Posts

Showing posts from April, 2012

प्रतिमांचे साजण ओझे...

Image
(चित्र जालावरून साभार)

ग्रेसचा कोणताही कवितासंग्रह वा ललितलेखसंग्रह मी उचलून वाचलेला नाही. पण तरीही मला ग्रेस माहीत आहे. मला तो कधीकाळी चारचौघांसारखा दुर्बोध वाटे. पण ग्रेस दुर्बोध आहे असं म्हणणं डाऊनमार्केट असल्यामुळे तो आवडतो असं बळंच फॅशन म्हणून म्हणणारे लोकही भेटले. मला ती फॅशन आवडली नाही हे बरंच झालं. नाहीतर कदाचित मला ग्रेस कधीच आवडला नसता. कारण जेव्हा तो आवडला, तेव्हा खराखुरा आवडला.
ग्रेस आपल्याला कळत नाही असं मानून सोडून द्यायला मी कबूल नव्हतो. कारण काय कळत नाही तेच कळत नव्हतं. न कळूनही ते शब्द मला खिळवून ठेवत होते. शब्द तर कळत होते, म्हणजे ते काही कुठल्या प्राचीन, मध्ययुगीन मराठीतून, संस्कृतातून वा फार्सीतून उसने आणलेले नव्हते. त्यामुळे शब्दार्थ माहीत होते. अनेक कवितांशी भुजंगप्रयात वगैरे सरधोपट वृत्तांची नावंही जोडता येत होती. पण मुख्य मुद्दा हा की कविता लयबद्ध होत्या. एकही शब्द उणा नाही की जादा नाही. अन्वयाचाही काही गुंता नाही. पण सगळं एकत्र पाहू, वाचू, ऐकू जाता काही कळत नाही. त्यात भरीस भर ह्या कविता अनेकदा संगीताचा संस्कार होऊन संगीतकार, गायक अशा लोकांकडून माध्यमांतरित होत…
Image