अधीर श्रावण


अधीर श्रावण, मनात पैंजण
उनाड वाहे वारा,
आठव येता तुझी माधवा
देह सावळा सारा...

अशांत यमुना, उदास गोकुळ
उधाणलेला पूर,
दूर तिथे तू, तरिही छळतो
तुझा पावरी सूर

कोमल स्वप्ने, मधुरा-भक्ती
जपते राधा वेडी,
पायांमध्ये जणू घातली
कुणी फुलांची बेडी!

हळवे तनमन, सरले ’मी’पण
गर्द निळी ही भूल
निळसर मोहन, राधा झाली
निशिगंधाचे फूल!

- स्पृहा

Post a Comment