चित्रकला, लैंगिकता आणि मी - भाग १चिन्ह २०११’ - मुखपृष्ठ
'चिन्ह'च्या 'नग्नता - चित्रातली, मनातली' या विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारताना आपल्याला हा विषय पेलू शकतोय का, मुळात कलेतल्या नग्नतेकडे किंवा नग्नतेमधल्या कलेकडे पाहण्याची माझी स्वत:ची दृष्टी कितपत खुली आहे हे तपासून बघताना माझ्या डोळ्यासमोर सहा वर्षांपूर्वीचं एक दृश्य तरळून गेलं.

साल - २००५.
स्थळ - डॉ. प्रकाश कोठारींचं ग्रॅन्टरोड येथील ऑफीस.
डॉ. कोठारींकडे जगभरातून जमवलेल्या दुर्मीळ इरॉटिक आर्टचा मोठा खाजगी संग्रह आहे. मला त्यावर लेख करायचा आहे. इरॉटिक आर्टबद्दल मी आजवर फक्त ऐकून आहे. नेटवरून मिळालेली माहिती आणि पाहिलेली चित्रं बरीचशी पाश्चात्य संदर्भातली, आणि त्यामुळे माझ्या मानसिक संवेदनांना काहीसा धक्का बसलेला आहे. त्या वस्तूंच्या लैंगिक स्वरूपामुळे आणि डॉ. कोठारींच्या एक नामवंत सेक्सॉलॉजिस्ट अशा प्रसिद्धीमुळेही माझ्या मनात -यापैकी संकोच.
डॉक्टरांच्या केबिनच्या आतल्या हॉलमधे त्यांची असिस्टन्ट मला घेऊन जाते. डॉक्टर फोनवर बिझी आहेत. त्यांच्या 'क्लायन्ट'शी चाललेल्या चर्चेतले काही दचकवणारे शाब्दिक उल्लेख, दरवाजाच्या काचेवर खजुराहोची चित्रं. माझा संकोच अनेक पटींमधे वाढतो. परतच जावं का असाही एक विचार. पण त्यामुळे आपल्या आजवर जोपासलेल्या कलाविषयक जाणिवांचा पराभव वगैरे होईल अशा विचारांत मी दरवाजा ढकलून आत जाते. आत जमिनीवर मांडून ठेवलेला सोंगट्यांचा मोठा पट, त्यावर फासे, टेबलावर टेराकोटाचा सुंदर तेलदिवा - त्याचं नक्षीदार हॅन्डल, कोप-यातल्या आफ्रिकन पुतळ्याच्या हातातलं लांब कणीस, निळ्या काचेच्या चायनीज सुरईवरच्या गूढ, पौर्वात्य आकृत्या, पंचधातूच्या घंटा, कांगरा शैलीतल्या रागमाला मिनिएचर्सची रांग. एक ना हजार कलात्मक वस्तू. नुसतीच नजर फिरवताना मी जराशी गोंधळून जाते. यात इरॉटिक काय आहे नक्की?
बाजूच्या भिंतीवर एक भलमोठं पेंटिंग. विलक्षण देखणं दृश्य आहे त्यावर. अथांग वाळवंटात दूरवर पसरलेले सोनेरी वाळूचे लहानमोठे उंचवटे. उन्हात झगमगणा-या वाळूच्या त्या टेकड्यांवरून सांजसावल्यांची आकर्षक वळणं घरंगळत माझ्यापर्यंत येऊन पोचणारी.
अनिमिष नजरेनं मी बराच वेळ ते चित्र निरखून पाहते.
"जवळून नाही पाहायचं हे पेंटींग. मागे ये आणि बघ." मागून कोठारींचा आवाज येतो.
मी ते उभे असतात तिथपर्यंत जाते. आता पेंटिंगच्या आणि माझ्या मधे पाच-सहा फुटांचं अंतर आहे. मी पेंटिंगकडे पहाते आणि थक्क होते. सोनेरी, झगमगत्या वाळूच्या टेकड्या आता तिथं नाहीत. विवस्त्र तरुणींचे पालथे देह त्या कॅनव्हासवर आहेत. देहावरची नग्न, कमनीय वळणं स्पष्ट उठून दिसत आहेत.

यशोवर्धन यांचे ’सॅण्ड ड्यून्स’ (सौजन्य: श्री. प्रकाश कोठारी आणि श्री. हेमंत दैय्या)

5 comments