Uncategorized

उमाळ्याची स्वप्नं

धूसर डोंगरावर पलित्यांप्रमाणे
निळ्या आकाशाकडे ज्या आवेगाने
वैशाखवणवा झेपावतो
त्या आवेगाने भस्म होण्याला
जगणं म्हणावं.
कडेकपारी चढून ओरखडलेले हात
रखरखल्या केसांनिशी, रापल्या चेहर्‍यानिशी
थकल्या डोळ्यांनिशी
वाऱ्यावर झिंगून बेभान पडावं.
अशी उमाळ्याची स्वप्नं
मऊ गालिच्यात चिणलीयेत
आरस्पानी पातेल्यात उकळलीयेत
इस्त्री फिरवून, समांतर कोपरे नेमके दुमडून
पुस्तकात घडी करून
ठेवलीयेत.
अनवधानाने पान उघडतं
जेव्हा ‘वेडाला’
लोक ‘खूळ’ म्हणतात
तेव्हा.
– विशाखा
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *