Uncategorized

पोस्टमार्टेम

मी रेल्वेच्या खिडकीतून शून्यात पाहत बसलो होतो. गाडी एका संथ लयीत थडथडत चालली होती. मलाखूप रडावंसं वाटत होतं, पण अश्रूच येत नव्हते. गेल्याच आठवड्यात लग्न मोडल्याचा एक आघात पचवता पचवताच हा दुसरा आघात होता. पण ह्या आघातातून बाहेर येणं अवघडच दिसत होतं. पहाटे पहाटेच आईच्या फोननं दिवसाची सुरुवात झाली होती. आधीच मी गेल्या आठवड्यापासून झोपू शकत नव्हतो.कधीतरी पहाटे तीन-साडेतीनला झोप लागायची.
अन्‌ त्या दिवशी बरोबर साडेचारलाच फोन खणाणला. आई काय बोलतेय तेच कळत नव्हतं. ती फक्त रडतच होती. मधेच एखादा शब्द फुटायचा. मी काय झालं, काय झालं विचारून थकलो आणि एकदम बाबांनी फोन घेतला, “सलील, आपली नलू गेली.”
नलू – नलिनी – माझी धाकटी बहीण – माझी लाडकी धाकटी बहीण.
‘नलू गेली? गेली म्हणजे कुठे गेली? काय झालं? कधी? डोक्यात हजारो प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं. पण सगळे प्रश्न जिभेच्या टोकावरच राहिले. माझ्या संवेदनाच बोथट झाल्यात का? मला रडूही येत नव्हतं. दुःख नक्की झालंय तरी का असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती.
“मी निघतोय लगेच!” एवढंच बोलून मी फोन ठेवला. आणि यंत्रवत निघण्याची तयारी केली. शून्य वैचारिक अवस्था का काय म्हणतात, तीही नव्हती. माझ्या डोक्यात व्यवस्थित विचारचक्र सुरू होतं. मी आता किती वेळात निघालो म्हणजे मला कितीची ट्रेन मिळेल, म्हणजे मी कितीपर्यंत पोचेन, उन्हाळा आहे, नलूची बॉडी किती वेळ ठेवतील? ’बॉडी’? माझी नलू आता फक्त ‘बॉडी’? आणि मीच असा विचार करावा? असो, आताआत्मक्लेश करून काय फायदा? नलू तर गेलीच. पण अशी कशी काय गेली? मीपण कसला मूर्ख, एकाशब्दानं विचारलं नाही, कशानं गेली? कधी गेली? छ्या.
ह्या विचारचक्रातच नीटपणे तिकीट काढून गाडीत एकदाचा बसलो. अगदीच पहाटेची गाडी होती, त्यामुळेगर्दी यथातथा होती. मी खिडकीत बसलो आणि बाहेर पाहू लागताक्षणी मात्र सगळं भरून येतंय का काय असं वाटू लागलं. एकदमच सगळ्या जाणिवा उद्दीपित होऊ लागल्यासारखं. माझी नलू, माझी हसरी बाहुली.आता मला पुन्हा कधीच भेटणार नव्हती. ह्या विचारानं अंगावर सरसरून काटा आला. आतमध्ये कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. अपरिमित वेदना उमटली. रडावंसं वाटत होतं, पण अश्रूच येत नव्हते.
नलू नात्यानं माझी सख्खी धाकटी बहिण असली तरी सात वर्षांच्या अंतरामुळे आमचं नातं त्याहून वेगळं होतं. आठवतही नाही तेव्हापासून मी तिला पोटच्या मुलीसारखी जपायचो. तीसुद्धा कायम ‘दादा, दादा’ म्हणतमाझ्या पुढेमागेच. आई-बाबांपेक्षा मी तिला जास्त जवळचा वाटायचो. शाळेपासूनच कुठल्याही गोष्टीला आधी माझी संमती घ्यायची अन्‌ मग आई-बाबांची. जितकी शिस्त लावायचा प्रयत्न करायचो, तितकीच लाडोबा होत गेली होती. तिच्यावर ओरडणं, तिच्यावर रागावणं मला कधीच जमलं नाही. अन्‌ माझ्याकडून आई-बाबांची बर्‍याच गोष्टींना संमती मिळवण्याचेही प्रकार करायची. मग गोडसं खट्याळ हसायची आणि मला मिठी मारून पळून जायची. हे सगळं माझं कॉलेज संपेस्तोवर चालूच होतं. मी एल.एल.बी. झालोआणि दुसर्‍या शहरात एका मोठ्या वकिली फर्ममध्ये नोकरीसाठी निघून गेलो. मला लेखनातही चांगली गती होती. विविध विषयांवर वर्तमानपत्रांमध्ये लिहिणारा चांगला स्तंभलेखक म्हणूनही मी नाव कमावू लागलो. तिथे नलू नुकतीच कॉलेजला जाऊ लागली होती. तिचा आदर्श असलेला मी आता तिथे नव्हतो.पण तिचं वय वाढू लागलं. शारीरिक बदल घडू लागले, तसं तिचं आयुष्य वेगळंच झालं. मित्रमैत्रिणी वेगळे.विश्वासू मैत्रिणी अन्‌ आई असं वेगळंच वर्तुळ. मी इथे माझ्या यशस्वी कारकिर्दीत मश्गुल होतो. यशाच्याशिड्या भरभर चढत होतो. अन्‌ माझं नि नलूचं नातं पूर्वीसारखं राहिलं नाही. आधी दर दिवशी फोन करणारी नलू नंतर नंतर महिनोन्‌महिने फोन करेनाशी झाली. मीही करायचो नाही. पूर्वी मी दर महिन्याला घरी जायचो, तो आताशा वर्षातून एकदा जाऊ लागलेलो. आमच्यातला जिव्हाळा तोच होता, पण तो ओलावा राहिला होता का हे मला समजत नव्हतं. खरं तर समजून घ्यावंसंही वाटत नव्हतं. मी माझ्या आयुष्यात गुंतलो होतो, अन्‌ ती तिच्या. पण अजूनही गेलो की आनंदानं हात हातात घ्यायची. आमचंबोलणं अगदीच यथातथा व्हायचं, कारण माझे विषय वेगळे, तिचे वेगळे. पुन्हा ही प्रौढ नलू माझ्या फारशी ओळखीची नव्हती. ओळखीचे होते ते फक्त तिचे प्रामाणिक, स्वच्छ डोळे. त्या डोळ्यांत पाहिलेलं पुरेसं असायचं. निघताना वाकून नमस्कार करायची अन्‌ मी अवघडून तिचे खांदे धरले की हसून म्हणायची, “लहानपणी आई-बाबांना मी नमस्कार केला की हट्टानं स्वतःलापण करून घ्यायचास.” मग का कुणास ठाऊक तिला जवळ घ्यावंसं वाटायचं, अगदी लहानपणीसारखं. मग तिचे डोळे पाणावायचे आणि ती मला घट्ट मिठी मारायची. सुरुवातीला मलाही काही वाटायचं नाही त्याचं, पण मग जसजसं तिचं वय वाढू लागलं, तसतसं मला तिच्या त्या मिठीमुळे अवघडल्यासारखं व्हायचं. अन्‌ नंतर मी स्वतःलाच खूप वेळ कोसत राहायचो. पण माझी नलू तरीही माझी लाडकी पोरच होती. ती न मागताही मी तिच्यासाठीभरमसाठ वस्तू विकत घेऊन पाठवून द्यायचो. तिची सगळी खबरबात मी आई-बाबांमार्फत ठेवायचो.आई-बाबासुद्धा मला विचारूनच तिच्या शिक्षणाबद्दलचे निर्णय घ्यायचे. असं होत होत मला शहरात येऊन सहा वर्षं निघून गेली होती. माझ्या आयुष्यात असंख्य उलथापालथी झाल्या होत्या. मी बचावपक्षाचा प्रथितयश वकील झालो होतो. अन्‌ माझं एका सुंदर मुलीशी लग्नही ठरलं. ती नलूच्या एका मित्राचीच बहीण. मी अगदी आनंदात होतो, पण अचानकच ग्रह फिरले. गेल्याच आठवड्यात काही कारण न देता मनीषानं – त्या मुलीनं – माझ्याशी ठरलेलं लग्न मोडलं. नक्की काय झालं हेही मला सांगितलं नाही. मीकेलेले सगळे फोन, मेसेजेस्‌ दुर्लक्षित केले. तिच्या आई-वडलांनाही तिनं काय ते नीट सांगितलं नाही. अन्‌त्या धक्क्यातून मी बाहेर यायचा प्रयत्न करत होतो, तोच हे.
माझ्या डोळ्यांसमोरून सगळा घटनाक्रम एखाद्या सिनेमासारखा सरकत होता. राहून राहून माझ्या नलूचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. सहा तासांचा प्रवास एकदाचा सरला. मी फलाटावर उतरलो, तर माझा आतेभाऊ मला घ्यायला समोरच उभा होता. “विमानानं का नाही आलास?” त्यानं विचारलं. त्याचे डोळे रडून की रात्रभराच्या जागरणामुळे लाल होते, कपडे अस्ताव्यस्त होते अन्‌ सकाळची दाढी झालेली नसल्यानं दाढीचे खुंट वाढलेले होते. अन्‌ मी पहाटे निघतानाही सवयीनं दाढी करून, नेहमीचे इस्त्रीचे कपडे घालून निघालो होतो. मला क्षणभर विचित्र वाटलं. पण आता ह्या विचित्र वाटण्याचीही सवय होऊ लागली होती. तेम्हणतात ना, माणसाला स्वतःची ओळख पराकोटीच्या दुःखामध्येच होते. “इतक्या पहाटे विमान नव्हतं,पहिलं पकडूनही ह्याच वेळी पोचलो असतो.”
मी स्वतःला आरशात पाहत होतो. नलूच्या खोलीतल्या ह्याच आरशासमोर मी तिला लहानपणी सूर्याची पिल्लं दाखवायचो. ती नको नको म्हणत किंचाळायची, पण मला गंमत वाटायची. तिची ती मजेशीर नारळाच्या झाडासारखी केशभूषा, खट्याळ डोळे, अपरं नाक अन्‌ गोबरे गाल. मग मी तिला कानांवर हात ठेवून उचलायचो. ती ओरडायची, मग मी लगेच तिला खाली ठेवायचो. ती मला रागानं दोन-तीन चापट्या मारून खोलीतून पळून जायची. एक दिवस मी तिचा हात धरला अन्‌ तिला जवळ ओढली. गुडघ्यांवरबसलो अन्‌ तिच्याकडे पाहिलं. तिचे कान लालीलाल झाले होते अन्‌ डोळ्यांतून दोन अश्रू ओघळले होते.मला हे असलं काही होतं ह्याची कल्पनाच नाही. बाबा मला करायचे तेव्हा मलाही दुखायचं, पण ही माझी नाजुका मुलगी होती. अन्‌ मी माझ्याच बाहुलीला नकळत दुखावत होतो. मी तिला जवळ घेतलं अन्‌ पुन्हा कधीही करणार नाही असं वचन दिलं. ह्या माझ्या बाहुलीला कुणी इतकं दुखावलं की तिनं स्वतःचंच मनगट कापण्याचं दुःख जवळ केलं?
Facebook Comments

1 thought on “पोस्टमार्टेम”

  1. छान. वेगळ्या विषयावरची पण अतिशय प्रभावी, दर्जेदार कथा. साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे मानले जाते. या विषयावरील असेच दर्जेदार साहित्य येऊ लागले पाहिजे.

    सुधीर कांदळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *