Uncategorized

सहेला रे

From: य xy1@xmail.com
To: क्ष xy2@xmail.com
Date: Sun, Oct 23, 2011 at 9:10 PM
Subject: सहेला रे
इमेल लिहायला बसलो आणि मायनाच सुचेना. खाजगी इमेलमधे मायना नसला तरी चालतो हे किती बरं. मला तर मायना सुचतही नाही काही. पण इमेलला विषय नसला की तो मला विचारतो, ‘असाच पाठवू विषयाशिवाय?’ आता ह्या विषयविचारी रेम्याडोक्याला काय सांगू? तेव्हा विषय हाच मायना. मायने नि सोपस्कार असलेलं शेवटचं चॅट आपण कधी केलं? मला तर आठवतही नाही. ते बरंच. तसंही चॅटवर ‘हेहे’ असलं फाजील कृत्रिम हसणं सोडून माणसासारखं ‘हाहाहा’, ‘हिहिहि’ असं हसतो आपण. त्यात कुठले मायने नि सोपस्कार. नव्या गावात माणसं शोधताना मिळालेल्या पहिल्या दोन व्यक्ती चॅटवर ‘हेहे’ करून हसल्या. मग रविवारची भीषण संध्याकाळ थेट डोक्यात गेली. चॅटवरच्या सगळ्या दृश्य, अदृश्य, लाल, हिरव्या, भगव्या मंडळींवर एका झटक्यात नजर टाकून, फेसबुकावरले शेवटचे दोनशे-एक अपडेट्स पालथे घालून, सगळ्या बातम्यांच्या सायटी दहा वेळा उघडून बंद करून, यूट्यूबच्या प्लेलिस्टा सतरा वेळा बदलूनसुद्धा तनामनाची काहिली शमेना. तेव्हा मग ‘ए’ पासून सुरू करून धडधडा फोन लावले, तर तेही कुणीच उचलेना. तूही उचलला नाहीस. मग काट्याने काटा काढावा म्हणून अंगाची लाही माझी मीच चेतवत शांत करू गेलो, तेव्हा तुझ्या इमेलची आठवण झाली. त्याला उत्तर राहिलं होतं. शहर सोडून आज महिना झाला की.
निघण्यापूर्वी भेटलो तेव्हा राहून गेलेले हुंदके प्रवासभर नुसते मुसळधार कोसळले. नव्या शहराच्या वेशीपाशी आलो, तोपर्यंत इतक्या वर्षांचं गोळा केलेलं सगळं रितं करून डोळ्यांनी गिव अप मारला होता. काही उरलेल्या संचितात तू ठासून भरला होतास. मी आणि ते शहर ह्या नात्यात तू इतका का उरला होतास?
नवं घर लावतोय. नवं शहरसुद्धा. लागतंय हळूहळू. प्रत्येक गोष्ट करताना, घेताना, पाहताना माझे माझे विश्लेषणाचे प्रश्न विचारून लेबलांचे रकाने भरताना साला एक प्रश्न मी जास्तीचा जोडतोय. जे करतोय, पाहतोय, घेतोय ते ‘कूल’ आहे का? हा प्रश्न कुठून आला? नि हा प्रश्न उसना तसं त्याचं उत्तरपण उसनं. तुला हे कूल वाटेल का, असला द्राविडी प्राणायाम करून मी तो प्रश्न सोडवतोय. माझ्या नजरेतला हा ‘कूल कोशंट’ तुझ्याकडून माझ्याकडे आलाय तर! शहरी, मध्यमवर्गीय ते सधन, पंचवीस ते चाळीस वर्षं वयाच्या, रोज रात्री आठ ते नऊ राजकारण फॉलो करून अराजकीय असणार्‍या, भांडवलशाहीसंपृक्त, गोर्‍या अमेरिकन पुरुषांच्या सवयी, राहणीमान, देहभान, स्टाईल, त्या वर्गाला जे म्हणजे ‘क्लास’ वाटतं ते रंग, गंध, स्पर्श, चवी ह्यांबद्दल (सरधोपटीकरणाचं पातक मान्य करून) तुला असलेलं विलक्षण आकर्षण तुझ्या ‘कूल’पणाच्या संज्ञेत पुरेपूर उतरलंय. पर्फ्यूमपासून अंडरवेअरपर्यंत कुठलीही वस्तू घेताना आणि वाईनच्या स्मूदनेसपासून बाईच्या सौंदर्यापर्यंत कशाला ‘लय भारी’ म्हणायचं ह्याची कसोटी ठरवताना तुझ्यातला ब्रँडेड कन्ज्युमर ती संज्ञा पक्की करत असतो – आपल्या प्रोफेसराकडे पाहून आपली रीसर्च मेथडॉलॉजी पक्की करत जाणार्‍या सिन्सिअर विद्यार्थ्याप्रमाणे. माझ्या त्या उसन्या कूलनेसलाही हाच पोत आला आहे. पण मला तो झेपत नाही. ह्या पोताला छेद देणारा प्रश्न असा की, आपल्यात जे काही उद्गारप्रश्नचिह्नांसह आहे, त्याबाबत आपण किती कूल आहोत?
चपापू नकोस. जे काही म्हणजे काय हे मलाही माहीत नाही. तुझ्या असण्याची सवय. तुझ्या नसण्याचा त्रास. आपण आपल्या एकमेकांसाठी बेगरज, राजदार असण्याची खात्री. कुठल्याही प्रहरी फोन करून पिडण्याची मुभा. फालतू, शारीर बडबड. त्या संवादांसाठीची हक्काची व्यक्ती. तुझ्यातली मैत्रीची निर्व्याज गुंतवणूक. तुझ्या शारीर अस्तित्वाचं आकर्षण. तुझ्या पुरुषी अस्मितेचा लोभस राग. त्या अस्मितेत बसत नाही म्हणून भावनांना व्यक्त न करता झाकणारा तुझा ताठपणा. नि ते ताठपणाचं उगीच आणलेलं अवसान गळून पाहताना मला होणारा आसुरी आनंद, तुझी वाटणारी कीव आणि तुझ्याबद्दल वाटणारी काळजी ह्यांची संमिश्रता. तुझ्या स्वभावाचे टोकदार बारकावे. नि तुझ्या शरीराचं टोकदारपण झाकतानाची तुझ्या पायांची चलबिचल. तुझा गंध नि निसटत्या स्पर्शांचं काटेरी कुंपण. नेमकं काय? मला माहीत नाही. हे सगळं किंवा ह्याहूनही अधिक काहीतरी. पुरुषी ऑरगॅजमच्या प्रकट रूपापल्याडचं इनटॅन्जिबल असं काहीतरी. रविवार संध्याकाळी भयाण असतातच. तो सार्वजनिक भयाणपणा आहे. आयुष्याचा भाग असल्यागत लोकांनी अकारण का होईना पण जणू मान्य केलेला. पण नव्या शहरात शुक्रवार संध्याकाळ घालवून पाहा. ती वारता येत नाही, तेव्हा हे सगळं मानगुटीवर बसतं.
परवा इथल्या एका रेस्टॉरन्टमधे मी एकटाच मेनू कार्ड पाठ करत बसलो होतो, तेव्हा त्या वेटरने खांद्यावर सहज हात ठेवून ‘हाय, हौ आर यू डुईंग टुडे? हॅव यू बीन हेल्प्ड? वॉट वुड यू लाईक टू ड्रिंक?’ विचारलं, तेव्हा त्या स्पर्शाचा मला केवढा आधार वाटला! मला धक्काच बसला. इतका की, ती पाणी देऊन, परत जाऊन पुढची ऑर्डर घ्यायला पुन्हा आली, तोपर्यंत ती किती बेब आहे हे माझ्या डोक्यात रजिस्टरही नव्हतं झालं, म्हणजे पाहा! अशा वेळी तुला फोन करायला हात शिवशिवत असतात. पण माहीत असतं की नाही करायचा. तू नि तुझी सखी एकमेकांत बिझी असणार, हे माहीत असतं मला. मग ते हात काबूत ठेवावे लागतात. तुझी सखी, तू आणि मी… असो. असं काही झेपेल तुझ्या सखीला? छे! केवळ अशक्य. समलिंगी संबंधांबद्दलचा तिचा आकस पाहून तिचं प्रबोधन करू पाहतानाची तुझी त्रेधा आठवते मला. तूच सांगितलं होतंस त्याबद्दल. हे असे युक्लीडला फाट्यावर मारणारे त्रिकोण तिला न झेपण्याची मला जवळपास खात्री आहे. बाय द वे, समलैंगिकतेविषयी ‘मारून टाकलं पाहिजे अशा विकृत लोकांना’ इतका काही तू उजवा नसलास तरी काही ‘एलजीबीटी आणि मानवी हक्क’ इतकाही काही तू डावा नव्हतास. तसाही तू काही मध्याच्या डावीकडे नाहीस. फक्त स्वत:च्या अंगाला काटे बोचतात तेव्हाच वॉल स्ट्रीटच्या नावाने बोटं मोडणारा नि त्यापल्याड काहीही न करणारा आहेस तू. तू एवढं मनावर घेऊन एलजीबीटींवर होणारा अन्याय, सामाजिक प्रबोधनाची गरज वगैरे तिला पटवून देताना पाहून मला रितसर धक्का बसला. तो बदल सुखावह होता, म्हणून मी त्याबाबत विचारणं जिभेच्या टोकावरून मागे ढकलत गेलो. पण काय झालं नेमकं तुझ्यात हा बदल घडून येण्यासारखं? ‘ब्रोकबॅक माऊंटन’ पाहणार नाही, असं उद्धटपणे सांगणारा तू एकाएकी त्या चित्रपटाचं कौतुक का करू लागलास? तुला हीथ लेजर आवडतो नि त्याचा ‘दि डार्क नाईट’मधला जोकर पाहून त्याच्या अभिनयावर फिदा होऊन तू त्याच्या मृत्यूनंतर क्रिटिकली अक्लेम्ड म्हणून परत जाऊन ‘ब्रोकबॅक’ पाहिलास, असली बकवास माझ्यासमोर करू नकोस. खरं काय ते सांग. माझ्या संगतीचा परिणाम असं म्हणण्याचं औदार्य तू दाखवणार असशील, तर मला खूश व्हायला अनेक कारणं मिळतील.
इथे आता जिम जॉईन करायचं म्हणतोय. अगदी सिरीअसली. काही खेळायचाही विचार आहे. तो किती फळतोय कोण जाणे. काय की खेळात मंदगती असणार्‍या कुणाशी कोणी खेळत नाही. तुला पटायचं नाही हे. पण पाहा जरा नीट आजूबाजूला. नि आता आपल्या विशीत झालं गेलं मागे टाकून आपल्याला मारे अगदी नेमाने खेळावं वाटलं, तरी कोण खेळेल आपल्याशी नि काय खेळेल? एकवेळ अभ्यासात ढ असाल तर ठीक. आपल्या मार्कनिष्ठ पद्धतीत मागे पडालही तुम्ही, पण तुम्ही एकटे नसाल. निदान लोक खेळतील तरी तुमच्याशी. खेळात मंदगती असणार्‍या माणसाचं दु:ख त्यालाच माहीत. त्याच्या मागे पडण्याला काहीच सुमार नाही. खेळात मागे पडलात की आपल्या शरीराच्या कुवतीबद्दल निर्माण होणारे संशय अडनिड्या वयात अडनिडे प्रश्नही उभे करत जातात. ‘ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले’ असं लिहिणारे भट जेव्हा ‘परमेश्वरानं मला पुनर्जन्म दिला तर तुमच्यासमोर अव्यंग सुरेश भट उभा राहील’ असंही बोलून दाखवतात, तेव्हा मला त्या गझलेत आत्मचरित्राची झाक दिसते. तू खेळायचास माझ्याशी, काही काळ का होईना, माझ्यासाठी केवढं मोठं होतं ते! खेळ नसला की स्पर्शही नाहीत. ते कुठे भागणार? लोकलच्या गर्दीत घाटकोपरपासून दादरपर्यंत ‘कधी एकदा दादर येतंय’ असं म्हणत, अतृप्त शरीरांच्या मुठीतून आपलं शरीर वाचवत जीव मुठीत धरून उभे राहिलेले आपण – सुरुवातीला भांबावून जाणारे, मग चिडणारे, मग भांडणारे, त्यानंतर नजरेच्या जरबेतून बोलणारे, मग गर्दीत कुठलाही प्रतिकार अशक्य म्हणून असहायपणे दुर्लक्ष करणारे नि अंतिमत: सरावलेले. अशी टोकाची किळस आणि उत्स्फूर्त सुंदर शृंगार ह्यापल्याडचे निव्वळ राकट, अलैंगिक स्पर्श. ते कुठे भागणार? माहीत नाही.
तो आपला शहाणा मित्र मला रोज नाईट लाईफ एक्सप्लोअर करायचे धडे देतोय. त्याच्याशी बोलणं आताशा मला कैच्या कै ऑकवर्ड होतं कधी कधी. तो खूप बटबटीत आहे. त्याच्याकडे पाहिलं की देसी लोकांच्या नजरा डिस्गस्टिंग वाटणर्‍या स्ट्रिपरची मला आठवण होते. आपण एकदा गेलो. पुन्हा गेलो, तरी त्याच्याबरोबर कधी स्ट्रिपक्लबमधे जाणार नाही. तिथे सर्वांनीच लाज सोडली असली, तरी हा आपल्याला लाज आणतो. पण खरं तर मला त्याचं वागणं कितीही रफ का असेना, किमान पारदर्शक वाटतं. काय खरं कोणास ठाऊक. मागल्या वेळेस तिथे जाऊन आल्यानंतर अंगभर भिनलेला सिगरेटचा वास मला गुदमरून टाकत होता. तो मी अर्थातच लॉंड्री करून लगेच धुऊन पुसून घालवला. पण आंघोळीनंतरसुद्धा माझ्या अंगाला एक स्त्रैण वास येत होता. तो काही केल्या गेला नाही. तो जाईना तेव्हा तो जावा असंही वाटेना. तेव्हा तो मला आवडतोय हेही मला लक्षात आलं होतं. आपण त्यानंतर जे काही असंबद्ध बोललो असू, त्यातून तुला हे नेमकं कळलं असणार असा माझा अंदाज आहे. तेव्हाच मला हेही नव्याने कळलं, की मला काही तू पुरणार नाहीस. नि मग साक्षात्कार झाला, की मीही तुला पुरत नसणार. तुझ्या अझेप सखीत तुझं गुंतणं मी आताशा स्वीकारू लागलोय. आपण एकमेकांना पूरक आहोत… पुरून उरू… पुरून उरू?… पुरणार नाही. मरो.
हे अस्सं सगळं आपण आधी कधी बोललो नसलो, तरी हे सगळं तुला माहीत नाही असं कृपया म्हणू नकोस. मी निघताना लिहिलेल्या पत्राला तू लिहिलेला इमेल मी इथे आल्यावर वाचला. मी पत्रात मैत्रीच्या जनरीक नात्याला विस्तारत अधिक अमूर्त करत होतो. कुसुमाग्रजांच्या ‘नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही, सार्‍याच चांदण्यांची जगतास जाण नाही’ अशासारखं काहीतरी. उलट तू तर तुझ्या इमेलमधे ती मैत्री अधिक कोरून दृढ आणि इंटिमेट केली होतीस. मला हेवा वाटला तुझा नि आपण हेच म्हणायचं असून नेमकं म्हटलं नाही ह्याचं वाईटही वाटलं. पण हे मी समोर असताना का नाही म्हणालास? मग हे सगळं ह्या पत्रात बरळण्याऐवजी तुला समक्षच सांगितलं असतं. तुझ्यासमोर असा अनावृत उभा राहिलो असतो. एका थेट प्रश्नचिह्नासकट कदाचित. तेव्हा तू काय केलं असतंस? का तेव्हा हे इनटॅन्जिबल असं काही न उरून सगळं संपलं असतं? माहीत नाही. मला खात्री नव्हती. मला आपल्यात जे काही आहे, त्या ‘काही’च्या सौंदर्याला धक्का लावायची हिंमत नाही झाली. वॅन गॉफच्या चित्राकडे जास्त वेळ पाहत राहिलं की, उगीच आपल्यातल्या आंदोलनांनी त्या रेषांचा तोल ढळून ते चित्र डहुळेल अशी भीती वाटते मला. तसंच काहीतरी. असंच वॅन गॉफचं चित्र समोर ठेवून भटांनी लिहावं – ‘बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग’ – असं काहीतरी. अजून काही लिहिलं तर ते खूप शब्दबंबाळ होईल. त्या अज्ञात चांदण्यावर तरंग उठायचा तर आणि तेव्हा उठेल. सध्या मला दिवा मालवला पाहिजे. दीप मालवल्यानंतरच हा इमेल पूर्ण होईल. लिहिता येण्यासारखं एवढंच. लिहिलंय तेवढं धाडतोय.
भेटूच.
– ए सेन मॅन
Facebook Comments

5 thoughts on “सहेला रे”

  1. मित्रा, लैंगिकता आणि मी ह्या विषयाऐवजी समलैंगिकता आणि मी हा विषय का नाही घेतलात रे? अंक उघडल्यापासूनचा हा चौथा लेख आणि तोच विषय. अर्थात लिहिलयंस उत्तम.

  2. Going through same phase, I don't know what is it happening.. it looks like i can not bear it.. what's the solution.. i know it isn't natural and all.. but i can not deny what feel.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *