Uncategorized

लैंगिकता: प्राचीन भारतीय कलाइतिहासाच्या दृष्टिक्षेपातून

सुमारे ३००० वर्षं मागे ज्या संस्कृतीच्या पाऊलखुणा अभ्यासकांना सहजपणे सापडतात, त्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासात ’कोऽहम्’ (मी कोण) असा प्रश्न माणसाला पडला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेल्या खटाटोपातून उपनिषदे अवतरली, त्याच्या कितीतरी आधीच वेदांचा जन्म झाला होता. आपल्या पूर्वजांच्या मूलभूत जाणिवा वेगळ्या होत्या का? चरितार्थ, पुनरुत्पत्ती, न्याय, समाज जीवन अशा सार्वकालिक महत्त्वाच्या वाटणार्‍या प्रश्नांना बगल देऊन, हे काय क्लिष्ट तात्त्विक प्रश्न घेऊन बसले आपले पूर्वज? तर ते तसं अजिबात नव्हतं. मूलभूत वाटणाऱ्या सर्व अंगांचं दीर्घ चिंतन आणि त्यातून निर्माण झालेली वैचारिक वाटचाल केव्हाच सुरू झालेली होती. किंबहुना त्यानंतरच अमूर्त वाटणार्‍या प्रश्नांकडे माणसाची दृष्टी गेली.
’लैंगिकता’ हा असाच भारतीय संस्कृतीनं आदिम काळापासून ’मूलभूत’ मानलेला विषय आणि त्यामुळेच त्याचा विचार हा ’मी कोण’च्या कितीतरी आधी झालेला!
आजच्या ’मूलगामी’ माणसानं अंगिकारलेला लैंगिकतेबाबतचा आकसयुक्त (taboo) आविर्भाव आणि त्याला छेद देणारा ’पुरोगामी’ माणसाचा नवा विचार हे दोन्हीही खुळचटपणाचं वाटेल इतका जास्त मोकळेढाकळेपणा आपल्या पूर्वजांनी अंगिकारला होता. कालौघात झालेले बदल, नवीन निर्माण झालेले पंथ, इतरत्र निर्माण झालेल्या सांस्कृतिक विचारांची आणि माणसांची सरमिसळ या सर्वांतच पूर्वजांचा तो मोकळा विचार झाकोळला गेला. आणि आता जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा ह्या मातीतच जन्माला आलेली पारदर्शक विचारधारा जणू काही परकीच वाटते!
’लैंगिकते’ला भारतीय सौंदर्यशास्त्राच्या परिभाषेत ’शृंगार’ ह्या संकल्पनेद्वारे अतिशय अप्रतिम पद्धतीने सामावून घेतलेले आहे. भारतीय सौंदर्यशास्त्राच्या मुळाशी नऊ रसांची रचना आहे, शृंगार, हास्य, कारुण्य, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत रस. ’शृंगार’ रस ह्या क्रमवारीत पहिला आणि ह्या नऊ रसांचा राजा गणला गेला आहे. ह्या अनुषंगानं एक फार मनोरंजक बाब नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे ५व्या ते ७व्या शतकाच्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या ’विष्णुधर्मोत्तर’ पुराणात असं म्हटलंय की, नगररचनेतील महत्वाच्या सार्वजनिक जागा व इमारतींवर अश्याच प्रकारची चित्रं, शिल्पकला असावी; ज्यात प्रामुख्याने शृंगार, हास्य आणि शांत रस व्यक्त केलेले असावेत. इतकेच काय, पण कितीतरी शतके आधी, ज्यांना भारतीय संस्कृतीमधील आदिम हस्तलिखितं म्हटलं जातं, त्या ऋग्वेदामधील ’काम’ आणि ’आसक्ती’बाबतची विवचने फारच स्पष्टपणे येतात.
एक महत्त्वाचा पैलू यात लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे प्राचीन भारतात ’धर्म’ आणि ’ऐहिकता’ यांची फारकत झालेली दिसत नाही. आणि यामुळेच भारतीय संस्कृतीमधील वैचारिक बैठक ही पाश्चिमात्त्य विचारधारेपेक्षा वेगळी ठरते. किंबहुना ज्या ठामपणे लैंगिकता ही स्वाभाविक जीवनक्रमाचा भाग म्हणून प्रस्थापित केली गेली, त्याचेच मूर्तरूप आपल्याला दहाव्या शतकात घडवल्या गेलेल्या खजुराहोच्या शिल्पकृतींमधून पहायला मिळते.
पण ह्या शृंगारिक शिल्पांचा केवळ स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर भाष्य करणे एवढा एकच उपयोग केलेला नाही. ह्यापलीकडे जाऊन काही क्लिष्ट, अमूर्त संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठीदेखील त्यांचा वापर केलेला आढळतो. उदाहरणार्थ उपनिषदांमधील काही तात्त्विक प्रश्नांची उकल करण्यासाठी (’अनंत’ आणि ’आत्मा’ या संकल्पनांमधील अतूट नाते इ.) स्त्री-पुरूष शृंगाराचा वापर शिल्पकृतींमध्ये रूपकात्मक (metaphoric ) पद्धतीने झाल्याचा दिसतो. कोणार्क, मामल्लापुरम्, कांचीपुरम्, पाटण अशा भारताच्या विविध प्रांतांत पसरलेल्या मंदिरांतील प्राचीन शिल्पकलेत अशी प्रतीकात्मकता पहायला मिळते.
शिल्पकला आणि चित्रकलेच्या बरोबरीनेच साहित्य आणि नाट्यकृतींमध्येदेखील स्त्री-पुरूष संबंध आणि शृंगार अतिशय सुंदर हाताळलेला दिसून येतो. इसवी सनाच्या तिसर्‍या शतकात वात्स्यायनाने लिहिलेले ’कामसूत्र’ हा ह्याचा सर्वात मोठा उपलब्ध पुरावा. लैंगिकता आणि त्या अनुषंगाने येणारे दैनंदिन जीवनातील इतर पैलू ह्यांविषयी भाष्य करणारे कामसूत्र म्हणजे जणू शास्त्रोक्त ’गाईड’च म्हणता येईल!
ह्या लेखात सर्वच महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणे शक्य नाही, पण कामसूत्राबरोबरच इतरही काही महत्त्वाच्या सहित्यकृतींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. जयदेवाचे ’गीत-गोविंद’, ’कुमारसंभवम’ यांसारखी नाटके, ’सेतूबंध’ आणि ’गाथा सप्तशती’ यांसारख्या महाराष्ट्री-प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यरचना, ह्या काही कृतींमध्ये शृंगार, लैंगिकता असे विषय अतिशय तरल पद्धतीने हाताळलेले आहेत.
एक मात्र नक्कीच की, चित्रकला, शिल्पकला, काव्य अथवा साहित्यकृती ह्या सर्वच कलाप्रकारांमध्ये आपल्या पूर्वजांनी ज्या मोकळेपणी जीवनाच्या सर्वच अंगांचा विचार केला, त्यात एक अभिरूचीपूर्ण आणि निकोप समाजाचे प्रतिबिंब आढळते.
– निवेदिता बर्वे
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *