Uncategorized

मॉडर्न फॅमिली

प्रवेश पहिला:
तुमच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी आहे, आणि त्याच्या मित्राला, स्टीवला, तुम्ही सांगता, “तू ये आणि आईवडिलांनाही घेऊन ये बरं का?” स्टीवच्या चेहर्‍यावर गोंधळ, आणि थोडीशी लाज वाटल्याचा भाव. “माझ्या दोन दोन मॉम आहेत. त्यांना आणू का?”
प्रवेश दुसरा:
ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वीचा शाळेतला एक दिवस. तासाच्या सुरुवातीला मुलांशी गप्पा मारताना मी म्हणाले, “मग सुट्ट्यांमधले कोणाकोणाचे काय काय बेत ठरलेत?” शांत डोळ्यांचा, थोडासा अबोल पण बराचसा मिश्कील केवीन म्हणाला, “मी केक आणि कुकीज बेक करणारे- आमच्याकडे दरवर्षी ख्रिसमस पार्टी असते, त्यासाठी.” मला कौतुक वाटलं. मी पुढे काही विचारणार, तोच त्याचे दोन मित्र खिदळले, “That’s like, so…gay!” आणि केवीनचंही त्यावर खो-खो हसत प्रत्युत्तर, “I know, right?…” म्हणजे ह्याने हुशारीने आपण गे नाही, अशी सुटकाच करून घेतली म्हणायची. हल्ली ह्या नवीन मुला-मुलींच्या तोंडी ’गे’ हा शब्द चक्क बिनडोक, नावडते, स्टुपीड ह्या कोणत्याही अर्थी येत असतो, पण त्यातला एकही अर्थ सकारात्मक नाही.
प्रवेश तिसरा:
आजी आजोबांना काळजी असते, आमच्या नातवाला मराठी येत नाही, आम्ही त्याच्याशी कसं बोलायचं? तुम्ही मनात विचार करता, “छे, मराठीचं काय येवढं? ह्या टोणग्याने पुढे मला चायनीज सून नाही आणली म्हणजे मिळवली!”. नवरा त्यावर म्हणतो, “अगं चायनीज का असेना, सूनच हवी- जावई नको!”
***
अमेरिकेचं वर्णन जर कोणी मला एका शब्दात करायला सांगितलं, तर मी म्हणेन… घाबरलात? ’गे’ नाही हो… मी म्हणेन… “पर्यायांचा देश”. इथे कॉलेज अर्धवट टाकलेल्या बिल गेट्सने इतिहास घडवला, आणि हार्वर्डमधून कायदा शिकलेल्या ओबामानेही. इथे तुम्हाला गव्हाची-मैद्याची अ‍ॅलर्जी असेल, तर बिनगव्हाचा ब्रेड खा, अंडे नको असेल तर बिन-अंड्याचे ऑमलेट खा, आणि लोणी नको असेल, तर “आय कान्ट बीलीव इट्स नॉट बटर” खा.
हा गमतीचा भाग झाला, पण एकूण एक गोष्टीत व्यक्तिस्वातंत्र्य असणे म्हणजे काय, हे सत्यात इथे अनुभवायला मिळतं. इथे तुम्हाला लग्न न करता मुलं होवोत, की ३ लग्नं करूनही न होवोत, कोणीही बोट दाखवणारं नाही. इथे तुम्ही खुल्लमखुल्ला गे, लेस्बियनच नव्हे, तर ट्रान्स किंवा चक्क बायसेक्शुअलही असू शकता. ह्या व्याख्यांबद्द्ल अगदी अडाणी असूनही मला एवढं मात्र कळत गेलं, की इथे कोणत्या ना कोणत्या व्याख्येत प्रत्येकाला ठाकून-ठोकून बसवायचंच, असला प्रकार नाही.
पण दुसरीकडे मनातले-जनातले ’प्रवेश’ चालूच होते. बरेचदा ’तो’ शब्द, चिवड्यात दाणे पेरावे तसा सहज ऐकू आला. पुस्तकातली संवेदनशील पुरुषाची व्यक्तिरेखा ’गे’, मुलांनी मोज्यांवरून सॅंडल चढवले की ’गे’, दोन मित्र/मैत्रिणींनी भावनात्मक पातळीवर काही शेअर केलं, की ’गे’… इतक्या सरधोपटपणे आपण समाजाच्या काही घटकांना लेबलं लावतो आहोत, हे बोलणार्‍यांच्या गावीही नसावं!
एकीकडे १९६० च्या सुमारास ‘स्त्रीमुक्ती चळवळी’ने अमेरिकेत मुळं पसरवली, तर त्यापाठोपाठच एलजीबीटी (LGBT) हक्कांचीही भाषा सुरू झाली. कॅलिफोर्निया राज्यात समलिंगी लग्नांना समाजमान्यता हळूहळू का होईना, मिळायला लागली, आणि पाठोपाठ कायद्यानेसुद्धा त्याला मान्यता दिली. पण दुसरीकडे टीव्हीवर गे-विनोदांचा उच्छाद मांडलेला, आणि त्यात गे पुरुषाला कपड्या-बुटांत-फॅशनमधे रस असणार, आणि लेस्बियन बायकांचे केस कापलेले, पुरुषी कपडे आणि घोगरा आवाज असणार.
टीव्हीवर, चित्रपटांमधे, स्त्री-पुरूष संबंधांचे चित्रण सर्रास दिसते, ते बघायला आपणही सरावलो आहोतच; पण तरीही गे व्यक्तिरेखा मात्र काहीशा साचेबंद पद्धतीनेच दाखवल्या जातात. गे-जोड्यांमधेही ’नवरा कोण – बायको कोण’ असे पारंपरिक रोल्स लादायचा प्रयत्न केला जातो. गंमत अशी की, आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचेच पितळ त्यातून उघडे पडत जाते. जास्त ’बायकी’ असेल ती बायको आणि जास्त अधिकार गाजवणारा/री असेल तो नवरा – असे हिशेब मांडले जातात.
‘द कलर पर्पल’सारख्या (The Color Purple) काही कादंबर्‍यांमधून चक्क नायिकेवर लहानपणीच बलात्कार झाल्यामुळे तिला पुरुषांबद्दल घृणा वाटायला लागली आणि त्याचा परिणाम म्हणून की काय तिला तिच्या मैत्रिणीबद्दल आकर्षण वाटायला लागलं असं दाखवलंय. सूर मात्र एकच, की ’गे’ प्रवृत्ती म्हणजे काहीतरी अनैसर्गिक किंवा विचित्र, अपवित्र आहे.
प्रवेश चौथा:
शाळेत ’रायन’चे वडील आले होते – रायन्स स्टोरी (Ryan’s Story) (दुवा: http://www.ryanpatrickhalligan.org/) सांगायला. पाचवीतल्या, केवळ १०-१२ वर्षांच्या, रायनने आत्महत्या करावी असं काय घडलं असावं? ही नवीन पिढी शाळेत तर अनेक तणावांना सामोरी जातेच, पण शाळेबाहेरही cyber-bullying नावाच्या भयानक प्रकाराने त्यांना ग्रासलंय. रायनला त्याच्या शाळेतल्या ’गुंड’ मुलांनी अतिशय चिडवलं आणि पदोपदी त्याला टार्गेट केलं. माय-स्पेस (My-space), फेसबुक (Facebook) सारख्या वेबसायटींवर त्याला चक्क ’गे’ म्हणून त्रस्त करून सोडलं. आणि एक दिवस हे सगळं असह्य झालं, तेव्हा मात्र रायनने स्वत:चा जीव घेतला. मुलांमधे नकळत ही दांडगाईची प्रवृत्ती वाढतेय, हे तर काळजीचं कारण आहेच; पण दुसरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे, ’गे’ हे संबोधन अजूनही कित्ती अपमानकारक आहे!
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही ’गे’ व्यक्तीला स्वत:ची ही ओळख कुटुंबीयांसमोर, जगासमोर सांगणे सहज शक्य नाही. सैन्यातल्या ’गे’ लोकांबद्दल तर एक विचित्र गुप्तता पाळतात, की तुम्ही सांगू नका नि आम्ही आम्हाला माहिती असल्याचं दाखवणार नाही, म्हणजे खुल्लमखुल्ला स्वीकारायचा प्रश्नच उद्भवत नाही!
प्रवेश पाचवा:
मित्र-मैत्रिणींच्या टोळक्याबरोबर ’नटरंग’ पाहून कॉफी पीत बसलो होतो. तर सगळ्या मुलींना चित्रपट आवडला होता, पण मुलं मात्र ’आम्ही त्या गावचेच नाही!’ अशा आविर्भावात होती. एकाने स्पष्ट वाचा फोडली, “खरं सांगू का, मला ह्या चित्रपटात काहीच रस वाटला नाही. त्या अतुल कुलकर्णीच्या व्यक्तिरेखेशी अजिबातच रीलेट करता आलं नाही! त्यामुळे त्याचं सुख काय नि दु:ख काय, त्याच्याशी मला काय देणघेणं आहे? एकूणच हा ‘गे’ प्रकार जरासा आपल्या अंगावरच येतो बुवा. आपण बुवा त्यापासून मैलभर दूरच असतो!”
अरे, पण चित्रपटाचा मुद्दा तो नव्हताच! मला ओरडून सांगावंसं वाटलं, पण त्याच वेळी काहीतरी उलगडतंय असंही वाटलं. ‘होमोफोबिया’ म्हणतात तो हाच असावा का?
सौंदर्याचं, सुंदर शरीराचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. मग ते समलिंगी असो वा भिन्नलिंगी. पण त्या आकर्षणाचा उच्चार केल्याने आपल्यातल्या सुप्त ’गे’ ऊर्मी जागृत होतील की काय अशी भीती वाटणे म्हणजे होमोफोबिया. स्त्रीसौंदर्याची चर्चा, स्त्रीपुरुषांकडून सारख्याच मोकळेपणाने होत असते. पण पुरुषी सौंदर्य / रुबाबदारपणाबद्दल एखाद्या पुरुषानेच बोलणं सहसा घडत नाही. ह्या होमोफोबियामुळेच तर समाजाला इतकं जड जातंय, काही व्यक्तींचं वेगळेपण मान्य करणं!
आज उघडपणे कुणाच्या लैंगिकतेला विरोध केला, तर आपल्यावर कर्मठ/सनातनी असल्याचा शिक्का बसेल, म्हणून न बोलता शहाणे होणार्‍या ह्या ९९% समाजाच्या मनात ठोकळे ते ठोकळेच – कुटुंबं चौकोनी ती चौकोनीच – राहतात. उलट फणा काढणारे शेकडो प्रश्न आणि लाखो गैरसमज- गे प्रवृत्ती बाह्य प्रभावांमुळे निर्माण होते, गे जोडप्यांची मुलं स्वत: गे होण्याकडे झुकतात, गे असल्यामुळे ‘एच‍आयवी एड्स’ची (HIV AIDS) लागण होते…!
गे जोडप्यांचं लग्न फक्त हातावर मोजता येण्याइतक्याच देशांत व देशांतील राज्यांमधेच कायदेशीर मानलं जातं- ते चित्र कधी बदलेल का? मुळात लिंग (sex) आणि लैंगिकता (sexuality) ह्यांतला फरक आपण खऱ्या अर्थाने कधी समजून घेऊ शकू का? आपल्या जवळच्या व्यक्तीने जर स्वत:ची ही ओळख सांगितली, तर आपण ते पचवू शकू का? हे सगळं मात्र अनुत्तरितच राहतं.
– विशाखा
Facebook Comments

2 thoughts on “मॉडर्न फॅमिली”

  1. >>> मुळात लिंग (sex) आणि लैंगिकता (sexuality) ह्यांतला फरक आपण खऱ्या अर्थाने कधी समजून घेऊ शकू का? <<<<

    याच्या साठी इंग्रजीमध्ये "जेंडर अँड सेक्सुआलिटी" अशा संज्ञा आहेत.

    लेख आवडला. किंचित अधिक सविस्तर प्रतिक्रिया थोड्या निवांतपणे लिहितो.

  2. हा प्रश्न पुन्हा पुन्हा ह्या अंकात चघळला गेलाय म्हणजे हा प्रश्न नक्कीच असावा. पण हे खरंच फक्त शारिरिक आहे, की जास्त मानसिक आहे? मी होमोफोबिक नाही, पण खुपदा प्रयत्न करूनही मला हा व्ह्यूपॊइंट कळतंच नाही. पटत नाही. आणि हल्ली पटत नाही म्हटलं की होमोफोबिक चा शिक्का पटकन बसतो. म्हणून नरो वा कुंजरोवा करणारेही बरेच असावेत असं वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *