Uncategorized

मुसळी..

“मुसली दे दो ना मुझे एक..”, मी म्हणालो.
लठ्ठपणामुळे अन शुगरची शंका येऊ लागल्यामुळे डॉक्टरांनी रोज सकाळी मला केलॉग्जची शुगर फ्री मुसळी दुधासोबत फळंबिळं घालून खायला सांगितली. ‘हाय फायबर’ डाएट. बाकी रोजची मिसळ अन वडेबिडे सगळे बंद. आता फक्त ड्रायफ्रूट क्रंची मुसळी.
मी हिरमुसल्या तोंडाने डॉक्टरांच्या क्लिनीकजवळच एका अनोळखी केमिस्टाकडे जाऊन मुसळी मागितली.
त्याने डाव्या बाजूच्या काचेरी कपाटातून एक छोट्या खोक्यातली बाटली काढून माझ्यासमोर ठेवली. मी एखादा मोठा खोका अपेक्षून वाट पाहत होतो. त्यामुळे बाटली हाती आल्यावर काहीशा बुचकळ्याने मी ती निरखून पाहिली. कोणत्याशा कुन्नथ फार्माने बनवलेली वैवाहिक जीवनात शक्ती भरणारी ती ‘मुसळी पॉवर’ कॅप्सूल होती.
माझी ‘पॉवर’ केमिस्टने जोखल्याने शरमिंधावस्थेत गेलेला मी तातडीने गैरसमज दूर करु लागलो, “अरे बाबा, ये मुसली नही रे. खानेवाला मुसली.”
“ये खाने का ही है”, केमिस्ट म्हणाला.
“अरे, दूध में मिला के वो सुबह को खाते है ना, वो.”
“हां, दूध के साथ ही लीजिये. ज्यादा फायदा होगा. लेकिन सुबह को मत लिजिये. रात को लिजिये.”
निरुत्तर होऊन ज्या कप्प्यातून त्याने ती बाटली काढली होती तिकडे मी एक नजर टाकली आणि विश्वरूपदर्शन झालं. शिलाजीत, जपानी तेल, टायगर कॅप्सूल, क्लायमॅक्स स्प्रे, अ‍ॅटमबाँब, टाईमबाँब, सुवर्ण-चांदी भस्मयुक्त सप्लिमेंट, ’केवल मर्दों के लिये’, ’मेक हर स्क्रीम’, व्हायग्रा, जियाग्रा, पेनेग्रा अश्या अक्षरांनी लडबडलेल्या शेकडो खोक्याबाटल्यांनी तो कप्पा खच्चून भरला होता. पैकी जपानी तेलाची जाहिरात टीव्हीवर पाहिली होती. ते प्रसिद्ध झाल्यावर आता ’जर्मन तेल’ही आलेलं दिसत होतं. जपान आणि जर्मनी हे देश महायुद्धात जबरदस्त झळ पोहोचलेले आणि त्यातून उभे राहिलेले दोन देश असल्यामुळे जपान-जर्मनी ही नावं एकत्र घेतली जातात. तेच नातं इथे लिंगशक्तिवर्धनक्षेत्रातही वापरलं गेलेलं दिसत होतं.
मला एकदम ’रेषेवरची अक्षरे’च्या संपादकांची ईमेल आठवली. ’लैंगिकता आणि मी’ अशी थीम यंदा घेऊन त्याच्या चौकटीत लिखाण करण्याविषयी त्यांनी सांगितलं होतं. माझ्या मनात या लिंगकपाटाच्या रूपाने रिमाइण्डर वाजल्यासारखा झाला. मग डायरेक्ट जंप मारली ती बालपणीच्या पहिल्या तत्सम आठवणीकडे.
“अरे, मगाशी जी तांबीची बस गेली ना त्यातूनच बाबा आले,” असं निरागस वाक्य चारचौघांत ओरडून माझ्या शाळूसोबत्याने म्हटलं होतं. तेव्हा आजूबाजूच्या आयाबाया तोंड लपवून का हसल्या ते कळलं नाही.
