Uncategorized

विषयाच्या किड्यांचे शुद्ध रसपान

’सेक्सटॉक’ ते ’डी-कन्स्ट्रक्टिंग जेन्डर डिकॉटमी फॉर अन्डरस्टॅन्डिंग सेक्शुऍलिटी’ व्हाया ’मैत्रीण /चतुरंग’: ’मिल्स ऍन्ड बून्स’ ते ’सविता भाभी’ व्हाया ’डी.के. सायन्स एन्सायक्लोपीडिया’ : ’नवर्‍यानं पप्पी घेतली की बाळ होतं’ ते ’विचित्रवीर्याचा नक्की प्रॉब्लेम काय असेल?’ व्हाया ’शिवलिंग आणि पर्वतस्तनमंडले म्हणताना कसंतरी होतं ना?’ : ’जैत रे जैत’ ते ’लाइक वॉटर फॉर चॉकोलेट’ व्हाया ’ब्रोकबॅक माउंटन’ असा कसाही उल्टासुल्टा प्रवास.
’लिहिण्यापेक्षा अनुभवा लेको’ म्हणत जर नवीन काही लिहून पाहिजे असेल तर सगळ्यांना सगळं ठाऊक असलेल्या लैंगिकतेलाच का वेठीला धरता अशी लाखोली वाहायच्या क्ष सेकंद आधी सुरुवात केलेलं हे भरताड.
चौथीत नानांच्या जुन्या पुस्तकांच्या पेटीत सरस्वती-पुराण सापडलेलं आणि विद्या यायला आपण पुस्तकात सरस्वतीचं मोरपीस ठेवतो म्हणून पुराण वाचायला घेतलेलं तेव्हा मिळालेली विद्या जशीच्या तशी अजून लक्षाते : का की ब्रह्मदेव आपल्या कन्येच्या, सरस्वतीच्या रूपावर भाळला – त्याचे वीर्यस्खलन झाले – ते त्याने टाचेने चिरडले – त्यातूनच साठ हजार बालखिल्य ऋषी निर्माण झाले – हे सगळं कळलं नसलं, तरी ते ’कुण्णाला विचारायचं नाही’ हे मात्र कळलेलं.
शाळेत सहावीच्या सगळ्या तीनशे पोरींना पावसात पिचीपिची चालवत मैदान पार करून पोरांच्या शाळेसमोरून पतोडिया सभागारात नेलं होतं वयात येतानावाली कुठलीतरी माहितीफीत तासभर दाखवली होती आणि त्यात पुल्लिंगाचा उल्लेखपण नव्हता इतक्यात कशाला माहिती पाहिजे म्हणून – [पण मग घाटकोपरातल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जाणार्‍या मैत्रिणीला मुलांना हाताचं बोट आपाप वर करता येतं तसं ’ते’ वर करता येत नाही आणि काही माणसं बसमध्ये मुद्दाम ते वर करून पाठीमागे उभी राहतात हे सगळं कसं काय माहिती होतं] – फिल्ममधलं काही आठवत नाही ती एकदम बोअर होती पण मग पीटीच्या बाईंनी सगळ्यांना एकेक नॅपकिन दिला व्हिस्पर विथ विंग्जचा आणि तो निळ्या जाड कागदाच्या खोक्यात गुंडाळला होता त्यावर पिवळी फुलपाखरं होती आणि खोक्याचा आकार पायसारखा होता गणितातल्या आणि आमच्या ग्रूपमधल्या सगळ्यानी खोका काखेत दाबून लपवून वर्गात आणला होता आणि मुलांच्या शाळेकडे बघतपण नव्हतो तरी वर्गात येताना बावळट सरडी खोका नाचवत आली आणि सातवीच्या दोन मुली फसफस हसल्या होत्या तेव्हाचं सगळं आक्रस बाईपण आठवतं : नंतर कळलं होतं की घाटकोपरातल्या त्या शाळेतल्या ही माहिती सांगणार्‍या सरांना काढून टाकलं तिकडून आणि आमच्या शाळेत गाण्याच्या सरांनी शाळा सुटल्यावर एकीला मागं थांबवून पिनॅफ्रॉक वर करायला लावला ती ओरडली मग शिपाईदादा आला पण सरांना नाही काढून टाकलं त्यांना समज दिली होती फक्त आणि आम्ही मग त्यांना प्लाटिहेलमिन्थेस म्हणायचो पोटातल्या जंताचं नाव नुकतंच शिकलो होतो : तरी तेव्हा शाळेतल्या एका तरुण बाईंना ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं खूप मोठ्या नवर्‍याशी ज्याचं नाव दुधकर, म्हणून बाई लांबून दिसल्या की दुधी भोपळ्याच्या भाजीबद्दलपण ओरडायचो आम्ही तेपण आठवतं.
याच्यात्याच्यावरून हिलातिला चिडवणे वगैरे गोष्टी सगळ्याच वयात इतक्या उत्साहानं करतात खूपशीच माणसं की ते सगळंच बंडल वाटायला लागलं तरी त्या वेळी आपल्या मेंदूचा किती भाग फक्त कार्तिकच्या हसण्यावर आणि त्याच्या गोंधळण्यावर आणि फाडफाड थियरम्स बोलण्यावर खूश होण्यात खर्च झाला हे लक्षात आणलं तर लैंगिकता, आकर्षण, प्रेम आणि लग्न हे डोक्यात फाट्‌कन वेगळे करायला उपयोग होतो आणि हे वेगळे असतात आणि कधी कधी एकमेकांवर अजिबात अवलंबून नसतात असं सोळाव्या वर्षी सांगायची तसदी कुणीही नसते घेतलेली.
इकडच्या पालीची चुकचूक तिकडे ऐकू यायची तसल्या भुसभुशीत हॉस्टेलात राहून टोकाच्या खोलीतली कुणाच्या अध्यात ना मध्यात चुपचाप मुलगी कुणाचीच मैत्रीण नसलेली तिच्या खोलीतून एकदा रात्री कुणालातरी तिनं ऐकवलेली स्वत:च्याच अंगाची पोसलेली वर्णनं ऐकून आमचे सगळ्यांचे कुंवार कान गरम होऊन आणि पुढे आठवडाभर कान देऊन ऐकून आणि हिकी, डिल्डो आणि ब्लोजॉब-बद्दल विकी करून आणि मग आपण सभ्य घरच्या मुली आहोत हे आठवून वॉर्डनला हे सांगायला पाहिजे म्हणून त्या मुलीच्या एकलेपणावर सामूहिक बलात्कार करून.
लिंग हे निसर्गानं फक्त अंगातलं दिलेलं नाहीये आणि मनातलं आणि समाजातलंपण आहे हे उमजायला लागायच्या पल्याड सगळ्याच दांडग्या संवेदनांशी लैंगिकता जोडली गेली – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर – प्रत्येकासरशी अंगावर सरसरता काटा फुलतो तो सारखाच असं वाटत असतं त्या भरात पुरावे गोळा करायला न्यूरोबायॉलॉजी शिकायला लागताना या सगळ्याच्या सगळ्या भावना म्हणजे ऑक्सिटॉसिन–टेस्टॉस्टेरॉन–कॉर्टिसॉल-डोपामिनांच्या वरखाली फवार्‍यांमुळे होतात हेच दिसल्यावर युरेका ओरडताना एक मोह मनात उगवला की आपण हे सगळे स्राव आपल्या कह्यात येतील असा मार्ग शोधू : आणि मग काय करू? काम करू, काम करू, दोन हातांनी काम करू असं एक कार्यानुभवाच्या पुस्तकाच्या सुरुवातीला गाणं होतं.
बाईच्या अंगातला पुरुष, अनिश्चित अंगातली बाई, कुठल्याही अंगातली अलैंगिक माणसं असा दोन लिंगांच्या बाहेरचा अफाट स्पेक्ट्रम दिसता दिसता स्वत:च्या अंगातला तेहेतीस टक्के पुरुष जाणवता जाणवता, असा तो भेटतो ज्याच्याही अंगात आरक्षणापुरती बाई आहे मग एकदम तिच्यामायला आपल्याला तू आवडलास आणि तुझं मन शुद्ध असू देत बर्‍याच जणांचं असतं पण मला तुझं शरीर आवडलं म्हणताना आपण बाई आहोत म्हणून हे म्हणणं खुपत नाही मजेदार चॅलेंजिंग एक्सायटिंग वाटतं पण एक पुरुष आपल्याला हेच म्हणाला असता तर कानफटात दिली असती की नाही हे स्वत:ला विचारता विचारता दुटप्पीपणाला इलाज नाही म्हणत लग्नबिग्न होतं तेव्हाही लग्नाला आलेला गे मित्र त्यानं कॉलेजात असताना आपल्याला विश्वासानं सगळं सांगितलेलं आणि प्रेमातल्या दुश्मनाचा काटा काढायला सल्लापण मागितलेला म्हणजे तेव्हा त्यानं सहिष्णुतेची सगळी थियरी इतकी कसोटीला लावायला लावलेली की एकदम उपकारच झाले त्याचे पण तरीसुद्धा त्याचा उल्लेख त्याच्या पाठीमागे गुलाब्बो म्हणून होत असताना गुपचिळी धरून बसायचं झालं इकडून म्हणून भांडतानासुद्धा ’माझा एक गे मित्र’ अशीच सुरुवात आपण तो कोणी एक्झॉटिक सॅम्पल असल्याच्या थाटात करतो गोष्टी सांगताना आणि त्याच्या लैंगिकतेच्या जोरावर आपल्या कूलनेसचा बोभाटा करतो.
पोटातलं मूल तिसर्‍या महिन्यात पडून जाणार तेव्हा ’ती घट्ट आहे आणि नेहमीच शांत डोक्यानं विचार करते’ हे लोकांचं ऐकत ऐकत घट्ट राहणार : बारा आठवड्यापर्यंत मिसकॅरिएजची शक्यता छत्तीस टक्के असते आणि अजून ऑर्गॅनोजेनेसिसपण पूर्ण झाला नसणार आणि पूर्वी वाटायचं की मूल जन्माला घालून आपण आधीच ओरबाडलेल्या जमिनीवर अजून भार घालणार तर नकोच ते… यातलं काहीच मदतीला येणार नाही पण ’आजी बाळ पोटात कुठून जातं’ म्हणताना ’अगं जिथून बाहेर येतं तिथूनच आत जातं’ म्हणत खळाळ्‌ हसणार्‍या इन्नीचा महामृत्युंजय मंत्र आपण निरीश्वरवादी वैज्ञानिक मनानं शांतपणे म्हणत बसणार आणि ’त्या जिवाच्या कर्मी तीनच महिन्याचं आयुष्य भोगायचं राहिलं होतं ती शिक्षा खतम आता पॅरोलवर सुटका झाली बिचार्‍याची’ असं म्हणत आपणपण खळाळ्‌ हसणार ते कुणाला भेसूर वाटायचं तर वाटो पण दर महिन्याला गरम धार खाली वाहताना स्पष्ट जाणवायची इतकी वर्षं ते गरमपण बाई असल्याचा मन्थली रिमायन्डर असून मेनॉपॉज म्हणजे फार भारी आपल्याला लवकरच यावा असं वाटलं असताना एकदम ते जाऊन एक कसलातरी पेशींचा आपाप आकार घेणारा संच तिथे चिकटलेला तो आपला वाटायला लागणार आणि तेवढ्यापुरतं शंभर टक्के मादी आहोत असं वाटणार जे झोपाळ्यावाचून झुलतानापण वाटलं नव्हतं हे कसं कळणार आधीच?
ओम्‌ म्हणजे अ + उ + म्‌ म्हणजे मांडी घालून ताठ बसून म्हणताना
अऽऽऽ तेव्हा कमरेखाली थरथर
उऽऽऽ तेव्हा पोट-छाती गच्च आणि
म्‌‌ऽऽऽऽ तेव्हा डोकं टाळूसकट झिणझिणताना
क्रिएशन, सस्टेनन्स, अनालिसिस असली जन्माला घालायची आणि वाढवायची
आणि फोडायची आणि परत जन्माला घालायची उसाभर
एकाच अक्षरात आणि एकाच अंगात अख्खीच्याक्खी असलेली लक्षात येताना –
शब्द कशाला? हुंकार पुरे.
– गायत्री नातू
Facebook Comments

4 thoughts on “विषयाच्या किड्यांचे शुद्ध रसपान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *