Uncategorized

प्रेमकथा वगैरे

विक्रांतने नवीन खूळ घेतलं आहे. नेटबुक घेऊन कुठेतरी जायचं आणि ‘मी लेखक आहे’ ह्याची जाहिरात करत काहीतरी डेंजर लिहायचं. हल्ली काही लोक डेंजर, बेक्कार, अगदी घाण वगैरे शब्दही चांगल्या अर्थाने वापरतात. नगरला म्हणे ‘बेक्कार वडापाव’ नावाचं दुकान आहे. मधे काका म्हणाला होता, त्याची होणारी बायको ‘भयंकर सुंदर’ आहे. अरे, भयंकर सुंदर काय? काहीही. तर विक्रांत डेंजर काहीतरी लिहितो.
आत्ता परवा म्हणाला, “प्रेमकथा लिहिल्ये मी.”
मी अवाक होऊन पाहिलं त्याच्याकडे. प्रे-म-क-था? आणि तीसुद्धा वि-क्रां-त?
“नरेट करतो तुला,” असं ऐकलं आणि अण्णाने डोश्याच्या तापलेल्या तव्यावर पाण्याचा हबका मारल्यावर जे काही होतं ते मला झालं. कारण विक्र्याची गोष्ट म्हणजे न तापलेल्या तव्यावर घातलेल्या डोश्यासारखी असते. ‘एक मुलगा असतो’ असं म्हणत त्याने चाफेकळीची (अंगठ्याशेजारचं बोट) नखुर्डी निघालेली खाल्ली.
बाकी आमचं काही पटो -ना -पटो, आमच्या खाण्याच्या आवडीनिवडी जुळतात भार्रीच! फक्त मी रवंथ करत बसत नाही, तो बसतो. ‘एक मुलगा असतो’ ह्याच्या पुढे ‘आणि एक मुलगी असते’ हे वाक्य येणार आहे हे शेंबडं पोरही सांगेल, पण उगाच इतकं फुटेज खायचं ना… (मला तेपण खायला आवडतं.)
मग एक दशलक्ष क्षणांनी तो म्हणाला,”आणि एक मुलगी असते,”आणि गायक-वादक समेवर दाद मिळवण्यासाठी जसं श्रोत्यांकडे बघतात, तसं त्याने माझ्याकडे पाहिलं. अश्या वेळी एखादा बहिरा श्रोता जे करेल तेच मी केलं. चेहरा जेवढा मख्ख ठेवता येईल, तेवढा मख्ख ठेवला.
“आपण मॅकडीमधे जाऊ या, इथे मूड येत नाही.”
मॅकडीमधे प्रेमकथा नरेट करायचा मूड कसा येऊ शकतो?
मुळात विक्याला प्रेमकथा नरेट करायचा मूडच कसा येऊ शकतो? तो ‘मी त्या गावाला जाऊन आलोय, गाव लई बेक्कार आहे’ गटात मोडतो. (बेक्कारचा इथला अर्थ आपल्याला हवा तसा लावावा.) एकदा कधीतरी प्रेमात पडून उठल्यावर, किंवा आपण प्रेमात पडलोय असं वाटून मग आपला प्रेमभंग झालाय असं वाटून झाल्यावरच्या लोकांचा गट असतो हा. जवळजवळ सगळे सिंगल लोक ह्या गटात मोडतात. 🙂
तर ह्या लोकांचं कसं असतं की – एकतर “दुरुन डोंगर साजरे” किंवा “कोल्ह्याला द्राक्ष आंबट” – काहीतरी एक असतं. म्हणजे –
गट १ : दुरून डोंगर साजरे. प्रेमात पडलोय असं फक्त वाटल्यामुळे ‘प्रेम’ ह्या संकल्पनेबद्दल असल्या कायच्या काय भारी कल्पना करून ठेवतात की बास्सच. माझा प्रियकर (हा शब्द नाही वापरत म्हणजे…) असा एकदम हिरो मटेरिअल असेल, तो स्मार्ट असेल, हुषार असेल, मनमिळाऊ असेल, प्रेमळ असेल, आणि हॅण्डसमपण असेल, आणि शॉपिंगलापण येईल, आणि पैसेही खर्च करेल. किंवा माझी प्रेयसी (हा शब्दही नाही वापरत) हॉट असेल, सेक्सी असेल, पण कौटुंबिक टाईपची असेल, माझं ऐकेल, माझ्या आईचं ऐकेल, वगैरे काय काय… आम्ही कॉफी पिऊ, पावसात भिजू, रात्री चांदण्यात फिरू आणि अजून असं काय काय…
गट २ : कोल्ह्याला द्राक्ष आंबट. प्रेमभंग (अनेक केसेस मधे क्रश-भंग) झाल्यानंतर मग कोल्ह्याला तो क्रश आंबट लागायला लागतो. द्राक्षांपेक्षा नासलेल्या द्राक्षांपासून बनवलेले द्रवपदार्थ गोड लागायला लागतात. मग हे लोक ‘प्रेम’ ह्या संकल्पनेला इतक्या शिव्या घालतात. आणि जनरलच प्रेमात पडलेल्यांना बावळट वगैरे मानायला लागतात.
बाय द वे, रिसर्च सांगतं की हे गट म्युचुअली एक्स्कक्लुझिव नाहीत. कोल्ह्याला डोंगर आंबट किंवा दुरून द्राक्ष साजरी दिसू शकतात.
तर मुद्दा राहतोय बाजूला. विक ह्या दोन्ही गटात अधूनमधून फिरत असतो. सो त्याने प्रेमकथा लिहावी म्हणजे जरा अतीच होतं. मग मॅक्डीच्या टेबलवर बसल्यानंतर त्याने रॉनल्ड मॅकडोनाल्डकडे पाहिलं.
“तेजू…”
मी बाजूच्या मुलाचं ‘हॅप्पी मील’मधे मिळालेलं खेळणं बघण्यात बिझी होते. त्याने परत हाक मारली, “तेजू…”
मग नाईलाजाने मला त्याच्याकडे बघावं लागलं. ह्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना ओठांना, हनुवटीला खाताना काहीतरी लागणं ही कल्पना इतकी का आवडते? म्हणजे फिल्ममधे ठीक आहे. पण प्रत्यक्षातही का नं? का? पुसावं की तोंड बर्गरचं चीझ लागल्यावर. विक्याच्या म्हणण्यानुसार ते चीझ सांडलं नाही बर्गर खाताना, तर त्याचं चीज होत नाही.
“तेजू, एकदा ना रजनीकांतने मॅक्डीत येऊन इडली-सांबार मागवला आणि रोनाल्ड त्याला नाही म्हणाला. तेव्हापासून तो इथे बाहेरच बसतो.”
मुळात एकतर आता रजनीकांतचं अजीर्ण झालंय (माझा ब्लॉग ह्या विधानानंतर बंद पडू शकतो. पण खरं खरं झालंय राव.) आणि त्यात विक्याने ‘पाव किलो मैदा, अर्धा किलो साखर, अर्धा किलो चहा पावडर, एक हमाम’च्या चालीत हा जोक सांगितल्यावर कोणाला का हसू येईल? मग मी माझा मख्ख चेहरा क्रमांक २ दाखवला.
“तू आज हरवली आहेस तेजू. जाऊ दे, हा प्रेमकथा सांगण्यासाठी चांगला दिवस नाहीये,” म्हणून तो तिथून निघाला. मॅक्डीमधे टीप देणारा माझ्या ओळखीतला एकमेव माणूस आहे विक्या. हा फंडा नाही कळलाय मला कधी. लोक टपरीवर कधी टीप देत नाहीत आणि चांगला पगार मिळणार्‍या ठिकाणी वेटर्सना भरमसाठ देतात.
मग मी निघाले. रिक्षात बसल्यावर २ मिनिटात विक्याचा एसेमेस आला – ‘मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात. पण मुलगी त्याला सोडून निघून जाते. आणि तिचं लग्न ठरतं. लग्नाच्या दिवशी हिरो तिच्याकडे जातो आणि ती त्याला हो म्हणते आणि दे लिव्ह हॅपिली एव्हर आफ्टर.’
कोल्हा, डोंगर, आंबट, साजरी, द्राक्षं, सगळे दूरवर पसरतात. रिक्षावाला कुठे जायचंय विचारत असतो आणि मग मी माझा मख्ख चेहरा क्रमांक ३ दाखवते.
– जास्वंदी
Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *