Uncategorized

दुसरी पायरी

स्वतःचे समलिंगित्व उमजणे हे जेव्हा व्हायचे तेव्हा आपोआपच होते. पण ती ओळख स्वतःसाठी अगदी सहज होणे ही पुढची पायरी. त्यानंतर ती ओळख घेऊन समाजातला वावर आयुष्यभर व्हायचा असतो – आणि जर स्वतःचा स्वतःशीच झगडा होत असेल, तर लोकांशी वर्तन करताना गुंतडे होणार नाहीत तर काय?
पहिल्यावहिल्या अस्फुट भावना म्हणजे इंद्रियांच्या साहजिक संवेदना. त्या भूमिगत स्तरावर आपोआप जागृत होतात. तीच उमज जाणिवेच्या स्तरावर येता-येता बराच उशीर होऊ शकतोही – याचा अनुभव मला आहे, तो आजचा विषय नाही. पण त्या जाणिवेनंतरही कित्येक समलिंगी व्यक्ती तिथे वर्षानुवर्षे अडखळतात, कित्येक लोक आपल्या स्वतःला दोष देत देत, आपल्या जाणिवेला खोटे म्हणत कितीतरी वर्षे तळमळतात, त्याबद्दल एक-दोन लोकांचे अनुभव सांगतो.
सुदैवाने या तळमळीचा अनुभव मला नाही. संवेदनांची आणि भावनांची जाणीव झाली आणि ’अरे, ही माझी नवीन ओळख म्हणजे एक खर्‍याखुर्‍या आणि प्रामाणिक भावना असलेल्या माणसाची ओळख आहे’ हे आनंदाने समजायला, आणि त्या नवीन ओळखीत स्वतःला सहजपणे पाहायला मला एक क्षण पुरला. समलिंगितेविरुद्ध बिंबवून-ठसवून ठेवलेली भीती म्हणा, किळस म्हणा, पापभावना म्हणा हे माझ्यात नव्हतेच. कित्येकांना या जात्या शत्रुभावनांचे आंतरिक समर सोसावे लागते.
माझ्या बाबतीत झाले ते बरेचसे अनायासे झाले खरे. हिंदू धर्मशास्त्रात समलिंगितेचा विरोध आहे, याचा मला मुळी पत्ता नव्हता – कारण धर्मशास्त्रातील तपशील आजकाल देवभिरू नागर सुशिक्षितांपैकीसुद्धा कोणाला ठाऊक असतात? लहानपणी माझ्या एकाच आप्ताशी यापूर्वी माझे समलिंगितेविषयी उडतउडत बोलणे झाले होते – माझ्या थोरल्या भावाशी. आणि त्याने “समलिंगी लोक किळसवाणे आहेत असे जे काय कधी कधी ऐकायला मिळते, ते काही स्पष्ट सत्य वगैरे नाही. थोडा विचार केला तर हे फक्त आपल्या वैयक्तिक इच्छेपेक्षा वेगळे आहे, इतकेच!” असे काहीसे म्हटले होते. भावाशीसुद्धा फार चर्चा अशी झाली नाही. त्यानेसुद्धा गंभीर विचार केलाच नव्हता, असे पुढे त्याने मला सांगितले. खरे तर अशी आम्हा दोघांची उडत-उडत चर्चा झाल्याचेही त्याला आठवत नाही. माझ्या आईवडिलांचे मत या ’जो जे वांछील’पेक्षा विपरित होते, मोठे कलुषित होते, हे मला फार नंतर कळले. कारण लैंगिक बाबतीत आईवडिलांशी लहानपणी कधी बोलणेच झाले नव्हते. ही बाब यादृच्छिक होती – जर माझ्या पौगंडावस्थेत आईवडिलांशी असे बोलणे झाले असते, तर त्यांच्या बोलण्यातून माझ्या मनात काय पूर्वग्रह उतरला असता, कोणास ठाऊक.
माझ्या वैद्यकीय शिक्षणात ’समलिंगी लोक असतात, हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे’ वगैरे माहिती मी शिकली. परंतु त्याच काळात ’ही विकृती आहे, की त्या व्यक्ती-व्यक्तीत भिन्न असलेली प्रकृती?’ याबाबत वैद्यकात ऊहापोह चालू होता. या चर्चेचा सूर रुक्ष का असेना, तरी समलैंगिकतेबाबत टोकाची नकारात्मक चर्चा वैद्यकीय शिक्षणात झाली नाही. जर वैद्यकीय शिक्षणाऐवजी दुसरे कुठले शिक्षण घेतले असते, तर कदाचित ’ही प्रकृती असायची शक्यता आहे’ ही कल्पना मनात राहिली नसती, आणि विकृती असल्याचा लोकप्रवादच मनात मुरला असता का, तेही कोणास ठाऊक.
होय, माझ्या आजूबाजूच्या समाजात नरम नपुंसकत्वाची भरपूर चेष्टा होती, आणि स्त्रीवेष करणार्‍या भसाड्या हिजड्यांबाबत घृणाही पदोपदी ऐकू येई. परंतु यांच्यासारखे माझ्यात काहीच नव्हते – ना अकार्यक्षम इंद्रिये, ना स्त्रीवेषाची इच्छा – त्यामुळे मला स्वतःविषयी शल्य किंवा घृणा वाटण्याचे काहीच कारण नव्हते. आता हे सर्व प्रकारही बहुधा व्यक्तिगत प्रकृतीच. ती माझी प्रकृती असती, तर मला स्वतःबाबत घृणा वाटलीही असती. म्हणजे आंतरिक समर न होण्याबाबतीत हे सुदैवच म्हणावे. ज्या एकदोन गोष्टींबाबत मला फाजील घृणा होती, त्या गोष्टींपेक्षा माझा स्वभाव विपरित होता. जर माझा पिंड तसा असता तर? पण जर-तरच्या गोष्टी सोडून देऊया. माझ्याबाबत ही गोष्ट मान्य करू या, की पहिल्या पायर्‍या मला सोप्या गेल्या त्याचे श्रेय एक तर निसर्गाला दिले पाहिजे – अस्फुट भावना आणि ऐंद्रिय संवेदनांबाबत, आणि दुसरे बहुतेक योगायोगाला – मला झालेल्या आंतरिक जाणिवांबाबत मलाच घृणा नसल्याबाबत.
खरे तर ज्याला मी आंतरिक समर म्हणतो आहे, ते पुरते आंतरिक असे समर नसतेच. समाजाने बिंबवून दिलेल्या, बाहेरून आलेल्या शिकवणीची आंतरिक ऊर्मीशी ही झुंज असते. या प्रकारची काही उदाहरणे मी माझ्या मित्रांमध्ये आणि परिचितांमध्ये बघितलेली आहेत.
माझा एक परिचित – त्याला रॉबर्ट म्हणू या – पाच-सहा वर्षांपूर्वी त्याच्या चाळिशीत मला भेटला. त्याने तेव्हा सांगितलेली कथा अशी: लहानपणापासून ख्रिस्ती धर्माच्या मोठ्या पगड्याखाली होता. शारीरिक-भावनिक जाणीव झाली पौगंडावस्थेत, तर “देवाय स्वाहा, इदं शरीरं न मम” म्हणून ब्रह्मचारी फादर होण्याची पळवाट जशी कॅथलिकांमध्ये असते, तशी या प्रोटेस्टंट रॉबर्टकडे नव्हती. स्त्रीशी लग्न करून संतती उत्पन्न करण्याशिवाय वेगळा पुण्यमय जीवनाचा मार्गच त्याला ठाऊक नव्हता. पापी लोकांपासून दूर राहावे, म्हणून तो चर्चसाठी पूर्ण वेळासाठी स्वयंसेवक झाला. अमेरिका सोडून स्पॅनिशभाषक परदेशात पंथप्रसार करावयास गेला. चर्चमधील पुण्यश्लोक लोकांचाच सहवास ठेवल्यामुळे शरीराला मोह पाडणारा कुठलाच प्रसंग येणार नाही असे त्याला वाटले. त्याच्याविषयी आत्मीयता वाटणार्‍या एका बाईबद्दल परस्पर आकर्षण वाटत असल्याची रॉबर्टने आपली ठाम समजूत करून घेतली. आता हे एक बरे – चर्चमधील इंद्रियनिग्रही समाजात “आपण तुझ्याशी लग्न होईस्तोवर संबंध ठेवणार नाही, मोह होऊ नये, म्हणून स्पर्शसुद्धा कमीत कमी करेन,” असे म्हणता येते. शारीरिक आकर्षण नाही याबाबत काणाडोळा करून नैतिक अधिष्ठान आहे अशी बाईचीच नव्हे स्वतःचीही फसगत करण्याची त्याला सोय होती. या मैत्रिणीशी वाङ्निश्चयाचे हे कथानक काही वर्षे चालले. शेवटी तिने “लग्न करतोस की नाही” असा निर्वाणीचा प्रश्न विचारला. सुदैवाने याने “नाही” म्हटले. एवढ्या प्रणयानंतर नकाराचे कारण म्हणून खरे सांगायची वेळ आली. मुख्य म्हणजे वेळ आली, तेव्हा त्याने खरे सांगितले. मग चर्चची स्वयंसेवी संघटना सोडावी लागली. होय – त्या बाईबद्दल सहानुभूती वाटल्याशिवाय राहत नाही. पण तरी रॉबर्टच्या उशिरा का होईना, आलेल्या अवसानाने मी अवाक होतो. वाङ्निश्चय मोडलेल्या बाईला कमीत कमी तिच्या चर्चमधील समाजाचा सहारा होता. याला तो सहाराही पारखा झाला. ’पापविचारापासून’ पळण्यासाठी त्याने जीव चर्चच्या स्वयंसेवी संस्थेवर ओवाळून टाकला होता, त्या चर्चबाहेर त्याला कोणीच मित्र नव्हते. खरेपणा स्वीकारल्यामुळे रॉबर्ट पुरता वाळीत पडला. आणि मुख्य म्हणजे हे सगळे ज्या समलिंगी संगतीकरता तो सोडून निघाला, तिथे त्याला असे जीवश्चकंठश्च आप्त मिळाले का? आधार सोडताना अशी समलिंगी बंधुत्वाची स्वयंसेवी संस्था थोडीच माहीत होती त्याला कुठली!
रॉबर्ट मला भेटला, तो प्रणयाराधक म्हणून. पण त्याची कथा ऐकून मी खुद्द त्याच्याविषयी सहानुभूती राखून होतो, इतकेच. जीवनसाथी काय, तात्पुरता प्रियकर म्हणूनदेखील ही फिस्कटलेली मनःस्थिती मला गळ्यात पडलेली नको होती. आणि मी तर सहानुभूती असलेला! बहुतेक लोकांना स्वतःच्या तारुण्याचे मातेरे केलेल्याबद्दल सहानुभूतीदेखील वाटत नाही.
पण रॉबर्टचे आगीतून फुफाट्यात पडणे म्हणजे पूर्ण शोकांतिका नव्हे. आगीत राहिले तर जळून नि:शेष होण्याशिवाय गत्यंतर नाही. फुफाट्यातून तडफडत तडफडत एखाद्याला बाहेर पडायची संधी तरी असते. चाळिसाव्या वर्षी त्याची खरी तगमगती मानसिक पौगंडावस्था सुरू झाली – उशिरा का होईना, पण रॉबर्ट प्रामाणिकपणे प्रणयाराधन करू लागला होता. माझी त्याची सुरुवातीची असफल भेट झाली होती त्यानंतर चारेक वर्षांनी, नुकता-नुकताच रॉबर्ट मला रस्त्यात भेटला. त्याच्या काही मित्रांच्या गराड्यात खळखळून हसत हसत चालत चालला होता. मला वाटते, त्याने मला नीट ओळखले नाही.
माझ्या सलामीला त्याने उत्तर दिले “तुझी माझी भेट… कधी झाली रे? तुझे नाव… आठवेल… सांगू नकोस…” त्याला आठवले असते, त्यापेक्षा त्याच्या विस्मरणातच मला अतिशय आनंद झाला. जो जखमी मनुष्य मला काही वर्षांपूर्वी भेटला होता, तो खरा रॉबर्ट नव्हताच. माझ्याशी केलेले केविलवाणे प्रणयाराधन खर्‍या रॉबर्टने केलेले नव्हते. त्यावेळी एक एकाकी दुखावलेले पाखरू खुसपटून निवारा शोधत होते. हा खळखळून हसणारा रॉबर्ट खरा धडधाकट मनुष्य होता. पूर्वीच्या त्या डळमळीत मनःस्थितीतल्या ओळखींची आठवण अंधूक झाली हे अपेक्षितच नव्हे, अभिनंदनाच्या योग्य होते!
मी त्याला उत्तर दिले – “अरे बाबा, ओळखीचा दिसलास असे वाटले. कदाचित कुठल्या पार्टीत वगैरे भेटलो असू एकमेकांना – नीट आठवत नाही मलासुद्धा. चल, पुन्हा कधी असेच मजेमजेत भेटू – गुड नाईट!”
या अमेरिकन रॉबर्टचे सोडा. माझी एक मराठी मैत्रीण सुहासिनी, हिने काय केले? कॉलेजात – होय भारतातल्या कॉलेजात – ज्या एखाददुसर्‍या मैत्रिणींशी तिचे शारीरिक संबंध आलेत त्या मैत्रिणींनी ते तात्पुरतेच मानले. ठरवल्याप्रमाणे त्यांनी लग्ने केली. त्या आनंदी असल्याचेच सुहासिनीला दिसत होते. सुहासिनी गोंधळली. आपले जे आहे, तेही तात्पुरतेच आहे, असे तिने स्वतःला पटवून घेतले. “लग्न झाल्यावर नवर्‍याशी प्रेम करायला शिकू” म्हणून सुहासिनीनेही लग्न केले. पण प्रेमसंबंध निर्माण झाले नाहीत. ते कायद्याचे बंधन सोडवता सोडवता खूप-खूप जखमा झाल्या. पण काही म्हणा. रक्तबंबाळ काडीमोड करून कित्येक वर्षांनी त्या दोघांना स्वातंत्र्य मिळाले ते बरेच झाले. तो दुखावलेला-फसलेला नवरा पण घटस्फोटानंतर खरी प्रेम करणारी बायको मिळवायला मोकळा झाला. दु:ख एवढेच की दोघांची फुलपाखरी वर्षे वाया गेली. या कडवट आठवणींचे ओझे देऊन वाया गेली. सुहासिनीने पुढे ज्या जोडीदारिणींशी संबंध ठेवलेत, ते सगळेच काही दीर्घकालीन नव्हते. पण त्यांच्या असाफल्यातही स्वतःला किंवा दुसर्‍याला फसवल्याचा पश्चात्ताप नव्हता.
या रेटारेटीत एक लढाई आपण आपल्या स्वतःशीच लढत असल्याचा अनुभव – रॉबर्ट वा सुहासिनीसारखा – मला आला नाही, याकरिता मी माझ्या सुदैवाचा ऋणी आहे. तरी माझ्या सुदैवाबाबत बेसुमार उदोउदो नको. रॉबर्टला, तसेच सुहासिनीला नैसर्गिक ऊर्मी जाणवण्यानंतरची दुसरी पायरी ठेचकाळली, हे खरे आहे, तरी त्यांनी हुळहुळलेल्या मनाची निश्चेतन मुटकुळी केली नाही. येनकेनप्रकारेण पुढची पायरी सर केली. आता त्यांचा जीवनक्रम सुरळीत झाला का? ही दुसरी पायरी सुदैवाने सोपी गेलेल्या माझा जीवनक्रम सोपा आहे काय? नाही. आपण स्वतंत्र लोक एकतर्फी प्रेमात पडतो, तडफडतो. एकमेकांच्या प्रेमात पडतो, अखंड प्रेमाची वचने एकमेकांना देतो, मग भांडतो. प्रेमसंबंधात कधी समेट होते, तर कधी त्यांची शिवण उसवते. आपणा सगळ्यांकरता संसाराचा हाच रखडा. काही फरक आहेतच – पण मूलभूत असे बघितले, तर हे सगळे समलिंगी आकर्षणाच्या लोकांकरता आणि भिन्नलिंगी आकर्षणाच्या लोकांकरता वेगवेगळे नाहीत.
– धनंजय
(’मिसळपाव.कॉम’या संस्थळावर प्रकाशित झालेला लेखकाचा याच विषयावरील लेख: कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे)
Facebook Comments

5 thoughts on “दुसरी पायरी”

  1. नेहमीप्रमाणे धनंजय चा उत्तम लेख.अजुन समाजात लैंगितेबाबत बोलताना आडून आडून बोलायला लागत.समलिंगी मानसिकतेच वेगळेपण अधोरेखित करायला हा रेषेवरची अक्षरे हा अंक नक्कीच कामाला येईल

  2. आवडला हे वेगळे सांगायला नकोच; पण मन:स्पर्शी, मुद्देसूद आणि थेट तरीही भावनिक ओलावा जाणवणारा आहे, हे नक्कीच नमूद करावेसे वाटते. हॅट्स ऑफ टू यू!!

  3. हा लेख वाचताना सतत काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. कदाचित ह्या विषयावर फारसं लिखाण होत नाही, किंवा माझ्या वाचनात आलं नसेल म्हणून असेल. पण कशाचातरी ताळा बसत नाहीये असं उगीच वाटत राहिलं. शेवटपर्यंत.

  4. धनंजय, खूपच आवडला हा लेख! पूर्वग्रह, समाज आणि आंतरिक ऊर्मींमधली झुंज यांबद्दलची निरीक्षणं आणि शेवटच्या परिच्छेदातला निष्कर्ष मनापासून पटला. उत्तरं ठाऊक नसलेली एक प्रश्नांची माळपण डोक्यात सुरू झाली. व्यक्ती भिन्नलिंगी असो वा समलिंगी, तिला स्वत:ची ’लैंगिक ओळख’ असणं आवश्यक आहे, ही गोष्ट कुठल्याही समाजात कितपत मान्य केली जाते? स्वत:ची नुसती ’समलिंगी/भिन्नलिंगी’ म्हणून ओळखसुद्धा पुरेशी असते का? लैंगिकतेचा स्थायी नात्याशी संबंध जोडायची ऊर्मी हेच दुसर्‍या पायरीवर ठेचकाळणार्‍यांचं दु:ख असेल का? भारतात दोन भिन्नलिंगी व्यक्तींचं ठरवून / मनोमनी प्रेमात पडून लग्न झालं, आणि त्यांच्या शारीरिक गरजा (उदा. लिबिडोची सरासरी पातळी) खूपच वेगवेगळ्या असतील, तरीही त्यांचे फुलपाखरी दिवस नष्ट होतीलच ना?

  5. खरं सांगायच तर या लेखाबद्दल काय लिहाव ते सांगता येत नाहिये, या विषयाची एकूणच माहिती कमी म्हणा किंवा एक प्रकारची अनास्था म्हणा, समजत नाहिये काय लिहाव ते, पण लिखाण प्रामाणिक आहे, थेट आलेलं आहे हे जाणवल, या बद्दल अजून वाचण्यात आलं, तर काहीतरी ठाम मत तयार होईल कदाचित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *