Uncategorized

सखी मावळला पश्चिमरेषेपाशी,
चंद्रमा स्तब्ध आकाशी
बघ विसावला अस्ताचलमाथ्याशी,
मध सांडून उंबरठ्याशी
वाळून गेल्या निशिगंधाच्या राशी,
उललेल्या ओष्ठकळ्यांशी
सोडून उद्याची भ्रांत,
ये नीज अशी गं शांत,
तू रातराणी रतिक्लांत –
ही मालवतो आता ज्योत उशाची,
थरथर ती रात्रभराची
तू मिटून घे जादू दो नयनांची,
भिरभिरत्या सुमपंखांची
गं शपथ तुला भिजलेल्या गालांची,
दंवभरल्या गवतफुलांची
होते अरुणाची नांदी
संपला खेळ स्वच्छंदी
ओसरे तमाची धुंदी –
मी आठवतो सरल्या संध्याकाळी,
घन उतरे गौर कपाळी
मन बैरागी फिरते रानोमाळी
पाखरू फुलांच्या गाली
सखी झोपी जा शांत चंपकाखाली,
ओढून मृदेची लाली
– मंदार गद्रे
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *