तू अकाली बाई झाल्यावर...


काल,
तुझ्या अल्लडतेसह
उधळले पावसाचे चार चिंब थेंब,
सिटीप्राईडचे नाईट शो
पावसात भुरभुरतं नाईट रायडिंग
आणि टपरीवरच्या चहासाठी
सार्‍या कोथरूडची पायपीट...
चतु:शृंगीच्या पायर्‍यांवरील
खिचडीचे अर्धेर्धे घास...
क्षण तास प्रहर दिवसांशी
कवितेनं फुललेले श्वास
माझ्या कवितांवरून फिरणारं
तुझ्या पापण्यांचं मोरपीस...
ओठांची थरथरती फुंकर
आणि पाठीवरची घट्ट बोटं...
आज,
तू अकाली बाई झाल्यावर...
मुकं आभाळ, मुकी कविता
मुक्या कवितेवर, मुक्या पापण्या
मुक्या सार्‍या भावभावना
नुसतं मुकं मुकं जगणं...
दोन पावलांची अखंड पायपीट
रात्र रात्र अवकाळी पाऊस, पानझड
अन् आठवणींचा चिखल नुसता
आपल्या मैत्रीच्या समाधीवर...
- संतोष पारगावकर
Post a Comment