Uncategorized

प्रतिमांचे साजण ओझे…

(चित्र जालावरून साभार)

ग्रेसचा कोणताही कवितासंग्रह वा ललितलेखसंग्रह मी उचलून वाचलेला नाही. पण तरीही मला ग्रेस माहीत आहे. मला तो कधीकाळी चारचौघांसारखा दुर्बोध वाटे. पण ग्रेस दुर्बोध आहे असं म्हणणं डाऊनमार्केट असल्यामुळे तो आवडतो असं बळंच फॅशन म्हणून म्हणणारे लोकही भेटले. मला ती फॅशन आवडली नाही हे बरंच झालं. नाहीतर कदाचित मला ग्रेस कधीच आवडला नसता. कारण जेव्हा तो आवडला, तेव्हा खराखुरा आवडला.
ग्रेस आपल्याला कळत नाही असं मानून सोडून द्यायला मी कबूल नव्हतो. कारण काय कळत नाही तेच कळत नव्हतं. न कळूनही ते शब्द मला खिळवून ठेवत होते. शब्द तर कळत होते, म्हणजे ते काही कुठल्या प्राचीन, मध्ययुगीन मराठीतून, संस्कृतातून वा फार्सीतून उसने आणलेले नव्हते. त्यामुळे शब्दार्थ माहीत होते. अनेक कवितांशी भुजंगप्रयात वगैरे सरधोपट वृत्तांची नावंही जोडता येत होती. पण मुख्य मुद्दा हा की कविता लयबद्ध होत्या. एकही शब्द उणा नाही की जादा नाही. अन्वयाचाही काही गुंता नाही. पण सगळं एकत्र पाहू, वाचू, ऐकू जाता काही कळत नाही. त्यात भरीस भर ह्या कविता अनेकदा संगीताचा संस्कार होऊन संगीतकार, गायक अशा लोकांकडून माध्यमांतरित होत होत आलेल्या. त्या त्या कलाकारांचं कसब वादातीत. कवितांचं माध्यम नवीन नाही, गाण्याचं माध्यम अगम्य नाही. मग अडत कुठे होतं? अडत त्या भाषेशी होतं. त्या कवितांची आपली एक भाषा होती. ती अवघड होती की सरळ होती माहीत नाही, पण ती सुंदर होती.
मला चित्रांची, शिल्पांची, रागांची भाषा कळत नव्हती (नाही) याचं जितकं वाईट वाटायचं, त्याहून अधिक ही भाषा कळत नाही याचं वाईट वाटायचं. त्या भाषेचं तंत्र, व्याकरण मला कळत होतं. तिच्या चिह्नांचे अर्थ मला कळत होते, पण संकेत आकळत नव्हते. मग मी तिला दोष देण्याचा नाद सोडून दिला. मी त्या सांकेतिक लिपीचा माझा-माझा अर्थ लावला. कधी तो केवळ शब्दश: होता. पण मग त्या कविता मला भेटत गेल्या आणि एकदम कुठेही ग्रेस आठवायला लागला. मुळात ‘इथे कवीला असे म्हणायचे आहे की …’ या ’कवितेचे आकलन’ या पठडीतल्या एकरेषीय साच्याला मी हद्दपार केलं. मग ते तसं करणं अनेक कवींच्या बाबतीत फायद्याचं ठरलं. विशेषत: आरती प्रभूंनाही ते बर्‍याच अंशी लागू पडलं. संत, पंत, साठोत्तरी, मर्ढेकरी, नवकाव्य अशा लेबलांकडे दुर्लक्ष केलं. ही लेबलं अनावश्यक नसतात, पण त्यातून कवितेच्या मजकुराविषयी काहीही अर्थबोध होत नाही नि ती मला कळतही नाहीत. ग्रेस आठवायला लागला, तसा आवडायला लागला. आवडायला लागला, तसा भेटायला लागला. भेटायला लागला, तसा तो मला माहीत झाला आणि त्याच्या कविता माझ्या झाल्या.
ग्रेसची भाषा माझ्यापर्यंत सातत्यानं पोचवायचं श्रेय मंगेशकर, फडके, वाडकर मंडळींना दिलं पाहिजे. त्याचा फायदा झाला. ते आकर्षक होतं, पण तरीही ग्रेस थेट भेटायला पुरेसं नव्हतं. एकदा एका दरीत, नदीकाठाशी कॅंपिंग करताना संध्याकाळ झाली, तेव्हा ’ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई’ म्हणजे काय ते मला अचानक कळलं. तेव्हा दडपून टाकणार्‍या अंधाराचं वजन मला कळलं. मग ’मी भिऊन अंधाराला अडगळीत लपुनी जाई’ म्हणताना भिऊन मुटकुळी करून अज्ञात दडपणाने अधिकाधिक आक्रसत गेलेला एक देह नेहमी समोर येत गेला. मंगेशकर मागे पडले. न्यूयॉर्कच्या ‘म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये ‘मोने’च्या वॉटरलिलींची चित्रं पाहताना परवा कुठे ’इथे दाट छायांतुनी रंग गळतात’ म्हणजे काय ते मला कळलं. म्हणजे मला जे कळलं, ते मला आवडलं. बहुदा तो चित्रकार मोनेही भेटला. वाडकर, फडकेंची आता गरज उरली नाही.
