Uncategorized

माझ्या प्रियकरांना…

(असं म्हणतात की, द बेस्ट लव्हस्टोरीज इन युअर लाइफ हॅपन व्हेन यू डोण्ट नो एनीथिंग अबाउट लव्ह. वेल, आय स्टिल डोण्ट थिंक आय नो एनीथिंग अबाउट लव्ह. पण नक्की आठवतंय, ‘नंदा प्रधान’ वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते. त्या सर्वांसाठी…)
***
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही.
तुटत तर त्याहून नाही…
जिग्-सॉ पझलसारखंच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधून जागच्याजागी बसवायच्या.
तसंच काहीसं होतं का नात्यांचं?
आपल्या मनात सगळ्याच नात्यांची काही काही रूपं असतात,
आणि मग माणसं बघून ती भरायची…
अपेक्षेपलीकडची नाती कधी असतात का?
घटना बदलतील कदाचित,
मथितार्थ मात्र तोच!
आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा झालाय,
कसं राहायचं मर्यादित प्रेम करत?
प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर
आणि प्रत्येक प्रियकरातला खूप रा मित्र.
आणि काही काही तर अगदीच कधीही न भेटलेले, पण…
कुणाचा धीरगंभीर स्वभाव आणि गाईचे डोळे,
कोणी उत्साहाचा झरा,
कोणाच्या कुंचल्यात जादू,
कोणाच्या गळ्यात.
कोणी प्रचंड आदराला पात्र,
आणि कोणासाठी उगीचच दाटून आलेली माया.
कोणी नुसते निर्मळ…
कोणी समजूतदार आणि प्रेमळ.
कोणाचा निर्हेतुक खमकेपणा,
तर कोणाचा सहेतुक थंडपणा…
माझं मलाच कळतंय आज प्रेम किती प्रकारे करता ञू शकतं…
आणि कदाचित पुढेही कळत राहील अजून किती प्रकारे?
तुम्ही मला प्रिय होतात…
इतरांपेक्षा प्रिय झालात.
प्रियतम… प्रियतर!
‘प्रियकर’???
हे लेबल लागलं की नाही,
याने खरंच कितीसा फरक पडतो…
प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता.
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं.
प्रश्न, उत्तरं, व्याख्या आणि बंधनं याच्या पार कधीच पोहचलेलं असतं मन.
आपण का व्याख्या मिळवायच्या नादात माणसं हरवून बसायचं?
शेवटी व्याख्या आली म्हणजे तिचं अपूर्णत्वही आलं,
अपवादही आले.
त्यापेक्षा शब्दांपलीकडचं सगळंच कसं पर्फेक्ट. परिपूर्ण.
काय फरक पडला आपल्या नात्यात, कबुली दिली गेली किंवा नाही त्यानं…
काय फरक पडला, तुम्हाला माहिती होतं तरी की नाही त्यानं…
आणि काय फरक पडला असता,
अजून काही घोटवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली असती तर त्यानंही?
खरं तर, नात्याच्या व्याख्येची खरी गरज तिसर्‍याच माणसाला असते.
कोणत्याही व्याख्येत न गुंतता प्रेम करू शकले,
म्हणूनच कदाचित तुम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं.
पण तुमच्यापैकी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याबद्दल कधी कधी वाटतं,
कदाचित कोणीच सर्वांगाने जाणलं नाही मला.
त्याचं वैषम्य वाटावं असंही काही नाही म्हणा.
हत्ती आणि आयुष्याच्या रूपकाप्रमाणे
करतच राहतो आपण चूक
कोणत्याही माणसाला जोखण्याची.
कदाचित मला स्वतःचा थांग अजून लागला नाहीये
त्यामुळे मी शिकलेय कोणाला ओळखल्याचे दावे न करायला.
पण तुम्ही?
तुम्हाला तरी पटलीये का ओळख स्वतःची खरंच?
आणि माझीही? पूर्ण नाही पण पुरेशी तरी?
त्यामुळे
ज्यांनी मला एकाच कोनातून जोखलं,
त्यांच्या वाट्याला दु:ख आलंही असेल…
ह्म्म…
तुम्हाला समजलं की नाही हे मला माहीत नाही,
पण तुम्ही कोणी कधीच नव्हतात एकमेकांच्या रीप्लेसमेंटसाठी.
माझ्या प्रिय प्रियकरांनो,
शेवटी आज मी जी काही आहे ती तुमच्यासकट आहे,
कोणाला – अगदी कोणालाही न वगळता.
माझ्या असण्यात जितकी मी आहे,
तितकेच तुम्हीही आहात.
शेवटी माझी तुमच्यापासून सुटका नाहीच.
जिथे स्वतःपासूनच सुटका नाही तिथे तुमच्यापासून कशी?
(तशी माझी सुटका तुमच्यापासून नव्हतीच कधी.
कारण मला बांधून घालणारेही तुम्ही नव्हतातच.
इथे स्वतःच्याच निर्दय तावडीत सापडलेय मी.)
असो.
तुम्ही भेटलात,
मी अजून भेटले स्वत:ला.
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,
सुकर वाटल्या असतील कदाचित,
उलट बर्‍याचदा तुमचा उत्प्रेरक म्हणून फायदाच झाला
त्या वाटा जोखताना.
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार…
– मेरा कुछ सामान
Facebook Comments

1 thought on “माझ्या प्रियकरांना…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *