Uncategorized

वाटा

सकाळ सकाळची गोष्ट आहे
जेव्हा ह्या वाटा निघतात इथून
दवात नि सांडलेल्या दुधात न्हाऊन
झाडूंनी खसाखसा अंग पुसून
गंधफुलांचे सडे माळून
मावळत्या दिव्यांत चाचपडत
बातम्या पोचवत
जातात इथून
आठेक वाजता जेव्हा
चहा पिऊन घरातून निघतात
तेव्हा जगबुडीच्या लगबगीने
स्टेशनकडे धावतात
नि गर्दीत स्वत्व हरवून
मिसळून जातात
मग ह्या बोळातून निघून
त्या गल्लीतून
तिकडच्या कंपाउंडवरून उडी मारून
चार घरं चुकवून
तिठ्यावरच्या चिंचेला वळसा घालून
गाड्यांना न जुमानता रस्ता क्रॉस करून
चौकात मेन रोडला लागतात
ही साधारण अकराएक वाजताची गोष्ट आहे
भर दुपारी
कल्हईवाले नि बोहारणींना
येणाजाणार्‍या मोलकरणींना
ईशान्त नाव असलेल्या मुलाला
कुणी थेट स्वयंपाकघरातून मारलेल्या
हाय पीच हाकांना
घराबाहेर टाकलेल्या कोळंबीवर
तुटून पडलेल्या कावळ्यांना
नि मांजरींच्या म्यावांना
खरकट्या पाण्याचे खिडकीतून
बिनदिक्कत खाली टाकलेले सडे झेलून
सुक्या पाचोळ्याने दिलेल्या करकरीत शिव्यांना
मुळीच भीक न घालता
बिल्डिंगांच्या आडोशाला
जऽरा पडतात
तेव्हा जिवाला किती गार वाटतात
दुपारच्या झोपेतून उठून
ग्लानीतच गप्पपणे
उन्हं कलण्याची वाट बघत
दबा धरून बसलेल्या वाटा
बटाटावड्यांच्या पहिल्या घाण्याबरोबर
अशा काही चुरचुरत जिवंत होतात
की दमलेला सूर्यसुद्धा
सावल्या लांब करून
कट्ट्याला रेलून
दाबेली नि वडापाव खात
त्यांच्याशी एकजीव होत होत
हरवून जातो
ह्या वाटांवरच्या संध्याकाळी
कधीच एकट्या येत नाहीत
कधी वारा येतो
कधी गजरा येतो
कधी चक्क वळवाचा पाऊस येतो
अनावर ओढीनं निघालेली
येणारी, जाणारी, परतणारी
माणसं दिसली
की वाटा लगोलग आपली दिशा बदलून
त्यांना वाट मोकळी करून देतात
तेव्हा वाटांच्या दुसर्‍या टोकांना
वाट पाहत उभी असलेली घरं, माणसं
नि समंजस वाटा
ह्यांच्यातलं आपलं नेमकं कोण
हे कळत नाही पटकन
ज्या विवक्षित वेळी
कुकरच्या शिट्ट्यांचे
टीव्ही सिरीअलच्या शीर्षकगीतांचे
नि सामुदायिक बोलण्यांचे
आवाज बंद होतात
तेव्हा कुठे वाटांवर रात्र होते
सोडिअम वेपरच्या प्रकाशात चमचमणारी
अभ्यासाच्या, इंग्लीश सिनेमांच्या
नि गजर्‍या-अत्तरांच्या
काही चुकार वाटा सोडल्या
तर सगळे फूटपाथ,
रस्ते, पथ,
स्ट्रीट, रोड
बोळ, गल्ल्या,
लेन, आळ्या,
पाऊलवाटा
झोपेतसुद्धा जात असतात
कुठूनतरी कुठेतरी
कशासाठी कळत नाही
पण रोज रोज जात असतात
मी येत असतो तेव्हा
मी जात असतो तेव्हा
मी वाट पाहत असतो तेव्हा
नि नसतो तेव्हा
मी कामात गढून जातो तेव्हा
नि फुकट बसतो तेव्हा
मला राहून राहून आठवतात तेव्हा
नि हो, मी त्यांना विसरतो तेव्हा
हो, अगदी तेव्हासुद्धा.
त्या वाटा निघतात इथून
नि दूर दूर जात राहतात
आत आत काळोखात
– ए सेन मॅन
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *