तुझे माझे


चित्र कुठले काढायचे त्याचा विचार करता चित्रकार नुसताच कॅन्व्हाससमोर उभा राहिला तर?
एक एक रेघ दुसरीला बोलवत गेली...
दुसरीहून तिसरी लांब झाली...
चौथी वर्तुळात हरवून गेली...
...आणि त्यांनी चित्र बनवले.
चित्रकाराने फक्त सुरुवात केली हातात पेन्सील धरून...
इतक्या प्रचंड गर्दीत गाणी ऐकायला मला मजाच येऊ शकत नाही असे मी बत्तीस वेळा म्हणूनही मला गीतूने आणि वैभ्याने नेलेच ओढून. 'गीताचा गर्दीवरचा प्रभाव प्लेगसारखा असतो , एक मेल्यावर सगळे पटापटा मरून पडायला लागतात,' असे मी म्हटल्यावर, हिला दाखवलेच पाहिजे काय असते मजा, असे परस्पर ठरवून मला नेण्यात आले.
गीतू नि वैभ्या गर्दीत एकजीव झाले, उकडलेला बटाटा आणि वाफवलेले मटार एकजीव करतात पॅटीससाठी, तसे. मला लोकांना बघून मजा येत होती. गाणी सुरू होती मागे. मधेच कान सुखावून जात होतेही. पण जसे बाईकवरचे दोघे पडले एकाच वेगाने - एकसारखेच, तरी लागते वेगवेगळे ना, दुखते वेगवेगळे. तसे गाणेही गर्दीतल्या प्रत्येकाला वेगळे भिडते.
मला गाणे एकटीसाठी हवे असते...
गाणे एका वेळी एकासाठीच असावे. वैभ्या म्हणतो तसे त्याचे एका वेळी एकीवरच प्रेम असते तसे!
"गाणे बघणे पहिल्यांदाच बघतोय, बाकी गाणी ऐकायची असतात बहुतेक."
तू पहिल्या क्षणापासून आगाऊ होतास. चेहऱ्यावर माज नि मिश्कील हसू. काही लोकांना ते कसेही राहिले नि त्यांनी काहीही घातले तरी चांगलेच दिसते, त्यांच्यापैकी एक.
उगाच काहीतरी तुझ्याचइतके आगाऊ उत्तर द्यावे असे आलेही मनात...
"मला नाही आवडत इतक्या गर्दीत गाणे ऐकायला."
मला जे आतून वाटते ते इतक्या पहिल्या क्षणापासून तुझ्याकडे बोलत आलेय, ओळख झाल्याच्या पहिल्या वाक्यापासून. तुला आहे त्याहून वेगळे किंवा खोटे काही सांगावेसे वाटले नाही नि त्यानंतर कधी तुझ्या डोळ्यांत बघितल्यावर खोटे बोलता आलेही नाही. नजर चुकवून बोलायचे अयशस्वी प्रयत्न तू पाव सेकंदात हाणून पाडलेस...
"तुला नाही कळणार."
हेही तुलाच जमू जाणे. तू ओळखतोस तरी का मला? उगाच अशी विधाने कशाला करावीत?
"जोरात बोल. ऐकू येत नाहीये."
जाऊ दे नं. मला असे लोकही आवडत नाहीत, जे आधीच ठरवून टाकतात समोरच्याला काय वाटत असेल किंवा नसेल ते...
मी कशी तुला बघून इतकी इम्प्रेस झाले होते की, ऐकू येत नाहीये नि त्यामुळे नीट भांडता येत नाहीये असा बहाणा करून मीच कसे बाहेर जाऊन बोलूयात असे सजेस्ट केले... असे तू नेहमीच म्हणत आलास. नि मी नुसती हसत आले त्यावर.
बॅण्ड्राला होते ते कॉन्सर्ट. डेल्ही, समुद्र, बनारस, अबिदा, रन लोला रन, लहानपण, पोलिसांनी पहिल्यांदा कसे पकडलेले तुला, मी गटारात कशी पडलेले...
मॅरीन ड्राइव्हला जाऊन तिथे सहा कप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आइसक्रीम खाण्यात तीन वाजले.
काही लोकांना डास आवडीने चावतात, तसे तुझ्यावरचे प्रेम जाहीर करायला पोलीस अर्थातच आला तिथे. आपल्याला हटकले. आपल्याला एकमेकांची नावेही माहीत नाहीत म्हटल्यावर त्याला आपला हेतू शुद्धच वाटला असणे साहजिकच होते. मला हसू आवरत नव्हते आणि त्याला राग...
वैभ्या नि गीतूचे फोन शेवटी घेतले मी त्यांच्या अनगिनत मिस्ड कॉल्सनंतर. शिव्या खाल्ल्या नि नंतर वैभ्याशी पंधरा मिनिटे काहीतरी वाद घालायला लागल्यावर तू येऊन फोन बंद केलास.
बंद केलास? इतका ताबा पहिल्या भेटीपासून घेता आला माझा?
माझ्या सारख्या मुलींबरोबर असा माज केला की त्या खपवून घेतात असे म्हणून मला बाकी मुलींमध्ये बावीसदा जमा केलेस त्यानंतर. आमच्या घराखाली सोडलस मला नि मागे वळून बघता तडक गेलास निघून. मीही खाली उभी वगैरे नव्हतेच राहिलेले...
पण मला आपली पहिली मुलाकात तुझ्यापेक्षा जास्त आवडते, ह्यात तुला राग कसला येतो इतका? मला मोमेण्ट्सबद्दल तुझ्यापेक्षा जास्त प्रेम वाटते कधी कधी ह्याचा?
एक आठवड्यानंतर रात्री मी नि गीतू पराठे लाटत 'जब वी मेट' बघत होतो, तेव्हा रात्री सोळा वेळा बेल वाजवलीस. खून करायच्या पवित्र्यात गीतूने हातात लाटणे घेऊन दार उघडले. तुला तीन मिनिटे बघितले नि काही बोलता दार बंद केले. मला येऊन म्हणाली, "अग्ग्गं, बाहेर एक असा कोणीतरी आलाय, ज्याच्यावर माझी वाईट नजर गेलीय."
ती बाहेर उभी असलेली व्यक्ती किती भयानक हॅण्डसम, हॉट, उंचबिंच आहे; तिच्या केसांचा रंग, कपडे, बूट, हातातले घड्याळ , मोबाईल कोणत्या कंपनीचा, वगैरे सगळे यथेच्छ यथाशक्ती वर्णन केल्यावर तिला आठवले की, तिने त्या व्यक्तीच्या तोंडावर दार लावले. नि त्यापाठोपाठ प्रश्न पडला की असा कोणीतरी आपल्याकडे काय करतोय? तू कुरियरवाला असणे शक्यच नाहीये, आणि माझा एखादा असा मित्र मी तिच्यापासून लपवून का ठेवीन वगैरे वाद नंतर घालायचे ठेवून, मेक-अप करून गीतूने दार पुन्हा उघडले.
तू ती बेशुद्ध वगैरे पडावी ह्या हेतूने हसलास.
ती म्यूट झालेली, नि तू मला म्हणालास, "पंधरा मिण्टात तयार हो. आपल्याला जायचंय. जरा एक चक्कर मारून येऊ १५-२० मिनिटे..."
कुठे ते सांगायची पद्धत नाहीच तुला नाहीतरी...
"मी 'जब वी मेट बघतेय पण."
गीतू ह्या उत्तराने नक्की बेशुद्ध पडली मनातल्या मनात. तुझ्या डोळ्यांतपण एक अख्खे मिनीट अविश्वास तरळून गेला. ''मी' बाहेर घेऊन जातोय नि हा माज?' असा. पण मीही इतक्या सहज तुला शरण नव्हते येणार. पहिला डाव तू जिंकल्यावर तर नाहीच.
"ठीके , मग पिक्चर संपल्यावर जाऊ."
'हां, बघू' असे काहीतरी मोघम उत्तर दिले मी. पराठे खात आपण तिघांनी पिक्चर पहिला. त्यानंतर बाहेर जायला मला कंटाळा आला असे मी म्हणणार होते, पण तू थांबला होतास इतका वेळ. म्हणून मग नुसते कपडे बदलून आले तुझ्याबरोबर.
१५-२० मिनिटे कधीतरी पुरलीयेत का आपल्याला? अर्थात पुन्हा पहाट उजाडली घरी परत यायला. ह्या वेळीही तू नंबर नाही मागितलास. तुझा दिलास.
"मला वाटते, मी माझ्याकडून योग्य तितके एफर्टस् घेतलेले आहेत, ओळख वाढावी म्हणून. आता तुला बोलावेसे वाटले, तर तू फोन कर. नाहीच केलास तर ही आपली शेवटची भेट आहे. इट वॉज रिअली नाइस मीटिंग यू."
पुन्हा एकदा सुसाट निघून गेलास.
तुला कधीच नीट निरोप घेता येत नाही...
मीही हट्टी आहेच पण.
मला तुटेपर्यंत ताणायला कसे आवडते हे मला त्या दोन आठवड्यांत गीतूने एक लक्ष वेळा सांगितले. बारा वेळा दूध उतू गेले. त्या दोन आठवड्यांत सगळ्याच्या सगळ्या पोळ्या करपल्या. सगळ्या असाइनमेण्ट्स तीन-तीनदा करायला लागल्या. एका रात्री झोपेत मी तुला काहीतरी सांगतेय असे वाटून जाग आली. तू असणार नव्हतासच. ह्याआधी कधी होतास? पण ह्याआधी का नव्हतास आणि ह्याआधी कितीदा आठवण आलीय हे सांगायला राहवून रात्री अडीचला फोन केला. तू पंजाबमध्ये होतास. खूप बदाबदा बोलेन असे वाटले होते, पण अर्धा तास रडलेच फक्त तू पंजाबमध्ये आहेस हे ऐकून.
तो मी केलेला पहिला फोन, जिथे रडलेच फक्त, नि 'ये प्लीज' इतकेच अधपाव वाक्य.
तूही कमी हट्टी नाहीस.
चार दिवसात यायचा होतास, तो चांगला एक आठवड्याने आलास. मला माझ्याहून जास्त प्रेम दुसर्यावर करायला नाही आवडत. माझे माझ्यावर प्रेम असते, तेव्हा माझेही माझ्यावर प्रेम असणार असते. दुसर्याच्या बाबतीत ह्याची काय खात्री? आणि एकदा माझे लक्ष माझ्यावरून उडले की परत तिथे येणे कठीण. तू उडवलेस ते, आणि मग मजा बघत बसलास.
आधी गीतूचा फोन नंबर मिळवलास. तिला अपोआप गायब व्हायला सांगितलेस. तिच्यावर काय, गारूड केले होतेसच तू. ती कशाला तुझ्या शब्दाबाहेर जातेय?
मला झाला होता तुझा ताप. कोणामुळे माझा मालकी हक्क गेलाय स्वतः वरचा हेही इतके झोंबत होते... राग नसानसांत भरला होता. पुन्हा तुला फोन करायचा नाही हे स्वतःला दर क्षणाला बजावून द्यायला लागत होते नि सगळे ओकायला गीतूही नव्हती घरात.
मोठ्याने गाणी लावत कांदा कापत रडत होते नि तू दार वाजवलेस. रडक्या चेहऱ्याने दार उघडले. बाहेर तू उभा होतास. बघत बसलो मग कोण आधी हरतेय ते. एक सणसणीत कानाखाली वाजवायची इच्छा आली मनात...
"तू मारलेले मला किती लागेल?"
पाटीवर लिहिल्यासारखा स्वच्छ कसा ओळखता येतो तुला माझा प्रत्येक भाव?
"कांदा कापतेय म्हणून पाणी आहे डोळ्यात. तुझ्या प्रेमात रडत नाहीये मी ."
"अर्थातच. मान्य केले तर दुखेल नं तुला? आताही इतके धावत माझ्याकडे यायची इच्छा असताना, मीच मिठीत घ्यायला हवंय हाच हट्ट आहे नं तुझा? हरकत नाही."
तेवढ्यात गीतू आली . इतके वाईट टायमिंग? ते गीतूलाच जमू शकते पण. गंमत म्हणजे तिच्याबरोबर वैभ्याही होता.
तू त्या दोघांसमोरही किती सहज मिठीत घेतलेस मला. निखळ का काय असते तसे...
तुझे माझे नाहीच्चे. तुझेच आहे...
तुला कुठे पर्याय असतो?
- अस्मि
1 comment