याच मित्रासोबत एकदा बाजारात फिरताना पिळदार शरीरयष्टीवाल्या मल्ल लोकांचे फोटो समोर ठेवून ’शक्ति’वर्धक औषधं विकणारा एक म्हातारा तिथे बसला होता. आम्हालाही तसंच पिळदार व्हायचं होतं. आम्ही दोघांनी त्या लहान वयात नगरपालिकेच्या व्यायामशाळेत बराच काळ आम्हांला झेपतील त्या साईझचे मुद्‌गल घुमवूनही तशी बॉडी आम्हाला मिळाली नव्हती. हा औषधाचा उपाय बरा वाटला. लहानपणी पोरांच्या हाती खर्चाला पैसे देण्याची पद्धत आमच्याकडे नव्हती, म्हणून आम्ही दोघे तडक आईकडे गेलो आणि त्या शक्तीच्या औषधासाठी पैसे मागायला लागलो.
दोन्ही आया पुन्हा एकदा तश्शाच हसल्या. आता मात्र “तुम्ही का हसताय?” असं आम्ही ठासून विचारलं.
“अरे, ती शक्ती म्हणजे तसली शक्ती नाही काही. ती वेगळी शक्ती. मोठ्या माणसांच्या शक्तीसाठी आहेत ती औषधं. तुम्ही नका जाऊ तिथे.”, इतकं एक्स्प्लेनेशन मिळालं.
नंतर रस्त्यात पडलेला वेगळ्याच मटेरियलचा आणि आकाराचा फुगा, भिंतींवर दिसणारी पाळणा लांबवणारी तांबी आणि खूपश्या अशाच काहीबाही गोष्टींतून अजिबात जाणीव नसतानाही आम्ही लैंगिक जगातच, पण एका पॅरेलल युनिवर्समधे जगत होतो.
मला वाटतं, चौथीत असताना वर्गातल्या एका पोराने मला पहिल्यांदा ’तसली’ काही गोष्ट असते हे सांगितलं. त्याच्या कन्सेप्ट बर्‍याच सत्याच्या जवळ जाणार्‍या होत्या. त्यामुळे मला त्यातून काही चुकीची माहिती मिळाली असं मी आता मागे पाहून नाही म्हणू शकत. त्यानेच नंतर मला ’बलात्कार’ शब्द सांगितला. शक्ती कपूर मीनाक्षी शेषाद्रीवर बलात्कार करतो असं त्याने म्हटल्यावर मी त्याचा अर्थ विचारलाच. तेव्हा त्याने मला विचार करून सांगितलं की, “बलात्कार म्हणजे इकडे तिकडे हात लावून सतवतो तो तिला.”
मी गोराचिट्टा होतो. आणि तसा नाजूकही. शाळेत एक सर माझ्याशी बोलता बोलता नेहमी माझ्या अंगावर आणि मांड्यांवर हात फिरवायचे ते आता आठवलं. त्या वेळी ते नुसतंच अप्रिय, नकोसं वाटायचं. त्यांना मी टाळायचो. आता मागे वळून पाहताना त्यांचा लडबडलेला उद्देश स्पष्ट दिसतो. पण त्या गोष्टीमुळेही काही खास मनात राहिलं असं नाही, किंवा त्याचा टिकून राहणारा प्रभाव राहिला असं नाही.
हायस्कूलच्या शेवटाला मात्र अगदी माहितीचं पेवच फुटलं. भरगच्च उरोज आणि राकट हातवाली मासिकं आणि कादंबर्‍या. लायब्ररीत पुस्तक हाताळत नेमकी तेवढीच पानं पुन्हा पुन्हा वाचायची. राकट, कणखर पुरुष हाच खरा मर्द आणि धसमुसळेपणाने केलं की पोरीला आवडतं अशी समजूत साहजिकच झाली होती. त्याच वेळी अचानक ’गे’ या विषयाची माहिती झाली. त्यामुळे इतकं अस्वस्थ वाटायचं की आपणही ’गे’ तर होणार नाही ना असा धास्तीपूर्ण विचार मनात यायचा. जणू साधासरळ मनुष्य एके दिवशी काहीतरी आजार व्हावा तद्वत ’गे’ बनतो अशी माझी समजूत झाली होती. त्यामुळे इतर मुलांविषयी आणि पुरुषांविषयी तसले विचार आपल्या मनात येऊ नयेत म्हणून उगाच धडपड करत राहायचो आणि त्यामुळे उलट ’मन चिंती’ न्यायाने वाईट विचार निसटते स्पर्श करून जायचे.
त्यानंतर एड्सची माहिती समोर आली आणि एक भयपर्व सुरू झालं. ’गे’ असलं की एड्स होतो अशी त्या वेळी प्रचलित समजूत होती. त्यामुळे आपण ’गे’ झालो तर आपल्याला एड्स आपोआप होईलच अशा जेन्युईन धसक्याने ’गे’ची भीती अजून शतपटींनी वाढली. अगदी मंत्रचळ म्हणता येईल अशा पातळीला वर्तणूक पोहोचली.
नंतर काळासोबत हेही वादळ शमलं.
कॉलेज लाईफ सुरू होताहोता थेटरात अ‍ॅडल्ट सिनेमांना जाण्याचं धाडस आलं. आपण लहान दिसू नये म्हणून पानबीन खाऊन तोंड लाल करून डोअरकीपरसमोर जायचं. शिवाय अश्लील व्हिडीओ कॅसेट्स लायब्ररीतून हिकमतीने मिळवून आणणं आणि व्हीसीआरवर पाहणं हाही एक गुप्त उद्योग मित्रांमधे सुरू झाला. सर्वच जण एकांतात फँटसाईझ करायचे. “तसं कोणी केल्यास ते नैसर्गिक आहे, पण आपण स्वतः मात्र ते करत नाही,” असंही आवर्जून सांगायचे.
आवडणार्‍या मुलींबाबत मात्र एकदम अशारीरिक प्रेम असण्याची स्वयंघोषित सक्ती होती. ’ति’च्याविषयी उघडेनागडे लैंगिक विचार मनात यायचे नाहीत. अगदी खोल कुठेतरी ’ति’ला आम्ही स्वतःच स्वतःपासून वाचवत होतो असं आता वाटतं. ’मानसिक कौमार्य’ नावाचा काहीतरी भाग असावा आणि तिच्या-आपल्या बाबतीत तो जपावा अशी तीव्र इच्छा असायची. ’ति’च्याविषयी विचार म्हणजे नुसते पवित्र, रोमँटिक; नुसतं तिच्याशी बोलावं; मॅक्स म्हणजे हातात हात घ्यावा; वगैरे इतकंच. त्याच वेळी इतर सुंदर किंवा दुष्प्राप्य मुलींचा मात्र स्वतःच्या मनात अन्‌ स्वतःच्या बाथरूममधे ’मानसिक’ कौमार्यभंग व्हायला आमची काही हरकत नव्हती. मला वाटतं स्वतःची ’ती’ लग्नापर्यंत स्वतःसाठी ’अनाघ्रात’ जपून ठेवण्याचा हा काहीसा वेडगळ प्रकार होता.
त्यानंतर सेक्स हा खूप वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत गेला. पण आता पोरंबाळं होऊन बापमाणूस झाल्यावर या विषयाविषयी काही गोष्टी ठामपणे माझ्या मनात येतात आणि आता त्या मांडाव्या यासाठी मस्तशी संधी ’रेषेवरच्या अक्षरां’नी मला दिलेली आहे.
मला असं वाटतं की सेक्स ही एक सुखद, आनंदाची क्रिया असू शकते असं त्याला आपल्या देशात प्रोजेक्ट केलंच जात नाही. पॅरेडॉक्स असा की पूर्वी कामसूत्र लिहिलं गेलं ते इथेच. ते मी विकत आणून नीट पाहिलं. अत्यंत अनवट अशा निरनिराळ्या पोझिशन्सनी ते भरलेलं आहे. त्यातल्या बहुसंख्य सामान्य माणसाला जमणं बापजन्मात शक्य नाही. अ‍ॅक्रोबॅटिक कसरती आहेत सगळ्या. पण तरीही एक फँटसी म्हणून किंवा आनंद म्हणून तिथे सेक्सकडे पाहिलं गेलंय. पिवळी पुस्तकं, ’चंद्रलोक’सारखे अंक हेही उथळ किंवा चावट पातळीवरून, पण एक मजेशीर, आनंददायक बाब म्हणून या विषयाकडे पाहतात. त्यातून योग्य माहिती मिळत नसली तरी.
पण योग्य माहिती आणि तीही आनंदासाठी, उपभोगासाठी उपयोगी पडेल अशी सहजपणे सर्वांपुढे येत नाही आणि अडनिड्या वयात पोरांना वाचायला, बघायला मिळत नाही. मिळालंच तर मिळतं ते एक तर ’सावधान’चा इशारा देणारं शास्त्रीय ज्ञान किंवा एकदम सविताभाभी. माहितीपर पुस्तकं आणि शिक्षणाच्या दृष्टीने सेक्स म्हणजे निव्वळ ’खबरदारी’.
सेक्स म्हणजे ’एड्स’.
सेक्स म्हणजे ’अनचाहा गर्भ’.
आणि त्या एड्सविषयक सरकारी जाहिरातीही धोकादायक जाहीर कराव्या अशा असतात. मला तर धक्क्यावर धक्के बसत आलेत त्या ऐकून आणि पाहून.
सरकारी कौन्सेलर बाई एड्सयुक्त किंवा एच.आय.व्ही.युक्त पुरुषाला एच.आय.व्ही.सहित जीवनाचं इतकं आशादायी चित्र दाखवतात की त्याने एच.आय.व्ही. बाधा झाल्याबद्दल देवाचे आभार मानावे. शेवटी एच.आय.व्ही.युक्त किंवा एड्ससहित आयुष्य कित्ती कित्ती छान ते सगळं ऐकून झाल्यावर एड्सयुक्त पुरुष लाजत कौन्सेलर बाईंना बायकोशी शरीरसंबंधांविषयी ’कामा’चा प्रश्न विचारतो. कौन्सेलर बाई न लाजता खट्याळ हसून सांगतात “बस… कंडोम का इस्तेमाल कर के आप बिलकुल पहले जैसे यौन संबंध रख सकते हैं.” आँ?! तो कंडोम फेल झाला की एरवीची जास्तीत जास्त रिस्क ‘प्रेग्नन्सी’एवढी मर्यादित असते. पण या एच.आय.व्ही.युक्त पुरुषाच्या अभागी अर्धांगिनीबाबत त्या ‘तीन टक्के फेल्युअर रेट’मुळे एच.आय.व्ही. संसर्ग + प्रेग्नन्सी + एच.आय.व्ही.युक्त बाळ इतकी अफाट ‘शक्यता’ही शक्यतेत येऊ शकते. हे यांच्या लक्षात नाही येत?
कौन्सेलिंगमध्ये हेही सांगतात की चुंबनाने वगैरे एड्स होत नाही. पण पुढे हेही सांगतात की चुंबन अतिरिक्त नसावे. चुंबनसमयी तुमच्या दोघांच्या तोंडी जखम असेल तर मात्र संसर्ग होऊ शकतो. आता काय करावं? चुंबन घेताना ते घाबरत घाबरत वर वर घ्यायचं का? बरं, रोगप्रसार होण्याइतपत खोल चुंबन किंवा डीप कीस, म्हणजे नेमकं किती हे काही मोजून मापून कौन्सेलिंगमधे सांगता येत नाही. तुमच्या तोंडात कसलीच जखम अल्सर वगैरे नसल्याची खात्री. समोरच्या व्यक्तीच्या तोंडात कसलीच जखम अल्सर वगैरे नसल्याची खात्री. किती किती खात्री करून घ्यायची?
त्यापेक्षा सरळ लग्न करून मग सेक्स, चुंबनं वगैरे सर्व काही करावं आणि महत्त्वाचं म्हणजे लग्नापूर्वी दोघांची तपासणी करून मनःशांती मिळवावी ही सोपी पद्धत का येत नाही?
अगदी लग्नाशिवायही सेक्स करायचा असेल आणि आपल्या पार्टनरविषयी थोडीशीही शंका असेल तर कशाला तपासणी तरी करायची? सेक्स टाळणं इतकं अवघड आहे?
आणि त्याउपर समजा प्रेमबीम काही नाही, आपलं एक शारीरिक गरज म्हणून कोणाशीही सेक्स करायचाच असेल, तर मग त्यातली रिस्क घेऊनच तो केला पाहिजे. प्रत्येक संबंधापूर्वी एड्स तपासणी शक्य नाही आणि रिलायेबलही नाही. सरकार एकीकडे एड्सग्रस्तांना त्यांचं ’एड्सग्रस्त’ हे स्टेटस पब्लिकमधे उघड होऊ नये हा अधिकार देतं (अ‍ॅनॉनिमिटी) आणि त्याच वेळी इतरांना ’सावधगिरी’ बाळगायला सांगतं. हा काय प्रकार आहे?
एड्स झालाच तर त्यासहितही जगता येतं. त्या आयुष्यातही इतर खूप सकारात्मक बाजू आहेत हे दाखवता येतं आणि दाखवायलाच हवं. पण एड्स रुग्णांना नॉर्मल जगता यावं या अट्टाहासापायी त्यांचं एड्सग्रस्त असणं ऊर्फ डायग्नोसिस गुप्त ठेवण्याचं धोरण. हा कसला ’हक्क’?
एड्स जाऊ दे. नुसत्या साध्या निरोगी सेक्सला चिकटलेला स्टिग्माही जाम इंटरेस्टिंग आहे. मधेच दुपारच्या लंगोटीपत्रांतून वेगवेगळे सर्व्हे प्रसिद्ध होतात. त्यात पंधरा वर्षांखालील अमुक इतक्या मुलांनी/ मुलींनी सेक्सचा अनुभव घेतला आहे. किंवा अमुक टक्के अल्पवयीन मुलं-मुली अमुक प्रकारे सेक्स करतात, अमुक टक्के विवाहित स्त्रिया विवाहाबाहेर संबंध ठेवतात, हे प्रमाण १९८० पेक्षा अमुक टक्क्यांनी वाढले आहे, अशा प्रकारचे सनसनीखेज निकाल येत असतात.
विवाहापूर्वी केवळ सेक्स घडला की मुलीचा कौमार्यभंग होतो. केवळ सेक्स घडला की मुलगी चवचाल होते. तीच क्रिया विवाहात घडली की मात्र ती कायदेशीर आणि सर्वमान्य होते. त्याची चर्चाही होत नाही. अळीमिळी गुपचिळी. अगदी स्वपुरुषाकडून बलात्कार झाला तरी काही ’उद्ध्वस्त’ होत नाही.
आहार, विहार, निद्रा आणि त्यांच्याइतक्याच सहजतेनं अस्तित्वात असणारं मैथुन. त्याच्या एकट्याच्याच वाट्याला इतकी गुंतागुंत का यावी? केवळ त्यातून नवनिर्मिती होते म्हणून?
पण नीट विचार केल्यावर मला वाटतं, आता आहार हासुद्धा आनंदापेक्षा ‘खबरदारी’ घेण्याचा विषय होत चालला आहे आणि अधिकाधिक होतच जाणार आहे. सहज खात्री करुन घेण्यासाठी घरी बुकशेल्फावर नजर टाकली. ‘पथ्यकर पाककृती’, ‘डोंट लूज युअर माईंड, लूज युअर वेट’, ‘लठ्ठपणा’ अशी तीन पुस्तकं दिसली. मंगला बर्वेंनी लिहिलेली सुग्रास अन्नावरची पुस्तकं आता आउट ऑफ प्रिंट होतील आणि डॉक्टर आणि आहारशास्त्रज्ञांनी आहारावर लिहिलेली पुस्तकं स्वयंपाकघराच्या शेल्फवर येतील अशी दाट शंका आली. हळूहळू सेक्सप्रमाणेच अन्नग्रहण हे आनंदाचं साधन न राहता खबरदारी घेण्याचं प्रकरण होणार हे मी कळून खोल श्वास घेतला आणि खाली वाकून सुटलेल्या पोटाकडे सहानुभूतीने पाहिलं.
केलॉग्जची मुसळी काय किंवा कुन्नथ फार्माची मुसळी पॉवर काय, एकूण प्रकार एकच म्हणायचा.
– नचिकेत गद्रे
Facebook Comments

6 thoughts on “मुसळी..”

  1. आवडणार्‍या मुलींबाबत मात्र एकदम अशारीरिक प्रेम असण्याची स्वयंघोषित सक्ती होती. he baki khare ho

  2. Gadre, nehmi pramanech bold tarihi balanced. Khup mahatwach bolalas: aaplyakade sex hi goshT fakt stigma mhanunach project keli jate. Nisargacha awibhajya bhaag mhanun nahi. Scientific drushtikon tar khupach laamb rahila.

  3. आवडला लेख.
    मानसिक कौमार्य.. यावर आधी हसले मग विचार करू लागले.. दांभिकतेचा इतका सॊलिड आरसा दुसरा कुठला. 🙂
    जियोच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *