्र अजूनही त्याच्याजवळच आहे, त्याला प्रदर्शनात जागा मिळालेली नाही. चित्रमालिकेचे शीर्षक आहे - Quel avenir pour notre art? - आमच्या कलेचे भविष्य काय?

गेल्या काही दशकांमध्ये आफ्रिका, आशिया येथील चित्रकारांना संधी देण्याचे विशेष प्रयत्न झाले आहेत. 

- राज

http://rbk137.blogspot.in/2012/02/blog-post_24.html