पण तेवढ्याने पुरलं नाही. ग्रेसच्या मुलाखती ऐकून, त्याच्याबद्दलचे लेख वाचून ग्रेस अधिकाधिक खुलत गेला.
युरोपात फिरताना अनेक चित्रं, शिल्पं, स्थापत्य, वास्तू पाहताना मी भंजाळून जात असे. ’काही कळत नाही आपल्याला’, ’छे, हे कधी शिकलोच नाही आपण’, ’हे छान आहे, पण काय आहे नेमकं कोण जाणे’ असं पदोपदी वाटत राहिलं. त्यात जखमेवर मीठ चोळायला म्हणून ते ध्वनिमुद्रित समालोचन. ‘या निओक्लासिकल वास्तुरचनेत अमुकने तमुक केलंय…’, ’ही गॉथिक कमान ’अ’च्या काळातली, पण ’ब’पेक्षा वेगळी आहे…’, ’हे प्रबोधनकालीन शिल्प…’, ’हे क्युबिझमचं उदाहरण नि ते उत्तरआधुनिक…’ अशा मजकुरांत संज्ञांचा नुसता चिखल असे. त्या नावांनी मी थकून गेलो. सिस्टीन चॅपलचं छत मला झोपून पाहायचं होतं. तिथे उभं राहायलाही जागा नव्हती आणि लोकांनी शांततेला हरताळ फासला होता. बार्सिलोनाला गौडीच्या वास्तुरचनेत कुठे कडाच (शार्प एजेस) नव्हत्या याचं मला जे काही अफाट नावीन्य आणि कौतुक वाटलं होतं ते कुणी मला पाहू देईना, नुसता पुन्हा एक संज्ञांचा ढीग. मग मी ते समालोचन सोईस्करपणे ऐकू लागलो नि मला हवं ते, हवं तसं पाहू लागलो. या गौडीने बांधलेल्या कासा मिला या एका मध्यमवर्गीय राहत्या इमारतीच्या गच्चीवर चिमण्या / धुरांडी बांधतानाही त्याने इतकी वैचित्र्यपूर्ण कलाकुसर केलीय की मला काही आधी उमजेचना. त्या धुरांड्यांची रचना काहीशी सॉफ्टी आईसक्रीमवरच्या वलयांसारखी वळत वळत वर जाणारी होती. आणि सर्वांत वर टोकांवर असे बॅटमॅनसदृश मुखवटे. त्या वलयांतही वैविध्य होतंच. नि शिवाय कडा नाहीतच कुठे. मला संदर्भ सोडून एकदम मीरचा शेर आठवला, ‘देख तो दिल के जाँ से उठता है, ये धुआँ सा कहाँ से उठता है’. मला माझ्यापुरते मीर आणि गौडी एकदम भेटले. कुठलंतरी जुनं कोडं एकदम सुटल्यासारखं झालं. पुढे साल्त्चबुक (साल्झबर्ग) शहरातलं कॅथिड्रल गॉथिक आणि बरोक या शैलींचं मिश्रण आहे हे कुणीही न सांगता माझं मलाच कळलं, तेव्हा जोरात ’हिहाहा’ असं हसून त्यात आवाज किती घुमतो हे पाहायचा अनावर मोह झाला होता. कॅथिड्रलमध्ये गेल्यावर ते किती भव्य आहे हा निकष मी बाद केला. तिथे शांतता आणि सुकून शोधत येणार्‍या व्यक्तीला त्याची वास्तुरचना दडपून टाकते की आपलंसं करते हा निकष मी माझी आवड-निवड ठरवायला पक्का करून टाकला. ध्वनिमुद्रित समालोचन किंवा माहितीपर पाट्यांमधला संज्ञांचा वापर रुतला खरा, पण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येईना. त्या कलाकृतीच्या निर्मितीचा काळ, त्यामागच्या संभाव्य प्रेरणा, कलाकाराबद्दलची माहिती, तत्कालीन समाज-राज्य-अर्थव्यवहार यांची माहिती मिळणं मोलाचं वाटू लागलं नि तशी मिळवणं आवश्यकही होत गेलं.
चित्र, शिल्प, वास्तुरचना वगैरेंची आपली अशी एक भाषा असते. ती भाषा सामान्य बोलीहून भिन्न असते. तिची चिह्नं, व्याकरण आपल्याला कळत नाही असं तरी म्हणता येऊ शकतं. पण लोकभाषेतलंच ‘शब्द’ हे चिह्न आणि त्याच भाषेचं व्याकरण वापरून ग्रेसनं आपली एक स्वतंत्र भाषा तयार केली, तरीही ती मला दुर्बोध वाटलीच की. थोडक्यात, चिह्न, तंत्र, व्याकरण कळलं तरी ती भाषा कळतेच असं नाही. ती आपली आपण शिकावी लागत असणार. बाबा ज़हीन शाहच्या एका कव्वालीत शब्दांची मर्यादा आणि ज्ञानाची व्याप्ती स्पष्ट करताना त्यानं एक उदाहरण दिलंय, “शोला शोला रटते रटते लब पर आंच ना आए, एक चिंगारी लब पर रख लो लब फ़ौरन जल जाए”.
या ज्ञानाच्या साक्षात्कारासाठी बाहेरचं शोषून घेऊन आत पाहावं लागत असणार. आपल्या कार्यक्रमाला गर्दी नसतानाही जराही वाईट न वाटून घेता त्याच तन्मयतेने गाणार्‍या कुमारांनी जसं “त्यात काय? आपण काय बाहेर बघून गातो काय?” असं म्हटलं होतं तशासारखं. पण फक्त एवढंच पुरत नसणार. या सगळ्याबरोबरच कलाकार नि कलाकृती यांच्या आयुष्याचं आणि तत्कालीन भवतालाचं आकलनदेखील महत्त्वपूर्ण ठरत असलं पाहिजे.
मग महत्त्वाचं नेमकं काय? बहुदा हे सगळंच.
कविता, चित्र, वास्तू, शिल्प, सिनेमा, पुस्तक… सारंच भेटावं लागतं. कधी अभ्यासातून, तर कधी थेट अनुभवातूनही. पण हेही खरं, की ते भेटायला हवं असेल, तर आपण स्वतःहून त्याच्यापर्यंत जावं लागतं.
– ए सेन मॅन
***
तुम्हांलाही कधी भेटले असतीलच की कुठलेतरी साहित्यिक, कलाकार, साहित्यकृती, कलाकृती… त्याबद्दल लिहा ना. त्यांच्याबद्दल, त्यांच्या भेटण्याबद्दल. कसं नि काय लिहायचं ते तुम्हीच ठरवा. वानगीदाखल गायत्रीचं हे ‘कॅराव्हॅजिओ’ या शीर्षकाचं जुनं पोस्ट पाहा. चित्रभाषा या विषयावरची शर्मिलाची ही सुंदर मालिका पाहा, केवळ चित्रभाषा समजून घेण्यासाठी नव्हे, तर अशा कलाभाषांविषयीच्या एका डोळस दृष्टिकोणासाठीही. ही केवळ उदाहारणं. कलाकार / साहित्यिक / कलाकृती / साहित्यकृती जगप्रसिद्धच हवी; अनुभव चाकोरीबाहेरचाच असावा, असे काही आग्रह नाहीत. चटका बसल्यावर बहिणाबाई आठवल्या असतील तरी, आणि जाता जाता कुठल्या मासिकात / ब्लॉगवर वाचलेलं असं भेटलं असलं तरी चालेलच की. लिहिलंत की दुवा इथे प्रतिक्रियेत द्या, म्हणजे ते एकत्रित राहील.
पहिले खो नंदन, श्रद्धा आणि अर्निका यांना.
– संपादक

***
Facebook Comments

7 thoughts on “प्रतिमांचे साजण ओझे…”

  1. प्रस्तावना लेख सुंदर! समीक्षकी रसग्रहणापेक्षा पोचणं महत्वाचं असतं. या ना त्या मार्गाने कला आपल्यापर्यंत येऊन पोचतेच. पण विशेषतः अभिजात कलांचा मार्ग आपला नव्हे, आपल्याला काय कळतय त्यातलं असं म्हणत अनेकजण हे पोचणं नाकारत रहातात. समीक्षकी मार्गाची धास्ती मनात इतकी असते की आपण आपल्या वैयक्तिक संदर्भातलं कळणं हे अनुल्लेखनीयच मानतो.
    पण जे तसं करत नाहीत त्यांचे अनुभव वाचताना मजा येईल. खो-खो साखळी चांगली लांबलचक होऊदेत ही.

  2. मस्त! माफ करा, मी मला दिलेला खो अत्ताच पाहिला… आठवडाभर blog शी काही संबंध नव्हता ना… नक्की लिहिते 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *