विशेष विभाग: लैंगिकता आणि मी


(चित्र जालावरून साभार)
रेषेवरची अक्षरेच्यालैंगिकता आणि मीया विशेष विभागात आपले स्वागत. गेल्या वर्षीही आम्ही वेगळ्या विषयावरच्या विशेष विभागाचे आयोजन केले होते. लेखकांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती कल्पना आम्हाला रद्द करावी लागली.
या वर्षी तसे झाले नाही.
लैंगिकता आणि मी- "या विषयासंदर्भात आम्ही काही लिहू असे वाटत नाही", "विषय कम्फर्टेबल वाटत नाही" अशा काही अपवादात्मक प्रतिक्रिया (अनपेक्षित लेखकांकडून) मिळाल्या ते सोडले, तर या विषयावर लिहिण्याच्या आमच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रतिसाद मिळण्याचे कारण विषयाची निवड असू शकते का? असूही शकेल. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर यावर विचार करण्याइतकी सवडच आम्हाला मिळालेली नाही. अर्थात तसे असेल तर चांगलेच आहे. संस्कृतीने दडपलेल्या कोणत्याही गोष्टीला विचारमंथनाचा खुला वारा लागलेला केव्हाही चांगलाच.
आलेल्या लेखांमधून काही विचारमंथन झाले आहे का?
या विषयावर काही वेगळे, वैचारिक वाचायला मिळते आहे का?
ते तुम्ही ठरवायचे आणि आम्हाला सांगायचे.
वैचारिक काही मिळावे हा विचार लेखन मागवण्यामागे नक्कीच होता.
अजूनही काही अपेक्षा होत्या ज्या काही() प्रमाणात पूर्ण झाल्या.
काय अपेक्षा होत्या आमच्या? मुळात हा विषय आम्ही विशेष विभागासाठी निवडण्याचे कारण काय होते?
सुरुवातीला फारसे काही खास कारण नव्हते. ब्रेनस्टॉर्मिंगमधे हा विषय सुचला इतकेच. मात्र एकदा विषय सुचल्यावर लेखन मागवताना काही ठोस अपेक्षा मनात आल्या. त्या स्पष्टपणे लेखकांसमोर मांडणे मात्र आम्ही जाणीवपूर्वक टाळले. आधीच सुचवलेल्या विषयावर लिहायचे ही कठीण गोष्ट, त्यात अपेक्षांचे ओझे. लेखकमंडळी बिचकली असती.
लैंगिकतेवरचे तुमचे वैयक्तिक विचार मांडा- इतकेच मग आम्ही सांगितले.
लैंगिकतेचा अर्थ इथे वैयक्तिक, शब्दश:, प्रतीकात्मक अशा कोणत्याही प्रकारे घेणे अपेक्षित होते.
काही जणांचा इथे काहीसा गोंधळ झाला.
स्वत:च्या अनुभवाला सामाजिकतेची, सार्वजनिकतेची, सार्वकालीन अनुभवाची जोड नक्की कशी द्यावी हे काही लेखकांना कळेना.
काहींना ते जमले, काहींना नाही.
ब्लॉगिंग करताना वैयक्तिकतेमधून सार्वकालीनतेकडे जाणे जसे काहींना जमले, काहींना नाही त्यासारखेच हे.
प्रयत्न केला त्या सर्वांचेच स्वागत.
सर्जनशीलतेच्या मागच्या काही प्रेरणा शोधताना त्यात लैंगिकता हीसुद्धा एक महत्त्वाची प्रेरणा असू शकते या विचाराचा आत्तापर्यंत कधी धांडोळा (निदान मराठीत) घेतलाच गेलेला नाही. सर्जनशीलता आणि लैंगिकता यांचा परस्परांशी जवळचा काहीतरी संबंध आहे हे नक्कीच.
प्राचीन साहित्यात कालिदास आणि जयदेवाने कुमारसंभव, गीतगोविंद यांसारख्या रचना करताना उत्कट शारिरीक-मानसिक पातळीवरचे प्रेम, विरह, शृंगार, वियोग, दमन, व्यभिचार इत्यादी भावना उत्कृष्टरित्या अभिव्यक्त करून ठेवल्या. हे लेखक वैयक्तिक पातळीवर प्रिय व्यक्तीच्या विरहातून जन्मणा-या तीव्रतम लैंगिकतेच्या जाणिवा अनुभवत होते हे सर्वश्रुत आहे. लैंगिकता आणि सर्जनशीलतेच्या परस्परपूरक संबंधाचे इतके उत्कट उदाहरण दुसरे नाही. लैंगिकतेचा हा वारसा आपल्या कुवतीनुसार शतकानुशतके भारतीय साहित्यिकांनी गिरवला. पण त्यात कालानुरूप फार काही वेगळेपणा उमटू शकला नाही. आपल्या वैयक्तिक लैंगिक जाणिवा इतक्या तीव्रतेने आणि खरेपणाने साहित्यातून अभिव्यक्त करणे सोपे नाहीच.
वैयक्तिक पातळीवर लैंगिकता ही शारीरिक, वैचारिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा असंख्य थरांमध्ये आपल्या आख्ख्या जीवनालाच दुस-या कातडीप्रमाणे वेढून बसलेली असते. तशीच सर्जनशीलताही.
प्रत्येकाच्या आनंदाच्या, मजेच्या, तत्त्वाच्या जाणिवा जशा वेगवेगळ्या, तशाच लैंगिकतेच्याही वेगवेगळ्याच. मराठी साहित्यात या जाणीवा फारशा समर्थपणे उमटू शकल्या नाहीत. लैंगिकतेचे विरूपीकरणच जास्त झाले.
काही पाश्चात्य लेखकांच्या बाबतीत लैंगिकता आणि सर्जनशीलतेच्या संबंधाचा जाणीवपूर्वक शोध घेतला गेला. उदा. ख्रिस्तिना रोझेट्टी, जॉर्ज इलियट, एमिली डिकन्सन, टी.एस.इलियट, फेडेरिको गार्सिया, शार्लट म्यू, सिसिली हॅमिल्टन, व्हर्जिनिया वूल्फ, सिमॉन बोव्हा... भारतीय साहित्यात अमृता प्रीतम, कमला दास, हरिवंशराय बच्चन, मैत्रेयी पुष्पा, राजेन्द्र यादव अशा काही मोजक्या साहित्यिकांनी लैंगिकता आणि साहित्यनिर्मितीचा एकत्रितपणे विचार मान्य केला. काही अपवाद वगळता मराठी साहित्यात मात्र असे कोणी आढळत नाही.
ब्लॉगर्स म्हणजे नव्या युगाचे, नव्या माध्यमाचे लेखक. त्यांच्या लेखनामधून जे काही नवीन, सर्जनशील सापडते ते निवडूनरेषेवरची अक्षरेमध्ये सादर करण्याचा आमचा अट्टहास असतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहीत झालेले आहेच.
तर अशा या आजच्या लेखकांना लैंगिकता आणि सर्जनशीलतेचा काही परस्परसंबंध आपल्या लिखाणामधून जाणवतो का? जाणवत असला, तर त्यांच्या या जाणिवा नेमक्या कोणत्या सामाजिकतेतून, वैयक्तिक अनुभवांतून विकसित होत गेल्या आहेत, हे या निमित्ताने जाणून घेता येणे ही एक अपेक्षा नक्कीच होती.
स्वत:तून वाहणारा शुद्ध अभिव्यक्तीचा ओघ, संवादाची उच्चतम पातळी गाठत मुक्ततेसाठी धडपडत बाहेर येत आहे... या र्जेला मग लैंगिकता म्हणा किंवा सर्जनशीलता... नक्की काय फरक पडतो?
- संपादक

अनुक्रमणिका

*****
2 comments